मध्यंतरी मी युरेनियन ज्योतिष पद्धती साठी आवश्यक असलेल्या  90 /45 डिग्री डायल्स परदेशातुन मागवल्या होत्या, साधारण पणे 25 ते 30 दिवसांत त्या मिळतील अशी अपेक्षा होती पण  तब्बल 50 दिवस झाले तरी त्या पोहोचल्या नाहीत. मला जरा काळजी वाटायला लागली. काय झाले असेल ? डायल्स पोष्टात गहाळ झाल्या असतील काय? चोरीला गेल्या असतील काय? कस्टम्सवाल्यांनी अटकवून ठेवल्या असतील काय? एक ना दोन अनेक शंका मनात येऊ लागल्या.कधी मिळतील डायल्स?
के.पी.  होरारीने अशा पश्नांची उत्तरे चुटकी सारखी मिळतात आणि या ही वेळी ते मिळाले,  अचूक  ठाम आणि परखड…

खरे पाहिले तर असल्या क्षुल्लक कारणासाठी ज्योतिषशास्त्राला वेठीस धरणे बरोबर नाही,  असले प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या काही जातकांना मी परत सुद्धा पाठवले आहे.  सर्व प्रयत्न करून झाले आता अगदी भिंतीला पाठ लागली अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा आणि तेव्हाच  या पवित्र शास्त्राचा वापर व्हावा या मताचा मी आहे. जातकाच्या प्रश्नाचे उत्तर ही एक दैवी मदत आहे आणि ज्योतिषी ही दैवी मदत जातकाच्या पर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. तेव्हा उठसूठ आलतू फालतू कारणांसाठी ह्या दैवी मदतीला वेठीस धरू नये, ही सुविधा महत्त्वाच्या कामांसाठीच राखून ठेवावी.

असो, पण यावेळी मला खरेच तशी गरज वाटली, म्हणून मी ‘केव्हा मिळतील डायल्स?’ असा प्रश्न मनात धरून प्रश्न कुंडली मांडली.  माझा स्वतः:चाच प्रश्न असल्याने,  १-२४९ मधला नंबर घेण्यासाठी मी संगणकावरून एक  रॅंडम नंबर घेतला, तो नंबर मिळाला:  ‘११३’.

होरारी नंबर अनेक मार्गांनी घेता येतो. जातकाकडून  एक नंबर घेणे हा एक सर्वात जास्त उपयोगात आणला जाणारा मार्ग, काही ज्योतिषी साधारण पणे ३०० पानाचे एक पुस्तक जातकाच्या हातात देऊन त्यातले एखादे पान उलगडायला सांगतात,  काही जण १-२४९ हे क्रमांक असलेली  टोकन्स वापरतात, ही टोकन्स एका थैलीत  ठेवतात व जातक त्या थैलीत हात घालून एखादे टोकन काढतो, काही वेळा कॉम्प्युटर वा कॅलक्युलेटर चा वापर करून रॅंडम नंबर काढला जातो, काही जण नंबर घेण्याच्या भानगडीत न पडता सरळ जातकाने प्रश्न विचारला तीच वेळा धरून प्रश्न कुंडली मांडतात.

मला मिळालेल्या ह्या ‘११३’ नंबरची पश्नकुंडली खाली छापली आहे.

 

होरारी नंबर: ११३ (१ ते २४९ पैकी)
दिनांक: २६ ऑक्टोबर २०१३
वेळ:  १९:४८:०६
स्थळ:  नाशिक
के.पी, अयनांश:  २३-५७-३५
सॉफ्टवेअर:  केपी स्टार वन.

रुलिंग प्लॅनेट्स : शनी चंद्र शनी शुक्र रवी  राहू

या वेळी हा माझा स्वतः:चाच प्रश्न असल्याने,  ‘प्रश्न जेन्युइन आहे का,?’,  ‘उत्तर जाणून घ्यायची खरी तळमळ आहे का?’  याचा शोध घ्यायची काही आवश्यकता नाही, तरी पण आपण प्रोसीजर प्रमाणे जाऊया , नाही का?

आपण  आतापर्यंत पाहिलेल्या प्रश्नांपेक्षा हा जरा वेगळा प्रश्न आहे. या प्रश्नाला कोणता ‘सब’ वापरायचा? कोणते ‘प्रिन्सिपल  ‘हाऊस? कोणती सपोर्टींग हाऊसेस? हे प्रथम ठरवले पाहिजे.

