“कोण सरदार साहेब म्हणायचे हे?”

“ते काय ठावे नाही, नानासाहेबांच्या खास गोटातली मोठी खानदानी असामी दिसते, बोलण्याचा ढंगावरुन मिरजकर पटवर्धनां पैकी वाटतात.. आपल्याला नावाचे काय देणे घेणे . सरदार साहेबांनी सांगीतले तसे करा.. कडक काम आहे, चूक केल्यास गर्दन मारतील, कळले?”

सगळ्यांनी माना डोलावल्या आणि जागेवरुनच सरदार साहेबांना मुजरे झडले.

 

तो दिवस असाच गोंधळाचा गेला, हे नविन सरदार साहेब नेमके कोण आहेत , त्यांचे काय काम कोणालाच स्पष्ट कल्पना नव्हती.

गणेश दरवाज्याला आलेल्या पहील्याच व्यक्तीला ‘चिंतो अप्पाजी’ ला अडवले गेले.

आता हा ‘चिंतो आप्पाजी’ म्हणजे चांगलेच बडे प्रस्थ होते. पुण्यातल्या सगळ्या व्यापार उदीमावर जी ‘बाजार – पट्टी’ बसवली होती त्याचा ठेका या गृहस्थाकडे होता. मोठा मालदार माणूस. बुटका , लठ्ठ , बोंगळ, अजागळ, भरभरुन वाहणारे सुटलेले पोट, चेहेर्‍यावर श्रीमंतीचे तुपट , ओंगळ ओघळ चहुबाजुंनी वाहात होते आणि या सगळ्यांच्या जोडीला चेहेर्‍यावरची कमालीची मग्रुरी, असणारच कारण खुद्द श्रीमंत पेशव्यांना कर्ज देऊन राहीली होती अशी ही गब्बर असामी!

आज ‘बाजार पट्टी’ च्या हिशेबाचा दिवस, चिंतो आप्पाजी साठी मोठी परीक्षेची वेळ कारण नानासाहेब स्वत: जातीने हा हिशेब तपासत असत, आता साक्षात नानांच्या समोर उभे राहायचे असल्याने चिंतो आप्पाजी ची नेहमीची मुजोरी सुद्धा काहीशी दबल्या सारखी होती.

खुद्द श्रीमंत पेशव्यांकडे नसेल अशा तगड्या , उमद्या, बेफाम, बुलंद अरबी घोड्यावरुन दौडत आलेल्या चिंतो आप्पाजी ला गणेश दरवाज्या वर आत्तापर्यंत कधीच अडवले गेले नव्हते, पहारेकर्‍यांचे मुजरे घेत, घोड्यावरुन थेट आत जाण्याची परवानगी असलेल्या काही मोजक्या असामी होत्या त्यातला हा चिंतो आप्पाजी , पण आज त्याला गणेश दरवाज्यापासुन पंचवीस हातांवरच चार हशमांनी घेरुन अडवले.

चिंतो आप्पाजी ला कळेना , हे शिपुर्डे आपल्याला अडवतात?  रागाने फणफणत त्याने त्या हशमांना हटकले..

“मला अडवता ? मी कोण ते माहीती नाही का?”

“माफी हुजुर पण दरबाराची आज्ञा आहे?”

“कसली आज्ञा? फडावर काम आहे माझे, उशीर झाला तर नानसाहेब रागावतील आणि आज हे काय नवीन चालवलेय?”

“सरकार , माफी असावी पण आपल्याला असे परस्पर आत जाता येणार नाही, त्या तिकडे ते सरदार साहेब बसलेत ना, पहिल्यांदा त्यांना भेटा मगच आत सोडतो”

“कोण सरदार साहेब? मी ओळखत नाही कोणाला , आणि कोणी सांगीतले हे ? असे पूर्वी कधी नव्हते”

“आजपासूनच सुरु झालीय ही पद्धत”

“कोणी सांगीतले?”

