‘मधुबाला सुंदर की आकर्षक ? ‘
आता हा काही चर्चेचा विषय आहे का? पण एकदा झाली हो चर्चा दणक्यात एका मराठी संकेतस्थळा वर !

जुनी गोष्ट आहे , मला नेमके आठवत नाही हे कुठे वाचले होते पण त्यातली काही मजेदार वाक्ये मात्र चांगलीच लक्षात राहीली होती. स्मरणशक्तीला जरा ताण देऊन आणि उरलेल्या जागा मी माझ्या कल्पनेतून भरुन काढल्या आहेत. लिखाणातला ९०% भाग माझ्या कल्पनेतून आलेला आहे , अगदी थोडा भाग, त्या अज्ञात मराठी संकेत स्थळा वरील झालेल्या चर्चेतून घेतलेला आहे.

त्या संकेत स्थळाचे आणि पोष्ट्स लिहणार्‍या सर्व लेखकांचे आभार आणि त्यांची काही वाक्ये (सगळी नाही ) / वाक्यांश इथे मोड्तोड करुन वापरल्या बद्दल माफी !

निखळ विनोद म्हणून घ्यायचे हे सगळे, बर्का !

मधुबाला सुंदर कि आकर्षक ?

“मधुबाला , मार डाला ..”

“मुद्द्याचे बोला..”

“सौदर्याची म्हणून एक व्याख्या असते पण आकर्षकपणासाठी  काही निकष पुरेसे असतात”

“म्हणजे एकच ना?”

“नाही, सुंदर व्यक्ती आकर्षक असेलच असे नाही”

“जरा समजेल असे बोला ना राव , उदाहरणें द्या प्रत्येक गटातली”

“ही काय शाळा वाटली का?”

“आता  का  ‘शे.घा.’, नाही देता येत उदाहरणे तर मग गप्प बसा, उगाच फुसकुल्या का सोडताय”

“मला ही असेच म्हणायचेय..”

“म्हणजे ‘फुसकुल्यां’ बद्दल म्हणायचे आहे का ?”

“नाही ग कमळें, काही माणसें सुंदर नसतात पण आकर्षक दिसतात असे म्हणायचे होते मला”

“तुमचे आपले काही तरीच..”

“ए कमळे , ते  ‘सुंदर..आकर्षक इ.’  तुला उद्देशून  नव्हते, मधुबाले साठी होते ते स्टेट्मेंट”

“मधुबाला सुंदरही नव्हती आणि आकर्षक ही नव्हती..”

“पांड्या कालची उतरली नै का अजुन”

“मन्या , माझे पिणे काढायची ही जागा नाही , मी तुझ्या गांजा बद्दल कधी असे ओप्पन मध्ये लिहतो का?”

“तुम्ही काही पण लिहा हो, मधुबाला चांगलीच.. सुंदर का आकर्षक ते तुम्ही ठरवत बसा, आम्हाला ग्वॉडच वाटते ती”

“म्हणजे वाद संपलाच म्हणायचा”

“वाद कसला संपतोय, तुम्ही त्या मन्याला बोलण्यावर जाऊ नका, त्याला काहीही ग्वॉड वाटते, हा शूर्पणखे बरोबर सुद्धा डेट ला जाईल”

“अस्सं , मग तुझा त्या हिडिंबे बरोबरचा सेल्फी व्हायरल झालाय त्याचे काय?”

“गोंद्या…”

मॉडरेटर:

सभासदांनी वैयक्तीक पातळीवर जाऊन लिखाण करु नये अशी सक्त ताकीद देण्यात येत आहे आणि हे असेच चालू राहील्यास हा ‘धागा’ नाईलाजाने बंद करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.

“पाहीलतं, मॉडरेट्र गुर्जी खवळले..”

“खवळतील नै तर काय , चर्चेचा विषय काय , लोक्स बरळतात काय , शिस्त ही पाहीजेच”

“वाद संपला नाय काय , तसे पाहीले तर अजून सुरुच झाला नैयेय “

“मधुबाला ही काय वाद घायची वस्तू आहे का?”

“ ‘वस्तू’ ? नशीब ‘आयटम’ म्हणाला नाहीत!”

