खूप वर्षां पूर्वी,  एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी हा किस्सा मला सांगीतला होता. खरा – खोटा मला माहीती नाही. या किस्स्यातल्या तांत्रिक बाबी बद्दल मी अनभिज्ञ आहे, किस्सा बराच जुना असल्याने त्यावेळेचे सरकारी नियम ,  कार्यपद्धती आणि आजची बायोमेट्रीक पडताळणी वर आधारीत संंगणकीकृत कार्यपद्धती यात बराच फरक आहे तेव्हा तो ध्यानात ठेवूनच या किस्स्याचा आस्वाद घ्यावा.

एका शासकीय कार्यालयात नवीन साहेब ‘कार्यालय अधिक्षक’ म्हणून बदली वर आले.

स्वत:ला शिस्तप्रिय , कर्तव्यदक्ष समजणार्‍या या नव्या साहेबांनी आल्या आल्या शिस्तीचा बडगा दाखवायला सुरवात केली.

‘नव्याचे नऊ दिवस’ झाले की येईल लायनी वर असे म्हणत कर्मचारी वाट पाहत होते पण साहेब काही थांबायचे नाव घेईना. शिस्तीच्या नावा खाली साहेबाने मांडलेला उच्छाद आता सहन करण्या पलिकडे गेला . चहाच्या सुट्टीत , लंच टाइम मध्ये ह्याच साहेबाची चर्चा , सगळ्यांच्या जीवाला घोर लागला होता.  त्यात एकाने बातमी आणली साहेबाची फक्त एकच वर्ष सर्व्हिस राहीली आहे , इथूनच हा साहेब रिटायर होणार आहे. सगळ्यांना हायसे वाटले , एक वर्षाने का होईना ही ब्याद टळणार आहे.

एके दिवशी एका कारकुनाचे आणि या साहेबाचे अगदी क्षुल्लक कारणा वरुन वाजले, खरे तर त्या कारकुनाची काहीच चूक नव्हती पण साहेबांनी गैरसमज करुन घेतला होता. ‘माझी ह्यात काही चूक नाही’ असे तो कारकून परोपरीने सांगत होता पण साहेब काही ऐकायला तयार नव्हते.  शब्दाला शब्द वाढत गेला  दोघांचाही तोल सुटला आणि  चांगलेच भांडण पेटले …

“असे बरेच साहेब बघितलेत मी, साहेब येतो आणि जातो,  पण आम्ही कारकूनच इथे कायमचे टिकून असतो. आम्हा कारकुनांच्या जीवावर तर हा सरकारी गाडा चालतो, तेव्हा थंड घ्या.. माझी अजून वीस वर्षे सर्विस आहे पण आपले मात्र सर्व्हिस चे शेवटचे वर्ष आहे तेव्हा आता जे काही थोडे दिवस राहीलेत ते आरामात काढा आणि शांतपणे रिटायर व्हा, कशाला उगाच खाजवून खरुज काढता?”

“एक फडतूस कारकून तू  आणि मला शिकवतो!“

“साहेब, मी कारकून आहे पण फडतूस नाही. एक डिवचला गेलेला  कारकून काय करु शकतो याची आपल्याला कल्पना नाही”

“अरे जा, आला मोठा धमकी देणारा”

“साहेब , उगाच विषाची परीक्षा घेऊ नका“

“अरेच्च्या , काय टीवटीव लावलीय , काय वाकडे करणार रे माझे”

“मी काय करणार ?  ‘ दात पाडेन तुमचे  ‘ बघाच तुम्ही”

“तुझी ही मजल …”

साहेब रागाने लालबुंद होऊन त्या कारकूनाच्या अंगावर धावून गेले , इतर कर्मचारी मध्ये पडले…

