मल्लिका-ए-तरन्नुम नुरजहॉं

 

(जिथे गाण्यांची नावे निळ्या अक्षरात आहेत त्याच  गाण्याच्या यु ट्यूब लिंक्स आहेत , क्लिक करा आणि त्या गाण्याचा आस्वाद घ्या !)

‘संगीत’ या सारखा भारदस्त शब्द वापरा किंवा साध्या सोप्या भाषेत ‘गाणे-बजावणे ‘ म्हणा, वट्टात ते जे काही असेल ते, मला त्याची फार आवड आहे.

एखाद्या सर्वभक्षी जनावरा सारखे (उपमा कै च्या कै आहे नै?) मी सगळ्या प्रकाराचे संगीत ऐकत असतो. ‘जॅझ’, ‘ब्लूज’, ‘पाश्चात्य शास्त्रीय संगीत’ आणि ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ असे चार भक्कम आधारस्तंभ हाताशी (का कानाशी!) असताना बाकी काही ऐकावे असे वाटतच नाही तरी देखील अधुन मधुन तोंडी लावण्यासाठी (का कानी लावण्यासाठी?) म्हणून का होईना हिंदी चित्रपट संगीत ही मी आवडीने ऐकतो. हिंदी चित्रपट संगीताचे एक बरे असते, तीन-चार  मिनिटांचे गाणे , मामला खतम. या अवघ्या तीन – चार मिनीटांत एखादी भावना उत्कटनेने श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवणे हे एक मोठे कसबच मानायला पाहीजे.

हिंदी सिनेमातल्या ज्या संगीताच्या बाबतीत मी बोलतो ते जास्त करुन १९४५ ते १९६५  (त्यातही १९५० ते १९६०) पर्यंतचा काळातले संगीत, हो, त्याच्या पलीकडे जाण्याचे धाडस माझ्यात नाही! या काळात निर्माण झालेल्या अवीट गोडीच्या गाण्यांना तोड नाही. असे असले तरी त्या काळातली सगळीच गाणी मला आवडतात असे नाही काही गाणी नाही आवडत. आता जी गाणी आवडतात त्यात नेमके असे काय असते म्हणून ती मला आवडतात हे सांगणे कठीण आहे,  कधी ओ.पी. च्या दिवाना हुवा बादल  ची अफलातून चाल अशीच आवडते तर कधी ‘आपके हसीन रुख’    मधली रफीची मधाळ गायकी सुखावून जाते तर आझाद मधल्या अपलप चपलम’ साठी अण्णा चितळकरांनी जुळवलेला सुंदर वाद्यमेळ मनात रुंजी घालतो!  काही गाणी त्यातल्या शब्दांसाठी आवडतात , शैलेंद्रची  ’सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है’ सारखी सरळ , साधी शब्द रचना जीवनाचे रहस्य किती सहजतेने उलगडून दाखवते! आणि शेवान रिझवी चे ते धारदार शब्द –   वक्त इंसान पे ऐसा भी कभी आता है, राह मे छोड के साया भी चला जाता है”  क्या बात हैं ! ‘

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गयॉ ‘सारखी काही गाणी मनात उत्साह, उमेद जागवतात, जगण्याचे तत्वज्ञान शिकवतात. ‘आनंद’ मधल्या कवी योगेश आणि सलिलदांची  ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ सारखी रचना त्या मुकेशने बेसुरा होत वाट लावलेली असली तरी सुद्धा ऐकावीशी वाटते ते त्यातल्या वेड्या हुरहुरी साठी. ‘मनमोहना बडे झुठे’ ची ‘जय जयवंती’ मनाला अशी तल्लीन करुन सोडते की गाणे कधी संपले ते कळतच नाही. काही वेळा यातले काहीही नसले तरी त्या गाण्यातून कशा कोण जाणे पण  ‘भाव-भावना’ अशा काही व्याकुळतेने व्यक्त होतात की बस्स , एका क्षणात ते गाणे, ते संगीत, ती रचना काळजाचा ठाव घेऊन जाते , ‘गमन’ मधले सिने में जलन ऑखोंमें तूफॉ सा क्यू है’  हे असेच एक गाणे सुरेश वाडकरांच्या असुनासिक, कोरड्या , पचपचीत आवाजात ऐकावे लागले तरी सुद्धा आवडून जाते!

