मध्यंतरी एकाने विचारले “माझी अमुक रास आहे तेव्हा मी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला पाहीजे?”

हा प्रश्न ऐकुण मला हसायला आले, कोणते  संगीत ऐकायचे ही काय पत्रिका बघून ठरवायची गोष्ट आहे ?

“जे तुम्हाला आवडते , मनाला भावते ते संगीत ऐका “  हेच त्याचे उत्तर आहे!

आता मनाला भावणे म्हणजे तरी काय ? जे संगीत आपल्या भाव – भावनांच्या जवळ जाते , काळजाला हात घालते ते.

मला सगळ्या प्रकारचे संगीत आवडते. आमच्या घरात ‘संगीताचे’ बाळकडू  का काय म्हणतात ना तसले काहीही नव्हते, तेव्हा आमच्या घरी एक रेडीओ सोडला तर बाकी ग्रामोफोन , टेपरेकॉर्डर सारखी गाणी ऐकायची सोय असलेली उपकरणे नव्हती. माझ्या आईला, वडीलांना गाण्याची फारशी आवड नसली तरी एक संस्काराचा भाग म्हणून मला बळजबरीने गाण्याच्या क्लासला घातले गेले. गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा ही मी दिल्या पण ते सगळे मारुन मुटकून. माझे वडील रेडीओ वर लागलेली भावगीते, भजने ऐकत पण त्यापलीकडे काही नव्हते. लहानपणी एकदा ‘बॉबी’ सिनेमातले गाणे गुणगुणताना पाहून ‘ही कसली छ्चोर गाणी ऐकतो/ गातोस रे’ अशी बोलणीं बसली ते आठवते. ‘मला आवडले म्हणून गुणगुणलो, त्यात गैर काय?” असा उलट प्रश्न करायची ईच्छा असूनही ते बोलता आले नव्हते हा भाग वेगळा.

पुढे महाविद्यालयात दाखल झाल्यावर काही बंधने सैल झाली (साहजीकच आहे !) , त्या काळात जे कानावर पडत होते (त्याला संगीत म्हणायचे का प्रश्न वेगळा!) ते ऐकायचा सपाटा सुरु झाला. हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा पलीकडे जाऊन संगीताचे अफाट जग विस्तारले आहे याची पुसटशी का होईना जाणीव झाली. हिंदी सिनेमातले संगीत सतत कानावर आदळत होते, मराठी संगीतात दखल घेण्यासारखे काही वाटलेच नाही. मुळव्याधीची जोरदार कळ आल्यासारखे गायलेले ‘यमुना काठी ताजमहाल’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे ऐकले , हे गाणंं ? सुधीर फडके गायक म्हणुन ठीक वाटले पण सगळे गाणे एकाच साच्यातले बुळबुळीत, व्हेरिएशन्स हा प्रकारच नाही आणि व्हेरिएअशन्स च्या नावाखाली जे प्रकार केले गेले होते ते  पटले नाही, अगदीच बाळबोध किंंबहुना हास्यास्पद वाटले. भावगीताचा पत्ता तिथेच कट झाला. लावणी हा प्रकारही असाच , नाही म्हणायला ‘मी पतंग उडवीत होते’  ही लावणी तेव्हा आवडली होती (आज ही आवडते , हो, खोटे कशाला बोला !).

माझे काही मित्र ‘गजल’ चे मोठे शौकिन! त्यांच्या सहवासात बर्‍याच गजल ऐकल्या, पण हा प्रकार काहीही केले तरी मनाला भावला नाही,  उर्दु भाषेची नजाकत मान्य करुनही हा संंगीत प्रकार माझ्यात रुजला नाही. आशुक- माशुक, मयखाना, गम, आँसू आणि ‘वो’ या पलीकडे गजल गेलेली कधी बघितलीच नाही. विरहा पलीकडे कोणत्या भावभावना असतात याचा या गजलकारांना गंधही नसावा, इतका हा कमालीचा एकसुरी बाज वाटला मला. (निदान मी गजल या नावाखाली जे जे काही ऐकले त्यावरुन तरी असेच म्हणावे लागेल !) एक ‘ती’ बेवफा होऊन गेली म्हणून पराभूत होऊन मी माझे आख्खे जिवन आसू गाळत , दारुच्या नशेत बुडवून घ्यायचे ? हॅट …. नाही पटत ! (माझ्या बाबतीत असे काही झाले असते तर , ‘गेलीच उडत, तू नहीं तो और सही’ असे म्हणत मी दुसरी कोणी तरी हुडकली  असती , हाय काय अन नाय काय !).  नाही म्हणायाला पुढे बेगम अख्तर च्या काही गजल ऐकल्या त्या मात्र आवडल्या.  

गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा रडत खडत का होईना दिलेल्या असल्याने भारतीय शास्त्रीय संगीताची चुटपुट ओळख झालेलीच होती. पण गाण्याच्या क्लासच्या शिक्षकांनी ज्या तर्‍हेने ते शिकवले (अत्याचारच म्हणायचा तो !) त्यामुळे हे काहीतरी अवघड, क्लिष्ट (किंवा थोडक्यात सांगायचे तर- भयंकर!)  आहे , याच्या वाटेला जायलाच नको अशी मनाची पक्की धारणां झाली होती.  पण लोकं (पुण्याची!) फिरुन फिरुन  पुन्हा भोपळे चौकात येतात (काय बरोबर ना, पुणेकर?) तसा मी पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळलो, त्याला कारण ही असेच घडले… 

सांगलीच्या सरकारी गणपतीच्या मंदिरात संध्याकाळची आरती झाली की एक अगदी वयोवृद्ध असे गवयी (ते संस्थानी काळात राजगवयीं होते म्हणे !) तंबोरा घेऊन (अक्षरश:) मिनिट – दिड मिनिट काहीतरी गात असत, काय गात असत कोण जाणे , ते कोणी ऐकतही नसे, बुवांचे ‘आ- ऊ ’ सुरु व्हायचे, आता काही ऐकायला मिळेल असे वाटते न वाटते तोच तंबोर्‍याला गवसणीं घालायला सुरवात व्हायची ! ती केवळ औपचारिकता होती हे उघडच होते, सगळा जुलमाचा रामराम वाटत होता. एकदा मी धाडस करुन त्या बुवांना नम्रपणे माझी शंका बोलून दाखवली. बुवांनी माझ्याकडे करुण नजरेने पाहीले आणि म्हणाले

“आजकाल हे ऐकते कोण ?”

“मी आहे ना !”.

बुवांनी त्यादिवशी आपला नेहमीचा शिरस्ता मोडला, गवसणीत घातलेला तंबोरा बाहेर काढला , एकदा समोरच्या सुवर्ण गणपतीला आणि चक्क मला पण नमस्कार करत त्यांनी  खास माझ्यासाठी म्हणून एक सुरेख अभंग शास्त्रीय अंगाने आळवला. पंच्चाहत्तरीच्या घरातल्या बुवांचा आवाज पूर्ण गेलेलाच होता पण दहा-पंधरा मिनिटें ते जे काही गायले त्याने माझे कान कमालीचे तृप्त झाले. हे भजन नंतर घरी गेल्यानंतरच नव्हे पुढे एक-दोन दिवस माझ्या कानात सतत गुंजत राहीले. भारतीय शास्त्रीय संगीताचा हा झालेला पहीला परिसस्पर्श म्हणा ना.

त्याच काळात सांगलीला विश्रामबागेत एक पत्ता हुडकत असताना एका लहानश्या बंगल्यातून गिटारचे सुरेख स्वर कानावर आदळले, हिंदी चित्रपट संगीता मुळे गिटार हे वाद्य नवीन नव्हते. ‘यादों की बारात’ मधले ‘चुरा लिया है ‘ ह्या गाण्यात वाजवलेले अप्रतिम गिटार मनात घर करुन होते. पण मी ऐकले ते गिटारचे स्वर जरा वेगळ्याच अंगाचे होते. एकदम रसरशीत, चैतन्यपूर्ण. काय ताकद होती त्या गिटार मध्ये ! माझे पाय जागीच खिळून राहीले. हा काय प्रकार आहे? गिटार आहे हे नक्की पण सुरांचा हा नेमका कोणता बाज आहे ? मी छडा लावायचा ठरवले आणि सरळ त्या बंगल्याच्या दरवाज्याची बेल वाजवली.

