ज्योतिष महामहोपाध्याय ! (भाग – १)
एक १००% टक्के सत्य घटना !
हा प्रसंग सहा महीन्यापूर्वी जसा घडलेला आहे तसा लिहला आहे . या प्रसंगावर एक चांगला लेख होऊ शकेल याची कल्पना असल्यामुळे मी या लेखाची कच्ची टिपणे काढून ठेवली होती पण वेळे अभावी त्यावर पुढे काम करणे राहुन गेले.
पुणे – मुंबई नाही तर चक्क एका जिल्ह्याच्या ठिकाणच्या गल्ली बोळातल्या एका तथाकथित आलतुफालतु युनिव्हर्सिटीने अशाच एका तथाकथित उपाय तोडगे बहाद्दर ज्योतिषाला म्हणे पी.एच.डी. पदवी दिली ! सोशल मेडीया वर त्या बोगस डीग्री चा किती म्हणून टीर्या बडवून घ्यायचा !!
मला खो खो हसायला आले आणि सहा महिन्यापूर्वीच्या ‘त्या’ प्रसंगाची आठवण झाली , लगेच हाता सरशी हा लेख पूर्ण केला इतकेच नव्हे तर सध्या चालू असलेली ‘काप्पे अॅस्ट्रॉलॉजी ‘ ही लेख मालिका सायडींग़ ला टाकून हा लेख (दोन भागात) मध्येच घुसडून द्यावा वाटला! मज्जा आहे !!
साधारण सहा एक महीने झाले असतील या घटनेला. दुपारची माझी एक अपॉईंट्मेंट संपली होती, थोडा निवांत पणे कान कोरत (माझा आवडता छंद !) विविधभारती ऐकत होतो इतक्यात फोन वाजला. स्क्रीन वरचा नंबर अनोळखी होता, दुपारची वेळ म्हणजे म्हणजे बहुदा ‘टेले मार्केटींग’ वाली असणार! या ‘टेले मार्केटींग’ वाल्या मुलींची (बहुतांश मुलीच असतात) फिरकी घ्यायला जाम मज्जा येते! मला ही नाहीतरी जरा टाईमपास हवाच होता, फोन घेतला..
पण फोन वर होता एक बाप्प्या!
आपल्या दमेकरी , अनुनासिक , पुणेरी आवाजात “सुहास गोखलेंं शी बोलायचे आहे” असे विचारत होता, आवाजा वरुन साठीच्या पुढचा वाटणारा हा बाप्प्या टेले मार्केटींग वाला नक्कीच वाटत नव्हता!
“हो, मी सुहास गोखले बोलतोय, आपण कोण?”
“घाटपांडे”
“कोण घाटपांडे म्हणायचे तुम्ही?”
“जनार्दन शंकर”
“नमस्कार जनार्दनजी, कोठून बोलता आपण?”
“पुण्यातून, मी XXXXXX संस्थेचा सेक्रेटरी आहे”
“XXXXXX? कसली संस्था म्हणायची ही, नाव कधी ऐकले नाही”
“आमच्या संस्थेचे नाव ऐकले नाहीत?”
“नाही”
“अहो, आमची XXXXXX जागतीक पातळी वरची संस्था आहे, गेली पंचवीस वर्षे ज्योतिष विद्येच्या प्रचारात अग्रगण्य आहे”
“असेल, असेल. पण माफ करा मी आपल्या या XXXXXX संस्थेचे नाव कधी ऐकले नाही”
“असे कसे, तुमच्या नाशिक मध्ये पण आमची ब्रॅच आहे, आपले ते ‘सोनटक्के’ बघतात त्याचे काम”
“सोनटक्के? मी यांचे पण नाव कधी ऐकले नाही”
“बहुदा कामाच्या व्यापात असल्याने आपल्याला ज्योतिष जगताशी संपर्क ठेवता आला नसावा नाहीतर आमच्या संस्थेचे नाव ऐकले नाही असा ज्योतिष अभ्यासक आख्ख्या महाराष्ट्रात नसेल”
“असेल तसे, पण जनार्दनजी आपण कशासाठी फोन केला आहे ते कळले तर बरे होईल”
“आपल्या साठी एक चांगली बातमी आहे”
“अच्छा! कोणती बातमी हो”
“आमच्या संस्थेचे एक ज्योतिष विश्वविद्यालय आहे”
“ही चांगली बातमी म्हणता काय?”
“तसे नाही हो, बातमी सांगतोच आहे पण त्या आधी त्याची ब्यॅकग्राऊंड नको का सांगायला?”
