नोव्हेंबरची , २०१६, एका निवांत रवीवारची तितकीच निवांत संध्याकाळ , रवीवार असल्याने अपॉईंटमेंट्स नव्हत्या,  फेसबुक , युट्युब इ. टाईमपास चालला होता,  इतक्यात फोन वाजला , अथर्व चा फोन होता. अथर्व माझ्या ओळखीतला, मागे एक – दोनदा माझा ज्योतिष सल्ला घेतलेला …

“काका, मी अथर्व बोलतोय, सॉरी तुम्हाला रवीवारी आणि ते ही अशा ऑड वेळेला त्रास देतोय पण जरा अर्जंट काम आहे. मोठा लोच्या झालाय…”

“यात नविन ते काय , अथर्व म्हणजे लोच्या असेच असते ना? आता काय लोच्या झालाय  ? “

“काय सांगु काका इथे कंपनीत जोरदार प्रॉब्लेम झालेत , प्रोजेक्ट हेड शी जरा बिघडलेय…”

“रुटीन म्यॅटर, प्रोजेक्ट हेड शी अनबन होतच असते रे, अथर्व , टेंपररी असते , जरा नरम घे, कलाने घे..”

“ते सगळे करुन झाले काका, ही आजची गोष्ट नाही, गेले तीन महीने प्रकरण धुमसते आहे, आता तर चांगलेच पेटले आहे.”

“नेमके झालेय काय ते जरा विस्कटुन सांगशील का?”

“एका अमेरिकन क्लायंटच्या प्रोजेक्ट रिस्पॉन्सिबीलीटीज वरुन आमच्या इथल्या दोन प्रोजेक्ट हेड्स मध्ये साठमारी चालू आहे आणि  त्यात मधल्या मधे माझा बळी दिला जात आहे , सगळ्याचे खापर माझ्या वरच फोडून, मला डच्चू  द्यायचा प्लॅन केला आहे”

“उगाच सुता वरुन स्वर्ग कशाला गाठतोस, असे काही नसेल”

“नाही, मला पक्की खबर आहे…”

“पक्की खबर ? पोलिसातच काम करायचा चूकून आयटी वाला झालास , बोल आता  तुझ्या या नव्या लोच्यात मला कोणता रोल देणार आहेस?”

“काय काका? इथे माझी …. माझी नोकरी राहते का जाते त्याचा घोर लागलाय, ते जरा बघून सांगता का?”

“हे एक बरे आहे नाही का अथर्व, आधी एका मागोमाग लोचे करायचे आणि  ‘काका मला वाचवा..’ करायला नेमका रवीवारच! बरोबर ना?  मागचे ते लफडे , आठवतय का? तेव्हा ही रवीवारच होता ना?.”

“काका, प्लीज, गॅस वर आहे मी”

“हे बघ अथर्व , तुझी नोकरी  घालवणे किंवा टिकवून ठेवणे माझ्या हातात नाही, पण ग्रहमान काय आहे ते तपासुन , काय होऊ शकेल याचा एक अंदाज देऊ शकेन”

“चालेल”

“ठीक आहे , बघतो, असे कर मला दीड एक तासाने फोन कर”

“नक्की काका,  मी फोन करतो,  आणि जर नोकरी जाणारच असेल तर दुसरी केव्हा मिळेल हे पण सांगता येईल का?”

“अरे आधी सध्याच्या नोकरीचे काय होते ते पाहू , ही नोकरी गेली तरच दुसरी नोकरी मिळेल का  हा प्रश्न निर्माण होईल ना? आत्ता पासुन कशाला त्याची काळजी ”

“ठीक आहे काका”

“मग आता ठेव फोन.. मला काम करु दे आता”

…..

…..

 


 

माझ्या नवीन रंगरुपातल्या वेबसाईट ला भेट द्या… 

सुहास ज्योतिष

माझ्या ऑन लाईन ‘ज्योतिष अभ्य्यास वर्ग’ बद्दल सपूर्ण माहिती असलेली ८ पीडीएफ डॉक्युमेटस इथे वाचा , जादा माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधा …

ज्योतिष अभ्यास वर्ग संपूर्ण माहिती


अथर्व ची जन्मपत्रिका माझ्या कडे होती पण अशा तात्कालीन प्रश्नासाठी जन्मकुंडली पेक्षा प्रश्न कुंडली जास्त प्रभावी ठरते असा माझा नेहमीचा अनुभव असल्याने मी प्रश्नकुंडली मार्फत हा प्रश्न सोडवायचे ठरवले.