हे असले भोचक उद्योग मी नेहमीच करतो, आजही करतो.  संगीत असो कि ज्योतिष कि अँटीक वस्तू असो की आणखी काही, माझ्या खजिन्यातल्या अनेक दुर्मिळ गोष्टी ह्या असल्या भोचक पणातूनच मला प्राप्त झाल्या आहेत. पुण्याच्या गणेश कला क्रिडा मध्ये रामनाथजी गोयंकाचे विपश्यनेवरचे विचार ऐकताना, शेजारच्या व्यक्तीशी कारण नसताना असाच भोचकपणा केला आणि त्याचे फलस्वरुप …. त्या घटने नंतर अवघ्या तीन महीन्यात, ध्यानी मनी नसताना, कोणतीही तयारी नसताना , मी अचानक अमेरिकेत दाखल झालो आणि पुढे सात वर्ष तिथे तळ ठोकून राहीलो ! , तो किस्सा नंतर कधीतरी!!

हा विश्रामबागेतला भोचकपणा देखिल असाच फलद्रुप झाला ! एका हसतमुख अशा चाळिशीतल्या तरुणाने दार उघडले…

‘बिटल्स’!  हो ते गिटारचे स्वर ‘बिट्ल्स’ चे होते…

“आवडले?”

“म्हणजे काय?”

“अरे वा , गाण्याची आवड दिसते तुम्हाला”

“हो”  

“हेच ते, अहो तुम्हाला नुस्ती आवड नाही तर स्वरांची उत्तम जाण आहे असे दिसते , त्याशिवाय का तुम्ही सरळ माझा दरवाजा ठोठावला !”

“आणखी ऐकवणार ?”

“हे काय विचारणे झाले? बसा, काय ऐकवू”

” पाटी कोरी आहे माझी,  जे ऐकवाल ते ऐकेन , नाही आवडले तर बंद करायला सांगेन”

“ये हुई ना बात… तो सुनिये …”

पुढचे दोन तास मी नुस्ते ऐकत होतो, पाश्चात्य संगीताबद्दल आपल्या मनात जी काही घृणा निर्माण केली गेली आहे ती केव्हाच गळून पडली. आता रक्ताची चटक लागलेल्या रानटी श्वापदा सारख्या माझ्या त्या विश्रामबागेतल्या बंगल्या वर माझ्या नियमित चकरां सुरु झाल्या, मनमुराद बिटल्स ऐकले तेव्हा… बिटल्स ने तेव्हा घातलेले गारुड अद्यापही कमी झाले नाही. काय साला जादू आहे त्यांच्या संगीतात कोण जाणे..मी च कशाला आख्खे जग त्यांनी घातलेल्या मोहिनीतून सुटले नाही. त्या चाळिशीतल्या तरुणाने नुसते बिटल्स नव्हे तर ‘अ‍ॅबा’, ‘पिंक फ्लाइड’, ‘लेड झेपलिन’. ‘रोलींंग  स्टोन’ असा अद्भुत खजिनाच माझ्या समोर रिता केला. ‘ऐक लेका किती ऐकतोस ते”… 

याच काळात पं.शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रत्यक्ष मैफल (लाईव्ह) ऐकायचा योग आला. सांगलीत असे काही ऐकायला मिळणे तसे दुर्मिळच. ही मैफल म्हणजे केवळ स्वर्ग सुखच होते. एखाद्याला दारुची चटक लागावी तशी मला शास्त्रीय संगीताची चटक लागली. हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा उत्तान पणा  उथळ पणा प्रकर्षाने जाणवला. ‘ही कसली छ्चोर गाणी ऐकतो/ गातोस रे’ असे माझे वडील का म्हणाले होते ते आत्ता उमगले!

