प्रश्न शास्त्र एक दुर्लक्षित प्रांत

बदलत्या काळातल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीने व्यक्तीगत आणि कौटुंबिक पातळीवर अभूतपूर्व बदल झाले आहेत. इंटरनेट सारख्या माध्यमाने एकाच वेळी लांबच्या माणसांना जवळ आणण्याची आणि जवळच्या माणसांना दूर लोटण्याची किमया करून दाखवली आहे. पूर्वी कधी कल्पनाही केल्या नव्हत्या अशा अनेक नवीनं समस्या व आव्हाने आज आपल्या पुढे अक्राळ विक्राळ स्वरूपात नित्य नव्याने उभी ठाकत आहेत ,  ढासळती समाजमूल्ये, नीतिमत्तेच्या बदललेल्या व्याख्या आणि काळ काम वेगाची सातत्याने बदलणारी समीकरणे सोडवताना चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी आपली अवस्था झाली आहे. डोळ्यापुढचे सगळे आदर्श कोसळून पडले आहेत, आधार कुणाचा घ्यायचा आणि सल्ला तरी कोणाचा मागायचा? सगळेच भ्रष्ट!

अशा वेळी प्रश्नशास्त्र तुमच्या नक्कीच मदतीला येईल असा माझा विश्वास आहे.

प्रश्नशास्त्राची निर्मिती झाली ती जातकाच्या तत्कालीन पण तातडीच्या प्रश्नांची तितक्याच तातडीने उत्तर देण्यासाठी. त्यावेळचे जीवन संथगतीचे होते, राहणीमान साधे होते तसेच त्यावेळचे प्रश्न ही तसेच साधेसुधे होते. “चरायला गेलेली गाय रात्र झाली तरी गोठ्यात परत आली नाही” , “परगावी गेलेल्या व्यक्तीची काहीच बातमी नाही, ती व्यक्ती सुखरूप असेल ना?”, “आजारी माणसाच्या प्रकृतीत केव्हा व किती सुधारणा होईल?” अशा प्रश्नांची उत्तरे जन्मकुंडली बघून सांगता येणार नाहीत, कारण जन्मकुंडली त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा एक धावता आढावा असते, आयुष्यात हरघडीला घडणा-या लहान सहानं घटनांची दखल त्यामधून घेता येणार नाही. भारताचा नकाशा घेऊन त्यात ‘ब- 3 ,जाईजुई अपार्टमेंट, नटराज सोसायटी…” हे ठिकाण दाखवता येणार नाही, त्यासाठी वेगळाच नकाशा वापरावा लागेल. हा ‘वेगळा नकाशा’ म्हणजेच ‘प्रश्न कुंडली’ आणि अशा प्रश्नकुंडली चा अभ्यास करून प्रश्नांची उतरे देण्याचे शास्त्र म्हणजेच प्रश्नशास्त्र.

आजच्या ‘GPS Tracking’ च्या जमान्यात ‘गाय कुठे आहे’ हा प्रश्न पडणारच नाही. मोबाईल फोन आणि ‘Skype / Facebook’  च्या जमान्यात, परगावी गेलेल्या व्यक्तीची खुशाली विचारण्या साठी आणि आजारी माणसाच्या प्रकृतीची खबर घ्यायला ज्योतिषी गाठायला लागणार नाही. पण काही प्रश्न आजही असे आहेत की ज्याच्या उत्तरांचा वेध आजच्या या तांत्रिक सुविधा घेऊ शकणार नाहीत.

‘विवाह कधी होईल’ ,’संतती योग आहे का’, ‘स्वतःचे घर कधी होईल’ या सारख्या मोठ्या तालेवार प्रश्नांपासून ते, ‘नोकरी कधी मिळेल’, ‘बदली कधी होईल’, ‘रजेचा अर्ज मंजूर होईल का’, ‘नोकरीत बढतीचा योग आहे का’, ‘परदेश गमनची संधी मिळेल का’, ‘हरवलेली वस्तू सापडेल का’ , ‘अमेरिकन व्हिसा मंजूर होईल का’  या सारख्या प्रश्नांपर्यंत, इतकेच नव्हे तर ‘खंडित झालेला विद्युतपुरवठा केव्हा पूर्ववत होईल’ , ‘ लेट धावणारी रेल्वे केव्हा पोचेल’,  असे  प्रश्न ज्याची उतरे जन्मकुंडली वरून द्यायला कधीच जमणार नाही, त्यांचीही उतरे प्रश्न शास्त्र अगदी सहज पणे देऊ शकते.

