चला , आजचा दिवस पार सुरळीत पार पडला असा सुटकेचा नि:श्वास टाकत खासगीवाल्यांची पथके आवराआवर करु लागली, इकडे सरदार साहेब ही बैठकीवरुन उठले , त्यांच्या नोकरांनी तातडीने बैठकीचे सारे सामान बैलगाडीत चढवायला सुरवात केली.
धुळीचे लोट उठवत खासगीवाल्यांची पथके एका पाठोपाठ एक त्यांच्या खडका वरच्या छावणी कडे रवाना झाली. तोच इकडे “निगा रख्खो, होशिय्यार, होशीय्यार, बाजु हटो’ अशा आरोळ्या हवेत घुमल्या आणि सरदार साहेबांची पालखी कसबा गणपतीच्या दिशेने निघाली.
आणि दिवस मावळला..
तो काळच मोठ्या धामधुमीचा होता , कर्नाटक मोहीमेची मसलत सुरु होती, इंदुर हून होळकरांची जंगी फौज पुण्यात दाखल झाली होती, नागपुरकर भोसल्यांच्या फौजा पण एक एक करत हडपसरला डेरेदाखल होत होत्या.वानवडीला महादजी शिंदेंच्या सरकारी फौजेच्या कवायती जोरात चालू होत्या. एरव्ही हुजुरपागे वर ठाण देऊन असलेली मोरो दिक्षीतांच्या हाताखालची पेशव्यांची खाशी हुजुरातीची फौज , शुक्रवारातल्या काळ्या वावरावर हलवली गेली होती. भांबुर्ड्यावरच्या सरदार पानसेंच्या तोफ गाड्यांची घरघर दिवसभर चालत असायची. बुंदेलखंडाच्या रामशरण गोसाव्याची उग्र, चित्रविचित्र पोषाख असलेली फौज तर सार्या पुण्यासाठी उत्सुकतेचा विषय बनली होती, द्स्तुरखुर्द श्रीमंत आणि नानासाहेब त्या मसलतीत पुरते गुंतले होते, नानासाहेबांना फडाच्या कामाला फुरसत मिळत नव्हती, कशीबशी एखादी चक्कर फडावर मारायचे, बाकी फडाचे सगळे काम नानांच्या खास विश्वासातला नारो अंताजी सांभाळत होता.
थोड्याच दिवसात सरदार विंचुरकरांच्या नेतृत्वा खालील पेशव्यांच्या फौजा कर्नाटक मोहीमे साठी पुण्यातून बाहेर पडल्या.
इकडे ह्या सर्व धामधुमीत सरदार साहेबांनी आपले बस्तान मात्र चांग़लेच बसवले होते, त्यांचे नाव गाव कोणालाच माहीती नव्हते पण सगळे जण त्यांना ‘पितळी शिक्क्याचे सरदार’ असेच संबोधत असत.
असाच एक दिवस उजाडला. सकाळी सकाळीच श्रीमंतानी बोलावले म्हणून नानासाहेब वाड्यावर दाखल झाले , श्रीमंताशी गणेश महालात थोडावेळ मसलत झाली, ती होताच नानासाहेब नारायणराव साहेबांच्या महालावरुन वरच्या मजल्यावरच्या डाकेच्या महालात गेले, तिथे आलेल्या डाकेतले महत्वाचे खलिते डोळ्याखालून घालत कारकूनांना काही जवाबी खलित्याचा मजकूर सांगीतला. हे सारे होते न होते तोच नारो अंताजी सामोरा आला.
“नारो, बरे झाले तुम्ही इथेच भेटलात”
“आज्ञा असावी”
“काल पासुन पाहतोय, फडावर इतकी सामसुम कशी , कालच्या दिवसात एक ही अर्जी माझ्यापर्यंत आली नाही, त्या चिंचवड देवस्थानाच्या निवाड्या साठी लोक येणार होते ते आले नाहीत, बिदरच्या माणकेश्वरांची सुनवाई काल होती ते ही फिरकले नाहीत, आज फलटणच्या भागोजी पाटलांची सुनवाई होती तेही आलेले दिसत नाहीत, काय झाले सगळ्यांना. ना कोणाची अर्जी ना कोणती तक्रार. दौलतीची स्थिती एकदम सुधारली म्हणायची का?”