परदेशाहुन डायल्स पाठवल्या गेल्या आहेत हे नक्की होते,  आतापर्यंत त्यांच्या कडून मागवलेल्या सर्वच वस्तू (सुमारे २० ग्रंथ व इतर बरेच काही) व्यवस्थित ठरलेल्या कालावधीत मिळाल्या आहेत , नेमके याच वेळी असे काय झाले असावे? गहाळ होणे किंवा चोरी या दोन शक्यता असू शकतात. त्यामुळे मी ‘चोरी / वस्तू हरवणे’ अशी समस्या आहे असे समजून हा प्रश्न सोडवायला घेतला.

डायल्स (वस्तू ) मिळाव्यात ही इच्छा म्हणजे (११) वे घर असलेच पाहिजे. आता आपल्याला हरवलेली /चोरीस गेलेली वस्तू सूचीत करणारा भाव घ्यायला लागेल तो कोणता हा प्रश्न निर्माण झाला, त्रितीय (३) स्थान डोळ्यासमोर आले कारण ह्या स्थानावरून  पत्र , संदेश अशा गोष्टींचा बोध होतो. पण जरा जास्त विचार करताना हे लक्षात आले की,  जरी या डायल्स पोष्टाने येणार असल्या तरी ते पार्सल आहे, पत्र / संदेश नाही त्यामुळे त्रितीय (३) स्थाना ला मी फारसे महत्त्व दिले नाही.  पैसे अ‍ॅडव्हान्स मध्ये भरले असल्यामुळे मी ह्या डायल्सचा मालकही आहे , स्वतः:च्या मालकीच्या जंगम (हालू शकणार्‍या, खरेदी -विक्री होऊ शकंणार्‍या) वस्तू व्दितीय (२) स्थानावरून बघितल्या जातात, म्हणून व्दितीय (२) स्थान  हरवलेल्या /चोरीस गेलेल्या वस्तू सूचीत करणारे स्थान म्हणुन नक्की केले. प्रश्नकुंडलीत (१) ले स्थान प्रश्नकर्त्याचे , (७ ) वे स्थान विरोधी पक्षाचे (चोर), चोरीला गेलेली वस्तू सापडणे म्हणजेच चोराचे नुकसान होणे आणि तो माझा फायदा म्हणून या चोराचे व्ययस्थान (६) विचारात घ्यायला पाहिजे.

म्हणून मी २,६,११ या स्थानाचा विचार करायचा ठरवले.

आता आपण प्रोसीजर प्रमाणे चंद्र काय दाखवतोय ते पाहू.
चंद्र दशमात (१०), लाभेश (११), चंद्र शनीच्या नक्षत्रात , शनी धनात (२), पंचमेश (५) आणि षष्ठेश (६)
म्हणजे चंद्राचे कारकत्व:  २,  ५, ६,१०, ११

म्हणजे चंद्राने २,६,११  ही तीनही स्थाने दाखवली म्हणजे प्रश्नाचा रोख अगदी अचूक , आणि प्रश्न अत्यंत तळमळीने विचारला आहे (असायलाच हवा, माझा स्वतः:चाच तर  प्रश्न होता).  याचा अर्थ प्रश्नकुंडली योग्य आहे, आपण पुढे जाऊ शकतो.

आता  नेहमीप्रमाणे लाभस्थानाच्या (११) सबचे कार्येशत्व पाहू. लाभाचा सब आहे चंद्र , त्याचे चे कार्येशत्व आपण बघीतले आहेच.चंद्र हरवलेली वस्तू (२), चोराचे नुकसान (६), आणि माझी ईच्छापूर्ती (११) या तीनही स्थानांचा कार्येश आहे.म्हणजे ‘डायल्स’ माझ्या पर्यंत पोहोचणार असा स्पष्ट संकेत लाभ स्थानाने दिला आहे.

एक महत्त्वाचा टप्पा पार पडला.  डायल्स मिळणार ह्याची मोठी शक्यता दिसते.  (२) आणि (६) या उरलेल्या  दोन्ही भावांचा सब आहे शनी, त्याचे कार्येशत्व: शनी धनात (२), पंचमेश (५) व षष्ठेश (६) , शनी राहूच्या नक्षत्रात , राहू धनात (२). शिवाय शनी राहू, बुध व रवीच्या युतीत मध्ये पण आहे. म्हणजे शनीही आपल्याल्या हव्या असलेल्या भावांचा कार्येश होत आहे. म्हणजे हा आणखी एक चांगला संकेत आपल्याला मिळाला आहे.

चला आता दशा-अंतर्दशा-विदशा बघायच्या.

