आज संगणकावर काही  सेकंदात संपूर्ण शास्त्रशुद्ध पत्रिका  तयार होते पण मी जेव्हा ज्योतिष शिकायला सुरवात केली (1984) तेव्हा संगणकाचा नुकताच चंचुप्रवेश होत होता , संगणकाचा वापर करून पत्रिका या गोष्टी आपल्याकडे प्रचलित झाल्या त्या 90 च्या दशकात. 1984 ते 1992 अशी सात वर्षे मी हाताने गणित करून पत्रिका तयार करत असे, राफेलच्या एफेमेरीज व सायंटिफिक कॅलक्युलेटर हाताशी असताना सुद्धा त्यावेळी मला एक पत्रिका तयार करायला तासभर तरी लागायचा. 1992 मध्ये मी माझा स्वत:चा पत्रिका  तयार करण्यासाठीचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहिला, अर्थात त्या वेळी संगणकाला सोयीच्या अशा ‘एफेमेरीज’ उपलब्ध नव्हत्या, खूप खटपट करून मी  ‘मोझियर ‘ अल्गोरिदम मिळवला, या व्दारे मला खूप अचूक पत्रिका तयार करता यायला लागली, फक्त चंद्राची स्थिती एक दोन अंशा नी  चुकायची, त्याचा परिणाम थोडासा विशोत्तरी अंतर्दशा , विदशां यांच्या कालावधी वर व्हायचा पण तो अगदी नगण्य स्वरूपाचा. अर्थात त्या वेळचा हा कॉम्प्युटर प्रोग्रॅम ‘बेसिक’ लँग्वेज मध्ये व ‘डॉस’ वर आधारित असल्याने आजच्या सारखी ग्राफिक्स नव्हती की एकाच वेळी दोन वा अधिक पत्रिका उघडणे, चार्ट अॅनिमेशन सारख्या सोयी त्यात नव्हत्या पण पत्रिका तयार होत होती ती सुद्धा  काही सेकंदात, (हो काही  सेकंद लागायचेच ,त्यावेळचे सर्वच संगणक आजच्या संगणकांच्या तुलनेत 1000 पटीने हळू चालणारे होते  3.2 मेगॅहर्टज ते  3 गिगॅहर्टज !!)

आज क्षणार्धात संगणकावर पत्रिका मिळते , सगळेच अॅटोमॅटिक झाले आहे, त्यात जरी  वेळ  वाचत असला तरी हे करताना आपण  बरेच काही गमावत आहे हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले. संगणकाचा पडद्यावर उमटणारी पत्रिका मला नेहमीच कमालीची रुक्ष वाटते, त्यातला कोरडेपणा माझ्या अंगावर येतो, जसे आपले पोर आणि दुसर्‍याचे पोर हयात जसा फरक आहे  तसा फरक मला  हाताने बनवलेली पत्रिका आणि संगणकाच्या पडद्यावरच्या छापील पत्रिके मध्ये जाणवतो.

मी जेव्हा हाताने पत्रिका बनवायचो तेव्हा कोठे तरी त्या पत्रिकेशी  आपली  नाळ  जुळल्याचा भास व्हायचा, एक प्रकारचा भावनेचा ओलावा त्यात निर्माण व्हायचा. प्रथम  जन्म लग्न निश्चित व्हायचे , मग एका पाठोपाठ सर्व  बाराही भाव निश्चीत व्हायचे, मग  एक  एक  ग्रह आपापले अंश ,कला,विकला घेऊन आपापल्या  जागी जाऊन बसायचे,  दशा ,अंतर्दशा,  विदशांचे  साखळी  नृत्य सुरू व्हायचे.ग्रह योगांचा ‘संगतीत विसंगती’ वा ‘विसंगतीत संगती’ असा  भूल भुलैया उभा राहायचा,   तिकडे  एका  बाजूला ‘नवमांश’ पत्रिकेचा दरबार भरायचा,  तर दुसर्‍या बाजूला  ‘अष्टक वर्गाचा’  गणिती  ठेका सुरू व्हायचा. एखाद्या चित्रकाराने  अथवा मूर्तिकाराने हळूहळू आपली  कलाकृती  उभी  करावी, तशी  पत्रिका माझ्या हातून घडवली जायची, तो एका कलाकृतीचा जन्मच असायचा. आणि  जशी जशी  पत्रिका मूर्तस्वरुप घेत जायची तसे तसे पत्रिका ही नुसती कागदावर चितारलेली आकृती न राहता जणू काही एक जिती जागती व्यक्ती होऊन माझ्याशी बोलू लागायची, आपली कहाणी सांगायला लागायची, एक एक खुलासा आपण हून करून द्यायची .

