एका जातकाने दिलेली ही जन्मवेळ  पहा:   सकाळी १०:१५ !
जगात फार थोडे जन्म अगदी १०:१५, ०९:३०, ०२:०० असे घड्याळ्याच्या ठोक्यावर होत असतील. प्रत्यक्षात या वेळां १०:१३, ०९:३३, ०२:०२ अशा असू शकतात पण बर्‍याच वेळा जन्मवेळ नोंदवताना ही वेळ नजिकच्या १५ मीनीटाला राऊंड ऑफ केली जाते.

व्यवहारात सुद्धा “किती वाजले” या प्रश्नाला ‘ सकाळचे ११ वाजून १३ मीनीटे आणि ३२ सेकंद’ अशी वेळ आपण सांगतो का? ‘सव्वा अकरा’ असे उत्तर दिले जाते आणि ते पुरेसे असते.

वरील  उदाहरणाततल्या जातकाने दिलेल्या जन्मवेळ. जन्मगाव, जन्मदिनांक  आदी  नुसार केलेल्या जन्मपत्रिकेत जन्मलग्न येते मेष ११:१२:२१. याचा अर्थ किमान जन्मलग्न तरी बरोबर असावयास हरकत नाही. याचे कारण म्हणजे जर जातकाचे जन्मलग्न मेषे ऐवजी मीन (अलीकडचे) किंवा वृषभ (पलीकडचे) असेल तर त्याची खरी जन्मवेळ १०:१५ ऐवजी ०९:३८ च्या अलिकडे (मीन लग्न) किंवा ११:२० च्या पलीकडे (वृषभ लग्न) असावयास हवी, याचा अर्थ जन्मवेळेत मोठी म्हणजे ‌+/- ४० मीनिटांची चूक असावयास हवी. जातकाचा जन्म १९७८ मधला तोही मोठ्या शहरातल्या हॉस्पीटलातला, तिथे जन्मवेळ नोंदवताना एव्हढी मोठी चूक सहसा होणार नाही. चूक असलीच तर काही मिनीटांची असू शकेल.

(अर्थात काही केसेस मध्ये तासा दोन तासांच्या किंवा त्याहुनही मोठ्या चूका सापडल्या आहेत , ती गोष्ट वेगळी!)

पण जर जन्मलग्न ३ अंशाच्या किंवा २७ अंशाच्या आसपास असेल  तर मात्र फार दक्ष रहावयाला लागते. कारण  सर्वसाधारणपणे  जन्मलग्न ४ घड्याळ्यातल्या मिनिटांत  १  अंश पुढे जाते, ३ अंश पार पाडायला १२ घड्याळ्यातली मिनीटें लागतात.

आता एखाद्या बालकाचे नोंदवलेल्या वेळे नुसारचे जन्मलग्न उदाहरणार्थ  कर्क ३ अंशाच्या आसपास असेल आणि  जन्मवेळ नोंदवताना ती १० -१२ मिनीटांनी  पुढची लिहली गेली असेल तर? खरी जन्मवेळ १० -१२ मिनीटे अलिकडे असल्याने , खरे जन्मलग्न मिथुन २९ च्या आसपास असणार !

असाच प्रकार नोंदवलेल्या वेळे नुसारचे जन्मलग्न २७ अंशाच्या आसपास असेल  तेव्हाही झालेला असल्याची शक्यता असते,  उदाहरणार्थ  मकर २७ अंश,  या केस मध्ये जर नोंदवलेली जन्मवेळ खर्‍या जन्मवेळेच्या अलिकडची असेल तर खरे जन्मलग्न पुढ्चे म्हणजे कुंभ असू शकते.

जन्मलग्न जेव्हा बदलते तेव्हा संपूर्ण पत्रिकाच बदलते , नरेंद्र मोदींचा  अरविंद केजरीवाल होऊ शकतो !

आतापर्यंतच्या निरिक्षणातून माझ्या हे लक्षात आले आहे की बर्‍याच केसेस मध्ये  खरी  जन्मवेळ नोंदवलेल्या जन्मवेळे पेक्षा काही मिनीटांनी  कमी  असते.

जे मी आधी लिहले  आहे ते  – ‘राऊंडिंग ऑफ’ हे या अशा चुका होण्याचे मुख्य कारण!