“काय फरक पडतो!”

“अरे त्याला ‘सबजेक्ट म्यॅटर’ म्हणायचे असेल, हो ना रे?”

“मला विचाराल तर मधुबाला सुंदर नव्हती फक्त आकर्षक होती”

“माझे याच्या बरोबर उलट मत आहे , ती सुंदर होती पण आकर्षक मुळीच नव्हती”

“हायला , हे कसे काय , सुंदर व्यक्ती आकर्षक नाही असे कसे काय असू शकते?”

“सुंदर व्यक्ती कडे फक्त सुंदर चेहेरा असतो. आकर्षक व्यक्ती कडे इतर बरेच काही”

“नै समजले राव!”

“आमी पूर्ण प्यॅकेजचा विचार करुन रायलो बे”

“ऑण्णा तुम्ही म्हणतायॅ तसे ऑसेल ही पॅण ऑम्हाला ती छॉनच वॉटते”

“भाऊ ते तोंडातले पान थुंकून या ना, मग बोलू आपण… “

“मॉडरेट्र गुर्जी वाचत असतील हा, जरा जपून “

“आपण फिरुन फिरुन पुन्हा भोपळे चौकातच येतोय, एकजण ‘ग्वॉड’ म्हणतोय , तुम्ही ‘छान’ म्हणताय, पण नक्की काय ? सुंदर का आकर्षक?”

“यातले कैच नव्हती ती बया, उगाच डोक्यावर बसवून ठेवलेय तिला.”

“तर काय , नुस्त्या थोबाडा वर कसले जाताय ,अभिनय यायला नको का?”

“अहो पण चर्चा सुंदर का आकर्षक अशी चालू आहे ना? मग अभिनयाचा मुद्दा येतोच कोठे?”

“पाव्हणं, ती शिणुमातली हिरवीण होती ना ? मग अभिनयाचे अंग पाहीजे की नै?”

“अभिनयाचे काय घेऊन बसलात , कोणतेच अंग नव्हते, कैच्या कै थोराड, पुरुषी दिसत होती, नजाकत म्हणून अशी काही नव्हतीच”

“मला ही तेच म्हणायचे आहे, वट्टात स्त्रीसुलभ असे काही तिच्यात नव्हतेच ..”

“गणप्या, मधुबाले बद्दल हे असे लिहणे हे पाप आहे , कुठे म्हणून फेडशील ही पापं ?”

“मधुबालेत स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव होता यावर जोरदार आक्षेप”

“नजाकत नसेलही, पण म्हणून अशी नजाकतेचा अभाव असलेली स्त्री आकर्षक नाही असे ठोस विधान कसे काय करता तुम्ही , काहीही असले तरी ती लक्ष देण्या इतपत तरी नक्कीच होती असे माझे ठाम मत आहे”

“द्या टाळी, हे वाक्य जरा बदलून मी असे म्हणेन की तथाकथित स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असलेली पण आकर्षक स्त्री लक्ष देण्या लायक निश्चितच असते”

“म्हणजे आधीच्या वाक्यातले नेमके काय बदलले तुम्ही”

“तुला नाही कळणार त्यातले”

“मी उत्तर दिले असते पण मग मॉडरेट्र गुर्जी पुन्हा खवळतील म्हणून गप्प बसतो”

“उत्तम, आपण गप्प बसलेलेच चांगले”

“ही उघडउघड गळचेपी आहे..”

“च्या मारी , आत्ता तुच स्वत: गप्प बसतो म्हणालास ना , मग कसली गळचेपी रे  ?”

“मला मधुबाला आवडते, तशी नव्या पिढीतली सोनाक्षी पण मस्तच आहे, काही तिला लठ्ठ म्हणतात.. म्हणू देत..”

“सहमत. मी म्हणतो ‘पाप्याचे पितर’ शोभेल अशी फिगर असण्या पेक्षा जरासे लठ्ठ असणे चांगलेच, शोभून ही दिसते ते काहींना..”

“लठ्ठ चालेल पण मठ्ठ असू नै”

“कमळे !”

