केवळ पुस्तके वाचून , नियमांची घोकंपट्टी करुन ज्योतिषशास्त्र शिकता येत नाही.
‘पोहायचे कसे’ हे काठावर बसून पुस्तक वाचून कसे येईल ? त्या साठी पाण्यात उडी मारलीच पाहिजे. ज्योतिषशास्त्रातल्या ‘शास्त्री’, ‘शिरोमणी’ अशा पदव्या मिरवणार्यांना एक पत्रिका धड सोडवता येत नाही की एखादे भाकीत आत्मविश्वासाने करता येत नाही याचे कारण हेच आहे.
हा अभ्यास कसा करता येईल?
पहिला मार्ग:
एखाद्या पत्रिकेचा अभ्यास करायचा आणि अनुमाने काढायची , भाकिते करायची आणि मग त्या अनुमानांचा , भाकितांचा पडताळा केव्हा आणि कसा येतो याची संयमाने वाट पाहायची. हा मार्ग वेळ काढू आहे कारण आपण वर्तवलेल्या भाकितांचा पडताळा यायला कदाचित काही वर्षे वाट पाहावी लागते आणि बर्याच वेळा जातक आपल्याला त्याला सांगितलेल्या भाकितांचे काय झाले हे सांगायला येत नाही. शंभरातले पाच सुद्धा जातक असा कोणताही पडताळा (फीड्बॅक) देत नाहीत. त्यामुळे आपल्या भाकितांचे काय झाले हेच कळत नसल्याने आपला अभ्यास कसा चालू आहे, शास्त्रातल्या कोणत्या नियमांचा अनुभव येतो हे आपल्याला कळत नाही.
दुसरा मार्ग:
हा मार्ग म्हणजे सर्व माहिती उपलब्ध असलेल्या जातकांच्या पत्रिका अभ्यास करायचा . इथे सर्व माहिती म्हणजे जातक काय शिकला आहे, कोणता उद्योग धंदा करत आहे , वैवाहिक जीवन कसे आहे , आरोग्य कसे आहे, संतती सुख कसे आहे, पैसा कितपत आहे, सामाजिक प्रतिष्ठा / कीर्ती, मानमरातब , कला- कौशल्ये, काही विचित्र / अद्भुत घटना घडल्या आहेत का इ.
ही माहिती आणि जातकाची पत्रिका घेऊन आता ‘उलट’ अभ्यास करायचा. इथे आपल्याला भविष्य सांगायचे नाही की कोणते भाकीत करायचे नाही आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून जातकाच्या आयुष्याचे सगळे पैलू कसे उलगडता येतात हे पाहावयाचे आहे. समजा एखादी व्यक्ती राजकारणात मोठ्या उंचीवर आहे मग त्याच्या पत्रिकेत असे काय आहे की त्याने हे साध्य केले? लेखक, कवी , चित्रकार, अभिनेते . संगीत/गायन क्षेत्रातले कलावंत अशांच्या पत्रिका गोळा करुन त्यांचा अभ्यास करता येतील , याच प्रमाणे उद्योगपती, समाजसेवक, लष्करातले / प्रशासनातले उच्च पदस्थ, न्यायाधीश, पत्रकार, संपादक, प्रकाशक , इंजिनियर, डॉक्टर , बँकर्स, व्यापारी, अन्न पदार्थ . वाहन/ पर्यटन अशा व्यवसायात असलेल्या व्यक्तींच्या पत्रिका घेऊन त्यांनी आपापल्या क्षेत्रात जे यश / नावलौकिक / मानसन्मान कमावला तो कोणत्या ग्रहयोगां मुळे हे आपल्याला तपासता येईल. खूप उशीरा लग्न , घटस्फोटित / विधवा/ विधुर, संतती नाही , मतिमंद / अपंग / व्यंग / मनोरुग्ण, भिक्षाधिश ते लक्षाधीश (किंवा उलट) , गुन्हेगार, विवाह बाह्य संबंध, जुळ्या व्यक्ती , अल्पायुषी / दीर्घायुषी , आत्महत्या केलेले, खून झालेले , व्यापारात दिवाळे, कायमचे परदेशात स्थायिक , आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह, इ.
