भाग ४ वरुन पुढे चालू  ………….

कित्ती वेळ फोनची रिंग वाजत होती … नंबर चुकीचा तर नसेल ना ? शेवटी कोणीतरी फोन उचलला …
“हॅलो…”
“सौ. सुमित्रा सरपोतदार आहेत का ..मला त्यांच्याशी बोलायचे आहे.?”
“मी सुमित्रा सरपोतदारच बोलत्येय .. आपण कोण ?”

कित्ती वर्षाने ऐकला आवाज तीचा….तीही आता माझ्याच वयाची की पण आवाज नाही बदलला अगदी कॉलेज मध्ये ऐकला होता तसाच गोड … दिसायला पण तशीच राहीली असेल का ?
“मी नाडकर्णी ..”
“कोण नाडकर्णी ? आणि हे पहा ऑफीसचे काही काम असेल तर या नंबर वर फोन करु नका प्लीज”
“मला ओळखलं नाहीत तुम्ही?”
“सॉरी.. मी खरेच ओळखले नाही आपल्याला..कोण आपण?”

कशी ओळख ठेवशील माझी तू… त्या बोकडाशी लग्न लावलेस तेव्हाच सगळे काही विसरुन गेली असशील ना…एक आंवढा गिळला … थोडा घसा खाकरुन बोललो..

“मी नाडकर्णी… आपण रुईया कॉलेजमध्ये एकत्रच शिकायला होतो…आठवतेय.?”

“अच्छा म्हणजे ते नाडकर्णी होय तुम्ही … बाई ग ..तुमच्या आवाज मला ओळखायलाच आला नाही… सॉरी हं..”
“अहो सॉरी काय … तसा माझा आवाज खूपच बदलला आहे इतक्या वर्षात ..”
“हो ना , कित्ती वर्षे झाली असतील नाही ..”
“ तीस”
“तुम्ही बरे लक्षात ठेवलेत…”

तू विसरली असशील ग ,पण मी ? मी कसा विसरेन.. तुला कसे सांगू …एक एका क्षण मोजलाय तुझ्या नावाचा …
“कोठे असता तुम्ही…आय मीन कुठून बोलताय तुम्ही ? ”
“याच गावात आहे मी गेली पंचवीस वर्षे..”
“कमाल आहे …आम्हाला इथे शिफ्ट होऊन तशी दोन एक वर्षे झालीत. पण तुम्ही याच गावात आहात हे आज कळतेय मला .”
“मला ही तुम्ही इथे शिफ्ट झाल्याचे काल परवाच कळले , तुम्ही आधी पंजाबात भटींड्याला बरीच वर्षे होतात”
“अय्या, तुम्हाला कसे माहिती हे …काय माझ्या मागा वर होतात का काय …”
“नाही हो… तसे काही नाही… असेच कधीतरी कोणा कडून तरी कळले इतकेच “
“मग आमचा फोन नंबर..”
“डॉ. देशमाने. त्यांनी सांगीतले… ते आणि मि. सरपोतदार एकाच क्लब मध्ये टेनिस खेळतात..”
“काय करता तुम्ही सध्या … तुमच्या पप्पां सारखी तुमची पण प्रॅक्टीस जोरात असेल म्हणा ..”
“नाही… मी एल एल बी पूर्ण करु शकलो नाही..”
“ओ सो सॉरी…अय्य्या पण हे काय .. आपण फोन वरच का बोलतोय सगळे ? तुम्ही आमच्या घरीच या ना , निवांत गप्पा मारु..कधी येता ?.”
“आपल्याला वेळ असेल तर आज –उद्या …”
“अं… आज उद्या नको… त्या पेक्षा असे करता का ..येत्या रविवारी या.. …मि. सरपोतदार टूर वर आहेत सध्या , ते शुक्रवार- शनीवार येतील परत … संडे वुड बी फाईन फॉर हिम अल्सो.. .. तुमची त्यांची ओळख पण होईल… मग येता ना रवीवारी… लंचला च या..”

………….

मला बघायला बरीच गर्दी जमली होती तेव्हा….

“ये बेवडा कायको लाके रख्खा इधर, ये क्या झाडू लगायेया .होश मैं तो होना चाहीये ना..”

“बेवडा है वो? लगता तो नही.. मुझे तो जंटलमन जैसा लगता है”

“हा, वैसा तो है बडे खानदान का है.. लेकिन..”

परब गेला.. चांदोरकर गेला.. जगदाळ्या.. संज्या … मग एके दिवशी जाधव सर…हा मला मिळालेला शाप आहे का .. सगळेच कसे मला सोडून गेले… राहीली ती फक्त दारु आणि तीची आठवण…ती माझ्या खांद्यावर डोके ठेऊन हमसाहमसी रडली असती ? कोणासा ठाऊक..
कसाही असला तरी तिचा तो नवरा होता.. तिला किती सुखात ठेवले होते त्याने… तो बंगला , ते वैभव.. प्रणव , प्रचिती सारखी मुलें… आणखी काय पाहीजे नाही का ?

