ज्याला ज्योतिष शिकायचे आहे त्याने ज्योतिष विषयक ग्रथांचा अभ्यास तर केला पाहीजेच पण त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कुंडली मांडुन त्याचे विश्लेषण केले पाहीजे. ते केले नाही तर शास्त्राचे नियम कसे , कोठे , केव्हा लागू पडतात ते कधीच समजणार नाही. पोहायचे कसे हे पुस्तक वाचून कसे येणार , त्यासाठी पाण्यात उडीच मारली पाहीजे (पाठीला भोपळा बांधा वाटल्यास!)

ग्रहाची स्थानगत, राशीगत फळे तसेच विविध ग्रहयोगांची फळे तर सगळ्या ग्रंथांतून दिलेली असतात पण ती नुसती वाचून त्याचे यथार्थ आकलन होणार नाही, कारण ग्रंथातून दिलेली फळें जशीच्या तशी , तशी ग्रह स्थिती असलेल्या प्रत्येक कुंडलीत मिळणार नाहीत. एकाच ग्रहस्थितीचे / ग्रह योगाचे अविष्कार अनेक मार्गाने होत असतात. ग्रहांना लाभलेले राशीबळ, स्थानबळ, म्युच्युअल रिसेप्शन, इतर ग्रहांची स्थिती , पत्रिकेतले इतर ग्रहयोग यावरुन ठरणारा कुंडलीचा एकंदर दर्जा या सार्‍यांमुळे प्रत्येक कुंडली गणिक फळे देण्याची पद्धत बदलत असते. घटना घडण्यासाठी आवश्यक ग्रहमान असतानाही अनुकूल गोचर भ्रमणे नसल्याने घटना घडत नाही.  त्यामुळे ‘अमुक एक ग्रह स्थिती म्हणजे तमुक प्रकारची फळें’  असा साचा किंवा रबरस्टँप करता येणार नाही.

त्यातच व्यक्ती,स्थळ, काळ, परिस्थिती, अनुवंशीकता , कर्म हे घटक ही विचारात घ्यावे लागतात. या सार्‍यांचे आकलन व्हायचे असेल, त्यातले बारकावे समजून घ्यायचे असतील तर शेकडो-हजारों कुंडल्या अभ्यासात आल्या पाहीजेत.

असा कुंडल्यांचा अभ्यास दोन पद्धतीने करता येतो.

एखाद्या जातकाची कुंडली घेऊन त्याच्या बाबतीत भविष्यात घडणार्‍या घटनांचा वेध घेऊन, त्याचा पडताळा आला ते पाहाणे. पण यात आपण वर्तवलेले भविष्य बरोबर आले किंवा कसे हे कळण्यासाठी आपल्याला बराच काळ थांबाबे लागते, काही वेळा काय घडले हे आपल्याला कळत नाही कारण ज्याला हे भविष्य सांगीतले ती व्यक्ती ‘ काय घडले’  ते परत येऊन सांगायची तसदी घेत नाही किंवा अन्य कारणांमुळे तुमचा त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकत नाही.

दुसरा मार्ग म्हणजे एखाद्याची कुंडली घेऊन , त्याच्या आयुष्यातल्या होऊन गेलेल्या घटना, त्या व्यक्तिचा स्वभाव, शिक्षण , नोकरी-व्यवसायाचे मार्ग, आरोग्य , विवाह, संतती, पैसा अशा अनेक बाबींचा वेध घेणे. आता इथे घटना घडलेल्याच असल्याने आपल्याला फक्त त्या घटनां पत्रिकेच्या माध्यमातून दिसतात का / सांगता येतात का ? हे बघायचे असते.जातकाच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटने मागे कोणते ग्रह योग होते , ती घटना नेमकी त्या एका विविक्षित दिवशीच का घडली ? अलिकडच्या – पलिकडच्या महिन्यात / वर्षात का नाही घडली ? असा अनेक अंगानी आपल्याला अभ्यास करता येतो.

सुदैवाने तुम्हाला एकाच दिवशी जन्माला आलेल्या जातकांच्या पत्रिका मिळाल्या तर असे दिसेल की अशा पत्रिकां मध्ये ग्रहस्थितीत फारसा फरक नसतो पण त्यांना वेगवेगळ्या प्रकारानीं फळे मिळालेली असतात. एकाचा घटस्फोट झालेला असतो  तर दुसर्‍याचा संसार सुखात चाललेला असतो. त्याच बरोबर अशा जवळजवळच्या जन्मवेळां असलेल्या जातकांच्या बाबतीत किंवा एखादा विषिष्ट ग्रहयोग असलेल्या अनेक पत्रिकांत कोणाला जास्त दणकेबाज फळे मिळलेली असतात तर तेच ग्रहयोग असलेल्या दुसर्‍या व्यक्तीला काहीसी सौम्य / मवाळ फळे मिळालेली असतात . काहीवेळा वरकरणी घटनां वेगळ्या स्वरुपाच्या असल्या तरी त्यात एक समान धागा असतो, हे असे कोणत्या घटकामुळे झाले असावे हे शोधण्यात मजा येते.

