मी सहसा माझी , माझ्या कुटुंबियांची पत्रिका बघत नाही तसेच होरारीचा बर्‍यापैकी अभ्यास असला तरी स्वत:च्या प्रश्ना साठी होरारी वापरत नाही. याचा अर्थ असा नाही की माझा माझ्याच ज्ञानावर, कौशल्यांवर विश्वास नाही. मी हे करत नाही याचे कारण म्हणजे दुसर्‍याच्या पत्रिकेवर मी जितका वस्तुनिष्ठ (Objective) आणि तटस्थपणे विचार करु शकतो तितका वस्तुनिष्ठ आणि तटस्थ मी माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांची पत्रिकां बघताना राहू शकत नाही, हे नैसर्गीकच आहे. याच कारणां साठी एखादा सर्जन  सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तींवर स्वत: शस्त्रक्रिया करत  नाही किंवा एकादा न्यायाधीश ज्या खटल्यात त्याचे जवळचे लोक (आप्तस्वकीय, मित्र इ) वादी-प्रतिवादी, साक्षीदार आहेत , अशा खटल्याचा न्यायनिवाडा करत नाही.


पण काल  मात्र अशी वेळ आली की मला माझ्याच प्रश्ना साठी प्रश्नकुंडली मांडायला लागली. त्याचे असे झाले:

दिनांक १२ ऑक्टोबर २०१५  म्हणजे गेल्याच आठवड्यात मी एक पार्सल माझ्या ग्राहकाला पुणे येथे पाठवले होते. पार्सल बिटको पॉईंट – नाशीक रोड इथल्या फ्रेंचाइझी कडे दुपारीच जमा केले होते. अशी पार्सले पाठवणे हा माझ्या व्यवसायाचाच (तसे माझे अनेक व्यवसाय आहेत!) भाग असल्याने आणि माझे पुण्यात बरेच ग्राहक असल्याने पुण्याचे पार्सल  १ – २ दिवसात पोहोचते हा माझा नित्याचाच अनुभव. त्याप्रमाणे मी माझ्या ग्राहकाला इमेल व्दारे पार्सल पाठवल्याचे कळवले , ट्रॅकिंग नंबर कळवला, पार्सल १३ किंवा  १४ ऑक्टोबर २०१५ रोजी मिळेल असेही सांगीतले.

पण तसे व्हायचे नव्हते, कुरियर कंपनीच्या वेबसाईट वर पार्सल  १३ तारखेला पुण्यात पोहोचल्याची नोंद झाली, दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ तारखेला पार्सल डिलीव्हरी साठी बाहेर पडले ( Out for Delivery) पण त्या दिवशी डिलीव्हरी झाली नाही. १५  तारखेला ही डिलीव्हरी झाली नाही , १६ तारीख पण भाकड गेली. दरम्यान माझ्या ग्राहकाचे ‘पार्सल अजून मिळाले नाही’ असे फोन यायला सुरवात झाली होतीच. कुरियर कंपनीचा एकच ठेका होता’ पार्सल पुण्याच्या वेअर हाउस मध्ये आहे.. उद्या डिलीव्हरी  होणार’ ! १७ तारखेला ही डिलीव्हरी झाली नाही.  १८ तारखेला रवीवार म्हणजे डिलिव्हरी  नाही. १९ तारखेला ग्राहकाने बरीच ताणाताणी केली, उशीर  झाला हे कारण देऊन त्याने ते पार्सल स्विकारण्यास नकार देऊन रिफंड ची मागणी केली , त्याचे ही साहजीकच आहे म्हणा, नाशीक – पुणे पार्सलला इतका वेळ लागायला नको पाहीजे होता. मी ग्राहकाला फक्त १ दिवस वाट पाहायला सांगीतले , जर २० तारखेला संध्याकाळ पर्यंत त्याला पार्सल मिळाले नाही तर त्याच दिवशी त्याचे पैसे परत करेन असे प्रॉमीस केले. कुरियर कंपनीला फोन करुन ही काही उपयोग नव्हता त्यांच्या सबबीं संपतच नव्हत्या. परिस्थितीवर माझे काहीच नियंत्रण नव्हते,  रिफंड द्यावा लागला असता तर माझे बरेच नुकसान होणार होते.  कुरियर कंपनीला एक शेवट्चा फोन केला ,

काहीसा हताश झालो , मनात आले ,  हीच ती वेळ , हाच तो क्षण.. प्रश्नकुंडलीचा  …!

