हे लिखाण संपुर्णत: काल्पनिक आहे , या लेखातल्या व्यक्ती आणि घटनांचा प्रत्यक्षातल्या व्यक्ती आणि घटनांशी कोणताही संबंध नाही, असा कोणता संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

या लेखात मांडलेले विचार माझे  स्वत:चे वैयक्तिक  आहेत . हे विचार आपल्या समोर मांडताना कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही किवा कोणाच्या कामाला / कार्यपद्धतीला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही किंवा कोणाला शहाणपण शिकवण्याच्या हेतुने लिहलेला नाही.

काहीश्या विनोदी अंगाने लिहलेला हा लेख तितक्याच सहजपणे घ्यावा ही विनंती.

पोष्ट मध्ये वापरलेले चित्र ‘इंटरनेट’ वरुन साभार  


हुडहुडी भरेल असा फुल्ल ए.सी. सोडलेल्या आलिशान दालनात , बाबा जाजमावर पद्मासन घालून बसले होते. आता बाबाचे ऑफीस ते , तिथे खुर्च्या नाहीत , टेबले नाहीत , बाबा जाजमावर आणि अभ्यागत (व्हिजिटर ) पण जाजमावरच !

बाबा समोर पस्तीशी –चाळिशीतच ढेरपोट झालेले , चमकणारी टक्कलं मिरवणारे बाबांचे तीन चार व्यवस्थापक , ‘बाबा या वयात ही इतका फीट कसा?’  याचे अजुनही आश्चर्य व्यक्त करत,  कसबसे पद्मासनात बसण्याची केवीलवाणी कसरत करत होते. पद्मासनात बसुन बसुन या लोकांच्या बुडाला रग लागून , बुडें बधीर झालीं तरी समोर बाबांचा चालू असलेला ‘आलोम-विलोम’ काही संपत नव्हता.

“माझे बुड इतके बधीर झालेय की मी असाच आणखी काही वेळ पद्मासनात बसलो तर  मला बुड नामक अवयव आहे हेच मी  विसरुन जाईन”

एक व्यवस्थापक दुसर्‍याच्या कानात कुजबुजला.. दुसरा ही ‘खरे आहे” असे काहीतरी पुटपुटत कसेनुसे हसला..

शेवटी एकदाचे बाबाचे आलोम विलोम संपले. बाबाने व्यवस्थापकां कडे भेदक नजरेने पाहात दुधाचा टोलेजंग पेला घटाघटा रिकाम केला, केशरी उपरण्याने आपली दाढी पुसत, आपला आधीच बारीक असलेला एक डोळा आणखी बारीक बाबाने विचारले..

“बोलो, आज किस विषय पर बात होगी?”

बाबा आणि त्याचे हे व्यवस्थापक तिकडचे म्हणजे उत्तर भारतातले असल्याने त्यांचा हरयानवी ढंगातील हिंदीत झालेला हा मधुर वार्तालाप आपल्या सारख्यांना समजायला तसा अवघडच म्हणून त्याचे माय – मराठीतले सुगम, सरल भाषांतर …

 

“बाबा, नासिक, महाराष्ट्र येथुन एक जण लिहतात, बाजारात ‘खतंजली डायपर’ उपलब्ध नाहीत त्यामुळे नाईलाजाने विदेसी कंपन्यांचे डायपर विकत घ्यावे लागतात…”

“काय? अजून पर्यंत ‘खतंजली’ डायपर  (बाबाच्या भाषेत ‘डैपर” !) बाजारात नाहीत?

“हो, बाबा, कसे काय कोण जाणे हे प्रॉडक्ट आपल्या नजरेतुन सुटले खरे”

“अरे काय कामं करता तुम्ही, इकडे तिकडे काही बघता की नाही, का सगळे मीच करायचे? “

“चूक झाली बाबा, पण आम्ही लगेच कामाला लागतो, चार – पाच डायपर बनवणार्‍या कंपन्यांशी बोलतो”

“हरकत नाही, लागा कामाला, पुढच्या आठवड्यात ‘खतंजली डायपर्स’ बाजारात आलेच पाहीजेत”

“हो, बाबा, अगदी तसेच होईल”

…..

…..

पुढच्या आठवड्यातल्या मिटिंग मध्ये..

सीन तोच , बुडाला रग लागलेले , बुडं बधीर झालेले व्यवस्थापक आणि उपरण्याने दाढी पुसणारा , आधीच बारीक  असलेला डोळा आणखी बारीक करत , पद्मासनावर बसलेला बाबा, ए.सी. नेहमी प्रमाणेच फुल्ल सोडलेला..

…..

…..