“स्थूलपणाच्या मुद्द्याला +१००! ”

“हॅट.. आपल्याला नै पटत , माणसाने त्यातल्या त्यात हिरवीणींनी तरी अंगाबरोबरच राहीले पायजे , हिरो ला उचलता तर आली पाहीजे ना?”

“त्या हिरोची तुम्हाला का पडलीय, त्याला हिरवीणीला उचलण्याचे पैशे मिळतात ना ? मग करु दे जरा मेहेनत.”

“पण मी म्हणतो ..स्थूल असणे हा काही गुन्हा आहे का ? लठ्ठ असले तरी स्वत:ला व्यवस्थित सांभाळू शकते ना , मग झाले”

“काय झाले?”

“आंद्या… पचकलास का ? कोठे होतास इतका वेळ?”

“काही जणांची चणच मजबूत असते , ते दुहेरी हाडांची का काय म्हणतात तशी”

“तो काळ जरा स्थूल नायिकांचाच होता. चूभूदेघे
आ.न.
भा. पै.

“तर काय, उगाच कुथुन कुथुन झिरो फिगर करुन ठेवायची, शरीरावर अत्याचारच म्हणायचा हा”

“’करिना’ चा असा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष केलेला उल्लेख आम्हाला चालणार नाही. चर्चा मधुबाले वर चालली आहे ना?”

“+१”

“हा सरळसरळ स्थूल स्त्रियां मध्ये नजाकत नसते असा आरोप होतोय”

“मधुबाले वर या बाबतीत चर्चा होणे क्लेशकारक आहे, माझ्या हातात असते तर या मधुबाला हेटर्स च्या आयड्या ब्यॅन केल्या असत्या”

“दादा, तुमचे तोंड पक्षी की-बोर्ड कोण धरणार, मागच्या एका लता- सुमन कल्याणपूर चर्चेत तुम्ही सुमनताईंच्या बाजूने गळा काढला होता , आज मधुबाले बद्दल .. तिसरे महायुद्ध सुरु होणार असे दिसतंय”

“ज्जो, ये हुई ना बात, भाई तुम आगे बढो , हम लडाई देकने को उत्सुक हय “

“मधुबाले बद्दल बोलायचे तर नुस्ता चेहेरा बरा होता, बाकी आयताकृतीच होती म्हणायची”

“बिनबुडाची मधुबाला ! आय माय स्वारी, ती तशीच होती आयताकृती..
——————————————————————–
मी अव्या , आंतरजाला वरचा पडीक पुणेरी भामटा

“काहीही हं अव्या”

“+१ ”

“हे +१ कुणाला ‘बिनबुडाला’ की ‘काहीही हं ..’ ला?”

”[पिंट्याचे बाबा मोड ऑन] “अव्या तू गप्प बस.. ”[पिंट्याचे बाबा मोड ऑफ:]“

“आयताकृती ? ओ मिस्टर विदा द्या विदा आणि नुस्त्या बुडा वरुन आकर्षक पणा कसा काय ठरवता हो तुम्ही?”

“मला पण तेच म्हणावेसे वाटते, इथे चेहेर्‍यातील सौदर्यावर चर्चा चालू असताना बुडाचा मुद्दा उपस्थित करणे मला बिनबुडाचे वाटते”

“सौदर्य चौफेर असते, फक्त चेहेर्‍यापुरते मर्यादीत नसते”

“हे तर आमी आधीच सांगून टाकले ना बाप्पा, पूर्ण प्यॅकेजचा विचार करुन रायले पाह्यजे”

“छिक्क , पूर्ण प्यॅकेज चो विचार करुक तां काय पुरणपोली नाय”

“सौदर्याची व्याख्या फक्त चेहेर्‍या पुरती मर्यादीत ठेवण्याच्या वृत्तीचा जैर णिषेध”

“चेहेरा सोडून फक्त बुडातच सौदर्य स्थळें हुडकू पाहणार्‍या वृत्तीचा तिव्र निषेध असो”

“सहमत. फक्त बुडाकडे लक्ष देणे हे अज्ञानमूलक व स्त्रीद्वेष्टी ही आहे”

“यात कसला आला आहे स्त्रीद्वेष्टे पणा?”

“मंडळी, मुद्द्याला धरुन बोलाल का?”

