विठ्ठला , कोणती कुंडली घेऊ हाती ?

भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात सामान्यत: जी कुंडली वापरली जाते ती ‘ क्षेत्र कुंडली’ असते , ‘भावचलित कुंडली ‘ चा वापर फारसा होताना दिसत नाही. काही वाचकांना ‘भावचलित कुंडली’ म्हणजे काय हे कदाचित माहीती नसेल त्यांचा साठी ही थोडीशी तोंडओळख.

एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली बनवताना काही गणितें केली जातात ती अशी:

 1. जन्मवेळ व जन्मस्थळ या माहीतीच्या आधारावर कुंडलीचा लग्न बिंदू निश्चीत केला जातो.
 2. त्यानंतर सर्व ग्रहांचे अंश (आणि कला – विकला) काय आहेत याची नोंद घेतली जाते.
 3. तिसर्‍या टप्प्यात कुंडलीतले बाराही भाव निश्चित केले जातात. (यालाच भावसाधन असे म्हणतात.)

भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडली तयार करताना पहिले दोन टप्पे नक्कीच पार पाडले जातात कारण त्या शिवाय कोणतीही पत्रिका तयारच होणार नाही.
पण तिसरा भावसाधनाचा टप्पा मात्र बर्‍याच वेळा वगळला जातो.

 आपण फक्त दोन टप्प्यांपर्यंत गणितें केली तरीही पत्रिका तयार होते त्याला  ‘क्षेत्र कुंडली‘ असे म्हणतात. आणि जर तिसर्‍या टप्प्याची गणिते करुन , सर्व बारा भाव सिद्ध करुन पत्रिका बनवली तर त्याला ‘भावचलित कुंडली’ म्हणतात.

भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात जवळजवळ सगळेच ज्योतिर्विद केवळ ‘क्षेत्र कुंडली’ वापरतात. भावचलित वापरणारे ज्योतिर्विद अगदीच कमी आहेत.

आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊन पाहुया म्हणजे आपल्याला क्षेत्र व भावचलित ह्या दोहों मध्ये नेमका काय फरक आहे याची थोडी फार कल्पना येईल.

कल्पना करा एक बालक दिनांक २१ सप्टेंबर २०१५ रोजी,  सोलापुर मुक्कामी , सकाळी  ०९: १३ वाजता जन्माला आले आहे. या बालकाची जन्मपत्रिका करण्यासाठी गणिते केली (संपुर्ण रीत येथे सांगत नाही , मोठा विषय होईल तो).

पहीला टप्पा ‘जन्मलग्न’  गणिताने निश्चीत करणे: गणीताने आलेले जन्मलग्न:

आता जर आपल्याला  फक्त क्षेत्रकुंडली हवी आहे, भावचलित कुंडली तयार करायची नसेल तर पहिल्या दोनच टप्प्यां नंतर थांबायचे. तिसर्‍या टप्प्यातली पत्रिकेतले बाराही भाव ठरवण्यासाठीची कोणतीही गणिते करावयास लागत नाहीत.

क्षेत्र कुंडलीत प्रथम भाव म्हणजे गणिताने सिद्ध केलेल्या या जन्मलग्नाची राशी, ती संपूर्ण राशी म्हणजेच तो संपूर्ण भाव. जन्मलग्न बिंदु एखाद्या राशीत कितीही अंशावर असला तरी ती संपूर्ण राशी म्हणजे प्रथम भाव जो त्या राशीच्या  ‘०’ अंशावर सुरु होऊन त्याच राशीच्या शेवट्च्या  ३० व्या अंशात संपतो. आपला जन्मलग्न बिंदू  त्या राशीत (म्हणजेच भावात) मध्येच कोठे तरी असेल.

हा थोडक्यात   राशी  =  भाव हे सुत्र लक्षात ठेवायचे.

क्षेत्र कुंडलीत एक रास = एक भाव असे सुत्र असल्याने प्रत्येक भाव नेमका ३० अंशाचाच असतो.

