4 फेब्रुवारी 2013, संध्याकाळचे पाच वाजत आले होते , मी मुकेसभाईंची अपॉईंटमेंट आवरण्याच्या प्रयत्नात होतो पण त्याचे आपले संपतच नव्हते –

“ते मागच्या टैमाला तू आमच्या गंगापूर रोड चा जागेचा बोलला ना ते 100% बराबर आला, साला आपुन काय काय नाय केला पन लास्टला तू म्हनाले तेच झ्याला , आजचे सवाल चे तू सांगीतला ते पन साला असाच बराबर येयाला पायजे हा”

“मुकेसभाई ज्योतिषात गॅरंटी नसते”

‘गारंटी नाय मागते , तु सांगते तेचा वर आपला भरोसा , ए सुहास भाय, मी ते लास्ट टायमाला माजा कझीन जिग्नेस चा प्रोब्लेम बोल्ला होता, तू तेचा कायपन सांगीतला नाय”

‘मुकेसभाई  जिग्नेशलाच ईथे यायला सांग ना, त्याचा प्रश्न आहे त्यालाच त्याचे उत्तर सांगतो,बरोबर ना?”

“जिग्नेस कवा पन येनार , बोल , कंदी आनू तेला तुझ्याकडे?”

मुकेसभाईने दिलेल्या कोर्‍या करकरीत , गुलाबी ‘गांधीबाबांना’ ड्रॉवर मध्ये ठेवत मी म्हणालो;

“मुकेसभाई, कधीही आण त्याला, ऑफिस आपलेच आहे असे समजायचे, पण आत्ता मला दुसरी अपॉईंट्मेंट आहे ना तेव्हा…”

“हा हा ते पन बराबर छे . आपले ध्येनामंदी रायले नाय बग, चलते आता , पुना येते नेक्स्ट विक मंदी, जय श्रीकृस्न “

“जय श्रीकृष्ण”

आता पुढची पाच वाजताची नेहा ची अपॉईंटमेंट. खरेतर नेहाचे काम फोन / ईमेल मार्फत सुद्धा होऊ शकले असते पण तीला प्रत्यक्षच भेटायचे होते आणि त्यासाठी जादाचे मानधन द्यायची तीची तयारीही होती (मी प्रत्यक्ष भेटीसाठी जादा मानधन घेतो).

“सर, मी नेहा, आजची पाच वाजताची अपॉईंटमेंट होती माझी, सॉरी हं, थोडा उशीर झालाय मला, त्याचे काय झाले मी निघाले होते वेळेत पण …”

नेहा ला मध्येच थांबवत मी म्हणालो

“काही हरकत नाही नेहा, दहा मिनिटांचा उशीर म्हणजे फार नाही, पण आता जास्त वेळ न घालवता आपण तुझ्या प्रश्नाबद्दल बोलुयात नाही का?”

“हो तेही खरेच की आधीच मी उशीर केलाय त्यात आता अवांतर बोलण्यात वेळ नको जायला”
“That’s like a good girl!”

नेहाचा प्रश्न होता “लग्न कधी होणार ?” या ना त्या कारणाने उशीर होत गेला वयाची तीशी ओलांडली होती, आता काळजी वाटणे साहजीकच होते.

कधी होईल नेहाचे लग्न ?
के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड!

कसे ते पुढे वाचा…..

“नेहा, काळजी करू नको, देवाने तुझ्या नवर्‍याला तुझ्या आधीच जन्माला घातलाय, आता फक्त तुझी आणि त्याची गाठ कधी पडणार हेच आपल्याला बघायचे आहे”

नेहाने तीची जन्मपत्रिका आणली होती, पण लग्न कधी ठरेल, नोकरी कधी लागेल, बदली कधी होईल यासारखे तत्कालीन प्रश्न सोडवायला प्रश्न कुंडलीच जास्त उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे.

जन्मपत्रिके बाबत एक मोठी समस्या असते ती म्हणजे अचूक जन्मवेळेची! के.पी. ही ‘सब लॉर्ड थिअरी ‘ आहे त्यामुळे जन्मवेळेत अवघी २-४ मिनिटांची जरी चूक असली तरी सब लॉर्डस बदलतात व नरेंद्र मोदींचा अरविंद केजरीवाल होऊ शकतो. बहुतांश लोकांच्या जन्मवेळा +/- 5 पासुन ते +/- 30 मिनिटां पर्यंत मागेपुढे असु शकतात. यावर उपाय म्हणजे जन्मवेळेचे शुद्धीकरण. यासाठी मी जातकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या आधारे, सोलर आर्क, टरशरी प्रोग्रेशन्स, युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स असे मार्ग वापरतो, पण त्यात फार वेळ मोडतो. आजकाल जातकांना झटपट भविष्य हवे असते, तेही 100% अचूक , आणि वर हे सर्व फुकटात मिळावे ही माफक (?) अपेक्षाही असते !

