‘गोल सेटींग’ प्रक्रियेतले महत्वाचे मुद्दे:

Personal (वैयक्तिक)

Positive (सकारात्मक)

Time bound (समयबद्ध)

Measurable: (सुनिश्चित , मापता येण्याजोगे)

Flexible : लवचिक , बदल क्षम

म्हणजेच : PPTMF

आता हे ‘PPTMF’ लक्षात ठ्वायला जरा कठीणच म्हणून आपण ते असे लक्षात ठेऊ:

पीपीटीएमएफ म्हणजेच ‘पाटलांची प्राची तु माझी फेव्हरिट’  किंवा ‘पाप्रातुमाफे’

पाटलांची: P

प्राची: P

तु : T

माझी: M

फेव्हरिट:  F

आता राहील लक्षात ?


या लेखमालेचा पहिला भाग इथे वाचा: पाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की ! (1)


 


आता आपण वर दिलेले सर्व मुद्दे एक एक करत समजावून घेऊ:  

(P) Personal (वैयक्तिक):

तुमची गोल्स तुमचीच असली पाहिजेत !

दुसर्‍याच्या गोल्स शी आपल्याला काय देणे-घेणे आहे? शेजार्‍याने मोठ्ठा 3 बीएचके  फ्लॅट घ्यावा किंवा शेजार्‍याचा मुलगा UPSC परीक्षा उत्तीर्ण व्हावा अशी सदिच्छा आपल्या मनात असणे यात वावगे काहीच नाही, चांगलेच आहे ते पण ही सर्व त्या शेजार्‍याची गोल्स असतील / असू शकतील, आपली कधीच नाही.

शेजार्‍याचा मोठ्ठा फ्लॅट व्हावा , त्याचा मुलगा परीक्षा पास व्हावा ही आपली जबाबदारी कधी पासून झाली ?  ती आपली जबाबदारी असूच शकत नाही. आपण आपल्या पुरते पाहावे त्यासाठीच आपण आपल्या स्वत: साठी, स्वत:च्या विकासा साठी , स्वत:च्या सुखा-समाधाना साठीच गोल्स आखायची असतात म्हणजेच ती वैयक्तिक Personal असलीच पाहिजेत. सार्‍या जगाची जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्यायला आपण काही संत- महात्मे गेला बाजार समाजसुधारक नाही, कोणी काहीही म्हणो,  ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे’ हे कायमच लक्षात ठेवा! तेव्हा  आता  ‘सेल्फिश’ व्हा , आपल्या पुरते पाहा, एका मराठी चित्रपटात वारंवार वापरले गेलेले लोकप्रिय वाक्य जरासे बदलून म्हणता येईल ” माझी गोल्स मला प्यारी , XXX गेली दुनियादारी’ !  

(P) Positive (सकारात्मक):

आपली गोल्स सकारात्मकच असली पाहिजेत!

 ‘स्वत:चे नाक कापून दुसर्‍याला अपशकुन’ असा प्रकार नसावा, किंवा दुसर्‍याचे वाईट व्हावे , वाईट करावे, दुसर्‍याचे वाईट होण्यात माझा लाभ’ असे नसावे.  आपल्याला यश मिळावे, सुख-समाधान, प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा धरण्यात काहीच चूक नाही पण हे साध्य करत नसताना इतरांचे नुकसान होऊन माझा लाभ व्हावा अशी इच्छा नसावी. मला स्पर्धेत यश मिळावे या साठी माझे सारे स्पर्धक आजारी पडावेत अशी इच्छा धरणे चुकीचे आहे. ‘Everything is fair in Love and War’ असे बोलले जाते पण ते अलंकारिक अर्थाने, त्याचा शब्दश: अर्थ घेणे अपेक्षित नाही. आपण आपली गोल्स गाठताना दुसर्‍यांना पायदळी तुडवून पुढे जायचे नाही. आपण आपल्या कष्टाने , स्वकर्तृत्वा वर आपले लक्ष गाठायचे आहे, कोणाचा जळफळाट करून किंवा कोणाचा तळतळाट घेऊन नाही हे पक्के लक्षात असू द्या. आणि अर्थातच आपली गोल्स ही विधायक, प्रामाणिक असलीच पाहीजेत, बँकेवर दरोडा घालण्याची नसावीत.

