(एक खुलासा” ******* मी कोणत्याही जुगाराचे समर्थन करत नाही ********* )

नुकतेच ‘मायबोली’ वर एका पोष्टला उत्तर देताना मला अचानक ‘बटेश’ आठवला. कामाच्या इतक्या घाईबडीत असताना सुद्धा हा ‘बटेश’ काही डोक्यातून जायला तयार होईना, शेवटी एकदा या बटेश ची स्टुरी लिहायचीच असे ठरवले! (सगळे सगळे सत्य घटने वर आधारित आहे, फक्त कथानकाच्या सोयी साठी काही ठिकाणी तोडमोड , काही नावे व संदर्भ बदलले आहेत ईतकंच)

‘बटेश’ हा आमच्याच गल्लीत एकदम टोकाला असणार्‍या भागीबाईच्या चाळीत राहायचा. ही भागीबाईची चाळ आमच्या दृष्टीने एक गूढ, गौडबंगालच होते. लहानपणी आम्हाला त्या चाळीच्या जवळपास सुद्धा फिरकायला बंदी होती. चाळीकडे जाणारा रस्ता आमच्या घरा समोरुनच जायचा त्यामुळे रोज सकाळी आठ-साडेआठ ला आणि रात्री नऊच्या सुमारास कसले तरी अगम्य गाणं गुणगुणत येणारा-जाणारा ‘बटेश’ मला रोज दिसायचा. अगदी फाटका माणूस, असली व्यक्तीमत्व म्हणालात तर आपल्या आजूबाजूला पैशाला पासरी सापडतील,त्यामुळे बटेश बद्दल लिहण्यासारखे खास  असे काहीच नव्हते (निदान त्या काळी तरी!), तेच आपले नेहमीचे वर्णन- कळकट लेंगा, तसलाच कळकट सदरा , पायात फाट्की चप्पल ईत्यादी ईत्यादी. त्याची चाल मात्र फार चपळ आणि सावध होती. आणि का कोणास ठाऊक या बटेशच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच चमक होती. आणखी एक , त्याला काहीतरी पुटपुटत हाताच्या बोटांची काहीतरी हिशेब करत असल्यासारखी हालचाल करायची सवय होती, त्यावेळी त्याचा अर्थ कळला नाही मात्र नंतर लक्षात आले हा माणुस तेव्हा खरोखरीचा हिशेब करत होता , गणिते करत होता !

मी तेव्हा लहान होतो, सातवी –आठवीत असेन नसेन, त्यामुळे या बटेश शी ओळख , दोस्ती होण्याची काही शक्यताही नव्हती, त्या भागीबाईच्या चाळीत अशा असंख्य वल्ली राहायच्या ,असे अनेक भणंग ‘बटेश’ तिथे पडिक असायचे त्यामुळे त्या काळात तरी बटेश आला काय आणि गेला काय कुणाचेच फारसे लक्ष नसायचे. मात्र या बटेशच्या बाबतीत एक होते , भागीबाईच्या चाळीतल्या इतर लोकांसारखे त्याच्या बद्दल वाईट कधी बोलले जात नव्हते हे नक्की. याला कारण बटेश ची आई , आजारपणामुळे ती क्वचितच घराबाहेर पडायची , घरी बसून ती अतिशय ,सुबक ,सुंदर गोधड्या शिवून द्यायची , आजही आमच्या घरी तिने शिवलेली एक गोधडी आहे. एका गोधडीची डिलिव्हरी घ्यायला मी एकदाच या बटेश च्या खोलीवर गेलो होतो तेव्हढेच. पुढे ती म्हातारी खपली. बटेशच्या आयुष्यात त्यामुळे काही फारसा फरक पडला नसावा, सगळे मागच्या पानावरुन पुढे. बाकी बटेशचा कुणालाच त्रास नव्हता, कुणाच्या अध्यात ना मध्यात. पण एक होते, गणपती असो वा होळी, या सार्वजनिक कार्यक्रमांत बटेश मात्र राब राब राबायचा, एकदा आमच्या शेजारी पाटणकरांच्या घरी मोठा साप दिसला होता तो ह्या बटेशनेच बिळात हात घालुन बाहेर काढलेला आठवतेय. बटेश हा असा होता खरे पण फार काळ ‘तसा’ राहीला नाही.