“जाऊ दे साहेब , त्या भडकू च्या  बोलण्या कडे कशाला लक्ष देताय , तो असाच आहे, मानसिक संतुलन ढळलेला, ट्रीटमेंट चालू आहे त्याची, रोजचेच आहे हे त्याचे , आम्ही म्हणून कसेबसे सांभाळतो आहोत त्याला , याचा बायकोला टी.बी. आहे , चार पोरें आहेत पदरात, याच्या वर अ‍ॅक्शन घेतली तर नोकरी जाईल याची आणि सगळी फॅमीली उघड्यावर पडेल हो याची,  तेव्हा त्यांच्या कडे बघून  तरी माफ करा त्याला , आम्ही  समजावतो त्याला …दुर्लक्ष करा त्याच्या कडे , प्लीज काही अ‍ॅक्शन घेऊ नका”

साहेब जरा शांत झाले, त्या कारकुनाला इतरांनी बाजूला नेले, जरा समजावले.

प्रकरण मिटले.

साहेब वर्षभरात सेवानिवृत्त झाला , ‘ सेन्ड ऑफ ‘ समारंभ झाला. प्रथे प्रमाणे साहेबांना हार –तुरे, शाल, श्रीफळ आणि एक छोटीसी भेटवस्तू  देण्यात आली , साहेबांच्या खोट्याखोट्या स्तुतीची भाषणे झाली,  समारंभ संपला , पांगापांग झाली, साहेब गाडीत बसले , गाडी सुरु होताच ‘तो’ कारकून हळूच खिडकी जवळ आला, आपल्या छद्मी आवाजात म्हणाला..

“साहेब , तुम्ही विसरला असाल पण मी नाही, दात पाडणार आहे तुमचे ..”

गाडीने एव्हाना गती घेतली होती, त्या उडालेल्या धुरळ्यात त्या कारकुनाचा चेहेरा बघून चडफडणे इतकेच काय ते साहेबांच्या हातात होते , ते काहीच करु शकणार नव्हते कारण ते आता अधिकृत सेवानिवृत्त झाले होते!

सेवानिवृत्त होताच साहेब आपल्या पेन्शन च्या मागे लागले ,  कागदपत्रांची जुळवाजुळव झाली, पेन्शन चा अर्ज सादर झाला , बस्स, आता दोन – तीन महीन्यात पेन्शन सुरु होणार !

पण तसे व्हायचे नव्हते , दोनाचे चार , चाराचे सहा महीने झाले तरी साहेबांच्या पेन्शन ची फाईल पुढे सरकायचे नाव घेत नव्हती. साहेबांच्या चकरा सुरु झाल्या , सेवेत असताना सिंहा सारखा रुबाब असलेल्या साहेबांची आता शेळी झाली होती, ह्या एके काळच्या सिंहाला आता चपरासी सुद्धा ओळख दाखवत नव्हता.

बर्‍याच कालावधी नंतर साहेबांना ‘ पेन्शन संदर्भातल्या पडताळणी साठी समक्ष येऊन भेटा’ असा खलिता मिळाला ,  साहेब खुष  झाले , झाले एकदाचे पेन्शन चे काम असे म्हणत साहेब विजयी मुद्रेने त्या ‘पेन्शन ऑफीसर’ समोर उभे राहीले.

“या , साहेब”

“शेवटी झाले ना माझे पेन्शन चे सगळे सोपस्कार, बराच वेळ लागला हो”

“हां , तसे आपले काम जवळजवळ होतच आले आहे,  फक्त एक त्रुटी राहून गेली आहे , ती दूर झाली की झालेच आपले काम”

“आता काय राहीलेय ? मी सगळी कागदपत्रे दिलीत ना , आणखी काही मिसिंग़ आहे का?

“नाही, कागदपत्रे चोख आहेत “

“मग काय अडचण आहे”

“अडचण अशी आहे ,  आपण पेन्शन साठी जे फोटो दिलेत तिथे थोडी गडबड आहे “

“असे कसे होईल, विहीत नमुन्या नुसार आणि शासन मान्य फोटोग्राफर कडून तर फोटो काढून घेऊन दिले आहेत ते सुद्धा अगदी नविन म्हणजे सेवानिवृत्तीच्या दुसर्‍याच दिवशी काढलेले फोटो आहेत , त्यात काय अडचण आहे?”

