मागच्या भागात मी ‘होलोग्राफीक इमेज ‘ , ‘व्ह्यूईंग अॅंगल ‘ इ. बद्दल लिहिले आहेच, याच मुद्द्यावर आणखीही माहिती द्या अशी विचारणा झाली आहे , तसे बरेच लिहिता येईल पण विस्तारभयास्तव जरा हात आखडता घेतो. ज्यांना यावर अधिक माहिती हवी आहे त्यांनी सुरवात म्हणून Carl Jung यांचे ‘Synchronicity’ या विषयावरचे लिखाण तसेच Micheal Talbot यांचे ‘ The Holographic Universe’ हे पुस्तक वाचावे. पुढे मागे जास्त माहिती द्यायचा अवश्य प्रयत्न करेन.
या लेखमालेतील आधीचे भाग:
मागच्या भागात आपण एकच प्रश्न पुन्हा पुन्हा त्याच अथवा दुसर्या ज्योतिषाला का विचारू नये याच्या मागचे मुख्य कारण बघितले.एकच प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारला जातो ? कारण पहिल्या वेळी मिळालेले उत्तर जातकाला आवडलेले नसते, तोच प्रश्न पुन्हा विचारल्यास कदाचित आपल्याला हवे असलेले अनुकूल उत्तर मिळेल अशी एक भाबडी आशा जातकाच्या मनात असते. वैद्यकीय शास्त्रात ह्याला ‘सेकंड ओपिनीयन’ म्हणतात, पण प्रश्न शास्त्रात अशी संकल्पना नाही.
प्रश्न शास्त्राचा पायाच मुळी ‘दैवी मदत’ हा असल्याने जातक जेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारतो त्यावेळी त्याला त्या प्रश्ना संदर्भात जी काही दैवी मदत मिळायची होती ती मिळालेलीच आहे, ‘प्रतिकूल उत्तर’ हा जसा ईश्वरी संकेत आहे तसेच ‘चुकीचे उत्तर’ मिळणे हा देखिल एक ईश्वरी संकेतच आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की या वेळी त्या आकाशस्थ दैवी शक्ती जातकाला मदत करायला उत्सुक नाहीत. तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून जातक एक प्रकारे त्या आकाशस्थ दैवी शक्तींवर अविश्वास दाखवत आहे, त्यांचा अनादर करत आहे. दर वेळेला जातलाला प्रश्न पडला रे पडला, त्या दैवी शक्तींनी त्याचे उत्तर द्यायला तत्परतेने धावून यायलाच पाहिजे असे थोडेच आहे ?
जसे ATM ( असत्याल तर मिळत्याल) मधून पैसे मिळण्यासाठी आधी तुमच्या खात्यात पैसे असायला लागतात , आधी दुनियाभरची पापे करायची, आणि आता अडचणीला ‘देवा मला पाव’ असा मतलबी व्यवहार इथे चालणार नाही. एरवी ज्योतिषाची टिंगल टवाळी करायची आणि मग आणीबाणीची वेळ आली की चोरून मारून / दुसर्याच्या मार्फत ज्योतिषाचे उंबरठे झिजवायचे असे चालणार नाही.
उत्तरे मिळतात म्हणून सतत आलतु फालतू कारणांसाठी या दैवी शक्तींना वेठीस धरल्यास,‘लांडगा आला रे आला’ या इसापच्या गोष्टी सारखी गत होते आणि मग जेव्हा जातकाला अत्यंत निकडीची गरज असते त्यावेळी या दैवी शक्ती जातकाकडे पाठ फिरवतात.