अथर्व ने प्रश्न विचारला ती वेळ (म्हणजेच मला जेव्हा त्याचा प्रश्न नेमका काय आहे याचा खुलासा झाला ती वेळ)  घेऊनच मी एक प्रश्न कुंडली तयार केली . कृष्णमुर्ती पद्धती मध्ये जातका कडून ‘नंबर’ घेऊन प्रश्नकुंडली बनवायचा प्रघात आहे , सुरवातीला मी ह्याच पद्धतीने प्रश्नकुंडली मांडत असे पण कालांतराने , अनुभवातुन मी नंबर घेऊन पत्रिका मांडण्यापेक्षा जातक प्रश्न विचारतो ती वेळ घेऊनच एक टाईम चार्ट म्हणजेच समय पत्रिका मांडणे अधिक पसंत करतो. खास करुन जातक जेव्हा फोन / ईमेल / व्हॉट्सॅप सारख्या अप्रत्यक्ष मार्गाने संपर्क साधतो त्या वेळी तर हमखास समय पत्रिकाच अधिक चांगले रिझल्ट्स देते असा माझे अनुभवातुन बनलेले मत आहे.

जातका कडून नंबर घेतो तेव्हा जातक हमखास त्याचा काही खास , जवळजवळ आधीच ठरवलेला असा एखादा लक्की नंबर  देतो, कितीही समजावले तरी हे लक्की नंबर यायचे काही थांबत नाहीत. बर्‍याच वेळा हे ‘नंबर’ प्रकरण काय आहे हे समजवण्या साठी जातकाला लेक्चर द्यावे लागते त्यात बराच वेळ जातो इतकेच नव्हे तर आधीच गोंधळलेल्या जातकाचा अधिकच गोंधळ होतो.   काही के.पी. वाले  पुस्तकातले एखादे पान उलटून त्या पाना वर असलेला पृष्ठ क्रमांक हाच के.पी. म्हणुन नंबर घेतात, काहींनी तर १ ते २४९ क्रमांकाचे बिल्ले तयार करुन ते एका थैलीत भरुन ठेवलेले असतात आणि मग जातक त्यातून (डोले मिटून) एक बिल्ला काढतो हाच के.पी. नंबर ! काही जण कॉम्प्युटर अथवा कॅलक्युलेटर वरचे ‘रॅन्डम नंबर’ हे फिचर वापरुन नंबर घेतात, माझ्या सॉफ़्टवेअर मध्येच हा असा के.पी. नंबर काढण्याची सुविधा दिली आहे ! मला ही असली ‘मटका’ सिस्टीम कधीच पट्ली नाही. त्या पेक्षा सरळ सरळ जातकाचा प्रश्न मला समजला ती वेळच जास्त नैसर्गिक आणि प्रश्नशास्त्राच्या मुलतत्वांशी सुसंगत वाटते. बाकीच्यांची मते वेगळी असू शकतात.

असो.

अथर्वचा प्रश्न नेमका मला समजला ती वेळ घेऊन केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.

 

प्रश्न नोकरी जाणार का ?

०६ नोव्हेंबर २०१६, २०:३०:२३ गंगापूर रस्ता – नाशिक 

 

 

प्रश्नकुंडलीच्या बाबतीत चंद्राची साक्ष घ्यायचा प्रघात आहे , चंद्र मनाचे प्रतिबिंब असते असे बरेच वेळा अनुभवास येते , म्हणजे प्रश्न वेळेला असलेली चंद्राची रास ,  नक्षत्र व त्यावरुन सिद्ध होणारे चंद्राचे कार्येशत्व हे  प्रश्नाच्या संदर्भात असते. म्हणजे प्रश्न विवाहाचा असेल तर चंद्र विवाहा संदर्भातल्या २ , ७ , ११ भावां पैकी काहींचा कार्येश असतो. नोकरीचा प्रश्न असल्यास २,६,१०, ११ ही स्थाने किंवा नोकरी जाण्या बद्दल प्रश्न असल्यास नोकरीच्या विरोधातली ३,५,९, ८, १२ अशी स्थाने , घरा संदर्भात प्रश्न असला तर ४, ११, १२ परदेश गमना संदर्भात प्रश्न असला तर ३,९, १२, ७ अशी स्थाने .