आमच्यातल्याच काही ज्योतिर्विदांनी लोकांना ही फुकट ज्योतिषाची सवय लावून ठेवलीय. शंभर जातकातला एखादाच पैशाच्या बाबतीत ‘अडलेला नडलेला’ असतो, बाकी सर्व नक्कीच शे-पाचशे खर्च  करु शकतात नव्हे ते ईतर गोष्टीं वर याहूनही जास्त खर्च हसतहसत करत असतातच  (पेट्रोल, परस्युम, पिझा, मल्टीप्लेक्स, ईंटरनेट , Talk Time / SMS Packs ई.). भटारखान्यात तयार झालेली डिश तुमच्या समोर आणून ठेवणे या पलीकडे कोणतीही खास सेवा न देणार्‍या हॉटेलामधल्या वेटरला 50/100 ची टीप सहजपणे दिली जाते, मात्र एका दहा-पंधरा वर्षाचा व्यासंग असलेल्या आणि प्रामाणीकपणे अभ्यास करुन , तास दोन तास मेहनत करुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार्‍या ज्योतिर्विदाला त्याचे योग्य ते मानधन देताना मात्र हात आखडतो,तोंड वाकडे होते , हे बघितले की मनस्वी चीड येते. ते जाऊदे.

के. पी. साठी जन्मपत्रिके पेक्षा प्रश्न कुंडली हाच खात्रीचा मार्ग आहे असे माझे मत बनले आहे. कारण प्रश्नकुंडलीची वेळ आपण स्वत: ठरवु शकतो. मी बरेचसे प्रश्न प्रश्नकुंडलीच्या आधारानेच सोडवतो. अनेक जुन्या जाणकार के. पी. अभ्यासकांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या याचाच पुरस्कार केला आहे.

प्रथम मी नेहा शी थोडे बोलून, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून  तीच्या मनावरचा ताणतणाव जरा हलका केला, ही पायरी महत्त्वाची असते, त्यामुळे जातकाच्या मनाला थोडी उभारी येते, प्रश्न विचारण्यासाठी जे स्थिर मन लागते ते तयार होते.

नेहाला अगदी थोडक्यात प्रश्न कुंडली म्हणजे काय ते सांगून तीला मनात घोळणार्‍या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून, एक नंबर जो, 1 ते 249 मध्ये असेल असा द्यायला सांगितला.

नेहाने ने क्षणार्धात नंबर सांगीतला “11”

हया ‘11’ नंबर वर आधारित जी प्रश्न कुंडली बनली ती शेजारी छापली आहे.

 

प्रश्न कुंडली चा डेटा:
होरारी नंबर: 11 (/249)
वेळ: 17:30:57
दिनांक: 04 फेब्रुवारी 2013
स्थळ: नाशिक
अयनांश: कृष्णमूर्ती 23 :56:59
संगणक आज्ञावली : KPStar One

प्रश्न कुंडली तयार होताच सर्वात प्रथम बघायचा ते चंद्र कोणत्या घरात आहे, कोणाच्या नक्षत्रात आहे कारण त्यावरून जातकाच्या मनात काय घोळते आहे प्रश्नाचा रोख बरोबर आहे का ते कळते. नेहाचा प्रश्न आहे ‘लग्न कधी होईल? त्यासाठी के. पी. मध्ये 3 महत्त्वाची स्थाने आहेत:

2:   कुटुंबात वाढ
7:   वैवाहीक जीवनातला जोडीदार
11: जातकाची इच्छापूर्ती
(हे 11 हे इच्छापूर्तीचे स्थान असल्याने सर्वच प्रश्नांना शेपटासारखे जोडावेच लागते) यापैकी सप्तम स्थान (7) हे प्रिंसीपल हाऊस मानले जाते.

चला आता आपण नेहाच्या प्रश्न कुंडलीत चंद्र काय दर्शवतो ते पाहू.