माझा प्रश्न होता  “पार्सल वेळेत डिलीव्हर होईल का? मला रिफंड द्यावा लागेल का ?

Jenson_Parcel Chart

चार्ट्चा तपशील:

दिनांक: १९  ऑक्टोबर २०१५ , वेळ:  १३:४१:०७
स्थळ: देवळाली कँप (नाशीक) 73e50’00, 19n57’00
Geocentric, Tropical, Placidus, True Node

चला , बघुया ,  पार्सल पोहोचते का मला पैसे परत करायला लागतील!

प्रश्नकर्ता  (या केसा मध्ये मी स्वत:) , नेहमीच Ascendant लग्न भाव  असतो. ह्या चार्ट मध्ये  ‘कुंभ लग्न’ आहे म्हणजे ‘शनी’  माझे प्रतिनिधीत्व करणार. नेपच्युन हा लग्न भावातच असल्याने तोही एक प्रतिनिधी असेल, त्याशिवाय चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने तो ही माझे प्रतिनिधीत्व करेल.

प्रश्न  ‘गतव्य स्थानी न पोहोचलेल्या पार्सल बद्दल आहे’  , लक्षात घ्या पार्सल मिळायला उशीर झाला आहे, पण पार्सल हरवले नाही आहे किंवा चोरी झालेले नाही.

पार्सल जरी मी पाठवले असले तरी ते आता माझ्या ग्राहकाची वस्तू आहे,  पार्सल वर माझ्या ग्राहकाचे नाव आहे, ग्राहकाने त्याचे पैसे आधीच मोजले आहेत, जरी ती वस्तू त्याच्या हातात पडलेली नसली तरी तो तांत्रिक दृष्ट्या त्या वस्तूचा मालक आहेच,  ज्याक्षणी मी ते पार्सल कुरियर कंपनीच्या हवाली केले त्याचा क्षणी माझा त्या वस्तू वरचा मालकी हक्क संपुष्टात आला आणि ग्राहकाचा सुरु झाला. आता त्या पार्सल बाबतीत माझी भूमिका काळजीवाहू – Care Taker अशीच आहे.

आपल्या मालकीच्या सर्व जंगम वस्तू (Movable) द्वीतीय स्थाना (२) वरुन पाहतात. या केस मध्ये हे द्वितीय स्थान माझे ना घेता माझ्या ग्राहकाच घ्यावे लागेल. माझा ग्राहक म्हणजेच ज्याच्याशी मी व्यवहार करतो ती व्यक्ती नेहमीच सप्तम स्थानावरुन (७) बघितली जाते. सप्तम स्थानी सिंह रास असल्याने ‘रवी’ ग्राहकाचे प्रतिनिधीत्व करेल. ग्राहकाचे दुसरे स्थान म्हणजे सप्तमाचे द्वीतीय स्थान म्हणजेच अष्टम स्थान (८). म्हणजे पार्सलचा प्रतिनिधी अष्टमेश होणार. अष्टम स्थानावर कन्या रास असल्याने ‘बुध’ या पार्सल चे प्रतिनिधीत्व करेल. ‘बुध’ हा नेहमीच पत्रव्यवहार, संदेश यांचा कारक असल्याने , पार्सल चा प्रतिनिधी नेमका बुधच यावा ही चार्ट रॅडिकल असल्याची पावतीच आहे.

