जप , पोथी याबद्दल आपण पाहीले आता पाहू या इतर काही लोकप्रिय  उपाय / तोडगे

जप / पोथी पेक्षाही जास्त लोकप्रिय असे काही उपाय / तोडगे आहेत , हे  निरुपद्रवी आणि कमी खर्चाचे असतात. बर्‍याच वेळा हे तोडगे  ‘लाल किताब’ नामक एक भंगार चोपडे फार लोकप्रिय आहे त्यातूनच उचललेले असतात. ह्या ‘लाल किताब’ इतके आचरट ज्योतिष विषयक पुस्तक मी अद्याप पाहीले नाही. पुढे मागे या ‘आचरटा’ पणावर काही लिहतो, मस्त करमणूक होईल.

देवळाला  ‘क्ष’ वेळा भेटी देऊन वस्तू अर्पण करणे:  (लाल) फूल / लवंग – दालचिनी- बदाम – काळे तीळ – उडीद , मूग डाळ, गुळ  (आणि मागे वळून न पाहता घरी परत येणे !), बर्‍याच वेळा ह्या  वस्तू  अर्पण करताना त्या चढत्या क्रमाने करावयाच्या असतात, म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसरे दिवशी दोन , तिसरे दिवशी तीन अशा पद्धतीने . हा प्रकार हमखास ११ / २१  / ३३  दिवस करावयाचा असतो.

रात्री झोपताना उशाशी / पायाशी काही तरी  ( उदा: गुळ, दगड, लसूण लोकप्रिय: चांदी च्या वाटीत दूध!  ) ठेवणे व दुसरे दिवशी ती वस्तू झाडाच्या मुळाशी सोडणे (पिंपळाचे झाड सध्याचे ‘हॉट’ झाड आहे !).

एखादी वस्तू वाहत्या पाण्यात सोडून देणे. यात असेच गुळ, बदाम , कणकेचे गोळे असले पदार्थ असतात,

दान धर्म:  एका विषीष्ठ वारी, विषीष्ठ वस्तूचे ( लोकप्रिय: पिवळ्या रंगाची वस्तू  ) दान करणे. शनीच्या देवळा बाहेरच्या भिकार्‍याला दान करणे इ यात अन्नदान , वस्त्र दान , एखाद्या विषीष्ट वस्तूचे दान असे पोट भेद असतात.

मंत्रवलेल्या (?) अक्षता , गुंजा, उडीद, तीळ,  विषीष्ट ठिकाणी जाऊन फेकणे.

२००९ सालची गोष्ट , तेव्हा मी नोकरीत असताना , एका जागे साठी उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो, तेव्हा एक उमेदवाराने माझ्या केबीन मध्ये आल्या आल्या गुपचुप कसले तरी तांदूळ (अक्षता ?) इकडे तिकडे भिरकावल्या, त्याच्या दुर्दैवाने मी ते बघितले , ज्योतिषाचा अभ्यास असल्याने मला लगेच लक्षात आले की त्या उमेदवाराने इंटरव्हू च्या यशा / नोकरी साठी एक (जालिम ?) तोडगा केला होता,  अर्थात असल्या फालतू तोडग्याचा माझ्यावर काय असर होणार ?

त्या उमेदवाराला  हे काय म्हणून विचारले , स्वारी त-त-प-प करायला लागली, नंतर त्याने सगळे कबूल केले.

मी त्या उमेदवाराला ताबडतोब हाकलून दिले आणि म्हणालो

“जा , सांग तुझ्या त्या ज्योतिषाला ,  म्हणावं तोडगा फेल गेला तुमचा…”

पिंपळाला / वडाला प्रदक्षिणा: हा तोडगा बर्‍याच कारणां साठी सुचवला जात असला तरी ‘संतती’ साठी खास लोकप्रिय आहे.

देवीची ओटी भरणे: हा तोडगा खास विवाहा साठी.

मौन व्रत:   आत्ता पर्यंत पाहीलेल्या तोडग्यात मला स्वत:ला आवडलेला असा हा एक  बेस्ट तोडगा आहे , खास करुन बायकांना मोठ्या प्रमाणात सुचवला गेला पाहीजे !

