मराठी चित्रपट संगीताच्या इतीहासातले हे एक अप्रतिम गीत!
बाबुजी (श्री सुधीर फडके) यांच्या काही अप्रतिम गाण्यां पैकी एक! बाबुजींनी फार सुंदर सुरावट दिली आहे या गाण्याला. गाणे बाबुजींनी सोबत आशाताईंनी गायलेले आहे.
पडद्यावर श्री विक्रम गोखले आणि पद्मा चव्हाण यांच्यावर हे गाणे चित्रीत झाले आहे. अर्थात १९७३ सालातला चित्रपट असल्याने निर्मिती मुल्ये यथातथाच आहेत. १९७३ साली सुद्धा जरा बर्यापैकी क्यॅमेरा उपलब्ध होऊ नये याचे वैषम्य वाटते! एकाच क्यॅमेर्यावर कसे तरी दळभद्री शुटींग उरकल्याने या नितांत सुदर प्रणय गीताचे वाट्टोळे झाले आहे. गाण्यात हळूवार प्रेमांची आंदोलने सतारीच्या साथीने गिरक्या घेत आहेत आणि क्यॅमेर्यावर उगाचच लाँग शॉट लावून ठेवलाय! एका शॉट मध्ये तर कॅमेर्याचा अॅगल असा काही चुकला आहे की त्या शॉट मध्ये पद्माताईंचे डोके फ्रेम मध्ये आलेच नाही , नुसती साडी आणि पाय! यक्क !
चित्रीकरणाची ही गत मग गाण्याच्या रेकॉर्डींग कडून वेगळी अपेक्षा कसली धरायची? स्टीरिओफोनीक वगैर नावे एकली तरी निर्मात्याचे डोळे पांढरे होत असतील त्या काळी.
बाकी या गाण्यात म्हणजे ध्वनी मुद्रणात एक चूक राहीली आहे, बाबुजीं सारख्यांच्या ही चूक लक्षात आली नसेल का? पण बहुदा दुसरा टेक घेण्या ईतके बजेटच नसेल त्याला बाबुजी तरी काय करणार म्हणा!
गाण्याची सुरवात होते सुरेख बासरी च्या लकेरीने या लकेरीला फार उंच न जाऊ देताच सुरु होणारा सतारीचा नियंत्रित टप्पा खालच्या पट्टीवर येऊन स्थिरावतो आणि गाण्याचा मूड अचूक पकडतो! पुढच्याच बार वर बासरी आपली राहीलेला भाग पूर्ण करते आणि सतार आणि बासरी एक लडीवाळ गिरकी घेत सुरेखपणे समेवर येतात इथेच रिदम सेक्शन (म्हणजे फक्त तबला!) चालू होतो.
बाबुजींचा मुखडा
धुंद एकांत हा, प्रीत आकारली ,
सहज मी छेडिता तार झंकारली,
आपल्या गाण्यांतून हमखास डोकावणारा जरा जादाचा लडीवाळ दाखवत बाबुजींनी ‘एकांत’ शब्द जरा लांबवला आहे असाच प्रकार पुढे ‘झंकारली’ मध्ये ‘का’ लांबवून केला आहे. (आणि या दोन्ही शब्दांवर लिप सिंक करताना श्री विक्रम गोखलेंना जाम कसरत करावी लागली ते व्हीडीओत सहजी दिसुन येते!)
‘सहज मी छेडिता तार झंकारली, पुन्हा एकदा घेऊन (झंकारली लांबवत ) बाबुजी थांबतात या दोन ओळी बाबुजी दोन वेळा घेतात आणि पाठोपाठ आशाताईंचा मधाळ स्वर गाण्याचा कब्जा घेतो ,
जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडिता तार झंकारली..
सुरवात जरासा निश्वास टाकल्या सारखे ‘जाण नाही मला’ ने होते पण नंतर ‘प्रीत आकारली ‘ मध्ये तोल सांभाळला गेला आहे पुढे ‘सहज तू छेडिता तार झंकारली’.. मधली ‘छेडीता’ आणि ‘झंकारली’ वरची नजाकत खास आशाताई ट्रेडमार्क !
बाबुजींच्या झंकारली आणि आशाताईंच्या झंकारली मधला फरक जाणवण्या सारखा आहे.
या ओपनिंग नंतर पुन्हा एकादा बासरी आणि सतारीचा सुरेख इंटरल्युड आहे, यातला पहीला भाग बासरीचा आहे (स्वर किंचित हलले आहेत, चालयचेच!) आणि दुसरा भाग सतारीच्या ताब्यात आहे (मी जी चूक झाली आहे असे म्हणतो ती चूक या सतारीच्या भागात आहे !) हा इंटरल्युड पण काहीशा वरच्या पट्टीत आणि जलद घेतला आहे पण कोठेही खटकत नाही.