(T) Time bound (समयबद्ध):

तुमच्या प्रत्येक गोल ला सुनिश्चित समय मर्यादा असलीच पाहिजे.

गोल्स ठरवताना ते पूर्ण करायची समय मर्यादा आखून घेतली पाहिजेच नाही तर त्या गोल्सना काहीच अर्थ राहणार नाही. एखाद्या कामाला जेव्हा समय मर्यादा नसते म्हणजे  ‘काही गडबड नाही , होऊ दे निवांतपणे’ ,. ‘टेक युअर ओन टाईम’, ‘होईल तेव्हा होईल’ अशी मुभा असेल तर ते काम कधीच पूर्ण होत नाही असा आपला सगळ्यांचा नित्याचा अनुभव आहेच. तेव्हा गोल्स ठरवताना त्याला निश्चित अशी समय मर्यादा आखून घ्या, भले ती मुदत पाच वर्षाची किंवा दहा वर्षाची असेल,  चुकीची का असेना!. आपल्याला एक समय मर्यादा ठरवता आली पाहिजे. आपल्याला जे साध्य करायचे आहे , जो बदल घडवायचा आहे ते सारे केव्हा पूर्ण व्हायला पाहिजे हे ठरवता आलेच पाहिजे तसे ते ठरवता येत नसेल तर कोठे तरी चुकते आहे, कदाचित आपल्याला काय साध्य करायचे आहे याचा आपल्यालाच नक्की अंदाज नाही असे म्हणावे लागेल.

“वजन कमी करेन” हे एक उत्तम गोल  आहे (फार लोकप्रिय पण आहे !) पण असे वजन कमी करायला किती कालावधी देणार आहात हे जो पर्यंत निश्चित ठरवत नाही तो पर्यंत अशा गोल्स ना काही ही अर्थ नाही.  समय मर्यादा नसेल तर तुमचे वजन कमी करण्याचे गोल कधीच पूर्ण होणार नाही . लक्षात ठेवा ज्याला समय मर्यादा घातलेली नाही अशी गोल्स / उद्दीष्ट्ये कधीच पूर्ण होणार नाहीत.

अर्थात अशी समयमर्यादा तारतम्य हे बाळगावेच लागेल, ‘ माझे सध्याचे वजन १०० किलोवरुन कमी करुन ६० किलो वर आणेन’ हे गोल दोन-तीन महीन्यात पुर्ण होणार नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहीजे. आज उधार उसनवारीत जगणार्‍या व्यक्तीने ‘ एका वर्षात दीड कोटी रुपयाचा अपार्टमेंट ‘ हे गोल आखताना जरा विचार करावा. काही वेळा ‘समय मर्यादा’ ठरवायची असते म्हणून एकदम होलसेल समय मर्यादा घातली जाते, वजन कमी करायच्या गोल साठी समय मर्यादा असली पाहीजे (असे सरांनी बजावलेय ना !) म्हणून  पाच- दहा वर्षांची समय मर्यादा घालण्यातून काहीही साध्य होणार नाही.