“सरकार. काल आज कोणीच अर्ज घेऊन आले नाही”
“कोणाच्या तक्रारी नसतील, तंटे नसतील तर चांगलेच आहे , श्री. गजाननाची कृपाच म्हणायची. आता आज मोकळा वेळ आहे तर जरा ते निजामाच्या चौथाईच्या वसुलीचे कागदपत्र तपासून फडशा पाडून टाकू , सातारा दरबाराला पाठवायचे आहेत, केव्हाचा तगादा लागून राहीलाय, कोण बघतो हे काम?”
“शंकरजी दत्तो”
“ठीक आहे, वर्दी द्या त्याला, पण थांबा, आम्हीच फडावर जातीने येतो, बाकीचीही काही किरकोळ कामे आहेत ती ही समक्षच उरकता येतील”
“जी”
नानासाहेब लगबगीने उठले, दादासाहेबांच्या महालाला डावी घालत ते गणेश दरवाज्याच्या बाजुला असलेल्या लाकडी जिन्याने खाली उतरुन फडावर आले.
फडावर नाही म्हणले तरी वीस एक कारकून कायम असायचे , आज फक्त दहा – बाराच रुजु होते , नानांना आश्चर्य वाटले, पुढचा धक्का तर त्याहुनही मोठा होता, एका कोपर्यात कोंडाळे करुन गंजिफाचा डाव रंगात आला होता!
नानासाहेब असे अचानक फडावर आले हे पाहताच सगळ्यांची पार भंबेरी उडाली, सारे एक जात थरथर कापू लागले…
“फडावर कामे करायचे सोडून गंजिफाचा डाव रंगलाय ? “ नानासाहेबांनी रुद्रावतार धारण केला ..
“नाही .. तसे काही नाही” फडावरचा मुख्य कारकुन कसेबसे उत्तर देत म्हणाला.
“नाही , मग हे काय चालू आहे.”
“नाही काल आज फडावर कोणी कामच घेऊन आले नाही, शिलकेतल्या कामाचा कालच फडशा पाडला , तेव्हा जरा अंमळ मनोविनोदार्थ…”
कारकुनाचे बोलणे तोडत नानासाहेब कडाडले….
“काल कोणीही फडावर आले नाही म्हणता , आज ही कोणी नाही. असे कसे होईल … काहीतरी गडबड आहे ..मला का नाही सांगीतले”
“सांगणारच होतो पण..”
“कधी ? गंजिफाचा डाव संपल्या वर का?”
“नारो, या सगळ्याची नोंद घ्या , उद्या श्रीमंता समोरच काय तो फैसला करु”
“जी”
“आणि काल आणि आज फडावर कोणीच फिरकले नाही हे तुम्ही मला आज आत्ता सांगताय , बहिरोजी कोठे आहेत?”
हा बहिरोजी वाड्याच्या आतल्या सुरक्षेचा सुभेदार होता , बहिरोजी इतका वेळ लांबून हे सारे ऐकत होता ,पहात होता , नानासाहेबांची हाक ऐकताच तो लटपटत त्यांना सामोरा आला. मुजरा करुन चळचळा कापत उभा राहीला.
“बहिरोजी काय झाले , गणेश दरवाजा का बंद ठेवला?”
“नाही , सरकार, दरवाजा उघडाच आहे , कालही होता, आजही आहे , पहील्या टोला ला उघडतो आणि उन्हे उतरल्यावर दुसर्या टोलाला बंद पण करतो”
“अस्सं, मग़ कोणीच कसे आले नाही?
“बाहेर चौकशी करुन सांगतो”
“थांब, बाहेर कोणाची पथके लावली आहेत ?”
“सरदार खाजगीवाल्यां कडची आहेत, नेहमीची”
“त्यांच्या सुभेदाराला बोलवा”
सरदार खाजगी वाल्यांचा सुभेदार सखोजी शितोळे वर्दी मिळताच धावत आत आला. साक्षात नानसाहेब समोर आहेत हे पाहताच त्याची तर बोबडीच वळली..
“मुजरा सरकार”
“तुम्ही रोज दरवाज्या वर असता?”
“जी”
“म्हणजे काल पण होता””
“जी”
“मग रोज इथे इतका राबता असताना काल आज कोणीच कसे आले नाही?”
“नाही तशी बाहेर बरीच गर्दी आहे”
“मग, ते आत का येत नाहीत , त्यांना अडवले आहे का कोणी ?”
“नाही सरकार, आम्ही कोण अडवणार ? पण सुनवाई झाल्या शिवाय त्यांना आत कसे सोडायचे ?”
“सुनवाई ? कसली सुनवाई, कोण करते? ते ही दरवाज्या बाहेर ?”