उपास: उपास धार्मिक कारणा साठी नाहीच , ‘लंघन’ म्हणजेच पचन संस्थेला विश्रांती अशा मर्यादीत अर्थानेच त्याचा वापर व्हावा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही. उपास करावयाचा असल्यास तो तब्बेती साठी करा , लंघन म्हणून करा.. आपली तब्बेत पाहून करा… उगाच सोसासोसाने निर्जळी उपवास करत बसु नका … “मी निर्जळी उपवास करतो / करते’ असे जे सांगत फिरतात त्यात केवळ .’मी म्हणजे किती कडक भक्त … बघा मला कसे जमते , तुम्हाला नाही जमणार असले उपास..’ अशी फुशारकी मारण्याचाच हेतु असतो.  ‘संकष्टी’ त्यातही ‘अंगारक’  संकष्टी यात काहीही स्पेश्यल नाही. शनीचा म्हणूण शनिवारचा उपास करु नका , शनिवारचा उपास धरल्याने शनी प्रसन्न होणार नाही.

रताळी, शाबुदाणा, बटाटा इ. खाऊन तुम्ही उपवास केला म्हणत असाल तर ती एक मोठी फसवणूक ठरेल,  हे पदार्थ इतके वातुळ व पचावयास जड आहेत की त्याने काही फायदा होण्या पेक्षा तोटेच जास्त होतील. तब्बेतीच्या कारणा साठी उपवास करायचा असेल तर अगदी हलका आहार, फळांचे रस असा घेऊन करावा.  ज्यांना ह्रदयविकार . किडनी,  मधुमेह किंवा तत्सम तब्बेतीच्या तक्रारी आहेतत् यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपास करावे हे चांग़ले.

पांढरे  बुधवार , सोळा सोमवार यात काहीही अर्थ नाही , संकल्प सोडून उपवास करणे मुळातच चुकीचे  आहे , असे करणे म्हणजे देवाला लाच देण्यातलाच प्रकार, त्याने काहीही साध्य होणार नाही

वर लिहलेले तोडगे तसे निरुपद्रवी आहेत , फार खर्चिक नाहीत पण तितकेच निर्बुद्ध पणाचे आहे,  असे उपाय करुन तर पाहू असा मोह होणे साहजीकच आहे , पण हे उपाय काय किंवा अन्य उपाय / तोडगे  करताना लोक त्याच्या आहारी जातात,  हे उपाय करण्याच्या नादात ते एरवीचे प्रयत्न सोडून देतात , काहीही न करता स्वस्थ बसतात (जसे काही त्या ‘उपाया’ ला कॉन्ट्रॅक्ट देले आहे ?)   खरा धोका हाच आहे , हे लक्षात घ्या.

आता आपण काही खर्चिक उपाय / तोडगे पाहू…..ज्योतिषाची खरी कमाई इथेच असते हे लक्षात ठेवा !

स्पेश्यल दान:  एखाद्या वस्तूची सोन्याची प्रतीमा विषीष्ट व्यक्तीलाच दान करणे,  हा तोडगा ‘आमच्या तर्फेच’ करायचा , अन्यथा लाभणार नाही, असा आग्रह का धरला जातो यामागचे कारण लक्षात आले का?

इथे ज्योतिषी दुहेरी कमावतो, ती ‘सोन्याची प्रतीमा’  त्या ज्योतिषा कडेच मिळते आणि ती ‘विषीष्ट व्यक्ती’ त्या ज्योतिषच्या परिवारतीलच  असते हे वेगळे सांगायला हवे का ? आणि ती ”सोन्याची प्रतीमा” आता पर्यंत असंख्य वेळा रिसायकल झालेली असणार हे ही उघडच आहे. ही लुट मार अधिकृत (?) करण्यासाठी मग अनेक (खोटे नाटे ) ग्रंथ लिहले गेले … हा घ्या पुरावा !

 

आणखी एक ….

तिर्थ यात्रा / विशीष्ट देवतेची , एखाद्या विषिष्ट ठिकाणी जाऊन (च) पूजा करणे: एखाद्या खास ,अपरिचित देवस्थानालाच ! ही देवस्थाने बहुतेक वेळा दक्षीणेकडच्या राज्यातच असतात!(का ?)