लक्षात ठेवा , जे गोल ठरवले आहे त्याला सुसंगत अशी समय मर्यादा ठरवता आली पाहीजे, ती व्यवहारीक / वास्तवाच्या जवळपास असली पाहीजे, त्याच बरोबर ती जराशी आव्हानात्मक पण ठेवली पाहीजे, एखादे गोल सामान्यत:  इतर लोक वर्ष भरात पूर्ण करताना दिसत असले तर आपण जरा आव्हानात्मक अशी म्हणजे नऊ महीन्यांची मुदत ठेवू शकतो, यात  ‘आव्हान’ आले पण वास्तवतेच्या विसंगत असे नाही. पण ज्या कामांना इतरांना दोन एक वर्ष लागतात त्याला तुम्ही पाच / दहा वर्षाची भली मोठी मुदत घालून घेतली तर तुम्ही फार बचावात्मक खेळत आहात, गोल गाठण्यातले आव्हान . थरार नष्ट करत आहात , इतकेच नव्हे तर अशी अघळपघळ , ऐसपैस समयमर्याद घातल्याने  ‘काय गडबड आहे , उद्या करु  , परवा करु  , भरपूर वेळ आहे’ अशी टंगळमंगळ नक्कीच होते आणि मग अशी  ‘भरपूर (?) ‘  समय मर्यादा असूनही  ते गोल कधीच पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्या.

(M) Measurable (मापता येण्या योग्य)

गोल्स पूर्ण झाली की नाही हे ठरवता आले पाहिजे.

म्हणजेच आपले एखादे गोल नेमके काय झाले / काय साध्य केले म्हणजे ‘ पूर्ण  होईल हे आपल्याला ठरवता आले पाहिजे,  कोठे जायचे हे न ठरवताच प्रवासाला निघणे याला प्रवास नाही तर भरकटणे म्हणतात. आपले लक्ष गाठायचे असेल तर ते नेमके काय आहे आणि त्याची पूर्तता कशात आहे हे आधी पासूनच माहिती असले पाहिजे.

“वजन कमी करेन” हे गोल म्हणून उत्तम साध्य आहे पण त्यासाठी ‘वजन’ किती किलो ने कमी करणार हे ठरवणेही तितकेच महत्वाचे आहे. वजन किती किलोने कमी करायचे आहे आणि त्यासाठी आपण काय समय मर्यादा घालून घेतली आहे यावरच आपल्याला वजन कमी करण्या साठी नेमके काय केले पाहीजे हे ठरवता येणार आहे, ‘किती? आणि ‘किती वेळात’ या महत्त्वाच्या दोन घटकां शिवाय आपली गोल्स / उद्दिष्ट्ये अपुरी आहेत .

मोजायला काही नाही आणि वेळेचे कोणतेच बंधन नाही, अशी गोल्स कधीच पूर्ण होणार नाहीत.

‘मला श्रीमंत व्हायचे आहे ‘, ‘मला यशस्वी व्हायचे आहे’. ‘मी चांगली व्यक्ती बनणार आहे’ ह्या अपेक्षा धरण्यात वावगे काहीच नाही पण ह्या अपेक्षा गोल्स म्हणून अपूर्ण आहेत कारण श्रीमंत म्हणजे नक्की काय? यशस्वी म्हणजे नक्की काय अपेक्षीत आहे किंवा काय झाले / मिळवले / साध्य झाले म्हणजे मी स्वत:ला यशस्वी समजेन , ‘चांगल्या व्यक्तीची माझी व्याख्या काय’ याचा खुलासा करून घेतला तर आणि तरच अशा प्रकाराच्या ‘गोल्स’ काही अर्थ असेल नाही तर ह्या सगळ्या वार्‍यावरच्या गप्पा ठरतील. गोल्स सेट करताना त्याची यशस्वी सांगता केव्हा आणि कशी होणार हे जर माहिती असेल तर आणि तरच आपण त्या संदर्भात आत्ता पर्यंत झालेल्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन आपण आपल्या उद्दिष्ट्यां पासून किती जवळ / लांब आहे हे ठरवता येईल, आपली प्रगती समाधान कारक होत आहे का नाही याचा अंदाज येईल आणि या अंदाजा वरून प्रयत्नांचा जोर कमी – जास्त करणे किंवा प्रयत्नांची दिशा ठरवणे / बदलणे शक्य होईल.

