आपल्या ब्लॉगला एक लाखाचा टप्पा गाठायला जवळपास तीन वर्षे लागली, आपल्या ब्लॉग चे स्वरुप, मांडणी, सकस-दर्जेदार लेखन, पोष्ट्सची संख्या, विषयांतले वैविध्य आणि सातत्य याचा विचार करता हा टप्पा कितीतरी आधीच गाठायला हवा होता, निदान माझी तरी तशी अपेक्षा होती.

ण का कोणास ठाऊक तसे झाले नाही. संख्ये पेक्षा गुणात्मक प्रगती मी जास्त पसंत करतो असे जरी असले तरी इतके सकस लिखाण लोकां पर्यंत का पोचू शकले नाही किंवा ते लोकां पर्यंत पोहोचवण्यात मी काहीसा कमी पडलो , याची मला राहुन राहुन खंत वाटते.

एका ज्योतिष विषयक मराठी ब्लॉग वर पाच वर्षात फक्त ५० पोष्टस आहेत . गेल्या तीन वर्षात फक्त ५, जानेवारी २०१६ नंतर एकही नविन पोष्ट नाही, असे असताना त्या ब्लॉग ला रतीब घातल्या सारखे रोजच्या ५० पेज व्हूज !! तुलनेत २६० पोष्टस, सरासरीने महीन्याला ८ नव्या पोष्टस असे असताना आपल्या ब्लॉग वर कसेबसे रोजचे १२५ – १५०इतके कमी पेज व्हूज ? हे असे का हे मला एक अद्याप न उलगडलेले कोडेच आहे!

वाचकांचा असा अत्यल्प प्रतिसाद मिळताना पाहून निराश व्हायला होते. चांगले लिहून सुद्धा वाचक ब्लॉग वर फिरकत नसतील, कोणी वाचत नसेल तर स्वत:चा अमूल्य वेळ खर्च करुन हा उद्योग कशाला करायचा? ब्लॉग च्या माध्यमातून माझ्या व्यवसायाबद्दल लोकांना माहीती होते (म्हणजेच जाहीरात होते) हा भाग खरा असला तरी , माझा ब्लॉग वाचून माझ्या कडे येणार्‍यांपेक्षा , ज्याला आपण ‘माऊथ टू माऊथ पब्लीसीटी’ म्हणतो त्याद्वारे माझ्या कडे येणार्‍यांची संख्या कितीतरी मोठी आहे, ब्लॉग बंद केला तरी काही अडणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बास झाले, व्यवसायाची जाहीरात करुन झाली, लिखाणाची हौस होती ती पुरी झाली, आता थांबवू या हे सगळे , असे पुन्हा पुन्हा वाटत असते. पण मायबाप वाचकांच्या कळकळीच्या विनंतीला मान देऊन मी लेखन चालू ठेवले आहे.

खरे तर मराठीतले लिखाण, तेही ज्योतिषा सारख्या रुक्ष विषयावर इथेच मुळात गणित फसले होते. मी ब्लॉग सुरु केला तो फार उशीरा,२०१४ मध्ये , या वेळे पर्यंत ब्लॉग्ज ना उतरती कळा लागली होती, २०१०-२०११ पर्यंत सर्वच ब्लॉग्ज जोरात होते कारण दुसरे पर्याय उपलब्ध नव्हते, २०१०- २०११ नंतर टच स्क्रिन वाल्या फोन्सचे अमाप पीक आले, फोन्स च्या किंमतीही आवाक्यात आल्या आणि पुढे पुढे तर फोन ची उपयुक्तता लक्षात आल्याने महागडा फोन सुद्धा बिनदिक्कत खरेदी केला जाऊ लागला. नोकीया फिचर फोन चा बाजार उठला , ते ठोकळे धाडधाड कचर्‍याच्या पेटीत गेले, आता बघावे त्याच्या हातात शामसिंगाचा किंवा मायक्रोमॅक्सचा टच फोन ! एकेकाळी ज्यांना फक्त सायबर कॅफेत जाऊन वेबसाईट्स बघायच्या (किंवा हाफीसातले फुकटातले इंंटनेट !) हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता ते आता हातातल्या स्मार्ट फोन वरुन इंटरनेट वापरु लागले, इंटरनेट चा वापर कमालीचा वाढला, इंटरनेटची गतीही वाढली, सुरवातीला महाग वाटणारे 3G आता आवाक्यात आले. हळूहळू ह्या जादाच्या खर्चाचा लोकांना बाऊ वाटेनासा झाला, इंटरनेट चा डेटा पॅक ही एक अत्यावश्यक गरज झाली, दुध , भाजी, किराणा तसाच डेटा पॅक ! एकंदरच इंटरनेट सारखे जबरदस्त ताकदीचे माध्यम सहजगत्या उपलब्ध झाले , रुजले आणि चटकन स्विकारले गेले.