(इथुन पुढे ग्रहाचे अथवा भावाचे कार्येशत्व लिहताना ते :

A grade  /  B grade  /  C grade  / D grade अशा पद्धतीने लिहीले आहे,  त्यामुळे कार्येश ग्रह कोणते ते तर कळतेच पण त्यातले प्रथम दर्जाचे कोण हे पण लगेच लक्षात येते‌.)

हा चंद्र सप्तमात (7), चंद्र चतुर्थेश (4), शनीच्या नक्षत्रात, शनी सप्तमातच (7), दशमेश (10) व लाभेश (11) म्हणजे चंद्र:

7 / 7 / 10, 11 / 4 या भावांचा म्हणजे विवाहा साठीच्या महत्त्वाच्या सप्तम (7) व लाभ (11) या दोन्ही भावांचा कार्येश आहे. प्रश्नाचा रोख ‘विवाह योग कधी’ हा आहे हे चंद्राच्या कार्येशत्वाने जणू सिद्धच केले आहे. ही कुंडली आपल्याला नेहाच्या नवर्‍या पर्यंत पोहोचवणार. चंद्र स्पष्टपणे सांगतोय की नेहाचा प्रश्न जेन्युइन आहे, मनापासून, कळकळीने विचारला आहे.

जर चंद्र भलतीच कोणती स्थाने दाखवत असेल तर? असे होते बर्‍याच वेळा, जातकाच्या मनात वेगळेच काही तरी घोळत असते, प्रश्न दुसराच कोणता तरी विचारलेला असतो, चंद्र हा गोंधळ दाखवतोच. अशा वेळी प्रश्नाचे उत्तर देऊ नये, जातकाला काही वेळा नंतर, मनातले इतर विचार बाजूला करून, फक्त समोरच्या पश्नावरच मन केंद्रित करायला सांगून त्याच्या कडून दुसरा नंबर घ्यावा.

आता पुढचा टप्पा, विवाह योग आहे का ? याचे उत्तर सप्तमाचा (7) सब लॉर्ड देणार कारण विवाह विषयक प्रश्नांना सप्तम स्थान (7) हा प्रमुख ( प्रिन्सिपल हाउस ) भाव आहे.

या टप्प्यावर आपल्याला दोन गोष्टीं तपासायच्या असतात:

सर्वप्रथम बघायचे ते हे की हा सब लॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा.तो स्वत: वक्री असला तरी चालेल. जर हा सब लॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही. विवाहाचा प्रश्न असेल तर  ‘विवाह योग नाही’. पण याचा अर्थ विवाह कधीच होणार नाही असा नाही, प्रश्नकुंडली साधारणपणे एक –दीड वर्षा पर्यंतच्या कालावधीसाठी उपयुक्त असल्याने याचा अर्थ असा घ्यायचा की नजिकच्या काळात ‘विवाहयोग ‘नाही, पण त्या पुढच्या काळात तो योग असेलही. उत्तर जर याच टप्प्यावर नकारार्थी आले तर मग केस ईथेच बंद करावी, पुढचे विष्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.

दुसरा तपासणीचा मुद्दा, हा सब प्रश्ना सदर्भातल्या भावसमुहातल्या एकातरी भावाचा कार्येश असातलाच हव. या केस मध्ये प्रश्न विवाहासंदर्भात असल्याने, सप्तमाचा सब विवाहा साठीच्या भावसमुहातल्या 2, 7, 11 यापैकी एका तरी भावाचा कार्येश असायलाच पाहीजे. त्यातही 7 किंवा 2 व्या स्थानाचा, कारण 11 हे स्थान हे इच्छापूर्तीचे, प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात इतरही अनेक इच्छा असू शकतात. तेव्हा प्रश्न विवाहा चा असल्याने 7 व 2 हीच स्थाने प्रामुख्याने बघावी. अपवादात्मक परीस्थीतीत 5 व 8 या स्थानांचा ही विचार करावा लागतो. हा सब जर 2, 7, 11 यापैकी एकाही भावाचा कार्येश नसेल तर प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे असे समजावे, म्हणजेच नजिकच्या काळात तरी प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही (पुढे कदाचित घडूही शकेल). असे झाल्यास केस ईथेच बंद करावी, पुढचे विष्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.

नेहाच्या प्रश्नकुंडलीतला सप्तमाचा (7) सब शुक्र असून तो रवी च्या नक्षत्रात आहे, रवी कधीच वक्री असत नाही. आता हया शुक्राचे कार्येशत्व बघुया.

