नुकतेच एका ज्योतिष अभ्यासकाशी ‘प्रश्नकुंडली’ या विषयावरती काहीसे ‘शंकासमाधान’ पद्धतीचे बोलणं झाले. तेव्हा मी जी काही माहिती त्या अभ्यासकाला दिली त्याचा इतर अभ्यासकांनाही थोडा फार लाभ होऊ शकेल असे वाटले म्हणून त्या संभाषणातला काही महत्त्वाचा भाग शब्द रूपाने आपल्या समोर मांडत आहे.
त्या अभ्यासकाचा एक प्रश्न असा होता:
‘प्रश्न कुंडली’ केव्हा मांडायची म्हणजेच प्रश्नकुंडलीची वेळ कोणती घ्यायची?
याचे सरळ सोपे उत्तर आहे जातकाने प्रश्न विचारला ती वेळ!
पण तरीही या बाबतीत अभ्यासक गोंधळात का पडला?
याचे गोंधळा मागे कारण आहे ‘नक्षत्रपद्धती’ मधल्या काही संकल्पना. नक्षत्रपद्धती मध्ये जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून सोडवताना जातका कडून १ ते २४९ मधला एक क्रमांक घेतात , ह्या क्रमांकावरून पत्रिकेचे बाराही भाव ठरतात! म्हणजे त्या प्रश्नकुंडलीचे बारा ही भाव प्रश्न विचारलेल्या वेळे वर अवलंबून नसतात तर ते ह्या होरारी क्र्मांकावर अवलंबून असतात (आणि अर्थातच प्रश्नकुंडली ज्या ठिकाणी बनवली जात आहे त्या स्थळाच्या अक्षांश , रेखांशाचा ही त्यात हिस्सा असतो) इथे पर्यंतचा भाग ठीक आहे पण पुढे बर्याच वेळा असे होते की जातकाने प्रश्न विचारला, होरारी क्रमांक दिला पण प्रश्नकुंडली लगेच बनवून सोडवता आली नाही तर ज्योतिर्विद त्याला / तीला जेव्हा सवड होईल तेव्हा प्रश्न सोडवायला घेईल आणि त्या वेळेची ग्रहस्थिती या होरारी क्रमांकावरुन सुनिश्चित केलेल्या बारा भावां मध्ये भरेल. अशा परिस्थिती जी प्रश्नकुंडली तयार होते त्याचा जातकाने प्रश्न विचारलेल्या वेळेशी कोणताही संबंध राहात नाही, पत्रिकेचे बारा ही भाव जातकाने प्रश्न विचारलेल्या वेळे प्रमाणे नसतात आणि ग्रहस्थिती पण वेगळ्याच वेळेची असते, कशाचाच कशाला मेळ नाही अशी स्थिती होते!
सामान्यत: ‘प्रश्नकुंडली’ चा ईतिहास आणि जगभरात होणारा वापर तपासला तर आपल्याला दिसेल की एक ‘नक्षत्र पद्धती’ वगळता सर्व जगभरच्या विविध ज्योतिषपद्धतीत ‘जातकाने प्रश्न विचारला ‘ ती वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि प्रश्नकुंडली त्या ‘प्रश्न विचारल्या’ वेळेचीच बनवली जाते, म्हणजे ‘प्रश्नकुंडलीची वेळ म्हणजेच जातकाने प्रश्न विचारला ती वेळ!
आणि या मागचे मूलतत्व आहे ते म्हणजे ‘ जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारलेल्या वेळेच्या ग्रह्स्थितीतच दडलेले असते!”
या मूलत्तवा प्रमाणे जायचे तर प्रश्न विचारलेल्या वेळेचीच कुंडली बनवली पाहीजे, पण नक्षत्र पद्धतीत हे होताना दिसत नाही आणि नेमके हेच कारण त्या अभ्यासकाच्या झालेल्या गोंधळाचे मागे आहे.