बटेश गणपती पेठेतल्या ‘विरमल चतुरचंद’ कडे वजनकाट्यावर काम करायचा , आता ह्या फडतूस नोकरीत काय पगार असणार ? पण ‘हे’ ही लौकरच बदलणार होते याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती, अगदी बटेशला स्वत:ला सुद्धा!

मी दहावी पास झालो आणि रिवाजा प्रमाणे सायन्स कॉलेजात दाखल झालो. खरे तर मला मराठी – इंग्रजी साहित्य, मानसशास्त्र यात बी.ए. करायचे होते पण … पण…. तुम्हाला माहीती आहेच… कॉलेजात मला जे नवे मित्र मिळाले त्यात एक अवलिया होता ‘अल्ताफ’, मला वाटते तो अकरावीला किमान सहा वेळा तरी नापास झालेला असावा ,आमची अजून मिसरुडे फुटायची होती तेव्हा हा घनघोर दाढी मिरवत होता! बाकी तसा तो सज्जन, एकदम दिलदार गडी, आमची ओळख झाली खरी पण लौकरच कळले की अल्ताफ चे वडिल मटक्याचे बुकी आहेत आणि अल्ताफ ही त्यांना धंद्यात मदत करतो. हे कळताच मी अल्ताफ पासून चार हात दूर राहणेच पसंत केले, अल्ताफला हे नविन नव्हते , तो काय ते समजला, पण ओळख दाखवत राहीला.

एके दिवशी या अल्ताफ ने मला जवळ बोलवून एक कागदी पाकीट हातात दिले व म्हणाला-

“सुहास , तू त्या भागीबाय चाळीच्या गल्लीत रैताय ना”

“हो”

“यार मेरा येक काम करेगा क्या”

“काय?”

“ये पाकीट वो भागीबाय चाल में वो बटेश रैता है ना , उसको देने का है, तू पैचानता उसे”

”तुला कसे माहीती”

“बटेशच बोल्या था मेरे कूं”

“मग तू का नाही स्वत: जाऊन देऊन येत?”

“हा यार, अब्बू ने मेरे कूच बोल्या था की जा के दे आव, लेकिन वो क्या है ना आज ‘सलमा’ के साथ पिक्चर देखने का मूड आयेला है , बाद मै टैम मिलेगा नै मिलेगा, और आज ये वहा नहीं पहुंच्या तो अब्बू गुस्स्सा करेगा ना, मै सोच रहा था, कैसे करु ,क्या करु , तो तू यकायक याद आया , तू उसीच गली में रैता है, तो सोचा तुझेही क्यू ना बोलू , करेगा ना यार “

“पण काय आहे काय ह्यात”

“अरे कुच नही पैसा है, पाचसौ”

“पाचशे रुपये? ”

“वो क्या है , पिछ्ले हप्ते ये बटेश का आकडा लगा था उसकाच , हमारे अब्बू का हिसाब का येक उसूल हय, किसिका पै भी पास नै रखते , जिसका पैसा उसी दिन उसके पास जानाच चाहीये “

“बटेश का नाही येत स्वत:च पैसे न्यायला?”

“अरे बिमार पडेला है , चार दिनसे आकडा लगाने को आयाच नै तो मैच उसकी दुकान पे गया था पैसा देनेको , वहा पूछा तब पता चला”

“…….”

“यार, अभी ना मत बोल, अल्लाकसम, गरीब की कमाई है”

“बटेश मटका खेळतो हे माहीती नव्हते मला… ”

“बटेश तो क्या और भी है , हमारे केमीस्ट्री लॅब का वो लंबू है ना वो भी..”

“म्हणजे ते कुलकर्णी डेमोस्ट्रेटर?”