शुक्र दशमात (10) असून धनेश (2) व सप्तमेश (7) आहे, शुक्र रवी च्या नक्षत्रात असून , रवी दशमात (10) व पंचमेश (5). म्हणजेच शुक्राचे कार्येशत्व 10 / 10/ 5 / 2 ,7 असे आहे.

शुक्र 2,7,5 या स्थानंचा कार्येश होत असल्याने सप्तमाच्या सब चा होकार आहे असे समजायला काहीच हरकत नाही.

पहिला टप्पा पार पडला पण सप्तमाच्या सब चा होकार म्हणजे विवाह नक्की असे काही नाही, त्यासाठी पुढे येणार्‍या दशा, अंतर्दशा, विदशा या अनुकूल असायला हव्यात , वयाच्या 70 व्या वर्षी विवाह योग्य दशा येणार असेल तर त्याचा काय उपयोग!

प्रश्नाच्या वेळी कुंडलीत शनी महादशा चालू होती ती 13 मे 2031 पर्यंत आहे. आता शनी महाराज नेहाचे लग्न जमवणार का ते पाहू.

शनी सप्तमात (7), दशमेश (10) व लाभेश (11), शनी राहू च्या नक्षत्रात, राहू सप्तमात (7) , म्हणजे शनी 7 / 7 / — / 10,11 चा कार्येश, त्यातही सप्तमचा (7) चा बलवान कार्येश आणखी काय पाहिजे, लग्ना साठी शनी अनुकूल आहे. पण शनीचा सब लॉर्ड पण बघितला पाहिजे, तोही विवाहासाठी अनुकूल पाहीजे, शनीचा सब आहे शुक्र. आपण शुक्राचे कार्येशत्व पाहीले आहेच ,ते 10 / 10 / 5 / 2,7 असे आहे, म्हणजेच शनीच्या सब ची पण काही तक्रार नाही.शनी महाराज नेहाला बोहोल्यावर उभी करणार असे दिसते !

पण शनी महादशा तर 13 मे 2031 पर्यंत चालणार आहे , आपल्याला तर महिना, आणि शक्य झाला तर दिवस ठरवायचाय, म्हणजे, अंतर्दशा,विदशा, सूक्ष्म दशा बघणे ओघाने आलेच.

शनीच्या दशेत सध्या शनीचीच अंतर्दशा चालू आहे ती 16 मे 2015 पर्यंत, शनी सप्तमाचा अत्यंत बलवान कार्येश असल्याने , शनीच्याच अंतर्दशेचा आपण सर्वप्रथम विचार करु. कारण एखाद्या ग्रहाच्या महादशेतली त्याच ग्रहाची अंतर्दशा नेहमीच जास्त फलदायी असते.

शनीच्या अंतर्दशेतल्या विदशा अशा आहेत.

बुध: 7 एप्रिल 2013 पर्यंत.
केतू: 10 जून 2013 पर्यंत.
शुक्र: 10 डिसेंबर 2013 पर्यंत.
रवी: 3 फेब्रुवारी 2014 पर्यंत.
चंद्र: 6 मे 2014 पर्यंत.
मंगळ: 9 जुलै 2014 पर्यंत.
राहू: 20 डिसेंबर 2014 पर्यंत.
गुरु: 16 मे 2015 पर्यंत.

प्रश्नकुंडलीचा आवाका वर्ष-दिड वर्ष एव्हढाच असतो , त्याहूनी जास्त कालावधीसाठी प्रश्नकुंडलीचा वापर टाळावा. त्यामुळेच मी बुध, केतू, शुक्र,रवी व चंद्र याच अंतर्दशांचा विचार करायचा आणि मंगळ, राहू व गुरु या विदशांचा विचार अगदि शेवटचा उपाय म्हणून करायचा असे ठरवले.

शनी सप्तमाचा (7) चा बलवान कार्येश आहे व लाभाचा (11) चा क्षीण कार्येश आहे, आता आपल्याला विदशा अशी पाहीजे जी द्वीतीय (2) स्थानाची बलवान कार्येश असावी आणि त्याचा बरोबर ती विवाहासाठीच्या विरोधी भावांची म्हणजेच षष्ठ (6), दशम (10) आणि लग्न (1) यांची बलवान कार्येश नसावी.

आपल काम सोपे व्हावे म्हणून आपण 2 , 11 , 6, 10 ,1 यांचे कार्येश ग्रह कोणते ते पाहून घेऊयात.