 

नारायण नाग बली / कालसर्प दोष शांती: उपाय तोडग्यांचा ‘राजा’ मानला जावा असा हा विधी ! मुळातच पितृ शाप , सर्प शाप असे काही नसतेच त्यामुळे ह्या असल्या विधींना काहीच अर्थ नसतो. कालसर्प योग हा अगदी अलिकडच्या काळातला तयार केलेला  ग्रहयोग आहे . ही शुद्ध बनवाबनवी आहे , लोक आताशा मंगळ, साडेसातीला फारशी घाबरेनाशी झाली म्हणून की काय ह्या योगाचे भूत उभे केले आहे ,  त्यातही आता अर्ध कालसर्प योग , पाव कालसर्प  योग  असे निर्लज्ज प्रकार चालू झाले आहेत. जुन्या ग्रंथांतून या योगाचा कोणताही उल्लेख नाही, अनेक नामवंत ज्योतिषांनी असला काही योग नसतो हे एकमुखाने  खणखणीत शब्दात निक्षून सांगीतले आहे . हे पूजा विधी महागडे असतात आणि त्यात ज्योतिषाला मोठे कमीशन मिळत असते हे वेगळे सांगायला नकोच.

 

यज्ञ/ याग: कसले कसले विधी , यज्ञ , याग ( याग शब्द वापरला की कसे वजन येतं नै, त्याच्या पुढे पूजा / अभिषेक एकदमच डाऊन मार्केट !)  अर्थातच हे याग करणारे गुरुजी स्पेश्यल असणार हे ओघानेच आले.. आणि ते कोण असतात हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

 

तांबे  किंवा तत्सम धातू च्या पत्र्यावर  कोरलेल्या आकृती / प्रतीमा: तांबा – चांदी – सोने ( फार पॉवर फुल्ल असते म्हणे !) यावर उमटवलेली यंत्रे  / ताईत काहीही परिणाम देत नाहीत,  त्याच्या नादाला लागू नका . २-५  रुपयाचा प्लॅस्टीक चा पिरॅमीड  अवाच्या सव्वा किमतीत गळ्यात मारला जातो, त्याची  लायकी त्या २-५  रुपयां इतकीही नाही.

 

काही विषीष्ट वस्तू …  रुद्राक्ष (एका मुखी लोकप्रिय) ,  घुबडाचे पीस,  स्पेश्यल शिवलिंग, कुबेर,  हाथीजोडी, एकाक्ष नारळ,  दुर्मिळ वनस्पती, शंख (दक्षिणावर्ती ?) , माकडाची / मांजराची (काळ्या) वार, सापाची कात , सर्प गरळ… यादी मोठी आहे… ह्या वस्तूंना एक खास ‘अघोरी’ टच आहे नै ! हे नुस्के मुख्यत: पैसा, व्यवसायात बरकत, कोर्ट कचेरीच्या कामात यश, शत्रुवर मात अशा कामा साठी सुचवतात. हे सुचवणारा ज्योतिषी / बुवा / बाबा  /  बापू  / महाराज / अण्णा (!)   अर्थातच ‘लै भारी’  मानले जातात !

 

भाग्य रत्ने, उप रत्ने :  पुष्कराज, माणिक, मोती, पोवळे, लसण्या, गोमेद इ. या खड्यात , रत्नांत (चुकलो … गारेच्या पॉलिश केलेल्या तुकड्यात ! ) अशी कोणतीही ताकद नाही जे तुमचे चांगले / वाईट करु शकेल .या खड्यातून अशी कोणतीही पॉवर फुल्ल किरणें निघत नाहीत की जी तुमच्यावर चांगला / वाईट प्रभाव टाकतील. समजा त्या  खड्याच्या स्पर्शाने काही चमत्कार होणार असेल  तर तो खडा अंगठीत धारण करुन काय उपयोग ? त्याचा तुमच्या शरीराला स्पर्शच होणार नाही !

समजा वादा साठी आपण अशी काही ताकद त्या ताकद खड्यात असे समजू पण तशी ताकद असायला तो खडा अत्यंत शुद्ध स्वरुपात लागेल. असा खडा अर्थातच कमालीचा दुर्मीळ असेल व स्वाभाविकच त्याची किंमत काही लाख रुपये किंवा त्याहुनही जास्त असेल, १००० -१२०० रुपयांच्या गारेच्या पॉलीश केलेल्या तुकड्यात अशी ‘पॉवर’ कशी येणार ?

खड्यात कोणतीही ’पॉवर’ नसते , तो खडा वापरुन काहीही होणार नाही, तुमच्या समस्या सुटणार नाहीत.

मग काही जणांना एखादा खडा लाभतो  काहींना लाभत नाही असे अनुभव येतात त्याचे काय?

