………….
संज्या म्हणत होता म्हणजे त्याला कुठून तरी कळले म्हणे…ती त्या धटींगणा बरोबर पंजाबात भटींड्याला असते.. छातीत कळ उठली … संज्या दात काढत म्हणतो कसा.. धटींगण आणि भटिंडा कसे रिदमीक वाटतेयं … संज्याचा राग नाही आला तेव्हा … तिची बातमी तर कळली.
भटिंड्या ला जायचे का ? एकदा तरी तीला भेटावे, डोळे भरुन पाहावे असे वाटतेय… पण नकोच… सुखात असेल ती तिथे .. आपले ओंगळ तोंड दाखवून त्या सुखात बिब्बा कशाला घालायचा.. संज्याने पेग भरला.. ग्लास पुढे केला … कितवा कोणास ठाऊक……
हा संज्या पण गेला एके दिवशी… दारुच्या नशेत अपघात झाला म्हणतात… मी गेलो होतो ना घाटावर… पोष्टमॉर्टेम केलेली , कशीबशी शिवलेली बॉडी त्याची…पाहावले नाही… माझ्या बरोबरीचे सगळेच गेले. छे , आत्ता जाधव सर असायला हवे होते… आभाळा एव्हढ्या थोर मनाचा माणूस तो..
…..
सोसत नाही आताशा… जळजळ फारच वाढलीय… आंटी नवसागर जास्तच घालतेय हल्ली… सगळा भेसळीचा जमाना… वर आंटी म्हणते कशी, “तब्बेत यकदम डौन झाली सायेब तुमची .. कशाला पिता येव्हढे , घरी बघायला कोणी नाही का ? ”
…काय सांगू आंटीला.. आज ती सोबत असती तर ही वेळ आली असती का ? डोळे मोठे करुन , दटावून माझ्या हातचा दारुचा ग्लास तिने केव्हाच काढून घेतला असता .. पण मुळात ती असताना मी दारु घेतली असती का ?
किती घाण वास येत होता… आंटीच्या गुत्त्यावर पहिल्यांदा गेलो होतो… कळकट टीनपाटातले ते काळं पिवळे रसायन… नवसागराचा आणि आंबलेल्या गुळाचा दरवळ…त्या गुत्त्यावरच्या गिर्हाईकांच्या भुतावळींत मीच एकटा काय तो जंटलमन दिसत होतो..
ती हिडींबेच्या आकाराची , रासवट पण गोरीपान आंन्टी! तीलाच राहवले नाही म्हणाली … सायेब हिथे नका येऊ , ही जगह आपल्या सारख्यांसाठी नाही… पीटर बरोबर माल घरपोच करते , तब्बेतीत घरी बसूनच प्या..पीटर .. सायबांचे पार्सल घेऊन जा …
पीटर मग येतच राहीला … सुरवातीला माल पोचवायला , नंतर उधारीच्या वसुलीला आणि एके दिवशी उधारी फारच थकली म्हणून चाकू ने भोसकायला .. पीटर येतच राहीला … पीटरचा मार बसला नाही असा शरीराचा एक अवयव शिल्लक राहीला नाही… शेवटी तोच कंटाळला..
तसा देसायांचा विकी ही बडवतो मला अधून मधून पण बच्चा आहे अजून…पीटरचा हात कसा दणकेबाज होता…असली कडक पहील्या धारेचा माल असतो ना तस्सा… मार खाण्यात सुद्धा व्हरायटी असते… ब्रँड असतो! विकी आधी मार मार मारतो , मग कुठून तरी एक खंबा आणून देतो …म्हणतो घे बेवड्या, ढोस आणि मर एकदा …. आणि नंतर बाहेर जाऊन रडतो … मी बघितलेयं ना.
…………..
“मग मुले बाळें ?“
“प्रणव , थोरला मुलगा बेंगलोर ला असतो, आय.टी. त आहे.. गेल्याच वर्षी लग्न करुन दिले त्याचे.. आणि धाकटी प्रचिती.. अहमदाबादला असते, आर्कीटेक्ट आहे , जावयांचा डायमंड पॉलीशींग चा बिझनेस आहे..”
“मग काय सध्या तुम्ही दोघेच असता इथे..” मी उगाचच काही तरी बोलायचे म्हणून बोललो.
