“तसा सायनाचार्यांना देखील कुठला वेळ गाईड करायला आणि प्रबंध तपासायला, त्यांच्या केटरींग आणि टुरिस्ट टॅक्सी च्या व्यवसायात ते इतके बिझी असतात की त्यांना खाजवायला सुद्धा सवड मिळत नाही”

“मग ज्याला खाजवायला सुद्धा सवड मिळत नाही अशी व्यक्ती मला काय गाईड करणार?”

“अहो ती फक्त फॉरम्यॅलिटी आहे, त्याचे काय आहे गोखले, आमची आंतरराष्ट्रीय पातळी वरची युनिव्हर्सीटी आहे, पदवी देताना काही निकष लावयला नको का? काही औपचारीकता असते ती पाळावीच लागते ना,  नाहीतर उद्या लोक म्हणतील बघा हे अशाच पदव्या वाटतात, आम्हाला पण आमचा दर्जा सांभाळायचा असतो ना!”

“हा असा?”

“अहो, अशा मानाच्या पदवी साठी तुमची निवड केली ह्यातच आमचा दर्जा समजतो ना? बाकी गाईड वगैरे संस्थेच्या नियमांचे पालन करायचे म्हणून, तुम्हाला गाईड शिवायच पदवी द्यायला पण कोणाची हरकत असणार नाही, पण मग तसा अनिष्ट पायंडा पडायला नको म्हणून आपले , शास्त्र म्हणून ‘गाईड’ दाखवायचा बाकी काही नाही. लक्षात आले का?”

 

या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:  ज्योतिष महामहोपाध्याय ! (भाग-१)

 

“अहो, अशा मानाच्या पदवी साठी तुमची निवड केली ह्यातच आमचा दर्जा समजतो ना? बाकी गाईड वगैरे संस्थेच्या नियमांचे पालन करायचे म्हणून, तुम्हाला गाईड शिवायच पदवी द्यायला पण कोणाची हरकत असणर नाही, पण मग तसा अनिष्ट पायंडा पडायला नको म्हणून आपले , शास्त्र म्हणून ‘गाईड’ दाखवायचा बाकी काही नाही. लक्षात आले का?”

“चांगलेच लक्षात आले!”

“येत्या विजयादशमीच्या समारंभात आम्ही आपल्याला ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ किंवा  ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ पदवीने सन्मानित करु!”

“अरे वा, झटपट काम दिसतेय तुमचे!”

“झटपट वगैरे काही नाही, असे बघा तुमचे लेखन तयारच आहे त्यामुळे प्रबंध लिहण्यात वेळ जाणार नाही, तुमचे गाईड सायनाचार्य , ते काय डोळे झाकून सही करतील! आणि सायनाचार्यांची सही आहे म्हणल्यावर आमची ‘प्रबंध स्विकृती समिती’ पण फारशी खळखळ करणार नाही ”

“सगळी नुसती फॉरम्यॅलिटीच दिसतेय नाही का? मग विजयादशमीचा समारंभ देखील खरा का ती ही आपली फॉरम्यॅलिटीच?”

“छे छे , असे कसे होईल , अहो आमचा पदवीदान समारंभ एक कौतुक सोहळा असतो दर वर्षीचा, मोठे मोठे नामांकित , माननीय प्रमुख पाहुणे म्हणून असतात, या वर्षी आपले ते WWWWWWW आहेत ना, त्यांनी यायचे कबूल केले आहे त्यांना नाही जमले तर आपले नेहमीचे TTTTT आहेतच , गेल्या वर्षी ते PPPPPPP पाहुणे होते, त्याच्या आदल्या वर्षी मुंबईचे  DDDDDD प्रमुख अतिथी होते”

“अरे वा!”

“तर काय, तुमचा एकदम जंगी सत्कार होणार, अहो, आमची सन्मानाची ‘शाल’ च ३०० रुपयांची असते!”

“३०० रुपयांची शाल ! भारीच आहे की, माझ्या दारातले पायपुसणे ४०० रुपयांचे असते!”