प्रश्नाच्या वेळी शनी महादशा चालू होती. ती १९ एप्रिल २०३० पर्यंत. महादशा स्वामी शनी चे कार्येशत्व आपण पाहिले आहेच. शनी आपल्याला अनुकूल आहे, पण आता आपण शनी चा विचार ‘महादशा स्वामी’ म्हणून करत असल्याने त्याच्या सबचा होकार आहे का नाही ते तपासले पाहिजे. शनीचा सब आहे चंद्रम्हणजे :   २,  ५, ६,१०, ११ म्हणजे शनी महादशा स्वामी अनुकूल आहे. त्याचा सब ही अनुकूल आहे.

या शनीच्या महादशेत सध्या चालू असलेली अंतर्दशा ‘शनी’ ची ती २२ एप्रिल  २०१४ पर्यंत. मी या शनीच्या अंतर्दशेवरच विचार करायचे ठरवले. एकतर हा मोठा कालखंड आहे, डायल्स मिळाल्या तर याच कालखंडात मिळायला हव्यात, शिवाय ‘अ’ ग्रहाची दशा व ‘अ’ ग्रहाचीच अंतर्दशा नेहमीच बलवान असते. आता शनीच्या अंतर्दशे मधल्या विदशा पाहूया.

प्रश्न विचारतेवेळी चालू असलेली विदशा होती राहूची जी  २७ नोव्हेंबर २०१३ पर्यंत चालणार आहे. प्रश्न विचारला आहे २६ ऑक्टोबर २०१३ ला, हा एक  महिन्याचा कालावधी आहे या कालावधीत डायल्स मिळण्यासाठी शक्यता आहे, तेव्हा ही राहू विदशा अनुकूल आहे का ते  पाहू.

राहू धनस्थानात (२) असून  बुध , शनी व रवीच्या युतीत आहे.

शनी:  धनस्थानात (२), पंचमेश (५) आणि षष्ठेश (६), शनी राहूच्या नक्षत्रात , राहू धनात (२)

बुध: धनस्थानात (२), लग्नेश (१), दशमेश (१०), बुध गुरुच्या नक्षत्रात , गुरू दशमात (१०), सुखेश (४) व सप्तमेश (७)

रवी: लग्नात (१), व्ययेश (१२), रवी राहूच्या नक्षत्रात, राहू धनात (२)

म्हणजे  राहू  १,२,४,५,६,७,१० एव्हढ्या सर्व भावांचा कार्येश होतो. राहू हरवलेल्या /चोरीस गेलेल्या वस्तूसाठी ठरवलेल्या भावाचा (२) कार्येश आहे, तसेच (६) चाही कार्येश आहे.राहू अनुकूल आहे.राहूचा सब पण अनुकूल आहे का ते तपासले पाहिजे. राहू च्या बुधाच्या सब मध्ये आहे, बुधाचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच. बुध शनीच्या युतीत आहे त्यामुळे शनीचे (२), पंचमेश (५) आणि षष्ठेश (६), हे कार्येशत्वही त्याला मिळेल , शिवाय बुध हा संपर्क, दळणवळण, पत्रव्यवहार, पुस्तके इ. कारक आहेच. त्यामुळे डायल्स मिळवून द्यायला त्याची मदतच होईल. बुध प्रश्नाच्या वेळी वक्री अ‍सला तरी ११ नोव्हेँबर २०१३ला मार्गी होणार आहे.

म्हणजे आता आपली शनी-शनी -राहू ही साखळी तयार झाली. कालावधी आहे २६ ऑक्टोबर २०१३ (प्रश्न विचारला ती तारीख) ते २६ नोव्हेंबर २०१३.

म्हणजे सुमारे ३० दिवसांचा कालावधी आहे. या ३० दिवसात डायल्स मिळतील असे सांगणे मलाच कमी पणाचे वाटले. म्हणजे आपल्याला या राहू विदशेतल्या सुक्ष्मदशा पाहायला पाहिजेत.

राहूच्या विदशेत एकंदर तीन  सुक्ष्मदशां शिल्लक आहेत.

रवी: ०३ नोव्हेंबर २०१३ पर्यंत. रवी  लग्नात  (१), व्ययेश (१२), रवी राहूच्या नक्षत्रात, राहू धनात (२); रवीचा सब गुरु दशमात (१०), सुखेश (४) व सप्तमेश (७)
म्हणजे व्ययेश रवी आपल्याला अनुकूल नाही, रवीचा सब गुरु सप्तमेश म्हणजे चोरालाच अनुकूल . सबब रवीची विदशा आपल्या उपयोगाची नाही.