“अहो काय चालवलेय आहे , ब्यॅक ग्राऊंड काय ,ज्योतिष विश्वविद्यालय काय , माझ्या काहीही लक्षात येत नाहीये?”
“अहो विश्वविद्यालय म्हणजे युनिव्हर्सिटी “
“तुमची एक युनिव्हर्सीटी आहे?”
“हो, अभिमत विश्वविद्यालय, डिम्ड युनिव्हर्सिटी, आहात कोठे!”
“इथे नाशिक मध्येच की”
“तसे नाही हो, आमची एव्हढी विश्वविख्यात युनिव्हर्सिटी आपल्याला माहीती नाही याचे आश्चर्य वाटले”
“अहो मला कसे ठावे असणार? कामाच्या व्यापात असल्याने मला ज्योतिष जगताशी संपर्क ठेवता येत नाही ना ! आपणच म्हणालात ना मघाशी”
“अहो, ते आपले..”
“ते जाऊ द्या, आधी ती ‘चांगली बातमी’ का काय म्हणत होता ते सांगा ना!”
“तेच तर सांगतोय ना, आमच्या विश्वविख्यात युनिव्हर्सीटी च्या माध्यमातून गेली दहा वर्षे आम्ही विद्यादानाचे पवित्र काम अगदी निष्ठेने पार पाडत आहोत”
“अरे वा, चांगलेच की !”
“धन्यवाद”
“पण जनार्दनजी अजून आपण फोन कशासाठी केला आहे ते सांगीतले नाहीत?”
“सांगतो ना, त्याचे काय आहे, ज्योतिष शास्त्राचा प्रसार करणे, संशोधन करणे, नव्या पिढीचे ज्योतिषी तयार करणे, झालेच तर वास्तुशास्त्र, साधना-उपासना अशा ज्योतिष शास्त्राला पुरक गोष्टींचा समन्व्यय साधणे असे बरेच प्रकल्प आम्ही चालवत असतो. याचाच एक भाग म्हणून ज्योतिषशास्त्राचा प्रचार करणार्या, या शास्त्रात संशोधन करणार्या ज्योतिर्विदांचे कौतुक करणे, त्यांची पाठ थोपटणे, त्यांच्या कार्याला मान्यता देणे, विद्वानांच्या पसंतीची मोहोर उमटवणे असे पण काम असतेच”
“हे सगळे माझ्या डोक्यावरुन जाते आहे जनार्दनजी, जरा समजेल अशा भाषेत सांगाल काय, आपले काम नेमके काय, कसली चांगली बातमी म्हणता आहात?”
“अहो ऐका तर खरे, या वर्षी आम्ही तुमची निवड ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ किंवा ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ पदवी साठी केली आहे, आहे ना खुषखबर ?”
“अहो मी साधा ‘ज्योतिष प्रविण’ सुद्धा नाही आणि तुम्ही मला एकदम ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ आणि ‘ज्योतिष विद्या वाचस्पती असल्या उच्च पदव्या देताय!”
“दोन्ही पदव्या नाही मिळणार, संस्थेच्या नियमा नुसार ‘ज्योतिष महामहोपाध्याय’ किंवा ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ यातली एकच मिळेल, चॉईस तुमचा”
“अरे व्वा! यात चॉईस पण आहे का! केवळ एक उत्सुकता म्हणून विचारतो , राग मानू नका, पण या ‘ज्योतिष महामहोपाध्याय’ आणि ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ मध्ये नेमका फरक काय असतो हो”
“तसा फरक काहीच नाही, महामहोपाध्याय जरा जुन्या पद्धतीची ट्रॅडीशनल पदवी आहे, विद्या वाचस्पती जरा मॉडर्न आहे इतकेच. दोन्ही पदव्या पी.एच.डी. समकक्ष आहेत म्हणजे आपल्याला आपल्या नाव आधी ‘डॉक्टर’ असे नामाभिधान वापरता येईल. तसे महामहोपाध्याय पदवी धारक ‘म.म.’ असे नामाभिधान लावतात आणि वाचस्पती वाले ‘डॉक्टर’, बाकी चॉईस तुमचा”
“ते ठीक पण या असल्या मोठ्ठ्या पदव्यां साठी माझी निवड कशी काय केली? आणि मुळात मी तुमच्याशी या संदर्भात कधी संपर्क पण केलेला नाही”
“अहो कस्तुरीचा सुगंध असा थोडाच लपून राहणार?”
“कसली कस्तुरी?”
“तुमचे या क्षेत्रातले योगदान!”