“अहो , मानाने दिलेल्या शालीची किंमत का कोणी करते?”

“शाल ३०० रुपयांची आहे असे तुम्हीच तर म्हणालात ना? मग किंमत कोणी केली मी का तुम्ही?”

“ते असु दे, शाल – श्रीफळ देऊन सत्कार करतोय त्यातला भावार्थ लक्षात घ्या ना”

“श्रीफळ पण देणार?

“अहो असे काय म्हणता, श्रीफळ असणारच ना? शाल – श्रीफळ अशी जोडीच असते नेहमी”

“आता तुम्ही श्रीफळ देणार म्हणजे चांगले घसघशीत , कुंभकोणम चे असणार! तीस-चाळीस रुपयांचे तरी नक्कीच असणार!”

“काय हे गोखले”

“मी आपला एक अंदाज केला हो , बरे ते राहू द्या, सत्कारात पुणेरी पगडी देणार की नाही? लाल रंगाची, चोच असलेली!”

“नाही, हल्ली आम्ही पुणेरी पगडीचा बेगडी बाजारु पणा बंद केलाय, ह्या असल्या थाटमाटा पेक्षा साधीसुधी सात्विकता महत्वाची असे आमच्या संस्थेने मत आहे”

“च..च..च.. म्हणजे पुणेरी पगडी नशिबात नाही म्हणायचे!”

“ते पुणेरी पगडीचे काय घेऊन बसलात, समारंभाला याल तेव्हा आम्ही आपल्याला नाशिक ते पुणे बस चे येता-जाता चे भाडे देऊ”

“अरे वा, हे एक चांगले करताय तुम्ही, नाहीतरी त्या यष्टी वाल्यांनी काहीच्या काही भाडी वाढवून ठेवलीत, ६०० रुपये त्या ‘शिवनेरी’ला देणे परवडत नाही हो”

“माफ करा पण संस्थेच्या नियमाप्रमाणे वातानुकुलित बस / रेल्वे चे भाडे देता येत नाही, तसे पाहीले तर तुमच्या सारख्या माननीयांची योग्यता ‘शिवनेरी’ / ‘ए.सी.फर्स्टक्लास’ ची आहे हे पटते हो पण काय करणार संस्थेचे नियम आडवे येतात ना?”

“ठीक आहे, शिवनेरी राहू द्या, नसते एखाद्याच्या नशिबात पण किमान लाल डब्ब्याचे भाडे तरी देणार ना?”

“हो, म्हणजे काय देणारच”

“आणि रिक्षा भाडे?”

“रिक्षा?”

“अहो शिवाजीनगराहून तुमच्या संस्थे पर्यंत येणार कसा? तुमचा भावी ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ / ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ असा तंगडेतोड करत चालत आलेला बरोबर दिसणार नाही!”

“त्याचे काय आहे गोखले, आम्ही स्थानीक म्हणजे लोकल प्रवासाचा भाडे खर्च  देत नाही , संस्थेचा तसा नियमच आहे, आता आपण सन्माननिय अतिथी , स्पेश्यल केस म्हणून , फूल ना फूलाची पाकळी स्वरुप रुपये ५१ , वाटखर्च म्हणून देऊ, त्यात बसवा काय तो तुमचा रिक्षा खर्च”

“राहू दे , इतकी मेहेरबानी कशाला, मी स्वखर्चाने संस्थेच्या दारात येतो”

“झालेच तर मग, मी आपला होकार पक्का समजू ? आमच्या किवळे मॅडम आपल्याला नक्की किती रक्कम संस्थेत भरायची ते ईमेल पाठवून सविस्तर पणे कळवतीलच”

“आता या किवळे म्यॅडम कोण? आणि कसली रक्कम? मला समजले नाही!”

“किवळे मॅडम आमच्या कुलसचिव आहेत, हिशेबाचे सगळे काम त्याच बघतात”

“कुलसचिव? अरे हो, तुमची युनिव्हर्सीटी आहे नाही का ! मग कुलसचिव पाहीजेच! पण कसला हिशेब म्हणताय तुम्ही?”

