झाशीची राणी’ ही कथा/ अनुभव वाचल्या नंतर अनेक वाचकांनी या ‘अंकिता’ उर्फ ‘झाशीची राणी’ चे पुढे काय झाले ह्या बद्दल उत्सुकतेने विचारणा केली होती त्यासाठी हा पुरवणी लेख आहे, हा त्या कथेचा दुसरा भाग नाही. मुळ कथा जिथे संपवायची तिथेच संपवली आहे.

 

ज्यांनी ही ‘झाशीची राणी’  ही   कथा वाचलेली नाही त्यांनी कृपया ती आधी वाचावी आणि मगच हा लेख वाचायला घ्यावा, तरच संगती लागेल.

असो.

आता त्या दिवशी नंतर काय झाले?

‘मी झाशीची राणी आहे का इंदिरा गांधी हे सांगा’

हा अंकिताचे सवाल ऐकताच मी हतबुद्ध झालो. माझ्या समोर कोण बसले आहे , हे काय प्रकरण आहे याचा खुलासा व्हायला मला वेळ लागला नाही. ही सरळसरळ ‘मल्टिपल पर्सोनॅलीटी डिस ऑर्डर’ ह्या मानसिक आजाराची केस होती.

मला काय बोलावे , काय करावे हे सुचेना अगदी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने माझे ऑफिस हे माझ्या घरातच म्हणजे बाहेरच्या व्हरांड्यात थाटलेले असल्याने मला एक काम चटकन करता आले ते म्हणजे घरात जाऊन मी माझ्या पत्नीला बाहेर बोलावून आणले , येता येता पत्नीला सांगीतले,

“बाहेर एक मेंटल ची केस आहे, बाई माणूस आहे , तसा काही धोका नाही पण तू जरा बाहेर येऊन तिच्या शेजारी थांब, घाबरु नको, मी परिस्थिती व्यवस्थित हाताळतो, फक्त काही न बोलता त्या मुली च्या शेजारी थांब”

हे असे करायचे मुख्य कारण म्हणजे अचानक ह्या अंकिताने आरडाओरड सुरु केला असता तर मी त्या प्रकरणात पुरता अडकलो असतो, ऑफिस मध्ये मी एकटा समोर एक पंचविशीतली तरुणी , आरडाओरड करते आहे याचा काय अर्थ निघाला असता याचा तर्क आपण करु शकाल. ही आफत नको म्हणूनच मी माझ्या पत्नीला बोलावून त्या अंकिताच्या जवळ थांबायला सांगीतले.

बचावा साठीची ही पहीली कृती केल्यानंतर आता पुढचा प्रश्न या झाशीच्या राणी ला हाताळायचे कसे?

“अंकिताजी , सॉरी, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही, आपण येऊ शकता (म्हणजे जा आता)” असे म्हणणे सोपे असले तरी  अंकिताचा एकंदर अविर्भाव / मनाची तयारी, उत्तर मिळवायचेच ही दृढता आणि तिचे ते बटाट्या सारखे बाहेर आलेले थिजलेले डोळे पाहता माझे हे उत्तर अंकिताने स्विकारले नसते हे नक्की, असे उत्तर दिले असते तर ती बिथरली असती आणि हिस्टेरीक होत तीने काय केले असते याचा आपल्याला अंदाज सुद्धा करता येणार नाही!

बटाट्या सारखे डोळे करुन ती जेव्हा माझ्याकडे बघायला लागली तेव्हाच मी ओळखले की ही त्या MPD च्या ट्रान्स मध्ये आली आहे, आता ही कोणत्याही क्षणी ‘तलवार फिरवायला’ सुरवात करेल , म्हणजे उन्मादात जाईल , व्हायोलंट होईल. मग तिला आवरणे मलाच काय आणखी चार माणसांना एकत्रित रित्या सुद्धा शक्य झाले नसते. त्यामुळे अंकिताला समजाऊन, चुचकारुन, वेळप्रसंगी खोटे नाटे बोलून शांत करणे आणि ती स्थिरावली की तीची पाठवणी करणे असे काहीतरी करणे भाग होते.