प्रश्न शास्त्राचा आणखी एक मोठा फायदा आहे तो म्हणजे ज्यांची जन्मतारीख,जन्मवेळ माहिती नाही किंवा त्याच्या अचुकते बद्दल शंका आहेत,अशा व्यक्तींना ज्योतिषशास्त्रा द्वारे काही मार्गदर्शन करता येते. काही वेळा जन्मकुंडली बघून सांगता येणा‌-या प्रश्नांच्या  बाबतीत सुद्धा प्रश्न विचारण्याच्या वेळेला मांडलेली प्रश्न कुंडली जादाचे अनेक बारीक सारीक तपशील पुरवते, जे जन्मकुंडली सांगू शकत नाही.

कोणतीही कुंडली असो ती एका विशिष्ट काळाच्या आकाशस्थ ग्रहांचा नकाशा असल्याने कोणतीही कुंडली  मांडताना एक वेळ व स्थळ लागते, प्रश्नशास्त्रात प्रश्न विचारला ती वेळ जन्मवेळ व ज्योतिषी जिथे आहे ते स्थळ धरून एक कुंडली मांडतात. प्रश्नकुंडलीचे विश्लेषण करताना , फलज्योतिषातलेच सर्व नियम व अडाखे वापरले जातात,  अर्थात  प्रश्न कुंडली चे  स्वत:चे असे खास नियम ही आहेत. प्रश्न कुंडली’ सोडवताना फक्त एका विशिष्ट प्रश्नाचेच उत्तर शोधायचे असल्याने बाकीचा फाफटपसारा टाळून फक्त समोरच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित करता येते त्यामुळे प्रश्नाचे उत्तर अगदी कमी वेळात मिळते.

प्रश्नशास्त्राच्या रचनेचा मूळ हेतू हा प्रश्नांची उत्तरे ‘हो /नाही’.’शुभ /अशुभ’ अशा प्रकारे देण्यासाठी असा असल्याने उत्तरात वर्णनात्मक  आणि कालनिर्णयात्मक भाग सहसा कमी असतो किंवा त्याची फारशी आवश्यकता नसते, ’ चरायला गेलेली गाय’ परत येणार का नाही  हा मूळ  प्रश्न, त्याचे  उत्तर ‘हो /नाही’ इतपत मिळाले तरी चालण्यासारखे असते . मग ‘गाय कोणत्या दिशेला गेली आहे’ किंवा ‘ती केव्हा परत येईल’  हे जाणणे काहीसे कमी महत्त्वाचे राहील.

प्रश्न शास्त्र हे फलज्योतिषा इतकेच प्राचीन आहे, पण मधल्या काळात त्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले, ह्या शास्त्रा वरचे ग्रंथ ही मोजकेच उपलब्ध आहेत. शेवटी शेवटी तर हे शास्त्र कुडमुडे ज्योतिषी आणि पंचांगाची पाने ऊलटण्या पलीकडे ज्यांचे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नाही अशा देवळातल्या पुजा-यांच्या हातात गेले आणि आपले महत्त्व आणि उपयुक्तता घालवून बसले.

या अत्यंत बहुमोल पण जवळजवळ मृतवत झालेल्या प्रश्नशास्त्राचे ख-या अर्था ने पुनरुज्जीवन केले ते ‘‘कृष्णमूर्ती पद्धतीचे’ जनक श्री के एस कृष्णमूर्ती यांनी. त्यांनी जातका कडून घेतलेल्या क्रमांका वरुन प्रश्न कुंडलीचा लग्नबिंदू ठरवणे , विशोत्तरी दशा विदशांचा वापर करणे या सारख्या  गोष्टीं ज्या पुर्वीच्या प्रश्नशास्त्रात कधीच वापरल्या गेल्या नव्हत्या , त्यांचा त्यांनी अत्यंत कल्पकतेने वापर केला आणि  त्याच बरोबर रुलींग प्लॅनेट्सचा क्रांतीकारी शोध आणि त्यांचा या प्रश्नशास्त्रात केलेला अभूतपूर्व आविष्कार, यां सा-यांच्या जोरावर या पुरातन शास्त्राला त्यांनी  नवसंजीवनीच दिली इतकेच नव्हे तर एकेकाळच्या ह्या दुर्लक्षित शाखेला ज्योतिषशास्त्रात मानाचे सर्वोच्च स्थान मिळवून दिले.

कालनिर्णयाच्या बाबतीत तर त्यांनी इतकी अचूकता आणली आहे की कालनिर्णयाच्या प्रांतात कृष्णमूर्ती पद्धती च्या तोडीची दुसरी पद्धती अवघ्या जगात नाही हे मान्यच करावे लागेल.

आजच्या तारखेला, अवघ्या ज्योतिषशास्त्रात ‘प्रश्नशास्त्र’ ही सर्वात वेगाने विकसित होणारी शाखा बनली आहे. ज्योतिषशास्त्रातले बहुतांश नवे विचार आणि नवे संशोधन हे प्रश्नशास्त्रा संबंधीतच आहे.

हे सर्व कसे  ते आपण पुढच्या काही भागांत  पाहूया.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.