मी यातले काय देऊ शकलो असतो ?

…………

तीला काय गिफ्ट द्यायचे … मी काय देणार म्हणा, माझ्या कडे होतेच काय द्यायला.. नाही म्हणायला एक चांदीचा झुमका होता… माझ्या आईने सुने साठी म्हणून कधी तरी हौसेने घेतला होता.. तो तसाच पडून होता… घरातल्या सगळ्या वस्तू विकल्या गेल्या … हा झुमका मात्र आईची आठवण म्हणून जपला होता… तोच तिला द्यायचे ठरवले..

तीने तो घेतला नाही… नाही घेत म्हणाली…

“डार्लींग , त्यांनी एव्हढे प्रेमाने आणलेय ना, अ‍ॅक्सेप्ट ईट.”

“….”

“जस्ट फॉर द सेक ऑफ फॉरम्यालिटी…”  —  सरपोतदार पाईपचा जोरदार झुरका घेत म्हणाला..

“कशी आहे गिफ्ट … मी गरीब काय देणार तुला..”

“असे नका बोलू… गिफ्ट छानच आहे . मला आवडली”

“आवडायलाच पाहीजे.. .. खूप जुनी वस्तू आहे, अ‍ॅन्टीक … माझ्या आईची आठवण म्हणून जपली होती”

“आणि ती तु मला देऊन टाकलीस ?”

आता तीला काय सांगणार ? आई तर केव्हाच गेली … शेवट पर्यंत सुन घरात आली नाही म्हणून तळमळत होती बिचारी… सुम्मी हा झुमका घालेल का कधी तरी ? … निदान एकदा तरी घालावाच…. आईच्या आत्म्याला तेव्हढेच बरे वाटेल…

सरपोतदाराने एक बॉक्स आणला…म्हणाला ही आमच्या कडून भेट .. स्विकारा नाही म्हणू नका..

“मला भेट ? नको…”

खरेतर मला म्हणायचे होते ..साल्या तू काय देणार मला गिफ्ट … सुम्मी भेटली, हीच सगळ्यात मोठी भेट नाही का.. तीला डोळे भरुन पाहिले… नजरेत साठवून ठेवले.. आता पुन्हा आयुष्यात दिसली नाही तरी चालेल.. नाही तरी आयुष्य असे राहीलेच किती… डॉ. देशमान्या तर म्हणालाच होता… नाडकर्णी वाया घालवलत हो सगळ…आता फार उशीर झालाय.. फार काळ राहीला नाही…

“मि. नाडकर्णी तुम्हाला गिफ़्ट घ्यावीच लागेल,  आम्ही नाही का तुमची भेट स्विकारली..

“ अहो पण.”

”ते काही नाही, तुम्हाला घ्यायलाच पाहीजे .. डार्लींग तूच आता समजाव ह्यांना.. “

“माझ्या साठी म्हणून घे ना ‘रमा’ .. प्लीज..”

डोक्यावर विजेचा लोळ कोसळावा तसे झाले मला… छातीत पण जोरदार कळ आली.. मला ती ‘रमा’ म्हणाली… मला ती ‘रमा’ म्हणाली.. हा रमाकांत नाडकर्णी आज धन्य झाला…

लाखो नाही करोडोंची दौलत उधळून टाकावी तिच्या या एका हळूवार ’रमा’ शब्दावर… होते नव्हते सगळे गमावून सुद्धा आज मी पराकोटीचा श्रीमंत आहे झालो …आज मी तृप्त आहे… बस्स आता दुसरे काही नको…अगदी दारु सुद्धा नको… आयुष्यात एकदा का होईना तीने मला ‘रमा’ म्हणून हाक मारली…

……जन्माचे सार्थक झाले…

मी थरथरत्या हाताने तिच्या हातून ते बॉक्स घेतले..

“सांभाळून ने रे”

“…”

“काही नाही मस्त Glenfiddich व्हिस्कीच्या बॉट्ल्स आहेत.. एकदम ओरिजिनल.. व्हींटेज…’

“ आम्हाला माहीतीय तू पितोस ते… “

“बट मि. नाडकर्णी , हॅट्स ऑफ टू यू… सुम्मीला आवडणार नाही म्हणून आयुष्यात पहील्यांदा आज दारुला नाही म्हणाला असाल नाही का?”

मी तिथे सोफ्या वरच कोसळलो असणार बहुदा… कारण नंतरचे काही मला आठवत नाही.. एकदम जाणवले ते मी घरी आहे… त्या सरपोतदारानेच मला घरी आणून सोडले असे तो विकी म्हणत होता.. त्या बाटल्या पण विकीनेच पळवल्या असणार ..

हरामखोर लेकाचा……

(क्रमश:)


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. Suresh

    Arere…tyachya nashibatach navati mhana na ti..!! Konas thauk mhana..aselahi…velevar jyotishala patrika dakhvali asti tar ti vel ali nasti 🙂

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.