“बाबा”

“काय झाले”
“बाबा, मागच्या मिटींग मध्ये आपण खतंजली डायपर बद्दल बोललो होतो…”

“हो, त्याचे काय झाले? आले का आपले ‘खतंजली डायपर्स’ बाजारात? कसा काय रिस्पॉन्स आहे?, माझी ‘डायपर’ लावुन ध्यानाला बसलेली पोज घेऊन एक अ‍ॅड टाकून देऊ सर्व  टी.व्ही. चॅनेलस वर. या विदेसी कंपन्यांना एक आणखी एक दणका, हॅ हॅ हॅ”

“नाही, बाबा , ते डायपर्स चे काही जमले नाही”

“काय? काम झाले नाही , का?

“बाबा, आम्ही चार – पाच डायपर्स करणार्‍या चांगल्या कंपन्याशी चर्चा केली, पण काम जमले नाही”

“अस्सं, नेमके काय झाले”

“त्याचे काय आहे , त्या सगळ्या कंपन्या आपल्या नियम – अटीं नुसार होलसेल मध्ये डायपर्स सप्लाय करायला तयार नाहीत”

“एक ही नाही”

“नाही, एक ही तयार नाही, आपल्या अटीं मानायला आणि आपल्या ‘परिव्दार’ च्या आश्रमाला तीन कोटी रुपये देणगी द्यायला कोणीच तयार नाही”

“आश्चर्य आहे, ‘खतंजली’ सारख्या ब्रँड ला नाही म्हणतात म्हणजे कमाल आहे!”

“त्याचेच तर आश्चर्य वाटते बाबा, तसे आम्ही बरेच समजावले त्यांना, पण काही उपयोग झाला नाही”

“बघितलेत , मी नेहमी म्हणत असतो तसेच झाले, अरे ही सगळी त्या विदेसी कंपन्यांची साजिस आहे”

“आम्हाला ही तसेच वाटत आहे बाबा”

“अरे नुसते वाटून काय उपयोग, तुम्हाला कामावर कशाला ठेवलेय , जरा हातपाय हलवा”

“बाबा. खूप प्रयत्न केले”

“असे कसे होईल, ह्या उभ्या भारतात फक्त हे दोन – चार लोकच डायपर्स बनवतात? दुसरे असतील ना? ”

“नाही म्हणजे…”
“दिल्लीत बघा, पंजाबात लुधियानात चौकशी करा, मुंबईत उल्हासनगरला चेक केल का? झालेच तर मुंबई ची धारावी , तिथे तपासले का,  बाकी कोठे नसले तरी धारावीत नक्की कोणीतरी डायपर बनवणारा असणार , आपले किती तरी प्रॉडक्ट्स पापड , मसाले, अचार, आलू भुजियाँ तिकडूनच येतात ना? मग? तिथे बघितले का?”

“बाबा, तुम्ही म्हणता तसे आणि तिथे सगळे डायपर वाले तपासले , डायपर बनवणारे बरेच आहेत , त्यांच्या कडून सँपल्स पण आली आहेत , पण एकदम टाकावू , भिकार माल, एक जात सगळे डायपर्स निकृष्ठ दर्जाचे आहेत ”

“कसला दर्जा घेऊन बसलात, किती दिवस काम करत आहात इथे, तुम्हाला कळायला नको? ‘खतंजली ‘ आणि दर्जा यांचा काहीही संबंध नसतो हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते तुमच्या, आलोम विलोप कमी पडतोय”

“पण बाबा, उत्पादनाला काही तरी किमान दर्जा हवा ना?”

“पुन्हा तेच , कसला दर्जा घेऊन बसलात, लोक ‘खतंजली’ नाव वाचून डोळे झाकून माल घेतात. कोणी दर्जा तपासत नाहीत. अरे जिथे रंग घातलेला साखरेचा पाक ‘खतंजली मध’ म्हणून हातोहात खपतो तिथे डायपर चे काय घेऊन बसलात”

“हो बाबा ते पण खरेच आहे” “

“मग वाट कसली बघता, उठा, बुडं हालवा जरा , पुढ्च्या आठवड्यात ‘खतंजली” डायपर बाजारात आला पाहीजे”

“जी बाबा, “

“ठीक आहे, आता आणखी कोणती प्रॉडक्टस उरली आहेत जिथे आपला ‘खतंजली’ ब्रॅन्ड नाही?”