या पायरीवर मी आपल्याला के.पी. मधला एक अत्यंत महत्वाचा नियम सांगणार आहे, कृपया त्याच्या कडे लक्ष द्यावे.

कुंडली तयार होताच ज्या भावात कोणताही ग्रह नाही असे भाव व ज्या ग्रहांच्या नक्षत्रात कोणी ग्रह नाही असे ग्रह यांची ताबडतोब दखल घ्या. ते ग्रह व भाव काळजीपूर्वक तपासा. ही अत्यंत महत्वाची पायरी आहे. विसरु नका. याचे कारण म्हणजे एक अत्यंत महत्वाचा नियम:

एखाद्या भावात कोणताही ग्रह नसेल आणि भावाधिपतीच्या नक्षत्रात ही कोणी ग्रह नसेल तर भावाधिपती जो एरवी त्या भावाचा ‘ड’ दर्जाचा कार्येश असतो तो आता एकमेव बलवान कार्येश होतो अशा वेळी त्या भावाधिपती ग्रहाच्या उपनक्षत्रातले ग्रह त्या भावाचे कार्येश होतात व त्यांचा दर्जा हा भावाधिपती पेक्षाही वरचा असतो.

द्वीतीय (2) स्थाना कडे जरा लक्ष द्या:
या स्थानात एकही ग्रह नाही, भावाधिपती शुक्र आहे त्याच्या ही नक्षत्रांत एकही ग्रह नाही म्हणजे भावाधिपती शुक्र हा द्वीतीय स्थानाचा एकमेव कार्येश होतो.
मघाचा नियम आता वापरायला लागणार , तेव्हा शुक्र कोणाचा सब आहे ते बघायचे (म्हणजेच कोणता ग्रह शुक्राच्या सब मध्ये आहे ) पण ईथे रवी, बुध, शुक्र, शनी,राहू या सार्‍यांचा सब शुक्र आहे , याचा अर्थ रवी, बुध, शुक्र, शनी,राहू हे सर्व द्वीतीय स्थानाचे कार्येश होणार इतकेच नव्हे तर शुक्र जो भावाधिपती म्हणून द्वीतीय स्थानाचा कार्येश आहे त्याच्या ही वरच्या दर्जाचे कार्येश होणार.
द्वीतीय स्थान: —/ —- / रवी, बुध, शुक्र, शनी,राहू / शुक्र.

लाभ स्थान: लाभात बुध व मंगळ आहेत, बुधाच्या नक्षत्रांत ग्रह नाहीत, बुध मंगळाच्या नक्षत्रात आहे, लाभेश शनी आहे ,शनीच्या नक्षत्रांत चंद्र आहे. म्हणजे लाभाचे (11) कार्येश बुध / बुध,मंगळ / चंद्र / शनी असे आहेत.

षष्ठ्म स्थान : या स्थानात एकही ग्रह नाही,भावाधिपती बुध आहे त्याच्या ही नक्षत्रांत एकही ग्रह नाही म्हणजे बुध हा षष्ठ्म स्थानाचा एकमेव कार्येश होतो. मघाचा नियम आता वापरायला लागणार , तेव्हा बुध कोणाचा सब आहे ते बघायचे (म्हणजेच कोणता ग्रह बुधाच्या सब मध्ये आहे ) पण ईथे तर एक ही ग्रह बुधच्या सब मध्ये नाही आता काय करायचे अशा वेळी सब सब पातळी वर तपासायचे म्हणजे कोणता ग्रह बुधाच्या सब सब मध्ये आहे ते तपासायचे. चंद्राचा सब सब बुध आहे , म्हणजेच चंद्र बुधाच्या सब सब मध्ये आहे. याचा अर्थ चंद्र षष्ठ्म स्थानाचा कार्येश होणार इतकेच नव्हे तर बुध जो भावाधिपती म्हणून षष्ठ्म स्थानाचा कार्येश आहे त्याच्या ही वरच्या दर्जाचा कार्येश होणार.
षष्ठ्म स्थान:  —/ —- / चंद्र/ बुध.

दशम स्थान: दशमात शुक्र व रवी आहेत, शुक्राच्या नक्षत्रात ग्रह नाहीत, रवी च्या नक्षत्रात शुक्र व केतू आहेत, दशमेश शनी आहे , त्याच्या नक्षत्रांत चंद्र आहे, म्हणजे दशमाचे (10) कार्येश ग्रह होतात: शुक्र,केतू / शुक्र,रवी / चंद्र / शनी.

