या लेखमालेतला पहिले भाग इथे वाचा:

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग १

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की प्रामाणिकपणे पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करुन जातकाला चांगले मार्गदर्शन करायचे म्हणले तर कमीतकमी २ तास तरी लागतात. मला स्वत:ला  पत्रिकेचा अभ्यास करायला याहुनही जास्त वेळ लागतो.

जातकांना अगदी अचूक मार्गदर्शनाची अपेक्षा असते आणि असे अचूक मार्गदर्शन करण्यासाठी अचूक जन्मवेळेची पत्रिका लागते. पण जवळजवळ ९५%  जातकांनी दिलेली जन्मवेळ अचूक ( +/- २ मिनीटें) नसते , ही चूक +/- ५ मिनीटां पासून ते  +/-  ३० मिनीटां  पर्यंत किंवा काही केसेस मध्ये या पेक्षाही जास्त असू शकते (मी काही केसीस मध्ये AM चे  PM असे झालेले घोटाळे दुरुस्त केले आहेत !).

पत्रिकेच्या अभ्यासाची सुरवात व्हायला हवी ती जन्मवेळेच्या अचूकतेची खातरजमा करण्या पासून, पण  फारच थोडे ज्योतिषी जन्मवेळेची खातरजमा करुन घेतात. गल्ली-बोळातला एखादा फडतूस क्लास लावून /  एक – दोन चोपडी वाचून किंवा ती ही न वाचताच ज्योतिषी बनलेल्यांची गोष्ट सोडाच (त्यांना ज्योतिषी म्हणायचे का इथून सुरवात आहे !) , पण ज्यांनी काही अभ्यास केला आहे ते ज्योतिषी सुद्धा या जन्मवेळेच्या अचुकते बाबत फारसे गंभीर नसतात याचे कारण म्हणजे त्यातले बरेचसे ज्योतिषी पारंपरिक पद्धतीची ठोकळा पत्रिका बघतात , या पत्रिकेत जो पर्यंत जन्मलग्न बदलत नाही (जे सरासरी २ तासांनी बदलते) तो पर्यंत पत्रिका तीच राहते त्यात कोणताच बदल होत नाही , ११:०५ किंवा १२:२७ या दोन्ही वेळेच्या पत्रिका जन्मलग्न बदलत नसल्यास त्याच राहतात. त्यामुळे हे ज्योतिषी जन्मलग्न अगदी  ३ – ५ डीग्रीज किंवा २७+ डीग्रीज असेल तरच जरा बूड हलवतात अन्यथा नाही.

साधारण दर १२-१३ मिनिटांनी नवमांश बदलतो त्यामुळे नवमांश पत्रिका बघायची असेल तर जन्मवेळेतली चूक  +/- १२ मिनीटांपेक्षा जास्त चालणार नाही. पण नवमांश कुंडली बघणारे किती ज्योतिषी आहेत ? आणि जे नवमांश कुंडली बघतो असे म्हणतात किंवा बघण्याचे नाटक तरी करतात त्यांना नवमांश ही कल्पनाच धड समजलेली नसते , त्याचा उपयोग करुन घ्यायचा ही फार लांबची गोष्ट !

के.पी. वाले जरा जन्मवेळेच्या अचूकते बद्दल काहीसे आग्रही असतात कारण के.पी. मध्ये सगळा भर ‘सब’ वर असतो जो अवघ्या २-३ मिनीटांत बदलत असतो, त्यामुळे के.पी. वाल्याला जन्मवेळ किमान +/- २- ३ मिनीटां पर्यंत तरी अचूक असायलाच लागते.  बरेचसे के.पी. वाले रुलिंग प्लॅनेट नामक पद्दती जन्मवेळेची खातरजमा करण्यासाठी वापरतात पण ही पद्धत बेभरवशाची आहे हे मी मागेच काही लेखां तून लिहले आहे त्यामुळे त्यावर आत्ता इथे जास्त काही लिहीत नाही.

