समक्ष भेटायला आलेल्या जातकीचा प्रश्न होता ‘विवाह कधी होणार ?’…

असे प्रश्न हाताळणे माझ्या साठी एक रुटीन झाले आहे कारण येणार्‍या ७० % जातकांचे प्रश्न विवाहा संदर्भातच असतात !

असो.

मी माझ्या पद्धतीनुसार जातकीची माहीती लिहून घ्यायला सुरवात केली. नेहमीची बेसीक माहीती जसे जन्मदिनांक, जन्मवेळ, जन्मगाव हा तर तपशील लागतोच शिवाय मी जातकाच्या आयुष्यात घडलेल्या ठळक घटनां पण नोंदवून घेतो :

जसे विवाह, संतती, नोकरी लागणे / जाणे, स्थानांतर, घर , वाहन खरेदी, अगदी जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू , मोठे अपघात ,शस्त्रक्रिया इ.

त्यासंदर्भात त्या जातकीशी प्रश्नोत्तरे चालू असताना , जातकीच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव पाहून मला वाटले बहुदा जातकी ही जादाची माहीती देण्याबद्दल जरा नाखुष आहे .

असे होते काही वेळा , आपल्या या वैयक्तीक माहीतीचा दुरुपयोग तर होणार नाही ना अशी भिती जातकाला वाटणे स्वाभाविकच आहे. मी लगेच जातकीला ही माहीती (आयुष्यातल्या ठळक घटना ) का गोळा करतो, त्याचा जन्मवेळेची खातरजमा करुन घेण्यासाठी नेमका कसा उपयोग होतो , भविष्यकथन जन्मपत्रिकेवरुन करतात, जर पत्रिका अचूक असेल तरच भविष्य कथनात अचूकता , सुक्ष्मता येते आणि अचूक जन्मपत्रिके साठी  जन्मवेळ अचूक  लागते इ. बाबत थोडक्यात खुलासा केला,  म्हणालो:

“ही माझी काम करण्याची पद्धती आहे पण तुम्हाला अशी माहीती देणे कोणत्याही कारणास्तव योग्य वाटले नाही तर काही हरकत नाही, ही माहीती देणे बंधन कारक नाही, जी बेसीक माहीती उपलब्ध आहे त्यावरच मी काम करेन ..”

“सर, माहीती द्यायला माझी काहीच हरकत नाही, तुम्ही त्याचा गैरवापर करणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे…”

“पण तुमच्या चेहेर्‍यावर मला जरा वेगळेच भाव दिसले..”

“सर , आत्ता पर्यंत मी चार – पाच ज्योतिषांकडे जाऊन आले आहे पण अशी माहिती घेऊन , जन्मवेळेची खातरजमा करुन घेणारे तुम्ही पहीलेच दिसलात म्हणून मला नवल वाटले इतकेच…माझ्या मनात शंका नाही”

“ठीक आहे”

असे म्हणत काम चालू केले…तेव्हढ्यात जातकीने तोंड उघडले …

“सर तुम्ही  …… (एका महिला ज्योतिषाचे नाव ) ….  यांना ओळखता का ?”

“मी त्यांचे नाव ऐकून आहे पण माझ्या त्यांचा परिचय नाही”

“गेल्याच महीन्यात मी त्यांना ह्याच प्रश्ना संदर्भात विचारले होते..”

“त्यांचा अभ्यास चांगला असावा असे त्यांचे ब्लॉग व इतर मराठी वेबसाइट्स वरच्या त्यांच्या लिखाणातून तरी जाणवते. त्यांनी तुम्हाला योग्य तेच मार्गदर्शन केले असणार , मग झाले  तर , आता मला परत तोच प्रश्न का विचारता ?”

“पण त्यांनी भविष्य असे सांगीतलेच नाही !”

“मला कळले नाही…”

“मी त्यांची मला आलेली ईमेलच दाखवते तुम्हाला म्हणजे कळेल मी काय म्हणते ते..”

जातकीला  थांबवत मी म्हणालो…

“हे पहा, मी माझ्या स्वत:च्या अभ्यासावर सांगतो , इतर ज्योतिषांनी ह्याच प्रश्ना बाबतीत काय अंदाज वर्तवले आहेत हे मला जाणून घ्यायचे नाही किंवा त्या बद्दल मला कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही… दुसर्‍या ज्योतिषाच्या कामावर बोलणे माझ्या व्यावसायीक नितीमत्तेत / प्रोफेशनल इथिक्स मध्ये बसत नाही”

“सर तुम्ही टीका –टिप्पणी करु नका वाटल्यास , पण त्यांनी काय लिहले आहे ते वाचण्या सारखे आहे , आपण त्यावर चर्चा नको करायला पण वाचा तर खरे..”