वस्तुत: हे खडे सहा महीने वापरा आणि मग ठरवा असा सल्ला दिला जातो , आता हा सहा महीन्याच्या कालावधी इतका मोठा आहे की व्यक्तीच्या आयुष्यात बरेच काही लहान – मोठे घडू शकते, त्यात त्या खड्याचे कर्तृत्व काहीच नाही , खडा न वापरताही त्या घटनां घडल्याच असत्या ! इथे होते काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीला खडा सुचवला जातो तेव्हा तो निश्चितच त्याच्या एखाद्या समस्ये साठी, त्यामुळे त्या व्यक्तीची मनोधारणा आपोआपच अशी बनते की “आता मी हा खडा वापरतो आहे ना. मग माझे सगळे चांगले होणार …”  याला वैद्यकिय शास्त्रात ‘प्लॅसीबो इफेक्ट’ म्हणतात ,  मनाचे प्रोग्रॅमिंग होते , बाकी काही नाही. खडा काहीच करत नाही , जे काही करायचे ते ती व्यक्तीच, श्रेय मात्र त्या खड्याला जाते !

या खड्याच्या व्यापारात जबरद्स्त नफा आहे !

लक्षात ठेवा तुमचे भाग्य उजळवायची कोणतीही ताकद ह्या खड्यात नसते . चांगली नोकरी , आर्थिक यश तुमच्या प्रयत्नांवर असते ,  विवाह ठरत नाही ?  इथे खडा काय करणार ?

आरोग्याच्या समस्ये साठी खडे वापरणे  हा अत्यंत आचरट आणि तितकाच धोकादायक अपाय आहे ,  या खड्याच्या नादात योग्य ते  औषधा उपचार वेळीच न मिळाल्याने किंवा त्या कडे दुर्लक्ष झाल्याने एखाद्याच्या जीवा वर बेतण्याची शक्यता असते हे लक्षात घ्या.

पुन्हा एकदा आपण वादा साठी म्हणून ‘खड्यात काही ताकद असते ‘  हे गृहीत धरु , असे असताना तो खडा सुचवताना योग्य असाच खडा सुचवला पाहीजे ना?  त्या साठी त्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा सखोल अभ्यास करावा लागेल पण नेमका तोच होत नाही,  चुकीचा खडा सुचवला जातो !  उदा: एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ बिघडला असेल तर त्याला मंगळचा म्हणून मानला गेलेला खडा सुचवला जातो, आता मंगळ बिघडला म्हणजे तो अशुभ फळे देणार , मंगळाचा खडा वापरुन आपण त्याची ताकद / अशुभत्व वाढवत असतो, हे म्हणजे सापाला दूध पाजल्या  सारखे  किंवा एखाद्या गुंडाला खुराक देण्या सारखे आहे , त्याने त्याची ताकद वाढून तो अधिक जोमाने आपल्याला त्रास देईल!!

हे खडे सुचवताना असा कोणताही विचार होत नाही, जन्मराशी वरुन खडे सुचवणे, नक्षत्रा वरुन खडे सुचवणे इतकेच काय प्रचलित नावा वरुन खडे सुचवणे हे प्रकार होतात, आता माझे नाव ‘सुहास’ आहे पण त्याच्या माझ्या जन्मनक्षत्राशी काही एक संबंध नाही, मग मला केवळ ‘सु’ या नावाने एखादा खडा सुचवला तर तो मला कसा  लाभेल ? (इथे वादा साठी खडा लाभतो असे गृहीत धरले आहे !)

नक्षत्र शांती:

काही नक्षत्रे अशुभ मानली गेली आहेत ती त्या नक्षत्र समुहात असलेल्या काही प्रभावी तार्‍यांमुळे. नक्षत्राची शांती चा त्या हजारो प्रकाश वर्ष दुर असलेल्या अशुभ तार्‍यावर कोणताही ठिम्म परिणाम होणार नाही . कोणतीही नक्षत्र शांती करायची आवश्यकता नाही. मग कोणीही कितीही, कसलाही आव आणून  सांगू  देत. शुद्ध बकवास आहे हा !

अघोरी: कवड्या, गुंजा , एक धारी लिंबू ,  कणकेच्या बाहुल्या (टाचण्या टोचलेल्या !) , रक्त , स्मशानातली राख , हाडे , माकडाचे पंजे, बाळंतीणीचा केस पासुन काहीही जे इथे लिहणे सुद्धा शक्य नाही .

