सकाळी ११ ची  वेळ ठरवलेली आदिती दुपारचा १॥ वाजला तरी आली नाही, नाही तिचा काही फोन! हे नेहमीचेच आहे, वेळ ठरवायची आणि यायचेच नाही, इकडे मी मात्र त्यांची वाट पाहात ताटकळत बसलेलो असतो. अनपेक्षित आलेल्या अडचणीं मी समजू शकतो पण किमान यायला जमत नाही, उशीर होईल, असा फोन तरी करावा ना? पण एव्हढा साधा शिष्टाचार सुद्धा पाळायला जमत नाही लोकांना, ना  खंत ना खेद, कहर म्हणजे  “ काम निघाले अचानक , नाही जमले यायला, भेटू पुन्हा केव्हा तरी, त्यात काय ”  असे म्हणायला मोकळे !

आदितीच्या बाबतीतही असेच काही असेल असे समजून मी माझी इतर कामें सुरु केली होती आणि १३:५७ ला आदिती दारात हजर ! १३:५७ अशी अचूक वेळ लिहलेली पाहुन दचकू नका ! मी ‘कन्सलटेशन चार्ट’ ’चा मोठा उपयोग करुन घेत असल्याने, ज्या क्षणी माझी व जातकाची नजरानजर होते ती वेळ मी ताबडतोब नोंद करतो, कारण त्याच वेळेची पत्रिका मी ‘कन्सलटेशन चार्ट’ म्हणून वापरत असतो.

आदिती आत येऊन आसनस्थ होई पर्यंत ती आलेल्या वेळेचा ‘कंसलटेशन चार्ट’ माझ्या संगणकाच्या पडद्यावर झळकू लागला होता.

आदितीने आल्या आल्याच उशीर का झाला, फोन का करु शकले नाही इत्यादीच्या सबबीं सुरु केल्या, पण मला त्यात काहीच स्वारस्य नव्हते , बये तू आधीच उशीराने आली आहेस, आता उशीर का झाला याची कारणें ऐकत बसण्यात आणखी कशाला वेळ घालवायचा ?

मी आदितीला जरा बसायला सांगीतले आणि तिच्या आगमनाच्या वेळीस केलेला  कंसलटेशन चार्ट अभ्यासायला घेतला.

 

Aditi Divorce Consultation Chart

14 Jun 2014 1:57:56 PM INT -05:30:00 Deolali India
73e50’00 19n57’00 Geocentric Tropical Placidus True Node

आदिती विवाहीत आहे हे आधी माहीती असल्याने त्या अंगाने हा चार्ट तपासला आहे.

(फोन वर अपॉईंटमेंट घेताना “मी सौ. आदिती .. “ अशी ओळख करुन दिली होती .प्रश्न अर्जंट आहे ,खासगी असे म्हणाली होती पण प्रश्न काय आहे याचा कोणताही अंदाज लागू दिला नव्हता, ).

‘कंसलटेशन चार्ट’ समोर आला की मी सर्वप्रथम लक्ष देतो ते Ascendant (जन्मलग्न) कडे. लग्नी उदीत असलेली ‘राशी’ व त्या राशीत असलेले ग्रह , जातका बद्दल व त्याच्या संभाव्य प्रश्ना बद्दल सांगून जातात असा माझा नेहमीचा अनुभव आहे.

या पत्रिकेत लग्न (१) व सप्तम (७) अक्षावर शुक्र व मंगळ या निसर्गत:च पती-पत्नींचे प्रतिनिधीत्व करणार्‍याच राशी आहेत! जेव्हा तूळ रास लग्नी असते तेव्हा जातकाचा प्रश्न ‘नातेसंबंधा’ विषयक असतो. हा नातेसंबध बर्‍याच वेळा ‘पती-पत्नी’ मधला असतो पण तसा तो भाऊ , बहीण, आई-वडिल, सासू-सासरे, मेव्हणे , मुले, जवळचे मित्र यांच्याशी असलेल्या नातेसंबंधा विषयी सुद्धा प्रश्न असू शकतो. काही वेळा प्रश्न ‘प्रेम प्रकरणा’ बद्दलही असू शकतो.

लग्नी तूळ रास असल्या मुळे सप्तमभावारंभी मेष रास येणार हे स्वाभाविकच आहे. अशावेळी प्रश्न ‘पती-पत्नी’ मधल्या संबंधाचा असल्यास , पती-पत्नीत तणाव असतो , काही अप्रिय घटना घडलेल्या असतात किंवा घडण्याची शक्यता असते.