मी काहीश्या नाखुषीनेच , जातकीने टॅबलेट वर सेव्ह केलेला त्या महीला ज्योतिर्विदेने पाठवलेल्या इमेलचा स्क्रिन शॉट पाहीला.. त्याचा सारांश असा होता:

“अजून दोन वर्ष तरी लग्न होण्याची शक्यता वाटत नाही ,पण ह्या दोन वर्षात विवाह होणारच नाही असे नव्हे , होऊही शकेल..”

मी जातकीला माझी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण जातकीने मला डिवचलेच..

“सर , आता सांगा … ह्याला ज्योतिष म्हणायचे काय ? याचा नेमका अर्थ काय, एकीकडे दोन वर्षे लग्न होणार नाही असे लिहायचे आणि पुढच्याच वाक्यात विवाह होईल असेही लिहायचे… आता हे सांगायला ज्योतिषी कशाला पाहीजे , कसा मस्त दोन्ही डगरींवर हात ठेवलाय बघा … माझे लग्न या दोन वर्षात नाही झाले तर या बाई भविष्य बरोबर आले असे सांगत फिरणार आणि सुदैवाने माझा विवाह या दोन वर्षात झालाच तरीही ह्या बाई म्हणायला मोकळ्या – ‘बघा विवाह होणार असे मी भाकित केलेच होते ,ती दुसरी लाईन वाचा’ ..”

क्षणभर मला ही हसू आवरले नाही , पण लगेच मी सावरुन जातकीला एव्हढेच म्हणालो..

“आपण नको ह्यावर चर्चा करायला .. मला माझ्या पद्धतीने काम करु द्या..”

असे म्हणून मी जातकीची पत्रिका अभ्यासायला सुरवात केली… अस्ट्रोडाईंन्स , मिड पॉईंट्स , महत्वाचे ग्रह योग, ट्रांसिट्स ….  माझ्या क्रमाने काम चालू केले .. पण जातकीचे तोंड आपले चालूच होते..

“तरी बरे मोफत सांगतात म्हणून ह्या ज्योतिषी बाईंना पैसे द्यावे लागले नाहीत ..नाहीतर पैसे देऊन हे असले भविष्य पदरात घ्यायचे का ? ज्योतिषाने अभ्यास करुन एकच एक असे ठाम विधान नको का करायला. … तसे करता येत नसेल बहुदा म्हणूनच पैसे घेत नसतील.. किंवा मोफत सांगायचे म्हणून काहीतरी  थातुरमातुर  सांगूत असाव्यात , गाजराची  पुंगी…  मग ज्योतिषी म्हणून कशाला मिरवायचे आणि लेख पाडायचे.. ”

“ह्म्म..’

जातकी आणखी काही बोलू नये म्हणून मी नॅशनल जिओग्राफिक्स चा ताजा अंक पुढे करत म्हणालो..

“काय मस्त फोटो आहेत बघा तरी जरा..दिल खूष होऊन जाईल..”

जातकी ते मॅगॅझीन चाळू लागली , मी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि काम चालू ठेवले.

माझे काम पूर्ण झाले , जातकीच्या बाबतीत वर्तवलेले भविष्य असे होते:

 1.     विवाह योग अगदी नजिकच्या काळात आहे, मजबूत ग्रहमान आहे , येत्या सहा महीन्यात आपला विवाह होण्याची खूपच मोठी शक्यता आहे.
 2.     विवाहोपश्चात भरभराट होईल विवाहानंतर परदेश गमन होईल आणि प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य होईल.
 3.     विवाह ठरताना किंवा विवाहाच्या वेळी / नंतर काहीतरी गंमतीदार किंवा काहीसा विचित्र प्रकार घडण्याची शक्यता आहे.

जातकी एकदम चिंतेत पडली , विवाह लौकर होणार पण  ह्या तिसर्‍या मुद्द्याचे काय?

“सर , विचित्र प्रकार ?  काही अशुभ तर नाही  ना…”

“अहो तसे अजिबात नाही, काळजीचे कारण नाही, जे होईल  ते गमतीदार असेल.. ”

जातकीचे आणखी समाधान करण्यासाठी मी  तिला तिच्या पत्रिकेतले  ते ‘गंमत करणारे’ ग्रहमान कसे  आहे ते समजाऊन सांगीतले. जातकीला काय खुलासा झाला कोण जाणे .. पण ती एकदम खूष होऊन गेली..

“काय म्हणता ? हे इतके सगळे चांगले होणार आहे, माझा विश्वास नाही बसत..”

“मी शास्त्राशी प्रमाणिक राहतो , केवळ तुम्हाला बरे वाटावे ,खुष करावे म्हणून मी हे सांगीतले नाही  तर तुमचे ग्रहयोग मला जे सांगतात तेच मी तुमच्या पर्यंत पोहोचवले, यात माझे पदरचे काहीही नाही.. आणि एक मी तुमच्या पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास केला आहे म्हणूनच ठाम नि:संदिग्ध शब्दात बोलतोय.. छापा मी जिंकलो ,काटा तू हरलास अशी भाषा मी वापरणार नाही..”