जर एखाद्याच्या पत्रिकेवरुन आपण त्याचे भविष्य सांगू शकतो तर त्याच पत्रिकेवरुन त्याचा भूतकाळ सुद्धा सांगता आला पाहीजे. किंबहुना भूतकाळ सांगता आला तर जन्मवेळ अचूक आहे आणि तुमचा अभ्यास ही योग्य दिशेने आणि पुरेसा झाला असल्याची ती पावती आहे!

एकादी व्यक्ती अति रागीट आहे , सतत दुसर्‍याला नावे ठेवत असते हे माहीती आहे पण त्याच्या पत्रिकेतुन ह्या स्वभावाचे काही धागेदोरे सापडतात हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरते.

जुळयांच्या (जी जुळीं ३० – ३५ वयाची आहेत) पत्रिकां जमवा, त्यांचा अभ्यास करा . पत्रिका अगदी एकसारख्या दिसतील मग पत्रिकांमध्ये असा नेमका कोणता सुक्ष्म फरक आहे ज्यायोगे त्या जुळ्यांच्या आयुष्यातल्या घटना वेगवेगळ्या घडल्या?

पंचम स्थानातला शनी विवाहास विलंब लावतो असा अनुभव बर्‍याच जणांच्या बाबतीत येतो, आपल्याला अशी एखादी पत्रिका मिळेल की पंचमात शनी असताना विवाह वेळेत झाला आहे आणि संततीही वेळेत आणि निरोगी आहे, म्हणजे पुस्तकातला नियम या पत्रिकेला लागू पडला नाही का? का त्या पत्रिकेत इतर काही प्रबळ योग आहेत ज्यांनी शनीचा विरोध धुडकावून लावून जातकाला चांगली फळे दिली ? किंवा पंचमात शनी असताना सुद्धा अशा शनीची खास मानली गेलेली फळे मिळाली नाहीत म्हणजे कदाचित असे ही असू शकेल की जन्मवेळ चुकल्यामुळे शनी पंचमात पडला असावा, प्रत्यक्षात चतुर्थात किंवा षष्ठात असायला पाहीजे होता , पण मग खरोखरच तसे असेल तर मग शनीची चतुर्थातली किंवा षष्ठातली फळे मिळायला हवी होती , ती मिळाली आहेत का….

अशा अनेक मार्गाने आपल्याला अभ्यास करता येईल. त्यातुन आपले नियम पक्के होतात, नियमांना अपवाद केव्हा व कोणत्या परिस्थितीत होतात याचा अदमास येतो, ग्रहांची फळे देण्यातली विविधता लक्षात येते तसेच आधी लिहल्या प्रमाणे या फळांच्या अभिव्यक्ति होताना व्यक्ती, स्थळ, काल, देश, समाज , परिस्थिती आणि कार्मीक सापेक्षतेचा हातभार किती आणि कसा असतो यांचा ही अंदाज येतो.

तेव्हा जेवढ्या मिळतील तेवढ्या पत्रिका जमवून मी वर लिहले आहे त्या प्रमाणे अभ्यास करावा. काय होईल, काही वेळा तुमचे अंदाज चुकतील , माझे बर्‍याच वेळा चुकले आहेत , आज ही चुकत आहेत! पण त्याला घाबरायचे नाही.

” तेरे गिरने भी तेरी हार नहीं क्यूंकी तू आदमी है अवतार नहीं ।”

ही उक्ती लक्षात ठेवायची आणि अभ्यास वाढवत राहायचे.

आता ह्या अशा कुंडल्या मिळावायच्या कशा ? त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार.

सर्वात प्रथम आपल्या नातेवाईंकांच्या , जवळच्या मित्रांच्या पत्रिकां गोळा करा.  ही माहीती गोळा करताना संपूर्ण माहीती (जन्मवेळ , घटनां व त्यांच्या तारखा इ.) मिळत असेल तरच घ्या अन्यथा नको.