आता मला ताबडतोब बाहेरच्या मदतीची गरज होती, कोणाला हाक मारावी? पोलीस ? जवळचे एखादे हॉस्पीटल? शेजारी-पाजारी? का अंकिताचे घरचे लोक? पण अंकिताच्या घरच्या लोकांशी कसा संपर्क करणार? त्यांची काहीच माहीती मला नव्हती. जर अंकिताचा फोन हातात आला असता तर अंकिताच्या कॉल हिस्टरी वरुन / अ‍ॅड्रेस बुक वरुन नंबर मिळवून काही फोन करुन तिच्या नातेवाईंका पर्यंत पोहोचता आले असते. तेव्हा काहीतरी करुन अंकिताचा फोन मिळवणे अत्यावश्यक होते. ते कसे जमवायचे ?

पण त्या दिवशी माझी वेळ चांगली होती , मी हा विचार करत होतो न होतो तोच दारा समोर एक रेनॉ डस्टर गाडी आणि पाठोपाठ एक मोटारसायकल येऊन उभी राहीली , एकंदर तिघे जण माझ्या घराच्या गेट वर धडकले. गेट वरुनच जोरदार आवाज आला…

“अहो जरा बाहेर येता का?

“कोण?”

“तुमच्या घरी आत्ता एक पंचवीस वयाची कोणी तरुणी आली आहे का?”

“असे का विचारता?”

“अहो, ती तरुणी आमची बहीण आहे , ती मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब्ड आहे , घरात कोणाला न सांगता बाहेर पडली आहे म्हणून आम्ही तिला हुडकतो आहे, तुमच्या दारात उभी असलेली ही पांढरी अ‍ॅक्टीव्हा आमचीच आहे म्हणजे आमची बहीण इथेच कोठे तरी आहे “

“तुमच्या बहीणीचे नाव काय?”

“अंकिता, पांढरी साडी नेसली आहे, हातात एकच मोठी बांगडी आहे मीना काम केलेली”

“बरोबर , त्या माझ्या ऑफिस मध्ये बसल्या आहेत आत या आणि  घेऊन जा तुमच्या बहीणीला”

मला एकदम हायसे वाटले, मोठ्या कचाट्यातून सुटल्या सारखे वाटले.

मोठ्या भावाने काळजीच्या सुरात विचारले.

“तिने काही त्रास नाही ना दिला तुम्हाला”

“नाही , काही त्रास सुरु व्हायच्या आतच तुम्ही आलात , बरे झाले”

अंकिताचे भाऊ आत आले  आणि त्यांना पाहताच अंकिता नुसती दचकली नाही तर चक्क घाबरुन थरथर कापायला लागली आणि दुसर्‍या क्षणी ती किंचाळली …

“नाही , नाही , मी चुकले दादा, पण आता पुन्हा नाही करणार, दादा मला मारु नकोस रे, मला कोंडून ठेऊ नको,  हे काका मला मी झाशीची राणी का इंदिरा गांधी ते सांगणार आहेत ते सांगून झाले की मग आपण घरी जाऊ. मी तुमचे सगळे ऐकेन पण मला मारु नका..”

”अंकिता, कोणी तुला मारणार नाही की काही नाही. आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत, चल आमच्या बरोबर , तुला कोणी बोलणार नाही , मारणार नाही. कोंडून ठेवणार नाही”

“दादा , नक्की ना? मला मार नकोय रे, खूप लागते रे, मी चांगले वागेन रे अगदी नक्की,  आई शप्पथ , पण मला मारु नका रे मला कोंडून ठेऊ नका रे…”

अंकिता खुर्चीचा हात धरुन गच्च रुतुन बसली होती , काही केल्या ती खुर्चीतून उठायला तयार नव्हती अंकिताच्या मोठ्या भावाने आणि त्याचा सोबत आलेल्या दुसर्‍या व्यक्तीने, जो अंकिताचा चुलत भाऊ होता, अंकिताच्या दंडाला धरुन ओढायला सुरवात केली तेव्हा मी त्यांना थांबवले..

अंकिताला एक स्माईल देत म्हणालो..

