श्री. जॉन फ्रावली (John Frawley) – एक परिचय

श्री.जॉन फ्रावली हे सध्याच्या पिढीच्या ज्योतिर्विदां मधले एक अग्रगण्य नाव आहे. १७ व्या शतकातल्या महान ब्रिटिश ज्योतिर्विद श्री. विल्यम लिली यांच्या परंपरेतले ज्योतिषी म्हणून श्री.जॉन फ्रावली यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

सध्याच्या काळात पाश्चात्य ज्योतिर्विदांत तीन ठळक गट पडले आहेत, पहिला गट १६ व्या ते १८ व्या शतकात वापरात असलेल्या ज्योतिष पद्धती व परंपरे प्रमाणे काम करणारे –‘ट्रॅडीशनॅलीस्ट’, दुसरा गट १९ व्या – २०व्या शतकात प्रस्थापित झालेल्या मतांचा व पद्धतींचा वापर करणारा , हा गटातले ज्योतिर्विद युरेनस, नेपच्युन आणि प्लुटो या शनी पलीकडेच्या कक्षांत असलेले बाह्य ग्रह , तसेच मंगळ-गुरु / शनी- युरेनस यांच्या मधल्या पट्ट्यात असलेल्या अनेक अ‍ॅस्टॉईड्स यांचा वापर करतात, तसेच अनेक कालबाह्य नियमांचा व रुढी-परंपरांचा वापर करत नाहीत. या गटाला ‘मॉडर्निस्ट’ म्हणता येईल. तिसरा गट ज्योतिष हे ‘इव्हेंट प्रिडीक्शन’ चे माध्यम आहे असे मानतच नाहीत किंबहुना ज्योतिषशास्त्राद्वारा ‘इव्हेंट प्रिडीक्शन’ करणे अपराध मानतात. ते पत्रिकेचा विचार मानसशास्त्रीय अंगाने करुन ज्याला आपण कॅरॅक्टर अ‍ॅनॅलायसिस म्हणतो तशा पद्धतीचे काम करतात. यांना ‘सायकॉलॉजीकल अ‍ॅस्ट्रॉलॉजीस्ट’ असे म्हणता येईल. ‘ट्रॅडीशनॅलीस्ट’ हे एक टोक तर ‘सायकॉलॉजीकल अ‍ॅस्ट्रॉलॉजीस्ट’ दुसरे विरुद्ध दिशेचे टोक !

श्री. जॉन फ्रावली हे पहिल्या गटात–‘ट्रॅडीशनॅलीस्ट’ ज्योतिर्विदांत मोडणारे आहेत. ‘होरारी अ‍ॅस्टोलॉजी’ ही श्री. जॉन फ्रावली यांची खासियत त्यातही ‘स्पोर्ट्स अ‍ॅस्टॉलॉजी’ मध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे.

मध्यंतरी काही काळ त्यांनी ‘Astrologer’s Apprentice ‘ हे मासीक प्रकाशीत केले होते. सध्या या मासीकाचे प्रकाशन बंद असले तरी , सर्व जुने अंक PDF स्वरुपात त्यांच्याच वेब-साईट वर डाऊन लोड करुन घेण्या साठी उपलब्ध आहेत.

सध्या ते जगभर प्रवास करत आपल्या ज्ञानाचा सर्वांना लाभ करुन देत आहेत.

एक ज्योतिषी म्हनून त्यांची किर्ती जगभर पसरली आहेच पण त्यांनी लिहलेले ग्रंथ ही तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘The Real Astrology’ या ग्रंथाला International Book of the Year, 2001 हा Spica तर्फ दिला जाणारा पुरस्कार मिळाला आहे.

श्री. जॉन फ्रावली यांची ऑडिओ आणि व्हीडीओ लेक्चर्स जगप्रसिद्ध आहेत. त्यांची लेक्चर्स असोत किंवा ग्रंथ , विषयाची सुस्पष्ट मांडणी, ओघवती भाषा, विश्लेषणातला नेमकेपणा आणि हे सगळे अगदी हसत खेळत , शैलीदार भाषेत! श्री. जॉन फ्रावली यांच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’ ला खास दाद दिली पाहीजे. माझ्या कडे ज्योतिष विषयावरचे असंख्य ग्रंथ आहेत पण श्री. जॉन फ्रावली यांच्या सारखे नर्मविनोदी लिखाण क्वचितच वाचावयास मिळते. अगदी ज्याला टिपीकल ब्रिटीश ह्युमर म्हणतात तो श्री. जॉन फ्रावली यांच्या सर्वच ग्रंथात , पानापानातून प्रत्ययास येईल.विषय सोपा करुन कसा सांगायचा हे श्री.जॉन यांचे कडून शिकावे.