के.पी. वाले  त्यांच्या त्या तथाकथित ‘रुलिंग प्लॅनेटस’ बद्दल  इतके अंधश्रद्धाळू  आणि टोकाचे अ‍ॅडामांट (Adamant : refusing to be persuaded or to change one’s mind.)  असतात की  त्या पद्धतीने मिळालेल्या जन्मवेळेचा ताळा – पडताळा  करुन घेत नाहीत,  कोणी मागीतला तर वस्सकन अंगावर येतात !  याचे एकमेव कारण आहे की ‘घटना v/s  ग्रहमान’ यांचा ठोस संबंध त्यांना अद्यापही प्रस्थापित करता आलेला नाही. समजा एक विवाहीत जातक आहे , त्याची रुलिंग प्लॅनेट नुसार आलेली रेक्टीफाईड  १२:२९ ही जन्मवेळ घेतली तर आणि तरच जातकाचा विवाह झाल्याची घटना तंतोतंत जुळते आणि हीच जन्मवेळ जर १२:२६ किंवा १२:३१  असेल तर ही विवाहाची घटना अजिबात जुळत नाही अशा प्रकारचा ठणठणीत ‘हा सुर्य – हा जयद्रथ’  पद्धतीचा  ताळा – पडताळा ते देऊ शकत नाहीत. म्हणूनच के.पी. फक्त ‘प्रश्न कुंडली’ साठीच  योग्य आहे , जन्मवेळ अचूक मिळत नाही / अचूक पणे ठरवता येत नसल्याने के.पी. जन्मकुंडली साठी वापरणे ही मोठी चूक आहे ! असो ह्या विषयावर बरेच काही लिहण्या सारखे , के.पी. चा पर्दाफाश करण्या सारखे बरेच आहे पण विस्तार भयास्तव इथेच थांबतो.

जन्मवेळेची खातरजमा करणे हे अत्यंत कौशल्याचे , Highly specialized काम आहे , नुसत्या या कामाचेच मानधन काही हजारात  (५०००  ते २५००० !) होऊ शकते !  अगदी +/- २ मिनीटां पर्यंत जन्मवेळ निश्चित केली नाही तरी दिलेल्या जन्मवेळेतली चुक  +/-  १२ मिनीटे ( एका नवमांशा इतका वेळ ) पेक्षा जास्त असू नये इतके तरी बघावेच लागते. यासाठीही काही वेळ खर्ची घालावा लागतो.

जन्मवेळ  अशी +/-  १२ मिनिटांच्या आत आणली की पत्रिकेचा अभ्यास चालू होतो.

पत्रिकेतल्या १२ ही ग्रहांचे बलाबल ठरवावे लागते , नवमांश कुंडली चा विचार या पायरीवर करणे अत्यावश्यक असते. मग या ग्रहांच्या स्थानगत , राशीगत , नक्षत्रगत फळांचा स्थूलमानाने आढावा घ्यावा लागतो, वक्री आणि स्तंभी ग्रह तर फारच बारकाईने तपासावे लागतात,  त्यानंतर भावेशाची फळे  काळजीपूर्वक अभ्यासावी लागतात,  जन्म लग्न, लग्नेश तसेच रवी , चंद्र यांचा खास विचार करावा लागतो. एखादा ग्रह मोठ्या स्थिर तार्‍याचा योगात असेल तर त्याची विशेष नोंद घ्यावी लागते. प्रश्नाच्या अनुरोधाने एखाद्या ग्रहाचा खास अभ्यास करावा लागतो , जसे विवाहा साठी ‘शुक्र ‘ , संतती साठी ‘गुरु’ इ.

साधारण या टप्प्या पर्यंत कुंडलीचा दर्जा लक्षात येतो, याच्या पुढच्या टप्प्यात  ग्रहयोगांचा अभ्यास करावा लागतो. त्या पाठोपाठ जातकाच्या प्रश्ना नुसार इतर वर्ग कुंड्ल्या ही काळजीपूर्वक तपासाव्या लागतात.

या नंतर जातकाच्या प्रश्ना नुसार ‘नाताल प्रॉमीस / पोटेंशियल ‘ किती व कसे आहे याचा अंदाज बांधावा लागतो.

हे झाले स्टॅटीक अ‍ॅनालायसिस , आता आपल्याला कालनिर्णय करायचा असल्यास (जो  ९५ %  केसीस मध्ये करावा लागतो) डायनॅमीक अ‍ॅनालायसिस  करणे प्राप्तच असते. यासाठी  मुख्य भर  दशा – विदशा , गोचर भ्रमणें  यांवर असतो. काही पत्रिकांच्या बाबतीत विशोत्तरी दशे पेक्षा त्रिभागी किवा योगिनी दशा वापरावी लागते. विशोत्तरी दशा म्हणजेच सबकुछ हा फार मोठा गैरसमज निदान महाराष्ट्रातल्या ज्योतिषांत तरी पसरला आहे. वस्तुत: मी उल्लेख केलेल्या  त्रिभागी आणि योगिनी दशा तितक्याच ‘पॉवरफुल्ल’ आहेत , जर जन्मवेळ अगदी अचूक मिळाली असेल तर एकदा ‘काल चक्र दशा’  वापरुन पहा, डोळे उघडतील नाही नाही डोळे विस्फारतील !!

