या लेखमालेतला पहिले भाग इथे वाचा:

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग १

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग २

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग ३

उपाय आणि तोडगे !

ज्योतिषाला खरा पैसा मिळवायचा असेल  तर ‘उपाय – तोडग्यां’ ना पर्याय नाही ! अमाप पैसा आहे ह्यात. ज्योतिषाशास्त्रातला हा छोटासा / सुचना वजा भाग आता अक्राळविक्राळ रुप धारण करुन मूळ ज्योतिषशास्त्राच्या जीवावर उठलाय! ज्योतिषाला त्याचे दुकान चालवायचे असेल तर ‘उपाय – तोडगे’ सांगावेच लागतात.

मी कोणतेही उपाय तोडगे सुचवत नाही , माझ्या कोटेशन मध्येच तसा स्पष्ट उल्लेख असतो.

पण त्याची मोठी किंमत मी चुकवत असतो, मी उपाय – तोडगे सांगत नाही कळताच माझ्या तोंडावर  ‘तुम्ही कसले ज्योतिषी ?” असे म्हणत लोक निघून जातात !

जसा घरगुती उपाय सांगणारा , साधी जेनेरीक औषधे देणारा डॉक्टर आलतू फालतू मानला जातो (हा कसला डॉक्टर , याला काही कळत नाही!) आणि महागडी (बर्‍याच वेळा अनावश्यक) ‌ अ‍ॅन्टीबायोटीक्स , एखाद्या औषध कंपनीचीच महागडी औषधे लिहून देणारा, टॉनिक्स / मल्टी व्हीटॅमीन्स चा मारा करणारा , उठसुठ इंजेक्शन देणारा डॉक्टर एकदम भारीतला ठरतो तसेच प्रामाणीक ज्योतिषाच्या बाबतीत ही झाले आहे.

पूर्वीच्या जमान्यातले ज्योतिषी ही उपाय सुचवत होते पण बरेचसे असे उपाय, जातकाचा धीर वाढावा , जातकाला हुरुप यावा या चांगल्या हेतुने सुचवले जात असत. हे उपाय साधारण पणे वरवरच्या मलमपट्टीचे / फुंकर घालायचे  काम करायचे . जसे एखादे लहान मूल खेळताना पडले तर आपण “अरे काही नाही झाले… उंदीर पळाला ..”  असे म्हणतो  किंवा त्या बालकाचे समाधान करायला  ‘ आला मंतर कोला मंतर छू ‘ असे काही म्हणतो साधारण तसेच त्या वेळेच्या उपायांचे स्वरुप असायचे.

पण हा मूळ हेतु केव्हाच बाजूला पडला आणि उपाय – तोडग्यांचा किळसवाणा बाजार मांडला गेला.

याला काही अंशी जातकच जबाबदार आहे. समजा मला ताप आला / खोकला झाला तर मी एखाद्या डॉक्टरला भेटतो , माझी अपेक्षा असते डॉक्टर मला तपासून औषध देईल आणि त्या गोळ्या घेतल्या की एक – दोन दिवसात मी बरा होईन, वैद्यकिय उपचारा बाबतीत हे शक्यही असते,  पण नोकरी , विवाह या सारख्या समस्यां साठी पण लोक हीच अपेक्षा धरतात!  लग्न जमत नाही करा उपाय / तोडगा , वाजतील सनई-चौघडे  असे लोकांना वाटू लागले. मी काहीच प्रयत्न करणार नाही / इकडची  काडी तिकडे  करणार नाही , पण पाहीजे तेव्हढे  पैसे ओततो (का फेकतो ?) काहीतरी’तोडगा’ करा आणि माझी समस्या दूर व्हायलाच पाहीजे  अशी विचित्र मनोधारणा तयार  झाली आहे.

याला कारण सभोवतालची परिस्थिती , सर्वत्र भ्रष्टाचार.  सरळ मार्गाने कोणतेही काम होतच नाही.. मग ते ड्रायव्हिंग लायसेंस असो की उद्योग परवाना … लाच दिल्या शिवाय कामेच होत नाहीत आणि पैसे फेकले की  कोणताही गुन्हा  उजळ माथ्याने करता येतो , कोणतेही गैरवर्तन राजरोस करता येते , कोणतेही बेकायदेशीर काम कायदेशीर (नियमित ?) करता येते …. ट्रॅफीक पोलिसाने धरले .. फेक शंभराची नोट मार गाडीला किक.. इथे पासुन ते … जाऊ दे आपल्याला माहिती आहे सगळे !

