ज्योतिषीबुवा, असतील अंदाजे साठीच्या आसपासचे , रंग आडनावाला साजेसा असा लख्ख गोरा होता. माणूस एकदम गोल गरगरीत, तोंडवर एक प्रकारचा कलंदर भाव,  दणकट पायजमा (शालगर होजीयरीचा ?) , वर निळा हाफ बुशशर्ट. केस विंचरलेले,  दाढी व्यवस्थित. डोळ्यावर आधुनिक पद्धतीच्या फ्रेमचा चष्मा होता बहुदा नविनच तयार केलेला असावा.

“या”

ज्योतिषीबुवांनी तोंड भरुन स्वागत केले.

“मी , गोखले,  त्या xxxx xxxxx ने मला तुमचा रेफरन्स दिला. त्याचे वडील श्री yyyyy आपल्याला ओळखतात”

“अच्छा , बँक ऑफ महाराष्ट्र मधले yyyyy का?”

“होच , तेच”

“ओ हो , yyyyy म्हणजे काय , आमचे एकदम जानी दोस्तच”

“तुमच्या बद्दल बरेच काही ऐकलय, तुमची भेट घ्यावी असे मनापासुन वाटले,  पण मी तसा न कळवताच आलो त्याबद्दल सॉरी“

“अहो , त्यात काय एव्हढे , मी इथे बसलेलाच असतो दिवसभर , लोक येत -जात असतात,  बाकी आज तुमची वेळ चांगली बघा, आज गुरुवार असून सुद्धा कोणी नाही , एरवी  गुरुवारी तशी जरा जास्त वर्दळ असते .. हरकत नाही, बसा , शेजारी स्टुलावर पाण्याचे तांब्या भांडे आहे – सेल्फ सर्व्हिस!”

मी त्या ज्योतिषाच्या समोरच्या गादीवर स्थानापन्न झालो. ज्योतिषीबुवा पुन्हा एकदा प्रसन्न हसले. समोरच्या साईकोशा घड्याळात पाहून त्यांनी काहीतरी लिहले,  घड्याळात नेमले किती वाजले याची ती नोंद होती (हे नंतर कळले) . या ज्योतिषाचे सगळेच काम ‘क्लास’ होते , एक प्रकारचा ‘व्हिंटेज’ फील होता. लिहायला सुद्धा हा पठ्ठ्या अत्यंत सुबक आणि देखणी दौत- लेखणी वापरत होता !

ज्योतिषीबुवांनी त्यांच्या समोरच्या टेबलाच्या ड्रॉवर मधुन कसलेसे यंत्र बाहेर काढले , आणि एखाद्या सराफाने सोन्याच्या दागिना हाताळावा तसे अलगद समोर ठेवले!  तसे ते ‘यंत्र’ नव्हते तर साधारण १ फूट व्यासाचा एकात एक बसणार्‍या अशा दोन – तीन लाकडी तबकड्यांचा संच होता.

त्यावेळेला आजच्या सारखे कॅमेरा वाले फोन नव्हते त्यामुळे त्या यंत्राचा फोटो घेता आला नव्हता  पण ते कसे दिसत असावे याचा आपल्याला अंदाज देण्यासाठी मी त्याचे एक संकल्प चित्र बनवले आहे ते असे:

कल्पना माझी , ग्राफिक्सचे स्किल माझा मुलगा ची. यश ( S.Y. B.Sc) याचे.

या सर्व तबकड्या मध्यभागी असलेल्या पितळेच्या स्क्रु ने जोडल्या गेल्या होत्या. हा स्क्रु जरासा सैल करायचा , बोटाने हलकेच तबकडी फिरवायची आणि परत स्क्रु घट्ट करायचा अशी काहीशी योजना दिसत होती.

सर्वात बाहेरील तबकडी वर बारा राशींची चिन्हे चितारली होती. प्रत्येक राशी जिथे संपते तिथे ठळक काळी रेघ होती , म्हणजेच ती तबकडी १२ राशींत (भागात) विभागली होती.

या तबकडीच्या आतल्या बाजुस एकात एक बसणार्‍या दोन तबकड्या दिसत होत्या , या दोन्ही तबकड्यांवर ३६०  अंशाची ( प्रत्येक अंशाला एक लहान काळी रेघ, ५ व्या अंशासाठी जरा मोठी काळी रेघ आणि १० व्या अंशा साठी त्याहुनही जराशी मोठी काळी रेघ) मार्किंग्ज होती. 

सर्वात आतल्या तबकडी वर  ३६०  अंशाच्या मार्किंग्ज सोबतच १२ भाग दाखवणार्‍या ज्या रेघा होत्या त्यांचा रंग बदललेला होता , काळ्या ऐवजी  पांढरा आणि केशरी.

इथे एक लक्षात घ्या ह्या तबकड्यांचा संच ‘होल साईन हाऊस – भारतीय क्षेत्र कुंडली पद्धत’ साठी तयार करण्यात आलेला होता. त्यामुळे प्रत्येक भाव  एका राशीच्या ० अंशावर सुरु होतो आणि  ३० अंशावर संपतो , म्हणजेच राशी = भाव असे समीकरण असते. केशरी रंगाच्या रेषां प्रथम व दशम भावाची सुरवात दाखवतात.

ही तबकडी प्लॅसीडस हाऊस सिस्टिम (जी के.पी. वापरतात ती) साठी नाही, कारण प्लॅसीडस हाऊस सिस्टीम मध्ये एखादा भाव राशीच्या कोणत्याही अंशात सुरु होऊ शकतो आणि कोणत्याही अंशात संपू शकतो, भाव दरवेळेस ३० अंशाचा असेलच असे नाही. काही वेळा एका भावात एखादी राशी पूर्ण पणे समाविष्ट / लुप्त होऊ शकते!

वरील चित्रात तबकडी त्याच्या डीफॉल्ट पोझिशन मध्ये आहे म्हणजे मेष लग्ना साठी तबकडी तयार आहे. अर्थात मेष लग्न काही कायमच असत नाही त्यामुळे ज्या वेळेची पत्रिका त्यावेळेचे लग्न ठरवून तबकडी त्या प्रमाणे अ‍ॅडजस्ट करायला हवी.

ज्योतिषीबुवांनी ड्रॉवर मधून एक लहानसे बुकलेट काढले , साधारण भावसाधन टेबल्स असतात तशा प्रकारच्या टेबलांचे बुकलेट असावे. त्या बुकलेट मध्ये ‘वाचन खुण (बुक मार्क) ‘ म्हणून चक्क मोराचे पीस ठेवले होते,  व्वा! याला म्हणतात रसिकता !!

ज्योतिषीबुवांनी नेमके पान उलगडले,  हाताशी असलेल्या कॅलक्युलेट वर काही आकडेमोड केली आणि समोरच्या कागदा वर एक नोंद केली.

त्या बुकलेट मध्ये ‘पुणे’ या ठिकाणाची लग्न सारिणी (टेबल) असणार, वाचन खुणे च्या साह्याने , त्या दिवशीचे नेमके टेबल निवडले गेल आणि घड्याळ्यातल्या वेळे नुसार त्या वेळेला कोणते जन्मलग्न राशी – अंश आहे याचे गणित त्यांनी कॅलक्युरेटर वर केले होते.

ही नोंद करुन झाल्यावर,  त्यांनी मध्यवर्ती पितळी स्क्रु सैल करुन बाहेरील मोठी ( रंगीत , बारा राशीं दाखवणारि) तबकडी अलगद फिरवली. मी जेव्हा त्या ज्योतिषासमोर होतो त्यावेळेला ‘सिंह’ लग्न उदीत होते. त्यामुळे बाहेरील तबकडी फिरवून सिंह लग्न ० अंश आतल्या तबकडीच्या प्रथम भावारंभाशी, केशरी रेघेशी जुळेल अशी आल्यावर पितळेचा स्क्रु घट्ट केला, तबकडी नव्या स्थितीत लॉक झाली, ती अशी:

 

Rotted Dial

‘सिंह’ लग्न असल्याने , सिंह राशीचा प्रथम भाव , आता घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाहात गेल्यास , कन्या राशी म्हणजे ‘धन स्थान २’ , तुळ राशी म्हणजे त्रितिय स्थान, वृश्चिकेवर चतुर्थ भाव अशा क्रमाने कर्केत व्यय भाव.

आता ज्योतिषीबुवांनी ड्रॉवर मधून आणखी एक नोटपॅड काढले, त्यातले एक पान उलगडले, या पानावर  बारा ग्रह व त्यांच्या राशी – अंश लिहलेले दिसत होते. म्हणजेच त्या दिवशीची ग्रहस्थिती !

मला वाटते ज्योतिषीबुवांनी एफेमेरीज वापरुन , प्रत्येक दिवसाची दुपारी बारा वाजताची ग्रहस्थिती काय असेल याच्या नोंदी आधीच करुन ठेवल्या असणार!

एक चंद्र सोडल्यास बाकी ग्रह रवी… प्लुटो दिवसभरात फारसे पुढे सरकत नसल्याने दुपारी बाराची स्थिती संपूर्ण दिवसभर चालू शकते , चंद्र साधारण एका दिवसात १२ – १५ अंश प्रवास करत असल्याने चंद्राची स्थिती वेळे नुसार सिद्ध करणे आवश्यक असते तसेच एखादा ग्रह नेमका त्याच दिवशी राशी बदलत नाही ना याकडे लक्ष द्यायचे म्हणजे झाले.

त्यासाठी ज्योतिषीबुवांनी पुन्हा कॅलक्युलेट वर काही आकडेमोड केली आणि शेजारील नोट पॅड मध्ये एक नोंद केली. ही आकडेमोड , चंद्राची स्थिती जलद बदलत असल्याने आत्ताच्या वेळेची करेक्ट चंद्र स्थिती  काढण्या साठी केली गेली हे सहज कळत होते.

ही सर्व सिद्धता होताच ज्योतिषीबुवांनी ड्रॉवर मध्ये हात घालून एक सुबक पितळेचा चपटा डबा काढला. त्या डब्यातून त्यांनी ड्राईंग पिन्स असतात ना तशा पिन्स बाहेर काढल्या , या पिन्सच्या डोक्यावर ग्रहांची चिन्हे रंगवली होती, साधारण अशी :

 

planet Pin 1

आता एखाद्या नर्तकीने चपळ आणि लयबद्ध पदन्यास करत नर्तन करावे तसे भराभरा , ग्रहांच्या पिन्स, आतल्या तबकडी वर , त्या त्या ग्रहाच्या राशी – अंश स्थिती मध्ये खोचून बसवल्या . त्या दिवशी मंगळ वक्री असल्याने त्याची खुण लाल रंगात दिसत आहे.

आता ती तबकडी अशी दिसत होती:

 

Planets_Placed45

थोडक्यात ज्योतिषीबुवांनी त्या दिवसाची, त्या वेळची एक पत्रिका ज्याला आपण ‘टाइम चार्ट’ म्हणतो तो माझ्या समोर तयार केला.

इथे एक गोष्ट लक्षात घ्या , ते १९८७ साल होते, संगणक अजून फारसे प्रचारात नव्हते ,   पत्रिका बनवणे हा हाताने आकडेमोड करायचा व्याप होता.  एफेमेरीज आणि भावसाधन टेबल्स वापरुन , लॉग-टेबल – कॅलक्युलेटर  ची मदत घेऊन सुद्धा  एखादी पत्रिका बनवायला तासभर तरी लागायचाच.

टाईम चार्ट साठी त्या दिवशीची ग्रहस्थिती व त्या दिवशीचे , त्या जागेचे भावसाधन टेबल असले की आकडेमोड फारशी लागत नाही. भावसाधन टेबल च्या साह्याने त्या दिवशी , त्या वेळी कोणते लग्न उदीत आहे हे चटकन समजायचे, एका विविक्षित दिवसाची दुपारची ग्रहस्थिती नोंदवलेली असली तर त्या क्षणाची ग्रहस्थिती काढणे हे साधे त्रैराशीक वापरुन शक्य होते. एक चंद्र सोडला तर बाकीच्या ग्रहांची ग्रहस्थिती एका दिवसात फारशी बदलत नाही.

कागदावर पत्रिका (सध्याच्या काळात संगणकाच्या स्क्रिन वर) आपण नेहमीच पहात आलो आहे पण या ज्योतिषीबुवांनी वापरलेली ही तबकडी अफलातून होती. याचा मोठा फायदा म्हणजे , पत्रिका आपल्या समोर त्रिमिती स्वरुपात (थ्री डायमेंशनल) येते.

याहुनही दुसरा खूप मोठा फायदा म्हणजे या तबकडी एकाच वेळी दोन पत्रिका तपासता येतात!

या अशा:

 

 

use 1

र दिलेल्या चित्रात , आतल्या तबकडी वर जन्मपत्रिकेतली ग्रहस्थिती मांडतात आणि त्याच्या बाहेरच्या तबकडी वर गोचरीचे ग्रह.

याचा आणखी एक मोठा उपयोग म्हणजे , दोन व्यक्तींच्या पत्रिका एकाच वेळी तपासता येतात,

उदा: विवाहा साठी पत्रिका जुळवणे (मॅच मेकिंग)

 

use 2

या मांडणीचा अजूनीही एक छान उपयोग म्हणजे , दोन ग्रहांत नेमके किती अंशांचे अंतर आहे किंवा दोन ग्रहांत नेमका किती अंशाचा योग होतो आहे हे अगदी चटकन पाहता येतो. त्यासाठी आणखी एक ‘पॉईंटर’ तबकडी असते ती सगळ्यात वरती बसवायची.

‘पॉईंटर तबकडी’

 

pointer 25

ही ‘पॉईंटर’ तबकडी बसवल्या नंतर ज्या ग्रहा पासुन इतर ग्रहांची अंतरे / योग पहावयाचे असतील , त्या ग्रहावर ‘0’ अंश दाखवणारा पिवळा पॉईंटर आणायचा .

