‘जॅक’ हा लंडन – युके मधला स्ट्रक्चरल डिझाईन इंजिनियर,
इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा आणि माझा परिचय झाला , दोन कन्सलटेशन्स पण झाली. ऑगष्ट २०१७ च्या पहील्या आठवड्यात त्याने संपर्क साधला होता नोकरीच्या संदर्भात, त्या वेळा जॅक बेरोजगार होता आणि त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीच्या मुलाखती साठी बोलावणे आले होते, त्या मुलाखतीत यश मिळेल का? म्हणजेच ही नोकरी मिळेल का? असा त्याचा प्रश्न होता , तेव्हा मी त्याला सुचवले होते की जेव्हा त्याचा इंटरव्हू संपता क्षणीच ती वेळ नोंद करुन मला कळव किंवा शक्य असेल तर तेव्हाच मला फोन कर. त्याप्रमाणे जॅक ने मला इंटरव्हू होता क्षणीच मला फोन करून कळवले.
या अशा वेळेच्या चार्ट ला ईव्हेंट चार्ट म्हणतात म्हणजे एखादी घटना घडता क्षणीच मांडला गेलेला चार्ट , असे चार्ट अनेक अंगाने माहितीपूर्ण असतात , खास करून जर दोन घटनांत काही कनेक्शन असते तेव्हा. इथे जॅक चा इंटरव्हू ही एक घटना आणि त्यावर अवलंबून असलेली नोकरी मिळण्याची घटना असा संबंध होता.
जॅक ने फोन केला त्या वेळेचा एक इव्हेंट चार्ट (प्रश्न कुंडली) मांडून मी जॅक चा प्रश्न सोडवला. सायन पद्धतीच्या प्रश्नकुंडली चे पाश्चात्त्य होरारी तंत्राने अॅनॅलायसीस करायचे आहे. कसे ते आता आपण पाहू.
प्रश्नकुंडली साठीचा तपशील:
जातक: पुरुष
दिनांक: 14 ऑगष्ट 2017
वेळ: 18:15:22
स्थळ: गंगापूर रोड, नाशिक
या पद्धतीच्या अॅनॅलायसीस मध्ये काही प्रारंभिक तपास करावा लागतो त्यात जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , कसा आहे, शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि विषयाचे (वस्तूचे) प्रतिनिधी ठरवावे लागतात.
चला तर मग, आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करू या.
जन्मलग्न:
जन्मलग्न ०९ कुंभ ०३ असे आहे त्यामुळे ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ हे दोन्ही फॅक्टर्स निकालात निघाले.
(ज्यांना या ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )
चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स:
चंद्र वृषभेत १५:०५ अंशावर आहे, वृषभेत असे पर्यंत हा चंद्र शुक्र, मंगळ, रवी, प्लुटो, शनी आदी ग्रहांशी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही, काळजी नको!
(ज्यांना चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )
शनी:
शनी लाभात आहे, म्हणजे तो लग्नात नाही, सप्तमात नाही त्यामुळे ही पण काळजी मिटली.
(ज्यांना सप्तमातल्या शनी बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )
सर्व प्रथम या केस मध्ये सक्रिय असलेल्या / असू शकणार्या सर्व पात्रांची – अॅक्टर्स यादी बनवूया.
अशी कोण कोण पात्रें – अॅक्टर्स आहेत?
- जॅक (प्रश्नकर्ता)
- नोकरी
- स्थलांतर ( नोकरी मिळाल्यास जॅकचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे )
- जॅकची मुलाखत घेणारी व्यक्ती ( ही फारशी महत्त्वाची नाही , पण असू दे)
चला आता ही पात्रें आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह कोण आहेत ते तपासूया.
जॅक:
प्रश्नकर्ता लग्न भावा (१) वरून बघतात, या चार्ट मध्ये कुंभ लग्न आहे म्हणजे कुंभेचा स्वामी ‘शनी’ प्रश्नकर्त्याचे म्हणजेच जॅकचे प्रतिनिधित्व करणार, लग्नस्थानात ‘नेपच्युन’ आहे म्हणजे शनी बरोबर नेपच्युन ही जातकाचा सह-प्रतिनिधी आहे आणि ‘चंद्र’ हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतो.
शनी, नेपच्युन आणि चंद्र हे सर्व जातकाचे (जॅक) चे प्रतिनिधित्व करतील.