बर्‍याच जणांचे आयुष्य तसे सर्वसाधारण , एका सरळ रेषेत,  रेल्वेच्या रुळां सारखे सरळ , समांतर गेलेले असते. शिक्षण – नोकरी – लग्न – मुले – घर – सेवानिवृत्ती असे अगदी पु.लं. च्या त्या ‘चौकोनी कुटुंबा’ सारखे चाकोरीबद्ध! त्यांच्या आयुष्यात खळबळजनक असे फारसे काही घडलेले नसते . या बाबतीत विनोदाने म्हणता येईल की “सांगण्या सारखे आयुष्यात काही घडलेच नाही, आणि जे घडले ते सांगण्या सारखे नाही’ . आपल्याला अशा व्यक्तींच्या पत्रिका  अभ्यासुन जास्त मायलेज मिळणार नाही ( एक आहे, इतके सुतासारखे सरळ आयुष्य जायला सुद्धा काही खास ग्रहमान असायला हवे ना?)

आपल्याला हव्यात त्या खळबळजनक, ‘कहानी में ट्वीस्ट ‘  वाल्या केसीस ! ज्यांचे आयुष्य एखाद्या ‘रोलर कोस्टर राईड’  सारखे गेले आहे अशा केसीस. अशा घटना घडलेल्या व्यक्तीं, जुळी मुले, उशीरा विवाह , घटस्फोट , संतती नाही असे काही खास वैविध्य असलेल्या व्यक्तींची माहीती  स्वत:हून आवर्जुन मागून घ्या. काही जण सहकार्य करतील, काही नाही.

चार लोकांना सांगीतले की मी थोडे फार ज्योतिष बघतो , की आपोआपच लोक तुमच्या कडे यायला सुरवात होते, त्यातही तुम्ही फुकट सांगताय असे दिसले तर मग काय बघायलाच नको.

मात्र हे करताना मिळालेली सर्व माहीती गुप्त ठेवण्याची हमी द्या (आणि ती पाळा देखिल!)

दुसरा मार्ग म्हणजे खास अ‍ॅस्ट्रॉलॉजी या विषयाला वाहिलेले विविध चर्चा ग्रुपस, फोरम. या ठिकाणी बरेचजण (फुकटे?) स्वत:ची माहीती देऊन भविष्य विचारत असतात, त्याद्वारे ही आपल्याला अभ्यासा साठीच्या पत्रिकांचा पुरवठा होत राहतो. मी अनेक अ‍ॅस्ट्रॉलॉजी फोरम्स चा सभासद आहे, ज्या व्यक्तींनी संपूर्ण माहिती दिली असेल अशा केसेस मी वाचतो, माहीती माझ्या डेटाबेस मध्ये नोंद करुन ठेवतो, वेळ मिळाल्यास त्यांचे विश्लेषण ही करतो.

फक्ता एका करा, मी या आधी सांगीतल्या प्रमाणे , संपूर्ण माहीती, आयुष्यातल्या घडलेल्या महत्वाच्या घटना, शिक्षण, नोकरी – व्यवसाय, इ. ‌ मिळत असेल तरच त्या पत्रिकांचा विचार करा, नुसती जन्मतारीख , वेळ, गाव अशी त्रोटक माहीती देऊन प्रश्न विचारणार्‍यांचा तुम्हाला अभ्यासासाठी उपयोग होणार नाही.

पत्रिकांचा आधीच घडलेल्या घटनांच्या अंगाने अभ्यास झाल्या वर वाटल्यास त्या व्यक्तिच्या भविष्यात डोकावा. काही दिसले / सापड्ले तर त्या व्यक्तिला सांगा, सांगताना सरळ लिहा: “मी शिकाऊ आहे, चूक होऊ शकते तेव्हा मी सांगीतलेले अगदी दगडावरची रेघ असे मानू नका, वाटल्यास सेकंड ओपिनियन घ्या इ”

एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा  ‘आरोग्य, मृत्यु, अनैतिक संबंध, कायदा –खटले, जुगार (शेअरबाजार , सट्टा, क्रिकेट मॅच चे निकाल) ‘ अशा विषया वरच्या प्रश्नांना उत्तरें देण्याचे टाळा.

कुंडली संग्रहची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत त्याचाही आधार घेता येईल. मात्र राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती,  नाट्य -चित्रपट व्यवसायातल्या व्यक्ती यांच्या पत्रिका शक्यतो टाळा याचे कारण म्हणजे बर्‍याच वेळा त्यांच्या जन्मवेळ, जन्मतारीख अशा तपशीलात चुका असतात, काही वेळा त्या व्यक्तीनेच जाणून बुजून चुकीची माहीती पसरवलेली असते किंवा कोणा ज्योतिषाने स्वत:चे डोके लढवून  (रुलिंग प्लॅनेट्स वापरुन ?)  आपल्या मनाप्रमाणे म्हणजेच वेळ बदललेली असते. कै. श्रीमती  इंदिरा गांधीच्या  किमान दहा वेगवेगळ्या जन्मपत्रिका उपलब्ध आहेत , यातली कोणती खरी मानायची? तेव्हा ह्या फंदात पडू नका. आपल्या हवीत ती सर्वसामान्य माणसे आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लहान-मोठ्या सुख-दु:खाच्या गोष्टी.

