आज एक अगदी शिंपल केस स्ट्डी अभ्यासूया!
यकदम शिंपल, व्हॅनिला आईस्क्रीमच म्हणा ना !
त्या
चे असे झाले, माझ्या कडे पॅनासॉनिक चा कॅमेरा आहे , तसा जुनाच आहे पण त्यातली लेन्स एक नंबर (f 2.8, 12 X Optical zoom with image stabilization लायका लेन्स ! काय समजलीव) ! अनेक वर्षे बिनतक्रार सेवा दिल्या नंतर एके दिवशी या कॅमेर्याच्या बॅटरीने ‘क्या बच्ची की जान लोगे क्या?’ असे म्हणत अंग टाकले. कॅमेरा जुना असल्याने त्याची बॅटरी मिळणे दुरापास्त होते, पॅनासॉनिक इंडिया ने हात झटकले, पॅनासॉनिक जपान बॅटरी पाठवू शकत होते पण त्यांनी सांगितलेली किंमत आणि शिपिंगचा खर्च माझ्या आवाक्या बाहेरचा होता.
मग अॅमेझॉन, ई- बे इकडे कोठे ही बॅटरी भेटते का याचा शोध सुरू केला. एकदा अचानक अॅमेझॉन इंडिया वर ही बॅटरी लिस्ट झाली, किंमत रास्त होती पण एकच विक्रेता ज्याचे फारसे रिव्हूज नाहीत, कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन नाही, अशा स्थितीत ऑर्डर करणे धोक्याचेच होतेच, पण काही झालेच तर अॅमेझॉन मध्यस्थ असल्याने तसे सुरक्षित आहे असा विचार करून दिनांक १३ ऑगष्ट २०१७ अॅमेझॉन इंडिया च्या वेब साईट वर ही बॅटरी ऑर्डर केली.
अॅमेझॉन चे काम तसे झटपट असते, शक्यतो ऑर्डर दिल्या दिवशीच पाठवतात, गेला बाजार दुसर्या दिवशी. पण या वेळेला काय झाले कोणास ठाऊक, १३ तारखेला काहीच झाले नाही , अर्थात हे अपेक्षीत होतेच. १४ तारीख गेली, १५ तारीख ही वाया गेली, काही पत्त्या नाय, अॅमेझॉन कडून काहीच अपडेट नाही, ऑर्डर स्टेट्स ‘ऑर्डर रिसिव्ह्ड ‘ असे दाखवत होते. बघता बघता १७ तारीख उजाडली, शेवटी मी अॅमेझॉन बरोबर संवाद साधला त्यांनी दिलगिरी व्यक्त करत अजून दोन एक दिवस थांबायला सांगितले. आता थांबण्या शिवाय माझ्या कडे दुसरा कोणता पर्याय होता का? ही बॅटरी अॅमेझॉन वरचा हा एक विक्रेता सोडल्यास बाकी कोणा कडेच उपलब्ध नव्हती. आता २० तारीख उजाडली तरी ही माझी ऑर्डर काही पाठवली गेली नाही. तो दिवस संपला, रात्रीचे सात वाजले अजून काहीही हालचाल नाही, ऑर्डर स्टेट्स अजूनही ‘ऑर्डर रिसिव्हड‘, हे काय चालले आहे तेच कळत नव्हते, ऑर्डर पाठवायला इतका उशीर झालेला मी कधीच पाहिला नव्हता!
कधी येणार माझी ऑर्डर ? हीच ती वेळ, हाच तो क्षण, प्रश्नकुंडली मांडायचा…
प्रश्न: मी अॅमेझीन मार्फत मागवलेली बॅटरी केव्हा पोहोचेल?
दिनांक: २० ऑगष्ट २०१७
वेळ: १९: ४५ : ५९
स्थळ : गंगापूर रोड , नाशिक
ट्रॉपीकल, प्लॅसिडस, मीन नोडस
अॅमेझॉन, ई-बे अशा अनेक व्हेंडर्स कडून मी असंख्य वस्तू मागवल्या आहेत, काही वेळा वस्तू पोहोचायला अपेक्षे पेक्षा जास्त उशीर झाला तेव्हा त्या केव्हा मिळतील या काळजी पोटी प्रश्न कुंडली मांडून उत्तरे पण मिळवली आहेत. पण या खेपेला प्रश्न जरासा वेगळा आहे. याचे दोन भाग पडतात:
- ऑर्डर पाठवतील का?
ऑर्डर नोंदवून आठवडा झाला तरी अजून पार्सल विक्रेत्याच्या गोडाऊन मधून बाहेर पडले नाही म्हणजे कदाचित मी मागवलेली बॅटरी स्टॉक मध्ये नसेल, किमतीचा गोंधळ असेल, या ना त्या कारणा साठी ही ऑर्डर रद्द सुद्धा होऊ शकते, पूर्वी मी ऑर्डर केलेल्या इतर ऑफ बिट , दुर्मिळ वस्तूंच्या ऑर्डर रद्द झालेल्या आहेत. ऑर्डर रद्द होणे ही शक्यता गृहीत धरलीच पाहिजे.