मागील भागात लिहिल्या प्रमाणे जातक जेव्हा प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याच्या हेतूने एखाद्या ज्योतिर्विदाला भेटतो, तेव्हा ज्योतिर्विद जातकाचा प्रश्न समजवून घेतो, मग एक प्रश्न कुंडली तयार केली जाते, ज्योतिर्विद जातकाच्या प्रश्नाच्या अनुरोधाने त्या प्रश्न कुंडली सांगोपांग विचार करतो आणि उत्तर देतो. प्रत्येक प्रश्नाला एक नवी प्रश्न कुंडली तयार केली जाते, काही अपवादात्मक स्थितीमध्ये मध्ये एकाच प्रश्न कुंडलीवरून दोन वा अधिक प्रश्नांची उतरे दिली जाऊ शकतात (तशी पुढील भागांत मी अशी काही उदाहरणे द्यायचा प्रयत्न करेन).
एका वेळेला फक्त एकच प्रश्न विचारा, दुसरा प्रश्न काही कालावधी नंतर विचारा. ज्योतिर्विद समोर आहे , मग घ्या विचारून असे करू नका. त्यातही एखादा मोफत भविष्य सांगणारा ज्योतिर्विद भेटला तर मग काही बघायलाच नको, लोकांना चेव चढतो आणि मग प्रश्न अक्षरशः: उकरून काढले जातात.
प्रत्येक प्रश्नाची एक आणि एकच वेळ असते , ती वेळ अचूक साधता आली तर प्रश्नाचे उत्तर अचूक मिळायची शक्यता जास्त असते. आता ही वेळ आलेली आहे हे कसे कळणार? खरेच, हे जाणता आले असते तर किती प्रश्न सुटले असते,पण दुर्दैवाने असे कोणतेही साधन आपल्या कडे नाही ज्याच्या साह्याने आपण ‘हिच ती प्रश्न विचारायची वेळ बरे का !” असे ठरवता येईल
पण याबाबतीत आपल्या कडे काही निकष (गाईड लाइन्स) आहेत, ते पाहूयात.
प्रश्नाची जन्मकथा
जशी प्रत्येक मनुष्य जीवाला एक जन्मवेळ असेते तसा प्रत्येक प्रश्नालाही एक जन्मवेळ असते. नऊ महिन्यांच्या गर्भावस्थे नंतरच जीव जन्माला येतो तसेच प्रत्येक प्रश्नालाही काही गर्भावस्था असावी लागते. प्रश्न आधी मनात तयार होऊन ,रुजावा लागतो, मुरावा लागतो. उगाचच मनात आले, गाठ ज्योतिषी, विचार प्रश्न असा प्रकार नसावा.
मुरलेला प्रश्न
काही अपवादात्मक परिस्थिती वगळता, बरेचसे प्रश्न हे हळूहळू विकसित होत असतात. उदाहरणार्थ, विवाहा संदर्भातल्या प्रश्नाचेच बघा, प्रथम ‘विवाह काय, होऊन जाईल’ असे म्हणता म्हणता महिने जातात,वर्षे पालटायला सुरवात होते, मग ‘विवाहाला का विलंब लागतोय’ अशी शंका मनात घर करायला लागते, पुढे या शंकेचे रूपांतर काळजीत होते आणि शेवटी ही काळजी , भितीच्या रूपाने समोर अक्राळ विक्राळ रूप घेऊन उभी ठाकते आणि इथे खरा (ज्योतिष्याला विचारण्या योग्य) ‘प्रश्न’ जन्म घेतो.
मुलगी अजून कॉलेजात शिकते आहे किंवा अजून स्थळे बघायला सुद्धा सुरवात ही केलेली नाही अशा वेळी केवळ उत्सुकता म्हणून विवाहा संदर्भात प्रश्न विचारणे इष्ट नाही, चुकीचे उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते.
नोकरीसाठी कोठेही अर्ज केलेला नाही , मुलाखती दिलेल्या नाहीत , कशाचा अजून पत्ता नाही, अशा वेळी ‘मला नोकरी मिळेल का?’ असा प्रश्न विचारू नये व ज्योतिर्विदाने सुद्धा त्याचे उत्तर द्यायच्या प्रयत्न करू नये.