“मोठ्ठी अडचण आहे, म्हणून खातरजमा करुन घेण्यासाठी तर तुम्हाला समक्ष भेटायला बोलावले आहे “

“नक्की काय अडचण आहे ती सांगाल का? “

“त्याचे काय आहे, आपले फोटो  आपली ओळख पटवण्यासाठी वापरले जाणार आहेत फक्त आजच  नव्हे तर पुढे अनेक वर्षे “

“हो , मला माहीती आहे ते”

“सर्व्हीस बुकात आपले वर्णन म्हणजे आपल्या ओळखण्याच्या ज्या खुणा नोंदवल्या आहेत त्या आणि आपला फोटो यात तफावत आहे. आपली ओळख पटत नाही म्हणून आपल्या पेन्शनची मंजुरी रखडली आहे”

“अरे , कसली तफावत?”

“सांगतो, पल्या सर्व्हिस बुकात लिहले आहे ‘दातांच्या वरच्या ओळीतले पुढचे चारही दात पडलेले आहेत’ आणि आपण दिलेल्या फोटोत तर सगळेच दात शाबूत दिसत आहेत , हीच तर तफावत आहे,  म्हणुन एकदा आपल्याला प्रत्यक्ष पाहून आपले वरचे चार दात पडलेले आहेत का नाही याची खातरजमा करून घ्यायची आहे , पण मी  तर पाहतोय की आपले वरचे चारही दात शाबुत आहेत , आपण त्या चार दातां साठी कवळी वापरता का? तसे असेल तर जरा ती कवळी काढून दाखवता का? म्हणजे ‘वरच्या ओळीतले पुढचे चार दात नाहीत’ याची खात्री पटेल. तसेच ते दात नसतानाचे नविन फोटो सादर करावे लागतील म्हणजे आपले फोटो आणि बुकातले वर्णन जुळेल”

“कवळी ? ती का म्हणुन ? माझे सगळे दात अजून शाबूत आहेत”

“सर्व्हिस बुकात वरच्या ओळीतले पुढचे चार दात नाहीत असे लिहले आहे , त्यामुळे तुमचे  पुढचे चार दात पडलेले असतील तर आणि  तरच ओळख पटेल”

“अरे पण माझे चार ही दात शाबुत आहेत ना त्याचे काय ? “

“चांगले आहे,  पण सर्व्हिस बुकात तर दात पडलेले आहेत अशीच नोंद आहे त्याचे काय ?  या पेन्शन च्या कामात ‘सर्व्हिस बुक’ काय म्हणते ते फायनल त्याच्या पुढे अपील नाही ! त्याला मी तरी काय करणार?  आपली ओळख पटत नाही तो पर्यंत पेन्शन मंजुर होणार नाही”

“मग आता मी काय करायचे”

“साहेब एक सुचवू का? वाद विवाद घालत बसू नका , सरळ एखाद्या डेंटीस्ट कडे जाउन ते चार दात पाडून घ्या, प्रश्न सुटला ”

“अरे बापरे .. असे करावे लागेल ?”

“हो, पुढचे चार दात नसतील तरच तुमची ओळख पटणार बघा”

“अहो पण इतके मजबुत चार दात हकनाक पाडायचे? “

“पेन्शन हवी असेल तर दात पाडावेच लागतील”

त्या क्षणी साहेबांना वर्षा पूर्वी ‘त्या’ कारकूना ने दिलेली धमकी आठवली

“ दात पाडेन तुमचे  ‘ बघाच तुम्ही”

पाणावलेल्या डोळ्यांनी साहेबांनी डेंटीस्ट कडे जाऊन पुढचे चार दात , पदरचे पैसे खर्च करुन पाडून घेतले आणि पडक्या दातां सहीतचा फोटो नव्याने काढला गेला ..

‘त्या’ कारकुनाने आपले शब्द खरे केले होते !

दात असेही पाडता येतात !

 

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.