दुसरे कारण असे आहे की, जेव्हा बालकाचा जन्म होतो ती वेळ मोठी धामधुमीची असते , बाळंतपण करणार्‍या डॉक्टरांचे आणि नर्स आदी कर्मचार्‍यांचे लक्ष, घड्याळ्यापेक्षा ,  त्या बाळ- बाळंतीणी कडे जास्त असते (नव्हे ते असायलाच हवे !) , जादा रक्तस्त्राव होत नाही ना?  पल्स , रक्तदाब ठिक आहे ना? बाळ गुदमरले तर  नाही ना, बाळाचा श्वास चालू झाला का ?  बाळ रडले का ?  एका ना दोन , अनेक महत्वाच्या गोष्टींकडे डॉक्टरांना बघावे लागेत. एकदा हे सारे सुखरुप पार पडले की मग कदाचित डॉक्टरांना घड्याळा कडे पाहाण्याची सवड मिळेल ! या  सगळ्यात दहा- बारा मिनिटे सहज निघून जातात. नोंदवलेली जन्मवेळ अर्थातच १०-१२ मिनिटे पुढची असते.

काही डॉक्टर (किंवा नर्स) यांना ह्याची कल्पना असते  मग ते काय करतात , सवड झाल्यावर घड्याळात बघायचे , त्यातून १०-१५ मिनिटें वजा करायची आणि ती जन्मवेळ  म्हणून नोंद करायची. असे जेव्हा होते तेव्हा नोंदवलेली जन्मवेळ , प्रत्यक्षातल्या जन्मवेळे पेक्षा काही मिनीटांनी  मागे होऊ शकते , त्यातूनच मग आधी  सांगीतला तसा २७ अंश जन्मलग्ना सारखा घोळ निर्माण होऊ शकतो (अर्थात जन्मलग्न बॉर्डर लाइन वरचे असेल तेव्हा).

जन्मवेळ नोंदवताना चुक होण्याचे आणखी एक कारण असे की, नक्की जन्मवेळ कोणती मानायची याबद्दल ज्योतिषांतच मतभेद आहेत. पण बहुतांश ज्योतीषी बालकाने स्वतंत्रपणे घेतलेला पहीला श्वास ही त्याची जन्मवेळ असे मानतात. हे जरी असले तरी , जन्मवेळ नोंदवणार्‍याने ‘बाळाची नाळ कापली ‘  ती त्याची जन्मवेळ असे मानून ती वेळ नोंदवली तर? बाळाचा पहीला श्वास (म्हणजेच बाळाच्या रडण्याचा पहिला स्वर) आणि नाळ कापणे  यात बर्‍याच मिनिटांचे अंतर पडू शकते.

मध्यरात्री नंतरचा जन्म असेल तर  लगेचच रजिस्टर मध्ये पक्की नोंद होतेच असे नाही, कारण जन्म-रजिस्टर मध्ये नोंदी करणारे कर्मचारी रात्रपाळीला कामावर नसतात. दुसरे दिवशी सकाळी दिवसपाळीचा स्टाफ कामावर आल्यानंतरच रजिस्टर मध्ये नोंदी होतात, रात्रपाळीचा स्टाफ सकाळी कशीबशी झोप आवरत , दिवसपाळीचा स्टाफ कधी एकदा कामावर येतो याची पेंगत वाट पाहत असतात. अशा पेंगुळलेल्या अवस्थेत , दिवसपाळीच्या स्टाफला कालच्या रात्रभरातल्या जन्मलेल्या बालकांचा जन्मवेळां देताना चुका होऊ शकतात.

मध्यरात्री नंतर जन्मलेल्या बालकाच्या बाबतीत जन्मवेळ नोंदवताना आणखी एका प्रकारे चूक होऊ शकते. (ज्या जन्मवेळां मध्यरात्री नंतर पण पहाटे ४ – ५ च्या आतल्या असतात).  कॅलेंडर मधली तारीख रात्री १२ च्या ठोक्याला बदलते ,  पण आपल्या साठी  सुर्योदय झाला , उजाडले की  आपला दिवस चालू होतो . यामुळेच की काय पण बर्‍याच वेळा मध्यरात्री नंतरच्या जन्मवेळा नोंदवताना वेळ  बरोबर ०१:४९ (उदाहरणार्थ)  अशी नोंदवली जाते पण तारीख मात्र जुनीच (१२:०० वाजायच्या आधी चालू होती ती ) , पहाटे नंतरच्या जन्मवेळा नोंदवताना अशी  तारखेची नोंद चुकत नाही, कारण तो पर्यंत उजाडलेले असते , नवा दिवस सुरु झालेला असतो. म्हणून काही बाळंतपणाच्या दवाख्यान्यात मध्यरात्री नंतर झालेल्या जन्मांच्या वेळा  ‘२३ /२४ सप्टेंबर,  ०२:१८’ अशा नोंदवलेल्या आढळतात. याचा अर्थ, त्या बालकाचा जन्म २३ सप्टेंबर च्या मध्यरात्री नंतर – पण कॅलेंडर प्रमाणे २४ सप्टेंबर रोजी ०२:१८ वाजता झाला आहे’ . मस्त पद्धत आहे , काहीही घोटाळा होणार नाही !