“माफी हुजुर , आम्हाला जास्त काही माहीती नाही, सरदार साहेबांनी परवानगी दिली तरच आलेल्याला आत सोडायचे अशी नानासाहेबांचीच आज्ञा आहे”

 

“अरे हाट.. मला कसले अडवता, आजपर्यंत कोणाची मजल झाली नाही ना कोणाची होणार आहे, चला व्हा बाजुला..”

 

चिंतो आप्पाजीचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत दोन हशमांनी भाले त्याच्या छातीला लावले , एका हशमाने घोड्याचा लगाम ताब्यात घेतला …

 

“माफी हुजुर पण आपल्याला आज्ञा पाळावीच लागेल , दरबाराच्या हुकुमापुढे आम्ही काही करु शकत नाही, आमचा नाईलाज आहे..”

 

चिंतो चपापला, काहीतरी गडबड आहे, उगाच वाद वाढवायला नको, आज चालवून नेऊ, नंतर नानासाहेबांशी बोलायला हवे. असा विचार करुन चिंतो ने सावध माघार घेतली …

“ठीक आहे , भेटतो त्यांना .. काय एक एक नविन खुळ काढतात , थोरल्या माधवराव साहेबांच्या वेळेला असले काही नव्हते..”

चरफडत चिंतो अप्पाजी सरदार साहेबांच्या समोर उभे राहीला आणि आपल्या नेहमीच्या गुर्मीत बोलता झाला.. .

“कोण हो आपण?”

“आदब!”

सरदार साहेबांचा कारकून कडाडला..

“आदब सांभाळा, खासे सरदार साहेब आहेत, दरबारी आदब सांभाळा..”

चिंतो अप्पाजी दचकला, हे काही वेगळेच प्रकरण आहे हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही, क्षणात स्वत:ला सावरत त्याने सरदार साहेबांना मुजरा केला.
चिंतो कडे भेदक नजरेने पहात सरदार साहेबांनी विचारले..

“बोला, कोण आपण?”

“मी चिंतो अप्पाजी”

“अस्सं , काय काम आहे फडावर”

“बाजार पट्टीचा ठेका असतो माझ्याकडे, आपल्याला माहीती नाही? ”

“आदब”

पुन्हा एकदा सरदार साहेबांचा कारकून कडाडला..

त्या कारकुनाला हात करुन थांबायला सरदार साहेब म्हणाले..

“बर मग?”

“आज बाजार –पट्टीच्या हिशेबाचा दिवस, म्हणून फडावर हजेरी लावायला आलो आहे, नानासाहेब स्वत: जातीने हिशेब तपासतात”

“अस्सं,  बाजार- पट्टीचे कागद आणलेत?”

“हो तर , हे काय”  चिंतो अप्पाजी ने पडशीतले कागदाचे गठ्ठे दाखवले.

“अर्ज ?”

“हा पहा..”

चिंतो ने दिलेला अर्ज नीट न्याहाळून पहात सरदार साहेब म्हणाले

“ठीक आहे , आणखी काही काम आहे ?”

“नाही , आज फक्त बाजारपट्टीचा हिशेब असतो”

चिंतो आप्पाजी कडे काहीसे संशयाने पहात सरदार साहेब म्हणाले

“नक्की?”

“जी सरकार..”

त्या सरदार साहेबांच्या नजरेत अशी काय जरब होती की चिंतो आप्पाजी सारखा मग्रुर सुद्धा एव्हाना लटपटायला लागला होता.

सरदार साहेबांनी तो अर्ज समोरच्या चौरंगावर ठेवला. शेजारी शाईने भरलेली ताटली होती, सरदार साहेबांनी शेजारचा एक सुबक पितळेचा शिक्का उचलला , अदबीने कपाळाला लावला. नजाकतीने तो शिक्का समोरच्या शाईच्या ताटलीत बुडवला , हळूवार पणे तो शिक्का अर्जाच्या तळाशी उमट्वला..

सरदार साहेबांचा कारकुन लगेच पुढे झाला , दुसर्‍या ताटलीतली अती बारीक, मुलायम गुहागर ची रेती त्याने त्या ठश्यावर टाकली , शाई वाळली.