“आम्ही यादी आणली आहे, माचिस, कंडोम, विजेचा बल्ब, वाई फाई राऊटर, परकर, पेन ड्राईव्ह, खंदील, बॅडमिंटन चे फुल, रबरी हातमोजे, डांबर, फुगे, पाय पुसणीं, आयुर्वेदीक गुटखा, चिक्की,  शर्ट ची बटनें, हेअर डाई, वॉशींग मशीन, टॅटू, केसांचे विग, चॉप स्टीक, कॉफी, टोईलेट  पेपर , लहान मुलांच्या चड्ड्या , सिगरेट लाईटर, उंदीर मारायचे औषध, खराटा, झाडू, गांधी टोपी, मफलर, कवळीं, अडकित्ता, पत्रावळीं, नाडी, सायकल ची इनर, पतंगाचा मांजा,  सिमेंट , छत्री – रेनकोट, स्टीलची भांडी, गॉगल्स, जॉगींग शुज, टमरेल, धुणं वाळत घालायची काठी, सल्फुरीक अ‍ॅसीड, भांडी घासायची राख, बांबुच्या चटयां,  सोनखत, ऑईल पेंट, सोन पापडी, खारीक पावडर..  …”

“बघा, अजून किती प्रॉड्क्स बाजारात आणायची आहेत आणि तुम्ही बसुन राहीलात , चला उठा लागा कामाला”

“बाबा ते सर्व ठिक आहे पण…

“आता पण बिण काही नाही, काम करायचे , सुटा आता..”

‘बाबा, काम तर करायचे आहेच पण आता विषय निघालाच आहे म्हणुन आपल्या कानावर घालतो..”

“आता काय नविन?”

“आपल्या ‘खतंजली’ प्रॉडक्ट्स बद्दल खूप तक्रारी आहेत, उपभोक्ता वर्गा कडुन तक्रारींचा महापुर येत आहे आणि सप्लायर्स, फ्रेंचाईझी, व्हेंडर्स सगळेच आरडाओरड करत आहेत”

“व्यवसाय आहे हा, हे असले प्रॉब्लेम्स येतच राहणार..”

“पण बाबा , आपण जरा दमाने घेतले तर?”

“म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?”

“नाही म्हणजे दिसेल त्या प्रत्येक उत्पादनाला ‘खतंजली’ च्या छत्री खाली आणण्या ऐवजी , काही मोजक्या , निवडक उत्पादनांवर फक्त लक्ष केंद्रीत करुन, उत्पादन, दर्जा नियंत्रण , वितरण व्यवस्था, ऑन लाईन पोर्टल,  संशोधन आणि विकास  या पायाभूत सुविधा प्रथम बळकट करुन घेतल्या तर?”

“त्याने काय होणार?”

“बाबा, केवळ आपल्या एकट्याच्या नावावर , लोकप्रियतेवर ‘खतंजली’ ब्रँड उभा आहे पण आपण ’खतंजली’ उत्पादनांचा दर्जा सांभाळला नाही तर हा फुगा फुटायला वेळ लागणार नाही त्यामुळे आम्हाला असे वाटते.. “

“अरे पुन्हा तेच तेच काय बोलून राहीलात रे, कसला दर्जा घेऊन बसलात , लोकांना फक्त ‘खतंजली’ नाव दिसले पाहीजे , दर्जा चे काय घेऊन बसलात, तुम्ही बघताय ना, अवघ्या दोन – चार वर्षात या सार्‍या विदेसी कंपन्यांची कशी छुट्टी करुन टाकली , आगे आगे देखो , होता है क्या”

“बाबा, बरोबर आहे,  ‘खतंजली’ ची सुरवात मुळी ह्या विदेसी कंपन्यांच्या नफेखोरी विरुद्ध, लुटालुटी  विरुद्ध होती. तो उद्देश बर्‍या पैकी सफल पण झाला आहे पण हे यश फार काळ टिकणारे नाही. विदेसी कंपन्यांची उत्पादने महाग असली तरी दर्जेदार आहेत. दर्जाच्या बाबतीत आपण त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही,  आपल्याला नुसता नावापुरता पर्याय देऊन चालणार नाही, आपला पर्याय पण तितकाच तगडा पाहीजे नाहीतर शेतातल्या बुजगावण्या सारखी आपली अवस्था होईल..”

‘अरे बघु रे तो दर्जा का फिर्जा, एकदा ह्या विदेसी कंपन्या संपवल्या की, भरपुर वेळ आहे आपल्याला..”

“बाबा, त्या विदेसी कंपन्या संपतील का नाही कोणास ठाऊक पण ह्या विदेसींना हद्दपार करण्याच्या नादात आपण आपल्याच भारतीय कंपन्यांचा गळा घोटायला निघालो आहोत”

“ते कसे?”