“माझे कसले आलेय योगदान?”
“अहो, असे कसे म्हणता? तुमचे ब्लॉग वरचे लेखन, केव्हढे मोठे योगदान आहे”
“त्या लिखाणाला तुम्ही योगदान म्हणता? कै च्या कै काय?”
“सुहासजी हा आपला विनय आहे, आम्ही तुमचे ब्लॉग्ज नियमीत वाचतो बरे का, तुम्ही फार चांगले, अभ्यासपूर्ण लिहता, आजकाल असले लिखाण वाचायला मिळत नाही, आपल्याला कल्पना नाही पण बाहेर आपले लिखाण खुप लोकप्रिय आहे”
“अहो कसले लोकप्रिय, एव्हढे मर मर राबून लिहलेले कोणी वाचत नाही हीच तर माझी तक्रार आहे केव्हा पासुनची..”
“एकदा का तुमच्या नावाच्या आधी ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ किंवा ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ असे काही नामाभिधान लागले की बघा, वाचक संख्या कशी वेगाने वाढते ते!”
“ते ठीक आहे, पण मला अजून लक्षात येत नाही ब्लॉग वर हलके फुलके लिखाण करणार्या , नाशिक सारख्या मागासलेल्या, आदीवासी मुलखात राहणार्या , माझ्या सारख्या एका भुरट्या ज्योतिषाला एकदम ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ आणि ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ सारख्या पदवीला पात्र कसे काय ठरवलेत?
“तुमचा दर्जा आहेच तसा, तुम्हाला माहीती असेलच , तुमच्या सारखे दर्जेदार लेखन असलेला दुसरा मराठी ब्लॉग नाही”
“अहो पण, माझे लेखन बरे असले तरी ते काही संशोधन नाही की फार खोलात जाऊन केलेले विवरण नाही, मला आपले जे सुचत गेले ते लिहीत गेलो , तसे पाहिले तर जरासा उथळपणाच आहे माझ्या लेखनात”
“अहो, तुम्ही किती नविन विषय हाताळले आहेत, मुद्देसुद केस स्ट्डीज आहेत, जातकांचे अनुभव आहेत, पत्रिकेचा मानसशास्त्रीय अंगाने विचार करता तुम्ही, हे एक प्रकाराचे संशोधनच आहे ना?”
“संशोधनात्मक लेखन या पेक्षा बरेच वेगळे असते”
“बरोबर, पण काळजी नको, आम्ही सगळी व्यवस्था करतो!”
“कसली व्यवस्था? मी समजलो नाही”
“सांगतो ना.. आपण काय करु, तुम्ही ब्लॉग वर लिहलेले सर्व लेख सुसुत्रपणे एकत्र करु , दोनशे एक पानांचा मजकूर होईलच ना?”
“हो”
“झालेच तर मग, तोच तुमचा पी.एच.डी. चा प्रबंध समजायचा काय? त्याला ‘ज्योतिषशास्त्राचा मानसशास्त्रिय अंगाने विचार’ असे काहीतरी भारदस्त नाव देऊ म्हणजे झाले!”
“हा असला प्रबंध?”
“अहो, बोलुन चालुन पी.एच.डी. चा प्रबंध तो, असाच असतो, नंतर कोण वाचणार आहे? आमच्या संस्थेत असे बरेच प्रबंध धुळ खात पडलेत!”
“त्या लायनीत मला पण बसवता?”
“अहो मी जरा अलंकारीक अर्थाने बोललो हो”
“ते काहीही असले तरी , मला बरोबर वाटत नाही”
“तुम्ही फक्त ‘हो’ म्हणा, आमची अॅकॅडेमीक टीम सगळे सांभाळेल”
“छे, हे असले काही पटत नाही मला”
“तुमचा गैरसमज होतोय, काही झाले तरी पी.एच.डी. चा थेसीस. त्याला आम्ही योग्य तो न्याय देणारच की, तुमच्या साठी एखादा तज्ञ, नामांकित मार्गदर्शक म्हणजे गाईड असेल, त्यांच्या देखरेखी खाली तुमच्या थेसीस चे काम होणार आणि शेवटी आमची ‘प्रबंध स्विकृती समिती’ असतेच ना , मोठे मोठे नामांकित ज्योतिर्विद असतात या समितीवर, ते पण थेसीस तपासूनच मान्यता देणार ना?”
“ते गाईड चे काय म्हणालात?”