यथावकाश माझे महाविद्यालयीन शिक्षण संपले आणि नोकरी निमित्त मी पुण्यात दाखल झालो. आता पुण्यासारख्या ठिकाणी राहावयास आल्यामुळे माझा संगीत विषयक प्रवास अधिक वेगाने सुरु झाला. ‘सवाई’ ची वैभशाली मेजवानी तर होतीच पण लक्ष्मी क्रिडा मंदीर, बेडेकर राम मंदिर , ओशो तिर्थ अशा संगीताच्या पाणपोया देखिल सापडल्या , पं. सतीश व्यासांचे सुरेख संतुर असेच बेडेकर राम मंदिराच्या पायरीवर बसून ऐकले आहे,  कोथरुड्च्या मृत्युंजयेश्वर मंदिरात डागर बंधुंच्या पायाशी बसून ध्रुपद ऐकायचा योग आला आणि धन्य झालो ! ओशो तिर्थावर हरीजींची (सोबत झाकीर !) बासरी आकंठ ऐकली आणखी काय पाहीजे ! 

याच काळात कै. पं. अरविंद गजेंद्र्गडकरां कडे मी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत होतो, पंडितजींनी माझ्यावर खूप मेहेनत घेतली पण मुळात गायकी अंग रक्तातच असावे लागते तेच वट्टात माझ्याकडे नाही, वाद्यवादनाचीही (बासरी आणि  कि-बोर्ड) ची साधारण अशीच वाट लागली. वाद्यही काही वश झाले नाही. ‘गानसेन’ बनता आले नाही पण कान उत्तम तयार होऊन ‘कानसेन’ मात्र बनलो. स्वरज्ञान झाले, कान भलताच तयार झाला !

भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास असला , त्यात कमालीची रुची असली तरी, ह्या संगीताने कधी काळजाला हात घातला नाही (हा कदाचित माझा दोष असेल !) पण मनातल्या भावभावनांना भारतीय शास्त्रीय संगीता ने कधी स्पर्शच केला नाही, काही सन्माननीय अपवाद वगळता हे संगीत बर्‍याच वेळा स्वरांच्या कवायती कसरती करत केलेले दळण वाटायला लागले , संवादा पेक्षा विसंवाद्च जास्त टॉचत होता. मनाचा ठाव घेणारे, आपल्या भावभावनांचे प्रतिबिंब असे ते कधीच वाटलेच नाही आणि आजही मला ते तसे वाटत नाही!    दु:ख , वेदना , प्रिती , भक्ती,  कणव, दया, वात्सल्य , हुरहुर असे भावभावनांचे कंगोरे व्यक्त करण्यात ते कोठेतरी कमी पडते आहे असे माझे आजही मत आहे.

स्वरांचे वैभव, ती मिंड, त्या मुरक्या, ती आवर्तने , त्या बिजली ताना , तो कोमल गंधारावरचा ठेहेराव हे सगळे शास्त्रीय अंगाने कितीही ठीक असले तरी,  गांजलेल्या , पिचलेल्या मनांचा आक्रोश काही त्यातून कधी व्यक्त झालेला मला कधी दिसला नाही, प्रेमाची ह्ळूवार आंदोलने, उत्साहाचे / चैतन्याचे उसळणारे कारंजे त्यात कधीच दिसले (ऐकले) नाही.  नैराश्येच्या गर्तेत खोलवर बुडालेले असताना आशेचा एखादा किरण दिसल्यानंतर मनाची होणारी अवस्था हे संगीत व्यक्त करु शकले नाही (निदान माझ्या बाबतीत तरी) , ह्या भारतीय संगीतात असेल काही दैवी इ. पण ते आपल्या पर्यंत पोहोचतच नाही हीच मोठी समस्या आहे. आणि म्हणूनच कदाचित, हे भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात रुजले नाही, तळागाळा पर्यंत पोहोचले नाही. एखादा गिरणी कामगार , दिवसभर राब राब राबून संध्याकाळी घरी येऊन निवांत ‘मारवा’ राग ऐकतोय असे चित्र कधीच पाहायला मिळणार नाही (ही उपमा श्री. अच्च्युत गोडबोले यांच्या सौजन्याने!).