नोकरी:
नोकरी – व्यवसाय नेहमीच दशम (१०) स्थानावरुन पाहतात. दशमेश आणि दशमातले ग्रह एकत्रित रित्या नोकरीचे प्रतिनिधित्व करतील.
दशम स्थानाची सुरवात २० वृश्चिक ४२ वर आहे , म्हणजे मंगळ दशमेश म्हणून नोकरीचे प्रतिनिधित्व करेल. दशमात कोणताही ग्रह नाही. म्हणजे दशमेश मंगळ एकटा नोकरीचे प्रतिनिधित्व करणार.
स्थलांतर:
जॅक ला नोकरी मिळाली तर त्याची नेमणूक एकतर जातक रहात आहे त्या देशात किंवा परदेशात होण्याची शक्यता आहे. परदेश / स्थलांतर हे नवम (९) भावा वरून पाहतात. नवम भावावर शुक्राची तूळ रास आहे , नवम भावात कोणताही ग्रह नाही म्हणजे एकटा शुक्र स्थलांतर / परदेश गमना चे प्रतिनिधित्व करेल.
मुलाखत घेणारी व्यक्ती:
कोणतीही ‘परकी व्यक्ती’ सप्तम भावा (७) वरून बघतात. सप्तमेशा बरोबरच सप्तमातले ग्रह पण ‘परक्या व्यक्ती’ चे प्रतिनिधित्व करतात. सप्तम भाव ०९ सिंह वर चालू होतो, म्हणजे सप्तमेश रवी आहे, मंगळ आणि बुध सप्तमात आहेत. रवी, मंगळ आणि बुध हे तिघेही ‘परक्या व्यक्ती’ चे म्हणजेच मुलाखत घेणार्याचे प्रतिनिधित्व करणार. राहू पण सप्तमस्थानाच आहे पण पाश्चात्त्य होरारीत राहू ला कोणाचे प्रतिनिधित्व देत नाहीत त्यामुळे राहू चा विचार करायला नको.
इथे मंगळ हा एकाच वेळी नोकरीचे आणि मुलाखत घेणार्याचे असे प्रतिनिधित्व करत आहे , म्हणून आपण मंगळाला फक्त नोकरीचे प्रतिनिधित्व देऊ , रवी आणि बुध हे दोघेच मुलाखत घेणार्याचे प्रतिनिधी असतील.
प्रमुख पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे अभिनेते निश्चित झाले!
मुलाखत घेणार्याचा प्रतिनिधी रवी ( २१ सिंह ५५ ) आणि जातकाचा प्रतिनिधी शनी ( २१ धनू १६) नुकतेच नव-पंचमातून बाहेर पडले आहेत , जातक आणि मुलाखत घेणारा यांचे संभाषण अगदी आत्ताच झाले आहे याचा हा ज्योतिषशास्त्रीय पुरावाच आहे.
आता जातकाला नोकरी मिळणार असेल तर नोकरीचा प्रतिनिधी (मंगळ) आणि जातक (शनी /चंद्र / नेपच्यून) यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा.
चंद्र जो प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधी आहे आणि मंगळ जो नोकरीचा प्रतिनिधी या दोघांत अवघ्या १ अंशात केंद्र योग होणार आहे. चंद्र १५ वृषभ ०५ आणि मंगळ १६ सिंह ०३.
शनी प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधी आणि मंगळ नोकरीचा प्रतिनिधी या दोघांत ६ अंशात केंद्र योग होणार आहे. शनी २१ धनू १६ , मंगळ १६ सिंह ०३.
या दोन टेस्टीमोनी आपल्याला हे सुचवतात की ही नोकरी जातकाला मिळणार आहे.
चंद्र – मंगळ योग १ अंशात होणार आहे म्हणजे जातकाची निवड अगदी नजिकच्या काळात होईल पण शनी – मंगळ योग पूर्ण व्हायला ६ अंश लागणार असल्याने जातक काहीसा विलंबाने या नोकरीवर रूजू होईल. याला आणखी एक कारण असू शकेल ते म्हणजे जातकाचा दुसरा प्रतिनिधी नेपच्यून आणि इंटरव्हू घेणार्या व्यक्तीचा दुसरा प्रतिनिधी बुध यांच्यात २ अंशात प्रतियोग होत आहे. याचा अर्थ काहीसा गोंधळ, संभ्रम.