दशा – विदशा , गोचर इ वरुन घटना केव्हा घडू  शकते याचा बर्‍यापैकी अंदाज येत असला तरी , फाईन ट्युनिंग / कंफर्मेशन साठी एक ट्रीगर पॉईंट् लागतो तो ठरवण्या साठी  सोलर रिटर्न्स  / ल्युनार  रिटर्न्स , अन्युअल प्रोग्रेशन्स या पाश्चात्य पद्धतींचा वापर अनिवार्य असतो.

इतके सर्व उपद्व्याप केल्या नंतरच जातकाच्या प्रश्ना बद्दल काही भाष्य करता येते.

आता हे इतके सगळे  तासाभरात होणारे काम तर नक्कीच नाही,  हे इतके शास्त्रशुद्ध बघायचे तर किमान  २ – ३ तास  फक्त पत्रिकेच्या अभ्यासालाच लागतील, इतर कामांना (जातकाचे स्वागत, प्रश्न समजून घेणे, माहीती गोळा करणे , जातकाला  मार्गदर्शन,  शंका निरसन, जातकाची पाठवणी इ.) लागणारा जादाचा तास-दीड तासाचा  वेळ जर यात जमा केला तर ४ – ५ तासांची निश्चिंती ! या गतीने दिवसात एक -दोन केसीसच खर्‍या अर्थाने पूर्ण करता येतील .

आता या पूर्ण दिवसाच्या सेवेचे मूल्य  किमान ३००० / ४००० ठेवले तरच ज्योतिषाचे पोट भरेल , म्हणजे एका प्रश्ना साठी १५०० /२००० ! पण एव्हढे पैसे देणारा जातक पंचवीस हजारात एक पण सापडणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

आता हा तिढा सोडवायचा कसा ?

मानधन वाढवणे: हा मार्ग सोपा वाटत असला तरी एका विषीष्ट रकमे पेक्षा जास्त मानधन वाढवता येत नाही, मानधन वाढवून कमाई वाढेलच असे नाही कारण मानधन वाढवले की जातकांची संख्या कमी होते म्हणजे पुन्हा हिशेब तोच ! त्याशिवाय  हा ज्योतिषी महागडा आहे अशी उलटी प्रसिद्धी होऊन त्याचा आगामी व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

जादा जातक हाताळणे: जादा जातक हाताळायचे असतील तर प्रत्येक जातकाला देण्यात येणार्‍या वेळात कपात होईल , त्याचा परिणाम सेवेच्या दर्जात  होईल. फोन, ईमेल हातळण्या साठी कोणी असीस्टंट ठेवला वेळेत बचत होऊ शकेल पण त्या असीस्टंट चा पगार , त्याला बसायला जागा , त्याच्या साठी वेगळा संगणक  अशा इतर खर्चात पण वाढ होईल. जादाचे ग्राहक जास्त वेळ काम करुन , सुट्ट्यां कमी करुन हाताळले  तर त्याचे शारीरीक – मानसिक घातक परिणाम होऊ शकतात त्याच बरोबर सतत काम एके काम करत राहिले त्याचा सामाजीक आणि कौटुंबिक जीवनावर मोठा वाईट परिणाम होऊ शकतो.

जेव्हा जातक आपल्या समस्या सांगत असतो तेव्हा स्भोवताली मोठ्या प्रमाणात ‘निगेटीव्ह एनर्जी  फिल्ड’ तयार होत असते , त्याची झळ ज्योतिषला लागतेच लागते , काही वेळा ही ‘निगेटीव्ह एनर्जी’ इंटेन्स बनली तर त्याचा चक्क ‘ सायकीक अ‍ॅटॅक ‘ होऊ शकतो. या पासून स्वत: ला वाचावायचे असेल तर जास्तीच्या आराधना कराव्या लगातात आणि त्या जास्त वेळ घेतात.
म्हणूनच मी स्वत: ‘प्रत्यक्षा भेटी द्वारे मार्गदर्शन ‘  करायला नाखुष असतो तशी गरज भासल्यास मी ती विशेष सेवा मानून त्याचे मानधन जास्त घेतो !

ज्योतिषी  दिवसाला १० जातकांचे  काम करायला एका पायावर तयार असला तरी हे जादाचे जातक आले तर पाहीजेत ना ? ते आले तरच कमाईत वाढ होणार,  जिथे  १-२ जातक यायची  मारामार तिथे १० जातक आणायचे कोठून?