( ‘नक्षत्र पद्धती’ मध्ये हे असे का केले जाते त्या मागे काही तरी कारणमीमांसा असेलही पण आपल्याल्या त्या वादात पडायचे नाही हे मी इथे नमूद करतो.)
हे इतके सरळ स्वछ असले तरीही अनेक वेळा प्रश्न विचारल्याची नेमकी वेळ घेताना चूक होऊ शकते आणि याला कारण म्हणजे जातकाने प्रश्न विचारण्याचे मार्ग पूर्वीच्या तुलनेत कमालीचे बदलले आहेत.
सुमारे पन्नास-साठ वर्षां पूर्वी ज्योतिषाला प्रश्न विचारायचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे जातकाने ज्योतिषा समोर बसून आमने सामने प्रश्न विचारणे. तो एक असा जमाना होता की त्या काळात आजच्या सारख्या मोबाईल, इंटरनेट, ईमेल, फॅक्स , व्हॉट्सअॅप , व्हीडिओ कॉलींग, एसेमेस या सुविधा उपलब्ध नव्हत्या. इतकेच काय साधा लँड्लाईन फोन देखील फारसा कोणाकडे नसे. त्यामुळे कोणाला ज्योतिषाला प्रश्न विचारायचा असेल तर ज्योतिषाच्या घरी अथवा कार्यालयातच जावं लागायचे. पण आता जमाना बदलला आहे ज्योतिषाला अनेक मार्गाने प्रश्न विचारला जातो, समोर भेटून हा मार्ग तर आहेच शिवाय फोन, ईमेल, फेसबुक, व्हॉट्सॅप, फॅक्स, एसेमेस असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत आणि अगदी ज्योतिषाला पत्र पाठवून देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पत्रव्यवहार हा प्रकार आजच्या काळात पहावयास मिळणार नाही पण पूर्वीच्या काळातल्या ज्योतिषां कडे जातकांची पत्रे आणि मनी ऑर्डर्स येत असायच्या.
जेव्हा एखादा जातक समक्ष भेटून प्रश्न विचारतो त्यात काही फारशी अडचण येत नाही कारण सगळा व्यवहार आमने सामने समक्ष भेटीतच होत असल्याने जातकाने प्रश्न विचारला ती नेमकी वेळ घेण्यात कोणतीच अडचण अथवा संदेह निर्माण होत नाही.
जातक जेव्हा फोन द्वारे संपर्क साधतो तेव्हा ही काही अडचण येत नाही, इथे जातक समक्ष आपल्या समोर नसला, आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी त्याचा आवाज आपण जातक ज्या क्षणी बोलला त्याच क्षणी ऐकत असतो त्यात कोणतेही अंतर नसते. तेव्हा फोन वर जेव्हा जातक आपला प्रश्न सांगतो ती वेळ आपण प्रश्नकुंडली साठी घेऊ शकतो.
इथे एक लक्षात ठेवायचे की ही वेळ आपली म्हणजे ज्योतिषी जिथे आहे त्या स्थळाची घ्यायची. हे लिहायचे कारण म्हणजे एखादा जातक अमेरिकेतून आपल्याला फोन करेल तेव्हा तो त्याच्या अमेरिकेतल्या वेळे नुसार सकाळी नऊ वाजता बोलत असला तरी आपल्या कडे तेव्हा रात्रीचे नऊ वाजलेले असतील हे लक्षात घ्या, तेव्हा वेळ आणि दिनांक हे नेहमीच ज्योतिषी जिथे आहे त्या टाईम झोन मधलेच घ्यायचे, जातक ज्या टाईम झोन मध्ये आहे ते नाही.