जातकाच्या प्रश्नाचा दुसरा भाग होता नेमणूक लंडन मध्ये का परदेशात (फ्रान्स) मध्ये. जर जातकाची नेमणूक फ्रान्स मध्ये होणार असेल तर ते जातका साठी स्थलांतर ठरणार आहे , शुक्र हा स्थलांतराचा प्रतिनिधी आहे ( नवम स्थान) जातकाचा प्रतिनिधी चंद्र १५ वृषभ ०५ आणि शुक्र १६ कर्क १२ यांच्यात १ अंशात लाभयोग होत आहे म्हणजेच जातकाची नेमणूक फ्रान्स मध्ये होईल. इथे चंद्र शुक्राच्या राशीत आणि शुक्र चंद्राच्या राशीत असल्याने अन्योन्य योग होत आहे हे दखल घेण्या जोगे आहे.
याला आणखी एक टेस्टिमोनी आहे ती म्हणजे प्लुटो जो व्ययस्थानात (१२) १७ मकर १९ वर आहे त्याचा आणि जातकाचा प्रतिनिधी चंद्र १५ वृषभ ०५ , यांचा २ अंशात नव पंचम योग होत आहे. व्ययस्थान हे परदेश दाखवते.
जातकाची नेमणूक परदेशात होणार असल्याने जातकाला तयारी करायला वेळ लागणे स्वाभाविक आहे आणि म्हणूनच जातक काहीसा उशीराने नोकरीत रूजू होईल असा कयास आपण केला होता, तो बरोबर ठरतो .
जातकाचा पैसा द्वितीय स्थानावरून पाहतात, द्वितीय स्थानावर मीन रास आहे आणि मीनेचा स्वामी गुरु अष्टमात १८ तूळ ५९ वर आहे , जातक सध्या बेरोजगार आहे याचेच ते द्योतक आहे पण गुरु अगदी लौकर म्हणजे अवघ्या २ अंशात नवम स्थानात (२० तूळ ५१) प्रवेश करणार असल्याने हे आर्थिक दैन्य लौकरच दूर होणार आहे , त्याच दरम्यान स्थलांतराचा प्रतिनिधी शुक्र आणि जातकाच्या पैशाचा प्रतिनिधी गुरु केंद्र योग करणार आहेत म्हणजे स्थलांतराच्या माध्यमातून आर्थिक उन्नत्ती दिसत आहे. लाभ स्थान (११) हे नोकरी व्यवसायातून मिळणार्या उत्पन्ना साठी पाहिले जाते या लाभस्थानावर गुरु ची धनू रास आहे आणि गुरु हाच जातकाच्या पैशाच्या द्वितीय स्थानाचा प्रतिनिधी असल्याने ह्या नव्या नोकरीतून जातकाला चांगला लाभ होणार आहे हे दिसते. याला आणखी एक टेस्टीमोनी आहे ती म्हणजे जातकाचा पार्ट ऑफ फॉरच्यून , ०२ वृश्चिक १४, हा नवम (९) स्थानातच आहे म्हणजे स्थलांतरातून लाभ असा संकेत आहे.
या सार्यावरुन आपले निष्कर्ष काय असतील?
इथे आणखी एक ग्रहयोग दखल घेण्या जोगा आहे तो म्हणजे नोकरीचा प्रतिनिधी मंगळ जातकाच्या पैशाचा प्रतिनिधीशी लाभ योग करत आहे कदाचित हा योग जातकाला जॉईनिंग बोनस मिळेल असे दर्शवत आहे. परदेशात चांगल्या पोष्टवर नेमणूक करताना असा जॉईनिंग बोनस नेहमीच दिला जातो.
- ही मुलाखत यशस्वी ठरून जातकाला नोकरी मिळेल.
- जातकाची नेमणूक फ्रान्स किंवा तत्सम ठिकाणी होऊन जातकाला स्थलांतर / देशांतर करावे लागेल.
- ही नोकरी जातकाला आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरेल. जॉईनिंग बोनस मिळायची पण शक्यता आहे.
- नोकरीचा, नोकरी संदर्भातल्या कराराचा (३ स्थान) , मुलाखत घेणार्याचा प्रतिनिधी एकटा मंगळ असल्याने जातकाला एखाद्या कडक शिस्तीच्या अधिकार्याच्या हाताखाली काम करावे लागेल.
- स्थलांतराच्या प्रक्रियेत जातकाला काही खर्च करावा लागेल.