माझ्या समोर त्या अजगराने सुम्मीला विळखा घातला..
“येस , आम्ही दोघेच ..राजा राणी” अजगर फुत्कारले… आणि ती त्याच्या केसातून हात फिरवत मंद हसली…
टक्कल पडल्याची आयुष्यात पहील्यांदा खंत वाटली मला. आम्हाला , म्हणजे मला व तीला अशीच मुले झाली असती का प्रणव , प्रचिती… प्रणव माझ्या सारखा दिसला असता आणि प्रचिती डिट्टो तिच्या सारखी…
……………
“पुअर सोल…”. फ्रेनी स्टँपवाला …. आमच्या जॉनसन कंपनीची सेक्रेटरी… कायम मला हेच म्हणायची ..पुअर सोल.. काय चुक होते म्हणा तिचे … पुअर सोल… जेव्हा सगळ होते पण ‘ती’ नाही म्हणून कफल्ल्क आणि आता होतं नव्हतं ते विकून खाल्ल्यावर पुन्हा एकदा कफल्लक झालोच नाही का? अधिकृत कफल्लक … अधिकृत बेवडा…
फ्रेनीचा बोलण्याने तरी काय फरक पडला होता म्हणा.. पण तेव्हा तिचे ऐकायला पायजे होते… बिच्चारी किती कळकळीने सांगत होती …साला निदान एकदा तरी ऐकायाला हवे होते…
“इतका दारु काय कू पिता रे..”
“कोण म्हणते असे..”
“बाकी लोक चा मला माहीती नाय…पन ते परब हाय नी ते म्हणाला … फ्रेनी .. काय तरी कराया पायजे …तु एक टायम तेचे शी बोल नी , साला ते नाडकर्णी ऐकला तर तुजाच ऐकनार ….”
“परब काय पित नाही का … आम्ही एकत्र तर बसतो…”
“ए बाबा , मला ते काय सांगू नाय ..पण छोड ना यार हे दारु … बरबादी होयेल बग तुझी”
“तुम्ही लोक पण पिता ना?”
“ते आमचे धरमचा काय तरी असते बाबा, घेयाला लागते..पन ते कितना , येक चम्मच भर … प्योर वाईन असते..”
“शेवटी दारुच ना..”
“तुजेशी काय बहस करायचा … पण प्लीज ते दारु छोड ना यार..पछी ते जरा कम तरी कर नी… आनी तुला एक बात प्रायवेट मंदी बोल्ते हां, कोनाला पन काय पन बोलू नाय. ते डिसोझा साब हाये नी तेला तुझा समदा हिस्ट्री कललाय…परसो मिटींग मंदी बोलला .. तुझ्या अगेंष्ट कॅप्लेंट छे , आता काय तर ऐक्सन घेयाला पायजे म्हनून .. मी आपला तुला फ्रेंडशीप मध्ये सांगून टाकला… तवा आता तूच बघ …”
“फ्रेनी, तू माझ्याशी लग्न केलेस तर दारु सोडतो ”
फ्रेनी चक्क लाजली… पण लगेचच नाक उडवत म्हणाली …
“ते आता कसा काय जमणार… माझी मंगनी कवाच जाली ते फिरोज हाय नी तेचा बरोबर , सॉरी.. तुला लेट जाला…”
फ्रेनी लग्नाला तयार झाली असती तरी काय उपयोग म्हणा.. कुठे ही बसल्या नाकाची, घोगर्या आवाजाची ,गोलम्टोल फ्रेनी… आणि कुठे ती !
फ्रेनी चे ऐकायला पाहीजे होते का? तिचे ऐकायचे म्हणजे दारु सोडायची… दारु सोडली तर मी करु काय ? ..तीची आठवण विसरायला मग दुसरे काय आहे माझ्या कडे ?
……
(क्रमश:)
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
suhasji naykachya grahsthitiche andaje varnan kara.
श्री. विराजजी ,
हे काहीसे अवघड आहे, नायक तसा पाहीला तर गर्भश्रीमंत होता आणि दारुचे व्यसन होते या दोनच गोष्टींवरुन तर्क बांधणे मुश्कील आहे .
सुहास गोखले