पाव्हणं, हे ‘नब्बे याने की ९०’ आणि ‘आपली वो वाली 90’ यकदम वायले वायले बर्का , गोंधळ करून घ्येऊ नक्का. तसे आपल्याला दोन्ही ‘नब्बे’ सारखेच (ये हुई ना बात!),  पण बसणार्‍याचा उगाच (गोड) गैरसमज होवू नये म्हणून आधीच खुलासा टाकून ठ्येवलेला बरा. मला म्हैतैय या खुलाश्याने काही जणांची सपशेल घोर निराशा होणार आहे, आणि ही मंडली कोण आहेत हे पण ठावे आहे मला, उगां इथे पब्लिक मध्ये नावें कशाला घ्यायची म्हणतो मी ? पण काय करणार बाब्बा, डायबेटीस चा विषय आहे ना!

(त्या दुसर्‍या 90 साठी नंतर कधी तरी बसू , मग तर झाले? )

हां , तर मी काय म्हणत होतो? नब्बे (९०) वाले बाबा !

आता तुम्ही म्हणाल हे आणखी काय खुळ ? खुळ च म्हणायचे ना.

त्याचे झाले असे….

(फ्लॅश ब्यॅक  सुरू ..)

२००८ साली आम्हाला ‘मधुमेहा’ ची दिक्षा मिळाली एकदाची, मी चक्क एक ‘साधक’ बनलो, तो देखील येकदम २५०+ शुगर वाला फर्स्ट क्लास, पहूँचा हुवा साधक (२५० क्लब का काय म्हणतात तस्ला) , आपलं कामच असे भारी असतेय म्हाराजा, असे किरकोळीत १००/१५० मध्ये खेळत नाय आपण. साधक झालो आणि मला उगाचच मोठी पांढरी दाढी फुटल्याचा भास झाला, पण मी पडलो असा ‘धब्ब गोरा’ त्याला पांढरी दाढी कशी काय सुट होणार? थोडा तरी कॉन्ट्रास्ट पाहिजे की नै , तेव्हा मेंहेंदी लावून जराशी रेडीश यल्लो झाक आणली तर यकदम ऑथेंटीक दिसणार, आता मला सिल्कची कफनी घालायला लागणार , पायात सागवानी लाकडाच्या इंपोर्टेड खडावा येणार, हातात फायबर चा कमंडलू (त्यात दडवलेली 90! जास्त नै) … या  नुसत्या कल्पनेनेच मला गुदगुल्या झाल्या! (90 घेतल्यावर काय होईल ?) .

तर मी हा असा डॉक्टर गुर्जीं समोर बसलेलो, अदबीने हात बित ज्योडलेले , चेहेर्‍यावर वर यकदम अलका कुबल टाईप भाव … हे डॉक्टर गुर्जीं ते ‘लागण’ वाले नाय काय, लागण वाल्या डॉक्टरांनी त्यांना डायबेटीस ची पॉवर नाय का लायसन नाय असे काही म्हणत मला या दुसर्‍या पावरबाज डॉक्टर स्वामींच्या पायावर घालून आपले हात झटकून मोकळे झाले , डांबिस ! म्हणून तर मी या आश्रमात पोहोचलो, स्वामी मधुमेहानंद म्हणे!

“म्हाराज, आता माझे कसे होणार”

“बालका, काळजी करून नकोस, आज मधुमेहाची दिक्षा ग्रहण करून तू पावन झाला आहेस”

“म्हणजे नेमके काय झाले , म्हणून समजायचे दादानु ?”

त्यावर डॉक्टर गुर्जीं  प्रेम चोपडा टाईप हसल्ये ..

‘वत्सा, उठ, मुक्त हो, आता तुझा प्रवास ‘साखरे कडून निर्वाणा कडे सुरु झाला आहे असे समज’

डॉक्टर गुर्जीं आणि बरेच काय बाय बोलत होते पण मी बधीर झालो होतो.

भानावर आल्यावर विचार केला चालतयं की ! असे नै तर तसे,  कोठून तरी का होईना ‘निर्वाण’ भेटल्याशी मतलब! नै तरी ‘जॅझ’ आणि ‘ब्लूज’ संगीत ऐकायच्या नादाने का होईना मी एकेकाळी ‘ओशो’ आश्रमाच्या अनेक चकरा मारल्या होत्याच (चांगला अनुभव होता तो!) तेव्हा ओशोंचे “ xxx तून समाधी कडे’ हे  तत्वज्ञान मला परिचित होतेच, ह्ये तसलेच काय तर द्येवाचे आसल बाबा अशी मी स्वत:ची समजून घालून घेतली.

