श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातला हा एक किस्सा आहे , किस्सा खरा का खोटा मला माहीती नाही पण आहे फार मजेदार आहे म्हणून आपल्या समोर सादर करत आहे.

 

ती कारकिर्द जरी सवाई माधवरावांची असली तरी राज्यकारभार खर्‍या अर्थाने नाना फडणवीसच चालवत होते. नानांचा दरारा मोठा, त्यांच्या कडक शिस्तीत राज्यकारभार सुरळीत चालू होता. त्या काळात पेशव्यांची म्हणजेच मराठी राज्याची मुख्य कचेरी शनिवारवाड्यातच होती. त्यामुळे अनेक प्रकाराची कामे घेऊन लोक शनिवारवाड्यात येत असत. फडावरचे कारकून आणि इतर अधिकार्‍यांना या सार्‍यांची कामे करताना क्षणाची उसंत नसे ईतका हा फड लोकांच्या वर्द्ळीने गजबजलेला असे. ही सारी वर्दळ अर्थातच शनिवारवाड्याच्या पुर्वेला असलेल्या  ‘गणेश दरवाज्या’ मार्फत होत असे. वाड्याचा दिल्ली दरवाजा फक्त खाशां स्वारी साठीच वापरला जायचा.

एक दिवस असाच आळसावलेला नेहमी प्रमाणे उजाडला, उजाडतीला दिल्ली दरवाजातून बाहेर पडलेली श्रीमंताची स्वारी पर्वतीला जाऊन देवदर्शन करुन परत सुद्धा आली होती. त्याला थोडा वेळ लोटतो न लोटतो तोच म्हणजे साधारण सकाळचे दहा वाजताच्या सुमारास नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे धुळीचे लोट उठवत सरदार खासगीवाल्यांची पथके एका पाठोपाठ एक अशी येउन गणेश दरवाजा समोर येऊन ऊभी राहीली, सरदार खासगीवाल्यांची ही पथके खास गणेश दरवाज्यावर पहारा करण्यासाठी नेमली होती. ही पथके रोज गणेश दरवाज्यावर पहारा द्यायला सकाळी यायची आणि संध्याकाळी परत आपल्या छावणी वर परतायची.  सखोजी शितोळे , पथकाच्या सुभेदाराने गणेश दरवाज्या जवळ जाउन खुणेचा आवाज टाकताच गणेश दरवाजा उघडला, वाड्यात आतल्या पहार्‍यावर असलेले चार आडमाप, आडदांड गारदी बाहेर आले आणि नेहमी प्रमाणे आपल्या भेदक नजरेने बाहेर काय हालहवाल आहे याची टेहळणी करु लागले, त्यांचा पाठोपाठच ‘कादरबक्ष’ जो या गारद्यांचा नाईक होता तो बाहेर आला. त्याने ही एकदा चौफेर पाहाणी केली , त्याची आणि सखोजी शितोळ्याची थोडी बातचीत झाली. तो पर्यंत पथकातले शिलेदार आपापल्या ठरलेल्या जागेवर पहार्‍यासाठी तैनात झाले होते. कादरबक्षने एकदा या सार्‍या नेमणूकी कडे बारकाईने पाहीले आणि सगळे व्यवस्थित आहे याची खात्री पटताच त्याने गणेश दरवाज्या पाशी असलेला टोल तीन वेळा वाजवला, वाड्यातल्या फडाचे कामकाज सुरु होत असल्याचा तो इशारा होता.

हे सारे होते न होते तोच कसबा गणपतीच्या बाजुने चार-सहा ढालाईतांचे एक पथक ‘होश्शीयार …निखा रख्खो … बाजू हटो..बाजू हटो.. .. ’ अशा आरोळ्या देत गणेश दरवाज्या समोर येऊन थडकले, त्या पाठोपाठ एक पालखी, पालखी बरोबर घोड्यावर एक कारकून दौडत होता. त्यांच्या मागे एक बैलगाडी, त्याच्या मागे आणखी एक चार – पाच ढालाईतांचे पथक असा तो सारा सरंजाम होता.

अचानक असा हा आरडाओरड पाहताच गणेश दरवाजा समोरील गर्दी जरा दचकली, गणेश दरवाज्यावर पहारा देणारी पथके पण आश्चर्याने त्या संरजामा कडे पाहू लागली , त्यांना या बाबत काहीच वर्दी नव्हती त्यामुळे ताबडतोब सपा सपा तलवारी उपसल्या गेल्या, भाले रोखले गेले, चार तगडे हशम गणेश दरवाजा बंद करायला धावले,  आत्ता एव्हढ्यातच काय तो उघडलेला असेल नसेल तो गणेश दरवाजा क्षणात बंद होऊ लागला.

