पाप्रातुमाफे आणि एक राहीलेच की ! या लेखाचे हे असले विचित्र शिर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटणे साहजीकच आहे.

हे  ‘पाप्रातुमाफे’ हे आहे तरी काय ?

सांगतो, हे एक लघु रुप आहे (Short form) आहे , मुळ वाक्य किंवा शब्द समुह असा आहे:

‘पाटलांची प्राची तु माझी फेव्हरिट ‘ या शब्दांतले पहिली अक्षरें घेऊन बनले आहे ‘पाप्रातुमाफे’!

डोके गरगरायला लागले ना? ही पाटलांची प्राची कोण? कोणाची फेव्हरिट आहे ?

ते पण सांगणार ना !

मग हे  ‘आणि एक राहिलेच की ‘ म्हणजे काय , काय राहिलेच की? ते पण सांगा की राव !

सांगणार, सगळे सांगून सोडणार बघा,  अगदी बैजवार, तेव्हा मंडळी जरा सावरुन बसा… भेटू या या पाटलांच्या प्राचीला !

…..

बेंगलुरु चे एक प्रख्यात मॅनेजमेंट गुरु आणि ‘व्यक्तिमत्व विकास’ प्रशिक्षक (कोच) माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत , मी माझ्या करीयरच्या सुरवातीच्या काळात नोकरी निमित्त काही महीने बेंगलूरु मध्ये वास्तव्यास होतो तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली, तेव्हा पासुनची आमची मैत्री आजही अतूट आहे.

हे गुरु बेंगलोर , मुंबई , दिल्ली , कोलकता, चैने अशा मोठ्या शहरातून व्यवस्थापन आणि व्यक्तीमत्व विकास विषयक कार्यशाळा (वर्क शॉप ) चालवतात , मित्रच असल्याने त्यांचा मुंबईच्या एका वर्कशॉप मध्ये भाग घ्यायची संधी मला मिळाली आहे (मी फुकट्या !) आणि त्याचा फार मोठा लाभ ही झाला आहे.

त्यांच्या व्यक्तीमत्व विकास शिबीरात ‘गोल सेटिंग’ म्हणजे ‘उद्दिष्ट्ये / ध्येय ठरवणे आणि त्यांची पूर्तता करणे’ हा भाग अगदी सखोल पणे शिकवला जायचा. अनेक उदाहरणे , रंजक किस्से यांनी भरलेला हा भाग अत्यंत प्रेरणादायी असतो. माझ्या लेखना वर , शिकवण्या वर या गुरु माऊलीची कमालीची छाप आहे हे मान्यच करावे लागेल.

त्यात जे काही शिकवले जात असायचे ते शब्दश: इथे सादर करणे शक्य नसले तरी त्यातला महत्वाचा भाग मी इथे देत आहे.

आज आपण ‘गोल सेटींग’ बद्दल बोलणार आहोत.

मराठीत याला आपण ‘ ठरवा- लिहून काढा- योजना बनवून ती कृतीत आणा- वेळोवेळी आढावा घ्या- साध्य करा’ असेही म्हणू शकतो.

मुळात हे ‘गोल’ म्हणजे काय? मराठीत याला आपण ‘लक्ष’ किंवा ‘उद्दीष्ट्य ‘ म्हणू , लक्ष्य ( Goal  ) म्हणजे  एक परिणाम (result) आहे , जो आपण मिळवू ईच्छीतो .

‘मी  परिक्षेत पास होणार’ , ‘मी वजन कमी करणार’, ‘मी गिटार वाजवायला शिकणार’, ‘मी भरपुर पैसा मिळवणार’. ‘या दिवाळीला दार समोर स्वत:ची नवी कोरी कार उभी करणार’, ‘बायकोशी भांडणार नाही (बायकोला तिच्या माहेरच्या माणसां वरून टोमणें मारणार नाही) !’ ‘जास्त जागरणें करणार नाही’, ‘मित्रा समवेत ‘बसण्याचे’ कार्यक्रम एकदम बंद करणार!” , “सिगरेट सोडणार’, ‘फेसबुकवर टाईम पास करणार नाही’ , ‘सगळ्या आलतु फालतु व्हॉटसॅप ग्रुप्स मधून बाहेर पडणार’ ,  ‘त्या तसल्या बेवसाईटीं उघडणार नाही’,  ही सारी गोल्स आहेत , उद्दीष्ट्ये आहेत ! थोडक्यात आपल्या ज्या काही ईच्छा आकांक्षा असतात त्यांना आपण गोल म्हणून शकतो.