मायक्रोवेव्ह ओव्हन, रेफ्रिजरेटर , वॉशींग मशीन, इंडक्शन कुकर सारखी आधुनिक इलेक्टोनिक्स उपकरणें बाजारात येऊन सुद्धा बराच काळ ती शो-रूम्स मध्येच राहीली, घरोघरी पोहोचायला त्यांना बरीच वर्षे लागली. वॉशिंश मशीन काही कामाचे नाही, कपडे स्वच्छ निघत नाहीत, सगळे आपल्यालाच करावे लागते, पापड भाजण्या पलीकडे मायक्रोवेव्ह चा काही उपयोग नाही, बर्फ करायला , मासे- मांस ठेवायाला फ्रिज लागतो नाहीतर त्याचा काय उपयोग अशा अनेक भ्रामक कल्पना लोकांच्या मनात कित्येक वर्षे घर करुन होत्या पण हळू हळू लोकांना ह्या उपकरणांची उपयुक्तता पटली आणि ती स्विकारली गेली. आज ही उपकरणे स्टेट्स सिम्बॉल न राहता एक अत्यावश्यक गरज बनली, आज या उपकरणां शिवाय घर ही कल्पनाही आपण सहन करु शकत नाही !! स्मार्ट फोन आणि इंटरनेट च्या बाबतीत मात्र प्रयोगशाळेतली कल्पना ते अर्ली अ‍ॅडॉप्टर्स ग्राहक ते सर्वसामान्य ग्राहक (म्हणजे कोणीही !) हा प्रवास न भूतो न भविष्यती इतक्या कमालीच्या वेगाने झाला. दिसेल त्याच्या अंगावर दिसायला ‘जिन्स ‘ सारख्या महावस्त्राला सुद्धा बराच काळ झगडावे लागले , त्या तुलनेत स्मार्ट फोन आणि इंटरनेट चा हा प्रवास थक्क करुन सोडणारा आहे! (हे इंटरनेट , स्मार्ट फोन नव्हते तेव्हा आपण काय करत होतो हो?)

खरे तर हा बदल ब्लॉग्ज आणि वेबसाईट्च्या पथ्थ्यावर पडायला हवा होता पण तसे व्हायचे नव्हते आता इंटरनेट चा वापर जरी शतपटीने वाढला असला तरी लोक इंटरनेट ब्लॉग्ज आणि वेबसाईटस बघायला नव्हे तर वेगळ्याच पद्धतीने / वेगळ्याच कामा साठी वापरु लागले. त्या काळातले सर्वच ब्लॉग्ज / वेबसाईट्स या मोठ्या स्क्रिन वर वाचल्या जातील असे गृहीत धरुनच तयार केलेल्या होत्या , स्मार्ट फोनचा चार – पाच इंचाचा पिटुकला स्क्रिन त्यांना न्याय देऊ शकला नाही. हेवी ग्राफीक्स , फ्लॅश अ‍ॅनीमेशन वाल्या वेबसाईटस , कमालीचा वेळ लावत , भरपुर डेटा खात लोड होऊ लागल्या आणि लोड झाल्या(च) तरी त्या लहान स्क्रीन वर कधीच व्यवस्थित दिसल्या नाहीत, लहानश्या स्क्रिन वर स्क्रोल करत मजकूर वाचणे म्हणजे एक डोकेदुखी ठरली. साहजीकच स्मार्ट फोन वरुन व्यवस्थित बघता येत नसल्याने ब्लॉग्ज अणि वेबसाईट्स मागे पडल्या. मग इंटरनेट नेमके कशासाठी वापरले जाऊ लागले?