पण हे साधक बनणे वाटले होते तितके सोप्पे नव्हते म्हाराजा. दिक्षा दिल्या बरोबर गुर्जींनी मला त्यांच्या अशिटण गुर्जी कडे म्हणजेच गुरुविणी कडे जायचा आदेश दिला, माँ आहारतज्ञ म्हणे , तेव्हा गुर्जी त्ये छद्मी का काय म्हणतात ना तसे ‘हसलं’, आता ते तसे का हे मी जेव्हा त्या गुरुविणी समोर हुभा राहीलो तेव्हा कळले. चांगली खात्या पित्या घरची ही गुरविण मारक्या म्हशी सारखे माझ्या कडे बघत म्हणाली …

‘कोण?’

“पेशंट”

“ते म्हैतैय , नाव काय”

मी एका दमात नाव , गाव , पत्ता, वय , वजन , कमरेचे माप, फोन नंबर , चष्माच्या नंबर , गाडीचा नंबर , लायसन नंबर , आई बाप जित्ते की मयत , रात्री पूर्व पश्चीम झोपतो का उत्तर दक्षीण, आठवड्यातून किती वेळा बसतो.  एच डी एफ सी चा इएमआय किती असतो,  प्रॉव्हिडंट फंड किती कट होतो , माझ्या घरच्या पाळलेल्या मांजराचे नाव, घरी टाटा स्काई चे कोणते पॅकेज आहे, माझी कमोड वरची सुप्रभात कशी होते, फोन मधले सिम कार्ड कोणत्या खंपणीचे आहे, माझ्या जन्मपत्रिकेत मंगळ कोणत्या राशीत कोणत्या स्थानात आहे सग्ळ सग्ळ धाडधाड सांगून टाकले. नंतर कटकट नको , ह्ये रायले , ते सांगीटले नाय असे व्हायला नक्को.

त्याच्या त्या मारक्या म्हशी वर ठिम्म परिणाम झाला नाही

‘बसा”

घाबरत घाबरत गुरुविणी समोरच्या खुर्चीवर कसाबसा टेकलो ,  काय करणार,  मारक्या म्हशीचा काय भरोसा ?

‘व्हेज की नॉन व्हेज?‘

व्वा , गुरुमाऊली , आश्रम असावा तर असा ! मला वाटले आता मला पाटावर बशीवत्यात आणि गोडाधोडाचे खाऊ घालूनच घरी पाठवतात की काय. पण कस्ले काय , घरी चापून गाजराचा हलवा खाऊन आलेल्या त्या गुरुविणीने माझ्या मात्र तोंडचा घास काढून घ्येतला हो, ह्ये खायच नाय आणि त्ये खायचे नाय चा पाढा असा काही लांबला की शेवटी कडेलोट झाला हो,  मग माझा ही  णाविलाज झाला, माझ्यातला एकारांत ,कोकणस्थ, चित्पावन जागा झाला…

‘माऊली, त्ये विष खाल्ले तर डायबेटीसला चालंतय का?’

त्या नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा कोथळा जसा घरात नाही घरा बाहेर नाही , जमिनीवर नाही की आकाशात नाही, सकाळी नाही की रात्री नाही, अशी सारी समीकरण साधून बाहेर काहाडला ना तस्से माझ्या कडून काहीतरी झाले असणार.

त्या गुरविणीने एक भेसूर , भीषण किंचाळी मारली इतकेच मला अस्पष्ट असे आठवतेय , क्लिनिकच्या बाहेर मी कसा काय आलो हे मला अजून न उलगडलेले कोडे आहे !

घरात काही वेगळ ‘शीण’ नव्हता..

त्या गुरविणिने दिलेला डायट चार्ट चक्क ल्यॅमीनेट करुन भिंताडावर डकवण्यात आला होता. जेवणाची वेळ झाली ,

‘घ्या तुमच्या त्या डायटीशीयन लिहून दिलेय त्या प्रमाणे डिश लावलीय’

बघतो तर काय डिश मध्ये कडबा कुट्टी सारखा दिसणारा पाला पाचोळा नीट रचून ठेवला होता! साला ती डायटेशीयन नामक मारकी म्हैस स्वत: मालपुवा खाणार आणि आम्हाला कडबा कुट्टी लिहून देते! सोबत एक उंच ग्लास ! (टॉल ग्लास , वळखीचा!) बायकोने मंडी मध्ये दिसला तो सगळा पालापाचोळा होलसेल मध्ये उचलून घरी आणला होता आणि तो मिक्सर मधून काहाडून एक अस्सल जातिवंत गरगट्या बनवला होता ..