‘येत्या पाच वर्षात मी स्वत:च्या मालकीच्या घरात राहीन’ हे उद्दिष्ट्य (गोल) एका अंगाने योग्य असले तरी त्यात तपशिलाचा अभाव असल्या मुळे ते निरुपयोगीच आहे. इथे पाच वर्षे ही समय मर्यादा घातलेली आहे हे चांगलेच आहे पण ‘घर’ म्हणजे नेमके काय अपेक्षीत आहे ? वन रूम किचन, तीन बेडरूम + टेरेस का ‘रो-हाऊस’, का अलिशान बंगला, त्याची किंमत काय असेल, कोणत्या शहरात , शहराच्या कोणत्या वस्तीत असेल हा तपशील ठरवल्या शिवाय ते ‘गोल’ या गटात मोडणार नाही.

वरचे विधान सुधारून ,  सर्व आवश्यक तपशिला सहीत असे मांडता येईल:

‘येत्या पाच वर्षात किंवा त्या ही आधी,  मी स्वत:च्या मालकीच्या दोन बेडरूम + टेरेस अशा किंवा ह्या पेक्षा ही चांगल्या आणि शहरातल्या मयूर कॉलनी, मॉडेल कॉलनी, अलंकार / नटराज / सहजानंद सोसायटी , कर्वे पुतळा परिसर, अशा चांगल्या परिसरात किंवा त्याहूनही अधिक प्रतिष्ठित अशा परिसरात, आजच्या बाजारभावा नुसार एक दीड कोटी किंवा अधिक मूल्य असलेल्या घरात राहात असेन, हे घर शक्यतो कोणतेही कर्ज न घेता खरेदी करू शकेन अशी आर्थिक सुस्थिती मी मिळवेन,  कर नियोजन किंवा तत्सम कारणाने मला कर्ज घ्यावेच लागले तर ते  सात वर्षा पेक्षा कमी मुदतीचे  असेल आणि कर्जाचा मासिक हप्ता माझ्या त्या वेळेच्या मासिक उत्पन्नाच्या  ३०% पेक्षा जास्त असणार नाही, असे कर्ज घ्यावे लागलेच तर कोणतीही वित्त पुरवठा संस्था असे कर्ज मला फारशी खळखळ न करता उपलब्ध करून देईन अशी बाजारातली  ‘पत’ मी निर्माण करेन.”

(F) Flexible (लवचीक):

गोल्स ठरवताना बर्‍याच वेळा काही चुकां होतात (च), त्यातली एक महत्त्वाची चूक म्हणजे गोल्स ठरवताना आपण फारच कडक पणाने वागतो, जशी स्वत:ला शिक्षा करुन घेतोय अशा अविर्भावात गोल्स आखले जातात, गोल्स काहीसे आव्हानात्मक असावेत हे मान्य पण म्हणून काही अशक्यप्राय गोल्स एकदम ठरवून टाकणे चुकीचेच आहे.

‘१ जानेवारी पासून सकाळी ५ वाजता उठून अभ्यास करणार / जिम ला जाणार’ असे गोल कागदावर उत्तम दिसते पण ते प्रत्यक्षात येताना दिसत नाही. कारण ज्याला आतापर्यंत सकाळी आठ पर्यंत लोळत पडायची सवय आहे त्याच्या   साठी असे गोल ही एक शिक्षाच भासते. अशा शिक्षा स्वरूप गोल्स ना आपले शरीर आणि मन कडाडून विरोध करते . उत्साहाच्या भरात असे गोल ठरवले आणि ते जरा जास्तच आव्हानात्मक आहे जे लक्षात आले तर त्यात योग्य बदल करता आला पाहिजे म्हणजे,  सकाळी आठ पर्यंत झोपणार्‍याने  प्रथम आठ ऐवजी सकाळी सात वाजता उठेन असा बदल करून घेतला तर ते गोल साध्य करणे सोपे जाईल, उत्साह वाढेल आणि मग त्यापेक्षा कठोर / आव्हानात्मक गोल ठरवता येईल.