“त्याचे काय आहे, गोखले, आपल्याला आमच्या संस्थेचे प्राथमिक सदस्यत्व घ्यावे लागेल, त्याची वर्गणी”

“ते काय असते?”

“प्राथमिक सदस्यत्व घेतले की तुम्ही आमच्या संस्थेच्या परीवारातले घटक बनता”

“किती वर्ग़णी असते या सदस्यत्वाची?”

“तशी आमची वार्षीक रुपये ३०१ असते, पण आम्ही तुम्हाला आजीव सदस्य करुन घेत आहोत , त्याचे तुम्ही एकदाच रुपये २५०१ भरायचे, म्हणजे दरवर्षी सभासद वर्गणी भरायची कटकट नाही”

“पण हे सदस्यत्व घेतल्याचा मला काय फायदा”

“फायदे बरेच आहेत, एकदा का तुम्ही संस्थेच्या परिवारात दाखल झालात की समजेल, म्हणजे बघा, संस्थेच्या कार्यक्रमात आपल्याला बसायला पहिल्या काही रांगांत आरक्षित जागा असेल,  समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांशी तुमची ओळख करुन दिली जाईल..”

“आणि कार्यक्रम संपल्यानंतर ‘चहा- चिवडा, केळं, भिस्कूट’ ?”

“नाही, ‘चहा- चिवडा आणि केळं’ फक्त विशेष सभासदां साठीच असते”

“म्हणजे मला नाही”

“नाही, ‘चहा-चिवडा-केळं’ फक्त विशेष सभासदांनाच दिले जाते. आपण पण विशेष सभासद होऊ शकता, वार्षीक रुपये १००१  किंवा आजीवन विशेष सभासदत्व फक्त रुपये ७००१”

“क्या बात है, का हो,  ‘संस्थेचा आश्रयदाता’ अशी कोणती कॅटेगिरी असते का”

“हो, आहे तर ! रुपये २१, ००१ एकदाच भरुन आपण संस्थेचे ‘आश्रयदाता’ बनू शकता”

“मग आश्रयदात्यांना समारंभा नंतर ‘चहा – चिवडा- केळ्या सोबत नारळाची बर्फी पण देत असाल ना?”

“नारळाची बर्फी?”

“चिवडा केळ्याच्या बरोबर बरी लागते, बाकी नारळाची बर्फी कोणाची असते? चितळे, काका हलवाई, घोडके , पाटणकर, वैद्य की कोथरुड च्या जोगळेकर काकूंची ”

“काय साहेब हे, विनोद चांगला करता आपण!”

“नशीब लौकर लक्षात आले!”

“गोखले आता तुम्ही हिशेबाचे विचारलेत म्हणून जरा कल्पना देतो. प्राथमिक सदस्यत्वाचे रुपये २५०१, आपण आमच्या विश्वविद्यालयाचे ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ / ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ चे विद्यार्थी त्यामुळे आमच्या विश्वविद्यालयाची अशा स्नातकोत्तर पदवी विद्यार्थी नोंदणी फी २०,००१ फक्त , आपल्याला भरावी लागेल”

“अगा गा गा..  आता ही स्नातकोत्तर पदवी विद्यार्थी नोंदणी फी काय असते?”

“रजिस्ट्रेशन हो, इतर विद्यापीठात पण असे शुल्क घेतातच , कोणी रजीस्ट्रेशन फी म्हणतात तर कोणी इलिजिबिलीटी फी म्हणतात इतकेच”

“बापरे बराच खर्च आहे”

“एकदाच करावयाचा आहे साहेब, आता अशी ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ / ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ सारखी भारदस्त पदवी मिळवायची म्हणजे थोडा खर्च होणारच ना?”

“आणखी काय काय खर्च करावा लागेल मला”

“जास्त काही नाही, नोंदणी झाली की, आम्ही तुम्हाला गाईड नियुक्त करु, त्या गाईडचे मानधन म्हणून रुपये ५००१ जमा करायचे”

“म्हणजे त्या खाजवायला सुद्धा सवड नसलेल्या, डोळे मिटून प्रबंधावर सही करणार्‍या सायनाचार्यांना मानधन? ते ही रुपये ५००१? कमाल आहे!”