इथे आपल्याला ‘पार्सल वेळेत पोहोचणे आणि रिफंड द्यायला लागू नये’ अशा दुहेरी अंगाने विचार करावयाचा आहे, कारण पार्सल जर उशीरा पोहोचले तर माझा ग्राहक ते स्विकारणार नव्हता आणि कबूल केल्या प्रमाणे मला त्याला रिफंड द्यावा लागणार होता. म्हणजे ‘रिफंड’ हा ही घटक आपल्याला बघायचा आहे, रिफंड ही एक प्रकारची नुकसान भरपाईच समजायची, रिफंड द्यावा लागला तर माझे आर्थिक नुकसान होणार होते , या दोन्ही बाबींचा विचार करता अष्टम स्थान (८) बघितले पाहीजे. अष्टम स्थानावर कन्या रास असल्याने ‘बुधाने ‘ या रिफंड चे प्रतिनिधीत्व केले पाहीजे पण या बुधाला तर आपण आधीच ‘पार्सल’ चे प्रतिनिधीत्व देऊ केले आहे त्यामुळे आपल्याला अष्टमातल्या इतर ग्रहांचा विचार केला पाहीजे. अष्टमात ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ आहेत. पैसा असल्याने आपण ‘गुरु’ ला हा मान देऊ.

आता जरा या चार्ट मधल्या प्रथम भावा कडे पहा, नेपच्युन  लग्न भावातच आहे, पार्सल संबधी झालेला घोळ  आणि माझी निराश , अगतिक मानसिक अवस्था नेपच्युन लग्नातच असल्याने अधोरेखित झाली आहे. चार्ट रॅडिकल असल्याची ही आणखी एक पावती!

सगळ्यात पहिला निकाल  लावूया ‘रिफंड’ द्यावा लागेल का याचा. त्या साठी रिफंड चा प्रतिनिधी (गुरु किंवा मंगळ) आणि मी (शनी) यांच्यात कोणता ना कोणता तरी योग व्हावयास हवा. शनी धनेत २:४४ अंशावर आहे तर गुरु व मंगळ दोघेही  कन्येत अनुक्रमे  १४:२७  व १५:०३अंशावर आहेत. म्हणजेच यांच्यात ते सर्व आपापल्या राशीं मध्ये आहेत तो पर्यंत लाभ, केंद्र, नव-पंचम, प्रतियोग असा कोणताही योग होत नाही. माझ्या दुसरा प्रतिनिधी (लग्न स्थानातले ग्रह) नेपच्युन धरुन विचार केला तरीही असे कोणतेच योग होत नाही. याचा सरळ सरळ अर्थ होतो ‘मला रिफंड द्यावा लागणार नाही !’

हुश्श्य !!

मग पार्सल चे काय?

ते तर ग्राहकाकडे पोहोचलेच पाहीजे. पार्सलचा प्रतिनिधी बुध आहे आणि ग्राहकाचा प्रतिनिधी रवी आहे. रवी तुळेत २५: ३७ अंशावर तर बुध तुळेतच ०८:०८ अंशावर , दोघेही एकाच राशीत , बुध जलद गतीचा ग्रह तेव्हा बुध तुळेतच रवी ला गाठून युती करेल असे वाटते पण तसे होणार नाही ! आपण जर एफेमेरीज पाहील्या तर हे लक्षात येईल की  रवि व बुध दोघेही तुळेत असताना ही युती होणार नाही (ही  युती होईल तेव्हा दोघेही वृश्चिकेत २५ अंशावर असतील). म्हणजे पार्सल ग्राहकाला मिळणार नाही का ? असे काही नाही कारण बर्‍याच वेळा दोन प्रतिनिधींमध्ये डायरेक्ट योग होत नसला तरी अन्य मार्गाने इनडायरेक्ट योग घडवून आणला जाऊ शकतो. यात दोन प्रकार असताता. कलेक्शन ऑफ लाईट  आणि ट्रांसलेशन ऑफ लाईट.