चिंतो आप्पाजी हे सगळे विस्मयाने पहात होता.

सरदार साहेबांनी कारकुनाला खुण केली, कारकुनाने चिंतोला जरा बाजुला घेतले. दोघांत कसलीसी कुजबुज झाली. चिंतो च्या चेहेर्‍यावर प्रथम आश्चर्य, नंतर वैताग आणि शेवटी उद्वेग असे भाव बदलत गेले.

“ही नवी पद्धत आहे , खुद्द नानासाहेबांनी सुरु केली आहे”

“पण असे पूर्वी कधी नव्हते”

“आजपासुन सुरु झालेय , कळले, आता वख्त बरबाद करु नका , मी सांगीतले तसे करा”

चिंतोने काहीशी कुरकुर करत कमरेचा कसा उघडला चार चांदीची नाणी हातात घेतली, सरदार साहेबांना मुजरा करत ती नाणी समोरच्या चांदीच्या तबकात सोडली.

“ठीक आहे, जा आता आत, पण घोड्यावर सवार होऊन नाही, घोडा बाहेरच ठेवायचा, चालत आत जायचे”

“मी आणि चालत? मला सरळ घोड्यावरुन आत जाण्याची परवानगी आहे..”

चितों हे बोलत असतानाच सरदार साहेबांनी शेजारी उभ्या असलेल्या ढालाईताला खूण केली, ढालाईताचा मजबूत पंजा चिंतो च्या खाद्यावर पडताच, चिंतो समजला ..आज काही खैर नाही.
चिंतो वळून वळून पहात काहीशा नाखुषीनेच गणेश दरवाज्याकडे गेला. दारावरच्या ढालाईताने पुन्हा अडवले , चिंतो आप्पाजींचा अर्ज बघायला मागीतला,  त्यावर सरदार साहेबांचा शिक्का आहे का तपासले गेले.

“जा आत”

रागाने तणतणत चिंतो आत फडावर गेला खरा पण त्याला लगेचच बाहेर माघारी पाठवण्यात आले कारण नानासाहेब प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज फडावर येणार नव्हते अशी वर्दी होती. चिंतो आप्पाजीचे काम झाले नाही पण गणेश दरवाज्यावर दाटी करुन असलेल्यांची कामे फडावरचे कारकूनच बघणार होते. त्यांची वर्दळ दिवसभर चालू राहीली.

अर्ज घेऊन आलेला प्रत्येक जण सरदार साहेबांकडे जाऊन अर्जावर शिक्का घेऊनच आत जाऊ लागला. सरदार साहेबांच्या समोरील चांदीचे तबक नाण्यांनी गच्च भरुन गेले होते.

आता उन्हे मावळतीला कलली , कादरबक्ष गारदी गणेश दरवाज्यातुन बाहेर आला. त्याने गणेश दरवाज्याचा टोल दोन वेळा वाजवला. फडाचे काम संपल्याचा तो इशारा होता. अजुनही आत असलेल्या एक – दोन अर्जदारांना बाहेर काढण्यात आले, बाहेरची एकही व्यक्ती आत वाड्यात नाही याची पुन्हा पुन्हा खात्री करु घेतली गेली आणि क्षणात गणेश दरवाजा बंद झाला.

चला , आजचा दिवस पार सुरळीत पार पडला असा सुटकेचा नि:श्वास टाकत खासगीवाल्यांची पथके आवराआवर करु लागली, इकडे सरदार साहेब ही बैठकीवरुन उठले , त्यांच्या नोकरांनी तातडीने बैठकीचे सारे सामान बैलगाडीत चढवायला सुरवात केली.

धुळीचे लोट उठवत खासगीवाल्यांची पथके एका पाठोपाठ एक त्यांच्या खडका वरच्या छावणी कडे रवाना झाली. तोच इकडे  “निगा रख्खो, होशिय्यार,  होशीय्यार, बाजु हटो’ अशा आरोळ्या हवेत घुमल्या आणि सरदार साहेबांची पालखी कसबा गणपतीच्या दिशेने निघाली.

 

आणि दिवस मावळला..

 

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.