- पार्सल, माझ्या हातात कधी पडणार?
जर ऑर्डर पाठवली जाण्याची शक्यता दिसत असेल तरच याचा कालनिर्णय करू.
चला तर या प्रश्नकुंडलीचा अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरे हुडकायचा प्रयत्न करू.
आपण हा प्रश्न पाश्चात्त्य होरारी तंत्राने सोडवणार आहोत, या प्रकाराच्या अॅनॅलायसीस मध्ये पत्रिका तयार होताच काही प्रारंभिक तपास करावा लागतो, ज्या मध्ये जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , कसा आहे, शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि विषयाचे (वस्तूचे) प्रतिनिधी ठरवावे लागतात.
आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करू या.
पत्रिकेत जन्मलग्न १३ मीन असे आहे म्हणजे ‘ ० ते ३ अंश अथवा २७ ते २९ अंश’ नाही.
(ज्यांना अर्ली / लेट असेंडंट बद्दल माहिती नाही त्यांनी माझी ‘ज्युवेल थीफ’ ही केस स्ट्डी अवश्य वाचावी, ज्युवेल थीफ )
चंद्र सिंहेत १२ अंशावर आहे, सिंह राशी ओलांडे पर्यंत चंद्राचे मंगळ, रवी , गुरु , शनी अशा अनेक ग्रहां बरोबर योग होणार असल्याने चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स ‘ नाही.
(ज्यांना चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स‘बद्दल माहिती नाही त्यांनी माझी ‘ज्युवेल थीफ’ ही केस स्ट्डी अवश्य वाचावी, ज्युवेल थीफ )
शनी दशम (१०) स्थानात असल्याने त्या बद्दलही काळजी नाही.
(ज्यांना सप्तमातल्या शनी बद्दल माहिती नाही त्यांनी माझी ‘ज्युवेल थीफ’ ही केस स्ट्डी अवश्य वाचावी, ज्युवेल थीफ )
आता आपण या कथेतल्या पात्रांचा (अॅक्टर्स) आणि त्यांच्या प्रतिनिधींचा परिचय करून घेऊ.
१) मी
जातक हा नेहमीच लग्न स्थाना वरून पाहतात, लग्नेश आणि लग्नातले ग्रह जातकाचे प्रतिनिधी असतात शिवाय चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून असतोच.
इथे जन्म लग्न १३ मीन असे असल्याने मीनेचा स्वामी ‘गुरु’ माझे प्रतिनिधित्व करेल. लग्नात नेपच्यून आहे पण युरेनस , नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा ‘प्रतिनिधी’ म्हणून फारसा वापर होत नाही (अगदी खास परिस्थितीत / निर्वाणीच्या वेळी हे ग्रह वापरता येतात). चंद्र हा नेहमीच जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असल्याने, चंद्र आणि गुरु माझे प्रतिनिधित्व करतील.
गुरु सारखा ग्रह माझ्या सारख्या विद्वान (?) , प्रौढ (?), गंभीर (?) व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून येणे ही हा चार्ट रॅडीकल असल्याची एक खूण आहे.
२) विक्रेता
मी अॅमेझॉन या बेवसाईट वर ऑर्डर नोंदवली, माझा पैशाचा व्यवहार अॅमेझॉन शी होणार आहे , वस्तू ची सर्व जबाबदारी अॅमेझीन कडे असली तरी अॅमेझॉन ही कंपनी ती वस्तू स्वत: बनवत नाही किंवा स्वत: विकत नाही, देश विदेशातले विक्रेते आपली उत्पादने अॅमेझीन मार्फत विकतात, म्हणजे अॅमेझॉन फक्त विक्रेता आणि ग्राहक यांच्यातली एक मध्यस्थ / दलाल आहे तेव्हा या अॅमेझॉन चा विचार करायची आवश्यकता नाही.
मी नोंदवलेली बॅटरीची ऑर्डर अॅमेझॉन त्या विक्रेत्या कडे पाठवणार आणि तो विक्रेता मला ती बॅटरी पाठवणार आहे.
आता विक्रेत्याचे स्थान कोणते ? आपण ज्या ज्या परक्या व्यक्तींशी व्यवहार करतो त्या सर्व परक्या व्यक्ती सप्तम (७) स्थानावरुन पाहतात त्यामुळे आपला विक्रेता हा सप्तम (७) स्थानावरुनच पाहावा लागेल. सप्तम (७) स्थानावर कन्या रास आहे म्हणजे कन्येचा स्वामी बुध आपल्या विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करेल. गुरु देखील सप्तमातच आहे पण गुरु माझे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याला विक्रेत्याचा प्रतिनिधी मानता येणार नाही.