वर उल्लेख केलेल तोडगे बघितले तर त्यात एक समान सुत्र दिसते ते म्हणजे ‘देवाला लाच देणे’ !  मी अमुक तमुक करतो , तू  माझ्या साठी हे  कर ते कर अशी लाच देता का देवाला ? देव जर सर्व शक्तीमान असेल तर त्याला तुमचे जे काही भले / वाईट करायचे ते तो करणारच , त्यासाठी देवाची स्तुती करुन नंतर याचना करणे अशा मखलाशीची / मस्का पॉलिशीची  काहीच जरुरी नाही.

देव मानू नका  / धार्मिक विधी करु नका असे मी अजिबात म्हणत नाही , गैरसमज करुन घेऊ नका..

मी फक्त एव्हढेच सांगतो आहे की देवाला लाच देऊ नका, संकल्प सोडून कोणतीही पूजा अर्चा , साधना / विधी करु  नका.

जे काही करायचे ते करताना , अगदी देवा पुढे साधा हात जोडताना सुद्धा  देवा कडे काही मागू नका.

देव सर्वसाक्षी , सर्वज्ञ आहे ना मग त्याला कळते तुम्हाला काय हवे नको ते ,  तुम्हाला जे पाहीजे ते मिळत नाही याचा अर्थ ….

तुम्ही त्यासाठी पात्र नाही किंवा त्याची अजून वेळ आली  नाही किंवा तुमचे प्रयत्न  पुरेसे होत नाहीत / चुकीच्या दिशेने होत आहेत.

मग काही जणांना या उपाय –तोडग्यांचा लाभ झाला आहे / अनुभव आला आहे त्याचे काय ?

सर्दी च्या बाबतीत  डॉक्टर विनोदाने म्हणतात  “सर्दीवर औषध घेतले तर आठवड्या भरात  बरी होते आणि औषध घेतले नाही मात्र सर्दी बरी व्हायला तब्बल सात दिवस लागतात !’

आपल्या पुढ्यताल्या काही समस्या या अशाच काही काळ थांबले तर आपोआपच सुटणार्‍या असतात. श्रेय मात्र त्या तोड्ग्याला जाते प्रत्यक्षात तो तोडगा न करता सुद्धा तेच रिझल्ट्स मिळाले असते.

काही वेळा हे तोडगे काहीसे सौम्य सायकॉलीजकल थेरपी / प्लॅसीबो इफेक्ट सारखे काम करतात.  हे उपाय करत असताना ती व्यक्ती स्वत:ची सतत समजुत घालत असते : मी हा खडा वापरतोय / हा जप करतोय / ही पोथी वाचतोय आता माझे सगळे ठीक होणार . हे एका प्रकारचे प्रोग्रॅमिंग होत राहते आणि सबकॉन्शस मन ते ग्रहण करुन , तुमच्या विचारात बदल घडवून आणते , तुमच्या मनाला काहीशी उभारी येते , चिंतेने  बधीर झालेले मन मग जरा वेगळा , फ्रेश विचार , वेगवेगळ्या मार्गाने / दिशेने करायला लागते. प्रश्न सोडवण्या साठी आवश्यक असलेले ब्रेन स्टॉर्मिंग आपोआपच होते , मार्ग सुचतो , समस्येचे समाधान होते… क्रेडीट मात्र त्या तोडग्याला आणि तो सुचवणार्‍या ज्योतिषाला / बुवा, बाबा, बापू , महाराजाला जाते !

मग आम्ही करावयाचे तरी काय ?

प्रयत्न ….प्रयत्न … आणि प्रयत्न !

चांगली कृत्ये करणे  यात सदैव खरे बोलणे , टीका – निंदा नालस्ती न करणे ,  समोरच्या व्यक्तीचे , प्रसंगाचे मूल्यमापन (जजमेंट ) न करता ते सगळे जसे आहे तसे स्विकारणे ,  सतत सकारात्मक (पॉझीटीव्ह) बोलणे,  यथाशक्ती पण सत्पात्री दान करणे , अपंग, रुग्ण, अनाथ मुले, निराधार वृद्ध यांना शक्य तितकी मदत करणे.