पण वाटते तितके हे सोपे नाही ! म्हणजे या ईच्छा पूर्ण करणे अवघड आहे असे मला म्हणायचे नाही तर केवळ मनात मनोरे रचून , दिवास्वप्ने रंगवून या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत असे मला म्हणायचे आहे.

आपली कोणतीही ईच्छा आकांक्षा असो, ती पुर्ण होण्यासाठी आपल्याला काही पावले उचलावी(च)  लागतील, त्या दिशेने काही प्रयत्न करावे लागतील आणि या सर्व प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणजे ‘गोल सेटिंग’ , आपल्याला जे काही हवे आहे ते मिळवण्याच्या प्रक्रियेतली पहीली आणि अत्यंत महत्वाची पायरी.

आपल्या मनात अनेक  ईच्छा आकांक्षा असल्या तरी जो पर्यंत आपण त्यांची सुसुत्र , क्रमवार मांडणी करत नाही तो पर्यंत ती सारी शेखचिल्लीची स्वप्नेच राहतील , असे होऊ नये म्हणुनच आपल्याला आधी ‘गोल सेटींग’ करावे लागेल. म्हणजे ‘काय’ , ‘कसे’ , कधी, असे प्रश्न स्वत:लाच विचारुन त्यांची उत्तरें स्वत:लाच देऊन एक निश्चित कार्यप्रणाली तयार करावी लागेल. ही प्रक्रिया तशी अवघड नाही, साधा तारतम्य भाव (कॉमन सेन्स) आहे ह्यात. याची सुरवात म्हणजे आपली ध्येय – धोरणे , उद्दीष्ट्ये स्पष्ट करणे. त्यासाठी अनेकांच्या अनुभवातून (किंबहुना अपयशातून) लक्षात आलेली काही सर्वमान्य सुत्रे आहेत . आज आपण त्यांचा एक घावता आढावा घेऊ.

‘गोल सेटींग’ हे शास्त्र तर आहेच पण एक कला देखील आहे. गोल्स कसे ठरवारयचे, त्याची व्याख्या काय ह्या संदर्भात पुस्तके लिहता येईल इतका मजकूर, अनुभव आहे पण महत्वाचे मुद्दे जरी लक्षात आले तरी बरेच काम झाले असे म्हणता येईल.

असे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचा एक सोपा उपाय म्हणजे प्रत्येक मुद्द्याचे पहीले अक्षर घेऊन एक शब्द किंवा अक्षर समुह बनवायचा , हा काहीसा अर्थहीन पण तरीही सुगम असा शब्द समुह एकदा लक्षात ठेवला की त्या वरुन चे मुद्दे आपोआप लक्षात राहतात. कसे ?

‘तानापिहीनिपाजा’ या अर्थहीन शब्दात किंबहुना अक्षर अमुहात इंद्रधनुष्याचे सगळे रंग आहेत दडले आहेत.. पहा बरे..

ता: तांबडा

ना: नारिंगी / केशरी

पि: पिवळा

ही: हिरवा

नि: निळा

पा: पारवा / करडा / ग्रे

जा: जांभळा

काहीजण हेच ‘जाताना ही पाणी पी’ अशा तर्‍हेनेही लक्षात ठेवतात.

असो.

या ‘गोल सेटींग’ प्रक्रियेतले महत्वाचे मुद्दे ही अशाच एका अक्षर समुहाने लक्षात ठेवता येतील, पण असे कोणते मुद्दे?

Personal (वैयक्तिक)

Positive (सकारात्मक)

Time bound (समयबद्ध)

Measurable: (सुनिश्चित , मापता येण्याजोगे)

Flexible : लवचिक , बदल क्षम

 

 

म्हणजेच : PPTMF

आता हे ‘PPTMF’ लक्षात ठ्वायला जरा कठीणच म्हणून आपण ते असे लक्षात ठेऊ:

पीपीटीएमएफ म्हणजेच ‘पाटलांची प्राची तु माझी फेव्हरिट’  किंवा ‘पाप्रातुमाफे’

पाटलांची: P

प्राची: P

तु : T

माझी: M

फेव्हरिट:  F

आता राहील लक्षात ?

आता हे मुद्दे नेमके काय आहेत  पाहूया,

पण या लेखमालेच्या दुसर्‍या भागात.. अगदी नक्की !

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.