श्री. जॉन फ्रावली यांच्या ‘The Real Astrology’ या ग्रंथांत आजच्या ज्योतिषशास्त्राने मानसशास्त्रिय अंगाचे जे वळण घेतले आहे त्यावर प्रखर हल्ला केला आहे, मी नावे घेत नाही पण अगदी भल्या भल्या आधुनिक ज्योतिर्विदांच्या धोतराला (पँटीला म्हणा वाट्ल्यास !) त्यांनी हात घातला आहे.

श्री. जॉन फ्रावली यांनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतीतला एक वाक्यांश:

“If we look at the keywords that the moderns tend to use in considering the planets – so many of them are vague, more-or-less meaningless tags. With traditional technique we are working with the concrete right from the start. Mars, for example, is not ‘aggression’, nor Venus ‘harmony’, but they are ‘your dad’ or ‘your sister’ or whatever. So, inevitably, our judgements are concrete, even if we are working on a psychological level. The traditional technique also makes it far easier for the astrologer to keep himself and his per-conceptions out of the chart. We don’t have to regard being a healer as the highest form of human life”

मी जेव्हा पाश्चात्य होरारीचा अभ्यास करावयास सुरवात केली तेव्हा सर्वप्रथम जी नावे माझ्या कानावर पडली त्यात श्री. जॉन फ्रावली यांचे नाव अग्रभागी होते. अर्थातच त्यांचा “ The Horary Textbook’ हा ग्रंथ लौकरच माझ्या संग्रहात दाखल झाला हे वेगळे सांगावयास नको.

श्री. जॉन फ्रावली यांनी स्वत: सही केलेला हा ग्रंथ माझ्या संग्रहात आहे याचा मला अभिमान आहे.

या ग्रंथाचे परिक्षण मी या पोष्ट्च्या पाठोपाठ लगेचच प्रकाशीत करत असल्याने त्या ग्रंथा बद्दल आत्ता इथे जास्त काही लिहीत नाही.

या ग्रंथाच्या पहील्याच प्रकरणात लेखक म्हणतो’

Horary is the art of drawing specific answers to specific questions from an astrological chart set for the time the question is asked. It is quick, simple and effective, providing concrete, verifiable answers.

How quick? How simple?

Follow this example.

तेच उदाहरण आज मी आपल्या समोर ठेवतो आहे!

माझ्या शेजार्‍यांचा पाळलेला गुबगुबीत बोका हळू हळू ओळख वाढवत आमच्या घरीही ठाण मांडू लागला, आम्हालाही त्याचा लळा लागला. एरव्ही रोज न चुकता हजेरी लावणारे हे मांजर गेल्या दोन दिवसात मात्र फिरकलेच नाही, मांजर का आले नाही? काय बरे झाले असेल ? मांजर सुखरुप तर आहे ना? असे प्रश्न मनात आले. शेवटी ‘मांजराचे काय? ते कधी आमच्या घरी येणार आहे?” असा प्रश्न मनात धरुन सरळ एक प्रश्न कुंडलीच मांडली.

पाळीव प्राण्यांसाठी पत्रिकेत दोन स्थाने आहेत. षष्ठम स्थान (६) व व्यय स्थान (१२) , त्यापैकी षष्ठमस्थान हे लहान पाळीव प्राण्यांसाठी जसे की मांजर ,कुत्रा, पोपट इ. आणि व्यवस्थान हे मोठ्या पाळीव प्राण्यांसाठी जसे की घोडा, गाय, हत्ती, उंट इ. इथे प्राणी कोणत्या प्रकाराचा आहे हे महत्वाचे त्याचा आकार नाही. उदाहरणार्थ एखादा ग्रेट डेन जातीचा कुत्रा , घोड्याच्या लहान शिंगरा पेक्षा आकाराने मोठा असू शकेल पण केवळ मोठा दिसतो म्हणून ग्रेट डेन ला व्ययस्थान देता येणार नाही त्याचा विचार षष्ठम स्थाना वरुनच करायचा.