सेकंड इयर इंजिनियरिंग मध्ये शिकत असलेल्या सौरभ साठी त्याच्या तीर्थरूपांनी मला ‘इन्फोसीस मस्त कंपनी आहे, आमच्या सौरभ ला तिथेच नोकरी लागेल काय?’ असा प्रश्न विचारला होता, मी त्यांना ‘असा प्रश्न आता विचारू नका .. आधी त्याचे शिक्षण पूर्ण होऊद्या, प्रश्ना साठी ही योग्य वेळ नाही ..” असे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे आपले एकच म्हणणे होते “ त्या अमक्या ज्योतिषाने सौरभ ला इन्फोसीस मध्येच नोकरी लागणार असून , पुण्यातच पोस्टिंग होईल, वार्षिक 5 लाखाचे प्याकेज मिळणार .. असे अगदी छातीठोक पणे सांगितले आहे…तुम्हाला विचारून एकदा खात्री करून घ्यायची होती”. अर्थातच अशा ‘प्रिमॅच्युअर’ प्रश्नांना मी कधीच उत्तर देत नसल्याने मला त्यांना नकार द्यावा लागला , त्यांना ते रुचले नाही, शेवटी जाता जाता “तुमचा ज्योतिषाचा अभ्यास अजून चालूच आहे वाटतंय ” असा कुत्सित टोमणा मारायला पण कमी केले नाही. खरेच इतके सूक्ष्म भविष्य, इतक्या छातीठोक पणे सांगण्या इतपत अभ्यास माझा आजही झालेला नाही.
नुकतीच कुठे नोकरीस सुरवात झाली आहे ,लगेचच ‘माझे स्वतः: चे घर कधी होणार ‘ हा प्रश्न विचारू नये, जेव्हा, ‘घर घ्यायचेच’ असा पक्का विचार करून आर्थिक बाबींची ( डाउन पेमेंट , ईएमआय इ.) चाचपणी करून , गांभीर्य पूर्वक घरे बघायला सुरवात होईल तेव्हा ‘माझे स्वत: चे घर कधी होणार ‘ हा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण होतो.
थोडक्यात प्रश्न विचारते वेळी , नेहमीच्या मार्गांनी प्रश्न सोडवण्या साठीचे प्रयत्न चालू असलेच पाहिजेत. ‘मला लॉटरी लागेल का’ असा प्रश्न विचारण्या पूर्वी लॉटरीचे तिकीट तरी खरेदी केलेले असले पाहिजे ना?
गल्ली चुकलेला प्रश्न
विचारलेला प्रश्न सुद्धा विचारणार्याशच्या आवाक्यातलाच असावा. गृहकर्जाचे हप्ते भरताना नाकीनऊ आलेल्या अवस्थेत असताना ‘मी कोट्याधिश, अब्जाधीश होईन का’ हा प्रश्न होऊ शकत नाही. शाळा मास्तर, पोष्टमन यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता कितपत असते ? त्यांच्या पूर्णं नोकरीच्या कालावधीत त्यांना अशी किती प्रमोशन्स मिळू शकतात? त्यांच्या साठी फारतर ‘बदली होईल का ‘ हा प्रश्न योग्य असू शकतो.
‘मला संतती होईल का ‘ प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी निदान त्या व्यक्तीचे लग्न तरी झाले आहे का हे बघायला नको? आणि समजा विवाह झालेला असला तरीही त्या व्यक्तीचे वय काय ते ही विचारात घेतले पाहिजे, रजोनिवृत्ती झालेल्या विवाहितेस संतती होण्याची शक्यता किती असेल?
चाळिशीच्या पुढच्या वयाच्या व्यक्तीला ‘पक्की सरकारी नोकरी’ लागण्याची शक्यता काय असेल? आधीच काडी पैलवान त्यात जाड भिंगाचा चष्मा असलेल्या व्यक्तीला लष्करात नोकरी करण्याची कितीही इच्छा असली तरी ती पूर्ण होणे कितपत शक्य होईल? नाही ना? पण असे प्रश्न मला विचारण्यात आले आहेत.
पुढच्या भागात आपण प्रश्नाचे आणखी काही प्रकार पाहू…
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020