मागच्या भागात आपण प्रश्न केव्हा विचारायचा या बद्दल काही विचार केला, या भागात आपण प्रश्नांचे आणखी काही प्रकार पाहू.
या लेखमालेतले मागचे भाग इथे वाचा:
अनपेक्षित प्रश्न
काही वेळा एखादा प्रश्न अनपेक्षित पणे समोर येतो आणि येतानाच मोठा होऊन समोर आलेला असतो उदा: वस्तू वा व्यक्ती हरवणे. इथेही प्रश्न विचारण्या पूर्वी नेहमीच्या मार्गाने आधी ही ‘वस्तू वा व्यक्ती’ सापडते का नाही यासाठी प्रयत्न झालेले असले पाहिजेत. हरवलेली अथवा चोरीस गेलेली वस्तूही मौल्यवान किंवा खूप भावनिक गुंतवणूक असलेली असावी, उगाचच चष्मा /पेन सापडत नाही म्हणून प्रश्न विचारू नये.
बहुपर्यायी उत्तराचा प्रश्न
काही वेळा ‘हो / नाही’ ‘करावे / न करावे’ ‘ हे का ते’ अशी द्विधा मन:स्थितीत होते आणि त्याच्यावर निर्णय घ्यायचा असतो, काही वेळेला हाताशी फारसा वेळ ही नसतो उदा: दोन ठिकाणांहून नोकरीचे कॉल एकाच वेळी येतात, लग्नाच्या मुलीला एकाच वेळी दोन ठिकाणांहून होकार येतो, विद्यार्थ्याला दोन वा अधिक महाविद्यालयांत / कोर्सेस ना अॅडमिशन मिळते आणि त्यापैकी काय निवडायचे असा यक्ष प्रश्न उभा राहतो, द्विधा मन:स्थिती होते.
आडवळणाने विचारलेले प्रश्न (प्रश्ना मागचा प्रश्न )
काही वेळा जातक जो प्रश्न विचारतो तो त्याचा खरा प्रश्न नसतोच, त्याला दुसरेच काहीतरी विचारायचे असते, पण ते तसे स्पष्टपणे विचारायचे धाडस त्याच्या अंगी नसते. काही वेळा त्याला आपली खासगी बाब दुसर्या समोर उघड करण्याची तयारी नसते तर काहींना आपल्या समस्या नेमके पणाने, स्पष्ट शब्दात मांडता येत नाहीत. काहीजण तोंडच उघडत नाहीत तर काही इतके पाल्हाळ लावतात की त्यांना नेमके काय विचारायचे आहे समजणे मुश्कील होऊन बसते.
विवाहाच्या संदर्भात एक वारंवार विचारला जाणारा ‘आडवळणी’ प्रश्न म्हणजे “माझा प्रेम विवाह होणार आहे का ठरवून केलेला असेल?” बहुतांश वेळा हा प्रश्न विचारते वेळी त्या व्यक्तीचे एकतर्फी किंवा चोरटे प्रेमप्रकरण चालू असते व त्या चोरट्या (हो, चोरट्याच, कारण उघड प्रेम करणारे, ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणारे प्रेमवीर ज्योतिषाला प्रश्न विचारायला जात नाहीत!) प्रेमाची फलश्रुती काय असा खरा प्रश्न असतो, तेव्हा असा आडवळणाने जाणारा प्रश्न विचारण्या पेक्षा सरळसरळ ‘इच्छित व्यक्तीशी माझा विवाह होईल का ?” असा प्रश्न विचारल्यास अचूक उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते.
विवाहाच्या संदर्भात एक विचारला जाणारा आणखी एक ‘आडवळणी’ प्रश्न म्हणजे “माझा भावी पती / पत्नी दिसायला कसा/कशी असेल ? “ बहुतांश वेळा इथेही जातकाला आपल्या चालू प्रेमप्रकरणा बद्दलच विचारायचे असते, पण सरळसरळ विचारायचे धाडस नसते म्हणून असा आडवळणी प्रश्न विचारून खुंटा बळकट करण्याचाच प्रयत्न असतो.