काही गाण्यात काहीतरी दैवी असावे, नव्हे ते असतेच म्हणा हवे तर , सैगल साहेबांची गाणी  ऐकताना हा अनुभव येतोच येतो! वास्तवीक मरणपंथाला लागलेल्या , विझलेल्या , थकलेल्या दारुच्या व्यसनात आकंठ बुडालेल्या सैगलच्या ‘गम दिये मुश्तकील’ या गाण्यात असे काय आहे … दैवी अंश !  कधी ओ.पी. आणि आशाचे  ‘आवो हुजुर तुमको बेहोष करुन टाकते तर कधी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ मधला लता, सतार आणि पाऊस यांचा झिम्मा लुभावून जातो. निखळ सौदर्य ! एखाद्या गाण्यात मध्येच एखाद्या अंतर्‍यावर काळीज पिळवटून टाकणारी तान येऊन जाते, कधी एखादी नखरेल, कातील हरकत ‘हीला के रख देती है’ तर कोठे एखादी नटखट ‘मुरकी’ गुदगुल्या करुन जाते. बस्स, आपल्याला काय , गाणे आवडायला इतके सुद्धा पुरेसे आहे! आता सांगायला हरकत नाही , केवळ ‘दत्ताराम ठेका’ एव्हढ्या भांडवलावर काही गाणी मला उगाचच आवडून गेली आहेत. ( ‘मेरे दिल है एक बात ‘ )

मी  गाणी ऐकतो सहसा नवे-जुने असा पंक्तीभेद करत बसत नाही. जे कानाला रुचते, मनाला भावते ते चांगले अशी आणि इतकीच सोपी व्याख्या मी करतो आणि म्हणुनच सैगल चे  ‘बाबुल मोरा’ ज्या तल्लिनतेने पुन्हा पुन्हा ऐकतो तसेच सध्याचे ‘जग घुमिया थारे जैसा ना कोई’ (चित्रपट: सुलतान गायिका:  नेहा भसीन) मला ऐकावेसे , गुणगुणावेसे वाटते. मला जे आवडेल ते दुसर्‍याला आवडेल असे नाही , माझा तसा आग्रह ही नसतो (का असावा?) , आणि इतरांना जे चांगले वाटले ते मला आवडेल असे नाही. हो , मला  ‘पतंग़ उडवीत होते’ ही लावणी आवडते, आणि गदिमांचे खटकेबाज ‘काही तरी करुन, बाई कडे बघून, कोल्हापुरी जाऊन, गुजरीत बसुन, सोन्याचा साज तुम्ही घडवा’ हे पण आवडते! शेवटी काय चांगले काय  वाईट हे ठरवायला ‘कोण, कधी , कोठे ‘ या पेक्षा ‘माझे कान’ हीच एकमेव फुटपट्टी मी वापरतो!

मी (कै) पं अरविंदजी गजेंद्रगडकरां कडे शास्त्रीय संगीताची थोडी तालीम घेतली आहे आणि  पंडीतजींनी सुद्धा फार मेहेनत घेऊन प्रसंगी रागावून , दरडाऊन माझ्या सारख्या रेड्याला स्वरज्ञान करुन दिले , हा एक चमत्कारच म्हणायचा, धन्य ती गुरु माऊली ! असा शास्त्रीय संगीताचा पाया असल्याने असेल कदाचीत मी कितीही ठरवले की ‘नाही, या टायमाला गाणे नुसते ऐकायचे,  विश्लेषण करत बसायचे नाही, किस पाडायचा नाही, गाणे बनवणार्‍याने, गाणार्‍याने काहीतरी विचार केला असेलच ना ?  पु.लं. चे रावसाहेब म्हणत असत तसे ‘गांजा ओढून काम नक्कीच केले नाही’ मग कशाला ‘हे असे का आणि ते तसे का’ , गाणे ऐकायचे , निखळ आनंद घ्यायचा.. आवडले तर आवडले म्हणायचे नाही आवडले तर नाही म्हणयाचे हाय काय आन नाय काय ! पण कसले काय, गाणे सुरु झाले रे झाले की संगीताचे व्याकरण मनात केव्हा घोळायला लागते ते माझे मलाच कळत नाही आणि मग अधुन मधुन (हमखास) बेसुरा होणारा मुकेश आणि रे रे रेकणारा किशोर खटकतो.. खटकतच राहतो .  ‘सखी मंद झाल्या तारकां’ सारख्या हळूवार प्रेमगीताची (विरह गीताची) एका महान गायकाने लावलेली वाट पाहून (ऐकून!)  हळहळायला होते! हेच   ‘सखी मंद झाल्या तारकां’  बाबुजींनी (सुधीर फडके) पण गायले आहे ते किती छान वाटते , पण तरीही बाबुजींच्या , एकसुरी,  बुळबुळीत पणावर मी अनेकदा नाक मुरडतो, मन्नादां च्या आवाजातला कमालीचा कोरडेपणा मला कधीच पटला नाही. तलत च्या आवाजातला तो प्रसिद्ध ‘कंप’ त्याच्या सुरवातीच्या गाण्यात बरा वाटला पण नंतरच्या काळातल्या त्याच्या गाण्यांतला ‘कंप’ विद्रुपते कडे झुकला त्याचे काय ? एक ना अनेक ही अशी गाणी जेव्हा ऐकतो तेव्हा पदोपदी नाना पाटेकरांसारखे ‘कंट्रोल ..कंट्रोल ‘ असे म्हणावेसे वाटते.

