मला सगळ्या प्रकारचे संगीत आवडते. आमच्या घरात ‘संगीताचे’ बाळकडू  का काय म्हणतात ना तसले काहीही नव्हते, माझ्या आईला, वडीलांना गाण्याची फारशी आवड नसली तरी एक संस्काराचा भाग म्हणून मला बळजबरीने गाण्याच्या क्लासला घातले गेले. गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा ही मी दिल्या पण ते सगळे मारुन मुटकून.

पुढे महाविद्यालयात दाखल झाल्यावर त्या काळात जे कानावर पडत होते (त्याला संगीत म्हणायचे का प्रश्न वेगळा!) ते ऐकायचा सपाटा सुरु झाला. हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा पलीकडे जाऊन संगीताचे अफाट जग विस्तारले आहे याची पुसटशी का होईना जाणीव झाली. हिंदी सिनेमातले संगीत सतत कानावर आदळत होते, मराठी संगीतात दखल घेण्यासारखे काही वाटलेच नाही.

माझे काही मित्र ‘गजल’ चे मोठे शौकिन! त्यांच्या सहवासात बर्‍याच गजल ऐकल्या, पण हा प्रकार काहीही केले तरी मनाला भावला नाही,  उर्दु भाषेची नजाकत मान्य करुनही हा संगीत प्रकार माझ्यात रुजला नाही.  एक कमालीचा एकसुरी बाज वाटला मला.

गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा रडत खडत का होईना दिलेल्या असल्याने भारतीय शास्त्रीय संगीताची चुटपुट ओळख झालेलीच होती.

याच काळात पं.शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रत्यक्ष मैफल (लाईव्ह) ऐकायचा योग आला. सांगलीत असे काही ऐकायला मिळणे तसे दुर्मिळच. ही मैफल म्हणजे केवळ स्वर्ग सुखच होते. एखाद्याला दारुची चटक लागावी तशी मला शास्त्रीय संगीताची चटक लागली.

यथावकाश माझे महाविद्यालयीन शिक्षण संपले आणि नोकरी निमित्त मी पुण्यात दाखल झालो. आता पुण्यासारख्या ठिकाणी राहावयास आल्यामुळे माझा संगीत विषयक प्रवास अधिक वेगाने सुरु झाला. ‘सवाई’ ची वैभशाली मेजवानी तर होतीच पण लक्ष्मी क्रिडा मंदीर, बेडेकर राम मंदिर , ओशो तिर्थ अशा संगीताच्या पाणपोया देखिल सापडल्या , पं. सतीश व्यासांचे सुरेख संतुर असेच बेडेकर राम मंदिराच्या पायरीवर बसून ऐकले आहे,  कोथरुड्च्या मृत्युंजयेश्वर मंदिरात डागर बंधुंच्या पायाशी बसून ध्रुपद ऐकायचा योग आला आणि धन्य झालो ! ओशो तिर्थावर हरीजींची (सोबत झाकीर !) बासरी आकंठ ऐकली आणखी काय पाहीजे !

याच काळात कै. पं. अरविंद गजेंद्र्गडकरां कडे मी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत होतो, पंडितजींनी माझ्यावर खूप मेहेनत घेतली पण मुळात गायकी अंग रक्तातच असावे लागते तेच वट्टात माझ्याकडे नाही, वाद्यवादनाचीही (बासरी आणि  कि-बोर्ड) ची साधारण अशीच वाट लागली. वाद्यही काही वश झाले नाही. ‘गानसेन’ बनता आले नाही पण कान उत्तम तयार होऊन ‘कानसेन’ मात्र बनलो. स्वरज्ञान झाले, कान भलताच तयार झाला !

भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास असला , त्यात कमालीची रुची असली तरी, ह्या संगीताने कधी काळजाला हात घातला नाही (हा कदाचित माझा दोष असेल !) पण मनातल्या भावभावनांना भारतीय शास्त्रीय संगीता ने कधी स्पर्शच केला नाही, काही सन्माननीय अपवाद वगळता हे संगीत बर्‍याच वेळा स्वरांच्या कवायती कसरती करत केलेले दळण वाटायला लागले , संवादा पेक्षा विसंवाद्च जास्त टोचत होता. मनाचा ठाव घेणारे, आपल्या भावभावनांचे प्रतिबिंब असे ते कधीच वाटलेच नाही आणि आजही मला ते तसे वाटत नाही!    दु:ख , वेदना , प्रिती , भक्ती,  कणव, दया, वात्सल्य , हुरहुर असे भावभावनांचे कंगोरे व्यक्त करण्यात ते कोठेतरी कमी पडते आहे असे माझे आजही मत आहे.

स्वरांचे वैभव, ती मिंड, त्या मुरक्या, ती आवर्तने , त्या बिजली ताना , तो कोमल गंधारावरचा ठेहेराव हे सगळे शास्त्रीय अंगाने कितीही ठीक असले तरी,  गांजलेल्या , पिचलेल्या मनांचा आक्रोश काही त्यातून कधी व्यक्त झालेला मला कधी दिसला नाही, प्रेमाची ह्ळूवार आंदोलने, उत्साहाचे / चैतन्याचे उसळणारे कारंजे त्यात कधीच दिसले (ऐकले) नाही.  नैराश्येच्या गर्तेत खोलवर बुडालेले असताना आशेचा एखादा किरण दिसल्यानंतर मनाची होणारी अवस्था हे संगीत व्यक्त करु शकले नाही (निदान माझ्या बाबतीत तरी) , ह्या भारतीय संगीतात असेल काही दैवी इ. पण ते आपल्या पर्यंत पोहोचतच नाही हीच मोठी समस्या आहे. आणि म्हणूनच कदाचित, हे भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात रुजले नाही, तळागाळा पर्यंत पोहोचले नाही. एखादा गिरणी कामगार , दिवसभर राब राब राबून संध्याकाळी घरी येऊन निवांत ‘मारवा’ राग ऐकतोय असे चित्र कधीच पाहायला मिळणार नाही (ही उपमा श्री. अच्च्युत गोडबोले यांच्या सौजन्याने!).

मी मघाशी लिहले तसे काही सन्माननिय अपवाद वगळता बहुतेक  सारे  ‘खाँ , उस्ताद, पंडितजी’  मोठी निराशा करुन गेले , त्यांनी दोन दोन तास सलग गायलेला / वाजवलेला एखादा राग , ऐकूनही शेवटी माझी पाटी कोरीच रहायाला लागली! समोर चालू आहे ते संगीत आहे की तबले वाल्याशी लढाई करत , संगीत शास्त्राच्या व्याकरणाचे पुस्तकाचे वाचन चालले आहे हेच कळत नव्हते.कोणी कितीही काही म्हणा , मला हे भारतीय शास्त्रीय संगीत नेहमीच  रुक्ष  ( stale) , अपारदर्शी (opaque) आणि भावनाशून्य ( expressionless)  वाटत आले आहे.

असे जरी असले तरी या भारतीय शास्त्रीय संगीतात काहीतरी जादू आहे हे मी मान्य करतो , अडचण हीच की ती जादू आपल्या पर्यंत पोहोचवणारे जादूगार भेटणे अवघड आहे.

मी हा असा ‘गाण्या-बजावण्याचा’ शौकिन त्यामुळे कोणताच सगीत प्रकार मला व्यर्ज नाही, माझे एक साघे , सरळ , सोप्पे सुत्र आहे , जे माझ्या मनाला भावते ते माझे संगीत , मग ते कोणत्याही प्रकाराचे असो, कोणीही गायले / वाजवले असो,  ते मी माझे मानतो. उगाच एखाद्या गायकाला ‘भारत रत्न’ किताब मिळाला म्हणून तो जे गातो ते आवडलेच पाहीजे (किंवा ‘आवडते असे खोटे खोटे म्हणले पाहिजे !) हे मला कधीच मान्य होणार नाही.