आता आपण या प्रश्नाचे उत्तर नक्षत्र पद्धतीने काय मिळते ते पाहू
जातकाने फोन वर प्रश्न विचारता क्षणीच प्रश्नकुंडली मांडली आहे,
प्रश्नकुंडली साठीचा तपशील:
जातक: पुरुष
दिनांक: 14 ऑगष्ट 2017
वेळ: 18:15:22
स्थळ: गंगापूर रोड, नाशिक
तेव्हा या कुंडलीतला चंद्र, जो मनाचा कारक असतो, तो काय म्हणतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. अशा वेळेचा चंद्र जातकाची मन:स्थिती बर्या पैकी अचूक दाखवतो असा अनुभव आहे.
चंद्र: मेषेत तृतीय (३) स्थानात , चंद्राची कर्क रास सप्तम (७) स्थानावर, चंद्र शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र षष्ठम (६) स्थानात, शुक्राच्या राशी पंचम (५) आणि दशम (१०) स्थानांवर आहेत.
चंद्र: ६ / ३ / ५ , १० / ७
१० आणि ६ ही नोकरीची प्रमुख स्थाने , ३ चे मुलाखतीचे स्थान, ७ वरून तिर्हाईत व्यक्ती म्हणजेच मुलाखत घेणारी व्यक्ती यांची उपस्थिती प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात नेमके काय विचार होते ते सांगत आहे म्हणजेच जातकाने प्रश्न तळमळीने विचारला आहे हे लक्षात येते. पत्रिका ‘रॅडीकल’ आहे.
सर्वप्रथम तपासू या जातकाच्या इंटरव्हू चा नतिजा , म्हणजे इंटरव्हू यशस्वी ठरेल का ?
इंटरव्हू हा तृतीय (३) स्थाना वरून पाहतात , जर या इंटरव्हूत यश मिळणार असेल तर या लाभा (११) चा सब तृतीय (३) स्थानाचा कार्येय असायला हवा.
लाभाचा (११) सब ‘चंद्र’ आहे , या चंद्राचे कार्येशत्व आपण पाहिलेच आहे, चंद्र: ६ / ३ / ५ , १० / ७
तृतीय स्थानात एकटा चंद्र आहे आणि चंद्राच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नाही म्हणून भावातला ग्रह या नात्याने चंद्र तृतीय स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश होणार आहे.
म्हणजे जातक या इंटरव्हू मध्ये यशस्वी होणार आहे.
आता इंटरव्हूत यशस्वी होणे आणि नोकरी लागणे या दोन स्वतंत्र घटना आहेत. काही वेळा नोकरीत निवड होऊनही पगार , पद, कामाचे ठिकाण अशा अनेक अडचणी मुळे मिळालेली नोकरी नाकारली पण जाऊ शकते.
इथे तसे काही होण्याची शक्यता आहे का ते तपासू.
नोकरी – व्यवसाया बाबतीतल्या सर्व प्रश्नां साठी दशम (१०) हे स्थान महत्त्वाचे (प्रिन्सिपल) असल्याने त्याचा सब कोण आहे , कसा आहे हे पाहणे अत्यावश्यक असते.
दशमाचा (१०) चा सब आहे ‘शुक्र’
शुक्र मार्गी आहे , शुक्र गुरु च्या नक्षत्रात आहे आणि गुरु मार्गी आहे.
या शुक्राचे चे कार्शेयत्व असे आहे:
शुक्र षष्ठम (६) स्थानात, शुक्राच्या राशी पंचम (५) आणि दशम (१०) स्थानांवर , शुक्र गुरु च्या नक्षत्रात , गुरु अष्टम (८) स्थानात , गुरु च्या राशीं व्यय (१२) आणि तृतीय (३) स्थानांवर.
शुक्र : ८ / ६ / ३, १२ / ५, १०
दशमाचा सब शुक्र नोकरी मिळण्याचे संकेत ६ व १० च्या माध्यमातून देत आहे तसेच मुलाखतीत यश मिळण्याचे संकेत ३ च्या माध्यमातून देत आहे. जातकाचा उपप्रश्न ‘परदेशात नेमणूक होऊन स्थलांतर होईल का ?’ असाही आहे त्या अंगाने शुक्राचे १२ व ३ चे कार्येशत्व नोंद घेण्यासारखे आहे.
शुक्र हा नोकरी देण्यास अनुकूल असल्याने आपल्याला पुढे जायला हरकत नाही.