असो, या बद्दल मी नंतर कधीतरी सवडीने (आणि मूड लागला तर !) आणखी लिहेनच , पण आज लिहावेसे वाटले ते  या ‘ दिया जलाकर आप बुझाया’ या गाण्या बद्दल. फार फार कमी लोकांनी हे गाणे ऐकले असेल , साहजीकच आहे  ‘ गल्ती से मिस्टेक’ आणि ‘ सोनू    SS’ च्या केकाटण्यात ही असली गाणी ऐकायला येणारच नाहीत.

दिया जलाकर आप बुझाया’ हे गाणे ‘के. दत्ता’ म्हणजेच आपल्या मराठमोळ्या ‘दत्ता (अण्णा ) कोरगावकर ‘ यांनी ‘बडी मॉ ‘ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केले आहे. गायले आहे मल्लिका-ए-तरन्नुम नुरजहॉ यांनी आणि ते साल होते १९४५!

‘अण्णा कोरगावकर’ हे नाव फार थोड्या लोकांना माहीती असेल. ज्यांना माहीती आहे त्यांचे मी अभिनंदन करतो! आता ज्यांना हे ‘अण्णा’ कोण असा प्रश्न पडला असेल त्यांच्या साठी… हे १९४० च्या दशकातले एक चांगले संगीतकार होते.  ‘महान’ संगीतकार वगैरे बिरुदे लागण्या इतकी कारकिर्द दुर्दैवाने या गृहस्थांना लाभली नाही (सोयी साठी आपण म्हणू — राजकारण आडवे आले ना!) असे असले तरी जे काही मोजके (अक्षरश: मोजकेच) चित्रपट त्यांना संगीतकार म्हणून लाभले त्याचे त्यांनी सोने केले.

‘कंट्रोल  …कंट्रोल ‘

आता कशाला ‘कंट्रोल ..कंट्रोल ‘ ? त्याचे काय आहे , मी जेव्हा एखाद्या कलाकाराचे वर्णन करत या वळणावर येतो तेव्हा मला काही  (सिने) संगीत समीक्षक आठवतात आणि थबकायला होते , चुकून कोठे मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नाही ना अशी शंका यायला लागते.

या चित्रपट आणि चित्रपट संगीताच्या समीक्षकांना उगाचच एक सवय आहे. कुठल्यातरी , अडगळीतल्या  ‘सईद अन्वर’ ,  ‘मीर महंमद’ , चॉद सुलतान’, ‘खुर्शीद बानू’, ‘चमनबाई’, ‘रामप्रताप’, ‘निस्सार नकवी ’ , ‘मास्टर  दिलशाद ’ , ‘पंडीत भोलाराम’ अशी मजबूत जुनाट नावं घ्यायची आणि गळा काढायचा!  एका समीक्षकाने तर ‘बरसात में हमसे मिले’ मधल्या ‘ताक धिना धिन’ या कोरसात असणार्‍यां पैकी एका च्या नावाने गळा काढला होता, आहात कोठे! लाहोर (फेव्हरीट!), गुरुदासपुर, लोंगोवाल, गढ्वाल, राजा मुंद्री मधून ते मुंबईत कसे आले, कोणत्या फुटपाथ वर झोपले, स्टुडिओ बाहेर कसे रेंगाळले एक ना दोन कहाण्या,  त्यांच्यावर कसा अन्याय (गळचेपी!) झाला,  ते कसे कमनशीबी ठरले, त्यांच्या तथाकथित दैदिप्यमान कारकिर्दीची (?) व्यसने , जुगार (आणि बाई!) यांच्या नादाने कशी धुळदाण उडाली (कुठल्या ट्रॅफिक सिग्नलला भिक मागताना दिसले!) , नौशाद त्याच्या बद्दल काय बोलला आणि सज्जाद त्याला किती मानत होता, यंव र्ते त्यंव! बाकी कोणताही विनोद , किस्सा हा अत्रे किंवा पुलं च्या नावावर खपवला जातो तसेच हे, ‘नौशाद  म्हणाला,  सज्जाद म्हणाला’ . एकदा का ही अशी पुडी सोडून दिली की बस्स, बाकी काही पुराव्याची गरजच नाही!  बाकी त्या नौशादमियॉंना आणि सज्जाद ला पण अशा उठसुठ पिचकार्‍या मारायची सवय होती हे ही खरेच आहे म्हणा! त्यात तो १९४०-५० चा काळ , लिहा दाबून कोण बघायला जाते , वित -दीड वितीच्या लेख पाडता आला की झाले , छापायला लोकसत्ता (रवीवार पुरवणी) / लोकप्रभा समर्थ आहेच!