पालखी सोबतचा घोड्यावर स्वार असलेला कारकून पायउतार होऊन मोठ्या तोर्‍यात खासगीवाल्यांच्या पथकाच्या सुभेदाराला बोलता झाला ..

‘अरे काय हे, सरदार साहेबांची स्वारी आली आणि इथे काहीच तयारी नाही?”

“कोण सरदार साहेब, कसली तयारी, आम्हाला काहीच वर्दी नाही”

“कोण म्हणुन काय विचारतोस, तुला माहिती नाही ? खुद्द नानासाहेबांची आज्ञा आहे , हा पहा परवाना, आज पासुन सरदार साहेबांची गणेश दरवाज्यावर नेमणूक आहे”

“ती कशा साठी?”

“कशासाठी म्हणजे? आजपासुन फडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येकाला प्रथम सरदार साहेबांना भेटावे लागेल , सरदार साहेब त्यांची पहीली सुनवाई करतील, अर्जी तपासतील, अर्जी योग्य असेल तर त्यावर खास मोहोर उठवतील, मगच अर्जदाराला आत फडात जाता येईल. कोणीही उठतो, बिना चौकशी सरळ फडात दाखल होतो, काही दगा फटका झाला तर ? हे थांबवण्या साठी ही खास योजना केलीय नानासाहेबांनी कळले?”

सुभेदार गोंधळला, त्याला अशा काहीच सूचना मिळालेल्या नव्हत्या. पण समोरचा तो सारा सरंजाम , त्या कारकुनाची गुर्मी पाहुन त्याला काय करावे ते सुचेना… तो पुन्हा म्हणाला…

“नाही पण आम्हाला याची काहीच वर्दी नाही”

“कशी असेल, दस्तुरखुर्द नानासाहेबांनी कालच तर या खास परवान्यावर मोहोर उमटवली आहे, अजुन सरदार खासगीवाल्यांनां सुद्धा कळले नसेल , तुमच्यापर्यंत ते पोहोचायला वेळ लागेल”

“तरी पण..”

“आता कसला ‘पण’ , दिसत नाही का सरदार साहेब खोळंबलेत ते.. “

हे बोलत असताना त्या कारकुनाने मालवाहतुकीच्या नोकरांना खुण केली, त्यांनी लगबगीने बैलगाडीतले सामान खाली उतरवायला सुरवात केली, जंगी सरंजाम होता,

सुबक शिसवी लाकडाचा , चांदीचे खुर असलेला भला थोरला चौरंग

बसायला पांढरी शुभ्र गादी, त्यावर अंजिरी रंगाची , गोंडेदार रेशमी चादर

मागे टेकायला तसाच एक भरजरी लोड

चकाकणारे  पितळी पान दान , त्याला साजेशी घाटदार , सुबक पिकदाणी

पाण्याची लखनवी थाटाची सुरई आणि एक नाजुक फुलपात्र

सावली साठी छत्र

आणि अशा अनेक बारीक सारीक अनेक वस्तु एका पाठोपाठ उतरवून घेण्यास सुरवात झाली.

 

हा सार जामानिमा गणेश दरवाजा बाहेर मांडण्यात आला. सर्व तयारी पूर्ण होताच , कारकून पालखी पाशी पोहोचला, बाहेरुनच मुजरा करत तो म्हणाला..

“स्वारींनी यावे, सगळी तयारी पूर्ण झाली आहे”

हे ऐकताच, पालखीत आत्तापर्यंत बसुन असलेले सरदार साहेब पालखीतून उतरले.

सफेत रेशमी वस्त्रे, कमरेला मुलायम रेशमी मोरपंखी शेला,  सोन्याचा जर असलेले  बनारसी भरजरी उपरणें , डोक्यास थोरला मंदील त्यावर नाजुक मोत्यांचा तुरा,  गळ्यात मध्यभागी एक घसघशीत पाचू असलेला ट्प्पोर्‍या खंबायती मोत्यांचा कंठा, बोटांत लखलखणार्‍या हिर्‍यांच्या अंगठ्या,  कमरेच्या शेल्यात एक तेज दुधारी जंगी फिरंगी तलवार, पायात अगदी खासे नानासाहेब वापरत असत तसेच खास पुणेरी चढाव. या सगळ्यावर कडी करणारी नजरेतून आग ओकणारी जरब! दमदार पावले टाकत सरदार साहेब पुढे आले, त्या सगळ्या मांडणी कडे समाधानाने पाहत त्यांनी गणेश दरवाजाला एक कडक मुजरा केला आणि मांडलेल्या गादीवर स्थानापन्न झाले .