३) बॅटरी
मी जरी त्या बॅटरी ची पूर्ण किंमत अॅमेझॉन ला दिली असली तरी ती बॅटरी अजूनही मला पाठवली गेलेली नाही, आत्ता या क्षणाला बॅटरी त्या विक्रेत्याच्या गोडाऊन मध्येच असेल, तिचा माझ्या पत्त्यावरचा प्रवास अजून सुरु झालेला नाही. जो पर्यंत हा प्रवास सुरु होत नाही (बॅटरी कुरियर कंपनी कडे सोपवली जात नाही) किंबहुना ही बॅटरी माझ्या हातात पडत नाही तो पर्यंत ती बॅटरी त्या विक्रेत्याच्या मालकीची राहील, उद्या समजा मी ते पार्सल नाकारले किंवा कुरियर वाल्याला ते पार्सल काही कारणां मुळे माझ्या पत्त्यावर सुपूर्द करता आले नाही तर ते पार्सल त्या विक्रेत्या कडे परत पाठवले जाईल, म्हणजे जो पर्यंत कुरियर कंपनी ने आणलेले पार्सल मी सही करुन ताब्यात घेत नाही तो पर्यंत ते पार्सल (बॅटरी) विक्रेत्याच्याच मालकीचे राहील. त्यामुळे आत्ता या क्षणी बॅटरी कोठे ही असली तरी ती त्या विक्रेत्याच्या मालकीची वस्तू आहे असेच समजायचे.
आपल्या मालकीच्या वस्तू आपण द्वितीय (२) स्थानावरून बघतो. इथे विक्रेत्याच्या मालकीची वस्तू आहे. या विक्रेत्याची वस्तू त्याच्या द्वितीय (२) स्थाना वरुन म्हणजेच सप्तमाच्या अष्टम (८) स्थाना वरुन बघायला पाहिजे. अष्टम (८) स्थानावर २० अंशावर तूळ रास आहे , अष्टम स्थानात कोणताही ग्रह नाही त्यामुळे तूळेचा स्वामी शुक्र हा एकटा ‘बॅटरी’ चे प्रतिनिधित्व करेल.
बाकी पैशाची देवाण घेवाण, कुरियर कंपनी इ बाबी विचारात घ्यायची आवश्यकता नाही.
कथेतली पात्रे आणि त्या भूमिका करणारे ग्रह निश्चित झाल्यावर आपण या पत्रिकेचा प्राथमिक अभ्यास करू
नेपच्यून सारखा गोंधळ, काळजी , संभ्रम निर्माण करणारा ग्रह वक्री अवस्थेत लग्नात आहे हे माझ्या प्रश्न विचारता वेळेच्या मन:स्थितीचे उत्तम द्योतक आहे.
माझा प्रतिनिधी गुरु सप्तम (७) स्थानातच आहे. मी त्या विक्रेत्या वर विश्वास ठेवून चक्क सात दिवस वाट पाहतोय कारण त्या विक्रेत्या शिवाय मला कोणताच पर्याय नाही. ही माझी अगतिकता माझा प्रतिनिधी विक्रेत्याच्या घरात सापडल्याने अगदी अधोरेखीत होत आहे. पण माझा प्रतिनिधी गुरु हा तांत्रिक दृष्ट्या सप्तम (७) स्थानात दिसत असला तरी प्रत्यक्षात तो सप्तम (७) आणि अष्टम (८) स्थानांच्या सीमारेषे वर आहे , गुरु १९ तूळ ५९ , अष्टम स्थान २० तूळ २४, फक्त २५ आर्क मिनिटे मागे ! हा विक्रेता काही ही ऑर्डर पाठवणार नाही या शंकेने माझ्या मनात घर केले आहे, इतका वेळ विक्रेत्याच्या पक्षात (म्हणजे घरात) असलेला माझा प्रतिनिधी गुरु अष्टम स्थानात प्रवेश करत आहे म्हणजे मन:स्ताप होणार, निराशा होणार आणि शेवटी मला या विक्रेत्याची साथ सोडावी लागणार. या परिस्थितीला माझा प्रतिनिधी विक्रेत्याच्या घराच्या (सप्तम) आणि मन:स्तापाच्या घराच्या (अष्टम) सीमेवर असणे याहून समर्पक दाखला आणखी कोणता असू शकेल ?
बुध जो विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करत आहे, तो वक्री अवस्थेत षष्ठम स्थानात म्हणजेच विक्रेत्याच्या व्यय (१२) स्थानात आहे, असा वक्री प्रतिनिधी तो देखील व्यय स्थानातला दोन बाबीं सुचवतो, एकतर हा विक्रेता लबाड आहे , याची नियत साफ नाही किंवा हा विक्रेता खरोखरीचा (बहुदा आर्थिक- व्ययस्थान !) अडचणीत असावा त्यामुळेच ऑर्डर मिळून सुद्धा तो बॅटरी पाठवू शकत नाही.