“हा वहीच, और वो क्या ,साला नाम भूल गया यार , वो नै क्या पुरे सफेत बाल, चष्मा लगाके लायब्ररी में किताबें देता..’”

“सरदेशमुख!”

“वो भी आता है हप्ते में दो तीन बार.. और वो एक गंजा है नै का, वो ऑफिस में क्याशर के बाजूमें बैठता है , हमारी बिरादरीकाच है, नायकवडी”

मी अल्ताफ चे काम केले, पैशाचे पाकीट बघितल्या वर आजारी बटेशच्या डोळ्यात पाणी आले.

”सुहास , चहा? ”

“नको”

बटेश बद्दल लहानपणी जी भीती घातली गेली होती ती अशी तशी थोडीच दूर होणार होती! बटेश ने ओळखले..

“आलं ध्यानात आलं , ठीक हय पुना कदीतरी”

तो काळ 1977 -78 चा, इंदिराबाईंची आणिबाणी नुकतीच संपली होती, आणिबाणीच्या काळात दबलेल्या मटक्याने आता पुन्हा उसळी घेतली होती, जो बघावे तो ह्या मटक्यात गुंतला होता, बटेश मटका खेळतो ह्यात नवल असे काहीच वाटले नाही तरी पण कुलकर्णी, सरदेशमुख आणि नायकवडीं सारखी माणसे पण त्यात?

एके दिवशी मला बटेश ने हाक मारली “ सुहास” ! मी चमकून पाहीले, नाही म्हणाले तरी माझ्या कपाळावर एक दोन आठ्या पडल्याच!

“तू बामण ना””

“हो”

“त्ये पंचांग का काय ते कळत आसलच तुला ”

“हो थोडेफार”

“मला पुर्णीमा आनी अमूशा कदी येत्याल ते सांगशीला का?”

मी चक्रावलो, हा काय प्रश्न आहे आणि तो ही बटेश सारख्या व्यक्ती कडून!

”का रे, तुला कशाला लागते ही माहीती”

“काय नाय , आसच , सांगशीला का, या गल्लीत तूच येकला मला वळख द्येतू ,बाकीचे काय..”

“हे बघ बटेश, पौर्णीमा, अमावस्या प्रत्येक महिन्यात एकेकदा येतात, कुठली सांगायची?”

‘गेल्या येळेला कवा आल्ती ती आनी पुनाद्या कवा येनार ती”

“हे बघ मला सगळ्या तारखा काही पाठ नसतात, मी कॅलेंडर बघून उद्या सांगतो चालेल?”

“चालतयं ना, मी उद्याच्याला दुकाना वर जाताना हाळी घालतो”

“ए बाबा, तसले काही करु नको”

“घाबरलास काय, आरं मी तसला वंगाळ आदमी नाय”

“माहीती आहे, तू मटका खेळतोस”

“हा त्ये आपला येक एक छंद हाय, पण आईच्यान बाकी काय नाय , बीडी नाय, तंबाकू नाय , दारु नाय. आपलं दुकानावर काम करायचे आना घरी यून गपगार पडायचे“

“मग आकडा का लावतो?”

“हा लावतो म्या आकडा ,पण ख्येळ म्हणून हां, हिथे पैका हाय कुणाकडे हे असले जुगार रचाया?”

“बर मी असे करतो उद्या सकाळी कोपर्‍यावर उभा राहतो, तु तिथे ये, तेव्हा सांगतो तुला पौर्णिमा आणि अमावस्या”

“चालतयं की”

मी कालनिर्णय मध्ये बघून मागच्या पुढच्या एक दोन पौर्णीमा अमावस्यांच्या तारखां एका कागदावर लिहून बटेशला दिल्या. बटेश नववी नापास होता , र ट फ करत का होईना लिहायला वाचायला येत होते.

“थांकू”

मी पुन्हा एकदा चमकलो, चक्क ‘थांकू’ ! मला वाटते दुकानात वजनकाट्यावर काम करता करता बटेश बरेच काही नवे शिकत असावा. हा अंदाज पुढे खराही ठरला म्हणा.