“तुमच्या तोंडात साखर पडो..”

“अहो बाई , ती साखर नको हो , डायबेटीस आहे मला, दुसर काहीतरी पडो असे म्हणा”

“मटार करंजी?”

“चालेल..”

जातकीने आणलेल्या मस्त मटार करंज्या फस्त झाल्या आणि जातकी हवेत तरंगत निघून गेली…

जातकी मला जानेवारी महीन्यात भेटली होती, आणि जातकीचा विवाह ठरला  ते सांगायाला ती एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आली  होती.

तिचा विवाह अगदी मी सांगीतलेल्या कालावधीतच म्हणजे मे महिन्यात झाला (नक्की तारीख माझ्या लक्षात नाही)

माझे दुसरे भाकित अगदी अचूक ठरले …

जातकीचा नवरा अमेरिकेत असून त्याने अमेरिकन नागरिकत्व स्विकारलेले आहे. त्यामुळे विवाहा नंतर जातकी लगेचच अमेरिकेला रवाना झाली आहे आणि पतीराज स्वत:च अमेरिकन नागरिक असल्याने जातकी कायमची परदेशी वास्तव्य करेल हे काय आता वेगळे सांगायला हवे !

माझे तिसरे भाकीत … ‘गंमतीदार किंवा काहीसा विचित्र प्रकार घडण्याची शक्यता आहे.’ तेही आश्चर्यकारक रित्या सत्यात उतरले !

त्याचे झाले असे, जातकीचा विवाह अगदी अनपेक्षित रित्या ठरला. एका शॉपिंग मॉल मध्ये या दोघांची शब्दश: टक्कर झाली , त्यात जातकीने नुकत्याच खरेदी केलेल्या काचेच्या डीनर सेट चे खळ्ळ खट्यॅक झाले ! त्यातून ह्या दोघांचा परिचय झाला आणि काही भेटीतच दोघांनी विवाहबद्ध व्हावयाचा निर्णय घेतला. पण खरी गंमत तर पुढेच आहे…

विवाहा नंतर जातकीला लगेच (आपल्या पती समवेत) अमेरिकेला जावयाचे असल्याने व्हिसा इ गोष्टी आल्याच , व्हिसाचा अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या संमतीने  जातकीचा नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला, मॅरेज सर्टीफिकेट हातात पडताच ताबडतोब व्हिसा साठीचा अर्ज दाखल केला गेला. व्हिसा मिळताच , अमेरिकेला जाण्यापूर्वी जातकीचा आणखी एक विवाह अगदी रितसर मुहुर्त, कार्यालय , बँड्बाजा वाजवून अगदी दिल्ली-पंजाब इस्टाइल धुमधड्याक्यात साजरा झाला, विवाहा नंतर अवघ्या सात-आठ दिवसात जातकी अमेरिकेला रवाना झाली. म्हणजे एकाच व्यक्तीशी दोनदा विवाह! आहे ना गंमतीदार किंवा काहीसा विचित्र प्रकार !

आता त्या महीला ज्योतिर्विदेचे भविष्य (त्याला आधी भविष्य म्हणायचे का नाही ते तुम्हीच ठरवा!) चुकले कसे ?

त्या ज्योतिर्विदेने  काय आडाखे बांधून भाकीत  केले  होते ते मला कसे कळणार ?  पण एक अंदाज असा असू शकतो  की त्या ज्योतिषी महिलेने जातकीच्या ज्या जन्मकुंडलीवरुन भाकित केले तीच मूळात चूक होती,  कारण जातकीने दिलेल्या जन्मवेळेत खुप मोठी चूक होती!! मी  जेव्हा जन्मवेळेची  खातरजमा केली  तेव्हा ते माझ्या लक्षात आले होते त्यामुळे मी माझ्या पद्धतीने ती जन्मवेळ सुधारुन घेतली  होती आणि मगच प्रश्नाच्या अनुषंगाने पत्रिकेचा अभ्यास सुरु केला होता.

जेव्हा जन्मपत्रिके वरुन भाकित करावयाचे असते तेव्हा मी कोणताही धोका पत्करत नाही , जातकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या आधारे मी जन्मवेळेची खातरजमा करुन घेतो आणि मगच पुढचे अ‍ॅनॅलायसिस करतो. जर जातकाने पुरवलेल्या माहीतीच्या आधारे जन्मवेळेच्या अचुकते बद्दल काही ठोस अंदाज करता आला नाही तर मी एकतर भाकित करायचे नाकारतो किंवा सरळ प्रश्नकुंडलीचा आधार घेतो.