“नै तर काय , चर्चेचा विषय काय , चर्चा कशावर चाललीय , एकूणातच सगळा बिनबुडाचा प्रकार आहे हा”

“पण ‘बुड’ हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही का?”

“’बुड’ हा मुद्दा असेल ही पण सांप्रत तो बिनबुडाचा आहे”

“म्हणजे मुळात बुड नव्हते हे तुम्हालाही मान्य झाले म्हणायचे तर! ब्राव्हो!”

“ओ मी असे कायसुदीक बोल्लो नव्हतो, उगा टाळ्या पीटू नका”

“निव्वळ स्वत:च्या विरोधाभक्ती साठी अशी अज्ञानमूलक विधाने केलेली वाचून बाकी मणोरञ्जण  चांगले होते आहे , चालू द्या ..”

“सौदर्याची आणि आकर्षकतेची व्याख्या प्रत्येक पिढीत बदलत असते , इतकेच नव्हे ती व्यक्ती गणिक बदलत असते.
—- वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशेसु सर्वदा ॥ —”

“मास्तर, देरीसे आये दुरुस्त आये..”

“मुळात ‘मधुबाला सुंदर आहे” हेच मुळी व्यक्ती सापेक्ष विधान आहे , त्याचे सरसकटीकरण करता येणार नाही,  मी तर पुढे जाऊन म्हणतो ‘फक्त मधुबालाच सुंदर’ असे म्हणणे म्हणजे मधुराभक्तीचे दुसरे टोक आहे.
—- वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशेसु सर्वदा ॥ —”

“मास्तर, डोक्यावरुन जातयं सग्ळे ..”

“झाले मास्तरांचे दळण सुरु झाले, बिच्चारी मधुबाला !”

” ‘दळण’ असेना का , पण मास्तरांच्या म्हणण्यात पॉईट आहे”

“कसला आलाय पॉईंट , फक्त उत्तरार्ध ठीक आहे पण पुर्वार्ध हा निव्वळ विरोध दाखवण्या साठी केलेला बिनबुडाचा सॉरी आयताकृती आरोप आहे”

“पांड्याची उतरली..”

“ए मॉडरेट्र गुर्जी हायेत हं आजूबाजूला”

“बाकी मास्तर आपले म्हणणे पटतयं मला, तसे पाहीले तर पुर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून खंप्लीट आयत बनतोय”

“घंटा.. मधुबालेबद्दल लिहताना स्त्री शरीराचे कोठेतरी वस्तूकरण करत नाही ना आपण?”

“वस्तू, मी नै म्हणालो, ते तो पांड्या म्हणाला होता.”

“तेच ते, पांड्या तुझी डुआयडी आहे हे सगळ्या आंतरजालाला माहीती आहे”

“कोणी का म्हणेना, पण वस्तूकरणाचा मुद्दा राहतोच ना?”

“पण मूळ मुद्दा ‘बुडाचा’ होता ना?”

“तो केव्हाच बिनबुडाचा ठरवला गेलाय इथे”

“कोणी ठरवला ? आमी नाय बॉ”

“पण मुळ चर्चा बुडावर नव्हतीच ना? मग हे बुड आले कोठून?”

“ते ह्या अव्याचे काम , याला सगळी कडे फक्त ‘बुडें’ (च) दिसतात!”

“असली तर दिसणार ना?
——————————————————————–
मी अव्या , आंतरजाला वरचा पडीक पुणेरी भामटा

“कहर आहे रे हा,  अरे या अव्याला आवरा रे कोणीतरी..”

“अर्रर , चर्चा भलतीकडेच घसरली म्हणायची… ही.मा.शे.पो.”

“म्हणजे पुढच्या पोष्ट्स आता डुआयडी मार्फत ना रे मन्या?”

“मंडळी  ‘बुड’  नसले तरी मधुबाले बद्दल बोलण्या सारखे बरेच काही आहे ना?
— वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशेसु सर्वदा ॥ —””

“मास्तर, याचा अर्थ ‘बुड’ नाही हे तुम्हाला मान्य दिसते,  पण साला, तुम्ही नेहमी प्रमाणे दोन्ही बाजूने बोलायला लागलात, तेव्हा पैला तुमचा पक्ष सपष्ट करा , मधुबालाच्या बाजुने की हाफोझीट पार्टी ?’

