आपण सगळेच ज्योतिषशास्त्र शिकत आहोत….

कोणी क्लास लावला आहे कोणी बुकं वाचून शिकतोय . माझ्या ‘ज्योतिष मार्गदर्शन’ या फेसबुक ग्रुप वर आपण पत्रिका सोडवण्याच्या अभ्यास ही करत आहोत. ज्योतिष मार्गदर्शन

हल्लू हल्लू का होईना आपली प्रगती होत असली तरी जे महानुभाव याच वाटेवरून चालून ‘बनचुके’ पातळीवर पोहोचलेत त्यांच्या कडून एखादी गुरु किल्ली , एखादा नुस्का, सुगरणीचा सल्ला मिळाला तर?  नेकी और पुछ पुछ!

चला तर मग जगातल्या अशाच काही विद्वान ज्योतिर्विदांच्या मुलाखतीतून उलगडलेला त्यांचा जीवनपट पाहू , त्यांनी केलेली साधना, त्यांना आलेले अनुभव, त्यांची मते , पत्रिका कशी सोडवतात, पत्रिकेतले कोणते घटक त्यांना महत्त्वाचे वाटतात , ज्योतिषशास्त्रा कडे ते कसे बघतात, नव्या ज्योतिषांना त्यांचा काय सल्ला आहे इ. सारे सारे जाणून घेऊ!

अर्थात एक दोन अपवाद वगळता सगळे ज्योतिर्विद फिरंगी आहेत (भारतातले बनचुके ज्योतिषी असे काही मोकळेपणाने सांगतील , आपले अनुभव शेअर करतील असे वाटते तुम्हाला ?)

एक बडी लेखमाला … मराठी ज्योतिष विश्वात प्रथमच!

 


अर्थात इथे मी एक नमूद करतो, ह्या मुलाखती मी घेतलेल्या नाहीत ! ज्यांनी या मुलाखती घेतल्या त्यांच्या बद्दल मी या लेखमालेच्या शेवटी सविस्तर लिहून त्यांचे श्रेय त्यांना देणार आहेच. मूळ कल्पना व त्याची कार्यवाही त्यांचीच आहे मी केवळ त्यांची पालखी वाहणारा भोई.


या लेखमालेची सुरवात आपण करू  सौ. कोमील्ला सुट्टॉन यांच्या मुलाखती पासून.

जन्माने भारतीय असलेल्या सौ. कोमील्लाजी एका ब्रिटिश सदगृहस्थांही विवाह करून सध्या इंग्लंड मध्ये स्थायिक आहेत.

‘कोमील्ला सुट्टॉन’ नावावरून आपल्याला फारसा बोध होणार नाही पण या कोमील्ला पूर्वाश्रमीच्या कु. कोमील्ला विर्क आहेत हे कळल्यानंतर आपल्या पैकी काहींना , (खास करून १९६० किंवा आधी जन्मलेल्या) त्यांची ओळख पटेल. ज्यांना अजूनही कोमील्लांजींची ओळख पटली नसेल त्यांच्या साठी:

सौ. कोमील्लाजी  १९७० च्या दशकात (शेवटी शेवटी) हिंदी चित्रपट सृष्टीतल्या गाजलेल्या अभिनेत्री होत्या !

मि.एक्स, जख्मी दिल, सुझाने , अधुरा आदमी, प्लॉट नं 5, दो पोस्ती, संपूर्ण संतोषी माँ की कहाँनी, गरम खून, शादी के पेहेले, दि बर्निंग ट्रेन, प्रेमिका, जानदार, जाट पंजाबी, सुहाग, शैतान मुजरीम, भक्ती में शक्ती,  परमात्मा, तुम्हारी कसम, ड्रीम गर्ल, दरिंदा, खेल खिलाडी का, ये है जिंदगी, नागिन, छोटी सी बात, जान हाजिर है, चोरी मेरा काम, ईश्क ईश्क ईश्क

अशा सुमारे ४०+ हिंदी / पंजाबी चित्रपटांतून त्यांनी लहान – मोठ्या भूमिका साकार केल्या आहेत.

