–  बाबाजी  भेटले !

गोष्ट तशी जुनीच म्हणायला पाहीजे आता कारण हे घडले तेव्हा १९९१ साल चालू होते. कंपनीच्या कामासाठी पुण्याहून झेलम एक्स्प्रेस ने दिल्ली ला जात होतो त्या प्रवासातली ही गोष्ट. तो दिवस होता १७ नोव्हेंबर १९९१ . (मला त्या काळी हिशेब आणि डायरी लिहायची वाईट सवय होती.. त्या वेळचे ते ऐतिहासिक दस्तऐवज (?) आजही माझ्याकडे आहेत! काही दस्तऐवज, मी लग्न केले तेव्हा बायकोच्या हाती पुरावे लागू नयेत म्हणून नष्ट केले गेले हा भाग वेगळा !! )

ठरल्या वेळेला संध्याकाळी झेलम पुण्यातून निघाली. गाडी रात्री अकरा –साडे अकराच्या सुमारास मनमाड ला पोहोचे पर्यंत डब्यात निजानीज सुरु झाली होती. मी पण माझ्या बर्थ वर अंग पसरले. माझ्या समोरच्या बर्थ वर एक मल्लू केव्हाचा घोरत पडला होता, कापडाचे तागे टराटरा फाडल्यासारखे त्याचे घोरणे म्हणजे एक कहर होता.. मला झोप अशी लागलीच नाही… पहाटे पहाटे जरा काय तो डोळा लागला..

गाडी सकाळी इटारसीत पोचली …   तो घोरासूर मल्लू इथेच उतरला , वळकटी गोळा करुन दरवाज्या कडे जाताजाता मला हात करुन कळकट्ट हसला .. मी पण दात दाखवले… आपले काय जातेय !

चहावाल्या कडून एक चहा घेतला..चहा घेऊन ‘एक’ नंबर करुन येई पर्यंत गाडीने इटारसी सोडून चांगलीच गती घेतली होती.

मी बॅग मधून टुथपेस्ट आदी सरंजाम गोळा करुन, मस्तपैकी दंतप्रक्षालन (असाच शब्द आहे ना?) करुन पुन्हा आसनस्थ झालो, जराशी भूक लागली म्हणून परत बर्थ वरील बॅग उचकटवून मी एक क्रिम रोल काढला , पुण्यातून निघतानाच क्रिमरोल्स चा पॅक सोबत घेतला होता.. बरे असते असले च्याऊम्याऊ … स्टेशनावरचे तळकट काहीबाही खाण्यापेक्षा.

मोठ्या चवीने क्रिमरोल खात होतो इतक्यात , डब्यात एकदम हालचाल जाणवली,

टि.सी. आला.!

हा टी.सी. कालच तिकटीं तपासुन गेला होता… आता तो एका व्यक्तीला एस्कॉर्ट करत आला होता कारण..

“आईये, बाबाजी, इस तरफ …”

असे म्हणत टि.सी.ने त्या व्यक्तीला म्हणजे बाबाजींना माझ्या सीट समोरची खाली सीट दाखवली … ती सीट अर्थातच इटारसी ला उतरुन गेलेल्या मल्लू ची होती. ( नंतर उलगडा झाला … हा मल्लू नेमका इटारसीलाच का उतरला !)

टि.सी. बरोबरची ती व्यक्ती तशी साधीसुधीच, तसे खास काही त्या व्यक्तीत नव्हते (निदान वरकरणी तरी!) , साधेसुधे कपडे, पायात चक्क स्लिपर, बरोबर काही सामान सुद्धा नव्हते (अगदी झोळी सुद्धा नाही! या व्यक्तीला कोणत्याही सामानाची मुळात गरजच नव्हती , हे नंतर कळले !) . पण अगदी चटकन ध्यानात येत होते ते म्हणजे त्यांची दाढी आणि अत्यंत तेजस्वी, बोलके आणि पाणीदार डोळे!

दाढी म्हणाल अगदी ऋषीमुनी स्टाईल (मी नंतर त्यांना तसे बोलुन ही दाखवले !) ,आता अशा दाढ्या असलेले शेकडो साधू , बैरागी आपण पाहात असतो, पण या माणसाच्या दाढीचे केस पांढरे नव्हते तर चक्क चांदीचे धागे असल्या प्रमाणे चमकणारे होते.

डोळे कमालीचे बोलके होते , इतके की मीच काय डब्यातले सगळेच लोक भूल घातल्या सारखे त्या डोळ्यांकडे बघतच राहीले.

“आईये , बाबाजी..”

म्हणत टि.सी. ने बाबाजींना अत्यंत अदबीने , सन्मानाने त्यांची सीट दाखवली (ती माझ्या समोरच होती)

“यहाँ आपका सारा इंतेजाम किया हैं ।“

बाबाजी त्याच्या कडे बघून मंद हसले , त्या हसण्यात काय कमालीची जादू होती म्हणून सांगू, मला आजही खात्री आहे की जो जो कोणी हे हसणे पाहील तो तो त्याच क्षणी कोणताही विचार न करता बाबाजींच्या पायावर लोळणच घेईल!