इथे एक मजा पाहा , प्रश्नकुंडलीतल्या चंद्राने तो त्याच्या सध्याच्या राशीत आल्या नंतर ते प्रश्न काळा पर्यंतच्या कालावधी पर्यंत केलेले योग , या घटने संदर्भातल्या काही घटनां / हालचाली दाखवतात (आणि चंद्रा चे पुढे होणारे योग हे आगामी काळात घडणार्या घटनां बद्दल सांगतात) . इथे चंद्र सिंहेत १२ अंशा वर आहे, पण चंद्र सिंहेत आल्या पासून त्याने कोणत्याही ग्रहाशी कसलाही योग केलेला नाही! आणि प्रत्यक्षात तसेच घडले आहे, मी ऑर्डर केल्या पासूनच्या सात दिवसात घटने संदर्भात काहीही महत्त्वाचे घडलेले नाही, साक्षात अॅमेझॉन ला सुद्धा या ऑर्डर बद्दल कल्पना नाही, ते पण क्लू लेस आहेत.
इथे अॅमेझॉन ची भूमिका एक मध्यस्त , दलाल अशी आहे, त्या अंगाने विचार करता पत्रिकेत अॅमेझॉन ‘दलाल’ / ‘एजंट ‘ या नात्याने तृतीय स्थानावरुन पहायला लागेल. तृतीय स्थानावर तूळ रास आहे म्हणजे शुक अॅमेझॉन चे प्रतिनिधित्व करेल. शुक्र बॅटरीचे पण प्रतिनिधित्व करत आहे, या शुक्राचा आणि गुरुचा नुकताच केंद्र योग होऊन गेला आहे , शुक्र म्हणजे ‘अॅमेझॉन’ आणि गुरु म्हणजे ‘मी’ यांच्यातला हा योग मी अॅमेझॉन कडे पैसे भरुन बॅटरीची ऑर्डर नोंदवली ही घटना सूचित करत आहे !
एखादा चार्ट किती बोलका असावा याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
जर ही बॅटरी मला मिळणार असेल तर बॅटरीचा चा प्रतिनिधी आणि माझा प्रतिनिधी यांच्यात एखादा ग्रह योग होणे आवश्यक आहे.
बॅटरीचा प्रतिनिधी आहे शुक्र आणि माझे प्रतिनिधी आहेत गुरु आणि चंद्र.
चंद्र १२ सिंहेत आहे आणि शुक्र २३ कर्केत, या दोघांत एक राशीचे अंतर असल्या मुळे या दोघांत कोणताही योग होत नाही.
गुरु १९ तूळेत आहे तर शुक्र २३ कर्क म्हणजे शुक्र १९ कर्केवर असताना यांच्यात केंद्र योग झाला होता , मी (गुरु) या बॅटरी (शुक्र) यांच्यातला झालेला हा केंद्र योग , मी बॅटरी साठी ऑर्डर नोंदवली ही घटना सांगत आहे!) पण आता शुक्र आपली राशी ओलांडे पर्यंत यांच्यात कोणताही योग होणार नाही.
म्हणजे मी आणि ते पार्सल यांच्यात कोणताही ग्रहयोग नाही म्हणजे हे पार्सल मला मिळणार नाही ?
असे लगेच म्हणता येणार नाही कारण आपण तपासले ते प्रत्यक्ष (Direct) ग्रहयोग पण होरारीत दोन ग्रहांत अप्रत्यक्ष (Indirect) योग सुद्धा होऊ शकतो, या साठी तिसर्या एका ग्रहाची मदत होते. हे अप्रत्यक्ष योग दोन मार्गांनी होऊ शकतात.
- ट्रान्सलेशन ऑफ लाईट :
या प्रकारात दोन ग्रहांत प्रत्यक्ष योग होत नाही पण एक तिसरा ग्रह जो या पहिल्या दोन ग्रहां पेक्षा जलद गतीचा असतो, असा ग्रह या दोन ग्रहांशी योग करून जातो, म्हणजे तिसरा जलद गतीचा ग्रह, पहिल्या ग्रहाशी योग करतो, त्या योगातून बाहेर येतो आणि मग दुसर्या ग्रहाशी योग करतो, हा तिसरा ग्रह पहिल्या दोन ग्रहां पेक्षा जलद गतीचा असला तर आणि तरच हे साध्य होऊ शकते. हा जलद गतीचा ग्रह एका ग्रहाचा उजेड ( किंवा बॅटन म्हणू शकता) दुसर्या ग्रहा कडे पोहोचवतो. मात्र इथे एक बाब लक्षात ठेवायची की हे सारे चालू असताना त्या जलद ग्रहाचा आणखी कोणा ग्रहाशी योग होता कामा नये.