समजा  एखाद्या वेळी गणिताने आलेला भाव  वृषभ २९:५९:२९  असा वृषभ रास संपायला अवघ्या काही विकला शिल्लक राहील्या आहेत असा असला तरीही प्रथम भाव ‘वृषभ’ च घ्यायचा ! का ? ते विचारु नका !

असो.

आता पहिला भाव जन्मलग्ना ने निश्चित झाला की पुढचे भाव ठरवणे अगदी सोपे आहे .  पुढचा भाव म्हणजेच पुढची राशी !

आपल्या उदाहरणात जन्मलग्न ‘तुळ’ आले आहे म्हणजे या पत्रिकेचा प्रथम भाव = तूळ रास , ओघानेच द्वितीय भाव म्हणजे ‘वृश्चिक ‘ , त्रितीय भाव = धनु .. या क्रमाने द्वादश भाव = कन्या. अगदी सरळ सोपे सुत्र आहे, कोणत्याही गणिताची आवश्यकता नाही!

आपल्या उदाहरणात , त्या सोलापुर वाल्या बालकाच्या पत्रिकेतले बारा भाव असे असतील.

या फ्रेम मध्ये जे आकडे लिहले आहेत ते भावांचे नसून त्या भावावर असलेल्या राशीचे आहेत हे लक्षात घ्या. जन्मलग्न तुळ म्हणजे प्रथम भावावर तुळ रास येत असल्याने प्रथम भावाच्या कप्प्यात तुळ राशी दर्शक ७ हा आकडा दिसेल, दुसर्‍या भावावर अर्थातच वृश्चिक रास असल्याने द्वितीय भावाच्या कप्प्यात वृश्चिक  राशी दर्शक  ८ हा आकडा दिसेल.

पत्रिकेत प्रथम भाव,,,, द्वादश भाव यांच्या जागा पूर्वनिश्चित असतात , त्या कधीच बदलणार नाहीत, पण वेगवेगळ्या जन्मलग्ना नुसार प्रत्येक भावावर वेगवेगळ्या राशी येऊ शकतात म्हणून भावावर कोणती रास आहे ते कळावे म्हणून प्रत्येक भावाच्या कप्प्यामध्ये त्या भावावर असलेल्या राशीचा आकडा लिहावयाचा असतो, हे पक्के लक्षात ठेवा , गोंधळ करुन घेऊ नका!

वर आता आपल्याला या फ्रेम मध्ये ग्रह भरायचे आहे, त्या साठी जन्मवेळ व जन्मस्थळ या माहीतीचा उपयोग करुन घेऊन आपल्यला सर्व ग्रहांच्या  राशी , अंश, कला , विकला गणिताने सिद्ध करायला लागतील.

दुसर्‍या टप्प्यावर सर्व ग्रहांचे अंश – कला –विकला निश्चित केल्या त्या अशा:

आता हे ग्रह आपल्याला आधी तयार केलेल्या फ्रेम मध्ये भरायचे आहेत,  म्हणजे प्रत्येक ग्रह तो ज्या राशीत आहे ती रास ज्या भावा वर आहे त्या भावात मांडायचा. उदाहरणार्थ , रवी कन्येत ०३ :४९: ६० असा आहे , आपल्या पत्रिकेत कन्या रास व्ययस्थानावर आहे (१२) आहे म्हणून आपल्याला  रवी बाराव्या भावात मांडायचा आहे. म्हणजे जन्मलग्न कोणते ते  माहीत असेल तर ग्रहाची नुसती रास कळली तरी तो ग्रह कोणत्या भावात आहे हे चटकन सांगता येते.

या प्रमाणे सर्व ग्रह आपापल्या राशी नुसार , योग्य त्या स्थानात मांडले की आपली ‘क्षेत्र कुंडली’  तयार झाली !

हा झाला दुसरा टप्पा. याच टप्प्यावर बरेचसे ज्योतिषी थांबतात. पण भावचलित कुंडली तयार करावयाची असेल तर आपल्याला प्रत्येक भावाचा आरंभ बिंदू ( किंवा काही भावसाधन पद्धतीत भावमध्य बिंदू ) ठरवायला लागतो.  हा आपला तिसरा टप्पा.