“अहो सांगीतले ना, ही केवळ एक औपचारिकता असते, तरी बरे तुमच्या साठी सायनाचार्य गाईड म्हणून आहेत, इतर विषयांतले गाईड १०००१ कमीतकमी, नवमांश वाले गाईड तर २५,००१ शिवाय बोलतच नाहीत, तुम्ही लक्की, सायनाचार्या वरच भागतेय तुमचे!”

“प्रकरण भलतेच महागडे होत आहे हे, आणखी काही?”

“परिक्षा फी रुपये २५,००१ पण भरावी लागेल”

“२५००१  रुपये! बापरे!”

“अहो ही साधी ज्योतिष विशारद / ज्योतिष प्रविण सारखी परिक्षा नाही,  ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ / ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ ची परिक्षा आहे ही, समजून घ्या जरा”

“पण तुम्ही तर म्हणालात ना की  सायनाचार्य डोळे झाकून सही करणार आणि त्यांची सही असेल तर प्रबंध स्विकृती समिती’ पण फारशी खळखळ करणार नाही,  मग कसली आलीय परिक्षा ?”

“अहो म्हणलो ना , ही सगळी औपचारिकता आहे , प्रोसीजरचा भाग आहे, नाहीतर उद्या लोक म्हणतील बघा हे अशाच पदव्या वाटतात”

“बापरे , बराच मोठा खर्च म्हणायचा हा!”

“एकदाच करावयाचा आहे, ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ / ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ सारखी भारदस्त पदवी मिळणार आहे हे लक्षात घ्या, आणि हो एक सांगायचे विसरलोच की!”

“आता काय आणखी?”

“आपल्याला  ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ किंवा  ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ अशी निवड करायची आहे, आपण जर ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ निवडली तर त्याचे जादाचे रुपये ५००१ शुल्क आहे!”

“असे का? दोन्ही पदव्या सारख्याच आहेत ना?”

“त्याचे काय आहे ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ चा निर्णय एकाच मिटींग मध्ये होतो आणि ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ साठी दोन मिटिंग्ज व्हाव्या लागतात , संस्थेचा नियमच आहे तसा”

“दुसर्‍या मिटींगच्या ‘चहा- चिवड्याचा’ खर्च ५००१? पुण्यात चिवडा इतका महाग झालाय?”

“थट्टा करु नका साहेब”

“थट्टा सुचणार नाही तर काय? तुमचे खर्चाचे आकडे तरी बघा जरा, प्राथमीक सदस्य फी २५०१, विद्यार्थी नोंदणी फी २०,००१, परिक्षा फी २५,००१ , गाईड चे मानधन ५,००१ हा सगळा हिशेब झाला ५२,५०४ चा त्यात ज्योतिष विद्या वाचस्पती साठी जादाचे ५,००१ म्हणजे ५७.५०५! बापरे एव्हढा खर्च मी करायचा? “

“एव्हढा खर्च होणारच ना, ‘ज्योतिष महामहोपाध्याय ‘ , ‘ज्योतिष विद्या वाचस्पती’ काय साध्या सुध्या पदव्या आहेत काय?”

“तरी पण हा फार म्हणजे फारच खर्च आहे”

“आता आहे हे असे आहे, मोठी संस्था आहे आमची, खर्चही बराच मोठा असतो आमचा. त्याची भरपाई या ना त्या मार्गाने व्हावी लागते.  आपण असे करु , थोडे फार डिस्काऊंट इकडे तिकडे करुन रुपये ५१,००१ मध्ये बसवून टाकू सगळे काय? मी किवळे मॅडमना तसा हिशेब पाठवायला सांगतो, तो मिळाला की लगेच रकमेचा भरणा करा. चेक XXXXXX संस्था, पुणे या नावाने काढायचा आणि पेएबल अ‍ॅट पार चेक द्या हं, नाही तर सरळ त्या रकमेचा  डी.डी. च पाठवा. पुण्यात येऊन कॅश भरता आली तर फारच उत्तम !  पण लौकर भरणा करा हो, कारण यादीत बरीच नावे आहे , आपल्या कडून उशीर झाला तर आपली या वर्षीची संधी हुकेल”