- कलेक्शन ऑफ लाईट:
या प्रकारात आपले जे दोन ग्रह आहेत ते स्वत: आपापसात योग करत नसले तरी ते एका मागोमाग एक अशा रितीने तिसर्या एका ग्रहाशी योग करतात, इथे तो तिसरा ग्रह पहिल्या दोन ग्रहां पेक्षा मंद गतीचाच असावा लागतो नाहीतर हा प्रकार साध्य होणार नाही,. या प्रकारात पहिला ग्रह एका मंद गतीच्या ग्रहाशी योग करतो आणि पुढे सरकतो मग दुसरा ग्रह पण त्याच मंद गतीच्या ग्रहा बरोबर योग करतो. इथे तो मंद गतीचा ग्रह पहिल्या ग्रहाचा लाईट ( बॅटन म्हणा हवे तर) ताब्यात घेतो आणि तो दुसर्या ग्रहा कडे सुपूर्द करतो. इथेही हे सगळे चालू असताना आणखी एखादा चौथा ग्रह मध्ये कडमडत नाही ना हे पाहावे लागते.
असो.
आता या पत्रिकेत असा काही इनडायरेक्ट योग होणार आहे का ते पाहावयाचे
ट्रान्सलेशन ऑफ लाईट बघायचे असेल आपल्याला फक्त शुक्र आणि गुरु या जोडीचाच विचार करावा लागेल . आता आपल्या शुक्र – गुरु जोडी पेक्षा जलद ग्रह कोण कोण आहेत ?
चंद्र , रवी, बुध हे ते तीन ग्रह जे शुक्र आणि गुरु पेक्षा जलद आहेत.
इथे चंद्र प्रश्नकर्त्याच्या प्रतिनिधी असल्याने याचा विचार आपण आधीच केलेला असतो, चंद्र योग करत नाही म्हणून तर आपण ट्रान्सलेशन ऑफ लाईट मिळते का ते पहात आहोत!
रवी: २७ सिंहेतला रवी १९ तूळेवरच्या गुरुशी लाभ योग करून बाहेर पडला आहे पण त्याचा शुक्राशी योग मात्र झालेला नाही आणि होणार ही नाही कारण या दोघांत फक्त एका राशीचे अंतर आहे. म्हणजे रवी ट्रान्सलेशन ऑफ लाऊट करू शकणार नाही
बुध: कन्येतला बुध कर्केतल्या शुक्राशी लाभ योग करेल पण तो तूळेतल्या गुरु शी कोणताही योग करू शकणार नाही कारण या दोघांत फक्त एका राशीचे अंतर आहे, सबब बुधा चा ही उपयोग नाही.
म्हणजे ट्रान्सलेशन ऑफ लाईट या मार्गाने गुरु आणि शुक्र यांच्यात कोणताही इनडायरेक्ट योग होणार नाही.
ठीक आहे आता आपण कलेक्शन ऑफ लाईट होते का ते तपासू
आपली जोडी शुक्र – गुरु आहे, या दोघां पेक्षा मंद गतीचा ग्रह फक्त शनी आहे (युरेनस , नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा इथे वापर केला जात नाही), म्हणजे शुक्राचा शनीशी योग होणे आणि पाठोपाठ गुरुचा शनी बरोबर योग होणे आवश्यक आहे किंवा गुरुचा शनीशी योग होणे आणि पाठोपाठ शुक्राचा शनीशी योग होणे असे काहीतरी घडायला हवे. तसे होणार आहे का?
१९ तूळे वरच्या गुरु चा २१ धनेतल्या शनीशी लाभ योग होणार आहे , मग शुक्राचे काय ? शुक्र शनी च्या षडाष्टक ( १५० अंश) योगातून बाहेर पडला आहे , होरारीत हा योग गृहीत धरत नाहीत त्यामुळे गुरु – शनी योग होणार असला तरी , शुक्र – शनी योग झालेला नाही आणि होणार ही नाही त्यामुळे इथे कलेक्शन ऑफ लाईट मिळणार नाही. वादा साठी जरी शुक्र – शनी षडाष्टक योग गृहीत धरला तरी गुरु- शनीशी लाभ योग करायच्या आधीच १९ सिंहेतला मंगळ २ अंश ओलांडून २१ धनेतल्या शनीशी नव-पंचम करेल आणि सगळा बना बनाया खेल विस्कटून टाकेल !
म्हणजे काय, कलेक्शन ऑफ लाइटस पण नाही.
कोणत्याही मार्गाने पार्सलचा प्रतिनिधी शुक्र आणि माझे प्रतिनिधी गुरु आणि चंद्र यांच्यात योग होत नाही, याचा सरळ , स्वच्छ अर्थ ‘पार्सल मला मिळणार नाही. आपला विक्रेता बुध हा वक्री आहे आणि व्ययात आहे , तो काही बॅटरी पाठवणार नाही , अॅमेझॉन असला प्रकार खपवून घेणार नाही , विक्रेता बॅटरी वेळेत पाठवू शकत नाही हे दिसताच अॅमेझॉन स्वत:च ही ऑर्डर रद्द करेल.