पहीले कडव्याची सुरवात बाबुजी करतात,
गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी…
यातल्या ‘गंधवेडी’ नंतर एक कातील कॉर्ड सतारीवर आहे, पॉईंट टु बी नोटेड मिलॉर्ड ! बाबुजी हेे’ गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी ‘ दुसर्यांदा म्हणतात तेव्हा मात्र गंधवेडी नंतर कॉर्ड ऐवजी पूर्ण तुकडा सतारीवर आहे, देखणा आणि चपखल! नंतरच्या ‘यौवनाने तिला आज शृंगारली’ मधला ‘शृंगारली’ चा उच्चार फक्त बाबुजीच करु जाणे !
(बाबुजी ‘ गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी ‘ दुसर्यांदा म्हणतात हे फक्त व्हीडीओत आहे , ऑडीओ ट्रॅक मध्ये याची कत्तल केली आहे. का? )
पहील्या आणि दुसर्या कडव्या मधे पुन्हा एकादा बासरी आणि सतारीचा इंटरल्युड आहे , हा इंटरल्युड आधीचाच आहे फक्त बासरी आणि सतारीनी जागा बदलल्या आहेत. पहिल्या पेक्षा हा इंटरल्युड जास्त सुखावह आहे!
दुसरे कडवे संपूर्ण आशाताईंचे
गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली
आणि आशाताईंनी त्याला चोख न्याय दिला आहे.
या गाण्याचे तिसरे कडवे व्हीडीओ वर उपलब्ध नाही हे दुर्दैव …
बाकी गाण्यातल्या शब्दांबद्दल काय लिहावे? नाना (श्री जगदीश खेबुडकर) काही वेळा असेच अवचित सुंदर काव्य लिहून जात त्यातल्या मोजक्या काव्यां पैकी हे एक!
धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडिता तार झंकारली
जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडिता तार झंकारलीगंधवेडी कुणी, लाजरी, बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला आज शृंगारलीगोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारलीरोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता रात्र अंधारलीआज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडिता, तार झंकारली
चित्रपट – अनोळखी
वर्ष : १९७३
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले , सुधीर फडके
शेवटच्या कडव्यातले:
“आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडिता, तार झंकारली”
अप्रतिम ! दुर्दैवाने हे कडवे या व्हीडीओ मध्ये नाही !
माझा मुलगा मला नेहमी टोचत अस्तो “बाबा, कोणतेही गाणे तुम्ही सरळ का ऐकत नाही , इतके बारीक सारीक कशाला बघत / ऐकत बसता?” पण काय करणार परमेश्वराने ‘गोल्डन ईयर’ का काय म्हणतात ती जोडी दिली आहे, जित्याची खोड…
ह्या सगळ्या तांत्रिक उणीवां बाजूला ठेवून या अविट गोडीच्या गाण्याचा आनंद घ्यायला काय हरकत आहे ?
या गाण्याचे तिसरे कडवे व्हीडीओ मध्ये नाही, म्हणून संपूर्ण गाणे ऑडीओ मध्ये पण देत आहे , कारण ते कातील “आज बाहुत या, लाज आधारली , सहज तू छेडिता, तार झंकारली” ऐकण्या साठी , त्या पाठोपाठ व्हीडीओ
या गाण्याची ऑडीओ आणि प्रत्यक्ष चित्रपटातले गाणे यात फरक आहे. मी वरती लिहला आहे तो ओपनिंग पीस ऑडीओत नाही, गाणे सुरु होते ‘चुक वाल्या’ इंटरल्युड ने आणि बाजुजींचा आणि आशाताईंच्या मुखड्याचा भागा नंतर तोच ‘चुक वाला’ इंटरल्युड पीस रिपीट केला आहे , हे खटकते !
व्हिडीओ सौजन्य : यु ट्युब www.youtube.com
व्हिडीओ होस्तींग : व्हीमीओ www.vimeo.com
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
बापरे! केवढे बारीक निरीक्षण!
तुमची संगीताची जाण, तंत्रज्ञानाची माहिती, आणि बारकावे अचूकपणे टिपण्याची वृत्ती खरंच वाखाणण्याजोगी आहे.
धन्यवाद श्री. प्राणेशजी,
संगीताची आवड मला अनुवंशिकतेने मिळाली आहे , माझे आजोबा उत्तम गात असत. माझा आवाज गाण्या योग्य नसला तरी काही वर्षे शास्त्रिय संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण (कै) पं. अरविंद गजेंद्रगडकरां कडे घेतले आहे. गाण्यातले बारीक सारीक बारकावे टीपणे (काही वेळा चुका हुडकणे!) हा प्र्कार ‘गोल्डन इयर’ या प्रकाराने मिळतो तो मला जन्मत:च मिळालेला आहे .
मी संगीत, अभिजात साहीत्य, अॅन्टिक्स हे छंद मोठ्या कष्टाने आणि चिकाटीने जोपासले आहेत.
सुहास गोखले