आदितीच्या बाबतीत पती-पत्नी मधले वितुष्ट हेच कारण असावे असे मला प्रकर्षाने वाटले याचे कारण म्हणजे सप्तमभावारंभीच असलेला ‘युरेनस’ ! हा महाभयंकर, उत्पाती ग्रह सप्तमस्थानात (जे विवाहाचे , वैवाहीक जीवनाचे प्रमुख स्थान मानले जाते) असणे हे काही संसार सुखा-समाधानाने चालू असल्याचे लक्षण निश्चीतच नाही.

त्याचवेळी माझी नजर ‘चतुर्थ भावारंभी’ असलेल्या प्लुटो कडे गेली आणि मी हादरलो, हा प्लुटो नुसता चतुर्थ भावात नाही तर तो चतुर्थभाव बिंदूवरच आहे , अगदी अंशात्मक! म्हणजे आदिती आणि तिच्या नवर्‍या मधले वितुष्ट हे साधी कुरबुर नसून प्रकरण भलत्याच थराला पोहोचले असावे. चतुर्थ स्थान हे कुटुंब स्थान तर आहेच शिवाय ते हे ‘सगळ्याची अखेर’ ही मानले जाते, त्यात आता प्लुटो सारखा विध्वंसक ग्रह म्हणजे काही बोलावयास नको, संसाराची ‘राखरांगोळी’!

प्लुटोचे कारकत्व पाहीले असता हा ग्रह ‘नष्ट करतो आणि पुन्हा: नव्याने निर्मिती करतो’ म्हणजे आदितीचा संसार प्लुटोच्या कृपेने (?) उध्वस्त झालाही असेल किंवा होण्याच्या बेतात आहे आणि आदिती पुन्हा नव्याने संसार उभा करण्याच्या प्रयत्नात असेल. प्रश्न कदाचित या बद्दलही असू शकेल.

आदीती साठी तयार केलेल्या या पत्रिकेत तूळ लग्न असल्याने, ‘शुक्र’ आदितीचे प्रतिनिधीत्व करेल. हा शुक्र अष्टमात आहे! अष्टम स्थान हे ‘मृत्यू’ स्थान मानले जाते,तसेच ते कष्ट, मानहानी, अपमान, मन:स्ताप यांचेही स्थान आहे. विमा, नुकसान भरपाई, पोटगी अशा मार्गाने होणार्‍या धनप्राप्तीचेही हेच स्थान आहे. या स्थानात आदिती (म्हणजेच शुक्र) असणे याचाच अर्थ आदिती सध्या मोठ्या अडचणीत आहे. मन:स्ताप, मानसीक छ्ळ,बदनामी, विमा,पोटगी,नुकसानभरपाई अशा प्रकारच्या काही आर्थिक विवंचना या बाबतीतही आदितीचा प्रश्न असू शकेल.

शुक्र अगदी नुकताच शनीच्या प्रतियोगातून (०१:२७ सेपरेटींग) बाहेर पडला आहे किंबहुना तो अजूनही शनीच्या प्रतियोगातच आहे असे म्हणता येईल ! शुक्रा सारखा विलासी, कलासक्त, शृंगारीक ग्रह , शनी सारख्या रुक्ष,निरस, वृद्ध , कळाहीन, मंद ग्रहाच्या प्रतियोगात असेल तेव्हा काय होऊ शकते ? ‘भावनिक आणि लैगीक कुचंबणा, नुसती कुंचबणा नव्हे तर चक्क उपासमार’!! आदितीचा प्रश्न या बाबतीतही असू शकेल.

शुक्र आगामी काळात युरेनसशी अर्धकेंद्र योग (११ अंशात) करणार आहे म्हणजे आदितीच्या विवाहा संदर्भात नक्कीच काहीतरी खळबळजनक आणि अशुभ अशी घटना घडण्याचे संकेत आहेत. काय असू शकतील या घटना? वैवाहीक जीवन संपुष्टात येणे अथवा वैवाहीक जीवनात मोठ्या अडचणीं निर्माण होणे.

चंद्र जो जातकाचे (आदीती) प्रतिनिधीत्व करतो, या चंद्राने तो सध्याच्या राशीत आल्यानंतर आत्तापर्यंत केलेले ग्रहयोग आणि चंद्र सध्याची रास सोडून पुढच्या राशीत जाण्यापूर्वी होणारे ग्रहयोग आपल्याला अनुक्रमें नुकतेच काय घडले असावे आणि नजिकच्या काळात काय घडू शकते याचा अंदाज देतात.