एके दिवशी अचानक त्यांनी चित्रपट सृष्टीतले आपले चांगले बस्तान बसलेले करियर सोडून परदेशात स्थायिक व्हायचे ठरवले. आज त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ञ ज्योतिर्विदा म्हणून ख्यातनाम आहेत. इंग्लंड मधल्या आघाडीच्या वैदिक (पारंपरिक) ज्योतिषी म्हणून त्या सर्वदूर परिचित आहेत , ज्योतिष मार्गदर्शन, ज्योतिष अध्यापन, ज्योतिष विषयक ग्रंथ लेखन अशा अनेक अंगांनी बहरलेली त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी आहे.

त्यांची वेबसाईट: https://komilla.com/

त्यांनी लिहलेली काही पुस्तकें:

१) The Nakshatras :The Stars Beyond the Zodiac
२) The Essentials of Vedic Astrology
३) Lunar Nodes : Crisis & Redemption
४) Personal Panchanga and the Five Sources of Light
५) Vedic Love Signs
६) Indian Astrology

सौ. कोमिल्लाजी आपल्या विद्यार्थांंना ज्योतिषशास्त्राचे धडे शिकवताना.

Komilla Sutton is the co-founder and chair of the British Association for Vedic Astrology. She is on the faculty of the American College of Vedic Astrology. Komila is a council member of the Astrological Association of Great Britain. As an internationally renowned consultant, Komilla is also a teacher and lecturer. Indian born, Komilla Sutton is one of the pioneers in creating opportunities for Vedic Astrology to be more accessible for western readers.

 चला तर ही ज्योतिर्विदा काय म्हणतात ते:

 

प्रश्न: मला माहिती आहे , पौर्वात्य देशांत , खास करून भारतात, गुरु – शिष्य परंपरेला फार मोठे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाच्या बाबतीत या गुरु- शिष्य परंपरेला म्हणजेच गुरु मुखातून विद्या ग्रहण करण्याला किती महत्त्व आहे?   

 

आपले निरीक्षण अगदी बरोबर आहे, भारतात ज्योतिषविद्या ही अशी गुरु- शिष्य परंपरेतूनच हस्तांतरित होत आली आहे. बदलत्या काळांनुरूप भारतातही नवी दिल्ली, मुंबई येथे ज्योतिष शिकवणारी विद्यालये स्थापन झाली असली तरी, गुरु – शिष्य परंपरा अद्यापही आपले महत्त्व राखून आहे. गुरु शिष्याची परीक्षा घेऊन , त्याची ग्रहण क्षमता पाहून ठरवतो , या शिष्याला काय शिकवायचे आणि काय शिकवायचे नाही. या शास्त्रातली काही गुपिते अपात्र व्यक्तींच्या हाती पडू नये म्हणून ही दक्षता घेणे जरुरीचे आहे.

ज्योतिषविद्या शिकणे एक मोठी वेळ घेणारी आणि कष्टसाध्य प्रक्रिया आहे. मी वाचले आहे की साधारणपणे या प्रक्रियेला किमान १२ वर्षे द्यावी लागतात, ज्ञानाच्या कारक ग्रहाचे , गुरु चे राशी चक्रातले एक भ्रमण.

अगदी अलीकडच्या काळा पर्यंत भारतात ज्योतिष व्यवसाय , जर त्याला व्यवसाय म्हणयचेच असेल तर , हा वंशपरंपतेतुन चालत आलेला आहे, ज्योतिषाचा मुलगा ज्योतिषीच होत असे त्यामुळे अगदी लहानपणा पासून या विद्येचे बाळकडू म्हणा किंवा संस्कार म्हणा आपोआपच मिळायचे.

पण आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे,  अधिक अधिक लोक ही विद्या मोठ्या उत्साहाने शिकत आहेत त्यांच्यातल्या बहुतेकांना ज्योतिषाचा कोणताही वंशपरंपरागत वारसा नाही.

असे असले तरी ज्योतिषविद्या ही गुरु मुखातूनच शिकावी असे माझे मत आहे.