‘घ्या टेस्टी स्मूदी बनवलाय … ‘

‘या गरगट्याला स्मूदी म्हणायच?’

‘स्मूदीच आहे हा, डायबेटीस स्पेश्यल ‘

‘मला तर हे आंबोण वाटते!’

‘स्मूदी म्हणा नाहीतर आंबोण, जे दिलेय ते गिळा मुकाट्याने’

मला दोन शिंगे आणि एक शेपूट आहे असे उगाचच वाटायला लागले.

घरी बाकी सगळे केशर, काजू युक्त साखर भाताचा आस्वाद घ्येत होते आणि मला स्पेश्यल म्हणुन केलेली कोंड्याची भाकरी ,

‘खा, भरपूर फायबर असतात यात!’

नाही म्हणायला शेवटी आणखी एक ग्लास पुढे केला गेला, कसले तरी पांढरे द्रव्य होते त्यात , मला वाटले थोडी तरी बूज राखली रे राखली, निदान मसाला दूध तरी भ्येटले पण कसचे काय, ते होते मलई काहाडलेले पात्तळ पुळकावणी ताक , ह्यालाच आता बासुंदी समजा असा वरतुन दिलेला सल्ला!

चार सहा दिवस हा अत्याचार मी सहन केला शेवटी एकदा रात्री गुपचुप तो गुरुविणिचा चार्ट मी फाडून फेकून दिला

काय पथ्य्य नाय कि फिथ्य नाय

पण झाले भलतेच (ब्यॅक फायर का काय म्हणतात ना तस्ले!) चार्ट समोर नाही म्हणून घरच्यांनी त्यांच्या कल्पनेने काय वाट्तेल ते माझ्या पूढ्यात ठेवायला सुरवात केली, साला त्या गुरविणिचा चार्ट बरा म्हणायचा निदान पानातले पदार्थ ओळखायला तरी येत होते !

…. (फ्लॅश ब्यॅक  संपला)

पुढची माझी सारी कहाणी अशीच वेदनामय आहे, सासूचा मार खाणारी  ‘अलका कुबल’ बरी म्हणायची अशी माझी अवस्था दिवसेंदिवस होत राहीली, माझ्या जगण्याला काही अर्थच उरला, निराशेच्या खोल गर्तेत मी सापडलो, आरशात पाहताना माझी मलाच लाज वाटायला लागली, माझे घरचे लोक, शेजारी पाजारी, मित्र , ऑफीस मधले सहकारी सारे माझी नफरत करू लागले. मला मेल्याहून मेल्या सारखे झाले. काय करू / कसे करु हे मला सुचेनासे झाले. कोठूनही आशेचा किरण दिसत नव्हता, माझ्या जीवनातली सारी खुषी , सारा आनंद संपला होता. असे दु:ख्खी कष्टी जीवन जगण्या पेक्षा ते संपवावेच असे विचार माझ्या मनात दाटून यायला लागले.. ..

…. आणि एके दिवशी मला ‘जॉन’ भेटला…

ओळखीचे वाटते ना हे .. टीव्ही वरच्या ‘नजर रक्षा कवच ‘ किंवा ‘शक्ती / स्फुर्ती / जोम देणार्‍या मुसली स्ट्रॉग गोळ्या’  टाईप जाहीराती सारखे ! सगळे अगदी कान टवकारुन बसले ना?

पण नाय हो, असा ‘जॉन’ वगैरे कोणी मला नाय भ्येटला … तेव्हढे आपले नशिब नाय हो!