पुढची विदशा चंद्राची जी १७ नोव्हेंबर २०१३ पर्यंत असेल. त्याचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच.

पुढची (व राहूच्या अंतर्दशेतली शेवटची विदशा) मंगळाची. मंगळ: व्ययात (१२), त्रितीयेश (३) आणि अष्टमेश (८), मंगळ केतूच्या नक्षत्रात केतू अष्टमात (८) मंगळाचा सब बुध जरी अनुकूल असला तरी मंगळाचे  ८, १२ हे कार्येशत्व आपल्याला प्रतिकूल आहे.

फक्त चंद्राचीच सुक्ष्मदशा आपल्याला चालू शकेल, ही सुक्ष्मदशा  ०३ नोव्हेंबर २०१३ ते १७ नोव्हेंबर २०१३ अशी आहे.

मी सहज रुलींग प्लॅनेट्स कडे पाहिले, त्यात शनी दोनदा आला आहे, आपल्या साखळीत शनी दोनदा आहेच, चंद्र पण आहे, मंगळ रुलींग मध्ये नाही, रवी रुलिंग मध्ये असला तरी तो आपल्या साठी उपयोगाचा नाही. राहूचा राशीस्वामी शुक्र ही रुलींग मध्ये आहे, म्हणजे रुलींग प्लॅनेट्स नी  दुजोरा दिला आहे की डायल्स आल्या तर  त्या शनी – शनी- राहू – चंद्र या साखळीतच  अन्यथा नाही.

आता शेवटचा टप्पा राहिला तो म्हणजे ट्रान्झीटस् तपासणे.
आपण  निवडलेल्या चंद्राच्या सुक्ष्मदशेत फक्त १४ च दिवस असल्याने या कालावधी साठी मी चंद्राचे भ्रमण तपासायचे ठरवले. चंद्र- शनी, शनी-शुक्र(राहू), शनी-राहू, चंद्र-शुक्र (राहू) , चंद्र-राहू यापैकी कोणती जोडी मिळते का?

३ नोव्हेंबर रोजी चंद्र तूळेत असेल , राशीस्वामी शुक्र (राहू) ठीक आहे पण जोडी बनण्यासाठी शनी वा चंद्राची नक्षत्रे नाहीत.चंद्र नंतर मंगळाच्या वृश्चिकेत व त्या नंतर गुरुच्या धनेत जाईल पण या मंगळ व गुरु आपल्या साखळीत नसल्याने या राशी आपल्याला सोडाव्या लागतील. नंतर चंद्र शनीच्या मकरेत जाईल, मकरेत आपल्याला चंद्राचे नक्षत्र मिळते , म्हणजे शनीची रास व चंद्राचे नक्षत्र अशी जोडी मिळते, तो दिवस येतो ०९ नोव्हेंबर २०१३, मी हा दिवस नोंद केला , पण चंद्र लगेचच शनीच्या कुंभेत जाईल तिथे राहूचे नक्षत्र आहे, ते आहे ११ नोव्हेंबर ला. म्हणजे शनीची रास व राहूचे नक्षत्र ही जोडीही मिळाली. आता प्रश्न पडला कोणतीही जोडी निवडायची?

विचार केला शनी आहे, विलंब करणार म्हणजे पहिली जोडी सोडायला लागेल, 09 तारखेला बुध जो पत्रव्यवहार ,दळणवळण, संदेश यांचा कारक तोच वक्री आहे.  दुसर्‍या जोडीत राहू आहे व छाया ग्रहांना नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे, आणि योगायोग म्हणा वा नियतीचा संकेत  बरोबर याच दिवशी बुध मार्गी होत आहे, हा मी एक शुभशकुन धरला व दुसरी जोडी शनी-राहू नक्की केली.

११ नोव्हेंबर ला चंद्र कुंभेत (शनी) , राहूच्या नक्षत्रात जाईल. शनी च्या राशीतले हे राहूचे नक्षत्र  दिवसभर असल्याने या नक्षत्रात मला माझ्या डायल्स मिळणारच!

ता पुढचे काही सांगायला हवे का? बरोबर ११ नोव्हेंबरला दुपारी पोष्टमन ने डायल्स असलेले पार्सल माझ्या हातात ठेवले,  मी तयारीतच होतो,वेळ नीट लिहून घेतली: १४: १७ संगणक चालू करून ,उदित लग्न तपासले,   कुंभ  १८:१७:४३ शनी-राहू-चंद्र ! वार सोमवार होता म्हणजे परत चंद्र!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.