प्रश्न: आपण म्हणालात की ज्योतिषविद्या शिकण्याला किमान १२ वर्षे द्यावी लागतात, याचा अर्थ इतकी वर्षे शिकल्या नंतरच मग एक ज्योतिषी म्हणून काम करायला सुरवात करायची का साधारण सहा – सात वर्षांच्या अभ्यासानंतर काम चालू करता येईल?

नाही, बारा वर्षाचे चक्र ही एक साधना आहे, या काळात फक्त अभ्यास करायचा , लोकांना भविष्य सांगायचे नाही. गुरु जे जे सांगेल ते ते फक्त आत्मसात करत राहणे इतकेच काम. तसे पाहिले तर थोडा प्राथमिक अभ्यास झाला की पत्रिका समजायला लागते पण त्यातले बारकावे समजायला मी म्हणते तशी किमान बारा वर्षाची साधना/ तपश्चर्या आवश्यक आहे. अर्धवट ज्ञान किती धोकादायक असते हे मी वेगळे सांगायला नकोच.
पण आजकाल कोणाला बारा वर्षाची साधना करायला वेळ आहे ? जरा थोडे फार समजायला लागले की झाले ‘ज्योतिषशास्त्री’ !

प्रश्न: आपला ज्योतिषशास्त्राशी परिचय कसा झाला ?

मी ज्या घरात जन्मले तिथे ज्योतिषाची कोणतीही परंपरा नव्हती. मी जन्मले तेव्हा, म्हणजे १९५३ मध्ये,  आमचे कुटुंब भारताच्या फाळणीच्या जखमां मधून सावरत होते.  माझे वडील लष्करी अधिकारी असल्याने घरात पाश्चात्त्य वातावरण होते. भारतीय संस्कृती / संस्कार मला माझ्या आजी-आजोबां कडून मिळाले. बहुतांश भारतीय घरांतून असते तसे आमच्याही घरात ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषां बद्दल एक आदर / श्रद्धा होतीच.  पार जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या सर्व प्रवासात या ना त्या कारणाने ज्योतिषांशी सबंध येतच राहतो. भारतात ज्योतिषशास्त्र , धार्मिकता, रुढी- परंपरा, पुराणे (मायथॉलॉजी) यांचे एक अजब मिश्रण झालेले सापडते , इतके की या गोष्टीं एकमेकांपासून वेगळ्या करताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. पाश्चात्त्यांना हे जरासे अजब वाटेल पण भारतात हे सगळ्यांच्या जीन्स – क्रोमोसोम्स मध्ये विणले गेले आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच असेल कदाचित भारतातल्या विद्यार्थ्याला ज्योतिषविद्या तुलनात्मक रित्या लौकर अवगत होऊ शकते. भारतातला विद्यार्थी जे आहे ते जसेच्या तसे स्वीकारतो फार प्रश्न विचारत नाही!

मी जरी भारतीय वंशाची असले तरी मी ‘हिंदू’ धर्मीय नाही. मी ‘शीख धर्मीय’ आहे. शीख धर्म तसा अवघा चारशे वर्षाचा म्हणजे इतर धर्मांच्या मानाने नवा आणि तरुण देखील. माझ्या धर्मात देव देवता, मूर्ती , कर्मकांडे या पेक्षा ‘ज्ञानाला’ मोठे महत्त्व आहे आमच्या धर्माचे तत्त्वज्ञान असलेला ‘ग्रंथ साहीब’ हा ग्रंथच आमचे दैवत आहे. माझ्यावर ‘ज्ञान’ हाच गुरु , ज्ञान हाच देव असे संस्कार अगदी बालपणा पासूनच झाले आहेत.

रीतिरिवाजा नुसार असेल कदाचित माझ्या जन्मा नंतर माझी एक जन्मपत्रिका बनवली गेली पण या पलीकडे ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषी हा भाग आमच्या घरापासून तसा लांबच राहिला होता.