टि.सी. पुढे सरसावला , त्याने खिशातला रुमाल काढून बाबाजींची सीट चक्क पुसली आणि हात जोडून विनंती केली…

“बाबाजी, काही लागले तर आज्ञा करा… मी आग्र्या पर्यंत ड्युटीवर आहे , आग्र्याच्या टि.सी. ला जाताना सांगून जातो आहेच.. बस्स आपली कृपा असावी..”

बाबाजींनी त्याला आशिर्वाद दिला.

त्या टि.सी. ने बाबाजींना असा मानसन्मान दिलेला पाहताच , आणखी एक कळकट मल्लू, दोन गुजराथी बायकां त्यांच्या त्यांच्या रमणिकलाल, हरिस भाय (चू.भू. दे.घे.) सहीत , दोन – तीन एस.आर.पी. चे धटींगण (हे पण डब्ब्यात होते) आणि इतर बरेच , बाबजींच्या पाया पडले … मी क्रिमरोल खात होतो , तसाच त्या क्रिमरोल धरल्या हाताने मी ही बाबाजींना नमस्कार केला …

माझा तो नमस्कार पाहून बाबाजी मिस्किलपणे हसले !

एव्हाना डब्ब्यातल्या सगळ्यांचे पाया पडुन झाले होते… बाबजी काही वेळ खिडकीतून बाहेर बघत होते… नंतर ते डोळे मिटून शांत बसून राहीले.

मी पुन्हा एकदा बॅग (माझी !) उचकटवली, आणि माझी ‘इलेक्टोनिक सर्किट ‘ ची फाईल बाहेर काढली. दिल्लीला क्यालंट शी त्याच विषयावर चर्चा करायला चाललो होते.

त्या फाइल मधले एक सर्कीट मी बघायला सुरवात केली. त्यातला एक प्रॉब्लेम मला गेले कित्येक दिवस सतावत होता.. मलाच काय पण माझ्या बॉस ला सुद्धा त्याचा वर काही करता आले नव्हते… बॉस ने सांगीतले होते –

“सुहास, त्या मुखर्जी (क्लायंट) समोर ह्या सर्किट वर चर्चा करु नको… उघडे नागडे करुन , फाडून खाईल तुला तो… त्याने विचारलेच तर – आम्ही अजून ह्यावर काम करतो आहे , सुधारणा करत आहोत असे काहीतरी सांगून वेळ मारुन ने..”
( म्हणूनच स्वत: जाण्या ऐवजी ..मला दिल्लीला पाठवले होते .. डांबिस !)

मी त्या नरभक्षक मुखर्जी पासुन बचाव कसा करायचा या साठी सर्किट चा अभ्यास चालू केला..

“हे ट्रॅपीझॉयडल चार्जींग असे काम नाही करणार बेटा !”

मी चमकून वर बघितले !

बाबाजी माझ्या सर्कीट कडे बघत मलाच संबोधून बोलत होते !!

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

15 प्रतिक्रिया

///////////////
 1. Santosh

  नमस्कार सुहासजी,

  बाबाजींचा एन्ट्री डायलॉग “हे ट्रॅपीझॉयडल चार्जींग असे काम नाही करणार बेटा !” एकदम सही जुळून आला आहे.
  पुढील लेखाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

  संतोष

  0
  1. सुहास गोखले

   संतोषजी,

   असे खरेच झाले आहे, ते बाबाजींना कसे कळले किंवा कळू शकते त्याच्या बद्दल आधीच्या भागात उल्लेख आलेला आहेच , आणखी माहीती आगामी भागांत देत आहे..

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  मस्त सुहास जी ! आता नेहमीप्रमाणे पुढे उत्सुकता आहेच .

  0
 3. Mandar joshi

  बाबो …..
  सुहास काका….
  अहो काय हे….

  बूडबुडा काय,बाबा जी काय…
  Zombie cocktail 🍸

  आणि जोडी ला तुमचा मिरजी तडका…

  वावा. मजा आणलीत
  एकदम झकास….

  बाय द वे त्या बटेश चे काय झाले हो😊☺😊₹

  0
  1. सुहास गोखले

   श्री. मंदारजी ,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद
   /बटेश चे काय झाले हो/ नावाची पोष्टच केली आहे गेल्या आठवड्यात ती वाचा.

   सुहास गोखले

   0
 4. Suresh

  तुम्हाला बरेच बाबाजी रेल्वे मध्येच भेटतात का? आम्हाला बुवा एकही अस भेटला नाही. आता रेल्वे प्रवास वाढविला पाहिजे अश्या विचारात आहे 🙂

  0
 5. Niranjan Joshi

  Dear Suhas Ji ,

  Eagerly waiting for next write up on this subject . The gap is too long .

  Trust you can spare some time and continue .

  Regards ,

  Niranjan Joshi .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. निरंजन जी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मी सध्या काही ट्रनिंग प्रोग्रॅम मध्ये गुंतलेलो आहे, त्यातुन जरा मोकळा होताच नविन लिखाण नक्की करेन.

   सुहास गोखले

   0
 6. प्राणेश

  दंतप्रक्षालन नव्हे, दंतधावन!

  बाकी लेखमाला अत्युत्तम!

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.