ट्रांसलेशन ऑफ लाईट प्रकारात एक तिसराच एखादा ग्रह मांडवली करतो ! म्हणजे हा तिसरा ग्रह एका प्रतिनिधीशी योग करतो आणि नंतर तो दुसर्‍या प्रतिनिधीशी योग करतो आणि हे होत असताना दोन्ही प्रतिनिधी आपापल्या राशीतच असले पाहीजेत एव्हढे बघायला लागते. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती ही मांडवली वाला ग्रह दोन्ही प्रतिनिधीं पेक्षा जलद गतीचा हवा , तर आणि तरच तो एकाशी योग करुन तसाच पुढे जाऊन दुसर्‍याशी योग करु शकेल.

आता अशी शक्यता म्हणजे ट्रांसलेशन ऑफ लाईट आहे का तपासूया.

आपले प्रतिनिधी आहेत रवी आणि बुध , आता यांच्यात मांडवली करु शकेल असा  कोणता ग्रह आहे ? अर्थातच ज्याची गती रवी आणि बुधापेक्षा जास्त आहे. फक्त चंद्र च अशी मांडवली करु शकेल. चंद्र मकरेत ०७:०८ अंशावर आहे , आपण जर लक्ष पूर्वक चार्ट बघितला तर आपल्या लक्षात येईल की बुध तुळेत ०८:०८ अंशावर आहे म्हणजे चंद्र  मकरेत ०८:०८ अंशावर आला की चंद्र – बुध केंद्र योग होणार, त्यानंतर चंद्र पुढे सरकत मकरेत २५: ३७ अंशावर आला की तो तुळेत २५: ३७ अंशावर असलेल्या रवीशी केंद्र योग करेल. आणि हे होत असताना रवी व बुधा त्यांच्या सध्याच्याच राशीत म्हणजे तुळेतच असणार आहेत. थोडक्यात चंद्र प्रथम बुधाशी हातमिळवणी करेल आणि तो करंट पुढे रवी कडे त्याच्याशी  हात मिळवणी करुन पोहोचवेल. यालाच ट्रांसलेशन ऑफ लाईट्स म्हणतात.

पार्सल ग्राहका पर्यंत पोहोचणार यात काही शंकाच नाही. पण केव्हा?

वेस्टर्न होरारीत कालनिर्णया साठी चंद्राचा उपयोग करतात. चंद्राने केलेला पार्सलशी (बुध) किंवा ग्राहकाशी (रवी) योग आपल्याला चालेल. चंद्र फक्त १:०० अंश पुढे सरकला की चंद्र – बुध केंद्र योग होणार आहे. चंद्र आणि रवी (ग्राहक) यांच्यातही केंद्र योग होत आहे त्यासाठी चंद्राला १७:२९ अंश पुढे जायचे आहे. चंद्र बुध योग कालनिर्णया साठी वापरला तर आपले स्केल १ तास / दिवस / आठवडा असे होते. तास तर शक्य नाही, आठवडा पण चालणार नाही , एका दिवसात , म्हणजे प्रश्न विचारल्याच्या दुसर्‍या दिवशी २० तारखेला पार्सल ग्राहकाच्या हातात पडेल. चंद्र रवी योग बघायची आवश्यकता नाही.

होरारी ने इतके खणखणीत उत्तर दिल्याने मी काहीसा निर्धास्त झालो..

असे जरी असले तरी आज म्हणजे  २० तारखेला दुपारी मी कुरियर वाल्यांच्या ऑफिसात जाऊन जरा आरडाओरडा केलाच!

काय योगायोग असतात पहा नेमका त्याच वेळी तिथे त्या कुरियर कंपनी रिजनल मॅनेजर व्हिजीट ला आला होता. त्याने वैयक्तिक रित्या माझी बाजू ऐकून घेतली, धाडधाड फोन केले आणि मला प्रॉमिस केले की कोणत्याही परिस्थितीत पार्सल आज म्हणजे आजच डिलिव्हर होईल. होरारी ने आपल्याला हे आधीच सांगीतले होते, बघा आठवते का ?  ट्रांसलेशन ऑफ लाईट !!! मांडवली !! तो रिजनल मॅनेजर म्हणजेच आपला मांडवली वाला. आणि या चार्ट मध्ये चंद्राने मांडवली केली म्हणून की काय  हा रिजनल मॅनेजर पूर्ण तुळतुळीत टकलू होता !!