आता समजा एका बालकाचा जन्म , पुणे मुक्कामी, १४ जुन २००१ च्या मध्यरात्री  १२:५४  वाजता झाला , बाळाची  जन्मतारीख १५ जुन २००१ अशी लिहावयास हवी असताना, अनावधानाने ती १४ जुन २००१ अशी लिहली  गेली (नर्सबाईंच्या डुलक्या!) , म्हणजे जन्मवेळ अगदी अचूक नोंदवली आहे पण जन्मतारीखच चुकवून ठेवली. चक्क एक दिवस अलिकडेची जन्मतारीख ? केव्हढी मोठी चूक ! पण तुम्ही जर १४ जुन २००१ रात्री  १२:५४  , पुणे  आणि १५ जुन २००१ रात्री  १२:५४ , पुणे  अशा दोन पत्रिका करुन पाहील्यात तर त्यातली गंमत तुमच्या लक्षात येईल!

या पहा त्या दोन पत्रिका !

लक्षपूर्वक पहा  , काही फरक दिसतोय का ? काहीही  नाही  पण दोन्ही जन्मवेळेत चक्क १ दिवसाचा म्हणजेच २४ तासाचा फरक आहे महाराजा!

(वरिल पत्रिकांत फक्त ‘फॉर्चुना’ – ‘FO’  ने जागा बदललेली  आहे, पण हा ग्रह नाही तर गणिताने सिद्ध केलेला बिंदू आहे,  सगळीच सॉफ्टवेअर हा दाखवतात असे नाही , जी दाखवतात त्यात देखील हा बिंदू  खास समाविष्ट करावा  (configure) लागतो. फार म्हणजे फार थोडे ज्योतिषी याचा वापर करतात, बर्‍याच ज्योतिषांना हा  ‘फॉर्चुना’ काय आहे , कशाशी खातात हे देखील माहीती नसते)

बरेचसे ज्योतिषी या असल्या पत्रिके वरुन सुद्धा सूटतात !! धाड्धाड ज्योतिषाची गिरणी चालू !! पटेल का तुम्हाले असले चर्‍हाट ? नाही ना !

मग याला उपाय काय? अंशात्मक पत्रिका !!

ठीक  आहे हे घ्या ग्रहांचे अंश !

आता काय फरक दिसतोय ?

रवी , मंगळ, बुध, शुक्र याच्या अंशात्मक स्थितीत फरक  आहे आणि तो ही किती ?  फक्त १  अंशाचा ! गुरु , शनी, राहु , केतु, युरेनस, नेपच्युन , प्लुटो यांच्या अंशात्मक स्थितीत फक्त काही कलांचाच (अंशाचा ६0 वा भाग) काय तो फरक ! मोठा फरक दिसतो तो फक्त चंद्राच्या स्थिती मध्ये , चंद्र या एका दिवसात जवळपास १४॥ अंशाने पुढे सरकला आहे पण त्याच राशीत!

आता ही माहीती मघाच्या त्या ‘धाड्धाड ज्योतिषाची गिरणी’ वाल्या ज्योतिषीबुवांना द्या,  आता काही वेगळे सांगता येईल का त्यांना ? नाही!

कारण त्यांच्या दृष्टीने सर्व ग्रह आपापल्या स्थानी, आपापल्या राशीतच आहेत,  बुध दोन्ही पत्रिकांत चतुर्थ स्थानातच आहे ! चंद्राची स्थिती बदलल्या मुळे चंद्राने केलेले इतर ग्रहांशी अंशात्मक कोन बदलले आहेत , पण हे ज्योतिषीबुवा अंशात्मक ग्रह योग बघतच नाहीत, ग्रह जेव्हा राशी बदलेल तेव्हाच त्याने केलेले योग बदलणार!

या दोन्ही पत्रिकां मधले फरक अंशात्मक पत्रिकां समोर असतील तरच दिसू शकतो.