प्रश्न कुंडलीच काय पण जन्मकुंडली वरून सुद्धा माणसाचे रंग, रूप, उंची, बांधा इ. चे तंतोतंत वर्णन करता येत नाही, जन्मरास,जन्मलग्न, (वैवाहिक जोडीदारा साठी सप्तमेश, सप्तमातले ग्रह) यावरून काही आडाखे बांधण्याचा प्रयत्न करता येतो पण ते आडाखे बऱ्याच वेळेला चुकतात. जिथे जातकाच्या पत्रिके वरून जातकाचेच वर्णन करता येणार नाही तिथे त्याच्या पत्रिकेवरून त्याच्या भावी वैवाहिक जोडीदाराचे वर्णन कसे काय करता येईल? पण काही ज्योतिर्विद मात्र अशी वर्णने एखाद्याचे छायाचित्र समोर ठेवून केल्या सारखे करतात! जर असे सांगणारा एखादा ज्योतिर्विद तुम्हाला भेटला तर ती एक धोक्याची घंटा वाजतेय असे समजा!
प्रश्न कोणता विचारचा ,कोणी विचारायचा , कधी विचारायचा याला ही काही नियम व मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
नोकरी व्यवसाया साठी किंवा शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रमाण जसे वाढले तसे ‘मी परदेशी जाईन का ?’ या प्रश्नांचेही प्रमाण वाढले आहे. पण याचा अर्थ असा नाही की केवळ उत्सुकता म्हणून कोणीही हा प्रश्न विचारावा. नोकरी व्यवसाया साठी किंवा शिक्षणा साठी परदेशी जाण्यासाठी सर्व प्रथम प्रश्न विचारणार्या व्यक्ती कडे तसे ‘पोटेंशीयल’ आहे का? हे पाहावयास हवे. शाळा मास्तर, सरकारी खात्यातला कारकून, पानबिडीचा ठेला चालवणारा यांच्या पेक्षा आय.टी. मधल्या एकाद्या सॉफ्टवेअर इंजिनियर कडे हे ‘पोटेंशीयल’ जास्त आहे. या इथे शाळा मास्तर, सरकारी खात्यातला कारकून, पानबिडीचा ठेला चालवणारी व्यक्ती परदेशी जाऊच शकत नाही अशा अर्थाने विधान केलेले नसून तुलनात्मक दृष्ट्या परदेशी जाण्याचे प्रमाण कोणात जास्त आहे याचा विचार केला आहे.
आता या ठिकाणी कोणी शंका उपस्थित करेल की जर परदेशी जाण्याचे योग नसतीलच तर प्रश्नकुंडलीत ते दिसेलच आणि नकारार्थी उत्तर मिळेल, त्या साठी आधी हे ‘पोटेंशीयल’ आहे ते तपासायची काय गरज? ज्योतिष ही ‘संकेत चिन्हां’ ची भाषा आहे, ग्रह, राशी , नक्षत्रे, कुंडलीतली बारा घरे, ग्रहांचे आपापसात होणारे योग, प्रत्येक गोष्ट हे एक ‘संकेत चिन्ह Symbol’ आहे, अशा प्रत्येक चिन्हाला शेकडो अर्थ आहेत, त्यापैकी कोणता अर्थ घ्यायचा हे त्या प्रश्नाचे स्वरूप, प्रश्नाचा संदर्भ , त्या मागची पार्श्वभूमी, प्रश्न कोण विचारतोय यावर अवलंबून असते याला इंग्रजीत ‘Context’ म्हणतात, म्हणजेच या चिन्हांचा अर्थ व्यक्ती,स्थल, काल,प्रसंग सापेक्ष असतो.