आणि हो, जन्मवेळेची खातरजमा / शुद्धीकरण यासाठी मी ‘रुलिंग प्लॅनेट्स’ सारखी बेभरवशाची पद्धत वापरत नाही. माझ्याकडे अधिक विश्वासार्ह्य पद्धती आहेत !

आता बर्‍याच जणांना उत्सुकता लागून राहीली असेल हे अचूक भविष्य कसे आले? मला सांगायला आवडले असते पण हे भाकित जातकीच्या जन्मकुंडलीवरुन केले होते आणि माझ्या जातकाची जन्मकुंडली व माहीती मी कधीच, कोठेही , कोणत्याही मार्गाने उघड करत नाही , हे आपल्याला माहीती आहेच, सबब… स्वारी..

शुभं भवतु

सुहास


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

16 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  Good read! In general, do you think predicting marriage and child birth is easier than career related questions?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद हिमांशुजी,

   जरी मी पोष्ट वर लिहले नसले तरी , आता सांगतो, या ज्योतिषी बाई आता पैसे घेऊन ज्योतिष सांगतात आणि त्यांचे मानधन माझ्या पेक्षाही जास्त आहे. (अर्थात मी माझे मानधन अगदी नॉमीनल, केवळ अगदी फुकट सांगायचे नाही म्हणून काहीतरी अल्प असे घेतो, माझ्या मेहेनतीच्या तुलनेत ते काहिच नाही. ) , त्या पुढची कमाल म्हणजे आता त्या ज्योतिषाचे क्लासेस ही चालवतात असे ऐकलय ! आपल्या आता लक्षात आले असेल की समाजात हे असे ज्योतिषी ९९% पेक्षा जास्त असल्यानेच हे शास्त्र बदनाम झाले आहे. हे लोक फक्त कोल्ड रिडींग करताता , जातकाला बोलते करुन त्याचीच माहीती त्यालाच ऐकवतात, काय ऐकले की जातक खुष होईल हे जाणुन तेच त्याला ऐकवतात , पैसे न घेणारे ज्योतिषी तर सर्वात धोकादायक , They have nothing to lose त्यामुळे काहीही सांगत सुटतात, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ल्ली !

   आपल्या दुसर्‍या शंके बद्दल:

   विवाह / संतती चे भाकित करणे तुलनात्मक रित्या सोपे असते . विवाह ही आयुष्यताली मोठी आणि बर्यासच जणांच्या बाबतीत आयुष्यात एकदाच घडणारी ‘माइलस्टोन’ घटना असते. त्याचा शारीरीक, मानसिक (भावनिक) , आर्थिक, सामाजीक इम्प्यॅक्ट मोठा असतो. विवाह / संतती या घटनांचा वेध घेण्यासाठी जे फॅक्टर्स वापरले जातात ते ही ठोस असतात , मोजकेच फॅक्टर्स असल्याने जास्त पर्म्युटेशंस , कॉम्बीनेशंस होत नाहीत. विवाह ही संकल्पना पाच हजार वर्षापूर्वी जशी होत तशीच आजही आहे , निदान भारतात तरी , अलिकडच्या काळात ‘लिव्हिं ईन रिलेशन’ आणि ‘सेम सेक्स – गे मॅरेज’ असे काही फाटे त्याला फुटलेत जरुर पण भारतात हे लोण येऊन ते सर्वमान्य व्हायला अजून बराच काळ लागणार आहे , ते तसे होईल तेव्हा बघू ! त्यामुळे प्राचिन काळी ऋषी मुनिंनी जे आडाखे लिहून ठेवले आहेत ते आजही जवळ जवळ जसेच्या तसे लागू पड्तात ( काही अपवाद आहेत … त्याकाळी अगदी लहान वयात विवाह व्हायचे , जाती बाह्य / धर्म बाह्य विवाह या कल्पना नव्हत्या ). पाश्चात्य संस्कृतीत ला जातक असेल तर मात्र जरा वेगळा विचार करावा लागतो, त्यांच्या बाबतीत विवाह ही फारशी मनावर घेण्यासारखी , गांभिर्याने घेण्याची गोष्ट नाही, विवाह वा कुटुंब ही संकल्पना त्यच्या कडे मोडीत गेली आहे.