आता आपल्या  कडे  हीच केस आली आणि आपल्याला ठरवायचे आहे की जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, १४ सप्टेंबर  का १५ सप्टेंबर ? अशा वेळी सगळ्यात आधी दिलेली ठोकळा पत्रिका काही कामाची  नाही कारण दोन्ही पत्रिका सारख्याच आहेत. अंशात्मक पत्रिका  केल्या की खुलासे व्हायला सुरवात होते.

एका दिवसाच्या फरकाने काही वेळा चंद्र ची रास बदलू शकते , चंद्राने  रास बदलली म्हणजे तो पुढच्या स्थानात जाणार त्यामुळे त्याची स्थानगत , राशीगत फळे वेगळी  मिळणार , चंद्राने राशी बदलली असल्याने आता त्याने केलेले ग्रह योग पण बदलणार , ग्रहयोगांच्या फळात बद्ल होणार इ.

पण आपल्या केस मध्ये चंद्राने रास बदलली नसल्याने आपल्यापाशी हा मार्ग नाही.

मग काय करायचे ? अशा वेळी दशा – विदशा पहायच्या त्यात मोठा फरक दिसेल.

आता संपूर्ण वेगळे चित्र समोर येते , एका पत्रिकेत जन्माच्या वेळेपासुन शनी महादशा चालू आहे तर दुसर्‍या पत्रिकेत बुधाची महादशा ! आता या दशा – विदशा यांचा जातकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी मेळ घातला तर ठरवता येईल १४ सप्टेंबर  का १५ सप्टेंबर ?

पण इथे अडचण ही आहे की जातकाचे वय आजच्या तारखेला अवघे १४ वर्षे आहे ( सप्टेंबर २००१ चा जन्म) , इतक्या लहान वयात लग्न , संतती , नोकरी , उच्चशिक्षण यातले  काय घडणार ? कोणत्या घटनांचा दशा – अंतर्दशांशी मेळ घालणार कप्पाळ !

मग आता काय करायचे ?

के.पी. वाले रुलिंग प्लॅनेट वापरुन निवाडा करतील पण ते किती भरवशाचे आहे या बाबत मला तरी शंका आहे.

वरील उदाहरणात :

१४  सप्टेंबर चे जन्मलग्न :   बुध –  राहु  –  शनी –  चंद्र

१५ सप्टेंबर चे जन्मलग्न :   बुध –  राहु  –  बुध –  बुध

मग हे के.पी. वाले म्हणतील  ‘शनी ‘ रुलिंग प्लॅनेटस मध्ये आलाय ना मग  १४  सप्टेंबरच! पण हे बरोबरच  कशावरुन ? याचा ताळा कसा घेणार ?

यावर यांचे एकच उत्तर असते : ”रुलिंग प्लॅनेटस समोर आव्वाज करायचा नाय !”

मी जेव्हा जातकाची जन्मवेळ विचारतो तेव्हा ती जन्मवेळ जातकाला कशी कळली ते आधी विचारुन घेतो. जन्मवेळ हॉस्पीटल च्या रेकॉर्ड प्रमाणे असेल तर जन्मवेळेत मोठी चूक व्हायची शक्यता तशी कमीच. पण “वेळ अंदाजे आहे”, “अशीच काहीतरी आहे असे माझे आजोबा / आजी म्हणत होते” असे खुलासे झाले तर मात्र जरा जास्त खोलात जाऊन जन्मवेळ बरोबर आहे का तपासायला लागते.

काही वेळा जातक जन्मवेळ देतो ती आधीच कोण्या एका के.पी. वाल्याने सुधारुन दिलेली असते. त्या के.पी. वाल्याने ही सुधारुन दिलेली जन्मवेळच अगदी बरोबर असा दावा केलेला असतो , पण त्याचा ताळा-पडताळा दिलेला नसतो, त्या के.पी. वाल्याला त्याची आवश्यकताही वाटत नाही आणि जर एखाद्याने धाडस करुन त्याबद्दल विचारलेच तर त्या जातका कडे एक तुच्छ कटाक्ष  टाकून ”रुलिंग प्लॅनेटस समोर आव्वाज करायचा नाय !” हे उत्तर मिळतेच.

अशा वेळी मी जातकाला  त्या के.पी. वाल्याला मूळ जन्मवेळ काय सांगीतली होती  ते विचारुन घेतो आणि ती वेळ आधार धरुन माझ्या पद्धतीने जन्मवेळ सुधारुन घ्यायचा प्रयत्न करतो. मी सुधारुन दिलेल्या जन्मवेळेची पत्रिका जातकाच्या आयुष्यातल्या घटनां कशा बरोबर ट्रॅक करते ते मी ‘हा सुर्य – हा जयद्रथ ‘ असे सोदाहरण दाखवू शकतो त्याच बरोबर जन्मवेळ दोन-चार मिनीटें अलीकडे पलीकडे घेतल्यास हे ट्रॅकींग कसे होत नाही हे पण दाखवून देतो , ‘आव्वाज करायचा नाय’ असली मग्रुरी माझ्याकडे नाही.