मग हेच जीवनातल्या इतर समस्यां बाबतीत लागू करायला सुरवात होते..नोकरी नाही.. कर तोडगा , लग्न जमत नाही .. कर तोडगा .. दे लाच ,  घे करुन काम !

आता जातकच ज्योतिषाला’ भविष्य कसले सांगताय … डायरेक्ट उपाय तोड्गे सांगा ‘ असे आग्रह करु लागले आहेत. पेशंटच डॉक्टरला ‘जालीम अ‍ॅन्टी बायोटीक्स’  द्या असा आग्रह धरु लागलेत !

प्रयत्न नको, प्रयास नको, मेहेनत नको, परिस्थिती स्विकारायचे धाडस नको, काही नको, फक्त तोडगे सांगा आणि माझे काम चुटकी सरशी सोडवा.

मग ज्योतिषांनी ही गरज ओळखली नसली तर नवलच !

एक जमाना होता , ज्योतिषी पत्रिका मांडायचे आपापल्या मगदूरा नुसार त्या पत्रिकेचा थोडातरी अभ्यास करुन प्रामाणिक पणे  मार्गदर्शन करायचे ,  आता हे सगळे बाजूला पडले आहे .. आताची मोडस ऑपेरेंडी अशी बनली आहे…

पत्रिका बघायचे नाटक करायचे , हे नाटकच असल्याने  ज्योतिषाचा अभ्यास करायची गरजच नाही , संगणका वर पत्रिका बनते, आपल्याला फक्त ग्रहांची नावे, वक्री ग्रह , युती इ. जुजबी माहीती असली की बास , तुमचे दुकान थाटले गेले , हाय काय आन नाय काय !.

दुसर्‍या पायरी वर थोडे कोल्ड रिडींग द्यायचे , हे इतके कॉमन आणि सगळ्यांना लागू पडणारे असते की कोणीही याला ‘नाही, हे चुकीचे आहे ‘असे म्हणूच शकत नाही.

नमुना बघायचाय ?  हे एक ‘व्हॉटसअ‍ॅप’ फॉरवर्ड (मूळ लेखक अज्ञात , त्याचे आभार मानतो )

कुणाचे पन भविष्य सांगू शकणार भाऊ !

लई मोठं मन हाय तुमचं भाऊ,

लोकं फायदा घेतात तुमचा भाऊ,

आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ,

कुनाबद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ,

पण तुमचे विषयी वाईट करतेत लोक भाऊ,

पैसा लई कमवते तुम्ही भाऊ पन पैसा टिकत नाही भाऊ,

लई मेहनत करून बी काम होत नाही भाऊ,

तोंडापाशी आलेला घास निघून जातो ना भाऊ,

देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ, पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ,

पन येचात देवाचा दोष नसतोय भाऊ,

नशिब लई जोरात हाय तुमचं भाऊ, सुख, समाधान आन बक्कळ पैसा लिहून ठेवलाय देवाने  भाऊ,

लाथ मारीन तीथं पानी काढनार तुम्ही भाऊ,

फक्त एक नड हाय तुम्हाला भाऊ,

तुमच्या जवळच्यांनीच आडून धरलंय तुम्हाला भाऊ,

तुमच्या पायाखालची माती नेउन करनी केली तुमच्यावर भाऊ,

तुमची परगतीच आडवून धरली भाऊ,

पन काळजी करायची नाय भाऊ,

XXXXXXXX  च्या आशीर्वादाने तुमची सगळी नड काढून टाकतंय भाऊ,

भिऊ नकोस भाऊ XXXXXXXX पाठिशी आहेत भाऊ…

(XXXXXXXX =  त्या ज्योतिषाचा  फेव्हरीट …

बाबा,  बुवा, अण्णा, तात्या ,  बापू, स्वामी, महाराज, माँ ,  देवी, माऊली …)

एव्हाना जातकाचा तुमच्या वर पक्का विश्वास बसलेला असतो… ज्योतिषी येकदम ‘भारी’ आहे  असे त्याचे मत बनलेले असतेच ..