‘थांबा थांबा जरा इतकी गडबड कशाला. त्याचे काय आहे माझा स्वभाव पडला थोडासा संशयी आणि अ‍ॅनॅलायटीकल, आपण माझे लेखन वाचले आहे म्हणता म्हणजे आपल्याला थोडीफार कल्पना असेलच”

“हो, तर”

“तेव्हा ऐका आता,  ‘तुमची संस्था माहीती नाही ‘ असे मी आधी म्हणालो होतो ते केवळ तुमची फिरकी घ्यायला बरे का जनार्दन शंकर घाटपांडे. प्रत्यक्षात मला तुमची ही संस्था , ते टिनपाट विश्वविद्यालय चांगले माहीती आहे , तुमच्या संस्थेत कोणती रेमेडोकी मंडळी भरली आहेत हे पण चांगले ओळखून आहे मी !  सगळे एकजात कूपमंडूक ! आणि काय हो,  तुमच्या त्या प्राथमिक सदस्यत्वाचे रुपये २५०१ भरायचे त्याचा फायदा काय तर पहील्या रांगेत आरक्षित जागा! अहो वर्षात इनमिन दोन फालतु कार्यक्रम करणारी तुमची संस्था, चार रिकामटेकडे पेन्शनर सोडले तर काळे कुत्रे फिरकत नाही तुमच्या कार्यक्रमाला , दोन रांगा भरतील इतकेही प्रेक्षक नसतात, कसली पहीली रांग घेऊन बसलाय”

“असे नाही हो …”

“नाही काय मला माहीती आहे ना! आणि प्राथमिक सदस्यत्वाचा दुसरा लाभ काय म्हणालात, हो, आठवले, कार्यक्रम झाल्यानंतर सन्माननिय अतिथींशी ओळख, असाच ना? कोणाला पाहीजेत ह्या असल्या लोकांच्या ओळखीं? हे तुमचे सन्मानानिय अतिथी अमृततुल्य चा चहा तोही दोघांत एक घेत , कुचाळक्या करत, दुसर्‍या ज्योतिषांची निंदा – नालस्ती करत गावभर उंडारत असतात , ज्योतिष हा जोडाक्षर युक्त शब्द निट उच्चारता येतो हेच त्यांचे एकमेव कर्तृत्व ,  रवी –शुक्र प्रतियोग शुभ असतो हे यांचे ज्ञान, मघाशी तुम्ही ज्यांचे नावे घेतली त्यातले एक महाशय रोज संध्याकाळी पिऊन टाईट्ट होऊन पडलेले असतात आणि दुसरे बाप कमाईवर बाया नाचवतात, जगजाहीर आहे हो हे , तरी ते तुमचे माननिय काय ? यांच्याशी ओळख हा माझा सभासदत्व घेतल्याचा फायदा काय?”

“अहो आम्ही त्या लोकांचे ज्योतिष विषयातले कर्तृत्व पाहतो, त्यांच्या खासगी आयुष्यात कशाला डोकवायचे?”

“अहो पण माननीय म्हणून बोलावताना त्या व्यक्तीचे चारित्र्य तपासायला नको ? उद्या तुम्ही दाऊद ईब्राहीम ला बोलवाल माननीय म्हणून, गेला बाजार पप्पू कलानी!”

“अहो काही तरीच काय बोलताय , गोखले”

“योग्य तेच बोलतोय मी ,सभासद फी काय, नोंदणी फी काय, गाईड फी काय … चौफेर लुटालूट चालवली आहे तुम्ही “

“अहो गोखले जरा विचार करा, खर्चाचा आकडा मोठा आहे हे मान्य पण एकदा का तुमच्या नावापुढे अशी भारदस्त पदवी लागली की बघा कसा चमत्कार होतो ते. समाजात तुमचे वजन वाढेल, तुमचा मोठा आदर सन्मान होईल, जातकांची नुसती रीघ लागेल, तुमच्या मानधनात तुम्हाला घसघशीत वाढ करता येईल, आज खर्च झालेले पन्नास हजार असे चुटकी सरशी वसूल होतील, मग नंतर काय फायदाच फायदा , लक्षात येतेय का तुमच्या मी काय म्हणतो आहे ते?”