आता आपल्याला दोन प्रश्नांचा विचार करायचा आहे :
१) नोकरी मिळेल का?
२) नोकरी निमित्ताने स्थलांतर करावे लागेल का?
जातकाला नोकरी मिळालीच तर त्याला एकतर लंडन मध्ये (म्हणजे जातका सध्या रहात असलेल्या गावातच) किंवा दुसर्या ठिकाणी म्हणजे फ्रान्स मध्ये स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. जातक ब्रिटिश नागरीक आहे आणि इंग्लंड आणि फ्रान्स हे देश अगदी जवळ आणि युरोपियन युनियन चे सदस्य असल्याने इग्लंड हून फ्रान्स ला जाणे म्हणजे परदेश प्रवास असे मानले जात नाही , हे फार तर लांब अंतरावरचे स्थलांतर मानले जाईल (आपल्याकडे नाही का नेपाळ ला गेलो तर परदेशगमन झाले असे मानत नाहीत तसेच हे )
प्रथम नोकरी मिळेल का नाही याचा फैसला करु:
नोकरीसाठी दशम (१०) भाव महत्त्वाचा, त्या सोबत षष्ठम (६) भाव , द्वितीय (२) आणि इच्छापूर्तीचे लाभ स्थान (११) पण विचारात घ्यावे लागते.
दशम (१०) भावाचे कार्येश असे आहेत:
दशमात एकही ग्रह नाही, दशमेश शुक्र आहे आणि शुक्राच्या नक्षत्रात चंद्र, बुध आहेत.
दशम भाव (१०): — / — / चंद्र , बुध / शुक्र
षष्ठम (६) भावाचे कार्येश असे आहेत:
षष्ठम स्थानात शुक्र आहे, शुक्राच्या नक्षत्रात चंद्र, बुध आहेत, षष्ठेश बुध आहे , बुधाच्या नक्षत्रात मंगळ, रवी, शनी आहेत.
षष्ठम भाव (६): चंद्र , बुध / शुक्र / मंगळ , रवी, शनी / बुध
द्वितिय (२) भावाचे कार्येश असे आहेत:
द्वितिय स्थानात कोणताही ग्रह नाही, द्वितियेश शनी आहे , शनीच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही
द्वितिय भाव (२): — / —/ —-/ शनी
ही एक असाधारण परिस्थीती आहे भावेश हा एकमेव कार्येश आहे , असे असते तेव्हा भावेश ज्या ग्रहांचा उप नक्षत्र स्वामी असतो , म्हणजे ज्या ग्रहांचा सब शनी आहे ते सर्व ग्रह द्वितिय भावाचे ‘अ’ दर्जाचे कार्येश होतील. इथे रवी आणि शुक्र यांचा सब शनी आहे म्हणून हे दोघे द्वितिय स्थानाचे ‘अ’ दर्जाचे कार्येश होतील.
द्वितिय भाव (२): — / —/ रवी , शुक्र / शनी
लाभ (११) स्थानाचे कार्येश असे आहेत:
लाभ स्थानात शनी आहे , शनीच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नाही, लाभेश मंगळ आहे, मंगळाच्या नक्षत्रात गुरु आणि केतु आहेत.
लाभ स्थान (११): — / शनी / गुरु , केतू / मंगळ
या माहीतीच्या आधारे आपण दशा – अंतर्द्शा आणि विदशा तपासू
प्रश्न विचारते वेळी शुक्राची महादशा , गुरु ची अंतर्दशा आणि शुक्राची विदशा चालू होती.
शुक्राची महादशा डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे .
शुक्राचे कार्येशत्व आपण पाहिलेच आहे.
शुक्र : ८ / ६ / ३, १२ / ५, १०
महादशा स्वामी शुक्राचा सब शनी आहे.
शनी लाभ (११) स्थानात, शनीच्या राशी लग्न (१) आणि धन (२) स्थानांवर, शनी बुधाच्या नक्षत्रात, बुध सप्तम (७) स्थानात, बुधाच्या राशीं षष्ठम (६) आणि नवम (९) स्थानांवर.
शनी: ७ / ११ / ६ , ९ / १ , २
म्हणजे महादशा स्वामी शुक्राचा सब शनी पण ११ , ६, २ च्या माध्यमातून नोकरी साठी अनुकूल आहे.