परदेश गमना साठीच्या प्रश्नासाठी 3, 9, 12 या स्थानांचा विचार केला जातो, त्यापैकी 12 वे स्थान जास्त महत्त्वाचे.
व्यय स्थान (12) अनोळखी ठिकाणी, प्रदेशात जाणे , अनोळखी व्यक्ती, भाषा व संस्कृती शी संबंध येणे
नवम स्थान (9) दूरच्या अंतराचा प्रवास
त्रितीय स्थान (3) लहान प्रवास, घरापासुन / कुटुंबीयांपासून दूर
आता या तीनही स्थानांचा एकत्रित विचार केल्यास परदेश गमन सूचित होते.
पण याच 3, 9,12 या स्थानांचे इतर ही काही अर्थ आहेत त्यांच्या परम्युटेशन्स / कॉम्बिनेशन्स चा विचार केला तर ?
- तुरुंग वास
- वेड्यांच्या इस्पितळात वा मोठ्या रुग्णालयात दाखल होणे
- नोकरी सुटणे
- मोठे नुकसान होऊन देशोधडीला लागणे
असेही अर्थ तितक्याच सक्षमतेने काढता येतात! मग , आता या पैकी कोणते भाकीत करायचे? अर्थातच ज्याचे ‘पोटेंशीयल’ जास्त आहे ते.
हे ‘पोटेंशीयल’ मला एकदा चांगलाच चकवा देऊन गेले आहे. प्रश्न परदेश गमनाचा होता , विचारणार्या व्यक्तीकडे ‘पोटेंशीयल’ होते, इतकेच नव्हे तर,एका परदेशी संस्थेने या व्यक्तीची निवड करून तसे कळवलेही होते, पण या ना त्या कारणांमुळे प्रकरण पुढे सरकत नव्हते. प्रश्न कुंडलीत 3,9,12 ही स्थाने अत्यंत बळकट होती त्यामुळे परदेश गमन निश्चतच असे ठरवून कालनिर्णयाची सर्व गणिते केली आणि परदेशगमनाची तारीख लिहून दिली, पण झाले भलतेच ! मी जी तारीख दिली होती त्या तारखेच्या आसपासच काही अनपेक्षित घटना घडल्या आणि त्याचे पर्यवसान त्या व्यक्तीला नोकरीचा सक्तीचा राजीनामा द्यायला सांगण्यात आले! म्हणजे प्रश्न कुंडलीने अगदी स्पष्ट संकेत दिला होता तो ‘नोकरी सुटण्याचा’, पण मी त्यांचा अर्थ लावण्यात चुकलो . कारण असे की प्रश्न विचारते वेळी चे परदेश गमनाचे ‘पोटेंशीयल’ इतके प्रबळ होते की मी दुसर्या कोणत्याही शक्यतेचा विचार सुद्धा केला नाही.
पुढच्या भागात आपण आणखी काही प्रश्नांचा विचार करू.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
प्रश्नशास्त्र भाग ५ मध्ये आपण म्हणता ३,९,१२ मिळाले (म्हणजे या तीनही स्थानांचा एकत्रित विचार करता) की चार घटना घडू शकतात. मला वाटते व्ययाचा सब परदेश गमनासाठी पाहणार व दशमाचा सब नोकरीतील सस्पेंशनसाठी पाहणार.षष्टाचा सब आजारासाठी पाहणार हां आता व्ययाचा, षष्टाचा व दशमाचा सब एकच असेल तर तुम्ही म्हणता तसे घडण्याची शक्यता आहे.षष्टाचा सब ३,९,१२ चा कार्येश असेल तर हॉस्पिटल निवास हे बरोबर पण माझा प्रश्न असा आहे ६,१०,१२यांचे सब वेगवेगळेअसतील तर तुमचे म्हणणे चूक ठरणार नाही का?
शिवरामजी तुमचे म्हणणे बरोबर आहे .
सुहास गोखले