दिक्षा मिळाल्या नंतर मी सुरवातीचे दहा रोज गुरविणी ने सांगीतलेले सारे पथ्थ्य पाळले देखील पण नंतर त्या काडबाकुट्टीचा मला इतका कंटाळा आली की बस्स, पथ्यपाणी खुंटीला टांगले गेले , व्यायाम म्हणजे डाव्या कुशी वरून उजव्या कुशीवर वळताना होतो तेव्हढाच. बाकी जिलेबी आणि पेढ्याचा खुराक चोरुन मारुन का होईना चालू होताच. नाही म्हणायला डॉक्टर गुर्जीं ने सांगीतलेला ‘मेट्फॉर्मिन’ नामक पादरा पावटा रोज घेत राहीलो आणि डॉक्टर गुर्जींनींच गळ्यात मारलेला ग्लुकोमीटर वापरुन शुगर टेस्ट करत होती , एक वेडी आशा होती की डॉक्टर गुर्जीं चे  निदान चुकीचे ठरेल , फॉल्स पॉझीटीव्ह ठरेल पण कसचे काय. शुगर बाई जी दोनशेच्या भोंज्याला शिवून बसली होती ती काही खाली उतरायचे नाव घेईना.

आता औषधांचे डोस वाढत चालले, एकाच्या जोडीला आणखी दोन औषधींचा मारा तूफानी मारा चालू झाला.

मग काय माझ्या शुगर बाई आता रोलर कोस्टर मध्ये बसून फिरायला लागली, आणि मग एक वेगळाच ख्येळ सुरू झाला …

(फ्लॅश ब्यॅक सुरू …)

 

ओ मैंने देखा जब तुझे मीटर के थ्रु

कभी फिफ्टी फाइव्ह कभी तिनसो तीस

उस दिन से हुवा ये खेल शुरु

कभी फिफ्टी फाइव्ह कभी तिनसो तीस

जाओ जाओ जल्दी डॉक्टर को बुलाव

ओय नब्ज दिखाओ मेरा हाल बतावो

क्यू दिल करता है धक धक मेरे यार

कुछ और नही ये प्यार का बुखार…

क्यू आँख मेरी धुँधली हो गयी यार

कुछ और नही ये प्यार का बुखार…

क्यू काँप रहा ये बदन मेरे यार

कुछ और नही ये प्यार का बुखार…

क्यू मूड मेरा बदले बार बार

कुछ और नही ये प्यार का बुखार…

क्यू पसीने की लग गयी धार

कुछ और नही ये प्यार का बुखार…

क्यू होश मेरा उड जाने लगा

कुछ और नही ये प्यार का बुखार…

साल्या, ये प्यार की बुखार नाय , हायपोग्लायसेमिया झालाय तुला !

….

(फ्लॅश ब्यॅक संपला..)

तर एक ‘साधक’ म्हणून माझा असा (?) प्रवास सुरू झाला तो आजही चालूच आहे. सुरवातीला मी नियमीत त्या डॉक्टर गुर्जी म्हंजे स्वामी मधुमेहानंदांच्या आश्रमात भक्तीभावाने चकरा मारत रायलो, दक्षीणा देत रायलो , मात्र त्या गुरविणीचे तोंड देखील पायले नाही. त्या गुरविणीची मी इतकी दहशत घेतली आहे म्हणून सांगू , आजही कोठे गाजराचा हलवा बघितला की त्यात त्या मारक्या म्हशीचा चेहेरा दिसतो मला .. हंबा ss !   ..

एव्हाना मी मधुमेह ग्रस्त झाल्याची बातमी वार्‍या सारखी पसरली होती. अग्दी आजच्या सारखी ‘वायरल’ झाली होती म्हणा. आणि मग काय एका पेक्षा एक खात्रीच्या जालीम नुस्क्यांच्या भडीमार सुरु झाला. मी पण वेड्या सराखे , आस्स , करून बघतो , हाय काय आन नाय काय म्हणत जे जे सागत्याल ते करत गेलो.

माझ्या आईला दहा वर्षे मधुमेह होता आणि मला स्वत:ला 10 वर्षे आहे म्हणजे एकंदर 20 वर्षाचा मधुमेहाचा अनुभव!

या काळात काय नाही बघितले , सर्व उपचार पद्धती, नुस्के, जटी बुट्टी, 7 दिवसात / 3 दिवसात मधुमेह बरा करतो, इतकेच नव्हे तर एका रात्रीत मधुमेह बरा करतो इथेपर्यत दावे करणारे पाहीलेत , सुरवातीला असे नुस्के करून पण पाहीले आहेत , त्यात काही दम नाही हे लौकरच लक्षात आले त्यानंतर मात्र असे काही सुचवले गेले की फक्त त्या कडे बघून हसतो.

मी मधुमेह या विषयावर इतके वाचले आहे , इतके प्रयोग स्वत: वर केले आहेत की माझे डॉक्टर विनोदाने म्हणतात ” अहो , गोखले , माझ्या पेक्षा तुम्हालाच मधुमेहाची जास्त माहीती आहे !”