तिसर्‍या टप्प्यात ‘प्लॅसिडस’ सिस्टीम प्रमाणे बारा भावांचे आरंभबिंदू  निश्चित केले ते असे:

क्षेत्र कुंडलीत जसा प्रत्येक भाव एखाद्या राशीच्या  ०  अंशावर सुरु होऊन त्याच राशीच्या शेवट्च्या  ३० व्या अंशात संपतो तसे भावचलितात होत नाही. भावाची सुरवात राशीच्या कोणत्याही अंशा वरुन होते व त्याचा शेवट हा त्याच्या पुढच्या भावाची सुरवात असते.  क्षेत्र कुंडलीत प्रत्येक भाव नेमका ३० अंशाचाच असतो,  भावसाधना मुळे प्रत्येक भाव नेमका ३० अंशाचा असेलच असे नाही , एखादा भाव ३५ अंशाचा होईल दुसरा एखादा भाव २५ अंशाचा असेल, पण सर्व १२ भावांच्या अंशाची बेरीज मात्र कोणत्याही परिस्थितीत ३६० अंश असते.

आता आपण  मागच्या सारखीच फ्रेम तयार करु ,  वर दिलेल्या तक्त्यात गणिताने सिद्ध केलेल भाव पाहीले तर आपल्या लक्षात येईल की, प्रथम भाव नेहमीच जन्मलग्न बिंदू पासून सुरु होतो. पण एका भाव = राशी असे सुत्र नसल्याने भाव बर्‍याच वेळा सुरु होतो एका राशीत आणि संपतो दुसर्‍या राशीत. हेच भावचलित कुंडलीचे वेगळेपण आहे.

आपल्या उदाहरणात प्रथम भाव तुळेत १५:०२:५८ अंशावर सुरु झाला पण तो तुळ रास ओलांडून वृश्चिकेत १४:१७:१२ अंशावर संपला. त्याच वृश्चिकेच्या अंशा पासुन दुसरा भाव सुरु होणार.

वर दिलेल्या तक्त्या प्रमाणे तयार केलेली फ्रेम अशी दिसेल:

या फ्रेम मध्ये पाहा, प्रथम भाव तुळेत १५:०२:५८ अंशावर सुरु होऊन वृश्चिकेत १४:१७:१२ अंशावर संपला आहे, तर द्वितिय भाव जिथे प्रथम भाव संपतो त्याच अंशावर म्हणजे वृश्चीकेत १४:१७:१२ अंशावर सुरु होऊन धनेत १४:०३:४४ अंशावर संपत आहे. या प्रमाणे बाकीचे भाव मांडले आहेत. शेवटी व्ययभाव कन्येत १७:२१:०० अंशावर सुरु होऊन  तुळेत १५:०२:५८ अंशावर संपेल (जो आपला लग्नबिंदू म्हणजेच प्रथम भावाचा आरंभ बिंदू आहे) .

क्षेत्रकुंडली दिसतात तसे राशींचे आकडे इथे नाहीत याचे कारण म्हणजे क्षेत्रकुंडलीत राशी = भाव असे घट्ट समीकरण असते , भावचलितात एक भाव दोन राशीं (किंवा काही वेळा अधिक राशीं मध्ये) मध्ये पसरलेला असल्याने क्षेत्रकुंडली सारखा एकच एक राशीचा आकडा आपल्याला लिहता येणार नाही. मात्र क्षेत्र कुंडली प्रमाणेच , भावचलित पत्रिकेतही प्रथम भाव,,,, द्वादश भाव यांच्या जागा पूर्वनिश्चित असतात , त्या कधीच बदलणार नाहीत.