शुक्राच्या महादशेत चालू असलेली गुरु अंतर्दशा ऑक्टोबर २०१८ पर्यंत चालणार आहे . प्रश्न कुंडलीचा एकंदर आवाका सहा महीने इतकाच (काही अपवादात्मक परिस्थितीत एक वर्ष) असल्याने जातकाच्या प्रश्ना बाबतीत जे काही घडायचे ते सारे या गुरु अंतर्दशेतच घडायला हवे , या पलीकडे जाण्याची आवश्यकता नाही.
अंतर्दशा स्वामी गुरु चे कार्येशत्व असे असेल:
गुरु अष्टमात (८) , गुरुच्या राशी व्यय (१२) आणि तृतीय (३) स्थानी, गुरु मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ सप्तम (७) स्थानात , मंगळाच्या राशीं चतुर्थ (४) आणि लाभ (११) स्थानांवर.
गुरु : ७ / ८ / ४ , ११ / ३ , १२
अंतर्दशा स्वामी गुरु राहू च्या सब मध्ये ,
राहू सप्तम (७) स्थानात , राहूला राशी नाही, राहू केतू च्या नक्षत्रात , केतू लग्नात (१) स्थानात , केतूला राशी स्वामीत्व नाही.
राहू बुधाच्या युतीत त्यामुळे बुधाचे कार्येशत्व पण राहू ला मिळणार आहे.
बुध सप्तम (७) स्थानात , बुधाच्या राशी षष्ठम (६) आणि नवम (९) स्थानी, बुध शुक्राच्या नक्षत्रात , शुक्र षठम (६) स्थानात , शुक्राच्या राशीं पंचम (५) आणि दशम (१०) स्थानांवर.
बुध: ६ / ७ / ५ , १० / ६ , ९
राहू शनीच्या राशीत , शनी: ७ / ११ / ६ , ९ / १ , २
राहू: १ / ७ /- / –
युती बुध: ६ / ७ / ५ , १० / ६ , ९
राशीस्वामी शनी: ७ / ११ / ६ , ९ / १ , २
म्हणजे अंतर्दशा स्वामी गुरु चा सब राहू देखील नोकरी (२, ६, १०) , लांबचा प्रवास (९) यांना अनुकूल आहे.
गुरु अंतर्दशेत शुक्राची विदशा चालू आहे आणि ती ३० नोव्हेंबर २०१७ म्हणजे प्रश्न विचारल्या पासून साडे तीन महीने चालणार आहे. हा कालावधी जातकाच्या नोकरीचा फैसला होण्या साठी पुरेसा आहे. अगदीच आवश्यकता भासल्यास आपण पुढची रवी ची विदशा तपासू.
विदशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच.
शुक्र : ८ / ६ / ३, १२ / ५, १०
विदशा स्वामी शुक्र चा सब शनी आहे, शनी: ७ / ११ / ६ , ९ / १ , २
म्हणजे विदशा स्वामी शुक्र आणि त्याचा सब नोकरीस अनुकूल आहे इतकेच नव्हे तर ९, १२ च्या माध्यमातून परदेशात स्थलांतराचे संकेत देत आहेत.
दशा स्वामी शुक्र षष्ठम (६) चा ‘ब’ दर्जाचा कार्येश आहे व द्वितिय (२) स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे व दशम (१०) स्थानाचा ‘ड’ दर्जाचा कार्येश आहे.
शुक्र चंद्राच्या अंशात्मक लाभ योगात आहे ही बाब विचारात घेतली तर चंद्राच्या माध्यमातून शुक्र दशम (१०) स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश होत आहे.
अंतर्दशा स्वामी गुरु लाभ (११) स्थानाचा ‘ब’ दर्जाचा कार्येश आहे
म्हणजे महादशा आणि अंतर्दशा स्वामी मिळून नोकरी साठीच्या सर्व स्थानांचे चांगल्या दर्जाचे कार्येश आहेत.
म्हणून शुक्राच्या विदशेत जातकाला नोकरी मिळेल असे अनुमान आपण काढू शकतो.
आता दुसरा प्रश्न आहे स्थलांतराचा / परदेश गमनाचा (जर तसे मानले तर), या साठी आपल्याला विचार करायचा तो ३ (कुटुंबियां पासून दूर ) , ९ (लांबचा प्रवास) , १२ (अनोळखी प्रदेश) या स्थानांचा.
