“नाडकर्णी … यु बास्टर्ड … गेट औट … तुला आत्ताच्या आत्ता कामावरुन कामा वरुन काढून टाकतोय मी..”
“मि. जाधव ह्याचे काय पेपर्स असतील ते लगेच माझ्याकडे पाठवून द्या आणि लिगल डिपार्ट्मेंटला सांगून डिसमीसल ची ऑर्डर बनवून घ्या क्वीक .. कामाच्या ठिकाणी दारु पिऊन गैरवर्तन केले असे कलम लावा… आणि फॉर गॉड्स सेक, या जनावराला ताबडतोब ऑफिसच्या बाहेर हाकलून द्या, कॉल सिक्युरिटी फर्स्ट…… ब्लडी ड्रंकार्ड …”
—————
“तु लग्न का नाही रे केलेस… कॉलेजात असताना कित्ती मुली मरत होत्या तुझ्यावर..”
काळजात चर्र झाले… बाकीच्या मुलींचे सोड … तू मरत नव्हतीस का माझ्यावर… तुझ्या वहीच्या मागच्या पानावर कोणाचे नाव होते तेव्हा..सांग ना ..
मी का नाही लग्न केले ?
… काय सांगू तुला. आणि आता सांगून तरी काय उपयोग म्हणा..घरच्यांनी काय कमी का प्रयत्न केले , लग्ना नंतर सुधारेल म्हणे… जॉनसन ची नोकरी मिळाल्यानंतर तर काय बघायलाच नको…पण एका ही मुली कडे ढूंकून ही पाहीले नाही… तुझी सर येणार होती का कोणाला ?
…तशी त्या कर्णिकांची मुलगी.. चारुलता … बरी होती .. अगदी तुझ्या सारखी नसली तरी बरी होती.. साईड ने बघितली तर तुझाच भास होईल.. पण तिच्या मामाला दारुचा वास आला… येणारच , दोन पेग टाकूनच तर गेलो होतो त्यांच्या घरी.. … माझ्या हातातली पोह्याची बशी खाता खाता हिसकावून घेतली साल्याने आणि दंडाला धरुन भर बैठकीतून हाकलून दिले…ती चारुलता फिस्सकन हसली
… त्या दिवशी रात्री जरा जास्तच घेतली मी . माझा स्टॅमीना कीती वाढलाय हे तेव्हा कळले.. …..
…..
“डार्लिंग, जेवायचे बघतेस ना ? यांना येऊन बराच वेळ झालाय .. ही मस्ट बी हंग्री..”
मी हंग्री होतोच , तेव्हा पण आणि आत्ता ही, पण तू मला मिळाली नाही म्हणून दुसर्याच्या हातून तुला हिसकावून घेण्या ईतका वखवखलेला ही नाही मी…
ती पाने घ्यायला आत गेली….. मंजुळ संगीत वाजले… त्याने हॉल मधल्या मिनी बार चे दार उघडले होते… नक्षीदार बाटल्यांची आणि किणकिणणार्या ग्लासांची आरास मांडली होती..
“काय घेणार…”
“नाही, मी ड्रिंक्स घेत नाही…”
मी हे असे बोलू शकलो ? गेल्या तीस वर्षात दारु घेतली नाही असा दिवस गेला नाही.. तरी मी असे बोलू शकलो ?
“अहो, घ्या ना थोडीशी, ह्यांना कंपनी म्हणून .. माझ्या जावयाचे पाठवलाय कसलासा इंपोर्टेड ब्रँड … व्हिंटेज आहे म्हणे.. हो ना रे डार्लिंग..”
“येस , हनी, मि. नाडकर्णी, यु आर लक्की.. एकदम व्हींटेज स्टफ आहे… तुम्ही सुम्मी चे तिच्या कॉलेजातले मित्र म्हणून स्पेशल तुमच्या साठी खोलतोय..”
“आय फेल्ट हॉनर्ड मि. सरपोतदार , पण सॉरी मी खरेच ड्रींक्स घेत नाही.. प्लीज..”
“इट्स ऑल राईट , मि. नाडकर्णी..लेट्स स्टार्ट विथ द लंच.. डार्लिंग , आज काय मेन्यू आहे , आपल्या या स्पेशल गेस्ट साठी… यु नो मि. नाडकर्णी , सुम्मी चे कुकिंग म्हणजे..”
तो सरपोतदार नंतर बरेच बोलत होता.. माझे त्याच्या कडे लक्षच नव्हते..
………..
फाडकन कानफाटात बसली… घेतलेली क्षणार्धात उतरली… शेवटी जाधव सरांनाही राग आवरला नाही…
“नाडकर्णी… किती म्हणून तुम्हाला सांभाळायचे … त्याला ही काही लिमिट असते … जा बाबा आता मी काही करु शकत नाही तुझ्या साठी…”
“पण सर..”
“नाडकर्णी , आता या पुढे काही शक्य होणार नाही.. झाला एव्हढा तमाशा बास झाला … बर्या बोलाने आता इथून चालते व्हा… देव तुम्हाला सदबुद्धी देओ…”
जाधव सरांच्या डोळ्यात पाणी आले..ते तरी काय करणार म्हणा… जॉनसन ची नोकरी गेल्यावर त्यांनीच स्वत: शब्द टाकून मला त्या ओस्तवाल च्या औषधाच्या फॅक्टरीत प्यॅकीग करायच्या कामावर चिकटवले होते… काही दिवस बरे गेले.. दारु ही कमी पीत होतो.. एकदम कशी सोडणार… तो लॅबोरेटरीतला चौहान भेटे पर्यंत सगळे चांगलेच चालले होते…एकदा चौहाने ने ते स्पीरिट आणि काय काय रसायन घालून केलेले ड्रिंक प्यायला दिले म्हणाला
” मुझे मालूम है के तू उस औरत की याद में …ये नुस्का एक बार ट्राय करले यार सबकुच भूल जावेगा तू…”
…ओस्तवाल ने पहिले कुत्र्यासारखे बडव बडव बडवले, अक्षरश: तुडवले पायाखाली.. मग जाधव सरांना बोलावले फोन करुन..
….
अॅडव्होकेट कामतांनीच ही चाळीतली खोली मिळवून दिली , कॉमन संडासाला लागूनच असल्याने इथे बरीच वर्षे कोणीच राहीले नव्हते … चाळीचे मेंटेनन्स चे काही जुने सामान, भंगार आणि उंदीत –घुशी ! …
कामत म्हणाले ..नाडकर्णी निदान इथे तरी नीट रहा.. कसे का असेना डोक्यावर छ्प्पर आहे ना … फुटपाथ पेक्षा बरे.. थोडा संडासाचा घाण वास येणार पण सहन करा आता.. शंभुनाथांची पुण्याई म्हणून इतक्या कमी भाड्यात ही जागा मिळालीय … तेव्हा जरा कमी-जास्त चालायचेच..
झाडलोट आणि झाडांना पाणी घालायचे महीना सहाशे रुपये देतो असे चाळीचे सेक्रेटरी म्हणाले आहेत .. आता निदान तेवढे काम मात्र न चुकता करा… नाहीतरी इथूनही गचांडी देतील… काय अवस्था करुन घेतलीत नाडकर्णी तुम्ही …
डोळ्याच्या कडा पुसत कामत निघून गेले..
मला बघायला बरीच गर्दी जमली होती तेव्हा..
(क्रमश:)
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020