माझा ज्योतिषाशी प्रथम संबंध १९७९ च्या आसपास आला, तो कालावधी माझ्या साठी मोठा कसोटीचा होता, आयुष्यात अनेक वादळी बदल होत होते आणि हे नेमके काय चालले आहे हेच समजत नव्हते, अत्यंत गोंधळलेल्या मन:स्थितीतीत काहीशा हताश / निराश अवस्थेत मी एका ज्योतिषाला तेव्हा भेटले होते.  त्या वेळी त्या ज्योतिषाने माझी पत्रिका अभ्यासून मला जे जे काही सांगितले ते ऐकून मी अक्षरश: थक्क झाले होते. कागदावर चितारलेल्या एका आकृतीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे  , नाते-संबंधाचे, आयुष्यातल्या बदलांचे / स्थित्यंतराचे इतके सारे बारकावे, कंगोरे उलगडता येऊ शकतात यावर माझा विश्वासच बसला नाही.

ते ज्योतिषीबुवाच माझ्या ज्योतिषशास्त्रातल्या वाटचालीतले माझे पहिले गुरु झाले. हे गुरु नुसते ज्योतिषी नव्हते तर एक उत्तम संस्कृत विद्वान होते त्यामुळे त्यांच्या कडून मी काहीसे उच्च दर्जाचे ज्योतिष शिकू शकले. पण खरे सांगते हे सारे एक उत्सुकता म्हणून शिकत होते, एक ज्योतिषी बनायचे किंवा ज्योतिषी म्हणून करियर करायचे असे माझ्या मनात कधीच नव्हते कारण त्या काळात माझे चित्रपट अभिनय क्षेत्रातली माझी कारकीर्द चांगलीच भरात होती.

बारा वर्षाचे शिक्षण आवश्यक आहे असे मी आज जरी म्हणत असले तरी मी स्वत: मात्र थोड्याशा अभ्यासा नंतरच पत्रिका अभ्यासायला , ज्योतिष सांगायला सुरवात केली होती आणि जे इतर ज्योतिषी त्या काळात करत तसे उपाय – तोडगे पण सुचवत होते, मी स्वत:ही अनेक उपाय तोडगे माझ्या स्वत: साठी ही केले जसे पूजा, खडे, जप इ.  अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही हे वेगळे सांगायला नकोच.

माझ्या पत्रिकेतले ग्रहमानच असे आहे की सतत बदल होत राहणार , त्याचा पडताळा मात्र मला त्यावेळी येत गेला आणि काही प्रमाणात आजही येत आहे.

अशाच एका बदला साठी अनुकूल असलेल्या ग्रहस्थितीचा लाभ उठवत मी भारतातून इंग्लंडला स्थलांतर केले.  इथे इंग्लंड मध्ये आले तरी ज्योतिषाच्या अभ्यासात जी रुची उत्पन्न झाली होती ती कायम राहिली, इथे आल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात मला दोघा महान ज्योतिषां कडून थोडेफार शिकायला मिळाले. दुर्दैवाने दोघांचेही अकाली निधन झाल्याने पुढचे सारे ज्ञान मी स्वयं अध्ययनातून मिळवावे लागले. होता होता बारा वर्षे पूर्ण झाली आणि मी पूर्ण वेळ व्यावसायिक ज्योतिषी बनले.

प्रश्न: भारत सोडून इंग्लंडला स्थायिक व्हायचा निर्णय नेमका का / कसा घेतला गेला ?

फार गुंतागुंतीचा निर्णय होता तो माझ्या साठी. त्यावेळी माझे सारे कुटुंबीय इथे इंग्लंड मध्ये स्थायिक होते तर मी एकटी भारतात एक चित्रपट अभिनेत्री म्हणून माझे करियर करत होते. एका बाजूला पैसा – प्रसिद्धी देणारे ,  झगमगणारे फिल्मी करियर तर दुसर्‍या बाजूला कुटूंबीयां पासून दूर राहावे लागल्याने लादले गेलेले एकाकीपण हे द्वंद्व सतत मनात चालू असायचे शिवाय त्यावेळी मी जे काही करत होते ते माझ्या आयुष्याचे खरे प्रयोजन नाही हे पण ह्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून लक्षात आले होते. भारतातले भरात आलेले करियर , मिळणारा पैसा सोडून परदेशात काहीश्या अनिश्चिततेच्या वातावरणात जाणे धाडसाचे होते पण शेवटी मी माझा अंतरात्मा मला जे सुचवत होता ते मी स्वीकारले आणि चित्रपट कारकीर्दीला रामराम ठोकून इंग्लंडला स्थलांतर केले.इथे आल्या नंतर मी एका ब्रिटिश सदगृहस्थाशी विवाह केला.  ‘सुटॉन’ हे सर नेम त्यामुळेच .