“हे पहा , मला मुळात अशा कोणत्या पदव्यांच्या शौक नाही, मी बी.ई. इलेक्ट्रीकल आहे पण मी अजुनही शिवाजी युनिव्हर्सीटी देत असलेले ते डिग्रीचे भेंडोळे घेतलेले नाही, त्या भेंडोळ्या वाचून माझे काहीही अडले नाही, भारतात नाही की अमेरिकेत नाही, अमेरिकेचा व्हिसा सुध्दा मला कोणा डिग्रीच्या कागदा शिवाय मिळाला होता, माझ्या कडे ज्योतिषातली एकही पदवी नाही की सर्टिफिकेट नाही, माझ्या कडे येणारे जातक माझ्या कडे कोणती पदवी आहे हे बघून येत नाहीत, मी चांगले मार्गदर्शन करतो म्हणून येतात ते आणि  भिंतीवर टांगलेल्या पदवी पेक्षा तेच महत्वाचे असते ना?”

“अहो असे काय बोलता, तुमच्या नावा पुढे ‘डॉ.”  लागणार ना, साधे ‘ सुहास गोखले’ आणि ‘डॉ. सुहास गोखले’ यात काहीच फरक नाही का?

“फरक आहे ना, जरुर आहे पण केव्हा? जेव्हा मी ही पदवी खरोखरीचे संशोधन करुन, कडक चाचणी परिक्षा उत्तीर्ण होऊन , कष्टाने , मेहेनतीने आणि प्रामाणीक पणे मिळवेन तेव्हाच “

“आम्ही ही परीक्षा घेतोच की”

“ही अशी? माझ्या ब्लॉग वर केलेले हलके फुलके लिखाण तुम्ही पी.एच.डी. चा थेसीस म्हणून स्विकारणार , केटरींग आणि टुरिस्ट टॅक्सीच्या व्यवसायात खाजवायला वेळ नाही अशी व्यक्ती माझा गाईड? मी स्क्रिन शॉट पाठवले तरी चालतील ? त्यावर तुमचे ते गाईड नामक बुजगावणे प्रबंध न वाचतात डोळे झाकून सही करणार आणि नंतर तुमची ती रिकामटेकडी चार – टाळकी मिटींग मध्ये माझे पैसे जमा झाले याची खात्री केल्या नंतर त्या तथाकथित प्रबंधास मान्यता देणार, अरे काय पोरखेळ चालवला आहे हा? विद्येचा बाजार भरवता काय?  माझ्या कडून पन्नास हजार घेऊन मला पदवीची सुरळी विकता काय?  तुमची गल्ली बोळातली फडतूस संस्था, तुमची काय लायकी असल्या पदव्या देण्याची आणि असल्या पदव्यांना ती ज्या कागदावर छापली आहे त्या कागदा इतकी तरी किंमत बाजारात आहे का?

“हे पहा गोखले आपला मोठा गैरसमज होतो आहे, अहो पैसे देऊन पदव्या देणार्‍यातले नाही आम्ही, आत्ता पर्यंत आम्ही सन्मानित केलेल्यांची यादी पाठवतो तुम्हाला , ते लोक असे पैसे देऊन पदवी स्विकारतील असे वाटते का तुम्हाला”

“अहो, वाटायला कशाला पाहीजे, तुम्ही जो हिशेब सांगताय त्यावरुनच सगळे स्पष्ट  होते आहे ना! ना थेसीस, ना गाईड ना परिक्षा, पैसे मोजा आणि पदवी घ्या, आणि समजा वादासाठी मी पैसे मोजून पदवी घ्यायची ठरवले तर तुमच्या कडे कशाला येईन हो? अरे गल्लीबोळातली फाळकूट संस्था तुमची त्याला ना शासन मान्यता ना समाज मान्यता, संस्था कसली , कुचाळक्या करणार्‍यांचे एक टोळके आहे हे, नाव ज्योतिष शास्त्राचे बाकी सगळे भंकसच”