सखोजी शितोळे अजुनही संशयानेच या सार्‍या प्रकाराकडे पाहात होता, ते ओळखून सरदार साहेबांनी त्याला खूण करुन आपल्याकडे बोलावून घेतले,  सुभेदार जरा कचरतच सरदार साहेबां समोर आला,  मनात संशय असला तरी रीती  नुसार त्याने एक मुजरा घातला..

“सरदार खाजगीवाल्यां कडचे का ? ”

“जी , हुजुर, मी सखोजी शितोळे”

“हं, सखोजी , काय नवीन का दरवाज्यावर..”

“नाही जी, वरिस झाले की आता “

“तरी दरबाराचे रितीरिवाज ठाऊक नाही”

“चुकी झाली हुजूर”

“असु दे, पण या पुढे अशी चूक होता काम नये, कळले?”

“जी, मायबाप”

“आजपासुन फडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येकाला प्रथम आमच्या कडे पाठवायचे, आम्ही सुनवाई करु त्याची खूण म्हणून आमची मोहोर अर्जावर असेल, ती पाहील्या शिवाय कोणालाही गणेश दरवाज्यातून आत फडा कडे सोडायचे नाही, लक्षात ठेव”

“जी”

“हे बघ, नानसाहेबांची सक्त ताकिद आहे ही, ह्यात कोणतीही कसुर मला चालणार नाही, आमच्या सुनवाई खेरीज एक जरी व्यक्ती आत गेली तर तुझी खैर नाही”

“नाही, असे होणार नाही , मी माझ्या लोकांना बजावतो तसे”

“ठीक आहे, लागा कामाला, आणि हो, आमच्या माणसांची काही व्यवस्था करा”

“करतो सरकार”

सखोजी शितोळे तरातरा दरवाज्यावर गेला, आपल्या पथकातल्या सगळ्यांना बोलावून घेऊन त्याने ही नवी योजना सगळ्यांना समजाऊन सांगीतली.

“कोण सरदार साहेब म्हणायचे हे?”

“ते काय ठावे नाही, नानासाहेबांच्या खास गोटातली मोठी खानदानी असामी दिसते, बोलण्याचा ढंगावरुन मिरजकर पटवर्धनां पैकी वाटतात.. आपल्याला नावाचे काय देणे घेणे . सरदार साहेबांनी सांगीतले तसे करा.. कडक काम आहे, चूक केल्यास गर्दन मारतील, कळले?”

 

सगळ्यांनी माना डोलावल्या आणि जागेवरुनच सरदार साहेबांना मुजरे झडले.

……

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
 1. avinash

  Why everytime I have to give my emailid?
  Your website does not accept at first trial
  Thirdly if I type in marathi the website never responds
  My efforts for at least 5 occaisions have failed
  Sorry to bother u for such trifing things but I read ur every post & wish to react but cannot succeed

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अविनाशजी,

   आम्ही वाचकांच्या ईमेल साठवून ठेवत नाही. तसेच या वेबसाईट्ला लॉग ईन सारखी सुविधा पण नाही त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला ईमेल इ द्यावे लागते . मराठीत टाईप करताना रिसपॉन्स मिळत नाही अशी समस्या आम्ही पहील्या6डाच ऐकत आहोत , आमच्या मते हा प्रकार आमच्या बेवसाईट पेक्षा आपण वापरत असलेल्या वेबब्राऊसर आणी काही प्रमाणात आपण वापरत असलेल्या डीव्हाईस )फोन, डेस्कटॉप) यावर अवलंबून आहे , बेवसाईट मध्ये समस्या नसावी पण तरीही आपण वरील तपशील आणि शक्य झाल्यास एखादा स्क्रीन शॉट पाठवल्यास आम्हाला त्याबद्दल तपास करता येईल.

   आपल्याला काही मतप्रदर्शन करायचे असेल / संपर्क साधायचा असेल त्यासाठी suhasg,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,AT……………….suhasjyotish………DOT……..com या पत्त्यावर संपर्क साधता येईल.

   अभिप्राया बद्दल धन्यवाद

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.