   शिक्षण आणि व्यवसायाच्या बाबतीत ही क्षेत्रे इतकी आहेत की केवळ ९ ग्रहांच्या माध्यमातून त्याचा वेध घेणे बरेच अवघड असते . आज उपलब्ध असलेली शिक्षण व व्यवसायाची क्षेत्रे पूर्वीच्या काळी आस्तीत्वाच नव्हती , सायबर सिक्युरिटी, डेटा मायनिंग, ओशिओनोग्राफी, फोरेंसिक सायंस, ब्युटी पार्लर इ. त्यामुळे ग्रथांत लिहलेले नियम ह्या नव्या क्षेत्रांना लागू करताना बरीच कसरत होते , त्यामुळे विवाहाचे , संततिचे पेडीक्शन जितके प्रिसाईज करता येत तितके शिक्षण / व्यवसायाच्या बाबतीत करता येत नाही. पत्रिकेतून जातकाचा शिक्षण / व्यवसायाच्या बातीतला नैसर्गिक कल / अनुकूलता सांगता येते पण जातक तेच शिक्षण घईल , तोच व्यवसाय करेल हे मात्र सांगणे अवघड असते. मंगळाचे प्राबल्य असेल तर लष्कर , पोलिस, सर्जन , हत्यारे वापरणारा , धाडसाची कामे करणारा. मैदानी खेळ . रवी चे प्राबल्य असेल तर सरकारी नोकरी, राजकारण , बुधाचे प्राबल्य असेल तर लेखन , वक्तृत, वाटाघाटी, पटवापटवी – दलाली , हिषेब, पुस्तक प्रकाशन, छोटे व्यापार , शुक्राचे प्राबल्य असेल तर कला, सौदर्य, वस्त्रे प्रावरणे, सुगंध, दागीने, कलावस्तू, स्त्रियांच्या संदर्भातल्या वस्तू असे ढोबळ अंदाज व्यक्त करता येतात.

   सुहास गोखले

   0
 2. SHIVRAM KAJAREKAR

  १. बाकी ज्योतिषविषयक आपण ज्ञानी आहातच पण ‘जातकी’ हा शब्द मराठी भाषेतला नाही. स्त्री किंवा पुरूष या दोघांसाठीही जातक हा एकच शब्द आहे हवे तर मागे स्त्री किंवा पुरूष असे लिहावे . लिहीले नाही तरी काही बिघडत नाही.
  २. रुलींग प्लॅनेट हे बेभरवशाचे आहेत हे म्हणणे फारसे रुचले नाही किंवा असे म्हणूया की कळले नाही जरा नीट समजेल असे लिहाल का? किंवा ज्याच्यावर पूर्ण विसंबून राहता येईल अशी एखादी पद्धत असेल तर ती जाहीर तरी करा म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल.म्हणजे अगदी क्लास काढा असे नाही म्हणायचे पण याच ब्लॉगवर त्यासंबंधी लिहीता येणार नाही का? धन्यवाद.

  0
  1. सुहास गोखले

   श्री शिवरामजी ,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   माझा मराठी व्याकरणाचा फारसा अभ्यास नाही , काही ठिकाणी जातक / जातकी असे शब्द वापरलेले दिसले त्यामुळे मी ही तेच वापरतो. उल्लेख केलेली व्यक्ती स्त्री का पुरुष हा भेद जातक / जातकी ने सहज होत असेल तर ‘जातकी’ हा शब्द , व्याकरण दृष्या बरोबर नसला तरी वापरायला हरकत नाही. कदाचीत असे केल्याने मराठी भाषेला एक नवा शब्द प्रदान करुन भाषेचे संवर्धन करायला हातभार लावला असे समाधान !

   रुलींग प्लॅनेट्स बेभरवशाचे आहेत हा माझा अनुभव आहे किंवा असे असेल की मला रुलिंग प्लॅनेट्स लाभत नाहीत , मदत करत नाहीत. रुलिंग प्लॅनेट ही दैवी मद्त आहे असे कृष्णमुर्तींनीच लिहले आहे त्यामुळे ही मदत वापरताना दोन पथ्ये पाळली गेली पाहीजेत असे मला वाटते:

   1> अगदि निर्वाणिच्या वेळीच ते वापरावेत , उठसुठ रुलिंग प्लॅनेट्स चा आधार धेतला तर ती मदत कुचकामी ठरते. अॅन्टीबायोटीक्स च्या बाबतीत आज डॉक्टरांना असाच अनुभव येत आहे, बेदरकारपणे अॅान्टीबायोटीक्स वापरत गेल्याने ऐकेकाळची ‘संजीवनी’ मानली गेलेली अॅन्टीबायोटिक्स आज लागू पडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

   2> दैवी मदत असल्याने ती वापरणारी व्यक्ती शुद्ध , यम नियम पाळणारी , साधना आराधना करणारी, गुरुकृपा झालेली असावी, कोणाच्याही मदतीला केव्हाही कुठेही धाउन यायला रुलिंग प्लॅनेट हे काही ५ रुपयाचा छोटा रिचार्ज नाही ! खुद्द कृष्णमुर्तीं एक विषीष्ट तांत्रीक साधना नियमीत करत असत. बी.व्ही. रमण , के. एन . राव सारखे जगद्विख्यात ज्योतिषी सुद्धा तांत्रीक साधाना करत, बी.वि.रमण यांनी तर त्यांच्या पुस्तकात याचा आवर्जुन आणि ठसठशीत उल्लेख केला आहेच.
   रुलिंग प्लॅनेट्स हे बेभरवशाचे आहेत . हे माझे वैयक्तीक मत असल्याने इतरांनी रुलिंग प्लॅनेट वापरु नयेत असा माझा आग्रह नाही. शेवटी हे ज्याचे त्याने स्वानुभवा नुसार ठरवावे.