तृतीय (३) भावाचे कार्येश असे आहेत:
तृतीय स्थानात चंद्र आहे, चंद्राच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नाही, तृतियेश गुरु आहे , गुरुच्या नक्षत्रात एकटा शुक्र आहे.
तृतीय (३) भाव: — / चंद्र / शुक्र / गुरु
नवम (९) भावाचे कार्येश असे आहेत:
नवम स्थानात एकही ग्रह नाही, भाग्येश बुध आहे , बुधाच्या नक्षत्रात मंगळ, रवी, शनी आहेत.
नवम भाव (९): —- / —- / मंगळ , रवी, शनी / बुध
व्यय (१२) भावाचे कार्येश असे आहेत:
व्यय स्थानात स्थानात एकही ग्रह नाही, व्ययेश गुरु आहे , गुरुच्या नक्षत्रात एकटा शुक्र आहे.
व्यय स्थान (१२): —- / —- / शुक्र / गुरु
महादशा स्वामी शुक्र आणि अंतर्दशा स्वामी गुरु दोघेही तृतीय (३) आणि वय (१२) स्थानाचे दर्जेदार कार्येश आहेत म्हणजे शुक्र महादशा, गुरु अंतर्दशा आणि शुक्र विदशेत जातकाचे स्थलांतर होईल आणि ते नवम स्थानाच्या एखाद्या बळकट ग्रहाच्या सुक्ष्मदशेत ( मंगळ, शनी , रवी) .
जातकाची नेमणूक परदेशातल्या ब्रँच मध्ये होणार असे अनुमान पण आपण काढू शकतो.
पण त्या आधी आपल्याला ट्रांसिट्स तपासले पाहिजेत. योग्य ती ट्रान्सिट्स या साठी उअपलब्ध असायला हवीत अन्यथा महदशा- अंतर्दशा- विदशांनी दिलेला कौल वाया जाईल, घटना घडणार नाही.
जातकाला नोकरी मिळण्या बाबतची आपली ‘महादशा – अंतर्दशा – विदशा ‘ साखळी अशी असेल: शुक्र – गुरु – शुक्र .
प्रश्न कुंडली आहे , घटना काही महिन्यांत घडणार आहे त्यामुळे रवी चे भ्रमण तपासावे लागेल.
आपल्याला एकतर
शुक्राची रास – गुरु चे नक्षत्र
किंवा
गुरु ची रास – शुक्राचे नक्षत्र
असे रवीचे भ्रमण पाहावयाचे आहे.
आपला अपेक्षीत कालावधी (शुक्राची विदशा) १४ ऑगष्ट २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा आहे.
प्रश्न विचारला आहे १४ ऑगष्ट रोजी तेव्हा रवी कर्केत होता. १७ ऑगष्ट रोजी रवी सिंहेत दाखल होईल, रवीची सिंह रास आपल्याला चालणार नाही, त्या नंतर रवी १७ सप्टेंबर २०१७ रोजी कन्येत दाखल होईल. रवीचे कन्येतले भ्रमण ही आपल्याला उपयोगाचे नाही , कारण बुध आपल्या साखळीत नाही.
१८ ऑक्टोबर २०१७ रोजी रवी शुक्राच्या तूळेत प्रवेश करेल , तूळेत गुरु चे नक्षत्र आहे म्हणजे आपली शुक्र-गुरु ही साखळी जुळते हा कालावधी असेल ७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१७
आपली अनुमानें अशी आहेत:
७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जातक नोकरीच्या ठिकाणी कामावर रुजू होईल.
जातकाची नेमणूक परदेशातल्या ब्रँच ऑफिस मध्ये होईल.
पडताळा:
सप्टेंबर २०१७ च्या दुसर्या आठवड्यात जातकाला नोकरीचे नेमणूक पत्र मिळाले. ( शुक्र – गुरु – शुक्र – गुरु )
जातकाची नेमणूक कंपनीच्या फ्रांस मधल्या ब्रँच ऑफिस मध्ये झाली
ऑक्टोबर अखेरीस जातक फ्रान्स मध्ये दाखला झाला ( शुक्र – गुरु – शुक्र – शनी )
आणि नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात नोकरीत रुजू झाला. (शुक्र – गुरु – शुक्र – बुध )
जातकाच्या बॉस बद्दल (मंगळ) आपण अंदाज केला होता त्याचे काय झाले ते मात्र कळले नाही.
शुने भं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
apratim analysis
धन्यवाद श्री आनंदजी
सुहास गोखले
bhari
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले