“राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा तलवार उपसून तो झाडावर चढला अन फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन काहीही न बोलता मांत्रिकाच्या कुटीचा रस्ता चालू लागला. …”
नाही , आज मी ‘वेताळ पंचविशी’ मधली एखादी स्टुरी सांगणार नाहीये. पण ती स्टुरी आणि माझी स्टुरी त्यात बरेच साम्य आहे. त्या राजा विक्रमादित्या सारखेच मलाही एक झाला की दुसरा अशी सतत या ना त्या ज्योतिषाला भेटायची सुरसुरी (खुमखुमी ?) येतच असायची, एखाद्या ज्योतिषा बद्दल कळले रे कळले त्याला कसे भेटता येईल (का त्याच्यावर धाड घालता येईल ?) याची योजना बनवायला सुरवात करत असे…
राजा विक्रमादित्याच्या स्टुरीत जसा एक वेताळ होता तसा माझ्या ही स्टुरीत एक मित्र रुपी वेताळ होता. तो मला नव्या नव्या ज्योतिषाची (सावजं ?) माहिती पुरवायचा…..
“xxxxxxxss नामक महान ज्योतिर्विदाची माहीती आहे?”
“नाही”
“नाssssही ? हे मुढमती बालका , या पुण्यपत्तनात येऊन इतका काळ लोटला तरी या महामानवा बद्दल तुला काहीच कसे माहीती नाही?”
“मुनिवर्य , या घोर अज्ञाना बाबत बालकास क्षमा करावी”
“वत्सा , शुभस्य शिघ्रम, जा भेट त्यांना”
“भारी आहेत का?”
“भेट म्हणजे कळेल”
“बा वेताळा , उगाच मला खड्ड्यात घालायचे पातक करु नकोस , परिणाम माहीती आहेत ना ? ज्योतिषी बोगस निघाला तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळण घेतील !”
“हायला , मी वेताळ ? म्हणजे तू राजा विक्रमादित्य आणि माझ्याच डोक्याची शकले?”
“ते नंतर बघू , पयला सांग हे म्हाराज कोठे भेटतील आणि मानधन वगैरे घेतात का?”
“तर , चांगले पंचवीस रुपये घेतात”
“साला , म्हणजे परत खाणावळीला चार दिवस खाडा”
“पोटाची उपासमार करुन असल्या पंचायती करायला कोणी सांगीतलेय?”
“मग दुसरे काय करु?”
“हॉटेलात कपबशा विसळ ना , पैसे ही मिळतील आणि वर चहा – खारी फुकट”
“तसे केले असते रे , पण त्यांना हाय क्वालीफाईड म्हणजे सातवी नापास लोक लागतात मी पडलो फडतूस बी.ई. ईलेक्ट्रीकल , हाकलून देतात”
“पण मी म्हणतो , एक गुरुवार सुट्टीचा असतो , तो असा का वाया घालवतोस रे”
“खुजली !”
“कोणाचे काय तर कोणाचे काय!”
“बरे ते जौ दे , हे गुरुवर्य कुठे राहतात म्हणायचे?”
“xxxxx माहीती आहे का”
“म्हैतैय का? अरे ते तर पुण्याचे ग्रामदैवत मानलेले देवस्थान!”
“बस्स त्याच्या जवळच राहतात हे”
“मित्रा कर्कोटका, नुसत्या एव्हढ्या पत्त्यावर सापडायला ते काय पु.ल. देशपांडे आहेत का?”
“हे आर्यपुत्रा , पाच शुभलक्षणी अश्वांचा वेगवान रथ सज्ज करुन , स्वत: सारथ्य करुन , आपल्याला त्या गुरुवर्यांच्या आश्रमात पोहोचवले असते पण … आपल्या कंडू शमनार्थ , म्हणजेच प्राकृतात ‘खुजली’ साठी मी का म्हणून कष्ट सहन करावेत बरे ? घे लिहून पत्ता xxxx, xxxx पेठ , जा शोध आता”
“बघून घेईन साल्या, पण काय रे यांची काय अपॉईंट्मेंट वगैरे असते का?”
“तसले काही लागत नाही, फारशी गर्दी नसते त्यांच्याकडे , तुरळक कोणीतरी येत जात असेल”
“गर्दी नाही म्हणतोस , मग कसला आलाय ‘भारी’ ज्योतिषी? “
“हीच तर मजा आहे, , ज्योतिषी चांगलाच आहे म्हणून त्याच्या कडे गर्दी नाही”
“भो पंचम जॉर्जा , आज हिज हायनेसांना गांजाचा डोस अंमळ जास्तच झाला आहे असे वाटत नाही का ?”
“आम्ही गांजा सेवन करत नाही हे माहीती असताना सुद्धा असा प्रश्न का बरे विचारावासा वाटला?”
“अरे तू म्हणतोस तसा ज्योतिषी चांगला असेल तर त्याच्याकडे तुडुंब गर्दी पाहीजे ना?”
“हाच तर विरोधाभास आहे.. अरे लोकांना उपाय – तोडगे हवे असतात , घेतली की सर्व समस्या दूर करणारी एखादी मॅजिक पिल हवी असते, हा माणूस ती देत नाही ना मग कोण जाणार त्याच्याकडे”
“हो तेही खरेच म्हणा, मग जाऊ म्हणतोस त्यांच्या कडे ?”
“जा केव्हाही , बिनधास्त ! “
“तू भेटला होतास का त्यांना”?”
“नाय बा , आपल्याला नाही हा असला भलता छंद”
“मला आहे , मी जाणार”
“देव तुझे भले करो”
“वत्सा , भद्रफुल्केंध्वजा , असला आशीर्वाद द्यायची काही गरज होती का ?“
“हे भद्रफुल्केंध्वजा म्हणजे काय असते?”
“तुला नै समजणार ”
गुरुवार आला !
‘xxxx, xxxx पेठ , ‘त्या’ देवस्थाना जवळ ‘ एव्हढ्या तुटपुंज्या पत्त्यावर या ज्योतिषीबुवांना शोधायचे धाडस करायचे होते.
धाडस म्हणायला दोन कारणें आहेत …
एकतर त्यावेळी म्हणजे १९८७ साली मी ही पुण्यात नविन होतो, पुण्यात येऊन अवघे सात-आठ महीनेच तर झाले होते, ‘पुणेरी पणाची’ , ‘चांगलीच’ ओळख एव्हाना झालेली असली तरी पुण्याचे गल्लीबोळ अपरिचितच होते.
दुसरे कारण म्हणजे पत्ता हुडकणार्याचे पुणेकर काय ‘हाल’ करतात हे ऐकून माहीती होते !
त्यामुळे किमान तीन वेगवेगळ्या व्यक्तीं कडून एक सारख्या डायरेक्शन्स मिळत नाहीत तो पर्यंत कोणी कितीही सांगीतले तरी पुढे , मागे, उजवीकडे , डावीकडे असे कोठेही वळायचे नाही असा सल्ला एक ‘पुणेरी’ ग्रस्त नागपूरकर मला देऊन राहीला होता!
बरीच यातायात केली, अगदी पायाचे तुकडे पडायची वेळ आली शेवटी पुण्याच्या त्या ग्रामदैवतालाच माझी दया आली असावी , गल्लीच्या एका टोकापासुन ते दुसर्या टोका पर्यंत तीन चकरां मारल्यावर तो वाडा एकदाचा सापडला.
१९८७ साली त्या भागात बरेचसे जुने वाडे शिल्लक होते , हे ज्योतिषीबुवा अशाच एका जुनाट , पडक्या वाड्यात राहात होते….
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
मस्त ! दोघांनमधला संवाद मजेशीर .पण खरोखर तुम्ही पोटाला चिमटा काढून, स्ट्रगल करून ज्ञान / अनुभव मिळवलाय .परिस्थितीच्या मर्यादा असल्या तरी ज्ञानाची भूक असेल तर असाच काहीतरी मार्ग काढला जातो आणि काहीही करून ज्ञान मिळवले जातेच . मी सुद्धा माझ्या इतर खर्चाला फाटा देऊन खूप पुस्तके खरेदी केली होती
श्री स्वप्निलजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
जे लिहले ते खरेच आहे, सत्य घटनेवर आधारीतच आहे. त्यावेळेला अगदी कमीम पगार होता त्यामुळे असले छंद पुरवताना काही वेळा या ना त्या पण सभ्य मार्गाने पैसे उभे करावेच लागत!
सुहास गोखले
हा वेताळ मजा देणार..उत्सुकता वाढली..👍👍
श्री दिपकजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
फारच छान !
स्वप्नीलजीच्या मताशी १००% सहमत.
ज्ञानाची भूक असेल तर काहीही स्ट्रगल करून ज्ञान मिळवले जाते आणि त्याची किंमत सहजपणे मिळालेल्या ज्ञानापेक्षा अधिक असते .
तुम्ही केलेल्या कष्टाला सलाम.
धन्यवाद.
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
तो काळच झपाटलेला मंतरलेला होता, नविन शिकायची जिद्द होती. ज्योतिष्शास्त्रा बरोबरच इलेक्ट्रोनिक्स , सॉफ्ट्वेअर , ग्राफिक्स या साठीही अशीच अपार मेहेनत घेतली . खानावळीचे खाडे , दोन स्टॉप चालत जाऊन बस घरणे आणि दोन स्टॉप अलिकडे उतरुन २ रुपये (त्या काळातले !) वाचवायचे , स्वस्त म्हणून रेल्वे स्टेशन वरच्या कॅन्टीन मधली जनता थाळी ३ रुपयाची खायची अशा अनेक क्लुप्त्या योजुन मी माझे छंद पुरे करत होतो. एक मजा होती त्यात पण …
सुहास गोखले