या संगीताच्या प्रवासात काही अवचित असे चांगले – चुंंगले सापडून जाते आणि माझी कळी खुलते , हे असले काही मला जाम आवडून जाते,  ‘जिओ मेरे लाल, साला दिष खुष किया आपने”  अशी मनापासून दाद द्यावीशी वाटते.

असाच एकदा पाकीस्तानचे सुप्रसिद्ध कव्वाल उस्ताद फरीद अय्याज यांच्या एका खाजगी मैफिलीचे  रेकॉर्डीग हातात पडले…

बाजूबंद खुल खुल जाये”

भैरवी रागातली ही चीज उस्ताद फरीद अय्याज नी (आणि त्यांच्या साधीदारांनी) अशी काही गायली आहे की बस्स. हे उघड आहे की भारतीय शास्त्रीय संगीताच्या काटेकोर फूटपट्ट्या वापरायच्या तर हे भैरवीचे सगळ्यात निकृष्ट सादरीकरण ठरेल. ना ताल , ना सुर ! पण त्यांनी जे काही करून दाखवले आहे तो एक निखळ आनंदाचा, उत्साहाचा जोशपूर्ण खळाळता झरा आहे. शास्त्रीय संगीत सुद्धा किती रंजक बनवता येते याचे हे रेकॉर्डींग एक उत्तम उदाहरण आहे. मोठ्या मोठ्या  बुवांनी , खाँ साहेबांनी दोन दोन तास दळलेले ‘भैरवीचे’ दळण मी ऐकले आहे, शास्त्रीय संगीता बद्दल कमालीची नफरत निर्माण करण्या पलिकडे या बुवा/ खाँ नी काही केले नाही. शंका असल्यास हीच “बाजूबंद खुलखुल जाये”  चीज इतर गायकांनी पण गायीली (दळली !) आहे ती ऐकावीच , मी नावे घेत नाही, हो, उगाच कोणाच्या भावना दुखावायच्या !

असो, या रेकोर्डिंग बद्दल मी जास्त लिहीत नाही (प्रत्येक गाण्याचा, त्यातल्या स्वरांचा, मांडणिचा किस पाडयाची माझी सवय आहे पण या टायमाला तो मोह आवरतो !)

प्रत्यक्षच ऐका आणि अनुभवा ती ‘शास्त्रीय संगीतातली जादू’ म्हणजे नेमके काय असते ते!

विडिओ सौजन्य:  The Dream Journey

 

शुभं भवतु

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. आण्णासाहेब गलांडे

  व्वा!क्या बात है.
  पण भैरवीच्या कुठल्या फुटपट्या चुकल्या ते सांगाल का?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अण्णासाहेब

   फार मोठा विषय आहे , सगळे असे समजाऊन सांगता येणार नाही.

   सुहास गोखले

   0
 2. Prashant

  Dear Suhasji,
  Enjoyed this thoroughly even though I am a classical music lover. I think the spontaneity and the informal presentation style enthralls the audience within matter of seconds! Thanks for sharing.
  -Prashant

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री प्रशांतजी

   “जे आपल्या मनाला भावते , काही क्षण का होईना आनंद देते’ ते संगीत असे मी मानतो. संगीत कोठेतरी मनाला भिडले पाहीजे . सदरचे अवघे 6 मिनिटांचे रेकॉर्डींग हे सारे निकष पुर्ण करतो , शास्त्रीय संगीताचे काटेकोर नियम लावले तर निकृष्ठ सादरी करण आहे हे मान्य असले तरी हे गाणे जो आनंद देते ते कितीतरी उच्च दर्जाचा आहे.

   आपल्याला ही क्लिप आवडली हे वाचून समाधान वाटले या कव्वाल ग्रुप च्या आणझी काही किल्प्स यु-ट्यूब ‘ वर उपलब्ध आहेत जरूर ऐकाव्यात .

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.