   असो.

   मी रुलिग प्लॅनेट वापरत नाही पण त्याहुनी जास्त विश्वासार्ह्य पद्धती मी वापरतो. माझे गुरु कै. श्रीधर शास्त्री मुळ्ये यांनी समजाऊन सांगीतलेल्या नाडी ज्योतिषातल्या काही गुप्त संकल्पना आणि पाश्चात्य ज्योतिषशास्त्रातून केलेली उधार उसनवारी यांचा दुहेरी वापर मी करत असतो. अर्थात ही पद्धत अत्यंत क्लिष्ट असल्याने ती समजण्यासाठी आणि वापरात आणण्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव व व्यासंगाची जरुरी असते , उगाच कोणालाही ही पद्धत सांगता येणार नाही, शिष्य हे ज्ञान स्विकार करायला पात्र आहे याची पूर्ण खात्री झाल्या नंतरच काही सांगणे योग्य ठरेल. माझ्या गुरुंनी माझी कसून चाचणी घेऊन मगच या गोष्टी मला समजाऊन सांगीतल्या होत्या आणी मला ही तीच अट घातली होती. त्यामुळे या अशी गुह्ये ब्लॉग च्या माध्यमातून सांगता येणार नाहीत , क्षमस्व.

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. SHIVRAM KAJAREKAR

  पहिल्या दोन मुद्दय़ंशी सहमत.पण तिसरा मुद्दा मात्र फारसा पटला नाही. याच गुप्तपणाच्या हव्यासापोटी भारतातील अनेक गहन ज्ञानविषय आज काळाच्या उदरात गडप झाले आहेत. तुम्ही ती तुमची गुरूदत्त पद्धती जाहीर करा असा मी आग्रह धरू शकत नाही हे मान्य पण ते किचकटआहे, क्लिष्ट आहे म्हणून इतरांना कळणार नाही म्हणून गुप्त ठेवायचे आहे वगैरे न पटण्यासारखे आहे.अर्थात गुरूला वचन देणे वगैरे ठीक आहे मझी तक्रार नाही पण जर ती क्लिष्ट असेल तर माझ्यासारखा सामान्य माणूस त्याच्या मागे लागणारच नाही.असो तुमची इच्छा प्रमाण मानून मी हा विषय संपवू इच्छितो.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. शिवराम जी

   आपण माझे उत्तर गडबडीत नीट वाचले नसेल . मी पद्धत किचकट आहे , क्लिष्ट आहे असे लिहले आहे पण म्हणून मी ती दुसर्‍याला सांगणार नाही असा अर्थ त्यातून काढता येत नाही कारण पुढे मी लिहले आहेच “शिष्य हे ज्ञान स्विकार करायला पात्र आहे याची पूर्ण खात्री झाल्या नंतरच काही सांगणे योग्य ठरेल. ” त्यामुळे जर अशी योग्य व्यक्ती माझ्या संपर्कात आली तर मी आनंदाने ही गुप्त विद्या त्याला सांगेल. ज्ञान लपवायचा हेतु अजिबात नाही तसे असते तर माझ्या गुरुंनी मला हे ज्ञान दिलेच नसते . योग्य , लायक, सक्षम व्यक्ती हवी , पहीली-दुसरीतल्या मुलाला , 1000 रुपयाचे पार्कर पेन घेऊन देऊन काय उपयोग. डॉक्टर , इंजिनियर , सी. ए. अशा उच्च अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी एक किमान पात्रता असावी लागते ना ? CET / HSC मध्ये उत्तीर्ण, आवश्यक तो विषय अभ्यासला गेलेला असावा जसे इर्‍जिनियरींग्ला PCM मेडीकल ला PCB. तिथे आपण म्हणतो का मुलगा फक्त चौथी पास आहे पण द्या त्याला मेडीकल ला अ‍ॅडमीशन ! तसेच हे ज्ञान कोणाला द्यायचे याचेही काही निकष आहेत अपात्र व्यक्तींच्या हातात हे असले काही देणे बरोबर नाही.

   मला वाटते आता याबदालचा पूर्ण खुलासा झाला असावा.