मी मघाशी लिहले तसे काही सन्माननिय अपवाद वगळता बहुतेक  सारे  ‘खाँ , उस्ताद, पंडितजी’  मोठी निराशा करुन गेले , त्यांनी दोन दोन तास सलग गायलेला / वाजवलेला एखादा राग , ऐकूनही शेवटी माझी पाटी कोरीच रहायाला लागली! समोर चालू आहे ते संगीत आहे की तबले वाल्याशी लढाई करत , संगीत शास्त्राच्या व्याकरणाचे पुस्तकाचे वाचन चालले आहे हेच कळत नव्हते.कोणी कितीही काही म्हणा , मला हे भारतीय शास्त्रीय संगीत नेहमीच  रुक्ष  ( stale) , अपारदर्शी (opaque) आणि भावनाशून्य ( expressionless)  वाटत आले आहे.  

काही बड्या गायकांनी  जी भजने किंवा तत्सम भक्तीगीते गायली आहेत ती ऐकली की मी असे का म्हणतो ते लक्षात येईल. ह्या भक्तीगीतांचा/ भजनांचा बाज निराळा असतो, ह्यात परमेश्वराशी  समर्पण व्हायची , एकरुपतेची भावना प्रकर्षाने व्यक्त व्हायला हवी हेच ते पंडीतजी विसरुन जातात, जिथे साधे , सोपे, सौम्य असे काही हवे तिथे शास्त्रीय संगीताची बडेजावी, अवजड झूल बळेबळेच चढवली गेली. आणि सगळ्या भाव-भावनांचे मातेरे करुन टाकले ! एका नुसत्या महान नव्हे तर अतिमहान गायकाने गायलेली संत ज्ञानेश्वरांची ‘राजस सुकुमार’ ही रचना किंवा त्याच गायकाने   ‘सखी मंद झाल्या तारकां’ सारखे हळुवार प्रेमगीत , शास्त्रीय संगीताचा पहाडी आवाज लावून गायल्यामुळे त्या गाण्याचे, त्यातल्या तरल प्रेम भावनेचे काय वाट्टोळे  झाले आहे ते  एकदा ऐका.

‘बिटल्स’ ने माझ्या मनातचा ताबा विश्रामबागेतच घेतला होता, ही भुतें तेव्हा जी मानगुटी वर बसली ती कधी उतरलीच नाहीत ! आणि ती उतरावीत असे कधी वाटलेच नाही !!! या बिटल्स च्या गारुडातून कोण बचावले आहे म्हणा, मग मी तरी कसा अपवाद ठरेन ?

त्याच सुमारास एका ओशो (तेव्हा आचार्य  रजनीश) भक्ताच्या नादाने कोरेगाव पार्कातल्या ओशो आश्रमात चकरा सुरु झाल्या , तिथे काही फिरंग्यांच्या चांगल्या ओळखी झाल्या , त्यांच्या कडे सतत ‘जॅझ’ संगीत  कानावर पडत होते, या जॅझ संगीतात आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात थोडेसे साम्य आहे. हळू हळू भारतीय शास्त्रीय संगीताचे उसने अवसान गळायला सुरवात झाली , ‘नाही पटत ते मला’ ही धारणां अधिकच दृढ होत गेली (पुन्हा , एकदा हे माझे अत्यंत वैयक्तिक मत आहे ! एखाद्याला गणितात गती नसते , इंग्रजीची भिती वाटते तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले असावे!)

‘जॅझ’ संगीतात जरा डुबकी घेतो न घेतो तोच ‘ब्लूज’ नी मनावर अक्षरश: झडपच घातली, काळीज पिळवटून टाकणारी वेदना संगीताच्या माध्यमातून इतकी प्रभावीपणे व्यक्त करता येते यावर माझा विश्वासच बसला नाही! सगळेच अद्भुत आणि अतर्क्य होते… आता माझ्या संगीत विषयक प्रवास ‘जॅझ’ आणि ‘ब्लूज’ या दोन चाकांवर सुरु झाला.