तुम्ही जेव्हा पत्रिका जमवायला सुरवात कराल तेव्हा अगदी सुरवातीपासुनच, मिळालेल्या पहिल्या पत्रिके पासुनच , सर्व पत्रिकांचा डेटाबेस पण तयार करायला घ्या. प्रत्येक पत्रिकेला कोड नंबर द्या. पत्रिकांचे अनेक मार्गाने वर्गीकरण करा. उदाहरणेच द्यायची तर:

जन्मलग्ना वरुन गट करा (मेष .. मीन बारा गट होतील), चंद्रराशी वरुन गट करा, ग्रहांच्या स्थानांवरुन गट करता येतील जसे चंद्र-१ .. चंद्र – १२ (लग्नात चंद्र … व्ययात चंद्र) , ग्रहांच्या राशीवरुन गट करता येतील जसे गुरु – मेष ….. गुरु – मीन, ग्रहयोगांवरुन गट करता येतील जसे चंद्र – मंगळ युती,  बुध – शनी  प्रतियोग इ. पत्रिकेच्या वैषीष्ट्या वरुन गट करा जसे उशीरा लग्न, लग्न नाही, दुसरे लग्न, घट्स्फोट, आंतरजातीय विवाह, परदेश गमन, लष्करात नोकरी, वकील, उच्च शिक्षण, पैसा, संतती नाही  इ.

पत्रिकेच्या अभ्यासातून काढलेले  निष्कर्ष नोंदवून ठेवा , जर वर्तवलेल्या भविष्याचा पडताळा आला तर त्याही नोंदी करुन ठेवा. ज्योतिषाशास्त्रातले कोणते नियम अनुभवास आहे याच्या नोंदी ठेवा म्हणजे कोणते नियम लागू होण्याची शक्यता जास्त आहे त्याचा एक डेटाबेस तुमच्याकडे तयार होईल.

आपण वर्तवलेले भाकित बर्‍याच वेळा चुकेल ही, पण त्यामुळे नाउमेद होऊ नका. भाकित चुकलेली पत्रिका पुन्हा तपासा, जर त्यावेळेच्या नोंदी ( काय आडाखे वापरले, कोणत्या घटकाला महत्व दिले इ.)   तुमच्या कडे असतील तर तुमचे तुम्हालाच कळेल की काय आणि कोठे चुकले, अशा झालेल्या चुकांच्याही व्यवस्थित नोंदी ठेवा. त्यातुन तुम्हाला बरेच काही शिकायला मिळेल.

पत्रिकेच्या अभ्यासाची एक पद्धत / शिस्त तयार करा, पत्रिका हातात आली की सर्वप्रथम काय बघायचे इ क्रम ठरवून ठेवा (त्यात वेळोवेळी बद्ल करावा लागतो)  , अशी एक शिस्त पाळली की “अरेरे हे पाहायचे लक्षातच आले नाही…हे विसरलोच ” असे म्हणायची वेळ येणार नाही.

सुरवातीला हे काम कंटाळवाणे , त्रासाचे वाटेल पण जेव्हा तुमच्या कडे १०,००० + पत्रिकांचा संग्रह होईल आणि जेव्हा एका माऊस क्लिक मध्ये ‘पंचमात शनी’ असलेल्या २९७ पत्रिका तुमच्या समोर येतील (तुलनात्मक अभ्यास करायला)  तेव्हा ह्या सगळ्या घेतलेल्या मेहेनतीचा तुम्हाला अभिमान वाटेल.

मला या सार्‍यांचा बराच लाभ झाला आहे, आपल्याही होईल.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

19 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  नवशिक्यांसाठी बहुमोल माहिती. धन्यवाद!

  0
 2. Gaurav Borade

  खूप उपयुक्त माहिती… धन्यवाद सर !
  आणि
  कोणा एकाची… च्या प्रतीक्षेत..

  0
 3. Umesh

  अशीच एक पत्रिका मी आपल्या समोर मांडणार आहे …

  माझ्या नव्या लेख मालिकेतुन ….
  Pratiksha karat aahet . aapale lekh abhyasiniy asatat.

  0
 4. दिलीप नाना जोशी.