लक्षात ठेवा कर्माचा सिद्धांत आपल्याला सांगतो:

कर्म कोणतेही करा त्याचे फळ निर्माण होतेच आणि ते आपल्याला भोगावेच लागते. (काही वेळा लगेचच , काही वेळा जरा उशीराने) . वाईट कर्माची वाईट फळें आणि चांगल्या कर्माची चांगली फळे असा साधा सरळ  हिशेब आहे.

चांगल्या कर्माची व वाईट कर्माची फळे स्वतंत्र असतात , ती वेगवेगळ्या हिशेबाच्या चोपडीत लिहली जातात, त्यांची बेरीज-वजाबाकी होत नाही,  चांगले कर्मे एखाद्या वाईट कर्माला  नष्ट करु शकत नाही.

म्हणजेच दिवसभर पाप करुन संध्याकाळी पूजा केल्याने ती पापे नष्ट होत नाहीत.

आपल्याला  जी सुख दु:खे भोगावयास लागतात  त्यातली काही दैवाधीन असतात त्यात आपल्याला काहीही बदल करता येत नाही ,जे पुढ्यात येईल ते भोगायचे बस्स. काही फळे प्रयत्नाधीन असतात , त्या फळांच्या बाबतीत आपल्याला थोडेसे स्वातंत्र्य आहे . म्हणजेच प्रयत्नाने , वर उल्लेख केला आहे तशा चांगल्या कृत्याने , अशी  फळें आपण टाळू शकलो नाही तरी त्यातले अशुभत्व / प्रतिकूलता काही अंशी कमी करु शकतो , किंवा ही फळे मिळण्याचा / भोगण्याचा कालावधी मागे – पुढे करु शकतो जेणे करुन आपण ती फळें आपल्याला अनुकूल अशा काळात भोगून संपवू शकतो.

समजा आपण राहातो  त्या भागात चार तासाचे सक्तीचे विद्युत भारनियमन (लोड शेडींग) आहे , आता सक्तीच असल्याने हे लोड शेडींग आपण टाळू शकत नाही पण हे लोड शेडिंग दिवसातले कोणते चार तास करायचे याचा चॉईस आपल्याला मिळाला असेल तर आपण कोणते चार तास निवडू  ? अर्थातच रात्री  १२ नंतरचेच ना?  ज्यावेळी आपण झोपलेलो असतो , विजेची गरज जवळजवळ नसते किंवा ज्या वेळात विज गेली तरी आपले फारसे अडणार नाही अशीच वेळ आपण निवडणार ना? म्हणजे ‘विज जाणे ‘ हे फळ आपण टाळू शकलो नाही तरी आपण ते फळ भोगायची वेळ अशी निवडली की ‘फळ ‘ तर भोगले पण त्याचा त्रास  झाला नाही !

महाभारतात अर्जुनाला ‘ स्त्रैण’ होण्याचे फळ भोगायचे होते ते त्याने आपल्या कर्माने पुढे ढकलले आणि अज्ञातवासाच्या काळात  ते भोगुन संपवले , पण साक्षात भगवान श्रीकृष्णाचा परममित्र असलेल्या अर्जुना सारख्या व्यक्तिलाही ते फळ टाळता आले नाही हे लक्षात घ्या. अर्जुन ते फळ टाळण्या साठी उपाय –तोडगे करत बसला नाही की श्रीकृष्णा कडे वशीला लावत बसला नाही.

असो.

लिहण्या सारखे बरेच आहे पण आता आवरते घेतो, पुन्हा कधीतरी ह्या विषयावर एका वेगळ्या अंगाने लिहावयाचा मानस आहे, बघू या तो योग केव्हा येतो… तो योग लौकर येण्यासाठी काही उपाय- तोडगा आहे का हो ? असेल तर सुचवा … करुन टाकू… होऊ दे खर्च !