काही जणांचे आयुष्य अगदी सुता सारखे सरळ जाते , शिक्षण -नोकरी – विवाह – संतती- घर – वाहन – नातवंडे – सेवानिवृत्ती अशा चाकोरीतून जाते , फारसे खळबळजनक त्यांच्या आयुष्यात घडलेलेच नसते ( नाही म्हणायला सदाशिव पेठ ब्रँच मधून नारायण पेठेतल्या ब्रँच मध्ये बदली झाली ते एक केव्हढे मोठे गंडांतर आले होते की ! ) , असे घिसे पिटे आयुष्य जगणार्या लोकांच्या पत्रिकेतून आपल्याला फारसे शिकायला मिळणार नाही तेव्हा अशा पत्रिकांवर वेळ घालवायचा नाही. ज्या व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या ‘रोलर कोस्टर ’ प्रमाणे असते त्यांच्या पत्रिका आपल्याला शिकण्यासाठी बराच मसाला उपलब्ध करुन देतात.
ज्यांच्या आयुष्यातल्या ठळक घटना तारखे निशी माहिती असतील त्या पत्रिकांचा ‘जन्मवेळ खातरजमा’ या खास अभ्यासा साठी उपयोग होतो. अशा पत्रिकांच्या अभ्यासातून ज्योतिषशास्त्राची सर्व मूलभूत तत्त्वे जशी स्थानगत , राशीगत , नक्षत्रगत फळे, ग्रहयोगांचे परिणाम पक्की होतात, तसेच ज्योतिषशास्त्रातले कोणते अडाखे बहुतांश वेळा लागू पडतात कोणते नियम – अडाखे कमी वेळा लागू पडतात, व्यक्ती-स्थळ-काल-परिस्थिती सापेक्षता कशी लागू होते अशा बाबींचा ही खुलासा होतो. घटना आणि तारीख यांचा अभ्यास केला तर कालनिर्णयातले बारकावे समजतात.
पत्रिका फक्त सेलेब्रेटींच्याच गोळा केल्या पाहिजेत असे नाही , आपल्या आजूबाजूला देखील असे कित्येक लोक असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे , अंबानींच्या पत्रिकेचा जरुर अभ्यास करा पण आपल्याच गावातल्या कोट्यवधीची उलाढाल करणार्या व्यक्तीची पत्रिका अभ्यासणे तितकेच उपयोगी पडेल.
संध्याकाळी चार तास पावभाजीची गाडी लावून दिवसाला दहा हजाराच्या घरात कमाई करणार्या व्यक्तीची पत्रिका मी त्याच्या मागे लागून घेऊन तपासली होती.
माझ्या ओळखीत एक जण आहे , त्यांनी नाम के वास्ते शिक्षण पूर्णं केले (नाहीतर कमी शिकलेला म्हणून लग्न जमणार नाही!) पण आयुष्यात एक पैसा ही स्वत:चा कमावला नाही कारण त्यांच्या वडिलांनी बरेच कमावून ठेवले होते त्याच्या व्याजावर ही व्यक्ती सुखात आहे . मी या व्यक्तीची पत्रिका अभ्यासली होती हे जाणून घ्यायला की असे काय आहे या व्यक्तीच्या पत्रिकेत की इकडची काडी तिकडे न करता वैभवात लोळतो आहे ?
तिसरा मार्ग:
ब्लाइंड पत्रिकेचा अभ्यास ! आता हे ‘ब्लाइंड पत्रिका’ म्हणजे काय? एक अशी पत्रिका ज्याचा जन्म तपशील माहिती आहे पण त्या व्यक्तीचे नाव,गाव व इतर कोणतीही माहिती नाही.