या केस मध्ये ‘मांजर’असल्याने षष्ठ्म स्थान(६) महत्वाचे. त्यासाठी आपण कुंडलीतले षष्ठम स्थान (व त्यातले ग्रह ) एव्हढेच पाहू बाकीच्या फापटपसार्‍याची सध्यातरी आवश्यकता नाही. तर अशी (नको असलेले तपशील वगळलेली) कुंडली शेजारीच छापली आहे.

30 Aug 1998 09:20 AM London, UK, 51N30, 00W10, Geocentric, Tropical, Regiomontanus, True Nodes

प्रश्नकुंडलीत  फक्त एकच (गुरु) ग्रह दिसतो बाकीचे ग्रह कोठे गायब झाले म्हणून दचकू नका, होरारी खरेच सोपी आहे. आपल्याला एखद्या नेमक्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असल्याने नेमक्या त्या प्रश्ना संदर्भातले ग्रह व भाव आपल्या दृष्टिने महत्वाचे असतात, बाकीचे ग्रह व भाव अशावेळी कमी महत्वाचे किंवा पूर्ण दूर्लक्ष करण्याजोगे असतात.

प्रश्नकुंडलीतले इतर ग्रह मुद्दामच दाखवेलेल नाहीत !

पत्रिकेत षष्ठमा वर मीन रास आहे म्हणजे ‘गुरु’ मांजराचे प्रतिनिधीत्व करणार. आता हे मांजर आहे तरी कोठे?

गुरु (मांजर) षष्ठम स्थानातच आहे . षष्ठम स्थान हे मांजराचे स्वगृह म्हणजे म्हणजे मांजर त्याच्या घरातच आहे . गुरु (मांजर) स्वराशीतच (मीन) असल्याने खुपच प्रबळ आहे (with lots of Essential Dignity), मांजर त्याच्या घरी सुखरुप आहे , मजेत आहे!

मीन रास सुखदायक, उबदार जागा दाखवते, याचा अर्थ मांजर एखाद्या उबदार ठिकाणी म्हणजे बहुदा त्याच्या घरी सोफ्यावर किवा बिछान्यावर निंवात पहुडले असेल.

पण गुरु वक्री आहे म्हणजे काहीतरी गड्बड आहे, मांजराला काही समस्या असू शकतात, त्यात मांजर जलतत्वाच्या मीन राशीत असल्याने मांजर भिजले असावे.

गुरु वक्री आहे याचा अजुन एक अर्थ असा निघतो की मांजर आत्ता आहे तिथे फार काळ राहणार नाही तर ते पुन्हा पूर्वी होते तिथे जाणार आहे. म्हणजे ते आमच्या घरी येऊ शकते.

पण तसे ते येईल का आणि येणार असल्यास केव्हा ?

आता आपल्याला उत्सुकता आहे मांजर माझ्या (लेखकाच्या ) घरी केव्हा येणार , त्यासाठी मांजराचा प्रतिनिधी (गुरु) आणि माझा प्रतिनिधी यांच्यात कोणता ना कोणता तरी योग व्हावयास हवा. आता माझा  प्रतिनिधी / माझे प्रतिनिधी कोण आहेत?

प्रश्नकर्ता नेहमीच लग्न स्थाना वरुन बघतात म्हणजे लग्नेश आणि लग्नातले ग्रह माझे प्रतिनिधी असतातच त्या शिवाय लग्न बिंदू (Ascendant) नेहमीच जातकाचा प्रतिनिधी मानला जातो.

एरव्ही इतर प्रश्नांच्या बाबतीतल्या प्रश्नकुंडलीत चंद्र हा प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करत असतो पण ‘हरवले –सापडले’ (Lost & Found) पद्धतीच्या प्रश्नाचा विचार करत असताना चंद्र हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधीत्व करत असतो आणि ह्या प्रकारच्या होरारीत चंद्र नेहमीच हरवलेल्या वस्तू साठी वापरला जातो.

तसेच चंद्र हा कालनिर्णयासाठी ही वापरला जातो.म्हणून आपण एक चंद्रच काय तो वापरु म्हणजे आपली दोन्ही कामे एकदमच होऊन जातील.