एखाद्या सहकारी पतसंस्थेत कारकून म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने ‘मी मोठा कारखानदार होणार’ किंवा’ भारताचा पंतप्रधान होणार’ अशी गोल्स ठरवणे काहीसे अव्यवहार्य आहे, एखाद्या कारकुनाने ‘पंतप्रधान’ / ‘कारखानदार ‘ होण्याची व्हायची अभिलाषा बाळगू नये असे मी म्हणत नाही पण मा. श्री शरद पवार , मा . श्री देवेंद्र फडणवीस . मा. श्री नीतीन गडकरी यांनी  (किंवा गेला बाजार पप्पू ने !) पंतप्रधान होण्याचे उद्दिष्ट ठेवणे स्वाभाविक आहे , ते त्यांच्या आवाक्यातले पण आहे पण एखाद्या कारकुना साठी ज्याला राजकारणाचा गंध ही नाही त्याच्या साठी एकदम पंतप्रधान पद हे फारच मोठे उद्दिष्ट ठरेल हे ही खरेच आहे.

काही वेळा याच्या उलट होते, अनेक गोष्टी आपण प्रयत्नच केले नसल्याने अवघड / आव्हानात्मक वाटत असतात पण एकदा का कामाला सुरवात केली त्याच गोष्टी सहजसाध्य आहेत असे लक्षात येते. काहीजण ‘गो स्टेप बाय स्टेप, स्टार्ट वुईथ सिंपल थिंग्ज’ म्हणजेच ‘छोट्या छोट्या पायर्‍या ठरवा, सहज सोपे ते प्रथम साध्य करा ‘ या उक्तीचा दाखला देत स्वत:ला , स्वत:च्या कुवतीला गौण लेखतात (Underestimate) , इतर बाबतीत हे(च) जरी योग्य असले तरी गोल्स सेटींग्ज मध्ये हे काहीसे चुकीचे आहे  गोल्स ही काहीशी आव्हानात्मक ,  कष्ट साध्य असली तरच त्याचा पाठपुरावा करण्यात मजा.  सोपे गोल्स ठेवत गेलात तर लौकरच या गोल्स ठरवण्याचा  आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचा कंटाळा येतो आणि मग ही सगळी प्रक्रिया बंद पडते. असे होऊ देऊ नका.

व्यायाम करताना आपण जाणीवपूर्वक शरीराला किंवा एखाद्या स्नायूंच्या समूहाला (बायसेप्स, ट्रायसेप्स, काफ, फोर आर्म्सस इ) ताण देतो आणि असा ताण मिळाला तरच शरीर / स्नायूंचा समूह बळकट बनतो, दंडात गोटी दिसायला लागते! नुसते हवेत हात फिरवले , मान वेळावली किंवा चार पावले इकडे तिकडे अशा सोप्या , सहजसाध्य हालचाली केल्या तर त्यातून बळकट शरीर . पीळदार स्नायू तयार होणार नाहीत!

काही वेळा ‘जमेल आपल्याला , जरा जोर लावला की झाले’ असा समज  करून घेऊन गोल्स आखली जातात पण नंतर लक्षात येते की वाटले तितके हे सोपे नाही , अंदाज चुकला आपला. अशा वेळी आपल्याला दोन पर्याय उपलब्ध असतात, एक तर ते गोल रद्दबादल करणे किंवा त्या गोल मध्ये बदल करून ते व्यवहारीक पातळीवर आणणे. म्हणजे ‘पंतप्रधान पद’ हे गोल आखलेल्या सहकारी पतसंस्थेत काम करणार्‍या कारकुना ने कालांतराने ‘पंतप्रधान पदा’ ऐवजी ‘पतसंस्थेच्या कार्यकारिणीत सेवक प्रतिनिधी म्हणून निवडून येणे’ असे काहीसे आवाक्यातले तरीही आव्हानात्मक गोल ठरवणे.