‘कंट्रोल  …कंट्रोल ‘……….

हा, तर, मी काय बोलत होतो?  ‘अण्णा कोरगावकर!

शास्त्रीय संगीताचा थोडा अभ्यास असला तरी अण्णांच्या या गाण्याच्या दाढीला हात लावायची आपली ताकद नाय.. इथे सपशेल शरणागती! तरीपण थोडक्यात सांगायचे तर या गाण्याचे खास वैषिष्ट्य म्हणजे ‘धैवत’ !  ‘दीया जलाकर’ या शब्दां वर नूरजहॉ ने असा काही गोलीबंद ‘धैवत’ लावलाय की थक्क व्हायला होते. त्यातही मुखड्यातला ‘धैवत’ वायला आणि अंतर्‍यातला ‘धैवत’ वायला असे पण आहे ! हे कमी पडले म्हणून की काय , गाण्यात तीव्र मध्यम आणि कोमल, अती कोमल ‘गंधार’ पण असे काही ताकदीने लागले आहेत की बस्स! मी आधी लिहल्या तसे गाणे  ऐकायचे, निखळ आनंद घ्यायचा, विश्लेषण करत बसायचे नाही, किस पाडायचा नाही!

हे गाणे म्हणजे एक लखलखीत हीरा आहे हीरा! अर्थात अण्णांचा हा मास्टरपीस गायला मल्लिका-ए-तरन्नुम नुरजहॉ सारखी बाई होती म्हणुनच या हिर्‍याचे सौदर्य जगा समोर आले, नाहीतर  त्या वेळच्या धापा टाकत गाणार्‍या कोणत्या गायिकेत ही ताकद (का जादू!) होती?  लताबाईंचा उदय व्हायला नुकतीच सुरवात झाली होती, त्यांच्या आवाजातही हे गाणे छान खुलले असते कोणी सांगावे पण काहीही म्हणा ,  नुरजहॉची जादू का चेटूक काही औरच! ‘चेटूक’ ही उपमा माझी नाही, शिरिष कणेकरांनी एका लेखात या मल्लिका-ए-तरन्नुम नुरजहॉ ला ‘चेटकीण’ म्हणले आहे, अगदी खरे आहे हो, ते काय ‘सोला आना सच’ म्हणतात ना तस्से., धारदार आवाज, बंदुकीच्या गोळी सारख्या तानां, हरकती म्हणू नका, मुरक्या म्हणू नका.. ही बाई गाणे गायची अशी आपण समजूत करुन घ्यायची प्रत्यक्षात ती काही मंत्र तंत्र करत असावी असा संशय कणेकरां सारखा माझ्या मनातही आहे. ते काय होते ते देव जाणे, ‘चेटूक’ च म्हणावे लागेल त्याला ,

इतकी सुरेल , इतकी सुंदर ‘चेटकीण’ ?

हा ‘बडी मॉ’ चित्रपट आपल्या मराठी मा. विनायक यांनी प्रफुल्ल पिक्चर्स या बॅनर खाली निर्माण केला होता, यात लता मंगेशकरांनी अभिनय केला होता! प्रफुल्ल पिक्चर्स चा बहुदा हा शेवटचा चित्रपट, कारण त्या नंतर लगेचच मा.विनायकांचे अकाली निधन झाल्याने ही चित्रपट संस्था बंद पडली.