या लेखमालेतला पहिले भाग इथे वाचा:

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग १

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग २

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग ३

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग ४

उपाय – तोडगे – १

 

लेखमाला समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

13 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  छान लेखमाला सुहास जी . तुमचे लेख संपूच नये असे वाटते . पण हे मानलेच पाहिजे कि इश्वर किवा कोणी तुमच्यावर कृपा किवा कोप करत नाही तर आपणच आपल्यावर आपल्या कर्माद्वारे कृपा किवा कोप करत असतो . जैसी करणी वैसे भरणी, करावे तसे भरावे असे म्हणतात न ते हेच . फक्त भोग थोडे मागे पुढे करता येतात .येथे तोडगा व उपाय काय करणार ? हि लेखमाला समाप्त झाली आता बाबाजींच्या आणि तुम्ही कोण कोणते प्रयोग (खास करून तांत्रिक आणि इतर जोतीषांचे कडू गोड आठवणी च्या ) प्रतीक्षेत…!!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी ,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   मन:शांती साठी कोणी जप केला, पोथी वाचली, पूजा केली , देवळाला – मठाला भेट दिली तर त्यात काही वावगे नाही पण त्यता देवाला लाच देण्याचा हेतु नसावा. ‘मी हे अमुक तमुक करतोय मग मला तू हे दे ते दे’ असा सौदा नसावा. दुसरे म्हणजे आपल्या समोरच्या समस्या सुटाव्या म्हणून हे उपाय करु नका , प्रयत्नांना पर्याय म्हणून हे असले भाकड तोडगे करु नका. चांगली कृत्ये हा आपल्याला उपलब्ध असलेला एकमेव तोडगा आहे तो करत राहावा , आपण आपले काम मन लावून करावे , त्याचे काय रिझल्ट मिळावेत / मिळायला पाहीजेत याचा विचार करु नका. काही भोग हे भोगुनच संपवायचे असतात त्यात कोणताही शॉर्टकट नाही !

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    सुहास जी तुम्ही मागे जे म्हंटले होती कि जातक जेव्हा प्रत्यक्ष भेटतो तेव्हा एक निगेटिव एनर्जी तयार होऊन त्याचा त्रास जोतीषाला सुधा होतो मग अशावेळी नक्की कोणत्या प्रकारची साधना किवा त्या एनर्जी पासून बचाव कसा करावा ? आणि कोठे तरी असे वाचले होते कि गणपती अथर्वशीर्ष वाचले कि जोतीषाला आंतस्फुर्ती ला मदत होते . या बद्दल आपले काय विचार आहेत

    0
    1. सुहास गोखले

     श्री. स्वप्नील जी ,

     निगेटीव्ह एनर्जी आणि सायकिक अ‍ॅटॅक पासुन बचाव करण्यासाठी आपले मन कणखर असावे लागते , नियमीत ध्यानधारणा , साधना करुन ही क्षमता विकसित करता येते . या बद्दल मी केव्हातरी एखादा लेख लिहेन. अंत;स्फूर्ती साठी बरेच उपाय आहेत , गणपती अथर्वशीर्ष त्यातलाच एक असावा.

     सुहास गोखले

     0
 2. Himanshu

  कोणताही ठिम्म परिणाम होणार नाही हेच खरे….उगाच का दाभोळकरांन्ना प्राण गमवावे लागले

  +1
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,
   डॉ. दाभोळकरांची काही मते निश्चितच योग्य आणि अनुकरणीय आहेत, फक्त वाईट ज्योतिषांना झोडपायचे सोडून त्यांनी ज्योतिषशास्त्रालाच चूक ठरवायला सुरवात केली ते काही पटले नाही.

   गेल्या शनिवारी माझ्या कडे एक जातक आला होता, त्याचा माझा पुर्व परिचय नव्हता , त्याची पत्रिका बघून मी पहीलच प्रश्न विचारला ” का हो , तुमच्या एखाद्या काका मुळे तुमच्या वडीलांना खूप त्रास झाला होता का ?”
   जातक म्हणाला ” हो, माझे एक काका लुच्चे , लफंगे निघाले त्यांनी अनेक फसवाफसवीचे छोटे मोठे गुन्हे केले , त्यांची रदबदली करताना, त्यांना जामीन राहताना, लोकांना नुकसान भरपाई देताना , कोर्ट कचेर्‍यांमुळे जातकाच्या वडीलांना अनन्वीत मानसीक , आर्थिक, त्रास झाला होता, काकाच्या वागणूकी मुळे समाजात अप्रतिष्ठा झाली होती !”

   आता हे काही अंदाज पंचे दाहोदरसे नव्हते किंवा कोल्ड रिडिंग नव्हेते, मला त्या काका बद्दल आधी माहीती होती किंवा जातकाने त्याच्या बोलण्यातून अशी काही मला हींट दिली होती असे हि नाही.. मी हे केवळ पत्रिकेच्या अभ्यासावरुन सांगू शकलो , माझ्या कडे असे शेकडो अनुभव आहेत .. ज्योतिषशास्त्रात काही तरी ‘दम’ आहे हे नक्कीच ..चुकते आहे ते अपुर्‍या अभ्यासावर केलेल भाकित !