प्रश्न: आपण म्हणालात ,  या ना त्या कारणाने , श्रद्धा असो की अंधश्रद्धा ,ज्योतिषशात्र हे भारतीयांच्या नाळेशी जोडले गेले आहे. कर्म, नशिबाचे भोग, पुनर्जन्म अशा कल्पना भारतीयांना सहजी पटतात , स्वीकारल्या जातात , तुलनेत आम्हा पाश्चात्त्यांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही, त्या मागे कदाचित आमची जात्याच भौतिकवादी, सुखवादी , चंगळवादी समाजरचना असेल किंवा कोणतीही बाब सहजासहजी न  स्वीकारणारी तर्कनिष्ठ विचारसरणी असेल. आपण या दोन्ही परिघांत वावरल्या आहात आपला काय अनुभव आहे , खास करून जातकाला मार्गदर्शन करताना ?

मला वाटते या जगात आपला जन्म झाला तो थोडाफार भौतिकवाद असल्या मुळेच ! पण समस्या निर्माण होतात त्या आपण जेव्हा भौतिकवादाचाच अतिरेक करत जगू लागतो तेव्हा. भौतिकसुखाच्या मागे धावताना आपण आयुष्य जगायचेच विसरून जात आहोत त्यातूनच मग  इच्छा आकांक्षा , भाव-भावना, गरजां , राग , लोभ.

भारतात निदान अजून पर्यंत तरी भौतिक सुख आणि धार्मिकता / अध्यात्म यांचा एक समतोल राखला गेला आहे , बहुतेक भारतीय देवभोळे आहेत.  विद्येची देवता शारदा आणि संपत्तीची देवता लक्ष्मी इथे शेजारी शेजारी पुजल्या जातात !  पाश्चात्त्यांच्या बाबतीतला माझा अनुभव असा आहे की त्यांना हा समतोल जमत नाही.

भारतात कर्माचा  सिद्धांत नुसता सांगितला जात नाही तर पाळला ही जातो, मी जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास करते तेव्हा हे कर्म , आयुष्याचे प्रयोजन या भागावर जरा जास्त लक्ष देते. आपल्या आयुष्यात घडणारे बरे वाईट प्रसंग हे आपल्या कर्माचे भोग असतात, त्यातून आपल्याला काही अनुभव मिळवायचे असतात काही धडे गिरवायचे असतात, या जन्मा साठी आणि पुढच्या जन्मा साठी पण.

पण अलिकडेच्या काळात अधिक अधिक पाश्चात्त्य लोक अध्यात्मा कडे वळताना मला दिसत आहेत. इथे मी अध्यात्म हा शब्द धार्मिक अशा अर्थाने वापरला नाही, वस्तुत: याचा धर्माशी काहीच संबंध नाही. एक वैश्विक ऊर्जा आहे आणि आपण सगळे त्या ऊर्जेचा एक भाग आहोत. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती हे त्या वैश्विक ऊर्जेचे एक प्रतिबिंबच आहे.  व्यक्ती जरी त्याच्या बाह्यरूपा वरून ओळखली जात असेल किंवा त्याचे मूल्यमापन ह्या बाह्य स्वरूपावरून होत असले तरी , जे दिसणारे बाह्य स्वरुप आहे ते त्या व्यक्तीचे फक्त एक दृश्य स्वरूप आहे , प्रत्यक्षात एकच व्यक्ती अनेक पातळ्यांवर साकारलेली असते , शारीरिक, मानसिक, अव्यक्त मानसिक इ.