 

ग्राहका कडून संध्याकाळी १८:३९ वाजता व्हॉटसअ‍ॅप मेसेज आला पार्सल मिळाले !

हा घ्या त्याचा स्क्रिन शॉट-

 

Jenson Message

सायबानु,  या टैमाला के.पी. वाली पत्रिका बनवलीच नाही. आधीच मी स्वत:चे प्रश्न बघत नाही , तरी नियमाला अपवाद करुन होरारी चार्ट मांडला. उत्तर मिळाले . आता परत के.पी. चार्ट कशाला. त्यातही इतक्या कमी कालावधी साठी दशा – अंतर्दशा – विदशा बघायच्या का? रुलिंग प्लॅनेट वापरावे लागतील. पण माझे आणि रुलिंग प्लॅनेट्स चे वाकडे त्यामुळे मला तो ही मार्ग उपलब्ध नाही. (बाकीच्या के.पी. वाल्यांची कशी मज्जा अस्ते नै, रुलिंग प्लॅनेट त्यांच्या समोर हात जोडून ‘आज्ञा मालक ‘ म्हणत सदैव तत्पर उभे! )

जाऊद्या ना , वेस्टर्न होरारीने उत्तर दिले आणि ते अचूक आले ना ? कोणाच्या कोंबड्याच्या आरवण्याने का होईना आपल्याला सुर्य उगवल्याशी मतलब , नै का?

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

7 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद , मला एका नव्या व्यवसायाची आयडिया दिल्या बद्दल एक धन्यवाद आणखी देतो ! ‘आमचे येथे जमिणीवर पडलेले जबडे परत जागच्या जागी बसवून मिळतील.. आमची कोठेही शाखा नाही… दुपारी १२ ते ४ वामकुक्षीची वेळ असल्याने दुकान बंद राहील .. हुकूमा वरुन. मालक.”

   आपला

   सुहास गोखले

   0
 1. अनंत

  जबरदस्त ! लेख अप्रतिम !!
  ट्रांसलेशन ऑफ लाईट – एकदम अफलातून. नवीन गोष्ट कळली.
  यामध्ये तुम्ही तिथे जाऊन जो आरडाओरडा केला – तो पण मध्यस्त ठरतो का ? जर तुम्ही तिथे गेला नसता तर मध्यस्त कोण ठरलं असतं ?

  कॉमेंट्स मधील “हुकमावरून” – एकदम मस्त.
  बरेचदा मला हा प्रश्न पडतो नक्की मालकाचा हा हुकुम आहे का मालकाला अजून कुणाकडून हुकुम मिळाला आहे

  CD चा काय फंडा आहे ? कश्या व कोणत्या ऑर्डर करता येतात ?

  धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मी जरी होरारी ने उत्तर मिळवले होते आणि माझा माझ्या स्वत:च्या कौशल्यावर विश्वास असला तरीही, आपण प्रयत्न सोडायचे नसतात, ज्योतिष हे मार्ग दाखवते पण प्रत्यक्षात पावले आपल्यालाच उचलावी लागतात, लॉटरी लागण्याचा आग्दी १००% योग असला तरी लॉटरीचे तिकीट काढणे ही क्रिया आपल्या कडून झालीच पाहीजे, प्रयत्न केलेच नाहीत तर फळ मिळणार नाही आणि ते संचित कर्मात जमा होईल किंवा दुसर्‍या कोणत्यातरी फळात रुपांतरीत होईल. म्हणून आपण प्रयत्न सोडायचे नाहीत.