आता अशी फ्रेम  तयार झाली की त्यात ग्रह भरायचे. क्षेत्र कुंडली तयार करताना हे काम खूपच सोपे होते कारण भाव = संपूर्ण रास असे समीकरण होते. आता मात्र आपल्याला ग्रहाची रास व अंश दोन्ही पहावयास लागतील. ग्रहाची रास व अंश पहावयाचे पहायचे नंतर ती रास व अंश कोणत्या भावात समविष्ट आहे हे पहायचे आणि मग तो ग्रह त्या त्या भावात मांडायचा . असे करताना समजा एखाद्या राशीत दोन ग्रह असतील तर  कदाचित एक ग्रह एका भावात तर दुसरा ग्रह अलिकडच्या किंवा पलीकडच्या भावात मांडावा लागेल (क्षेत्र कुंडलीत ते दोन्ही ग्रह एकाच राशीत असल्याने  , एकाच भावात असतील)

क्षेत्र कुंडलीत ग्रहाची नुसती रास कळली तरी तो ग्रह कोणत्या भावात आहे हे चटकन सांगता येते (अर्थात जन्मलग्न कोणते ते आधी माहीत असावे लागते). पण भावचलित पत्रिका मांडताना ग्रहाची रास व अंश दोन्हीही पक्के माहीती असायला लागतात.

ह्या प्रमाणे त्या सोलापुर वाल्या बालकाची ही ‘भावचलित (प्लॅसिडस)  जन्मलग्न कुंडली’:

बुधा , रवी व राहु  एकाच म्हणजे कन्या राशीत आहेत त्यामुळे ते क्षेत्र कुंडलीत एकाच भावात ( व्ययस्थानात) मांडले होते. भावचलितात रवी आणि राहु कन्येत असले तरी त्यांचे अंश हे ११ व्या  भावाच्या सुरवातीच्या आणि शेवटच्या अंशाच्या आत असल्याने , म्हणजेच ते  ११ व्या भावाच्या – लाभ स्थानाच्या हद्दीत येत असल्याने हे दोन्ही ग्रह लाभ स्थानात येतात , मात्र बुधाचे अंश लाभस्थानाच्या हद्दी बाहेर म्हणजेच व्ययस्थानाच्या हद्दीत येत असल्याने बुध व्ययस्थानात गेला आहे.

क्षेत्र आणि भावचलित कुंडलीत काही ग्रहांचे भाव बदललेले दिसतात ते या कारणामुळे.

आज मितीला ज्योतिषशास्त्रात २०- २५ वेगवेगळ्या भावसाधन पद्धती प्रचलित आहेत. काही जास्त लोकप्रिय आहेत तर काही अगदी क्वचित कोणी तरी वापरताना आढळतो. काही भावसाधन पद्धती जास्त प्रचलित आहेत म्हणजे त्या चांगल्या आहेत असे मात्र नाही. त्या पद्धती जास्त वापरात आहेत कारण भावसाधना साठी जी कोष्टके , तक्ते लागतात ते त्या पद्धती साठी सहजासहजी उपलब्ध आहेत म्हणून. ज्या भावसाधन पद्धती साठीचे असे तयार तक्ते उपलब्ध नाहीत त्यांच्या वापर करण्यासाठी बरीच आकडेमोड करावी लागते, ती आकडेमोड करण्यात इतका वेळ खर्च होईल की त्या दरम्यान  ‘जानू’ बाळंत सुद्धा होऊन जाईल ! ती आकडेमोड नको म्हणून त्या पद्धती मागे पडल्या.

कृष्णमुर्ती पद्धतीत ‘प्लॅसिडस’ ही भावसाधन पद्धती वापरली जाते. पण ‘प्लॅसिडस’ पद्धती उत्तम आहे (तशी ती नाहीच!) म्हणून कृष्णमुर्तीं नी स्विकारली असे नाही तर कृष्णमुर्तींच्या काळात ( १९४०+) संगणक तर सोडाच  सायंटीफीक कॅलक्युलेटर सुद्धा उपलब्ध नव्हते (त्या काळी लॉग टेबल म्हणजे आधुनिकतेची परमावधी होती – केळ्याची शिकरण – मटाराची उस्सळ होती) ! त्यामुळे भावसाधन करताना जी बरीच आकडेमोड करावी लागते ती टाळण्या साठी त्यांनी ‘प्लॅसिडस’ भावसाधन पद्धती  स्विकारली,  आता प्लॅसिडसच का दुसरी का नाही ? तर त्याकाळात फक्त ‘प्लॅसिडस’ पद्धतीचेच तयार भावसाधन तक्ते बाजारात उपलब्ध होते म्हणून.