पुढच्या तिसर्‍या टप्प्यात ,  जातकाला घाबवरुन सोडायचे काम करावयाचे असते, जातक जाम घाबरला पाहीजे असे बोलायचे असते . त्यासाठी –  हा ग्रह वक्री आहे , यंव योग आहे , त्यंव दशा चालू आहे असे काही बाही बरळायचे , साडेसाती, मंगळ , राहू, कालसर्प योग, गुरु-चांडाल योग हे नेहमीचे व्हिलन तर मदतीला असतातच , भरीस पितृशाप, मातृशाप, सापाचा शाप, माकडाचा शाप, मांजराचा शाप (गेल्या जन्मी तुम्ही एक मांजर मारले होते त्याचा शाप भोवतोय तुम्हाला ! ),  घराण्याचा मूळ पुरुष – कुल दैवत नाराज झाले आहे, वास्तू बाधिक आहे , करणी केलीय, पनवती लागलीय,  नजर दोष आहे … एक ना दोन शंभर व्हीलन आहेत  हो , यातली एखादी तरी टोपी फिट्ट बसणारच !  काय बिशाद आहे नाही बसायची !!

व्हीलन कोणीही असो  , आपल्याला देणे-घेणे नसतेच,  आपल्याला जातकाला घाबरवून सोडायचे आहे,  पुढचा काळ डेंजर  ,  सगळे अत्यंत अवघड असले म्हणजे झाले !

या वेळे पर्यंत जातक इतका टरकलेला असतो की तुमचे पाय धरुन “ महाराज , वाचवा , काहीतरी उपाय सुचवा … काहीतरी तोडगा असेलच ना…करुन टाकू … होऊ दे खर्च ..” असा टाहो फोडतोच!

मस्त!  जातक कसा अल्लाद जाळ्यात फसला आहे  नै !  आता  फिरवा सुरी !

मग उपाय तोडग्यांचा मारा सुरु होतो. काय वाट्टेल ते सुचवले जाते आणि हे सुचवताना एक दक्षता मात्र हमखास घेतलेली असते ती म्हणजे हे उपाय , त्या ज्योतिषी बुवां कडून किंवा त्यांनी सुचवलेल्या व्यक्ती / संस्थे कडूनच करुन घ्यावे लागतील अन्यथा त्याचे फळ मिळणार नाही असा एक डिस्क्लेमर टाकायचा!

पूजा / यज्ञ आम्हीच करतो, रत्ने, खडे, माळा, यंत्रे आमच्या कडूनच घ्यायची (दुसरी कडुन घेतली तर लाभत नाहीत !) , जप करायला वेळ नाही, चिंता नको , सगळी सोय आहे , आम्हीच तुमच्या साठी जप करतो , त्यासाठी पगारी ‘जप वाले’ बाळगलेत आम्ही,  त्यांना काही काम नको का? अशा सरळ सरळ कंत्राटी ऑफर्स चालू होतात.

जो जातक ‘विवाह कधी होईल ‘ या प्रश्नासाठी सुहास गोखलें ना ४०० रुपये सुद्धा द्यायला  तयार नसतो , तोच जातक आता त्या ‘तोडगे’ वाल्या ज्योतिषी बुवांना २००० रुपये अगदी हसत हसत काढून देतो. जणु काही २००० रुपये फेकले की लगेच त्याचे लग्न जमणारच आहे … अवघ्या २००० रुपयां मध्ये त्याचे भविष्य बदलणार आहे!

उपाय- तोडग्या च्या नावाखाली जो बाजार मांडला आहे त्याचे अर्थकारण  ही एकदा बघाच !

३०० – ४०० चा खडा २००० -३००० मध्ये आरामात विकला जातो, तांब्याच्या पातळ पत्रावर उमटवलेले २५ – ५० चे  तथाकथित यंत्र १००० ला  विकले जाते, १५००० – ३०००० च्या पूजाविधी मध्ये २०% पर्यंत (काही वेळा यापेक्षा ही जास्त! ) कमिशन असते , म्हणजे  त्यातून ज्योतिषाला ३०००  ते  ६००० मिळतात, आहात कुठे !

आता ज्योतिषाला दिवसात असा एक जरी जातक (का बकरा !) आला तरी पुरेसा असतो ४ जातकां कडून होणार्‍या कमाई पेक्षा कितीतरी जास्त  हा कसाई एकाच जातकाच्या (बकर्‍याच्या ) गळ्यावर सुरी  फिरवून कमावत असतो. आणि हा सगळा प्रकार तासाच्या आत बाहेर उरकला जात असल्याने ‘दरबार ‘ भरवून  दिवसाला १० -१२ बकरे सहज कापता येतात !