पार्सल येणार नाही कारण ते पाठवलेच जाणार नाही ! हे नक्की, पण आता पुढे काय ?
खरेतर होरारीने माझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर दिले आहे, केस इथेच बंद करायला हरकत नाही, पण पुढे काय होणार याची उत्सुकता होतीच ना. ही पत्रिका तपासताना ,मला कुणकुण लागली होती की पत्रिकेतली ग्रहस्थिती आणखी बरेच काही सांगत आहे त्यातून आणखी पुढे काय काय होणार आहे याचे ही उत्तर मिळणार आहे !
कलेक्शन ऑफ लाईट बघतानाच माझ्या लक्षात आले की गुरु – शनी योग होण्या आधीच मंगळ – गुरु आणि मंगळ – शनी असे योग होत आहे. इतकेच नव्हे तर चंद्र देखील या मंगळाशी युती करत आहे . म्हणजे या मंगळाचा या सगळ्याशी कसला तरी फार जवळचा संबंध आहे, हा मंगळ काहीतरी उचापती करणार आहे हे निश्चित. हा मंगळ काय उद्योग करणार आहे , कोणती भूमिका बजावणार आहे ? काय असेल ते?
मंगळ षष्ठात (६) आहे पण त्यावरून काही बोध होत नाही, मंगळ सिहेंत आहे पण त्याचे काय ? हा मंगळ कोणाचे प्रतिनिधित्व करत आहे यावरून काही तरी धागेदोरे नक्की हाताला लागतील. मंगळाच्या राशी मेष आणि वृश्चिक अनुक्रमे द्वितीय (२) आणि नवम (९) भावांवर आहेत. म्हणजे मंगळ द्वितीय (२) आणि नवम (९) भावाचे प्रतिनिधित्व करणार. द्वितीय (२) भाव म्हणजे माझा पैसा , म्हणजे या मंगळाचा माझ्या पैशाशी काहीतरी संबंध असावा हे नक्कीच मग नवम (९) स्थानाचे काय ? नवम (९) भावा वरून काही वस्तू / व्यक्ती / संस्था / नाते संबंध यांचा बोध होतो का? मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला!
आपला विक्रेता आपण सप्तम (७) स्थाना वरून पाहिला, आता समजा या विक्रेत्याशी माझे जमले नाही तर मी दुसर्या विक्रेत्या कडे जाणार हे स्वाभाविकच आहे आणि हा विक्रेता त्याच प्रकाराच्या वस्तू (बॅटरी) विकत असल्याने तो तशा अर्थाने पहिल्या विक्रेत्याचा शेजारीच मानले पाहीजे ना? कोणत्याही शहरातल्या बाजार पेठेत पाहिले तर आपल्या लक्षात येईल की भाजीवाले , कापड, हार्डवेअर, सराफी पेढ्या कशा एकमेकांना खेटून थाटलेल्या असतात सगळ्यांची दुकाने कशी एका ओळीत असतात, ते एकमेकाला ‘शेजारी’ च समजतात. आपण ही एका दुकानात हवी ती वस्तू मिळाली नाही तर त्याच्या शेजारच्याच तशाच प्रकाराच्या वस्तू विकणार्या दुकानात ती वस्तू आहे का ते पाहतो. व्यवहारातले हे सातत्याने येणारे अनुभव व निरीक्षणें होरारीत का वापरू नये, वापरलीच पाहिजेत कारण शेवटी होरारी आपल्या दैनंदिन अनुभवां साठीच तर आहे!
असे तर्क आपल्या कडच्या पारंपरीक आणि नक्षत्र पद्धतीत पण वापरले जातात , उदाहरण द्यायचे तर ‘दुसरे लग्न – दुसरी पत्नी’ ही नवम (९) स्थाना वरून पाहिली जाते, या मागे तर्क असा की दुसरी पत्नी पहील्या पत्नीची धाकटी बहिण मानली जावी (प्रत्यक्षात तसे नसते हे आपल्याला माहिती आहे !) , पहीली पत्नी सप्तम (७) स्थानावरुन म्हणून सप्तमाचे तृतीय (३) स्थान (धाकटे भावंड) म्हणजेच नवम स्थान (९) हे दुसर्या पत्नी साठी मानले जाते.
शेजारी हा नेहमीच तृतीय (३) भावा वरून पाहतात, इथे पहिला विक्रेता सप्तम (७) स्थाना वरून म्हणून पाहिला त्याचा शेजारी म्हणजे सप्तमाचे तृतीय म्हणजेच नवम स्थान (९), म्हणजेच दुसरा विक्रेता नवम भावा (९) वरून बघितला पाहिजे!
गुंता सुटला !