“अंकिताजी, आपण सेलेब्रिटी आहात ना”

“हो तर मी इंदीरा गांधी आहे आणि झाशीची राणी सुद्धा”

“आणि तुमची पत्रिका स्पेश्यल असल्याने ज्योतिषांनी तुमच्या कडे यावे ना?”

“होच मुळी , माझी पत्रिका आहेच स्पेश्यल, मी का म्हणून जायचे कोणा ज्योतिषा कडे?

“हो, ना.  मग तुमचा प्रश्न इथे माझ्या ऑफिस मध्ये सोडवणे बरोबर नाही दिसत नाही . तुमच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या मान राखला जात नाही अशाने”

“हो तुम्ही बरोबर बोलताय काका”

“मग अंकिताजी , तुम्ही असे करा, तुमच्या दादा बरोबर घरी जा, मी पाठोपाठ तुमच्या दुसर्‍या भावा बरोबर मोटार सायकल वरुन तुमच्या घरी येतो. आणि मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, शिवाय तुमची स्पेश्यल पत्रिका अभ्यासायला मिळाली म्हणून मी तुम्हाला एक छोटासा नजराणा पण भेट देईन, चालेल ?”

अंकिता खुदकन हसली .

“तेव्हा अंकिताजी आता शांतपणे घरी जा , मी आलोच मागोमाग.”

अंकिताचा मोठ्या भावाने तीला गाडीत नेऊन बसवले आणि ‘सर आम्ही परत येऊन तुम्हाला भेटतो’ अशी खूण मला करुन निघुन गेला, त्या पाठोपाठ तिचा चुलत भाऊ जो डस्टर मधून आला होता तो अंकिताची अ‍ॅक्टीव्हा घेऊन निघाला. अंकिताचा दुसरा भाऊ जो मोटार सायकल वरुन आला होता त्याला मात्र मी थांबवून घेतले. त्याच्या कडूनच अंकिताचा सगळा खुलासा झाला.

….

….

अंकिता ही नाशकातल्या एका तालेवार, प्रतिष्ठीत पण अतिशय कर्मठ घरातली आणि तितक्याच कर्मठ समाजातली मुलगी, एकत्र कुटुंब  पद्धतीत वाढलेली दोन भावांच्या पाठीवर झाली असल्याने सगळ्यांची लाडकी बाहुली होती. शाळा, कॉलेजात प्रगती चांगली, आवाज गोड , थोडे फार संगीताचे शिक्षण, छान सतार वाजवायची, नाटक सिनेमाची आवड. अंकिताचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत सगळे चांगले चालले होते.

अंकिताचे शिक्षण पूर्ण झाले तशी तिच्या घरच्यांची तिच्या विवाहा संदर्भात हालचाली चालू केल्या, अंकिताचा जन्म झाला त्या समाजात मुलींची लग्ने तशी लौकरच करुन द्यायचा प्रघात आहे. शिकलेल्या , पदवीधर मुली त्या समाजात सापडणे तसे मुश्किलच. घरच्यांनी विवाहाचा तगादा लावला असला तरी  ‘अंकिता’ लग्नाला तयार नव्हती.  तिला करीयर करायचे होते, काही काळ हौस म्हणून का होईना नोकरी करायची होती. ज्या समाजात जिथे पुरुषाने नोकरी करणे नामुष्की समजली जाते अशा समाजातली एक मुलगी नोकरी साठी घराबाहेर पडणे म्हणजे गजहबच होता. अंकिताचा घरातल्या वडीलधार्‍यांशी , खास करुन मोठ्या भावांशी संघर्ष सुरु झाला तो इथेच.