फोन च्या बाबतीत आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे ‘आन्सरिंग मशीन’ . हा प्रकार भारतात फारसा प्रचलित नाही पण परदेशांतून हे उपकरण हमखास घरातल्या (लॅन्ड लाईन) फोन ला जोडलेले असते, आपल्या अनुपस्थित एखादा फोन आला तर हे ‘आन्सरिंग मशीन’ आपल्या वतीने कॉल घेते, आपण आधीच रेकॉर्ड करून ठेवलेला एखादा ‘वेलकम’ मेसेज कॉल करणार्याला ऐकवते आणि कॉल करणार्याला काही मेसेज द्यायचा असेल तर तो लहानसा मेसेज (एखाद्या मिनिटाचा) त्या ‘आन्सरिंग मशीन’ मध्ये रेकॉर्ड करायची सोय पण असते.
आता एखाद्या जातकाने फोन केला संध्याकाळी ६:०० वाजता, तुम्ही त्यावेळी घरी नव्हता, जातकाने त्याचा प्रश्र्न ‘आन्सरिंग मशीन’ मध्ये रेकॉर्ड केला. ती वेळ होती संध्याकाळी ६:०२ वाजताची, त्या दिवशी तुम्ही घरी परत आलात रात्री ११:०० वाजता आणि त्यानंतर ११:१३ वाजता तुम्ही ‘आन्सरिंग मशीन’ मध्ये रेकॉर्ड झालेला जातकाचा प्रश्न ऐकला. आता यातली कोणती वेळ प्रश्नकुंडली साठी घ्यायची? जातकाने जरी ०६:०२ वाजता प्रश्न रेकॉर्ड केला असला तरी तुम्ही तो समजाऊन घेतला ११:१३ वाजता तेव्हा ११:१३ हीच वेळ प्रश्न कुंडली साठी घ्यायला पाहिजे.
आता जेव्हा व्यक्ती तुम्हाला ईमेल पाठवते तेव्हा खरी समस्या निर्माण होऊ शकते. एखाद्याला ईमेल मेसेज पाठवला तर तो अक्षरश: सेकंदाच्या दहाव्या भागापेक्षाही कमी वेळेत त्या व्यक्तीच्या ईमेल इन बॉक्स मध्ये पोहोचतो सुद्धा. पण ती व्यक्ती असा आलेला ईमेल मेसेज अगदी आल्या क्षणी लगेच वाचेल असे समजणे चुकीचे आहे, सहसा असे होत नाही. लोक त्यांच्या सवडीने असे मेसेज वाचत असतात. जातकाने ईमेल कदाचित आदल्या दिवशी सकाळी पाठवली असेल तरी जर ती ईमेल दुसर्या दिवशी संध्याकाळी ७:०० वाजता उघडून वाचली गेली तर प्रश्नकुंडलीची वेळ पण दुसर्या दिवशी , संध्याकाळी ७:०० असायला हवी, जातकाने ईमेल केव्हा पाठवली याच्याशी काहीही देणे घेणे नसते.
आज काल पत्राने ज्योतिष बघितले जात नाही, तो जमाना गेला पण समजा अशी वेळ आलीच तर जातकचे आलेले पत्र (ज्यात जातकाने आपला प्रश्न लिहला आहे) जेव्हा उघडून वाचले जाते ती वेळ प्रश्नकुंडलीची समजावी. पत्र वाचणे म्हणजेच जातकाचा प्रश्न जाणणे, समजाउन घेणे त्यामुळे जातकाने पत्र आठवड्या पूर्वी लिहून पोष्टात टाकले असले तरी तुम्ही आज ते पत्र वाचता, प्रश्न समजाऊन घेता त्यामुळे ही आजची वेळच महत्त्वाची.
हाच नियम फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सॅप मेसेजेस, एसेमेस बाबतीत ही लागू पडतो. हे मेसेज तुमच्या इन बॉक्स मध्ये केव्हाचे येऊन पडलेले असतात पण तुम्ही तो मेसेज जेव्हा वाचता तेव्हाच प्रश्नाचा जन्म होतो आणि म्हणून तीच वेळ प्रश्नकुंडलीची असली पाहिजे.
इथे आणखी एक बारकावा, एक महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवायचे आहे आणि ते म्हणजे जातकाने विचारलेला प्रश्न ज्योतिषाला समजला पाहीजे तेव्हाच खर्या अर्थाने प्रश्नाचा जन्म झाला असे म्हणता येईल.
‘ज्योतिषाला तो प्रश्न समजला पाहिजे’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
तसे पाहिले तर ‘जातकाने प्रश्न विचारला’ ही वर वर साधी वाटणारी घटना असली तरी त्यामागे बरेच रामायण घडलेले असते.
जातकाच्या मनात एखादा प्रश्न निर्माण होणे ही पहीली पायरी असते, पण या पायरीवर जातक लगेच ज्योतिषाकडे धाव घेत नाही. असा निर्माण झालेला प्रश्न जातकाच्या मनात घर करून राहतो, घोळवला जातो, जसे एखादे ‘फळ’ हळू हळू पिकत जाते तसा हा प्रश्न पिकायला लागतो, जेव्हा जातकला त्या प्रश्ना बद्दल , त्याचे उत्तर मिळवण्या बद्दल कमालीची तीव्रता जाणवायला लागते तेव्हाच जातक तो प्रश्न ज्योतिषाला विचारायचे ठरवतो. जातक आणि ज्योतिषी यांचा संपर्क होतो (प्रत्यक्ष भेट , फोन वा इतर अनेक मार्गाने), आता जातक ज्योतिषाला आपला प्रश्न सांगत असला तरी अनुभव असा आहे की बर्याच जातकांना आपला प्रश्न व्यवस्थित पणे सांगता येत नाही, हे स्वाभाविक आहे कारण प्रश्न विचारते वेळी जातकाची मन:स्थिती काहीशी गोंधळाची असू शकते, जातक दडपणा खाली असतो, भांबावलेला असते, निराश झालेला असतो, काळजीने व्याकूळ झालेला असतो अशा परिस्थितीत त्याला आपला प्रश्न दुसर्याला सहज समजेल असा भाषेत व्यक्त करता येत नाही, काही वेळा जातकाच्या मनात एक असते आणि प्रश्न भलताच विचारलेला असतो, जातकाने वापरलेली भाषा , शब्द प्रयोग इतकेच काय प्रश्न विचारते वेळीची जातकाची देहबोली गोंधळाची, गैरसमज निर्माण करणारीही असू शकते. बरेच जातक बोलताना पाल्हाळ लावत बसतात, नेमका काय प्रश्न आहे हे सांगताना बरेच आढेवेढे घेत राहतात, किंवा प्रश्न विचारताना एकाच वेळी उलट सुलट विधाने करत राहतात, जातकाला नक्की काय विचारायचे आहे याचा खुलासा करुन घेताना ज्योतिषाची दमछाक होते. फार थोडे जातक असे असतात की काहीशी पूर्व तयारी करुन आलेले असतात आणि ज्योतिषाला आपला प्रश्न अगदी सरळ, स्पष्ट आणि नि:संदिग्ध शब्दात सांगू शकतात.
त्यामुळे जातका तुमच्या समोर ६:०० वाजता येऊन बसला तरी जातकाचा नेमका प्रश्न काय आहे याचा पूर्ण खुलासा करुन घेण्यासाठी पंधरा – वीस मिनिटे लागू शकतात. अशा वेळी आपण जातकाने प्रश्न विचारयला सुरवात केली ती वेळ नाही (म्हणजे ६:००) घ्यायची नाही तर ६:१७ ची वेळ, जेव्हा नेमका प्रश्न समोर आला, सर्व खुलासे झाले ती वेळ प्रश्नकुंडली साठी वापरायला हवी.
असाच प्रकार जातक जेव्हा फोन वर बोलत असताना होऊ शकतो, इथेही जातकाने केलेल्या फोन ची घंटी वाजल्याची वेळ महत्त्वाची नाही , बरेच संभाषण झाल्या नंतर शेवटी जेव्हा जातकाचा नेमका प्रश्न काय आहे याचा खुलासा होतो ती वेळच महत्त्वाची.