“अहो काय हे भलतेच , तुम्ही आमच्या संस्थेवर खोटे आरोप करत आहात”

“मी बोललो त्यात काहीही खोटे नाही, मी नाशकात राहातो म्हणजे पुण्यात काय चाललेय ते कळत नाही असे वाटले का तुम्हाला, नाशकात येण्या पूर्वी मी पुण्यातच बरीच वर्षे राहीलेलो आहे तेव्हा कोणता बेडूक कोणत्या विहीरीतला आहे हे मला चांगले माहीती आहे, तुमच्या ह्या चिरकूट संस्थेचे जे संस्थापक आहेत ना त्यांना सुद्धा एकदा भेटलो आहे मी, त्यावर एक लेख पण लिहला आहे मी माझ्या ब्लॉग वर , तो वाचला नाहीत का? काय भंपक पणा चालवलाय हा, भविष्य सांगण्याच्या बहाण्याने जातकांना लूटून झाले आता पैसे घेऊन पदव्या वाटायचे दुकान चालवायला लागलात का? कोठे फेडाल हो असली पापें?

“म्हणजे तुम्हाला आम्ही देत असलेली पदवी नको आहे तर?”

“कशाला पाहीजेत या असल्या पदव्या त्या ही विकत घेतलेल्या, असल्या विकाऊ पदव्या भिंतीवर टांगून लोकांना फसवायचे काय?

“माफ करा तुमचा गैरसमज आम्ही दूर करु शकत नाही”

“नकाच करु , मुळात माझा गैरसमज झालेलाच नाही. गैरसमज झाला असेल तर तो तुमचाच, अंदाज चुकला तुमचा, चुकीच्या माणसाला पदवी विकायचा घाट घातला तुम्ही”

“आता असे बोलल्यावर मार्गच खुंटला म्हणायचा”

“बरे झाले लौकर लक्षात आले आपल्या, इथे भेटलात ते भेटलात आता पुन्हा वरती भेटू नका म्हणजे झाले!”

“…..”

 

समाप्त 

शुभ भवतु 

 

 

 

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

14 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  कड्डक! एक दिवसाचा कोर्स करून ज्योतिष प्रवीण झालेल्यांची कीव येते.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री प्राणेशजी

   अहो या लोकांना भविष्य सांगायचेच नसते , पत्रिका बघायचे नाटक करुन प्रथम जातकाला भिती घालायची असते त्यासाठी शनी , मंगळ, साडेसाती, पितृदोष, नक्षत्रशांती, ग्रहणयोग, गुरु-चांडाल असले बागुलबुवे उभे करण्यापुरती माहीती असली की झाले . मग सुरु होता तो उपाय तोडग्यांचा भडीमार आणि किळसवाणा बाजार ! यांचा खरा व्यवसाय तर उपाय तोडग्यांचाच असतो, भविष्य फक्त जातकाला खेचून आणायचे एक साधन फक्त , मग त्यासाठीच भींतीवर मोठ्या मोठ्या पदव्या भिंतीवर टांगाव्या लागतात , अगदी विकत घेऊन का होईना भिंत सजवायची आहे ना!

   सुहास गोखले

   +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री प्रमोदजी,

   आपली ही कॉमेंट कशी काय कोण जाणे ‘स्पॅम’ फोल्डर मध्ये गेली होती. आत्ता सहज तो फोल्डर बघताना दिसली. त्यामुळे आपली कॉमेंट जरा उशीरा प्रकाशीत झाली.

   सुहास गोखले

   0
 2. शरयू आडकर

  सुपर
  तूम्ही असल्या लोकांना लांब ठेवा तुमचा वेळ अमूल्य आहे

  0
 3. Suresh

  <>

  hmmm. मुंबईचे DDDDDD माहित आहेत मला. ते अतिथी होते खरंच? वाटले होते ते तरी नसतील यांच्यात. असो.
  वर घेतलेले जनार्दन शंकर घाटपांडे हे नाव खरे म्हणायचे कि बदलले? मायबोली वर एक घाटपांडे आहेत ते हेच तर नव्हे ना?