अंकिता मोठ्या धाडसाची म्हणावे लागेल, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने एका खासगी कंपनीत नोकरी करायला सुरवात केली , स्वत:च्या पगाराच्या जोरावर बँके कडून कर्ज घेऊन स्वत:चे वाहन ‘अ‍ॅक्टीव्हा’ स्कुटर घेतली. जुनाट , कर्मठ विचारसरणीच्या घरातल्या नाराजीने आता कमालीचे उग्र स्वरुप धारण केले. समाजाच्या ‘जात पंचायती’ मध्ये याचे पडसाद उठले, जात पंचायती समोर अंकिताच्या वडीलांना ‘मुली वर लक्ष ठेवतो, तिचे हे सगळे उद्योग बंद करवतो’ अशी विनंती हात जोडून , मान खाली घालत करावी लागली.  अंकिताच्या घरच्यां साठी ही मोठी नाचक्की ठरली , मोठी मानहानी ठरली. पण ह्या सगळ्यांना न जुमानता अंकिता आपले करीयर घडवत राहीली. घरी रोज भांडणे , वादविवाद, धमक्या सुरु झाल्या …

… पण खरा आघात त्याच्या पुढेच व्हायचा होता..

अंकिता एका तरुणाच्या प्रेमात पडली , फिरणे , हॉटेलात जाणे, सिनेमे पाहणे असे प्रकार चालू झाले. प्रेम प्रकरणच ते किती दिवस लपून राहणार ? एके दिवशी ह्या छुप्या प्रेम प्रकरणाचा बोभाटा झाला, अंकिताच्या घरी हे कळताच मोठा बॉम्ब स्फोटच झाला!

तो तरुण चांगला शिकलेला होता, सभ्य , सुसंस्कृत होता, दिसायला बरा होता , पगार चांगला होता ,स्वत:चे घर होते, आई- वडील एकंदर घराणे गावात चांगली पत असलेले होते . खरे तर जोडी अनुरुप होती,  विरोध करावा असे काहीच नव्हते .. पण ‘जात’ आडवी आली!  तो तरुण अंकिताच्या जातीचा नव्हता ! बस्स,  अंकिताच्या घरात आगडोंब उसळायला आणखी काय हवे? एखाद्या हिंदी सिनेमात दाखवतात तसे अंकिता ला बोलणी बसली, तिला घराबाहेर पडायला बंदी घातली , नोकरी अर्थात सोडायला लावली हे सांगायला नकोच. आता आणखी बोभाटा व्हायच्या आत अंकिताचे लग्न उरकून टाकायची घिसाड्घाई सुरु झाली, अंकिताला सक्तीने वधु परिक्षेला म्हणजे दाखवण्याच्या कार्यक्रमाला सामोरे जावे लागले , धाकदपट्शा करुन वेळप्रसंगी मारहाण करुन अंकिताला बळेबळे लग्नाला उभे करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले.

दिवसभर अंकिताला तिच्या खोलीत जवळ जवळ कोंडून ठेवण्यात येत होते, ना कोणाशी बोलणे ना कसली मोकळीक, अंकिता पार कोमेजून गेली आतल्या आत  कुढत राहीली,  कडेकोट बंदोबस्तात असली तरी कोठून , कशी कोणास ठाऊक अंकिताला कळले की तिचे प्रेम असलेल्या त्या तरुणाचा अपघाती मृत्यु  झाला. अंकिता पुरी कोसळली, पार जमिनदोस्त झाली. हा तणाव असह्य होत गेला त्यातूनच  ती हळू हळू मानसिक आजाराची शिकार होत गेली.

वेड्या सारखे हसणे, आस्तीत्वात नसलेल्या व्यक्तींशी बोलत राहणे, दिवसागणिक अंकिताच्या आजाराची तिव्रता वाढत गेली. अंकिता ला असला काही  मानसीक आजार झाला अहे हे तिच्या घरातल्या लोकांना पटतच नव्हते. बाहेरची बाधा आहे, कोणीतरी करणी केलीय, घराण्याचा शाप आहे असे समजून तो दुर व्हावा यासाठी उपाय – तोडगे सुरु झाले. अघोरी तांत्रीक मांत्रीक, देवर्षी , बाबा , बुवा घरात यायला लागले, त्यांच्या अघोरी उपायांनी अंकिता आजारात गर्तेत आणखी खोल खोल गाडली गेली.