अर्थात असे असायलाच हवे असे बंधन नाही पण एक सुरवातीचा चेक म्हणून याचा उपयोग करुन घ्यायला काहीच हरकत नाही. काही वेळा जातकाच्या मनात असते एक आणि प्रश्न दुसराच विचारला असतो, हा गोंधळ या चंद्रा वरुन समजतो. मात्र प्रश्ना संदर्भातले प्रमुख भाव आणि चंद्राने निर्देशीत केलेले भाव यात फारच तफावत असली  तर तीन शक्यता असू शकतात:

१) जातकाच्या मनात एक आहे आणि प्रश्न भलताच विचारला आहे. अशा परिस्थितीत जातकाला बोलते करुन खुलासा करुन घेणे आवश्यक आहे.

२) जातकाने प्रश्न विचारण्यास चुकीची वेळ निवडली आहे, सध्या या प्रश्नाला उत्तर मिळू नये अशी नियतीचीच ईच्छा आहे असे समजावे , या प्रश्ना संदर्भात आणखी काही घटनां अगदी नजिकच्या काळात घडणार आहेत ,

त्या घडून  गेल्यावरच हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल. अशा वेळी जातकाला दुसर्‍या कोणत्या वेळी तोच प्रश्न विचारण्यास सुचवावे.

३) जातक प्रश्ना बाबतीत पुरेसा गंभीर नाही, कदाचित जातक ज्योतिषाची परीक्षा घेण्याच्या अथवा ज्योतिषाची चेष्टा करण्याच्या हेतुने आला आहे . अशा वेळी योग्य ती खातरजमा करुन घ्यावी.

अर्थात चंद्राची अशी साक्ष काढण्यासाठी  प्रश्न विचारता क्षणी प्रश्नकुंडली मांडली जाणे आवश्यक आहे. काही के.पी. अभ्यासक प्रश्न ऐकून घेतात / नंबर घेऊन ठेवतात पण प्रश्नकुंडली सवडीने नंतर केव्हातरी मांडून सोडवतात, अशा वेळी प्रश्न वेळेची चंद्राची स्थिती आणि कुंडली मांडतानाच्या वेळेच्या चंद्राची स्थिती बदललेली असल्याने , चंद्राची अशी साक्ष निरुपयोगी असते.

इथे पत्रिका प्रश्न विचारता क्षणाचीच असल्याने चंद्राची साक्ष घ्यायला काहीच हरकत नाही.

 

चला तर, हा अथर्वचा चंद्र काय म्हणतो ते पाहूयात…

 

 

चंद्र , अष्टम (८) स्थानात आहे , चंद्राची कर्क राशी त्रितिय (३) स्थानावर आहे, चंद्र रवीच्या नक्षत्रात , रवी पंचम (५)  स्थानात , रवीची सिंह रास चतुर्थ (४) स्थानावर म्हणजे चंद्राचे कार्येशत्व असे आहे:

चंद्र:  ५ / ८ / ४ / ३

चंद्राने अथर्व चा प्रश्न अगदी बरोबर दाखवला आहे. ५,३ ही स्थाने नोकरीच्या विरोधी स्थाने आहेत , हे मन:स्तापाचे स्थान तर हे घरी बसण्याचे द्योतक.

प्रश्न नोकरी जाणार का ? असा असल्याने आपल्याला नोकरीचे प्रमुख स्थान मानले जाणार्‍या दशम स्थानाचा (१०) सब काय  म्हणतो ते बघायला हवे.

दशमाचा सब मंगळ आहे.  मंगळ रवीच्या नक्षत्रात आहे. मंगळ स्वत: वक्री नाही आणि रवीच्या नक्षत्रात असल्याने तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात पण नाही.

हा प्रश्नकुंडलीतला महत्वाचा चेक ! प्रश्ना संदर्भातल्या  प्रमुख भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असता कामा नये , तसा तो असेल तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडत नाही.  हा सब स्वत: वक्री असला तरी चालेल (तो मार्गी झाला की रिझल्ट मिळतील / नाही) .

मंगळ अष्टम (८) स्थानी आणि मंगळाची मेष व्यय (१२) स्थानी , मंगळाची वृश्चिक रास लुप्त आहे. मंगळ रवी च्या नक्षत्रात, रवी पंचमात (५) , रवीची सिंह रास चतुर्थ स्थानावर (४) म्हणजे मंगळाचे कार्येशत्व असे आहे:

मंगळ  : ५ / ८ / ४ / १२

मंगळ अष्टम (८) , पंचम (५), व्यय (१२) स्थानांच्या माध्यमातुन नोकरी साठी प्रतिकूल संकेत देत आहे. नोकरी सुटून घरी बसण्याचे संकेत पण चतुर्थ (४)  स्थानाच्या माध्यमातुन मिळत आहेत.