(आज जर कृष्णमुर्ती हयात असते तर त्यांनी प्लॅसिडस ऐवजी ‘कोश’ ही जर्मन भावसाधन पद्धती नक्कीच निवडली असती !)

बर्‍याच वेळा कोणती भावसाधन पद्धती वापरायची या बाबतीत ‘सोय’ हाच एकमेव निकष वापरला गेला. मग नंतर त्याचीच (चुकीच्या भावसाधन पद्धतीची) सवय झाली , चुक आहे  हे कळले तरी त्यात बदल करायचे धाडस किती जणांकडे असते ?  आणि शेवटी ‘बाबा वाक्यं प्रमाणं , के.पी रीडर्स प्रमाणं  ‘  हे आहेच ना!

आज संगणकामुळे या तयार भावसाधन तक्त्यांची आवश्यकता निकालात निघाली आहे, कोणतीही गणिते आता करावी लागत नाहीत. आज आपण फक्त एका ‘माउस क्लिक’ मध्ये , सेकंदाच्या शतांश भागात , कोणत्याही भावसाधन पद्धतीचा वापर केलेली पत्रिका बनवू शकतो. तेव्हा आजच्या काळातल्या ज्योतिर्विदांनी विषेषत: के.पी. वाल्यांनी केवळ एकच एक भावसाधन पद्धतीचा वृथा अभिमान न बाळगता विविध भावसाधन पद्धतीचा , विषेषत: ‘कोश’ या जर्मन भावसाधन पद्धतीचा , तौलनिक अभ्यास करावा असे सुचवावेसे वाटते.

पण भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात भावसाधन केले जात नाही असे मात्र नाही, भावसाधना साठी ‘श्रीपती पद्धती’ म्हणजेच ‘भाव मध्य’ ही पद्धती वापरली जाते पण फार कमी ज्योतिर्विद भावचलित कुंडली मांडतात आणि वापरतात.

“भावसाधन म्हणजे काय रे भाऊ?”

एक लेख माला मी खास आपल्यासाठी लिहून सोडतो बघा , हा.का.ना.का. ,  पण थोडी प्रतिक्षा करावी लागेल , सायबानु !

सध्यातरी क्षेत्र कुंडलीची एक रास = एक भाव ही सोपी सुटसुटीत पद्धतच आपल्या कडे जास्त लोकप्रिय आहे . यालाच ‘होल साईन हाऊस सिस्ट्म (Whole Sign House System)’ असे संबोधतात. आपण वापरत असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये ‘क्षेत्र कुंडली’ बनवायची असल्यास आपल्याला तिथे ‘Whole Sign House System’ हा ऑप्शन निवडायला लागेल.

आता बर्‍याच वाचकांना शंका पडली असेल:

 1. कोणती भावसाधन पद्धती  (श्रीपती, प्लॅसिड्स, कोश, इक्वल हाऊस इ. ) चांगली ?
 2. भावचलित कुंडली वापरायची का क्षेत्र कुंडली ?

हे  दोंन्ही मोठे विषय (आणि मोठे वादाचे देखिल) आहेत , त्याचा उहापोह करायचा तर स्वतंत्र लेखच लिहावयास लागतील तेव्हा नंतर कधीतरी आपण या दोन बाबतीत नक्कीच चर्चा करु.