  0
  1. सुहास गोखले

   श्री सुरेशजी .

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   लेखात लिहलेली घटना 100% सत्य आहे , प्रसंग जसा घडला तसा लिहला आहे. प्रसंग नुकताच म्हणजे सहा महिन्यांं पूर्वीच घडला असल्याने सर्व तपशील चांगले स्मरणात आहेत.

   अर्थात लेख लिहताना त्यात रंजकता आणण्यासाठी थोडे फार साहीत्यीक / संपादकीय संस्कार करावे लागतात तेव्हढेच केले आहेत. लेखात उल्लेख केलीली नावे म्हणजे जनार्दन शंकर घाटपांडे , किवळे मॅडम, सन्माननीय अतिथी W, Y , T D इत्यादी अर्थातच बदललेली आहेत. सत्यकथा असली तरी काही वेळा उगाच कोर्ट कचेर्‍या करायला लागू नयेत म्हणून नावे बदलावी लागतात.

   त्यामुळे मुंबईचे DDDDDD म्हणजे तुम्हाला जे वाटले ते गृहस्थ नाहीत (अर्थात तुम्हाला हे कोण वाटले ते कळवले नसले मी तर्क केला आहे)

   मुळात ज्यांनी मला फोन केला होता त्यांचे नाव ‘घाटपांडे ‘ नव्हतेच त्यांचे नाव दुसरेच होते त्यामुळे मायबोलीवरचे श्री प्र्काश घाटपांडे वेगळे त्यांचा या जनार्दन शंकर घाटपांडेशी कसलाही संबंध नाही. श्री प्रकाश घाटपांडे अतिशय अभ्यासू , संतुलीत असे अभ्यासक आहेत.

   सुहास गोखले

   0
 4. Uttam Gawade

  हा. हा.. हा… मस्त सुहास जी, सध्या अशा “डॉ.” लोकांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ज्योतिष संस्था या पैसे कमविण्याचा धंदा बनल्या आहे. पत्रावळी प्रमाणे प्रमाण पत्र व डिग्री वाटली जातेय.
  मागच्या आठवड्यात फेसबुकच्या एका ग्रुपवर अशाच एका PhD धारकाचा सत्कार करण्यात आला होता, अर्थात त्यांनी ऍडमीनना पर्सनल मेसेज करून बातमी दिली होती, ज्याचा स्क्रीन शॉट देऊन ऍडमीननी त्यांचा सत्कार केला होता, लाईक व अभिनंदनाच्या कमेंटचा तर पाऊसच होता. (गमतीदार गोष्ट तर हि होती कि या महाशयांनी कधीही एकही लेख, पोष्ट अथवा कमेंट ग्रुपवर केली नव्हती . आणि अचानक Phd ?) whats app वाराही आपले सत्काराचे फोटो हे महाशय पाठवत राहतात.

  0
  1. सुहास गोखले

   श्री उत्तमजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपण लिहलेले ‘मागच्या आठवड्यात फेसबुकच्या एका ग्रुपवर अशाच एका PhD धारकाचा सत्कार करण्यात आला होता,…” वाचून मौज वाटली. म्हणजे अशी अ‍ॅफर आलेला मी एकटाच नाही तर ! मी पैसे भरुन खोटी पदवी घेण्याचे नाकारले पण काही जण अशा पदव्या निर्लज्ज्पणे विकत घेत आहेत असे पण आहे तर !

   सुहास गोखले

   0
 5. Anant

  श्री. सुहासजी,

  वाचताना जाम हसू येत होते.
  मस्त लिहिले आहे.
  आज काल अश्या डिग्रीयांचे फार पेव फुटले आहे.
  बरे झाले तुम्ही यावर प्रकाश टाकलात.

  धन्यवाद,

  अनंत

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.