पुढे पुढे मग हे नेहमीचेच झाले शेवटी मी बटेशला एक ‘कालनिर्णय’ विकत घेऊन दिले आणि त्यात अमावस्या म्हणजे काळा ठिपका ,पौर्णिमा म्हणजे पोकळ ठिपका कसा छापलेला असतो ते समजाऊन सांगीतले. बटेश खुष झाला आणि माझा त्रास ही कमी झाला. नाही म्हणले तरी गल्लीतल्या लोकांची नजर माझ्या आणि बटेशच्या या वाढत्या मैत्री वर पडली होतीच.

दोन वर्षे गेली, आता मी ‘वालचंद’ ला ईंजिनियरिंगला शिकत होतो, दरम्यानच्या काळातली बटेशची ची प्रगती जाणवण्या सारखी होती. मळकट पायजम्यातला , तुट्क्या पायताणातला बटेश आता बर्‍यापैकी कपड्यात दिसू लागला होता, पायात धड पायताणं आलेली दिसली. पुढे बोटात एक अंगठी झळकू लागली.

एके दिवशी बटेशने मला रस्त्यातच गाठले आणि हातावर एक पेढा ठेवला

”कशाचा रे’

“ही काय स्कूटर घ्येटली.. लांबरेटा..”

हो, तो जमाना असल्या स्कूटरचाच होता , हिरो होंडा अजून बाजारात यायची होती आणि बजाजच्या स्कूटरला सात आठ वर्षाचे वेटिंग होते.

“बटेश तू स्कूटर घेतलीस?”

“का, आमी काय घेऊ नै का”

”अरे तसे नाही, पण तुला कोठे जायचे यायचे असते?”

“कामाला जायाला यायाला नै बा, जरा हौस आपली”

बटेश च्या ह्या स्कूटर चे ‘राज’ काय हे थोड्याच दिवसात कळले , याचे कारण पुन्हा एकदा ‘अल्ताफ’ !

बारावीत गचकल्या नंतर अल्ताफ कॉलेज सोडून वडिलांच्या बुकीच्या धंद्यात पूर्ण वेळ लक्ष देऊ लागला होता, आपला तो प्रांत नव्हे म्हणून मी ही या अल्ताफ चे पुढे काय झाले याच्या भानगडीत कधी पडलो नाही. एकदा ‘चिंतामण’ च्या कॅन्टीन मध्ये अल्ताफ अचानक भेटला, तो तिथे लायनी मारायला यायचा आणि मी पण ! तेव्हा बोलता बोलता अल्ताफ कडून कळले की बटेश आता एक नंबर चा पंटर झाला आहे, म्हणजे मटका खेळण्यात एकदम एक्स्स्पर्ट . तो जो आकडा लावतोय तो येतोय ..शेवटि काहीतरी झोल आहे म्हणून अल्ताफच्या अब्बूं नी त्याच्या कडून बेटिंग घ्यायचेच बंद केले होते. त्यामुळे बटेश आता कराड, तासगाव, आष्टा ,इस्लामपूर ,मिरज, जयसिंगपूर, अगदी कोल्हापूर पर्यंत जाऊन आकडा खेळतोय , बटेश ने स्कूटर त्यासाठीच तर घेतली होती. अल्ताफ च्या म्हणण्यानुसार बटेश काय झोल करायचा माहीती नाही पण हप्त्यात तीन तरी विन आहेतच , बटेशला हे कसे काय जमते अल्लाजाने , काहीतरी जादूटोणा असणार !

बापरे! एका हप्त्यात तीन तीन विन्स? बटेश नेमके काय करत असावा? पण बटेशला हे विचारायचे कसे हा असला माणुस ! नसती आफत यायची म्हणून मी गप्प बसलो. पण दैववशात , बटेश नेमके काय करतो हे एके दिवशी मला कळणारच होते!

त्याचे असे झाले …

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

One comment

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.