असो , जन्मवेळेतली चूक सुधारुन घेण्यासाठी ‘के.पी. च्या रुलिंग प्लॅनेट्स’ पेक्षा जरा जास्त भरवशाच्या पद्धती आहेत आस्तित्वात , पण त्याबद्दल नंतर कधीतरी लिहेन.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gaurav Borade

  Very informative…. धन्यवाद सर …
  आणि
  ” जन्मवेळेतली चूक सुधारुन घेण्यासाठी ‘के.पी. च्या रुलिंग प्लॅनेट्स’ पेक्षा जरा जास्त भरवशाच्या पद्धती आहेत आस्तित्वात ” अरे व्वा … बऱ वाटल हि वाक्य वाचून… 😉
  आम्हालापण आवडेल वाचायला त्या पद्धती…

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद गौरवजी,
   ईतर पद्धतीं बद्दल वेळ मिळाला तर लिहायचा प्रयत्न जरुर करेन.
   आपला
   सुहास गोखले

   0
 2. Narayan T

  Hello Sureshji,

  Nice article. I have a question- for many those born in July-August many times parents change the birth date altogether(June or before that) just to put them in a school and save one year of study. Most of such students dont have the birth certificate also and their birth date becomes the same as they put in a school.
  For such cases, is there any method to correctly identify the birth date and time to get the exact patrika?

  0
  1. सुहास गोखले

   Hi Narayan ji,
   Finding the correct time within a time fram of +/- 30 minutes is easy, within +/- bit difficult but still manageable, anything beyond that is too difficult. I once attempted one such case (finding a date and time within one week span) but it took me a week to finish and lots of interaction with the client. Not worth the attempt. In such cases Horary (Prasna Kundali) is a better option.

   Hope this helps

   Regards

   Suhas Gokhale’

   0
 3. मंगेश शिंदे

  सुहास जी, लेख एकदम फर्स्ट क्लास्सच झालाय.

  आणि जन्मवेळेची नस (नाहीतर नाळ म्हणा हो) एकदम परफेक्ट पकडलीत.

  अगागा! मी पण अशीच एका केपी वाल्याने सुधारून दिलेली जन्मवेळ लागली तर वापरतो.

  साधारण माझ्या आजोबांनी नोंदवून ठेवलेली वेळ होती दुपारी २. ३० आणि केपी प्रमाणे आली दुपारी २. २२ त्यांच्या रुलिंग planet चार्ट प्रमाणे.

  त्यावरूनच त्यांनी भविष्य वर्तविले परंतु त्यात बरेच काही घडलेच नाहि.

  जाउद्या आता पुन्हा जन्मवेळ सुधारणे आले. 🙂

  मंगेश शिंदे

  0
  1. सुहास गोखले

   श्री. मंगेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. रुलिंग प्लॅनेट ने काही वेळा बरोबर येत पण कायमच नाही पण हही शक्यता लक्षात न घेता या रुलिंग प्लॅनेट्स वर जरा अतिरेकी विश्वास टाकला जातो आणि कोणी चॅलेंज केले तर त्याला फाट्यावर मारले जाते.

   असो
   आपला

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद . माझा चंद्र वृषभेचा , पण बुध दणकेबाज आहे.

   आपला

   सुहास गोखले

   0
    1. सुहास गोखले

     ह्यॅ ह्यॅ ह्यॅ कसचे कसचे! माझा फटू आहे ना ब्लॉग वर , दिसतोय का मी देख़णा ? एक कोकणस्थी गोरा रंग सोडला तर बाकी काही नाही. बुद्धी म्हणाल तर बुद्धीबळातल्या उंडा सारखी तिरकी चालणारी (तिरसिंग राव!) , भरोसा नाही. नाही म्हणायला उत्तम सेन्स ऑफ आर्ट आहे, संगीताची खास जाणकारी ( भारतीय शास्त्रीय संगीत, पाश्चात्य शास्त्रिय संगीत, जॅझ ) त्याबाबतीत माझे कान ‘गोल्डन ईअर’ या सदरात मोडतात. बाकी सारे यथातथातच .

     धन्यवाद

     0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.