   या केस स्ट्डी मध्ये ‘तो रिजनल मॅनेजर’ हाच ‘मांडवली कार’ , जेव्हा ट्रांसलेशन ऑफ लाईट च्या साह्याने योग होतो तेव्हा खरेच घटना घडवूण आणण्यसाठी एखादा मध्यस्थ लागतोच.

   मी जुन्या रेकॉर्ड्स, सीडिज , कॅसेट्स जमवतो , मी एकदम लॉट ने विकत घेतो (किलोच्या भावात किंवा ‘हा सगळा कचरा घेऊन जा , तुला काय द्यायचे ते दे!), मग जरा साफसफाइ करुन त्यातल्या काही माझ्या स्वत:च्या कलेक्शन मध्ये ठेवतो व जादाच्या विकतो , सुशिक्षीत , विंग्रजी बोलू शकणारा भंगारवाला म्हणा हवे तर! , आता सुद्धा माझ्याकडे अमेरिकन कंट्री म्युझीक ३५ , वेस्टर्न क्लासिकल प्रकारातले ४० , जॅझ मधले ५० असे सुंदर अलब्म विक्री साठी उपलब्ध आहेत.

   आपला

   सुहास गोखले

   0
 2. Gaurav Borade

  खरच अप्रतिम, तुमची प्रत्येक केस स्टडीतून काहीतरी नवीन शिकायला मिळते… 🙂 यामध्ये पण ट्रांसलेशन ऑफ लाईट आणि प्रत्येक ग्रहाचा वेग consider करण किती महत्वाचा आहे हे समजल… मजा आली वाचताना.. 🙂
  आणखी एक , तो chart कोणत्या software मधून create करता येतो ? graphics भारी आहे त्याच खूप…

  आणि
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  ~~~~~~~~~~ विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा…! ~~~~~~~~~~~~~~~
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  0
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   होरारी मगा ती वेस्टर्न असो वा के.पी. तशी फार अवघड नाही. चार्ट एका प्रश्ना पुरताच असल्याने स्कोप फार मर्यादीत असतो. प्रश्न जर तळमळीने विचारला असेल तर चार्ट रॅडिकल मिळतो , काम करणे सोपे जाते , तळमळीचा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या क्षणात त्या प्रश्नाचे उत्तर बंदिस्त असतेच असते, आपल्याला ते हुडकून काढायचे असते. पण म्हणून उठसुठ, आलतु फालतु कारणा साठी प्रश्न विचारु नये, एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारु नये.

   मी जे चार्ट वापरतो ते माझ्या एका मित्राच्या मदतीने तयार करतो. इतर कामासाठी मी http://www.astro.com यांची फ्री चार्ट सर्व्हिस वापरतो.

   विजयादशमीच्या शुभेच्छा !

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. Chaitanya Kalve

  नमस्कार माझे नाव चैतन्य कळवे
  माझी जन्मवेळ 00 06
  माझी जन्मतारीख 19 04 72
  माझी जन्म ठिकाण मुंबई

  संदर्भ : मी 2018 19 पर्यंत ऑरगॅनिक रिटेल चे दुकान चालवत होतो पार्टनरशिप फॉर्म द्वारे. पार्टनर अजूनही दुकान चालवत आहेत मी एग्रीमेंट करून बाहेर पडलो. त्याचे पैसे अजूनही मला हळूहळू मिळत आहेत. ॲग्रीमेण्टप्रमाणे मी मुंबईत या प्रकारच्या कुठलाही बिझनेस करू शकत नाही.
  मला माझ्या एका ओळखीच्या कडून एक रिटेल ऑरगॅनिक दुकान पार्टनरशिप मध्ये चालवण्यासाठी ऑफर आलेली आहे.
  मी कागदोपत्री कुठेही नाव देऊ शकत नाही पण माझा मुलगा आजच अठरा वर्षाचा झाला आहे.
  प्रश्न: मी माझ्या मुलाच्या नावाने / किंवा बायकोच्या नावाने, तो व्यवसाय पार्टनरशिप द्वारे चालवावा का… त्यातून आर्थिक फायदा होईल का

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.