सध्या इथेच थांबतो.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. विराजजी ,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपण माझा ब्लॉग नियमीत वाचता आणि आवर्जुन अभिप्राय देता , असे काही (थोडेच) वाचक ./ चाहाते आहेत म्हणूनच मला लिहायची प्रेरणा मिळते आणि ब्लॉग चालू ठेवायला ही काही कारण लाभते. अन्यथा ब्लॉग वर लिहणे हा मोठा वेळकाढू आणि रिसोर्सेस ड्रेन करणारा प्रकार आहे.

   सुहास गोखले

   0
 1. Santosh

  नमस्कार सुहासजी,

  फारच छान लेख आणि नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण (वाचल्या बरोबर अभिप्राय लिहावासा वाटला 🙂 )

  कोश आणि प्लॅसिड्स बद्धल अजून वाचायला आवडेल ते पण तुमच्या खास शैलीत, तो लेख तुम्ही लवकरच लिहाल अशी आशा आहे.

  आभारी,
  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   अभिप्रयाबद्दल धन्यवाद.

   भावसाधना वरचा लेख फारच किचकट अशा गणिता वर आधारीत होईल, किती जणांना समजेल याबद्दल शंका आहेत , तरीही एखादा लाईटवेट लेख लिहायचा प्रयत्न करतो, मला तेव्हढी ती जानी बाळंत झाली का ते सांगा ,

   सुहास गोखले

   0
 2. Gaurav Borade

  खरच खूप उत्तम लेख… धन्यवाद सर ..

  भावचलित कुंडली मुळे त्या त्या स्थानाची फळे , त्याचे परिणाम पण अचूक सांगता येत असतील ना ?
  आणि भावचलित कुंडली वापरायची का क्षेत्र कुंडली ? आपल्या अनुभवावरून आपण कोणती कुंडली वापरता/ सुचवाल ?

  कोश आणि प्लॅसिड्स बद्धल अजून वाचायला आवडेल ते पण तुमच्या खास शैलीत>> +१ एक लेख तो बनता हे… 🙂

  आणखी एक … विनंती समजा हव तर.. पण आपणच एखादि भावसाधन पद्धती किवा आपल्याला खात्री असलेली भावसाधन पद्धती वापरून एखादे software काढाल का ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री गौरवजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण विचारले आहे त्याबद्दल:

   १) ग्रहांची स्थानगत फळे क्षेत्रकुंडली वरुनच पाहावीत.आपल्या शास्त्रात जी भावगत फळे वर्णन केली आगेत ती क्षेत्रकुंडलीच्या अंगानेच दिली आहेत.
   २) मी फक्त के.पी./ होरारी साठी भावचलित कुंडली वापरतो, बाकी बहुतांश अ‍ॅनॅलायसिस साठी क्षेत्र कुंडली वापरतो. वेस्टर्न साठी सुद्धा अलिकडच्या काळात मी क्षेत्र *म्हणजे होल हाऊस सिस्टिम ‘ वापरायला सुरवात त्केली आहे.
   ३) जर भावचलितच वापरायची असेल तर प्लॅसिडस पेक्षा कोश पद्धती चांगली आहे.
   ४) इतक्या सार्‍या भावसाधन पद्धती असताना आणखी एका नविन पद्धतीची कशाला भर घालायची? आहे त्यातुनच एखादी त्यातल्या त्यात बरी निवडायची म्हणजे झाले !
   ५) बहुतेक सर्वच ज्योतिष सॉफ्टवेअर्स आपल्याला पाहीजे त्या भावसाधन पद्धतीने कुंडली बनवून देतात, त्यासाठी एक कॉन्फ्युगरेशन ऑपशन असतो तो सेट केला की झाले. नव्याने सॉफ़्टवेअर लिहायाची आवश्यकता नाही.

   भावसाधना वरचा लेख अतिशय किचकट (गणित, साधी जॉमेट्री, सॉलीड स्टेट जॉमेट्री ) होईल, तो किती जणांना समजेल याची शंका आहे. मी M1, M2, M3, M4,असे गणिताचे अवघड पेपर पास होऊन इंजिनियर झालो असताना सुद्धा मला ते पहिल्यांदा समजायला जड गेले! पण एक जरा सोपा केलेला लेख नक्की लिहणार आहे . त्याचे सगळे मटेरियल तयार आहे , प्रश्न फक्त वेळेचाच आहे!