समजा आपल्याला ‘बुधा’ पासुन प्रत्येक ग्रह किती अंशावर आहे हे पहावयाचे आहे. त्यासाठी  ‘पॉईंटर तबकडी’ फिरवून तिचा पिवळा पॉईंटर ‘बुध’ या ग्रहा वर आणुन ठेवायचा.

हे झाले आपले ‘०’ अंश,  आता पॉईंटर तबकडीवरचा मार्क (० – ३६०)  , कोणताही ग्रह ‘ बुधा” पासुन किती अंश दूर आहे हे अगदी चटकन दाखवतो! मार्क ०-१८० मधला आकडा असेल ते सरळ अंशात्मक अंतर दाखवेल, जर मार्क १८० पेक्षा जास्त असेल तर तो आकडा ३६०मधून वजा केल्यास अंशात्मक अंतर मिळेल.

इथे ‘Asc’ जन्मलग्न बिंदू  , बुधा पासुन २९० मार्क वर म्हणजेच ७० अंशावर आहे ( ३६० -२९० = ७०) ,  चंद्र बुधा पासुन २१६ मार्क वर म्हणजेच १४४ अंशावर (३६०-२१६ = १४४) आहे. युरेनस हा ग्रह बुधा पासुन १४९ मार्क वर आहे म्हणजेच १४९ अंशावर आहे. दोन ग्रहां मध्ये कोणता अंशात्मक योग होतो आहे का हे तपासायाला हे सगळ्यात सोपे, जलद आणि अचुक साधन असावे.

pointer 71

ज्योतिषीबुवांनी त्या तबकडी कडे काही क्षण  रोखून  राहीले आणि कागदावर काही लिहले अर्थात ते मला दिसत नसल्याने वाचता आले नाही.

माझ्याकडे काहीसे पाहुन काहीसे हसत ज्योतिषीबुवा म्हणाले…

क्रमश:

शुभं भवतु 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anant

  श्री. सुहासजी ,

  व्यक्ती व स्थळ वर्णन फारच छान. एकंदरीत वर्णनावरून हे “स्मार्ट” जोतिषी दिसतात. त्याचा त्या तबकडी वापरण्याच्या व नोंदी ठेवण्याच्या सवयीवरून खरेखुरे अभ्यासू आहेत. पुढे जाऊन कदाचित तुम्ही त्यांना गुरु मानले असावे असे मला वाटते आहे.
  चि. यश च्या ग्राफिक्स स्किल्स जबरदस्त आहेत, तुमच्या मनातले आमच्या पर्यंत फार सुंदर पद्धतीने त्याने पोचविले आहे. त्याच्या पुढील वाटचालींना शुभेच्छा !

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद,
   हे ज्योतिषी बुवा खरेच अभ्यासु होते , त्यांच्यकडे उपाय तोडगे नव्हते की थातुर मातुर सांगणे नाही. त्यांची एक अलग अशी शैली आणि तंत्र होते. त्यांच्या कडून ज्योतिष विषय शिकण्याचे भाग्य लाभले नाही पण त्यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव माझ्या वर निश्वितच पडला आहे , त्या अर्थाने त्यांना गुरु म्हणायला काहीच हरकत नाही. माझा मुलगा चि.यश ग्राफिक्स मधला दर्दी आहे, फक्त त्याच्या मागे लागुन कामें करवून घ्यावी लागतात.
   कळावे
   सुहास गोखले

   0
 2. Himanshu

  Neat…looks like this person was ahead of the times….it need some luck to find people like these….like some of the best foods you get is from not so famous restaurants.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद,
   हे ज्योतिषी बुवा खरेच एक ‘फाईंड’ होते !

   पण बर्‍याच वेळा काय होते ‘नकली’ मालाच्या बाजारपेठेत ‘असली’ माल हरवून जातो तसेच यांच्या बाबतीत झाले असावे (आणि आज माझ्या बाबतीत होत आहे !).
   कळावे
   सुहास गोखले

   0
 3. स्वप्नील

  त्या तबकड्यांची ची चित्रे मस्तच !! पुढे काय सांगितले याची उत्सुकता लागलीये !! आणि सध्या पुढे त्यांची परंपरा सध्या कोणी सांभाळत आहेत का ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी
   अभिप्राया बद्दल धन्यवाद,
   त्या काळात म्हणजे १९८७ मध्ये त्या तबकड्या योग्य होत्या पण आता कॉम्प्युटर च्या जमान्यात अशा तबकड्या सदृष्य यंत्र वापरायची गरज नाही.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.