आता समोर फक्त पत्रिका आहे ती कोणाची आहे हे माहिती नाही , त्यामुळे कोणताही संदर्भ नाही , कोणतेही क्लूज नाहीत. अशा पत्रिके वरून जातकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, वैवाहिक जीवन , शिक्षण , व्यवसाय अशा बाबी बद्दल आपल्याला काय सांगता येईल ? हे अगदी अवघड आहे हे मान्य पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. इथे आपली अनुमाने स्थूल स्वरूपाची असतील उदाहरण एखाद्या कलावंताची पत्रिका असेल तर अगदी ही व्यक्ती एक मोठी कलावंत आहे असे जरी ओळखता आले नाही तरी या व्यक्तीला कला गुण चांगले अवगत असतील / कला विषयांत रुची असेल इतके जरी ओळखता आले तरी खूप मोठी मजल गाठता आली असे म्हणता येईल.
याचा उपयोग आपल्याला पत्रिका समोर आले की एक स्नॅप शॉट प्रेडिक्शन करण्या साठी होऊ शकतो.
या ब्लाइंड रीडिंग चा आणखी एक मार्ग म्हणजे
एखाद्या व्यक्तीची पत्रिका आणि त्या व्यक्तीच्या आयुष्या घडलेले काही प्रसंग माहीती आहेत पण त्यांच्या तारखा नाहीत किंवा जातकाच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे घडले याचा तारखा उपलब्ध आहेत पण त्या त्या तारखांना काय घडले आहे हे माहिती नाही , आता आपल्याला जे प्रसंग माहिती आहेत ते केव्हा घडले असतील याचा अंदाज करावयाचा आहे किंवा ज्या तारखा माहिती आहेत त्या तारखांना काय घडले असावे याचा अंदाज घ्यायचा आहे या अभ्यासा साठी साठी एका जोडीदाराची / सहाध्यायाची मदत लागेल. तो / ती तुम्हाला काही पत्रिका पुरवेल आणि तुम्ही त्याला / तिला अशा पत्रिका पुरवेल, नंतर आपण उतरे ताडून पाहून शकता.
अर्थात पत्रिकांचा असा अभ्यास करताना एक शिस्त पाळा.
समोर आलेल्या प्रत्येक पत्रिकेला एक कोड नंबर द्या , पत्रिकेचे सर्व तपशील वहीत किंवा संगणाकावर एक्स्लेल शीट / डेटाबेस मध्ये नोंद करा , किंबहुना अशी नोंद केल्या शिवाय पत्रिका अभ्यासायला घेऊच नका.
आपण जी गणितें कराल, नियम -अडाखे वापराल , कोणत्या घटकांना जास्त महत्व दिले , निष्कर्षां पर्यंत कसे पोहोचलात याच्या जितक्या म्हणुन सविस्तर नोंदी ठेवता येतील तितक्या ठेवा. यात कंटाळा अजिबात नको कारण या अशा सविस्तर नोंदीतुनच तुमचा अभ्यास होणार आहे, आपण केलेल्या भाकितांचा / अनुमानांचा पडताळा आला किंवा कसे त्याच्या ही नोंदी ठेवा , समजा आपले अडाखे / भाकितेंं चुकली तर कोठे चुकले त्याचा शोध घ्या त्याच्या ही नोंदी ठेवा.
जशा जशा आपण पत्रिकां अभ्यासाल तशी तशी आपली पत्रिका पाहण्याची एक पद्धती तयार होत जाईल, किंबहुना अशी एखादी पद्धतीं तयार करण्या कडे लक्ष द्या, त्याने तुमचा वेळ तर वाचेल शिवाय ‘हे पाहावयाचे राहीले , ते विसरले’ असे होणार नाही.
या बद्दल मी एक सविस्तर लेख पुढे मागे लिहणार आहे , सध्या इतकेच!
तर लागा कामाला !
शुभं >भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
धन्यवाद सर,
तुमच्या लेखनामुळे प्रेरणा मिळते.
धन्यवाद श्री प्राणेशजी
सुहास गोखले