गोष्ट तशी जुनी म्हणजे १९५०-५५  च्या आसपासची. ‘उमा’ चे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले, बाकी देशपांड्यांनी मात्र मोठा बार उडवून दिला, लाडाकोडात वाढलेली पोर सासरी जाताना कशी लक्ष्मीच्या पावलाने गेली पाहिजे ना ? खर्चाला काही कसर ठेवली नाही, मागितले त्याच्या दसपटीने देऊन देशपांड्यांनी उमाच्या सासुरवाडीला नावे ठेवायला जागाच ठेवली नाही!

वैशाखात लग्न झाले, बघता बघता श्रावण येऊन ठेपला, सण वार , व्रत वैकल्याची धामधूम सुरू झाली, उमा तशी येऊन गेली एक दोनदा माहेरी पण एक गिरकी मारून परत सासरी, ती तरी काय करणार इकडे माहेरची ओढ तर तिकडे पतीचा विरह ! आपली गुणाची पोर सासरी सुखात नांदतेय पाहून उमाचे माता पिता मात्र धन्य धन्य झाले.

उमाच्या सासूबाई एकदम साध्या , उमाला तर सख्ख्या आई पेक्षा माया लावणार्‍या, दिवाळी आली, उमेचा पहिला दिवाळसण माहेरी मोठ्या दणक्यात साजरा झाला, जेवणा नंतर दोन्ही विहीणबाई जरा निवांत बोलत बसल्या होत्या.

“जयश्री ताई, पोर तुमची मोठी गुणाची हो, अशी सून मिळाली हे माझे दहा जन्माचे पुण्यच म्हणायचे हो..”

जयश्रीताईंचा उर भरून आला, डोळ्याच्या कडा पाणावल्या, एका आईला याहून अधिक काय चांगले ऐकायला मिळणार ?

“पण एक गोष्ट बरीक जरा गमतीचीच आहे हो उमेच्या बाबतीत”

जयश्रीताईंचे काळीज लक्ककन हालले , श्वास वरच्या वर थांबला, आई जगदंबे, आता काय ऐकायला मिळणार, उमा काही वेडेवाकडे तर वागली नाही ना?

“अहो तसं काही मोठे गंभीर नाही आहे गमतीतच… त्याचे काय झाले…. नवरात्रात आमचे कडे रोज पुरणाचा नैवेद्य .. नेमके पहिल्या माळेला मला ताप भरला , मला घोर लागला आता नैवेद्य चे कसे करायचे , पण आई तुळजाभवानीला काळजी बघा सार्‍यांची ,

“उमा पदर खोचून म्हणाली कशी, काही काळजी करू नका मी करते पुरणाच्या पोळ्या त्यात काय मोठेसे”

मी म्हणाले ,

“बाई गं, एव्हढीशी तू पोर , लाडाकोडात वाढलेली , कालीजात शिकलेली , जमणार आहे का तुला हा सारा घाट, सोप्पे नाही ते, आपण सरळ सीताकाकूंना बोलवू मदतीला, त्या बघतील सगळे”

“पण कौतुक हो पोरीचं, केलंन हो सर्व यथासांग. कुठे कुठे नाव ठेवायला जागाच सोडली नाही. पुरणपोळी तर काय सांगू , एकदम झकास झाली होती हो, अगदी दृष्ट लागण्या सारखी , पण गंमत म्हणजे उमेची प्रत्येक पोळी आपली बशीच्या आकाराची, गुजराती फुलक्यांसारखी, आता पुरणपोळ्या कशा मोठ्या आकाराचा असतात आता येव्हढ्या लहान पुरणपोळ्या पाहून नाही म्हणाले तरी आम्ही सारे चक्रावलोच ना!”