“ते पितळी शिक्क्याचे सरदार आहेत ना, ते सुनवाई करतात, त्यांची अर्जावर मोहोर असेल तरच लोकांना आत सोडतो”
“पितळी शिक्क्याचे सरदार?”
“हां, गेले महीनाभर ते रोज दरवाज्यावर असतात सुनवाईला, पण काल आज सरदार साहेब आलेच नाहीत, सुनवाई नाही, सिका नाही म्हणून कोणाला आत सोडले नाही”
“अरे पण हे सगळे कोणी सांगीतले तुम्हाला, आम्ही अशी काही कोणाची नेमणूक केली नाही”
“माफी सरकार, पण ते सरदार साहेब तुमच्या सही सिक्क्याने नेमणुक झाली असे म्हणाले “
“अस्सं, कोण हे सरदार , काय नाव गाव?”
“ते आम्हाला कोणाला ठावे नाही जी”
“कमाल आहे, आम्ही कोणाला नेमले नाही, मग हा काय प्रकार आहे? कोण आहे ही असामी”
नानासाहेबां सारख्या बुद्धीचे सागर म्हणवणार्या व्यक्तीला हा प्रकार काय आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही.
एका धुर्त ठकसेनाने सगळ्यांना उल्लू बनवले होते! मुळात अशी कोणतीही नेमणूक नानसाहेबांनी केली नव्हती आणि जरी केली असती तरी अर्जावर मोहोर उठवायला पैसे घ्यायची परवानगी दिली नसती. पण ह्या ठकसेनाने ते बेमालूम साधले, आतल्या फडावरच्या माणसांना देखील हे कळले नाही. अर्जाच्या तळाशी कसला शिक्का आहे , तो कोणी मारला आहे , कशा साठी मारला आहे हे ना कोणी बघितले ना कोणती शंका कोणाच्या मनात आली. बिनबोभाट काम चालू होते. पुढे ही चालू राहीले असते पण तो ‘पितळी शिक्का’ वाला भामटा आजारी पडला आणि तिथेच घोट्टाळा झाला .
फडावर कोणीच कसे फिरकले नाही ही शंका ना कारकुनांना आली ना नारो अंताजीला. गर्दी नाही चला बरे झाले म्हणत चक्क गंजीफाचा डाव टाकण्या पर्यंत मजल गेली. मात्र नानासाहेबांच्या ते लगेच लक्षात आले , ‘नानासाहेब’ हे ‘नानासाहेब’ होते ते उगाच नाही!
फडावर सगळ्यांना तंबी देऊन, नानासाहेबांनी पुण्याचा कोतवाल तुळोजी नगरकराला बोलावणे पाठवले.
‘तुळोजी, तो कोण ‘पितळी शिक्का’ वाला भामटा आहे त्याला मुसक्या बांधून माझ्या समोर हजर करा “
“जी हुजुर, आत्ता लगेच माणसे पाठवतो आणि जेरबंद करतो त्या असामीला”
तासा दोन तासातच तुळोजी कोतवाला ने त्या पितळी शिक्क्याच्या सरदाराला जेरबंद करुन नानासाहेबांच्या समोर आणला!
यथावकाश चौकशी पूर्ण झाली आणि या ‘पितळी शिक्क्याच्या’ सरदाराची वरात रायगडावरच्या अंधार कोठडी कडे निघाली.
गणेश दरवाज्याने सुटकेचा निश्वास टाकला.
साक्षात नानासाहेबांच्या हातावर तुरी ठेवणार्या या ठकसेनाची ही कथा नंतर अनेक वर्षे चघळली गेली…
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
waah (Y) mast
श्री कौशलजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
कुतुहल वाढले
श्री अविनाशजी
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Awaiting the next article…
श्री प्रशांतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद, ह्या लेखमाले ला अत्यल्प वाचकवर्ग मिळाला फार कमी वाचकांनी ही लेखमाला वाचायची तसदी घेतली . लिहण्याचा सारा उत्साह निघुन जातो .
असो वेळ मिळेल तसे काही लिहेन.
सुहास गोखले
Shri. Suhasji,
Nice story, don’t know if it is fiction or non-fiction. It does shows origin of current “chaparasi babu” working style in government offices.
Your story writing skills are amazing.
Thanks,
Anant
श्री अनंतजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. उत्तर पेशवाईत जी अनागोंदी माजली होती त्यात अनेकांनी हात धुऊन घेतले होते , हा त्यातलाच प्रकार असावा.
सुहास गोखले