“हो, प्रत्येक पी.एच.डी. च्या विद्यार्थ्याला एक गाईड असावाच लागतो, संस्थेचा नियमच आहे तसा”
“आता हा गाईड कोठे भेटेल? म्हणजे मीच कोणाला भेटून गाईड व्हा अशी गळ घालायची का?”
“नाही, तुम्हाला कोणतेही कष्ट पडणार नाहीत, आमचे ‘गाईडस’ चे एक प्यॅनेल असते त्यातलीच एखादी तज्ञ व्यक्ती तुम्हाला गाईड करेल. तुमचा पाश्चात्य ज्योतिषाचा मोठा अभ्यास आहे , आपले लेखनपण त्याच अंगाने जाणारे असते, त्याचा विचार करता, तुम्हाला आमचे हरदणकर सर गाईड म्हणून योग्य होतील, एकदम फिट्टं, हरदणकरांचा पाश्चात्य ज्योतिषाचा दांडगा अभ्यास आहे बरे का, आम्ही त्यांना कौतुकाने ‘सायनाचार्य’ म्हणतो, शिवाय ते पण नाशकातच असल्याने , तुम्हाला भेटणे, बोलणे सोपे जाईल”
“तुमचे हे सायनाचार्य हरदणकर म्हणजे YYYYY केटरींग वाले का? इथल्या लोकल पेपरात जैरात असते त्यांची रोज”
“हो, तेच ते, तसे पाहीले तर तुमचा अभ्यास , व्यासंग इतका मोठा आहे, तुम्हाला गाईड लागणारच नाही”
“मग कशाला त्या सायनाचार्यांना त्रास द्यायचा?”
“त्रास कसला त्यात, ना सायनाचार्यांना त्रास ना तुम्हाला त्रास”
“त्रास नाही कसे म्हणता? अहो पी एच डी चा थेसीस आहे ना, गाईड आणि विद्यार्थी दोघांनाही काम पडणार नाही का?”
“अहो, गोखले, तुमच्या ब्लॉग वरचे लेखन हाच तुमचा थेसीस, सगळे म्यॅटर तयारच आहे, आपण फक्त ते एकत्रित करुन , किरकोळ एडिटींग करायचे, काही पत्रिकांचे स्क्रिन शॉट्स टाकायचे, आमच्या कडे आधीच तयार असलेली संदर्भ ग्रथांची मोठी सुचि आहे ती शेवटी चिकटवायची, झाला तयार थेसीस ! आमच्या अॅकॅडेमीक टीमची प्राजक्ता आहे ना, सध्या S.Y. B.A करतेय , एकदम स्मार्ट आहे, ती हे काम करुन देईल, नो टेन्शन! “
“असा बनतो का थेसीस? कमाल आहे, पण ह्या सगळ्यात त्या सायनाचार्यांचे काम काय?
“तसा सायनाचार्यांना देखील कुठला वेळ गाईड करायला आणि प्रबंध तपासायला, त्यांच्या केटरींग आणि टुरिस्ट टॅक्सी च्या व्यवसायात ते इतके बिझी असतात की त्यांना खाजवायला सुद्धा सवड मिळत नाही”
“मग ज्याला खाजवायला सुद्धा सवड मिळत नाही अशी व्यक्ती मला काय गाईड करणार?”
“अहो ती फक्त फॉरम्यॅलिटी आहे, त्याचे काय आहे गोखले, आमची आंतरराष्ट्रीय पातळी वरची युनिव्हर्सीटी आहे, पदवी देताना काही निकष लावयला नको का? काही औपचारीकता असते ती पाळावीच लागते ना, नाहीतर उद्या लोक म्हणतील बघा हे अशाच पदव्या वाटतात, आम्हाला पण आमचा दर्जा सांभाळायचा असतो ना!”
“हा असा?”
“अहो, अशा मानाच्या पदवी साठी तुमची निवड केली ह्यातच आमचा दर्जा समजतो ना? बाकी गाईड वगैरे संस्थेच्या नियमांचे पालन करायचे म्हणून, तुम्हाला गाईड शिवायच पदवी द्यायला पण कोणाची हरकत असणार नाही, पण मग तसा अनिष्ट पायंडा पडायला नको म्हणून आपले , शास्त्र म्हणून ‘गाईड’ दाखवायचा बाकी काही नाही. लक्षात आले का?”
…..
हा किस्सा इथेच संपत नाही… पिक्चर अभी बाकी है । चुकवू नये असा ‘दुसरा भाग’ लगेचच….
या लेखमालेतला दुसरा (आणि अंतीम ) भाग इथे वाचा: ज्योतिष महामहोपाध्याय ! (भाग-२)
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020