   आपला
   सुहास गोखले

   0
 3. Suresh

  छान लेख सुरेशजी. मला काही क्षेत्र कुंडली आणि भावचलित कुंडलीच्या अनुषंगाने काही प्रश्न होतेच ते आता आपल्या लेखामुळे काही प्रमाणात सुटले. तसे आपण म्हणालाच आहात कि ग्रहांची स्थानगत फळे क्षेत्रकुंडली वरुनच पाहावीत. परंतु भावचलित कुंडलीमुळे जर ग्रहस्थाने बदलली तर मिळणाऱ्या फळामध्ये काही बदल असू शकतो का व कसा हे एखाद्या लेखामध्ये क्षेत्र कुंडली आणि भावचलित कुंडलीचे एखादे उदाहरण देवून स्पष्ट केले तर नक्की वाचायला आवडेल.
  बाकी सर्व छानच लिहिता त्यामुळे कोणतेही लेख वाचणे काही चुकत नाही 🙂

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुरेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण म्हणता आहात तसा लेख लिहायचा प्रयत्न करेन.
   सुहास गोखले

   0
 4. रविकिरण पानवलकर

  नमस्कार सुहासजी
  आपण लिहलेला मनापासून खूप खूप आवडला.आपण उल्लेख केल्याप्रमाणे कोश या भावसाधन पद्धतीबद्दल उत्सुकता अधिक वाढलेली आहे.तुमच्याकडून हि अपेक्षा लवकरच पूर्ण होईल अशी आशा करतो.धन्यवाद.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. रविकिरणजी,

   हाउस डिव्हिजन हा अत्यंत किचकट विषय आहे, यामध्ये साधी ट्रिग्नोमेट्री नाही तर सॉलिड जॉमेट्रीचा अभ्यास असावा लागतो. माझ्या सुदैवाने मी इंजिनियरींग चा अभ्यास केला असल्याने आणि गणिताची खास आवड असल्याने हा विषय मला समजतो त्यामुळे सर्वच हाउस सिस्टीम्स वर मला लिहणे अवघड नाही, पण अनेकांच गणित दहावी इयत्ता पास झाल्या बरोबरच थांबलेले असते त्यांना हा विषय अक्षरश: डोक्यावरुन जाईल!

   भारतात जवळजवळ ९५% ज्योतिषी क्षेत्र कुंडली वापरतात , म्हणजेच ते कळत नकळत ‘होम साईन हाऊस सिस्टीम’ वापरत असतात. बाकी भावचलित कुंडली वापरणार्‍या ५% ज्योतिषां मध्ये ४% ‘प्लॅसिडस’ सिस्टीम वापरतात (जे के.पी. मध्ये वापरली जाते) १ % ज्तोतिषी ‘श्रीपती प्रणित भावसाधन ‘ पद्धती वापरतात.

   मी फक्त ‘होरारी (प्रश्नकुंडली)’ साठी भावचलित वापरतो कारण तिथे इंटर मिजिएट कस्प (भाव) यांचा खास विचार करावा लागतो. पूर्वी मी ‘प्लॅसीडस’ पद्दत जास्त वापरत असे , सध्या मी ‘रेजीओमोन्टॅनस’ ही पद्दत मोठ्या प्रमाणात वापरत आहे, कोश पद्धतीची मी चाचणी घेत आहे , कदाचीत आगामी काळात मी त्यावर जास्त भाष्य करु शकेन. बाकी अन्य कामासाठी ‘होल साईन हाऊस’ म्हणजेच आपली नेहमीची ठोकळा कुंडलीच वापरतो. सध्या जास्त प्रचलित असलेल्या पद्दती मध्ये : होल साईन हाऊसेस , इक्वल हाऊसेस, प्लॅसिडस, रेजीओमोंटॅनस.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.