“पूढच्या लगीन सराई किंवा त्याच्या आधीच ‘वरच्या आळीतल्या संगी’ ला  लगीन करुन बायकू म्हणून घरात आणणार” असे गोल असू शकते ! पण यात ‘लवचिकता’ नाही ! म्हणजे जर ‘एका वर्षात जमले नाही म्हणून समय मर्यादा वाढवत राहीलात तर दरम्यान ‘संगीचा’ बा , संगीचे लग्न दुसर्‍याशी उरकून मोकळा होईल आणि ‘संगी’ चे काही झ्येपत नाही म्हणून ‘संगी’ ऐवजी ‘छाया (ती पण भारीच आहे की!)’ असा बदल केलात तर मूळ गोलच बदलले असे होईल. ( ‘संगी’ ऐवजी ‘छाया’ ऐवजी ‘चंदा’ ऐवजी ‘आर्ची ‘ असा बदल करत राहीलात तर आपले गोल मजनूगिरी किंवा दिवास्वप्नात रुपांतरीत होईल )

थोडक्यात सांगायचे तर आपली गोल्स जशी आव्हानात्मक असावीत तशीच ती ‘लवचीक’ पण असावीत, म्हणजे ह्या गोल्स च्या पूर्ततेचे निकष ( वेळ , साध्य) आपल्याला वेळोवेळी तपासून त्यात स्थळ, काळ, व्यक्ती, परिस्थिती सापेक्ष बदल करता आले पाहिजेत नाही तर आपण आपणच निर्माण केलेल्या पिंजर्‍यात बंदिस्त होऊ आणि तिथेच आपला आत्मविश्वास खचायला सुरवात होईल. आणि मग या अशा एका नाठाळ गोल मुळे इतर व्यवस्थित मार्गक्रमणां करत असलेल्या , साध्य होऊ शकणार्‍या , हातातोंडाशी आलेल्या गोल्स / उद्दिष्टांना पण खीळ बसते.

 

गोल सेटिंग या विषयावर तसे पाहिले तर बरेच लिहिता येईल, मी तर एक दिवसभर या विषयावर बोलू शकतो पण विस्तारभयास्तव इथेच थांबतो.

पण मी या लेखाचे शीर्षक काय दिले आहे ते पुन्हा एकदा पाहा… पी-पी-टी- एम- एफ आणि हे राहिलेच की !

यातले पी-पी-टी- एम- एफ हा भाग आपण बघितला मग आता ‘हे राहिलेच की !’ म्हणजे काय?

या पी-पी-टी- एम- एफ च्या जोडीला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहून गेला आहे , हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की त्या मुद्द्या चा विचार केल्या शिवाय या ‘पी-पी-टी- एम- एफ’ ला आणि पर्यायाने तुमच्या ‘गोल सेटिंग’ ला काहीच अर्थ राहणार नाही!

कोणता मुद्दा?

शंकासुरांनो,  सांगतो, अगदी सविस्तर , एका मस्त बोध कथेच्या माध्यमातून सांगतो पण लगेच नाssय  काssय , तर या लेखाचा आणखी एक भाग येणार आहे , त्याच्या पुढच्या भागात आणि त्यासाठी थोssडीसी प्रतीक्षा करायला लागेल !

क्रमश: 

 

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Pranesh

  Great one. I had read about SMART Goals. It stands for specific, measurable, achievable, realistic and time-bound.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री प्राणेशजी

   आपण पण पाप्रातुमाफे मध्ये हेच सगळे समाविष्ट केले आहेच. Achievable and Realistic हा भाग आपण Flexible या जरा विस्तृत संज्ञेत विचारात घेतो , Measurable आणि Time bound आपल्या कडे ही आहे,

   पण यात एक ‘महत्त्वाचा’ घटक सगलेच विसरतात ! तोच मी जास्त विस्ताराने लिहणार , तो भाग खूप उत्कंठा वर्धक असेल

   सुहास गोखले

   +1
 2. shrikant jinral

  खुपच छान माहीती गोल सेटींग बद्दल.मनोरंजक पध्दतीने गोलसेचींगचे जिवनातील महत्व उद्बोधक केले आहे,धन्यवाद .

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.