ज्योतिषाचे क्लासेस:  असे क्लासेस सुरु करायला तो ज्योतिषी स्वत: अनुभवी , निष्णात असावा लागतो,  ’आडात नाहीतर पोहोर्‍यात कुठून येणार ‘ ? क्लासला येणारे विद्यार्थी ‘कोण शिकवणार आहे ‘, ‘त्याचे रेप्युटेशन काय आहे ‘ ही चौकशी करुनच पैसे भरतात , उगाच कोणा सोम्यागोम्याने पाटी लावली की लगेच अ‍ॅडमिशनला झुंबड उडाली असे थोडेच आहे ? क्लास सुरु करणारा ज्योतिषी थोडाफार का होईना प्रसिद्ध  / नाव झालेला असला पाहीजे.  त्या ज्योतिषाला शिकवण्याची कला उत्तम अवगत असावी लागते .  ८ – १० लोकांसमोर  आत्मविश्वासाने बोलणे  सोपे नाही, भल्या भल्यांचे त-त-प-प होताना मी पाहीलेय , त्यामुळेच कोणीही उठावे आणि क्लास चालू करावे इतके हे काम सोपे नाही.

क्लास म्हणले की  जागा पाहीजे, बाके / खुर्च्या पाहीजेत , आजच्या काळाच्या मागणी नुसार एअर कंडीशनिंग  / LCD – LED Projector (किंमत रुपये ५०,०००+) , असा सगळा सरंजाम ही लागतो. एव्हढे करुन क्लास चालू केले तरी विद्यार्थी येणार किती? कोणाला वार सोयीचा नसतो तर कोणाला वेळ सोयीची  नसते, कोणाला ‘फी’ जास्त वाटते.

ही सगळी कसरत करत क्लासला कसेबसे १० विद्यार्थी आले तरी जिंकले म्हणावे लागेल. १० वी  / १२ वी च्या कोचिंग क्लासेस सारखे ८० /१००/ १२० विद्यार्थी ज्योतिष क्लासला येण्याचे दिवस अजून यायचेत! ‘भारतीय विद्या भवन’ सारख्या आंतरराष्टीय किर्तीच्या बलाढ्य ज्योतिष शिक्षण संस्थेत जिथे एके काळी साक्षात  के.एस. कृष्णमुर्ती, के.एन. राव सारखे दिग्गज शिकवायला येत असत , त्यांनाही इतक्या मोठ्या संख्येत विद्यार्थी मिळत नाहीत, तिथे पुण्याच्या सदाशिव / नारायण पेठेतल्या एखाद्या कुलकर्णी / देशपांडे / उपाध्ये यांच्या सारख्यांच्या क्लासला किती टाळकीं येणार ? आणि मुंबई – पुणे सारख्या ठिकाणी असे बरेच क्लासवाले आहेत, ‘रस्ता तिथे एस.टी’  असे म्हणतात तसे ‘गल्ली तिथे ज्योतिष क्लास’   असे विनोदाने म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे.  इथेही स्पर्धा आहे हे विसरुन चालणार नाही.

या क्लास मधून उत्पन्न तरी किती मिळेल ? साधारण एका विद्यार्थ्या कडून एका तासाच्या लेक्चरला  १०० ते १५० रुपये च्या आसपास फी घेतली तर आणि तरच क्लास ला अ‍ॅडमिशन होतील. याहुन जास्त फी ठेवली तर कुत्रे फिरकत नाही हा माझा स्वत:चा अनुभव आहे !

आठवड्याला २ तास –  महिन्याचे ८ तास, तासाला १०० ते १५० रुपये ,  १० विद्यार्थी  हा हिशेब धरला तर महीन्याचे ८०००  ते  १२००० एव्हढेच काय ते उत्पन्न मिळेल. यातून क्लासच्या जागेचे भाडे , नोटसचा खर्च , क्लासची जाहीरात  , सर्व्हिस टॅक्स (आता तो १५% झालाय !) हे खर्च वजा केल्यास हातात काय पडेल ?  कवड्या नाहीतर करवंटी!!

ऑन लाइन / वेब बेस्ड क्लासेस हा एक चांगला पर्याय आहे , जागा – वेळ याचे बंधन नाही, जगभरातल्या विद्यार्थ्यांना जॉईन होता येते , कोणी केव्हाही जॉईन होऊ  शकतो , एखादे लेक्चर चुकले तरी रेकॉर्डेड व्हर्शन सवडीने ऐकता / पाहता येते.