पत्रिकेत चंद्र मकरेत ९:३० अंशात आहे, मकरेत आल्यापासुन त्याने नेपचुन शी लाभयोग आणि बुधा बरोबर प्रतियोग केला होता. नेपचुन वा बुध यांच्याशी झालेले हे योग, सुचवतात की आदिती मोठ्या वाद-विवादात, भांडणात गुंतली होती, भरीला फसवणूक, पोकळ आश्वासने, अपेक्षाभंग यातून आलेले नैराश्य, भावनिक छळ, मानसिक कौंडमारा यापैकी कशाला तरी तीला सामोरे जावे लागले असेल.

चंद्र मकरेतून बाहेर पडे तो मंगळाशी केंद्र योग (३ :१३ अंश), प्लुटोशी युती योग (३ :१६ अंश) युरेनसशी (६ :२६ अंश) केंद्र योग करणार आहे ! हे सगळे योग घातक , विस्फोटक आहेत. या योगांवर भावनीक, मानसिक कोंडमारा,छ्ळ, लैगीक शोषण, अत्याचार, मारहाण, अपघात असे काहीही असू शकेल.

सप्तम भावावर मेष राशी असल्याने , आदितीच्या नवर्‍याचे प्रतिनिधीत्व ‘मंगळ’ करेल.
(मंगळ लग्नात असल्या मुळे आदितीचे प्रतिनिधित्व करु शकतो, जेव्हा एक ग्रह दोन्ही पक्षांचे एकाच वेळी प्रतिनिधीत्व करतो अशा परिस्थितीत त्या ग्रहाला ‘डिस्पुटेड प्लॅनेट’ घोषीत करुन तो विरुद्ध पक्षाला (प्रश्नकर्ता आपला पक्ष) बहाल करतात, या पत्रिकेत मंगळ आदितीच्या नवर्‍याला बहाल केला आहे)
युरेनस सप्तमस्थानात असल्याने तोही आदितीचे नवर्‍याचे प्रतिनिधीत्व करेल. या दोघांशी होणारे चंद्राचे अशुभ योग काय सांगतात? आदितीचा विवाह धोक्यात आहे!! त्यात चंद्र अगदि लौकरच प्लुटो शी युती करणार आहे , मग काय विचारुच नका!

आतापर्यंतच्या विष्लेषणातून आपल्या हे लक्षात आले आहे की आदितीचा प्रश्न खात्रीने वैवाहीक जीवना बद्दल असणार आहे आणि आदिती सध्या फार मोठ्या खडतर परिस्थितीतून जात आहे.

प्रश्न वैवाहीक जीवना संबंधी असण्याची शक्यता असल्याने आदितीच्या नवर्‍याची हालहवाल काय आहे हे बघणे ओघानेच आले.

मंगळ (आदितीचा नवरा) तुळेत आहे म्हणजे तो मुळातच कमकुवत आहेच, त्यातच तो लग्नी असल्यामुळे असून शत्रुपक्षा च्या गोटात आहे ! म्हणजे आदितीचा नवरा देखील फार सुखा-समाधानात नाही, त्याच्या समोरही अडचणींचे डोंगर अभे असतील.

मंगळ लग्नबिंदू वरच आहे ,आदितीच्या नवर्‍याच्या अंगाने पत्रिका पाहीली तर (म्हणजे सप्तमस्थान लग्न स्थान मानले तर) मंगळ सप्तमबिंदू वर येतो. याचा अर्थ वैवाहीक जीवनात, नातेसंबंधात जबरदस्त समस्या! मंगळ हा ग्रह मुळातच’तोड-फोड,मारा-काटा’ वृत्तीचा असल्याने आदितीच्या नवर्‍याचा संसार (म्हणजेच आदितीचा संसार) तुटण्याचा बेतात आहे!

युरेनसा सारखा वादळी, विक्षीप्त, सनसनाटी ग्रह आदितीच्या नवर्‍याच्या लग्नस्थानात असणे म्हणजे युरेनस अशा प्रकाराची फळें नक्कीच देत असणार! हे त्याला, आदितीला आणि पर्यायाने त्यांच्या संसाराला अत्यंत घातक ठरु शकते.

त्यात हा मंगळ अगदी लौकरच (३ :१३ अंशात) ह्या युरेनस शी प्रतियोग करणार आहे, म्हणजे युरेनस जे काही थैमान घालत आहे किंवा घालणार आहे त्याला आता मंगळाची हिंसक ताकत मिळणार आहे, आगीत तेल ओतले जाणार आहे (बिच्चारी आदिती!)

आदितीच्या दृष्टीने पाहीले तर मंगळ आणि राहु लग्नी येतात तर आदितीच्या नवर्‍याच्या अंगाने पत्रिका बघितली तर हेच ग्रह सप्तमस्थानात येतात. सप्तमात दोन-दोन पापग्रह असो किंवा लग्नातले सप्तमावर दृष्टी टाकणारे पापग्रह असो, एकंदर परिणाम काय ते वेगळे सांगायला हवे काय? वैवाहीक सौख्य नाहीसे होणे, विवाह मोडणे, दुसरा विवाह करावा लागणे…काहीही..