फेसबुक व्हॉट्सॅप आणि व्टीटर ! या नवीन संपर्क माध्यमांनी सारे चित्रच पालटून टाकले , ही माध्यमे आली अक्षरश: वायुवेगाने पसरली, आश्चर्याने तोंडात बोटें घालावी इतक्या झपाट्याने ती लोकप्रिय झाली. मित्र – मैत्रीणांच्या संपर्कात राहणे , ख्याली खुशाली कळवणे , निरोपांची देवाण घेवाण, स्टेट्स अपडेट करणे, कॉमेंट्स मारणे, लाइक्स देणे , वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, फोटो डकवणे, पोष्ट्स लिहणे, व्हीडीओज टाकणे अशा असंख्य गोष्टीं लोक लीलया करायला लागले, जे ब्लॉग, वेबसाईट सारख्या माध्यमां द्वारा कधीच शक्य नव्हते , शिवाय ही नवी माध्यमे मुळातच कमालीची आकर्षक , सहज -सोपी , लोकांचा सक्रीय सहभाग असलेली सर्वसमावेशक ठरली. एकेकाळी काही निवडक (भाग्यवान!) लोकांना उपलब्ध असलेली ही संपर्क – गंगा आता कोणाच्याही दारात खळाळुन वाहू लागली, मग काय या वाहत्या गंगेत सगळ्यांनीच हात धुऊन घ्यायला सुरवात केली. ज्यांनी आयुष्यात कधी कॉम्प्युटर ला हात लावला नव्हता ते सर्व आता कॉम्प्युटर शिवाय ही सफाईने इंटरनेट वापरु लागले आणि ते ही मनमुराद. या संपर्क माध्यमांनी राजकारणाचे कौल ठरवले / फिरवले, सामाजीक क्रांतीचे वणवे पेटवले. एका को-बोर्ड च्या फटक्यात क्षणात लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचे अचाट बेफाट सामर्थ्य अगदी सामान्य माणसाच्याही हातात आले.

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप वर नसणे किंवा फेसबुक वर अकौट नसणे हे एक मागासलेपणाचे किंवा मतीमंदपणाचे प्रमुख लक्षण मानले जाते!

बघता बघता फेसबुक , व्हॉट्सॅप ग्रुप्स सुरु झाले, आज प्रत्येक जण डजनाच्या घरात अशा ग्रुप्स चा सभासद आहे. आता माहीती (कॉपी-पेष्ट) ची देवाण घेवाण करण्यात लोकं तरबेज झाली, जे काही व्हायचे (हॅपनिंंग्ज) ते सगळेच या तीन संपर्क माध्यमांंतूनच होऊ लागले. ब्लॉग आणि वेबसाईट अधिकच केविलवाण्या झाल्या , तिथे आता कुत्रं फिरकेना. मोठ्या मोठ्या वेबसाईटसनी काळाची पावलें ओळखून स्वत:ची अ‍ॅप्स आणली , त्यांची फेसबुक पेजेस आली, फॅन क्लब्ज आले. आता लोक मुख्य वेबसाईट ला भेट देण्या पेक्षा अ‍ॅप च्या माध्यमातून कामे उरकू लागले. अल्पावधीतच या सार्‍यांची लोकांना इतकी चटक लागली की आता फेसबुक, व्हॉट्सॅप, ट्वीटर च्या पलिकडेही काही बघायला कोणी तयारच नाही किंबहुना या पलीकडे जाऊन ही बरेच इंटरनेट शिल्ल्क आहे हे कित्येकांच्या गावीही नाही! ‘दुध कारखान्यात बनते , पाऊच मध्ये पॅक होऊन आपल्या घरी येते’ असा समज जसा मोठ्या शहरातल्या लहान मुलांचा झालेला असतो तसेच काहीसे या इंटरनेट च्या बाबतीत झाले आहे !