शेवटी शेजार्‍या पाजार्‍यांच्या समजावणीला रुकार देत अंकिताच्या घरच्या लोकांनी अंकिताला मानसोपचार तज्ञांच्या हवाली केले . डॉक्टरांनी ‘मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसऑर्डर’ चे निदान केले , उपाय योजना सुरु झाल्या, अंकिताचे ‘दाखवायचे प्रोग्रॅम्स’ बंद झाले, मारहाण बंद झाली पण हिंडण्या फिरण्या वरची बंधने चालूच होती. घरात कोणी तिच्याशी बोलत नसत, घरात अंकिताची एक लांबची आत्या रहात असे ती आत्याच तेव्हढी काय ती या पोरीची आईच्या मायेने काळजी घ्यायची. अंकिता घरातल्या कोणाशी बोलत नसली तरी या आत्याबाईं पाशी सारे मन मोकळे करत असे. ती आत्या हाच काय तो अंकिताचा शेवट्चा आधार .

दोन वर्षे लोटली, हळू हळू का होईना मानसोपचार तज्ञांच्या उपाय योजनेला काहीसे यश आले, अंकिताची शारीरिक आणि मानसिक तब्बेत सुधारायला लागली , ‘झाशीच्या राणीचा’ अवतार धारण करायचे बंद झाले नसले त्याचे प्रमाण खूपच कमी झाले. पोरगी सुधारत आहे हे बघून घरच्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. तिच्या वरची बंधने अजून थोडी सैल झाली, अंकिता आता घरच्यांशी बोलू लागली, अधून मधुन हसू लागली, टी.व्ही. वरच्या सिरियल्स बघू लागली, घरच्या कामात थोडीथोडी मदत करायला लागली. मोठ्या भावाने तीला एक लॅपटॉप, चांगला टच स्क्रिन वाला फोन घेऊन दिला , इंटरनेट साठी डेटा प्यॅक देण्यात आला जेणे करुन ती आपले मन रमवू शकेल आणि त्याने झटके कमी येतील असे घरच्यांना वाटत होते.

आता अंकिताचे वागणे, बोलणे खुपच सुधारले होते. तिला घरा बाहेर पडून थोडे फार हिंडायला परवानगी दिली गेली पण तिला एकटीला घरा बाहेर पाठवत नव्हते, घरच्यां पैकी कोणीतरी एकजण तिच्या बरोबर असे किंवा ती बाहेर पडताच तिच्या नकळत कोणी घरातली व्यक्ती पाठलाग करत असे.

अंकिताच्या आजाराची बाह्य लक्षणें दिसत नसली तरी आजार फार खोलवर होता , तो मध्येच उफाळून यायचा. आपण खरोखरीची झाशीची राणी आहोत हा तिचा भ्रम शेवट पर्यंत कायम होता , औषधाच्या मार्‍याने आणि तत्सम थेरपीच्या उपयोगाने हे भ्रम बाह्य स्वरुपात व्यक्त होत नसत इतकेच.

आता अंकिता इंटरनेट च्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला लागली, अंकिताच्या ब्राऊसर हिस्ट्री मध्ये , बुक मार्कस मध्ये जादा करुन ज्योतिषी, सायकीक अशा प्रकारच्या वेब साईंट्चा भरणा लक्षणीय होता. तिच्या फेसबुक फ्रेंड मध्ये ८० टक्के लोक ज्योतिषी , सायकीक असेच होते. या सगळ्यांचा शोध लागला कारण अंकिता तिचे लॉग ईन डिटेल्स , पासवर्ड्स  एका वहीत लिहून ठेवत असे (विसरायला नको म्हणून) ती वही सापडल्या वर या सगळ्यांचा खुलासा झाला. अंकिताच्या हातुन लॅप टॉप काढून घेतला तरी फोन (व डेटा प्यॅक ) चालूच होता. माझा फोन नंबर ही ती ने असाच सर्च करुन मिळवलेला असावा.

अंकिता माझ्या कडे आली ती अशीच गुपचुप , कोणाच्या लक्षात येणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊनच. अंकिता घरातून अ‍ॅक्टीव्हा घेऊन बाहेर पडली हे कोणालाच कळले नाही पण अंकिताने एक चूक केलीच! घराबाहेर पडताना ती आपल्या खास विश्वासातल्या आत्याला ‘मी गंगापूर रोडवर च्या xxxxx  कॉलनीत एकाला भेटायाला जात आहे असे बोलून बसली.