आता लग्नाचे कार्येश ग्रह पाहू या: लग्नात केतू व गुरु आहेत, केतूच्या नक्षत्रात ग्रह नाहीत, गुरु च्या नक्षत्रात राहू आहे, लग्नेश मंगळ आहे , त्याच्या नक्षत्रांत बुध आहे, म्हणजे लग्नाचे (1) कार्येश ग्रह होतात: राहू / केतू, गुरु / बुध / मंगळ.

प्रश्नकुंडलीत सध्या बुधाची विदशा चालू आहे, त्याचे कार्येशत्व असे आहे: बुध लाभात (11), त्रितीयेश (3) , षष्ठेश (6), बुध मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ लाभात (11),लग्नेश (1) व अष्टमेश (8). शिवाय आपण बघितले आहे की बुध हा विषेषाधिकाराने लग्नाचा बलवान कार्येश झालेला आहे. बुध काही विवाहाला अनुकूल नाही (8,6,1).

पुढची विदशा केतू ची. केतूचे कार्येशत्व असे आहे: केतू लग्नात (1), केतू रवीच्या नक्षत्रात, रवी दशमात (10) व पंचमेश (5), केतू वर शनीची दृष्टी आहे, शनी 7 / 7 / — / 10,11 चा कार्येश, केतू शनीच्या माध्यमातून सप्तमाचा (7) चा बलवान कार्येश होत असला तरी त्याचे स्थानगत(1) व नक्षत्रगत (10) कार्येशत्व काही विवाहाला अनुकूल वाटले नाही, त्यातच द्वीतीय (2) स्थाना चे कार्येशत्व नाहीच. म्हणून केतू ची विदशा सोडावी लागेल.

पुढची विदशा शुक्राची, शुक्राचे कार्येशत्व आपण आधीच बघीतले आहे, 10 / 10 / 5 / 2 ,7. शुक्र रवी च्या युतीत आहे म्हणजे रवी ज्या भावांचा कार्येश त्या सर्व भावांचा शुक्र ही कार्येश होणार. रवी दशमात (10) व पंचमेश (5), रवी चंद्राच्या नक्षत्रात , चंद्र सप्तमात (7) व सुखेश (4). आपण बघीतले आहे , रवी विषेषाधिकाराने द्वीतीय स्थानाचा बलवान कार्येश झालेला आहे. 2, 7 / 10 / 4 / 5 म्हणजे शुक्राची विदशा विवाहाला  अनुकूल आहे , पण आता सगळे तपासतोच आहे तर पुढच्याही सर्व विदशां एकदा बघून घेऊ . ही माझी नेहमीची पद्धत आहे, हयात थोडा जास्त वेळ जातो पण असे केल्याने आपली पूर्ण खात्री होते, म्हणतात ना ‘Leave no stone unturned’.

जर इतर कोणतीही विदशा अनुकूल दिसली नाही तर शुक्राची विद्शा नक्की करु असा विचार करुन मी पुढच्या विदशा तपासायला सुरवात केली.

पुढची विदशा रवीची, रवी कार्येशत्व आपण बघीतले आहे ते 2, 7 / 10 / 4 / 5 रवी शुक्राच्या युतीत आहे म्हणजे शुक्र ज्या भावांचा कार्येश त्या सर्व भावांचा रवी ही कार्येश होणार. रवीची  विदशा पण विवाहाला अनुकूल आहे.

पुढची विदशा चंद्राची, चंद्र सप्तमात (7) व सुखेश (4), चंद्र शनीच्या नक्षत्रात , शनी सप्तमात (7), दशमेश (10) व लाभेश (11). आपण बघीतले आहे ,चंद्र षष्ठम स्थानाचा बलवान कार्येश आहे, म्हणजे चंद्र दशम (10) वा षष्ठमचा (6) या विरोधी स्थानांचा बलवान कार्येश आहे. 7,10, 6 / 7 / 10,11 / 4 . शिवाय तो आपल्याला हव्या असलेल्या द्वीतीय (2) स्थानाचा कार्येश नाहीच. चंद्राची ही विदशा विवाहाला फारशी अनुकूल नाही.

पुढच्या मंगळ, राहू व गुरु च्या विदशांचा सध्या विचार करायचा नसल्याने , आपण ईथेच थांबूया.