  अत्यंत उपयुक्त माहिती ती देखील इतक्या सोप्या शब्दांत……
  खुप खुप धन्यवाद सर….

  0
  1. सुहास गोखले

   वर्षाजी ,

   धन्यवाद. सध्या काही ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये जास्त बिझी आहे , त्यातून मोकळा झाल्यावर पुन्हा लेखन चालू करत आहे.

   सुहास गोखले

   0
 5. Santosh

  सुहासजी,

  ज्योतिष संदर्भात काही चांगले आणि अचूक Astrology software सुचवू शकाल का?

  माझ्या माहिती प्रमाणे बरेच ज्योतिष निदान पुण्या / मुंबईतले AstroComp चे (Kismat किंवा Astro-Office) Software वापरतात, ह्या व्यतिरिक्त काही चांगले software तुम्ही सुचवाल का?
  जे KP व्यतिरिक्त अन्य पद्धती मध्ये वापरता येतील जस कि Wheel Chart काढण्यासाठी.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,
   धन्यवाद.

   मी भारतीय लायसेंस्ड (पेड) सॉफ्टवेअर्स फारशी हाताळली नाहीत. पण परदेशात तयार झालेली दोन सॉफ्टवेअर्स मी काही काळ (ट्रायल व्हर्शन्स) आहेत ती सगळ्यात चांग़ली आहेत.
   Kala (कला)
   Shri Jyoti Star (श्री ज्योती स्टार)
   ह्या दोन्ही सॉफ्टवेअर्स मध्ये सगळी कामे होऊ शकतील. यांच्या किंमती अंदाजे १०,००० ते २५,००० असतील, सध्याची किंमत नक्की माहीती नाही.
   आणखी एक सॉफ्ट्वेअर आहे Parashra Light , लोकप्रिय आहे पण ते स्विस एफेमेरीज वापरतात का ते मला माहीती नाही.
   फ्री म्हणजेच लायसेंस न लगाणारी (पायरेटेड नव्हे!)
   के.पी. साठी एकमेव : KPStar One , हे मी स्वत: माझ्या व्यवासायीक कामांसाठी वापरतो.
   वेदीक साठी: Jagannath Hora

   वेस्टर्न साठी: पेड व्हर्शन्स मध्ये Solar Fire Gold, Janus , Kepler ही सॉफ्टवेअर्स चांगली आहेत.
   वेस्टर्न साठी फ्री व्हर्शन सॉफ्टवेअर्स जवळ जवळ नाहीतच , whatwatch, म्हणून एक सॉफ्टवेअर्स आहे ते बरे आहे.
   मी माझ्या वेस्ट्र्न चार्ट साठी http://www.astro.com ची मोफत सेवा वापरतो.

   सुहास गोखले

   0
 6. Sudhanva Gharpure

  Dear Suhas,

  Heartiest congratulations to you. Your website has got developed in an excellent manner. You have provided lot of good information for beginners as well as experienced astrologers. Now I have something worthy to read in coming week !!!

  I felt that you need to develop similar website in English version. That will take you outside Maharashtra, and particularly, outside India ( well, you are already become known outside India as well !!! ). I have seen many websites where they provide language button on top-right corner. One selects language there and entire website gets converted in that language. You can provide similar button !!!

  May all planets gather in your good house and shower blessings & fruits !!!

  With warm regards and good luck.

  Sudhanva Gharpure
  Pune

  +1
 7. सुहास गोखले

  धन्यवाद श्री. सुधंन्वाजी,

  आपण आवर्जुन वेळात वेळ काढून अभिप्राय दिला या बद्दल आभार.

  मी सध्या इंग्रजी ब्लॉग वर काम करत आहे , सध्याचा मराठी ब्लॉग चाच लेआऊट वापरुन हा इंग्रजी ब्लॉग तयार होईल. यात अडचण एकच आहे की माझ्या मराठी लेखांचे तितकेच सरस भाषांतर करणे. काहीही झाले तरी इंग्रजी ही माझ्यासाठी एक परकी भाषा आहे , मराठीत मी जितके सहजतेने आणि लालित्यपूर्ण लिहू शकतो तो बाज इंग्रजी भाषेत आणणे अवघड आहे , माझे काही शैलीदार मराठी लेख तर इंग्रजीत आणणे शक्यच होणार नाही. पण तरीही मी प्रयत्न करणार आहे. येत्या दोन एक महीन्यात इंग्रजी ब्लॉग ही वाचकांच्या सेवेत रुजु होईल.

  शेवटी पुन्हा एकदा आपल्या अभिप्राया बद्दल मन:पूर्वक धन्यवाद,

  कळावे,

  आपला

  सुहास गोखले

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.