युरेनस जो आदितीच्या नवर्‍याचे प्रतिनिधीत्व करतो, तो नुकताच प्लुटो शी झालेल्या केंद्र योगातून बाहेर पडलेला आहे (०३:१० अंश) , याचा अर्थ आदितीच्या नवर्‍याच्या नोकरी-व्यवसायात फार मोठा ‘राडा’ झाला असणार ! त्याचा अनिष्ट परिणाम त्यांच्या संसारावर निश्चीत झाला असणार. (‘राडा’ हा शब्द काहीसा असभ्य आहे, तो वापरल्या बद्दल मला क्षमा असावी पण ही परिस्थिती यथार्थपणे व्यक्त करायला दुसरा समर्पक शब्द आत्ता ह्या घटकेला तरी मला सुचत नाही, अन्यथा माझ्या ब्लॉग वर आपल्याला असले असभ्य शब्द वापरलेले कधीही सापडणार नाहीत)

आणि ह्या सगळ्यावर मात, अगदी कडेलोट म्हणता येईल असा ‘मंगळ- प्लुटो’अंशात्मक केंद्र योग (००:०३ अंश !!!!) . आता बोला.

आता या सार्‍याचा विचार करता आदितीबाईंचा प्रश्न त्यांच्या ‘वैवाहीक’ जीवनाबद्दल असणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्र ही शंका उरली नाही. एव्हढेच नव्हे प्रकरण एव्हाना घट्स्फोटाच्या ऊंबरठ्यावर येऊन पोहोचले असणार असेही अनुमान काढता येईल.

शुक्र (आदिती) आणि वक्री शनीचा अंशात्मक प्रतियोग , होऊ घातलेला चंद्र- युरेनस केंद्रयोग, लग्न स्थानचे मंगळ व राहु , मंगळाचा म्हणजेच आदितीच्या नवर्‍याचा आणि सप्तमातल्या युरेनस चा होऊ घातलेला प्रतीयोग, मंगळ प्लुटोच्या अंशात्मक केंद्रयोगात. आणि या सगळ्या वरताण म्हणजे, चंद्र जो आदितीचे प्रतिनिधीत्व करतो , तो एकाच वेळी , मंगळाशी (आदितीचा नवरा) केंद्र्योग आणि चतुर्थ स्थानारंभी असलेल्या प्लुटो बरोबर युती करणार आहे .

हे सर्व एकमुखाने सांगताहेत : आदितीबाई मोठया अडचणीत आहेत, पती-पत्नीत कमालीचे वितुष्ट निर्माण झाले आहे, आणि याची परिणिती महाविस्फोटक घटनेत होणार आहे ती म्हणजे

‘घ-ट-स्फो-ट !

काय असेल आदितीचा प्रश्न ? काय उत्तर मिळाले? शेवटी काय घडले?

त्यासाठी पुढच्या भागाची प्रतिक्षा करा…
शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
 1. ashok kulkarni,Indore.

  Gokhale saheb sadar namskar,mi maze quest.tumhala sangitale hote I hope te tumchya kade astilach.tya prashnachya uttarasathi apan mhatlyapramane tyachi fees mi ICICI bank madhe 1-2 divsat jama karun din.Tari apan majhya kundalicha abhyas karun thewa.fees jama jhali ki mi tumhala kagecha sangto.actually me pratyaksh Nashikla yaycha tharval hote pan te ata sadhya vijya dashmi (dashara) paryant jamnyasarakh nahi. tari mazya manat ekda ka hoina bhet denyachi ichcha aahe.wa me ti purn karnyacha mi prayatn karin.majha contact No.918989464787 aahe,awashyakta aslyas ya No.war apan sampark karava. hi vinanti.OK.shubham Bhawanti.

  0
 2. प्रसाद सरदेसाई

  सर आपण कंसल्टेशन चार्ट किंवा कुंडली बनवण्यासाठी कोणते software वापरता.

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्रसादजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद

   मी भारतीय पद्धतीच्या कुंडल्या बनवण्या साठी KP STar One हे सॉफ्टवेअर वापरतो. पाश्चात्त्य पद्धतीच्या कुंडली साठी मी बहुतेक वेळा ऑन लाईन पत्रिका बनवून देणार्‍या वेब सर्विसेस वापरतो (उदा http://www.astro.com) कधी माझ्या फिरंगी मित्रां कडून (त्यांची सॉफ्टवेअर्स वापरुन ) पत्रिका बनवून घेतो.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.