आपल्याला नेमके हेच समजावून घ्यायचे आहे. या जगात जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती ही तिच्या अनेक मागच्या जन्मांचे संकलन आहे , गोळाबेरीज आहे. मागच्या अनेक जन्मां मधले हजारो , लाखो अनुभव आपल्या पाशी असतात, फक्त ते आठवत नाहीत आणि आठवले तरी उमगत नाहीत असे म्हणता येईल. या जन्मात आपण जे भोगतो आहे त्याचा मागच्या जन्मांशी निश्चित संबंध आहे. आणि या जन्मात आपल्याला जे ‘फ्री विल – निर्णय स्वातंत्र्य ‘ लाभलेले आहे त्याचा वापर करत आपण आपले या जन्मातलेच नव्हे तर पुढच्या अनेक जन्मातले भवितव्य घडवत असतो!

भारतात ह्या बाबी माहिती असतातच त्या नव्याने सांगाव्या लागत नाहीत. पाश्चात्त्यांच्या बाबतीत  ‘कर्म ‘ ही संकल्पना आता बर्‍या पैकी रुजली आहे , स्वीकारली गेली आहे, पुनर्जन्म ही संकल्पना गळी उतरवणे मात्र जरा अवघड आहे.

मी इथे १९८३ मध्ये आले तेव्हाच्या तुलनेत आज अनेक पाश्चात्त्य व्यक्ती अध्यात्माकडे वळताना दिसत आहेत निदान माझ्या कडे येणार्‍या जातकां पैकी बहुतांश धार्मिकते कडे / अध्यात्मा कडे झुकलेले जास्त आहेत आणि त्यांची संख्या वाढताना दिसते आहे.

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. योगेश दैठणकर.

  मस्त, धन्यवाद . ग्रुपवर या लेखमाले बद्दल सांगतांना तुम्ही जे मोती चे प्रतीकात्मक चित्र दिलेत ते खरोखर योग्य आहे. या अश्या मुलाखती ज्या ज्योतिषशास्र सागरातील तळाशी असलेले मोतीच. जे आमच्या तुम्ही काढून देत आहात. पुनश्च धन्यवाद.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री योगेशजी,

   गेले वीस वर्षे मी ज्योतिषाचा अभ्यास करतो आहे , पारंपरीक ज्योतिष हा माझा पाया असला तरी नक्षत्रपद्धती , नाडी ज्योतिष, पाश्चात्त्य ज्योतिष , युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी , कास्मोबायोलॉजी अशा विविध ज्योतिष पद्धतींंचा मी अभ्यास करत असतो. एकाच पद्धतीला धरुन राहात नाही. झटपट ज्योतिष पद्दती (केपी, 4 स्टेप हे त्यातलेच काही प्रकार म्हणावे लागतील) हे जे खूळ आजकाला लोकांच्या मनात शिरले आहे ते या शास्त्राच्या विकासाला घातक ठरत आहे

   मी बरेच वाचन केले आहे , अनुभवले आहे , भारतातल्या ज्योतिषां पेक्षा मी पाश्चात्त्य ज्योतिषांच्यात जरा जास्त वावर असतो तेव्हा त्यांंच्या विचारशैलीचा, काम करण्याच्या पद्दतीचा, शिस्तीचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे , स्वत: इंजिनियर असल्याने आणि अ‍ॅपल च्या कै स्टीव्ह जॉब्स चा फार मोठा प्रभाव असल्याने ‘परफेक्शन’ कडे कल जास्त आहे !

   असो.

   ‘A picture is worth ten thousand words’ ! माझे लेखन जास्तीतजास्त नेटके व्हावे असा माझा नेहमीच प्रयत्न असतो, लेखनाला पूरक अशी समर्पक चित्रे हे माझ्या लिखाणाचे महत्त्वाचे अंग असते , ते जपायचा मी जास्तीतजास्त प्रयत्न करत असतो.

   आपल्याला लेखन आवदले हे वाचून समाधान वाटले

   सुहास गोखले

   +1
 2. Sudhanva Gharpure

  सुहास जी,

  लेख खूप आवडला. आणि तो फारच आश्चर्य जनक होता. एक चित्रपट अभिनेत्री या विषयात एवढा रस घेते आणि त्यात प्राविण्य मिळवते, कमाल आहे.

  0
 3. Kiran

  This is really nice information in Marathi. I have started following her twitter account. Surprised to that the information about her is available in Marathi. Sincere thanks for your contributions. Due to technical issue could not type in Marathi. Apologies.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.