‘अण्णा कोरगावकर आणि नूरजहॉ ही जोडी ही नंतर फारशी एकत्र येऊ शकली नाही कारण त्यानंतर लगेचच म्हणजे फाळणीच्या वेळी नूरजहॉ आपल्या नवर्‍या बरोबर पाकिस्तानला निघून गेली. भारतात असताना ‘अण्णा कोई खास चिज बनायी है क्या” असा भुंगा अण्णांच्या पाठी लावणारी नुरजहॉ (निघून) गेली आणि ‘आता माझी गाणी कोण गाणार’ या विचारानेच अण्णा खचले, त्यातच काही कारणांमुळे ते काही काळ मुंबई पासुन म्हणजेच फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेले.. इंडस्ट्री त्यांना केव्हाच विसरुन गेली, त्या माया नगरीत कोणी कोणासाठी थांबत नसतो, तेव्हढा वेळ असतो कोणा पाशी?

‘दिया जलाकार’ हे मला बेहद आवडलेले गाणे,  मला आवडले , ओ पी नैयरला आवडले,अनिल विश्वास बेहद खुष झाला , गुलाम हैदर सारखा कलावंत या ‘धैवता’ च्या जाळ्यात फसला, किती म्हणून नावे सांगू? दारुच्या नशेतल्या शामसुंदर ला सुद्धा अण्णांचा दरवाजा ठोठावत  विचारावेसे वाटले “कमाल कर दी तुमने दादा ! कहॉ से ढूँढ निकाला ये ‘धैवत’ ?” 

काय आहे काय या गाण्यात असे ?  ऐका तर खरे हे गाणे ‘ दिया जलाकर आप बुझाया’  खास त्या चेटकीण स्वरुप मादाम नुरजहाँ साठी आणि त्या काळजाचा ठाव घेणार्‍या ‘धैवता’ साठी!

(सौजन्य: यू ट्युब आणि व्हिमिओ )

 

जाता जाता……….

ज्यांना हे गाणे आवडले , अण्णा कोरगावकर आवडले त्यांच्या साठी अण्णा कोरगावकर उर्फ के.दत्ता यांचे ‘दामन’ या चित्रपटातले अवीट गोडीचे गाणे , लता आणि रफीच्या आवाजात .. “याद आने लगी दिल दुखाने लगी’ ! लता आणि रफी  चे कोवळे (म्हणजेच खरे!) स्वर! माशाल्ला ! या गाण्याबद्दल काय लिहायचे ! लिहेन हो नक्की लिहेन, असाच मूड लागला की ..

 

तर ऐका हे गाणे ‘ याद आने लगी दिल दुखाने लगी’

(सौजन्य: यू ट्युब आणि व्हिमिओ )

 

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  लेख फारच अप्रतिम झाला आहे. आपण शब्दप्रभू आहात. आपले लेख वाचून आपल्याला भेटण्याची तीव्र इच्छा होते.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद , मी लेख म्हणून जे काही लिहले आहे ते आपल्याला आवडले याचे समाधान आहे पण त्याहून ही जास्त आपल्याला संगीता मध्ये रुची आहे आणि चांगल्या संगीताची कदर आहे याचे कौतुक वाटते, असाच छंद जोपासा.. संगीत आपल्या जगण्याला सुगंध देते.

   सुहास गोखले

   +1
 2. Niranjan Joshi

  Dear Suhas Ji ,

  Pleasure writing after a gap and trust you are fine . Some articles are pending for long time and trust you will find some time to release
  them .

  Meanwhile , one small request , please change my E Mail I D registered with you . Revised I D is niranjanj07@gmail.com

  Warm Regards ,

  Niranjan Joshi

  0
  1. सुहास गोखले

   श्री. निरंजनजी,

   अभिप्राया बद्द्ल धन्यवाद . इतर कामांच्या व्यापां मुळे ब्लॉग लिहायला वेळ मिळत नाही. पण मी काही नविन लेख लिहीत आहे तसेच काही जुन्या अपूर्ण लेख माला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आहे. आशा आहे आपल्याला हे लेख आवडतील. हिंदी सिमेमातले संगीत आपल्या सर्वांच्या जीवनचा जवळजवळ अविभाज्य घटक आहे , कितीही टाळावे म्हणले तरी हिंदी चित्रपट संगीत आपल्याला टाळता येत नाही. या विष्यायावर मी बरेच लिहू शकतो , वाचकांना कितपत आवडेल या बद्दल मी काहीसा साशंक आहे, या आत्ताच्या ‘दिया जलाकर…’ या लेखाला तसा थंडाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. आपल्या सारखे काही रसिक वाचन असे लेखन वाचतात आणि त्यावर आव्र्जुन अभिप्राय देतात हा मी माझा बहुमान समजतो.

   आपली ‘ईमेल’ बदलाची विनंती माझा मुलगा (बेव मास्टर ) हाताळत आहे , एक दोन दिवसात होऊन जाईल आपले काम.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.