   आपला
   सुहास गोखले

   0
 4. SHIVRAM KAJAREKAR

  पहिल्या दोन मुद्दय़ांशी सहमत.पण तिसरा मुद्दा मात्र फारसा पटला नाही. याच गुप्तपणाच्या हव्यासापोटी भारतातील अनेक गहन ज्ञानविषय आज काळाच्या उदरात गडप झाले आहेत. तुम्ही ती तुमची गुरूदत्त पद्धती जाहीर करा असा मी आग्रह धरू शकत नाही हे मान्य पण ते किचकट आहे, क्लिष्ट आहे म्हणून इतरांना कळणार नाही म्हणून गुप्त ठेवायचे आहे वगैरे न पटण्यासारखे आहे.अर्थात गुरूला वचन देणे वगैरे ठीक आहे माझी तक्रार नाही पण जर ती क्लिष्ट असेल तर माझ्यासारखा सामान्य माणूस त्याच्या मागे लागणारच नाही.असो तुमची इच्छा प्रमाण मानून मी हा विषय संपवू इच्छितो.

  0
 5. viraj

  ‘रुलिंग प्लॅनेट्स’ सारखी
  बेभरवशाची पद्धत वापरत नाही. अगदी सहमत

  0
 6. swapnil

  सुहास जी तरी पत्रिका न छापता एक केस स्टडी म्हणून कोणत्या ग्रहयोगाच्या आधारे आपण फलादेश कथन केले हे सांगता नाही का येणार ?आणि मा. कृष्णमुर्ती हे नक्की कोणत्या प्रकारची तांत्रिक साधना करायचे या बद्दल काही कल्पना आहे का ? आणि दुसरे असे कि हल्ली अंगठ्याच्या ठशावरून नाडी भविष्य सांगतात त्या बद्दल आपले काय मत आहे ? किवा Share करण्यासारखा अनुभव आहे का ?

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   पत्रिका समोर नसताना ग्रहयोग इ. गोष्टी समजाऊन घेता येत नाहीत.

   कृष्णमुर्ती व इतर अनेक नामांकित ज्योतिषी अनेक प्रकारची तांत्रिक साधना करत होते त्यांच्या बोलण्यातून , लिखाणातून जाणवते. कृष्णमुर्तीं कडे उच्छीष्ट महा गणपतीची तांत्रीक मुर्ती होती. या साधना तांत्रीक असतात म्हणूनच गुप्त असतात त्या काय व कशा या गोष्टी उघड केल्या जात नाहीत.

   एक लक्षात घ्या ज्योतिष केवळ गणित व तर्क शास्त्रावर चालत नाही, ते फक्त 30% आहे, बाकी 70% हे इंटीईश्युन आहे, रुलिंग प्लॅनेट्स हे पण त्या इंटीईश्युन चा भाग आहे. हे इंटीईश्युन मिळवायला साधना करावीच लागते, त्याला पर्याय नाही.

   मी स्वत: एक विषीष्ट प्रकारचे ध्यान करतो, अत्यंत प्रखर (कॉन्संटृएटेड) असे ध्यान आहे.

   नाडी ज्योतिष मध्ये असेच एखाद्या क्षुद्र देवते कडून मार्गदर्शन घेतले जाते , तुम्ही कर्ण पिशाच्च हा शब्द ऐकला असेल त्यातलाच हा प्र्कार आहे, खूप तांत्रीक साधना करुन ही क्षुद्र देवता वश होते आणि तिला वश करुन ठेवण्यासाठी , सतत साधना करत रहावे लागतेच, त्यता जरा जर खंड पडला किंवा चुक झाली तर ह्या देवता उलट वार करतात.बहुतांश नाडी ज्योतिष वाले शेवटी अत्यंत वाईट अवस्थेत (अंगात किडे पडून) मृत्यू मुखी पडलेले आहेत आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मुलांना ही क्षुद्र देवता वश झ्हलेली नसल्यास अशी नाडी केंद्रे बंद पडलेली आहेत.

   माझ्या कडे एक नाडी ज्योतिष ची पोथी होती , ती गुरुच्या मार्गदर्शना खालीच वाचावी असा स्प्ष्ट आदेश असताना सुद्धा मी ती तशीच वाचावयाचा काही वेळा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी फार म्हणजे फारच वाईट अनुभव आले. सबब ती पोथी मी गंगार्पण केली आणि सुटका करुन घेतली !

   या क्षुद्र देवता साधकाला समोरच्या व्यक्तीचा भूतकाळ अगदी खडनखडा सांगतात , पण भविषकाळ मात्र त्यांना सांगता येत नाही, त्यामुळे नाडी वाले तुमचा भूतकाळ अगदी अचूक सांगू शकतात पण भविष्यकाळ मात्र ते (क्षुद्र देवतेची मदत नसल्याने) असाच बनवून सांगतात , त्यामुळे भूतकाळ 100% बरोबर आणि भवीष्य काळ 100% चूक असा अनुभव सर्वच नाडीज्योतिषां बाबतीत येतो.