या जबरदस्त झंझावातात मोठे मोठे याहु किंवा तत्सम वेब बेस्ड डिस्कशन ग्रुप अक्षरश: संपले, आमचा एक याहु चर्चा ग्रुप होता, ८००० च्या वर सभासद होते त्यात ३०० च्या आसपास कमालीचे सक्रिय सभासद होते , ज्योतिषावर मोठ्या हिरीरीने चर्चा करायचो आम्ही, हा ग्रुप ही ईतका रोडावला की जिथे एकेकाळी दिवसाला १०० पोष्ट्स असायच्या तिथे आता महीन्याला ५ सुद्धा पोष्ट पडत नाहीत , ज्या पाच पडतात त्यातल्या तीन स्पॅम पोष्ट्स ! ब्लॉगजची तर पार धुळधाण उडाली, बहुतेक ब्लॉगज वर शुकशुकाट झाला, एकेकाळी महिन्याला पन्नास हजारां पेक्षा जास्त पेज व्हूज मिळवणारे ब्लॉग्ज आता कसेबसे चार – पाच हजार पेज व्हूज मिळाले तरी समाधान मानायला लागले. ब्लॉग्ज तर सोडाच मोठ्या मोठ्या बलाढ्य वेब-साईट्सची सुद्धा वाचकवर्ग टिकवताना दमछाक होऊ लागली.

ते काही ही असो, काहीश्या प्रतिकूल परिस्थितीत, उशीराने का होईना , आपल्या ब्लॉग ने एक लाखाचा पल्ला गाठला याचेच मला मोठे समाधान आहे !

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Upen

  I daily view ur blog…..excellent. Pl continue without comparing with other one……सकस ते टिकेलच! Your thoughts and situation analysis are suparb.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. उपेनजी,

   माझे लेखन जास्तीतजास्त वाचकां पर्यंत पोहोचावे असा माझा प्रयत्न असतो, ज्या ब्लॉग्ज ना मोठा वाचक वर्ग लाभला आहे तो कशामुळे ह्याचा शोध त्यासाठीच घेतला जातो आहे. त्यातुन माझ्याकडून होत असलेल्या चुकां, ब्लॉग मधल्या राहुन गेलेल्या उणीवां समजण्यस मदत होते त्याच बरोबर साधारण कोण्त्या प्रकाराचे लेखन वाचकांना जास्त पसंत आहे याचा ही काही अंदाज येतो. अर्थात अनेक वाचकांना काहीतरी चटकदार, खमंग (त्यात अश्लील भाषेतला मजकूर पण येतो) हवे असते , मी असे लेखन करु शकत नाही किंवा करणार नाही हा भाग वेगळा.

   असो. माझे लेख अधिक माहिती पूर्ण , नवे नवे विषय हाताळणरे , वचाकांना काहीतरी देणारे असावेत हे बघितले जाईल. आपल्या सारख्या वाचकांच्या पाठींब्यावर तर हा लेखनाचा उद्योग करत आहे .

   सुहास गोखले

   0
 2. संतोष

  सुहासजी,

  तुमची लेख लिहितानाची मेहनत वाखानान्या सारखी आहे.
  तुम्ही असेच दर्जेदार लेखन करत रहा आणि पुढील लेखा साठी शुभेच्छा.

  तुमचे ग्रहयोगावरील पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी ,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   पुस्तकांचे (तीन पुस्तके पाईप लाइन मध्ये आहेत) लिखाण जवळजवळ पूर्ण आहे पण प्र्काशन करणे हा प्रकार सुरवातीला जितका सोपा वाटला तितका नाही, मोठ्या प्रमाणात फसवाफसवी, पिळवणूक होते असे दिसते. एका नवाजलेल्या प्रकाशनाने सुरवातीला खूप उत्साह दाखवला , जसे पुस्तक पुर्ण होत आले तसे त्यांनी पैसे मागायला स्यरवात केली,. आत्ताची त्यांची मागणी ५०,००० रुपयांंची आहे ते पैसे दिले तरच पुस्तक प्रकाशीत करणार ! त्यामुळे मी स्वत:च ती पुस्तके स्वत:च्या खर्चाने छापून घेऊन स्वत:च त्यांची विक्री करण्याचे ठरवत आहे. त्या आधी या पुस्तकांची एक लघु (संक्षीप्त) आवृत्ती ‘किंडल’ फॉरमॅट मध्येही उपलब्ध करुन द्यायचा विचार आहे. बघुया कसे जमते ते…

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.