आज  मी  ज्योतिष शास्त्रातील अनेक गुंतागुंतीच्या पद्धतींचा वापर एकाच  वेळी करतो, ही सर्व गणिते हाताने करता येणे शक्य  असले तरी आजच्या काळ  काम  वेगाच्या गणितात हे  बसवता येणार नाही. आता  संगणका खेरीज पर्याय  नाही पण मग त्या संगणकीकृत पत्रिके मधल्या कोरडेपणाचे काय?  यावर  मी  एक  उपाय  करतो, संगणकाने केलेली पत्रिका मी  कागदावर हाताने उतरवून घेतो,  कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे कार्येश  ग्रहांची टेबल्स स्वत: हाताने बनवतो,  ग्रहयोगांचे  टेबल  (अस्पेक्ट्स ग्रिड) पण  स्वत: तयार करून घेतो. ग्रहांचे बलाबल, म्युच्युअल एक्सचेंजीस,  अवस्था इ.  बाबी  स्वत:च्या हाताने  लिहून काढतो. या थोड्याश्या  आकडेमोडीने  थोडातरी  भावनिक ओलावा निर्माण होतोच, हे ही  नसे  थोडके.

याच बरोबर मी काही  ‘फिल गुड’ गोष्टीही आवर्जून पाळतो, त्यासाठी योग्य तो  खर्च करताना  कोणतीही काटकसर करत नाही उदा:

 

स्वच्छ पांढरा शुभ्र:

उच्च दर्जाचा ,100 जीएसएम ‘रॉयल एक्सेक्युटिव्ह बॉंड ‘ कागद

 

फौंटन पेन:

हे  आवश्यक !  बॉलपेन्स,जेल पेन्स  टाकून द्या , फौंटन पेन ने लिहून  बघा , फरक  नक्कीच  जाणवेल. सध्या मी  14 कॅरेट गोल्ड प्लेटेड निब असलेले, हाताने बनवलेले,  ‘रतनम’ फौंटन पेन वापरतो आहे .(या  ‘रतनम’ फौंटन पेन कंपनीला सुद्धा  एक  इतिहास  आहे, परंपरा आहे  जी  महात्मा गांधीं पासून सुरू होते, पुढे मग जवाहर लाल नेहरू, बाबू राजेंद्र  प्रसाद ,इंदिरा गांधी  … या ‘रतनम’ फौंटन पेन बद्दल एकदा सविस्तर लिहिणार आहेच)

 

 

हिरव्या रंगाची शाई!

मी जेव्हा ज्योतिष शिकायला सुरवात केली तेव्हा मला ही ‘टिप’ मिळाली  होती. या हिरव्या रंगाच्या  शाईचा  आणि ज्योतिषाचा काही बादरायण संबंध  आहे  कारण मी  बर्‍याच  कृष्णमूर्ती पद्धती ज्योतिर्विदांना हिरव्या रंगाची शाई वापरताना पाहिले  आहे.  आपण ही  बदल  म्हणून  हिरवी शाई  वापरून पहा . पण आताशा हिरव्या रंगाची शाई मिळणे दुरापास्त  झाले आहे,  कोणी वापरत नाही  म्हणून ‘कॅमलिन’,  ‘पार्कर’ यांनी या रंगाच्या शाईचे उत्पादनच बंद केले आहे,’ब्रिल’ व ‘पेलिकन’ शाई महाराष्ट्रात तरी सहजासहजी मिळत  नाही. मी शास्त्र म्हणून ‘सेलर जेंटिल एपिनार्ड ‘ ह्या जपानी हिरव्या शाईने  (भलतेच महाग प्रकरण!) पहिली ओळ लिहितो आणि  बाकी सर्व  ‘शेफर’ किंवा  ‘म्वू ब्लांच’ यांची सुंदर  निळी शाई  वापरून लिहितो.

आता हे सर्व  केले अथवा नाही केले तर पत्रिकेत काहीही  फरक  पडणार नाही  कारण  ती तर  गणितावर  आधारितच आहे, पण पत्रिका गणितावर आधारित असली  तरी ज्योतिष गणिताच्या पलीकडले आहे. संगणक गणित करून देईल हो,  पण  ‘इंट्यूशन’ कोठून आणणार ? त्यासाठी वेगळेच मार्ग अवलंबायला  लागतात. ज्योतिर्विदाला आपल्या पुढ्यातल्या पत्रिकेशी एकरूप  होता आले  पाहिजे, त्यासाठी काही वातावरण निर्मिती करायलाच लागते. त्यातलाच हा एक भाग .

आजही अत्यंत महागड्या  ‘मेड  टू  ऑर्डर ‘ स्विस घड्याळातले बरेचसे  भाग  हाताने बनवतात व त्या भागांची  जुळणीही हाताने  होते, ही जुळणी करणारा  मुख्य कारागीर ,काम  चालू  करण्या पूर्वी पूजा करतो, काम चालू असे पर्यंय  व्रतस्थ राहतो (मांसाहार,दारू , शिग्रेट बंद) , घड्याळातला अत्यंत महत्त्वाचा भाग  ज्या दिवशी जोडायचा असतो त्या दिवशी तर हा कारागीर चक्क  उपवास  करतो!

हे  सर्व  त्या  ‘वैश्विक शक्ती’ शी संपर्क प्रस्थापित  करण्यासाठी  जो एक  प्रोटोकॉल  पाळावा लागतो याचा एक  भाग आहे. या  प्रोटोकॉल मध्ये बर्‍याच काही गोष्टी  आहेत, त्या बद्दल नंतर  सविस्तर  लिहितो.

शुभं भवतु

सुहास


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.