   नाडीवाले तुम्हाला अचूक भूतकाळ सांगून इंप्रेस करतात आणि मग भविष्यकाळातल्या घटनांबद्दल अशुभ सांगून कमालीची भिती तुमच्या मनात उत्पन्न करतात. भूतकाळ बरोबर आलेला असल्याने तुमचा त्या नाडीवाल्यावर आधीच विश्वास बसलेला असतो मग तो नाडीवाला तुम्हाला उपाय / तोडगे सांगतो, विश्वास बसलेला असल्याने तुम्ही ते तोडगे करताच. हे तोडगे म्हणजे पूजा विधी असतात , ते अर्थातच त्या नाडीवाल्याने सुचवलेल्या देवळातच करायचे असतात , इतर ठिकाणी नाही, ह्या पूजाविधींचा खर्च 10,000 पासुन ते लाखा पर्यंत असतो !

   बाकी अंगठ्या चा ठसा घेणे इ. गोष्टी गिमिक्स आहेत

   नाडीवाल्यांच्या नादाला लागू नका !

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    आणि सुहास जी ते सांगितलेल्या भविष्याची पण करून देतात . माझ्या मित्राला दिली आहे . अजून मी नाही एकली ती .

    0
   2. स्वप्नील

    आणि सुहास जी ते सांगितलेल्या भविष्याची Audio C D पण करून देतात . माझ्या मित्राला दिली आहे . अजून मी नाही एकली ती .

    0
 7. स्वप्नील

  सुहास जी खूपचं छान माहिती सांगितलीत आपण ! पण एक Share करतो कि मी हल्लीच एका नाडीवाल्याकडे ठसा देऊन आलोय . एक राउंड झाला त्याने मला बरेच काही काही विचारले पण माझी माहिती taly नाही झाली त्यांचेकडे असलेल्या पत्तीशी / Patti म्हणून आता सोमवारी म्हणजे २२/०२/१६ ला बोलावलंय . पण माझ्या एका मित्राला उत्तम अनुभव आले असे तो म्हणतोय अर्थात तुम्ही सांगता तसे भूतकाळ perfect सांगितला असेल . कर्णपिशाच्च वगरे प्रकार माहित आहेत मला . मला देखील तीच शंका होती . असो . पण सर विंग कमानदार शशिकांत ओक यांनी याचा खूप अभ्यास केलाय म्हणे त्यांना खूप चांगले अनुभव आलेत असे ते म्हणतात . नक्की काय प्रकार असेल हा ? असो . सर मला जर आपणाशी काही Personal गोष्टी बद्दल बोलायचे असले तर आपली वेळ काय ?

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,
   लोकांना उत्तम अनुभव येतो ते भूतकाळातल्या , त्यांचा भविष्यातल्या घटनांचा अंदाज नेहमीच चुकतो , अगदी 10% सुद्धा बरोबर येत नाही. या बाबतीत कृष्णमुर्ती , बी.व्ही. रमण , पासुन ते पुण्याचा व.दा. भटांनी आपापले अनुभव मांडले आहेत आणि त्या सगळ्याचे हेच मत आहे. विंग कमांडर ओक नाडी च्या प्रेमात पडले आहेत असे दिसते, त्यांच्याही बाबतीत भूत काळ बरोबर आला होता भविष्यकाळ चूकला होता.

   आपल्याला काही वेगळा अनुभव येईल तुमचे नाव, आई वडीलंची नावे ते सांगतील पण तुमच्या आयुष्यातली महत्वपूर्ण घटना (जी फार लोकांना माहीती नाही अशी) त्यांना सांगता येत का ते पहा.
   ते आपल्याला भूतकाळ सांगून भविष्यकाळात अनेक वाईट घडेल अशी भिती घालतील आणि मग त्यावरचे उपाय तोडगे सुचवतील , त्यांचा खरा धंदा तोच तर आहे !
   बाकी सी.डी. वगैरे व्यवसायाचा भाग , आता ते आधुनिक झाले आहेत असे दिसते , पूर्वी कॅसेट वर द्यायचे !

   आपला अनुभव जरुर शेअर करा… वाटल्यास गेस्ट ऑथर म्हणून आपल्या नवानिशी मी माझ्या ब्लॉग वर तो आनंदाने पोष्ट करेन !

   0
   1. स्वप्निल

    ok. sir, आभारी आहे तुमचा. वेळीच सावध केलेत तुम्हि, आता जरा विचार करतो जायचे का नाहि ते . तशी त्यांची फी 500/- आहे. ( तीच फुकट जायची भिती आहे हो।…हा….हा….हा…) बघतो काय करायचे ते . काहिहि अनुभव आला तरी नक्की share करेन . धन्यवाद.

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.