अॅमेझॉन, ई-बे अशा अनेक व्हेंडर्स कडून मी असंख्य वस्तू मागवल्या आहेत, काही वेळा वस्तू पोहोचायला अपेक्षे पेक्षा जास्त उशीर झाला तेव्हा त्या केव्हा मिळतील या काळजी पोटी प्रश्न कुंडली मांडून उत्तरे पण मिळवली आहेत.
मी गेल्या नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात अॅमेझॉन (अमेरीका) वरून एक पुस्तक मागवले, अशी पुस्तकें मी नेहमीच मागवत असतो आणि साधारण पणे आठ ते पंधरा दिवसात पुस्तक घरपोच होते हा माझा नेहमीचा अनुभव आहे. या खेपेला देखील हे मागवलेले पुस्तक साधारण डिसेंबर १५ तारखे पर्यंत मिळावे अशी अपेक्षा होती पण आख्खा डिसेंबर महीना संपला तरी पुस्तकाचा पत्ता नाही !
सव्वा महीना थांबलो तरी पुस्तक नाही, सहसा असे होत नाही म्हणूनच काळजी वाटली. अर्थात पुस्तक अॅमेझॉन वरून मागवले असल्याने काही काळजी नव्हती, पुस्तके मिळाले नाही तर अॅमेझॉन कडून रिफंड मिळाला असताच.
पण मला रिफंड नक्को होता, पुस्तकच पाहिजे होते, माझ्या साठी हे पुस्तक अत्यंत मह्त्त्वाचे होते. मुळात हे एक कमालीचे दुर्मिळ पुस्तक, गेले वर्ष भर मी या पुस्तकाच्या मागे आहे , या पुस्तका साठी अक्षरश: जंग जंग पछाडले होते , बरीच शोधाशोध केल्या नंतर अगदी अचानक ‘अॅमेझॉन अमेरिका’ वर हे पुस्तक उपलब्ध झाले, एकच कॉपी होती, अवाच्या सव्वा किमत असणे स्वाभावीकच आहे! पण दुसर्या कोणी ते उचलायच्या आतच चपळाई करुन मी अक्षरश: त्यावर झडप घातली होती!
१ जानेवारीला, फार अस्वस्थ झालो, साला, या पुस्तकाचे काय होणार? मिळणार की नाही? हा प्रश्न सतावी लागला, शेवटी एकदा ठरवले, प्रश्नकुंडली मांडून पाहू !
1 Jan 2020 12:42:58 Nasik 73e48’00 19n59’00 Geocentric Tropical Regiomontanus
ही प्रश्नकुंडली सोबत दिली आहे. पत्रिका ‘सायन’ पद्धतीची असून , नेहमीची Placidus हाऊस सिस्टीम्स न वापरता मी Regiomontanus ही हाऊस सिस्टीम वापरली आहे! (मागच्या वर्षा पासून मी होरारीसाठी Regiomontanus हाऊस सिस्टीम वापरणे सुरु केले आहे, फार चांगले रिझल्ट्स मिळत आहेत!)
आपण हा प्रश्न पाश्चात्त्य होरारी तंत्राने सोडवणार आहोत, या प्रकाराच्या अॅनॅलायसीस मध्ये पत्रिका तयार होताच काही प्रारंभिक तपास करावा लागतो, ज्या मध्ये जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , कसा आहे, शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि विषयाचे (वस्तूचे) प्रतिनिधी ठरवावे लागतात आणि मग प्रश्नात अपेक्षीत असलेली घटना घडेल का नाही? केव्हा? याचा शोध घ्यायचा.
आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करू या.
वेस्टर्न होरारीत प्रश्ना साठीची कुंडली मांडली गेली की सर्वप्रथम तपासायच्या त्या तीन गोष्टीं:
१) जन्मलग्न बिंदू (Ascendant)
२) चंद्र
३) शनी
जन्मलग्न बिंदू चे अंश काय आहेत हे महत्वाचे असते. जर जन्मलग्न बिंदू (तो कोणत्याही राशीत असू शकतो) ० ते ३ अंशात असेल तर त्याचा अर्थ असा होतो की प्रश्न जरा वेळे आधीच विचारला गेला आहे , प्रश्ना संदर्भात अजून बरीच उलथापालथ होणार आहे, कदाचित ‘कहानी में व्टिस्ट भी आनेवाला हय’ तेव्हा आत्ताच त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे उचित नाही किंवा उत्तर शोधताना ही ‘व्टीस्ट’ वाली बाब लक्षात घेतली पाहीजे. (आणि बर्याच वेळा असा व्टिस्ट आहे का आणि असल्यास तो कशा प्रकारे असू शकेल याचा अंदाज पत्रिकेतून मिळतोच मिळतो, शोधा म्हणजे सापडेल!)
जर लग्न बिंदू २७ ते ३० अंशात असेल तर त्याचा अर्थ असा असू शकतो की परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे. आणखी एक अर्थ असा निघू शकतो की जातक प्रश्ना बाबतीत फारसा गंभीर नाही , त्याने अगदी कॅज्युअली, सहज, जाताजाता , टाईमपास , चेष्टा ,ज्योतिषाची परिक्षा घेणे अशा एखाद्या उद्देशाने प्रश्न विचारला आहे. याचा ही योग्य (?) तो उपयोग करुन घ्यावा लागतो.