अंकिता घरात नाही हे कळायला फारस वेळ लागला नाही, त्यातच अंकिताची अ‍ॅक्टीव्हा दिसत नाही हे पण लक्षात आले, घरात आकांत उसळाला, तरणी ताठी पोर त्यात मनोरुग्ण ! लगेच धावाधाव सुरु झाली, घरातले लोक शोधायला बाहेर पडले. तितक्यात एकाच्या लक्षात आले की बाकी कोणाला नसले तरी अंकिता त्या आत्याबाईंना सांगायची राहणार नाही. अंकित कोठे गेली आहे हे आत्याबाईंना नक्की माहीती असणार ! आत्याबाईंना बोलते करण्यात आले आणि मग शोध मोहीम चालू झाली,

आमची xxxxx सोसायटी  फक्त बंगल्यांची कॉलनी असल्याने सापडायला वेळ लागत नाही , सगळ्यांना माहीती असते. आणि मुळात आमची कॉलनी तशी पिटुकली , ची , इन मिन दोन उभ्या आणि दोन आडव्या गल्ल्यांची , त्यामुळे शोधणे सोपे होते, अंकिता अ‍ॅक्टीव्हा घेऊन आली असल्याने , ज्या बंगल्याच्या बाहेर तिची अ‍ॅक्टीव्हा आहे तिथेच अंकिता सापडणार हा तर्क अगदी सहज सोपा होता. आणि त्यामुळे अंकिताचे भाऊ माझ्या घराशी येऊन धडकू शकले.

अंकिताचा हा भाऊ अक्षरश: माझे पाय धरत म्हणाला काही तरी उपाय सांगा गुरुजी, म्हणाल ते करतो , काय होईल तो खर्च होऊ द्या , पण माझ्या बहीणीला या त्रासातून सोडवा, तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही! आता याला काय उत्तर द्यायचे, या अशा केसेस ज्योतिषाच्या नाही तर एखाद्या मानसोपचार तज्ञाच्या हातात सोपवायच्या असतात. या केसेस बाबतीत ज्योतिष काहीही करु शकत नाही, उगाच बाहेरची बाधा, घराण्याच्या शाप, अमुक तमुक दोष असे सांगून उपाय तोडगे सुचवून / करुन असले प्रश्न सुटत नसतात. अंकिताचा इतिहास बघितला तर अंकिताचा आजाराचे खरे कारण लक्षात येईल. अंकिताला मुंबई च्या एका प्रख्यात मानसोपचार तज्ञांची ट्रिटमेंट चालू होती (म्हणजे तेव्हा तरी होती) आणि तेच  योग्य आहे , उपाय – तोडगे / देव-देवस्की नाही.

मी अंकिताच्या भावाला काय सांगणार ?

असो,  अंकिताचे पुढे काय झाले हे मला माहीती नाही पण काय झाले असावे ही उत्सुकता जशी आपल्याला लागून राहीली तशीच ती मला ही आहे .

 

अंकिता मला भेटली होती ते जानेवारी (२०१७) , त्याला आता नऊ महीने झाले असले तरी …

 

 

“दादा , मला मार नकोय रे, खूप लागते रे, मी चांगले वागेन रे अगदी नक्की,  आई शप्पथ , पण मला मारु नका रे मला कोंडून ठेऊ नका रे…”

 

असे कळवळून विनवणारी अंकिताची ती भेदरलेली केविलवाणी छबी डोळ्यासमोरुन जात नाही.

 

आत्ता या क्षणाला अंकिता बरी होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करण्या व्यतिरिक्त आपण आणखी काय करु शकतो?

 

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. अण्णासाहेब गलांडे

  लेखाचा ऊत्तरार्ध वाचुन बोलणेच खुंटले.
  असो
  पण अंकिताने प्रश्न विचारल्या नंतर जो “कन्सलटेशन चार्ट”कंप्यूटर वर तयार झाला त्यात काय दिसले हे वाचायला आवडले आसते.
  धन्यवाद.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.