त्यासाठी आपण वरील कुंडलीत चंद्राचा समावेश करु. चंद्र दाखवत असलेली कुंडली खाली छापली आहे. (ही आणि वर छापलेली कुंडली एकच आहे )

 

 

आता कुंडलीत बघा, मी आणि गुरु यांच्यात कोणता योग होतो आहे का ? म्हणजे चंद्र किंवा गुरु (मांजर) आणि मी (लग्न बिंदू) यांच्यात काही योग होतो आहे का ते पाहाणे. चंद्र धनेत ०८:१६  अंशावर आहे तर जन्मलग्न बिंदू तुळ ०९:१६ असा आहे. चंद्र फक्त १ अंश पुढे सरकून तो धनेत ०९:१६ अंशावर आला की तो जन्मलग्न बिंदू शी अगदी पूर्ण अंशात्मक लाभ योग करेल.

मांजर नक्की माझ्या घरी येणार , चंद्राला फक्त १ अंश पुढे जायचे असल्याने १ टाइम युनीट लागेल. आपले टाईम स्केल १ तास / दिवस/ आठवडा असे असू शकते. चंद्र धने सारख्या म्युटेबल राशी व त्रितीये सारख्या कॅडेट हाऊस मधून लाभयोग करणार असल्याने आपण ‘दिवस’ हे मधले युनिट म्हणजे निवडू , त्या हिशेबाने मांजर, एका दिवसात माझ्या घरी हजेरी लावेल!

हो, आणि अक्षरश: तसे झाले, प्रश्न विचारलेल्या वेळेच्या २४ तासाच्या आत मांजर आमच्या घरी ‘म्यॅव’ करत होते!

पाहीलेत,  फक्त दोन ग्रहांच्या  साह्याने प्रश्नाचे उत्तर मिळवता आले आणि  ते बरोबर पण आले आहे !  होरारीची हीच तर कमाल आहे.

अर्थात सर्वच प्रश्न असे चुटकी सारखे सोडवता येतात असा गैरसमज मात्र करुन घेऊ नका (तोंडघशी पडाल!)

पण मोजकेच नियम, कोणताही फाफट्पसारा नसल्याने होरारीचे काम काहीसे सोपे आहे हे मात्र निश्चित.

होरारी मुख्यत: एखादी घटना घडू शकेल का आणि घडणार असल्यास केव्हा? याच मूळ उद्देशासाठी वापरली जाते पण फक्त घटनांच्या तारखां ठरवण्याला अतिरेकी महत्व  देता कामा नये.
घटने मागची पार्श्वभूमी सांगणारे ग्रहमान, घटना घडून गेल्यानंतरची परिस्थिती सांगणारे ग्रहमान, विविध ग्रहयोग यांचा साधकबाधक विचार केला पाहीजे.  ग्रहांची कारकत्वे, राशीबल, अवस्था यांचाही विचार  तितकाच सखोल पणे व्हायला हवा.
युरेनस , नेपच्युन , प्लुटो सारखे प्रभावशाली ग्रह व त्यांचे परिणाम विचारात घेतले नाहीत  तर ती मोठी चूक ठरेल! या सगळ्यांकडे कानाडोळा केला तर  घटना घडेल किंवा नाही आणि घडणार असल्यास ती केव्हा हे कळू शकेल पण त्यातला वर्णनात्मक भाग अभावनेच हाती लागेल.

म्हणूनच आपण स्वत: वापरत असलेली पद्दतीच सर्वोत्तम बाकी सारे तुच्छ असा  विचार न करता पारंपरीक , के.पी.,  पाश्चात्य होरारी, युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स या सगळ्यांचा जमेल तसा वापर करुन जास्तीतजास्त अचुकता मिळवायचा प्रयत्न व्हायला हवा.

असो

पुढील भागात श्री. जॉन फ्रावली यांनी लिहलेल्या “ The Horary Textbook’ या ग्रंथाचे परिक्षण प्रकाशीत करत आहे. जरुर वाचा.

श्री. जॉन फ्रावली यांनी लिहलेली काही पुस्तकें:

 

John Frawley Books

 
शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. viraj

  सुहासजी तुम्ही टेलिस्कोप वरुन रात्री अवकाशाचा अभ्यास करता का. कींवा छंद म्हणून.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   मांजराचा प्रतिनिधी गुरु हा मीनेत म्हणजे जलतत्वाच्या राशीत होता त्यामुळे मांजराचा पाण्याशी संपर्क आला असण्याची एक शक्यता असू शकते, पण हे काही मेजर टेस्टीमोनी नाही, गुरु (मांजर) कर्केत असते तर ही शक्यता जास्त असती. सामान्यता: मीनेचा संबध ‘कंफर्ट’ ‘उबदार जागे’ असा जास्त आहे.

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.