हा मंगळ दुसर्या विक्रेत्याचे प्रतिधिनिधित्व करेल (कारण नवम स्थानावर मंगळाची वृश्चिक रास आहे ). आता समजा मी या नव्या विक्रेत्या कडून वस्तू मागवली तर ती त्या विक्रेत्याची वस्तू असल्याने त्या विक्रेत्याच्या द्वितीय (२) भावावरून म्हणजेच दशम (१०) भावा वरुन पाहिली पाहिजे.
दशमा वर गुरु ची धनू राशी १७ अंशावर आहे, शनी दशमात आहे म्हणजे धनेचा स्वामी गुरु आणि शनी या नव्या पार्सल चे प्रतिनिधित्व करतील पण गुरु आधीच माझे प्रतिनिधित्व करत असल्याने एकटा शनीच त्या नव्या पार्सल चे प्रतिनिधित्व करेल.
दशमातला हा शनी सध्या वक्री आहे ! हे स्वाभाविकच आहे म्हणा , अजून माझा नवा विक्रेता कोण याचाच खुलासा नाही त्यामुळे त्याच्या कडच्या बॅटरी बद्दल आत्ताच काही कळणे कसे शक्य आहे ?
आता आपले समीकरण बदलले , आता आपल्याला माझे प्रतिनिधी चंद्र आणि गुरु यांचा नव्या विक्रेत्याच्या पार्सल शी म्हणजेच शनी शी होणारे योग तपासायचे आहेत.
१२ सिंहेतला चंद्र , ७ अंश अंतर कापून १९ सिहे वरच्या मंगळाशी (नवा विक्रेता) विना अडथळा युती करेल त्या पाठोपाठ १९ सिंहे वरचा मंगळ १९ तूळेवरच्या गुरुशी (मी) अवघ्या २ आर्क मिनिटांत लाभ योग करेल.
माझा प्रतिनिधी गुरु जो १९ तूळेत आहे , धनेतल्या २१ अंशावरच्या शनीशी ( पार्सल – नव्या विक्रेत्या कडून येणारे) लाभ योग , विना अडथळा करणार आहे. इतकेच नव्हे तर माझा दुसरा प्रतिनिधी चंद्र हा देखील ९ अंश कापून शनीशी विना अडथळा नव-पंचम करणार आहे. हे सगळे होत असताना शुक्र, गुरु, मंगळ कोणीही वक्री होत नाहीत, शनी सध्या वक्री आहे लौकरच तो मार्गी होईल.
हे सगळे ठीक पण आता हे होणार केव्हा?
कालनिर्णयाच्या बाबतीत आपण चंद्र वापरतो
इथे चंद्र प्रथम मंगळाशी युती करेल आणि नंतर तो शनीशी नव पंचम करेल म्हणजे मला पार्सल मिळेल.
चंद्र मंगळ योग ७ अंश , मंगळ – गुरु योग २ अंश, चंद्र – शनी योग ९ अंश ! लक्षात येते का? ७ + २ = ९!
आपले स्केल दिवस – आठवडे – महीने असे असू शकते.
सात दिवसांत विक्रेता सापडेल – त्याने बॅटरी पाठवल्या नंतर अवघ्या दोन दिवसांत माझ्या कडे घर पोहोच होईल हे काही शक्य दिसत नाही. त्यामुळे हे असे दिवसांतले स्केल जमणार नाही!
सात महिन्यांत विक्रेता सापडेल – त्याने बॅटरी पाठवल्या नंतर दोन महिन्यांत बॅटरी माझ्या कडे घर पोहोच होईल. हे स्केल एका अंगाने योग्य वाटले कारण ही बॅटरी कोठेच उपलब्ध नव्हती त्यामुळे कदाचित ती विकणारा विक्रेता सापडायला मला सात महिने सुद्धा लागू शकतात पण त्या विक्रेत्या कडे नोंदवलेली ऑर्डर माझ्या कडे घर पोहोच व्हायला दोन महिने लागतील असे सहसा होणार नाही, पंधरा – वीस दिवस , गेला बाजार एक महिना ठिक आहे पण दोन महिने जरा जास्तच होईल. त्यामुळे महिना हे स्केल मी विचारात घेतले नाही .
म्हणून मी आठवडे हे जास्त रिझनेबल / रिअलॅस्टीक स्केल निश्चित केले.
आज पासून साधारणे सात आठवड्या नंतर मला नवा विक्रेता सापडेल , मी ऑर्डर नोंदवेन आणि ही ऑर्डर नोंदवल्या नंतर दोन आठवड्यात माझ्या पर्यंत पोहोचेल.
म्हणजे आपले एकूण अनुमान असे असेल:
- अॅमेझॉन कडे नोंदवलेली ऑर्डर पूर्ण होणार नाही. काही ना काही कारण निघेल आणि ही ऑर्डर एकतर मी स्वत: किंवा विक्रेता (किंवा अॅमेझॉन) ही ऑर्डर रद्द करेल.