“बाबा आपण त्या नूडल वाल्या कंपनीला जबरदस्त ट्क्कर दिली, त्या डिटर्जंट वाल्या  कंपनी च्या तोंडचे पाणी पळवले. पण त्या विदेसी , लुटारु कंपन्या होता. तेव्हा आपण जे केले ते योग्यच होते. पण आता जेव्हा आपण ‘खतंजली’ पापड , ‘खतंजली’ अचार , ‘खतंजली’ मसाले विकतो तेव्हा आपण कोणां  विदेसी कंपन्यांचे नाही तर आपल्याच देसी बांधवांच्या कंपन्यांचे गळे घोटत आहोत.”

“मग आपण ‘पापड ‘ बनवायचे नाहीत? अरे हा व्यवसाय आहे , इथे स्पर्धा चालणारच ना?”

बाबा, आपण योग साधनेचा , योग प्रचाराचा मार्ग बदलून नव्हे तर चक्क बंद करुन ह्या व्यावसायीक क्षेत्रात उडी मारली, आपला उद्देश खरेच व्यवसाय करुन बक्कळ पैसा मिळवायचा असता तर पापड बनवणे क्षम्य ठरले असते. पैसा आपला हेतु नव्हताच ना बाबा? आपला लढा नफेखोर विदेसी कंपन्यां विरुद्ध होता ना? म्हणजे सुरवात तर त्याच साठी झाली होती ना? तेव्हा आपण फक्त विदेसी कंपन्यांना देसी पर्याय देऊन थांबलो असतो तर?

पण नाही आपल्याला यशाचा कैफ चढला, सुचेल ते, दिसेल ते प्रॉड्क्ट आपण ’खतंजली’ नावाखाली  विकायला सुरवात केली. असे विकायला पण हरकत नाही पण फार थोडी ‘खतंजली’ उत्पादनें आपण स्वत:च्या कारखान्यात बनवतो, बहुतांश ‘खतंजली’ उत्पादने आपण दुसर्‍यां कडून घेऊन त्यांचे फक्त मार्केटींग करुन रायलो आहोत. हे पण एक वार चालेल , पण बाबा, त्यात ही एक व्यावसायिक शिस्त आणि नितीमत्ता असावी लागते , आपण दुसर्‍याने बनवलेले प्रॉडक्ट बिनधास्त विकतो पण विकण्या पूर्वी  ते प्रॉड्क्ट कसे बनवले जाते , त्याचा दर्जा काय याच्या कोणत्याही तपासण्या न करता, खातरजमा न करता , आलेल्या कोणत्याही  प्रॉड्क्टला केवळ  ‘खतंजली’ चे लेबल लावून  विकायचा सपाटा लावलाय. दर्जा नियंत्रण कशाशी खातात हे आपल्याला माहीतीही नाही. आणि हे करताना आपल्याच देसी बांधवांनी पै पै गोळा करुन , घरेदारे गहाण टाकून , बँकांच्या चक्रवाढ व्याजाच्या कर्जांचे डोंगर छाताडावर घेऊन उभ्या केलेल्या लघु / मध्यम उद्योगांना आपण देशोधडीला लावतोय, आपल्या या सपाट्याने असे अनेक उद्योग बंद पडत आहेत. त्यांच्या पोटावर पाय आणायची काय आवश्यकता होती?

कोणती विदेसी कंपनी पापड , अचार बनवते ?  हे आचार , पापड बनवणारे आपलेच लोक आहेत , महीला बचत गट आहेत , एखादी विधवा हा उद्योग करुन पोटाची खळगी भरतेय , त्यांच्या तोंडचा घास काढून घेतोय आपण. विदेसी कंपन्यां बाबतचा आपला मुद्दा रास्त असला तरी, आपण देशोधडीला लावलेले हे लहान उद्योजक भारतीय  आहेत , भारतातच राहणारे आहेत आणि भारतातच मरणार आहेत, हे उद्योजक भारत सरकारला कर भरतात, मिळालेले पैसे भारतातच खर्च करत आहेत,  एखाद्या पापड वाल्याशी स्पर्धा करुन आपण काय मिळवणार आहोत. एखाद्या  महा बलाढ्य विदेसी कंपनीशी पंगा जरुर घ्या पण लहान शहरातल्या एखाद्या लोणची आणि हल्दी पावडर बनवणार्‍याला संपवून आपल्याला काय मिळणार आहे?

“व्वा, आज तुम्ही सगळे लेक्चर देण्याच्या मूड मध्ये दिसताय! मस्त ! पण मला वेळ नाही ते ऐकायला, ‘खतंजली’ चा झेंडा अजून वर गेलेला बघायचा मला, तुम्हाला जमत असेल तर काम करा नाही तर….. ”

“जी बाबा”

———- जय खतंजली ……………….

 

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. अण्णासाहेब गलांडे

    छान, त्या ‘ठखंजली’ हे माहित नाही की त्याची सर्व ‘माया’हि कोल्हाकुत्रयाचे धन होणार आहे।

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.