“उमा , एव्हढ्या का गं लहान लाटल्यास पोळ्या ?”
“नाही , सासूबाई, पुरणपोळी तर याच आकाराची असते”
“अग नाही उमा, पुरणपोळी नेहमीच मोठी असते, आपल्या नेहमीच्या पोळ्यांपेक्षाही मोठी”
“ नाही हो, तुम्ही म्हणताय त्या कोणत्या तरी वेगळ्या प्रकाराच्या पोळ्या असणार, खर्‍या पुरणपोळ्या ह्याच , जश्या मी केल्या आहेत तशाच”

आम्ही किती समजावतोय पण ही काही एक ऐकेल तर शपथ , हिचे आपले एकच पालुपद !  “पुरणपोळी हीच , ह्याच लहान आकाराची असते “

शेवटी आम्ही ,विचार केला, असते एकेका घराची करण्या सवरण्याची पद्धत, एक आकार सोडला बाकी पुरणपोळ्या एखाद्या कसलेल्या सुगरणीच्या तोंडात मारेल अशा, मी मनात म्हणाले , “असू दे, पोर लहान आहे शिकेल हळू हळू त्यात काय मोठेसे”

“आज बोलता बोलता विषय निघाला , म्हणून बरीक बोलले हो जयश्री ताई, तुम्हीही त्याचे काही वाईट वाटून घेऊ नका, बाकी लाखात एक पोर आहे हो तुमची”

इकडे हे सारे ऐकत असतानाच जयश्रीताईंना मात्र हसू कोसळले!

“जयश्रीताई अहो हसायला काय झाले?”
“अहो, हसू नको तर काय करू ?”
“म्हणजे?”
“”अहो ह्या सगळ्याला मीच कारण आहे”
”ते कसे काय? ”
“आता प्रत्येक घरात पुरणपोळीचा म्हणून खास असा , बिडाचा मोठ्या आकाराचा तवा असतो तसा आमच्या कडेही होता, पण मध्यंतरी तो फुटला , आमचे गाव केवढे लहान, दुसरा काही लगेचच मिळाला नाही, मग दुसरा एक जरा लहान आकाराचा बिडाचा तवा होता तसा माझ्या कडे त्याच्यावरच काम भागवले काही दिवस, दुसरा मोठा तवा काही मनासारखा मिळाल नाही, सरते शेवटी त्या लहान तव्याचीच सवय झाली हो, आता आज ही तोच तवा वापरते मी . आता उमेला काय, ती स्वयंपाक घरात लुडबुड करायला लागल्या पासनं हाच लहान तवा पाहिलाय तिने, ती शिकली ती ह्याच तव्या च्या साथीने, मोठा तवा माहितीच नाही मग मोठ्या पोळ्या तरी कशा बनणार, तिचा समज झाला की पुरणपोळी ही अशीच लहान आकाराचीच असते, बशीच्या आकाराची.”

उमेच्या सासूला ही हसू आवरले नाही आणि ह्या दोन्ही विहिणींना एकत्र हसताना बघून घरचे ही बुचकळ्यात पडले..

आता ही पुरणपोळी आत्ताच आठवायचे काय कारण आणि ह्याचा ज्योतिषाशी काय संबंध? सांगतो…

‘हर्षल’, ‘नेपच्युन’ , ‘प्लुटो’

या पारंपरिक पद्धतीने ज्योतिष बघणाऱ्या चे आणि ‘हर्षल’, ‘नेपच्युन’ , ‘प्लुटो’ या आपल्या सूर्य मालिकेतल्या नव्याने शोध लावलेल्या ग्रहांशी काय वाकडे आहे ते कळत नाही. खरे पाहिले तर ‘हर्षल’, ‘नेपच्युन’ यांची स्थानगत व दृष्टियोगा द्वारे निर्माण झालेली फळे अशी बंद्या रुपयाच्या नाण्या इतकी खणखणीत वाजणारी आहेत की थक्क व्हायला होते. पण आमच्या ‘पराशरी’ ,’‘सारावली’, ‘जातक अमुक“, “जातक तमुक “ अमुक चिंतामणी’ ‘तमुक दीपिका” मध्ये या ग्रहांचा उल्लेख नाही ना ? विशोंत्तरी दशा पद्धतीत त्यांना स्थान नाही ना ? कृष्णमूर्तींनी त्यांचा विचार केला नाही ना … झालं तर मग .. आता तुम्ही कितीही ओरडून सांगा, कितीही दाखले द्या आम्ही ते स्वीकारणार नाही म्हणजे नाही!

हे ‘हर्षल’, ‘नेपच्युन’ , ‘प्लुटो’ साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत (साध्या डोळ्यांनी फक्त शनी पर्यंतचेच ग्रह दिसतात) , त्या काळात दुर्बिणीचा शोध लागला नव्हता, हे ग्रह आहेत हेच मुळी माहिती नव्हते. आपल्या प्राचीन ग्रंथांतून अगदी त्रोटक उल्लेख आहेत पण ते नक्की ‘हर्षल’, ‘नेपच्युन’ , ‘प्लुटो’ यांचेच आहेत का हे सांगता येणार नाही, नुसते उल्लेख आहेत पण त्यांची स्थानगत, राशीगत, दृष्टीयोगाची फळे यांचा मागमूसही नाही. पण पाश्चात्त्य ज्योतिर्विदांनी मोठ्या मेहनतीने ह्या ग्रहांचा वेध घेऊन , निरीक्षणे नोंदवली आहेत, हजारो नव्हे लाखो पत्रिकांचा अनुभव घेऊन या ग्रहांबद्दल जी फळे निश्चित केली आहे , ज्यांचा हरघडी पडताळा येतो आहे त्याकडे मात्र ढुंकूनही बघायचे नाही !

शुक्र – हर्षल यांची दृष्टी योगाची फळे बघा , कशी ठणठणीत प्रत्ययास येतात . नेपच्युन ने निर्माण केलेली ‘इंट्युइशन’, ‘मानसिक आजार’, ‘कला क्षेत्रातली कामगिरी’ या संदर्भातली फळे पहा म्हणजे हा ग्रह किती महाप्रतापी आहे याची खात्री पटेल. ‘प्लुटो’ ‘नष्ट करून पुनः निर्माण करतो’ म्हणजे काय ते पाहा, काळजाचा थरकाप होईल. हे सर्व ढळढळीतपणे डोळ्या समोर असताना , त्याकडे दुर्लक्ष ? काय वेडे पणा आहे हा! का हा आपल्या जुन्या मतप्रणालींचा वृथा अभिमान आहे!

कृष्णमूर्ती पद्धती’ चे अभ्यासक / समर्थक त्यातल्या त्यात आधुनिक विचार सरणीचे , निदान त्यांनी तरी या ग्रहांचा स्वतंत्र का होईना विचार करायला हवा पण नाही , ‘कृष्णमूर्ती पद्धती’ मध्ये तर एकीकडे पाश्चांत्या कडून उचललेली ‘प्लॅसीड्स हाउस’ सिस्टिम आहे तर दुसरी कडे पारंपरिक मधले राशीं वर आधारीत दृष्टीयोग आहेत, अरबांच्या कडून उचलेला ‘पार्ट ऑफ फॉरचून’ आहे, ‘नाडी ग्रंथातला ‘सबलॉर्ड’ आहे , जर ही असली ‘खिचडी’ रुचकर लागते तर मग त्याच पाश्चात्त्यांचे ‘हर्षल’, ‘नेपच्यून’ , ‘प्लुटो’ का नाही घ्यायचे ? ‘“के.पी. रीडर्स’ मध्ये कोठे वापरलेत हे ग्रह?” अशी लंगडी सबब सांगत सगळे ‘के.पी.’ वाले ‘सबलॉर्ड एके सबलॉर्ड ‘ घोकत बसले आहेत!

नाही म्हणायला महाराष्ट्रात श्री व.दा. भट व कै. श्री, म.दा. भट या बंधूद्वयांनी याचा विचार केला , जाणीवपूर्वक पुरस्कार केला, कै. श्री, म.दा. भट यांनी तर फक्त या तीन ग्रहांवरच एक सुंदर ग्रंथ लिहिलाय, दोघांनीही असंख्य उदाहरणांतून या ग्रहांचा विचार करणे किती अत्यावश्यक हे पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न केला . कृष्णमूर्ती पद्धतीचे अभ्यासक व ‘फोर स्टेप’ पद्धतीचे जनक श्री. सुनील गोंधळेकर यांनी ‘प्लुटो’ चा काही मर्यादित प्रमाणात वापर केलेला दिसतो.

पारंपरिक वाले असोत वा ‘के.पी.’ वाले, एकदा अशी डोळ्यावर झापडें ओढून घेऊन बसल्यावर , यांचे तवे कायमच लहान राहणार, आता ‘तवा’ लहान आहे तर पुरण पोळी लहानच बनणार ना? आणि मोठा तवा कधी पाहिलाच नसेल तर यांना पुरणपोळी मोठी असते हे सांगून ही पटणार नाही!

अजून असाच एक ‘लहान तवा’ कृष्णमूर्ती पद्धती वाले आजही वापरत आहेत तो म्हणजे ‘पलॅसीडस हाउस सिस्टिम’ ! ही हाउस सिस्टिम 66 अक्षांशाच्या पुढे पूर्णपणे निरुपयोगी ठरते. म्हणजे 66 उतर किंवा 66 दक्षिण अक्षांशाच्या पलीकडे जन्म ठिकाण असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे भविष्य कृष्णमूर्ती पद्धती द्वारा सांगता येणार नाही ! पत्रिकाच बनू शकत नाही तिथे भविष्य काय ढेकळाचे सांगणार ?

कृष्णमूर्तींनी ही प्लॅसीडस हाउस सिस्टिम’ उणीव माहिती असूनही जाणूनबुजून स्वीकारली कारण त्यावेळची परिस्थिती ! त्या काळात बाजारात फक्त पलॅसीडस हाउस सिस्टिम वर आधारित भावसाधन टेबल्स (तक्तें) बाजारात उपलब्ध होते, बाकीच्या हाउस सिस्टिम्स च्या भावसाधना साठी किचकट , वेळ काढू गणिते करावी लागली असती. (मोठा तवा मिळाला नाही म्हणून उमेच्या आई ने नाईलाजाने लहान तवा वापरला होता तसेच काहीसे हे ) , दुसरा विचार असा झाला असेल की “पलॅसीडस हाउस सिस्टिम नाही चालली 66 अक्षांशाच्या पलीकडे तर काय बिघडले, नाहीतरी तिथल्या जन्मलेल्या व्यक्ती ज्योतिष पाहायला कशाला इथे भारतात येतील?”  त्याकाळी ही विचारसरणी ठीक होती पण आज असा संकुचित आणि चुकीचा विचार करुन चालणार नाही. आजकालच्या सॉफ्टवेअर च्या जमान्यात ही भावसाधन टेबल्स (तक्तें) उपलब्ध नाहीत ही उणीवच राहिली नाही, इंटरनेटच्या माध्यमातून स्थळ , काळ, वेगाची सर्व बंधने गळून पडली आहेत त्यामुळे 66 अ‍क्षांशाच्या पलीकडे जन्म झालेली व्यक्ती तुमच्या कडे ज्योतिष बघायला येण्याची शक्यता कैक पटीने वाढली आहे , माझ्याकडे गेल्या सहा महिन्यात अशा दोन व्यक्ती आल्या आहेत ! मग हा ‘हाउस सिस्टिम’ चा तवा आपण मोठा करून घ्यायला नको का ?

बघा पटते का!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

5 प्रतिक्रिया

///////////////
 1. jayesh

  sir namaskar
  sir mala puran poli ani tya sambandhit aslela lekh aavadla tumcha,
  ani harshal neptune & pluto chya lekh pan khup mhanje khup aavadlaa
  coz sir harshal neptune ani pluto hey parinaam karmtaatach ani itar grahan peksha spashtapane ani thalak pane disun yetaat
  tyamule tumhala ani tumchya lekgaalaa

  0
 2. Aniruddha Patwardhan

  Sir,
  Tumchi chhotya puranpolichi gost aavdli aani pudhacha Neptune Pluto cha lekh tar apratimach.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.