नोकरी संदर्भातले आणखी एक महत्वाचे स्थान म्हणजे षष्ठम (६) स्थान , त्याचा सब काय म्हणतो ते पाहु.

षष्ठम (६) स्थानाचा सब  ‘शुक्र’ आहे. शुक्र वक्री नाही आणि तो मार्गी बुधाच्या नक्षत्रात आहे. चेक पास झाला !

शुक्र षष्ठम  (६) स्थानी आणि शुक्राची तुळ रास षष्ठम  (६) स्थानी , शुक्राची वृषभ रास लुप्त आहे. शुक्र बुधाच्या नक्षत्रात, बुध पंचमात  (५) , बुधाच्या राशी लग्न (१) , धन (२) आणि पंचम (५) स्थानांवर म्हणजे शुक्राचे  कार्येशत्व असे आहे:

शुक्र  : ५ / ६ / ५, १, २ / ६

हा शुक्र विशेष अधिकाराने व्यय (१२) स्थानाचा प्रथम स्थानाचा कार्येश होतो आहे ! कसे ?

जरा व्यय (१२) स्थाना कडे पाहा… व्ययास्थान रिकामे आहे म्हणजे व्ययस्थानाला ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाचे कार्येश नाहीत, मंगळ व्ययेश आहे , या नात्याने तो व्ययस्थानाचा ‘ड’ दर्जाचा कार्येश  होणार. मंगळाच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही म्हणजे व्ययस्थानाला  ‘क’ दर्जाचा  कार्येश पण नाही,  व्यय (१२) स्थानासाठी ‘मंगळ’ हाच काय तो एकमेव कार्येश होणार ! अशा वेळी या भावेशच्या सब मधले  ग्रह व्ययाचे ‘क’ दर्जाचे कार्येश होतात , पण एकाही ग्रहाचा सब मंगळ नाही , मग सब – सब बघायचे , शुक्राचा सब-सब  मंगळ आहे , म्हणजे शुक्र व्ययस्थानाचा ‘क’ दर्जाचा  कार्येश होणार आणि व्ययस्थानाला ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाचे कार्येश नसल्याने शुक्र हा व्ययस्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश ठरतो !!

शुक्राचे सुधारीत कार्येशत्व असे असेल:

शुक्र  : १२, ५ / ६ / ५, १, २ / ६

हा शुक्र षष्ठम स्थानाचा कार्येश असला तरी ‘ब’ दर्जाचा आहे, शुक्र देखील नोकरीच्या बाबतीत प्रतिकूल आहे .

लाभस्थान (११)  हे ईच्छा पुर्ती स्थान असल्याने त्याचा सब बघणे काही वेळा आवश्यक असते , या प्रश्ना साठी हे इतकेसे आवश्यक नसले तरी लगे हाथ तपासुन घेऊयात म्हणून लाभा (११) सब ही बघितला तो चंद्र आहे ! या चंद्राचे कार्येशत्व आपण आधीच पाहीले आहे ,  चंद्र:  ५ / ८ / ४ / ३

अथर्व म्हणाला तसे घडले म्हणजे त्याचा बळीचा बकरा बनवला गेला तर त्याचा अर्थ त्याला नोकरीतून काढून टाकणार. नोकरीवरुन काढून टाकले जाण्या बाबतीत एक नियम अनुभवास येतो.

दशमा (१०) चा  सब अष्टमाचा बलवान कार्येश होतो तेव्हा ही जातकाला कामा वरुन काढून टाकले जाते.

इथे दशमा (१०) सब मंगळ आहे आणि मंगळ अष्टमाचा ‘ब’ दर्जाचा कार्येश आहे.

आता सार्‍यातुन काही प्राथमिक निष्कर्ष निघतो ?  

अथर्व ची  शंका / भिती रास्त आहे ! त्याची नोकरी धोक्यात आहे!

मग खरेच का अथर्व ची नोकरी जाणार का वाचणार ?  ते आपण या केस स्ट्डीच्या पुढच्या भागात पाहू..

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. शरयू आडकर

    खूप छान सांगितले
    सुहासजी थँक्स

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.