आपल्या अपेक्षित कालावधी (वर्ष-दिड वर्ष ) मध्ये शुक्र , रवी ,चंद्र बसू शकतात त्यापैकी चंद्राच्या विदशेचा विचार करता येणार नाही. त्यामुळे शुक्र व रवी या दोनच विदशा उरतात, यातली एक निवडायची आहे. शुक्र व रवी तसे तुल्यबळच ,दोघेही युतीत आहेत म्हणजे कार्येशत्व सारखेच, त्यांचे सब ही एकच म्हणजे शुक्र!

शुक्र विवाहासाठीचा कारक ग्रह म्हणून त्याला प्राधांन्य द्यावे असा एक विचार मनात आला पण स्त्री जातकांच्या बाबतीत रवी व मंगळ हे विवाहासाठी जास्त महत्वाचे.

रुलींग प्लॅनेट्स अशा वेळी मदतीस येतात , बरेच ज्योतिर्विद अशा परिस्थीतीत रुलींग मधल्या बलवान ग्रहाची निवड करतात. पण का कोणास ठाऊक मला मात्र या रुलिंग प्लॅनेट्स ची मदत मिळत नाही. याबाबतीत माझा एक अनुभव सांगतो:

मी जेव्हा प्रश्नकुंडली वापरतो तेव्हा जातकाची जन्मकुंडलीही तपासतो , जर जातकाचे जन्मलग्न व प्रश्नकुंडलीतले प्रश्नलग्न एकच असेल किवा जातकचे जन्मचंद्र नक्षत्र व प्रश्नकुंडलीतले चंद्र नक्षत्र एकच असेल तर रुलिंग प्लॅनेट्स ची मदत हमखास यशस्वी ठरते.

या प्रश्नाच्या बाबतीत तसे काही जुळून आले नाही म्हणून मी रुलिंग प्लॅनेट्स ची मदत घ्यायची नाही असे ठरवले.

त्यामुळे मी सरळ ट्रान्सीट्स तपासायचे ठरवले.

आपली दशा अंतर्दशा विदशा साखळी ही : शनी – शनी – शुक्र किंवा शनी – शनी – रवी अशी असू शकते. विदशांचा कालावधी बघितला तर आपल्याला रवीचे गोचर भ्रमण पाहायला लागेल. आपल्याला रवी चे भ्रमण असे पाहिजे:

 • शनीची रास शुक्राचे नक्षत्र
 • शनीची रास रवीचे नक्षत्र
 • रवीची रास शनीचे नक्षत्र
 • शुक्राची रास शनीचे नक्षत्र

आपला अपेक्षित कालावधी आहे: (शुक्र व रवी विदशा एकत्रित कालावधी) 10 जून 2013 ते 3 फेब्रुवारी 2014या कालावधीत रवी,  मिथुन (बुध),कर्क (चंद्र) , सिंह (रवी), कन्या (बुध), तुळ (शुक्र) , वृश्चिक (मंगळ), धनु (गुरु), मकर (शनी) असे भ्रमण करणार आहे.मिथुन , कर्क , कन्या, वृश्चीक व गुरु च्या राशींचा विचार करता येणार नाही. रवीच्या सिंहेत शनीचे नक्षत्र नाही. शुक्राच्या तुळेत शनीचे नक्षत्र नाही. म्हणजे फक्त शनीची मकर रास उरली. मकरेत रवी, चंद्र व मंगळाची नक्षत्रें आहेत. म्हणजे फक्त शनी –रवी अशीच साखळी पूर्ण होऊ शकते. शुक्र विदशा का रवी विदशा याचा निकाल आता स्पष्ट आहे.रवी विदशा आहे 10 डिसेंबर 2013 ते 3 फेब्रुवारी 2014. रवी शनीच्या मकरेत, रवीच्या नक्षत्रात 15 जानेवारी ते 21 जानेवारी या काळात असतो. हा कालावधी आपल्या रवी च्या विदशे शी जुळतो आहे. आता विवाहाचा प्रश्न असल्याने कालनिर्णय देताना काही महत्वाच्या गोष्टींकडे ही लक्ष दिले पाहीजे , उदा: शुक्राचा अस्त असताना विवाह करत नाहीत. या केस मध्येही शुक्राचा अस्त 8 जानेवारी ते 14 जानेवारी असा आहे हे मी बघीतले होतेच.आपले काम झाले, 15 जानेवारी 2014 ते 21 जानेवारी 2014 या कालावधीत नेहाचा विवाह योग आहे. सुक्ष्मदशांचा विचार केला तर आणखी सुक्ष्म कालावधी सांगता येईल. पण मला त्याची आवश्यकता वाटली नाही.
“नेहा, हया 2013 मध्ये मध्ये काही जमेल असे दिसत नाही, तुला जरा जास्त प्रतिक्षा करायला लागेल, साधारण पणे 15 जानेवारी 2014 ते 21 जानेवारी 2014 या कालावधीत तुझ्या विवाह होण्याचे चांगले योग आहेत”