“मी कोणत्याच पार्टीचा नाही. मी सौदर्याचा उपासक आहे
—- वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशेसु सर्वदा ॥ —”

“बिनबुडाची उपासना कशी काय करता हो तुम्ही मास्तर?”

“अजुन ‘बुड’ गेले नाही म्हणायचे!”

“बिनबुडाचे बुड जाणार कसे?”

“मी शाप देतो, आमच्या मधुबाले बद्दल बिनबुडाचे लिवणार्‍यांचा कॉंम्प्युटर बंद पडो, मधुबाले बद्दल वंगाळ शब्द टाइप करणारी बोटे झडोत..”

“हो हो हो क्या बात की है ! ऐसी बोली जैसे बंदुक की गोली!”

“तरी म्हणालो , हा मधुबालेचा पंखा इतका गपगार कसा होता इतक्या वेळ”

“बाकी, स्त्री सुलभ नजाकत सोडून इतर मुद्द्यांशी मी सहमत आहे”

“मधुबाला सुंदर होती हे तरी मान्य आहे ना? मग ती आकर्षक नाही असे कसे काय म्हणू शकता आपण, जरा सोदाहर्ण सपस्ट करा की राव !”

“त्यात काय एव्हढे , जरा कान करा इकडे .. मला सॅन्ड्रा बुल्लोक आवडते”

“सॅन्ड्रा बुल्लोक ? अरे रत्ताळ्या , तुला पोकल बांबूचे फटके देयाला पाय्जेत”

“का रं , नरसाळ्या , सॅन्ड्रा बुल्लोक तुझी आज्जी लागते काय रे?”

“तुम्ही काहीही म्हणा, मधुबाला एक अभिनय शून्य, आयताकृती ठोकळाच होती. हे माझे मत अजूनही कायम आहे”

“गणप्या, तुझा तोल सुटत चाललाय ..”

“तसे कै नै रे , लोक्स ना डिवचण्या साठी म्हणतोय रे, मधुबाला म्हणले की लोक्सना जरा जास्तच उमाळें  फुटतात म्हणून जरा कुजकेपणा केला!”

“हे गेंड्या , तुला म्हैतैय का , मधुबाला आवडणे हे उच्च अभिरुचीचे लक्षण असल्याने, ती आयताकृती असली तरी चांगलीय म्हणावे लागते , कळ्ळं”

“बघा, बघा हा मला गेंडा म्हणाला, उद्या मधुबालेला जिराफ म्हणेल, तळपट होवो साल्या तुझे..”

“कस्ली हुच्च अभिरुची , उलट्पक्षी मधुबाला आवडते म्हणणे ‘टू कॉमन ‘ सदरात मोडते , जरा तिच्याबद्दल नाक मुरडून पाहा, लगेच अभिरुचीच्या वरच्या वर्गात पोहचाल तुम्ही, त्या मास्तरां सारखे… ऑ , मास्तर कोठे गेले म्हणायचे?”

“मास्तर ते त्या ‘जानी’ ला नेमका कितवा म्हैना चालू आहे ह्या चर्चेच गुंतले आहेत असे कळते..”

“अक्षी बरुबर, मला पण हेच म्हणायचे हय .. ‘वुडहाऊस’ च्या तुलनेत ‘पु.ल.’ किस झाड की पत्ती असे बोलून पाहा एकदा”

“जोडे पडतील..”

“स्वानुभव का?”

“बास्स, कटतो आता , नै तर मलाही जोडे पडतील, पण त्या बिनबुडाच्या मुद्द्याचे काय झाले शेवटी ( जाता जाता आपलाही थोडासा कुजकेपणा ..‌)”

“कठ्ठीण आहे सगळे, मधुबाला न आवडण्याची इतकी सारी कारणें असू शकतात?
—- वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशेसु सर्वदा ॥ —”

“मास्तर , आलात म्हणायचे , चर्चा आता इसबगोल चांगले की कायमचूर्ण प्रभावी यावर आली आहे”

चर्चा अशीच चालू राहीली…..

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ
कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ
छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ
आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.