जातक – ज्योतिषी आमने सामने किंवा फोन वर बोलत असताना ही स्थिती असते तर जेव्हा हा संवाद ईमेल, मेसेज , पत्र अशा माध्यमातून होत असेल तर समस्या आणखी गडद होते. जातकाने ईमेल / मेसेजींग च्या माध्यमातून प्रश्न विचारला पण जे समक्ष बोलताना होऊ शकते ते या अशा लिखीत संपर्क माध्यमांच्या बाबतीत पण होऊ शकते, जातकाने नेमके काय विचारले आहे हे ज्योतिषाच्या लक्षात येत नाही किंवा जातकाने जे विचारले त्याबद्दल ज्योतिषाला काही शंका पडतात. उदाहरणार्थ जातक लिहतो “ मला नोकरी संदर्भात मार्गदर्शन हवे आहे” आता ज्योतिषाने यातून नेमका काय अर्थ काढायचा? प्रश्न नोकरी बद्दल आहे हे जरी कळले तरी नेमका काय प्रश्न आहे याचा खुलासा अजून झालेलाच नाही. ‘नोकरी कधी लागेल”. ‘नोकरीत बदल होणे शक्य आहे का’, ‘बदली होईल का’, ‘पदोन्नत्ती (प्रमोशन) मिळेल का”, व्हिआरएस घ्यावी का’, ‘पगारवाढ मिळेल का’, ‘नोकरीत त्रास आहे, कामावर मन लागत नाही’,’ नोकरी सोडून व्यवसाय करू का’ असे विविध प्रश्न ‘नोकरी’ या गटाखाली येऊ शकतात, साधा ‘विवाह योग कधी’ सारख्या प्रश्ना बाबतीतही ‘पहीला विवाह की दुसरा’ हा खुलासा करुन घेणे अत्यावश्यक असते! असे मोघम काही विचारले गेल्याने जातकाचा नेमका प्रश्न काय आहे हे ज्योतिषाला कळत नाही मग ज्योतिषी त्या जातकाशी संपर्क साधून खुलासा मागतो आणि संवादाच्या अशा दोन तीन फेर्या झाल्या नंतर केव्हा तरी जातकाच्या प्रश्ना बाबत नेमका खुलासा होतो आणि यात कदाचित एखादा आठवडा सुद्धा लागू शकतो !
त्यामूळे जातकाने प्रथम संपर्क साधला ती वेळ महत्त्वाची नाही तर जातकाने विचारलेला प्रश्न ज्योतिषाला समजला तो दिवस आणि ती नेमकी वेळच खरी मानायची, इथेच प्रश्नाचा जन्म होतो असे समजावे आणि ह्याच वेळेची (आणि ज्योतिषी हे सारे समजाऊन घेताना ज्या स्थळी / ठिकाणी आहे त्या स्थळाची) पत्रिका बनवली पाहीजे.
इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. समोर असलेल्या जातकाला बोलते करून त्याचा नेमका प्रश्न काय आहे त्या प्रश्नाची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणे जसे आवश्यक असते तसेच एक लहानशी खबरदारी इथे घेणे आवश्यक असते. जातकाचा प्रश्न नीट समजून घेतल्या नंतर ज्योतिषाने तो प्रश्न जातका समोर मांडून त्याला (जातकाला) नेमके हेच विचारायचे आहे ना याची खात्री (कन्फर्मेशन) करुन घ्यायला हवी नाही तर पुन्हा समजुतीचा घोटाळा होऊ शकतो. उदाहरणार्थ: ‘’आपल्याला नोकरीत बदल होईल का? आणि असल्यास साधारण कोणत्या कालावधीत’ असा प्रश्न विचारायचा आहे, बरोबर ना?” असा उलट सवाल जातकाला करून त्याची त्याला संमती मिळवणे आवश्यक आहे. जर जातकाला नेमका तसेच विचारायचे असेल तर तो लगेचच ‘हो, अगदी हाच माझा प्रश्न आहे’ असे अनुमोदन देईल अन्यथा ‘नाही हो, मला तसे विचारायचे नव्हते, म्हणजे मला असे विचारायचे आहे…” अशी सुरवात करेल, म्हणजे पुन्हा एकदा सवाला – जवाबाचे सत्र चालू करुन नव्याने खुलासा करुन घ्यायची वेळ येते.