एक वर्षा नंतरचा कालावधी सांगीतल्यामुळे नेहा जरा निराश झाली पण लगेच स्वत:ला सावरुन घेत म्हणाली :

“ठीक आहे , इतकी वर्षे थांबलेय, त्यात अजून एका वर्षाची भर , पण हे तरी नक्की का ? कारण आजवर मी ईतक्या ज्योतिषांना भेटलेय , त्यांची भाकितं जर खरी ठरली असती तर एव्हाना माझी चार पाच लग्नं व्हायला हवी होती”
“नेहा अशी गॅरंटी कोणीच देणार नाही, देता पण येणार नाही, तुझ्या प्रश्नकुंडलीच्या अभ्यासातून मला जे काही दिसले ते मी तुला सांगीतले, कर्ता करवता तो परमेश्वर आहे, प्रयत्न करणे एव्हढेच आपल्या हातात असते”

marriage2त्यानंतर नेहा भेटायला आली ती जानेवारी 2014 मध्येच, तीच्या चेहेर्‍यावरची खुषीच सांगत होती की ती आली आहे विवाहाचे आमंत्रण द्यायला!
“काय मग झाले ना मनासारखे ? केव्हाची तारीख आहे?”
“21 जानेवारी 2014, सर तुमचे कोणत्या शब्दात आभार मानू तेच कळत नाही”

नेहाला अशा शुभेच्छा देताना म्हणालो …

“‘नांदा सौख्यभरे”‘

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. शरयु अड़कर

  अतिशय समर्पक विश्लेषण
  सुरेख मार्गदर्शन

  0
 2. Mrs. Tanuja Phatak

  Sir, mi KP chi vidyarthini ahe. एखाद्या भावात कोणताही ग्रह नसेल आणि भावाधिपतीच्या नक्षत्रात ही कोणी ग्रह नसेल तर भावाधिपती जो एरवी त्या भावाचा ‘ड’ दर्जाचा कार्येश असतो तो आता एकमेव बलवान कार्येश होतो अशा वेळी त्या भावाधिपती ग्रहाच्या उपनक्षत्रातले ग्रह त्या भावाचे कार्येश होतात व त्यांचा दर्जा हा भावाधिपती पेक्षाही वरचा असतो.Ha niyam mala aaj navyane kalala.

  Dhanyawad,

  Mrs. Tanuja Phatak

  0
  1. सुहास गोखले

   सौ. तनुजाजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपण उल्लेख केलेल्या नियमाचा पडताळा येतो , हा नियम श्री. सुरेश शहासनेंनी त्यांच्या पुस्तकांतूण मांडला आहे , मलाही त्र्या नियमाचा पडताळा आला म्हणून मी हे तो स्विकारला. हा नियम वापरताना काही वेळ अशी स्थिती येते की भावात ग्रह नाहीत, भावाधिपतीच्या नक्षत्रात ग्रह नाहीत, इतकेच काय भावाधिपतीच्या उपनक्षत्रात पण ग्रह नाहीत अशा वेळी भावाधिपतीच्या उप-उप नक्षत्रातील ग्रह त्या भावाचे प्रथम दर्जाचे कार्येश होतात ! काही वेळा उप-उप-उप नक्षत्र पात्ळीवर ही जावे लागते पण अशी स्थिती फार क्वचित येते.

   या ब्लॉग वर अनेकअत्यंत विस्तृत , सखोल अशा केस स्ट्डीज आहेत ज्या तुम्हाला इतर कोणत्याही ब्लॉग, वेबसाईट्स, मासीकें , पुस्तके (मराठी , हिंदी, इंग्रजी) यात सापडणार नाहीत. त्यांचा अभ्यास केल्यात लाभ होईल. फक्त के.पी. एके के.पी. करत बसू नका , इतर ही चांगल्या पद्धती आहेत काही वेळा त्यांचाही करणे वापर आवश्यक असतो. म्हणूनच मी काही केस स्ट्डीज मध्ये वेस्टर्न होरारी, कंसलटेशन चार्ट्स पण वापरले आहेत , ते कसे ते पण पाहून घ्या.

   शुभेच्छा !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.