हा मधुमेह तेव्हापासून जो काही जळवे सारखा मला चिकटला तो आज पण घट्ट चिकटून आहे पण मी त्या अस्वलाला चांगली वेसण घालून ठेवलाय , साधारण ज्याला मधुमेह होतो ती व्यक्ती तोंडाने घ्यायच्या औषधाने सुरवात करून काही वर्षात एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगारा सारखी स्वत:ला (गोड्ड गोड्ड) इन्शुलिन चे ‘टुच्च ‘ (आई ग !) करुन घ्यायला लागलेली असते!  पण मी अजूनही तोंडाने घेण्याच्या औषधाच्या अत्यल्प मात्रेवरच आहे , ‘टूच्च ‘ करुन घेण्याची वेळ आली नाही हा मी माझा मोठा विजय मानतो.

अथक परिश्रम करून , कमालीच्या चिकाटीने आणि पूर्ण शास्त्रीय पद्धतीने मी माझी शुगर एका हेल्दी – नॉन डायबेटीक व्यक्ती ची जशी असते त्या पातळी वर आणली आणि सातत्याने टिकवून ठेवली आहे. मेटफॉॉर्मिन चा लहानसा डोस वगळता मी घेत असलेली मधुमेहा वरची सर्व औषधे बंद झाली आहेत (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार )

माझी साधना इतकी वाढली, इतकी वाढली की एके दिवशी मीच स्वामी बनलो म्हणाना .. नाही म्हणजे मी तसे मानत नाही पण लोक्स कसे चावट असतात बघा, तेच मला ‘नब्बे (९०) वाले बाबा’ म्हणायला लागले त्याला मी तरी काय करणार?

आता तुम्ही म्हणाल, ह्ये नब्बे (९०) वाले बाबा असे नाव कसे काय घेतले ? घेतोय कसले असेच पडले नाव! यातले नब्बे याने की 90 म्हणजे माझी शुगर आता नेहमीच  90 असते ! याला म्हणतात ‘कंट्रोल’ ! आणि असा शुगर कंट्रोल ठेवण्याचा चमत्कार चिमित्कार करून दाखवला म्हणून नब्बे (९०) वाले बाबा ! काही खवचट असतात ते वेगळ्याच 90 वरुन माझे नाव पडले असे म्हणतात, म्हणू देत , त्याला काय करणार. तसे आपल्याला दोन्ही 90 सारख्याच , कर लो हिसाब !

 

आज अगदी  ‘नब्बे 90 वाले बाबा’  बनलो तरी साला ह्या साखरेचे काय करायचे हे उमगत नाय. खोटे कशाला बोला.

‘याद जिलेबी की आयें … ये दुख सहा नही जायें’

….

आज मी असा ‘नब्बे 90 वाले बाबा’  म्हणून प्रसिद्ध झाल्याने मी कोठेही गेलो की लोकांना वास लागतो आणि मधुमेहावर प्रवचन सुरु होते आमचे.

पण खरे सांगू , लोक्स ना या ‘नब्बे 90 वाले बाबा’  चे  लेक्चर नको  असतो , त्यांना हवा असतो झटपट , जादूई , रामबाण ,अक्सीर , जालीम , एका रात्रीत मधुमेह बरा करणारा नुस्का , बस्स्स! यांना डायट चा सल्ला नको आहे,. यांना व्यायामाचा सल्ला नको आहे , यांना हवा आहे तो फक्त ‘झटपट , आर्म चेअर कंफर्ट नुस्का’ ! त्याला काय करणार ?
आणि माझ्या कडे असला काही ‘नुस्का’ नाय हे कळल्यावर “ ह्ये कसले बाबा, यांच्यात काय पावर नाय ..” असे म्हणत पांगापांग होते !

असो ,  कोणाची ऐकायची तैयारी असल्यास आज ही हा ‘नब्बे 90 वाले बाबा’  लेक्चर द्यायला हुभा आहेच (नाही तरी या बाबाला दुसरा उद्योग कसला आहे म्हणा !)

आता ह्या प्रवचनां तले काही मौलिक (?) माहिती आपल्याला सांगतो.. पण आत्ता लफ्गीच नाय, जरा टायम सापडेल तसे … नाही तरी लोक्स ना असे खुंटीला टांगून ठेवायची सवय हायेच माझी.. त्याला आता कय करणार ?

भेटू पुढच्या लेखात ..

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.