   सुहास गोखले

   +1
   1. स्वप्नील

    बरोबर सुहास जी ! दाभोलकरांची किवा अनीस ची काही मते बरोबरच असतात पण बर्याच वेळेला ते प्रामाणिक काम न करता केवळ विरोधाला विरोध करतात त्यामुळे त्यांच्या हेतू बद्दल शंका निर्माण होते . अधिक माहितीसाठी श्री .अद्वयानंद गळतगे यांचे विज्ञान आणि बुद्धिवाद व विज्ञान व अंधश्रद्धा निर्मुलन हि पुस्तके वाचले कि लक्षात येईल .

    0
 3. Santosh

  सुहासजी,

  लेख मालेचा शेवट आवडला, खास करून कालसर्प योगावरचे गैरसमज बरेच दूर झाले, शेवटी कर्मभोग भोगल्या शिवाय सुटका नाही.

  तुमच्या ग्रहयोगावरील लेखाची वाट पाहतो आहे, त्यावरील लिखाण लवकरच चालू करावे हि विनंती 🙂

  संतोष

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद संतोषजी, ग्रह योगा वरचे काही भाग लिहून तयार आहेत पण अशा लेखांचा वाचक वर्ग अत्यंत मर्यादीत आहे (बर्‍याच जणांच्या डोक्यावरुन जाते हे) , पण लौकरच ते भाग प्रकाशीत करेन

   सुहास गोखले

   0
 4. Anant

  श्री. सुहासजी ,

  दोन्ही भाग एकदम छान. तुमची मते एकदम पटली, लेखमाला सुंदर झाली आहे. जपामगील meditiation चे तत्व एकदम १००% मान्य.
  “देवळाला – मठाला भेट दिली तर त्यात काही वावगे नाही पण त्यात देवाला लाच देण्याचा हेतु नसावा. ‘मी हे अमुक तमुक करतोय मग मला तू हे दे ते दे’ असा सौदा नसावा”, एकदम पटले – अगदी परवाचा अमेरिकेतला प्रसंग – संध्याकाळ साधारणपणे ७.३० ची वेळ एका देवळात आई-वडील आणि त्यांचा एक आठ -नऊ वर्षाचा मुलगा. आई-वडिलांचा कितीतरी प्रदक्षिणा घालण्याचा मानस, त्यामुळे त्यांच्या जवळजवळ धावत प्रदक्षिणा घालणे चालू होते. त्यांच्याबरोबर त्या मुलाला पण पळवीत होते, त्याला लागली होती भूक – तो प्रत्येक प्रदक्षिणाला त्यांना विचारत होता “झाले का ? मला भूक लागली आहे”. आता त्यांचे किती लक्ष त्या प्रदक्षिणा घालण्यात आणि किती त्या मुलाला वेळेवर जेवायला देण्यात.

  तुम्ही जे सांगितले आहे, “की देवाला लाच देऊ नका, संकल्प सोडून कोणतीही पूजा अर्चा , साधना / विधी करु नका. जे काही करायचे ते करताना , अगदी देवा पुढे साधा हात जोडताना सुद्धा देवा कडे काही मागू नका.”, हेच खरे, त्या देवाशी व्यवहार करू नका – आपल्या आजूबाजूला बरोबर विरोधी चित्र पहावयास मिळते – नकळत हेच संस्कार आपल्या पुढील पिढीवर होत आहेत – हे सर्वात वाईट.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   रिच्युअल्स / कर्मकांडा पेक्षा भावना महत्वाची , पण हे कमी जणांना समजते . देवाची पूजा आता To Do List मधला उरकायचा आयटेम झाला आहे. देव सुद्धा आता निगोशिएबल करुन टाकलाय , बाय वन गेट वन फ्री फार लांब नाही.

   सुहास गोखले

   0
 5. Vivek Mayalu

  सुहास सर आपले लेख आवडले दाभोलकर , आणि श्याम मानवांचे साहित्य वाचले त्यांची भूमिका पटायची पण टोकाची वाटायची तुमच्या लिखाणातून विचार बॅलन्स झाले धन्यवाद असेच लिहत रहा

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.