- या घटने नंतर साधारण सात एक आठवड्यात मला दुसरा कोणी . नवा विक्रेता सापडेल आणि मी त्याच्याशी खरेदीचा व्यवहार करेन.
- हा नवा विक्रेता मला बॅटरी पाठवेल पण ही डिलिव्हरी ऑर्डर नोंदवल्याच्या सुमारे दोन आठवड्या नंतर माझ्या पर्यंत पोहोचेल.
पडताळा :
आणि अगदी असेच घडले!
दोनच दिवसांनी म्हणजे २२ ऑगष्ट रोजी अॅमेझॉन इंडिया कडून मला ईमेल आली ‘आपली ऑर्डर पूर्ण करू शकत नाही, क्षमस्व’
दुसरे कोणीच ही बॅटरी विकत नसल्याने मला काहीच करता येत नव्हते , होरारी चार्ट वरून निघालेल्या अनुमाना बद्दल मला खात्री होती. मी अॅमेझॉन , इ-बे अशा ठिकाणी चक्कर मारून बॅटरी चे नवे लिस्टींग झाले आहे का ते तपासत राहिलो, ५ आक्टोबर २०१७ , म्हणजे होरारी चार्ट च्या दिनांका पासून ४६ दिवसांनी , सहा आठवड्यांनी, तीच वस्तू ई-बे युएसए वर लिस्ट झालेली दिसली, बॅटरी ची किंमत + शिपिंग खर्च जवळपास मी आधी अॅमेझॉन इंडिया वर ऑर्डर केलेल्या बॅटरी इतकाच , मी वेळ न दवडता ताबडतोब ती बॅटरी ऑर्डर केली.
हा होरारी चार्ट अभ्यासला तेव्हा माझ्या लक्षात आले नव्हते पण मी जेव्हा ई-बे युएसए वर ऑर्डर प्लेस केली तेव्हा लक्षात आले , माझा नवा विक्रेता मंगळ. हा नवमेश आहे , नवम स्थान परदेशी व्यक्ती / संस्था यांच्यातला व्यवहार / व्यापार दाखवते !
असो
ऑर्डर केल्या नंतर ती दोन दिवसांत पाठवली गेली आणि बरोबर दोन आठवड्या नंतर ही बॅटरी माझ्या हातात पडली,
अमेरिका – भारत हा प्रवास आणि मुंबई तले कस्टम्स क्लियरिंग याला इतका वेळ लागतोच.
(चंद्र – शनी नव-पंचम आणि गुरु – शनी लाभ योगांं मुळे असेल कदाचित पण आलेली बॅटरी जराशी जुनी (शनी चा इफेक्ट!) असली तरी वर्जिनल आहे, टुणटुणीत आहे, उत्तम काम देते आहे अगदी नव्या बॅटरी सारखी ! आणखी काय हवे ? )
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
You are a gifted person sir..
इतकं सहज, सुंदर समजेल असं कुणीही लिहिलेल मी तरी अजुन पाहिलेले नाही. हैट्स ऑफ🙏
धन्यवाद श्री सुशांतजी
केस स्ट्डीज हा भाग ज्योतिषशास्त्रात फारसा हाताळला जात नाही आणि ज्या काही थोड्या फार केस स्ट्डीज वाचायला मिळतात त्या अपुर्या , अर्ध्या कच्चा असतात त्यात शिकण्या सारखे फारसे लिहलेले नसते. असे अनुभव आल्यानेच मी जरा सविस्तर , स्टेप बाय स्टेप लिहायचा प्रयत्न केला आहे . आपल्याला तो पसंत पडला हे वाचून समाधान वाटले
सुहास गोखले
नमस्कार सुहासजी,
उत्तम लेख … सारासार व सांगोपांग विचार सरणी..
एक शंका… मी कुठेतरी वाचले होते नक्की आठवत नाही पण दुसरी पत्नी हि दुसऱ्या भावावरून पाहतात कारण ते पहिल्या पत्नीचे अष्टम स्थान असते.
पहिली पत्नी गेली तर दुसरे लग्न,किंवा पत्नि हे नातं तुटलं-मेल नाही का, जरी आपण सवत हि धाकटी बहीण समजत असलो तरी पहिल्या
पत्नीला नक्कीच ते मरणप्राय असेल.. म्हणून दुसरी पत्नी व्दितीय स्थान असे वाचले होते.. तुमच्या एवढा अनुभव,अभ्यास नाही सहज वाचलेलं आठवलं म्हणून लिहलं….
आपला एकलव्य,
सुशांत
धन्यवाद श्री सुशांतजी
‘कोठेतरी वाचले होते’ याला काही अर्थ नाही , नेमका संदर्भ सांगीतला असता तर बरे झाले असते ? उद्या कोणी काहीही म्हणेल , आठव्या भावा वरून , बाराव्या भावा वरुन , तिसर्या भावा वरुन , या सगळ्याचे स्पष्टीकरण मला कसे देता येईल ?
सुहास गोखले