ओशो आश्रमात सतत नविन ऐकायला मिळत होते आणि त्या सार्‍यांची कमालीची धुंदी चढत होती..  ती धंदी तेव्हा जी चढली ती आजही उतरलेली नाही…

क्रमश: मुद्दामच  लिहले नाही…. वेळ मिळेल तसे (का टी आर पी किती मिळतो ते पाहून ?) पुढचे भाग लिहीन म्हणतो….हॅ हॅ हॅ 

शुभं भवतु  


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Prashant

  Dear Suhasji,
  Nice article. I would say that every genre of music has some deficiencies and also every genre has it own era when it flourishes. So a true music lover should not adhere to listening to only a particular genre. I agree to your views on ghazals. I used to wonder I was the only one who had those views. Also agree to your views on ‘Sakhi Manda Jhalya’ sung by the great legendary singer. I don’t know how the music composer could assign this song to him.

  Anyways I hope to see more articles. Don’t worry too much about the TRP. Popular articles are not necessarily the best always.
  Kalave lobh asava,
  Aapla,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद .

   शास्त्रीय संगीत ऐकणे म्हणजे काही तरी खास आहे किंवा ते ऐकणे म्हणजे आपण एकदम ‘हाय क्लास’ सोसायटीचा भाग बनतो किंवा ‘इंटलेक्च्युअल’ वर्गात मोडले जातो असा भ्रामक समज झाल्याने त्यातले ‘ओ की ठो’ कळत नसताना , आवडत नसताना, सोसासोसाने जांभया देत बळजबरीने मैफीलीला उपस्थिती लावणारे अनेक जण मी स्वत: बघितले आहेत. पुण्यात ‘सवाई’ जाणे हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे, एक इव्हेंट बनला आहे, वडे , कणसे आणि कॉफी ढोसत , नव्या गाड्या, नव्या फॅशन्स मिरवायची एक संधी झाली आहे.

   त्यापेक्षा ‘आपल्याला काय सुदीक कळ्ळे नाय बा ‘ किंवा ‘सम्दे डोचक्या वरुन शान ग्येले’ किंवा ‘ह्य साला , बोर झाला साला .. ‘ असे स्पष्ट शब्दात सांगायचे धाडस फार कमी जणांत असते. नाही आवडले तर नाही आवडले इतका सरळ हिषेब असावा.

   गजलचे असेच. मुळात गम, आसू, साकी , वो या पलीकडे त्यांच्या कडे कोणता दुसरा विषयच नाही, विरहा खेरीज दुसरी भावना नाही, उत्साह , आनंद, आशा , भक्ती , श्रद्धा वात्सल्य अशा अनेक भाव भावना आपल्या आयुष्यात असतात हेच त्या गजल वाल्यांना माहीती नसावे. गजल अगदी काटेकोर नियमात लिहावी लागत असल्याने बहुतांश गजल एकाच मीटर मध्ये येतात त्यामुळे गजल ला लावलेल्या चाली ही बर्‍याचशा ठरीव , एक सुरी असतात. कधी मधी, मुड प्रमाणे एखादी गजल ऐकायला हरकत नाही पण फार ग्रेट असे त्यात काहीही नाही.

   बाकी त्या महान नव्हे अतिमहान गायका बद्दल काही उणे बोलणे म्हणजे फाशीच की ! नशिब मी नाशीक मध्ये राहातो, पुण्यात असतो तर ?

   हिंदीत एक मुहावरा आहे ‘ दुनिया का सबसे बडा रोग … क्या केहेंगे लोग..’ इथेही तेच आहे, लोक काय म्हणतील , त्या अतिमहान गायकावर टीका करायची आपली लायकी आहे का? ही असली नसती ओझी घेऊन आपण आपली फसवणूक करत असतो, ही फरफट थांबवणे आपल्याच हातात आहे, फक्त निर्धराने ठाम पणे आपले मत मांडून आपल्याला जे हवे तेच करायची हिंमत दाखावावी लागते!

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.