जातकाने प्रश्न विचारला, ज्योतिषाला तो समजला, तो प्रश्न केव्हा समजला ती वेळ ज्योतिषाने नोंदवली देखील पण काही कारणां मुळे ज्योतिषाला त्या प्रश्नावर लगेच काम करता येत नाही त्यामुळे ज्योतिषी नंतर कधीतरी सवडीने सोडवायला घेतो, अशा वेळी प्रश्न सोडवायला घेतला ती वेळ महत्त्वाची नाही, तर प्रश्नकुंडली बनवायची ती आधी नोंद केलेल्या वेळेचीच आणि स्थळाचीच, स्थळ ही तितकेच महत्त्वाचे असते. समजा जातकाच्या प्रश्नाचा खुलास करून घेऊन वेळ नोंदवली तेव्हा ज्योतिषी मुंबईत होता पुढे ज्योतिषी कामा निमित्त बेंगलोरला गेला आणि तिथे त्याला त्या जातकाच्या प्रश्नावर काम करावेसे वाटले, अशा वेळी बेंगलोर हे स्थळ आणि ती वेळ धरायची नाही तर या प्रश्न समजला ती वेळ आणि स्थळ (या उदाहरणात मंबई) घेऊनच प्रश्नकुंडली बनवायची, बेंगलोर चा इथे काही एक संबंध नाही.
काही वेळा ज्योतिषी एखाद्या प्रश्नकुंडली वर काम चालू करतो पण काही कारणा मुळे ते पूर्ण करता आले नाही तर ते नंतरच्या टप्प्यात पूर्ण करावे लागते काही वेळा तर चक्क तीन चार हप्त्यात हे काम पूर्ण होते असे असले तरी मुळचीच पत्रिका घेऊन काम पूर्ण करावे, पत्रिकेच्या अभ्यासाचे असे कितीही टप्पे करावे लागले तरी मुळचीच पत्रिका कायम ठेवावी , अभ्यासाची वेळ कोणती / वेळा कोणत्या हे इथे मह्त्त्वाचे नाही.
जे जातकाने प्रश्न विचारला त्यावेळी लगेचच त्यावर काम करणे शक्य झाले नाही तर नंतर सवडीने त्यावर काम करता येते असे जरी असले तरी त्याला फार विलंब करू नये, सवलतीचा गैरफायदा घेतला जाऊ नये. शक्य तितक्या लवकर जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असते. उत्तर देण्यास जर उशीर झाला तर दरम्यानच्या काळात प्रश्ना संदर्भातली परिस्थिती बदलू शकते कदाचित फार उशीर झाला तर प्रश्ना मागचे गांभीर्य नष्ट होण्याची शक्यता असते.
प्रश्नाची नेमकी वेळ घ्या, स्थळाचे नेमके को-ऑर्डीनेट्स गुगल मॅप किंवा च्या माध्यमातून मिळवा, उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर अथवा अचूक अशा एफेमेरीज वापरा आणि जास्तीतजास्त अचूक पत्रिका बनवायचा प्रयत्न करा.
प्रश्नकुंडली वरून केलेले भाकित बरोबर येणे / न येणे हा एक वेगळा मुद्दा होऊ शकतो आणि त्यातल्या अनेक बाबीवर आपले नियंत्रण पण नसते पण किमान अचूक पत्रिका बनवणे हे काम जे १००% आपल्या हातात असते, ते तरी व्यवस्थित पार पाडता आले पाहीजे!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020