तोडगे सांगणार्‍या ज्योतिषा (?) कडे जातकांची रिघ आणि पत्रिकेचा मर मर अभ्यास करुन , शास्त्राशी प्रामाणिक राहून , जातकाला मार्गदर्शन करणार्‍या , जातकाला प्रयत्नवादी करणार्‍या माझ्या सारख्या ज्योतिषाकडे शुकशुकाट असे काहीसे विपरीत चित्र दिसते आहे.  आधीच ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी बदनाम त्यात या ‘उपाय – तोडग्यांच्या ‘ लुटालुटी मुळे आगीत तेल ओतल्या सारखे झाले आहे .

हे उपाय / तोडग्याचे लोण आता आमच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये ही येऊन पोचलेय !  हा पहा बंगाली बाबा.. याच्या कडे आहेत , खास  आय.टी. वाल्यां साठीचे तोडगे !!

या उपाय / तोडग्यात कमाई पोटेन्शीयल किती आहे हे लिहलेच आहे , या लेखमालेतल्या आधीच्या भागांत मी इतर ज्योतिषाच्या कमाईचे सविस्तर हिशेब करुन दाखवले होते .. आता ह्या उपाय – तोडगे वाल्या ज्योतिषाच्या कमाईचा आपणच हिशेब  करा !

तुम्हाला हिशेब करायला जरा वेळ लागेल  तो पर्यंत मी  हा गेलो आणि हा आलो .

( हॅ हॅ हॅ , आपले ते न्हेमीचेच  .. गन्या ‘चा’  आनायाला ग्येलाय आणि ही बघा सद्याने पुडी सरकीवली सुद्धा !) .

तेव्हा भेटू  या लेखमाले तल्या शेवटच्या भागात .

तेव्हढे हिशेबाचे बघा जरा..

क्रमश:

(पुढील भागात संपूर्ण )

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  सुहास जी जोतिष आणि तोडगे याचे अगदी सयामी जुळ्याचे दुखणे झालेय आता . पण एक विचारतो काही तोडग्याची पुस्तके असतात विश्वसनीय व्यक्तींनी लिहिलेली म्हणजे त्याचा जोतिष शास्त्राशी संबंध नसतो .पण एकंदरीत जीवन सुखी होण्यासाठी प्रयत्नांना Saported असे तोडगे असतात या बद्दल काय सांगता येईल आणि हे बंगाली बाबा Challenge देतात , guarenty पण देतात यांची काय भानगड असते ?

  0
 2. स्वप्नील

  ……आणि सुहास जी या बंगाली बाबांकडे खरोखर काही तंत्र विद्या असते का काहीतरी थातूर मातुर सांगतात अर्थात त्यांच्या जाहिरातीवरून ओळखतेच कि सगळी गन्डवागण्डवी (हा आमचा कोल्हापुरी शब्द ) असणार तरी पण त्यांच्कडे काही कर्णपिशाच्च किवा क्षुद्र सिद्धी असतात का ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी ,
   मी या लेखमालेचा पुढचा भाग प्रकाशीत करतोय तो वाचला की या बाबतीतला खुलासा होईल.

   सुहास गोखले

   0
 3. Anant

  श्री. सुहासजी,

  एकदम मस्त – पर्दा फाश केलात या ढोंगी तोडगा सांगणाऱ्या बाबांचा.
  बाबा खालिद बंगालीची जाहिरात वाचताना मजा आली.
  IT मध्ये या बाबा कडे जाणारे असतील तर कल्पनाच करता येत नाही त्यांच्या software कोडची.
  मनात भीती निर्माण करणे व त्यावर माझा तोडगा – एकदम जबरदस्त मार्केटिंग स्किल.
  समजा कोणी परत गेला सांगायला की हा तोडगा उपयोगी नाही पडला – हे त्या जातकालाच सांगणार की तू मनापासून केला नाही म्हणून तुला फळ मिळाले नाही – हे म्हणजे “चित तू हारा, पट मै जिता ”

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद अनंतजी,

   ज्योतिष नावालाच बेट आणि स्विच साठी , खरी मलई तोडग्यातच ! मी पण आता ‘बाबा सुहास सांगली ‘ व्हायचे का याचा विचार करतोय !

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.