पण एका अडचण आहे आणि ती मोठी अडचण आहे … पायरसी! शिक्षकाने मरमर राबून केलेल्या व्हिडिओज शक्य झाल्या तर अक्षरश: त्याच दिवशी नाही तर दुसर्‍या दिवशी तरी  खात्रीने  यु- ट्यूब वर फुकटात बघायला मिळत असतील / असंख्य टोरंट्स वरुन डाऊनलोड करता येत असतील तर पैसे भरण्याचा वेडेपणा (निदान भारतात तरी!) कोणी करणार नाही!  एकदा का तुमचे  कंटेंट दुसर्‍याच्या कॉम्पुटर  स्क्रिन वर झळकले की त्याची कॉपी रोखणे साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाही ! या पायरसी पुढे  मोठ्या मोठ्या म्युझीक कंपन्या, चित्रपट निर्माते , सॉफ्टवेअर कंपन्यांनी हात टेकलेत तिथे एकट्या –दुकट्या ज्योतिष शिक्षकाचा काय पाड लागणार आहे !

चौथा मार्ग: व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस !

हा एकमेव मार्ग आहे ज्यात ज्योतिषी जरा जास्त कमावू शकतो किंवा ‘अंनिस’च्या भाषेत बोलायचे तर गब्बर होऊ शकतो आणि  हो  चक्क  ‘शोषण’ पण करु शकतो !

कोणती आहे ही व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस ? उपाय – तोडगे ! ज्योतिषी काही कमावू शकतो ते इथेच !

हा विषय इतका मोठा  आहे की तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो.  म्हणून त्या विषयी ज्योतिषाची  कमाई किती ? – भाग  ४  , या पुढ्च्या भागात लिहतो .. प्रॉमीस !

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  सुहास जी के पी चा परदा फाश चा लेख पण लवकर लिहा . कारण आम्ही के पी बद्दल खूप काही एकून आहोत . काहीजण म्हणतात कि पारंपारिक मध्ये नुसार राजयोग असलेया व्यक्तीकडे वडापाव पण खाण्यासाठी पैसे नसतात . गोचरीचा गुरु किवा शुक्र अनेक वेळा सप्तम स्थानातून येउन जातो पण अनेक जण अविवाहितच राहतात याला उत्तर के पी देऊ शकते वगरे . थोडक्यात पारंपारिक के पी अशा दोन्ही पद्धतीचा योग मेळ साधून कुंडली बघावी असे काहींचे म्हणणे आहे .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   पारंपरीक मधल्या राज योग किंवा तत्सम योगांना काहीच अर्थ नाही एकदम टाकावू आहेत. गोचरी ने विवाह योग ठरवणे चूकीचे आहे. अचूक जन्मवेळ (+/- २ मिनीटें) असेल तरच के.पी. काहीतरी करु शकेल . के.पी. बद्दल बरेच गैरसमज आहेत .. आपल्या कडे म्हणताता ना ‘मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागलयं ‘ तसला प्रकार आहे .. याबाबतीत श्री. गजानान तेंडुलकरांनी लिहलेले ‘कृष्ण्मुर्ती पद्धती – एक चिकित्सा’ नामक पुस्तक वाचावे म्हणजे बराच खुलासा होईल.

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    ok सुहास जी तुम्ही सुचवलेले पुस्तक नक्कीच वाचेन . पुस्तकाचे नाव सुचवल्याबद्दल धन्यवाद

    0
 2. माधुरी लेले

  बापरे, सगळे तांत्रिक विश्लेषण (ज्योतीषाच्या बाबतीतले) डोक्यावरून गेले.. आपण म्हणता त्या अडचणी पटल्या. क्लास घेणे सोपे नाही हे खरेच. एकूण खूप चिकाटी, अभ्यास आणि कष्टाचेच हे क्षेत्र आहे. लेखमाला आवडली.

  0
 3. Anant

  श्री. सुहासजी,

  खूप छान विश्लेषण. त्यामागे तुमचा अभ्यास दिसतो.
  पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

  धन्यवाद.
  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. दीपकजी ,

   दुर्दैवाने माझा व्ही.के. चौधरीजींच्या सिस्तीम्स अप्रोच या पद्धतीचा फारसा अभ्यास नाही, त्यांनी के.पी. सारखे रॅडीकली डिफरंट असे काही केलेल नाही, ग्रांचे बलाबल, वक्री अवस्था , फळे देण्याची क्षमता या विषयी काही वेगळी मतें मांडली आहे , बाकी सारा भाग आपल्या पारंपरीक सारखाच वाटला.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.