चंद्रा कडे ही लक्ष द्यावे , चंद्र जर ‘व्हाईड ऑफ कोर्स ‘ असेल म्हणजेच चंद्र सध्या ज्या राशीत ज्या अंशावर आहे तिथे पासुन चंद्र ती राशी ओलांडे पर्यंत त्याचे कोणत्याही ग्रहा बरोबर योग होत नाहीत अशी स्थिती. या स्थितीत दुहेरी परिणाम मिळतात. म्हणजे प्रश्ना संदर्भातली परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे असा अर्थ निघू शकतो. किंवा प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची मोठी शक्यता असते. चंद्र हा कालमापनासाठी वापरला जात असल्याने चंद्र त्याची सध्याची राशी बदले पर्यंत एक ही ग्रह योग करणार नसेल तर कालनिर्णय कसा करता येईल ? चंद्राला राशी बदलल्या खेरीज नवा ग्रहयोग करता येणार नाही म्हणजे प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडेलही (इतर अनुकूल परिस्थिती व ग्रहयोग असतील तर ) पण त्यासाठी प्रश्ना संदर्भात बरेच काही मोठे बद्ल झाल्यावरच ! आणि ते कोणते बदल हे पण पत्रिका सांगू शकते , शोधा म्हणजे सापडेल !!
शनी लग्न स्थानात किंवा सप्तम स्थानात नसावा. तसा तो असल्यास समोर असलेली प्रश्न कुंडली काहीशी ‘ट्रिकी’ असू शकते, फार काळजीपूर्वक अभ्यासावी लागते, बहुदा शनी अशा स्थितीत असताना एकतर जातकाने चुकीचा प्रश्न विचारलेला असतो किंवा ज्योतिषी पत्रिकेचा अभ्यास करताना कसली तरी गाढव चूक करून बसतो !
चला तर मग आपण आता ही पत्रिका वर दिलेल्या तीन बाबीं संदर्भात तपासू .
पत्रिकेत लग्नबिंदू १६ मेष ०१ असल्याने , लग्नबिंदू संदर्भातली काळजी नाही.
चंद्र मीनेत १९: ४३ अंशावर आहे, चंद्र मीनेत आहे तो पर्यंत तो शनी व मंगळा शी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही. म्हणजे ही पण काळजी मिटली.
शनी दशमात असल्याने तो लग्नात / सप्तमात असताना जी काळजी असते ती नाही!
आता आपण या कथेतल्या पात्रांचा (अॅक्टर्स) आणि त्यांच्या प्रतिनिधींचा परिचय करून घेऊ.
या कथेत किती पात्रे आहेत?
१) प्रश्नकर्ता, ज्याने पुस्तक मागवले आहे तो म्हणजेच मी !
२) विक्रेता: ज्याच्या कडून मी हे पुस्तक विकत घेतले आहे तो
३) पुस्तक
इथे जरी मी अॅमेझॉन या बेवसाईट वर ऑर्डर नोंदवली, माझा पैशाचा व्यवहार अॅमेझॉन शी झाला , पुस्तकाची (पार्सल) सर्व जबाबदारी अॅमेझीन कडे असली तरी अॅमेझॉन ही कंपनी हे पुस्तक स्वत: बनवत नाही किंवा स्वत: विकत नाही, देश विदेशातले विक्रेते आपली उत्पादने अॅमेझीन मार्फत विकतात, मी नोंदवलेली पुस्तकाची ऑर्डर अॅमेझॉन विक्रेत्या कडे पाठवणार आणि तो विक्रेता मला हे पुस्तक पाठवणार आहे. म्हणजे अॅमेझॉन फक्त विक्रेता आणि ग्राहक यांच्यातली एक मध्यस्थ / दलाल आहे तेव्हा या ‘अॅमेझॉन’ चा विचार करायची आवश्यकता नाही.
बाकी पैशाची देवाण घेवाण, कुरियर कंपनी इ बाबी विचारात घ्यायची आवश्यकता नाही.
पात्रे निश्चित झाली, तेव्हा या पात्रांचे प्रतिनिधित्व कोणते ग्रह करणार आहेत ते तपासू:
मी:
प्रश्न मी स्वत:च , माझ्या साठी विचारला आहे , प्रश्नकर्ता नेहमीच लग्न स्थाना वरुन पाहतात. मेष लग्न असल्याने मेषेचा स्वामी ‘मंगळ’ माझे प्रतिनिधित्व करेल. युरेनस लग्नात आहे पण युरेनस , नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा ‘प्रतिनिधी’ म्हणून फारसा वापर होत नाही (अगदी खास परिस्थितीत / निर्वाणीच्या वेळी हे ग्रह वापरता येतात). चंद्र हा नेहमीच जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असल्याने, चंद्र पण माझा सह प्रतिनिधी आहे.
विक्रेता:
विक्रेता म्हणजे ज्याच्याशी माझा आर्थिक व्यवहार झाला आहे अशी व्यक्ती जी नेहमीच सप्तम (७) स्थानावरून पाहतात. इथे सप्तमावर १६ तूळ ०१ राशी आहे, म्हणजे तूळेचा स्वामी ‘शुक्र’ विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करेल. सप्तम स्थानात कोणताच ग्रह नसल्याने हा एकटा ‘शुक्र’ च विक्रेत्याचे प्रतीनिधित्व करणार आहे.
पुस्तक (पार्सल):
प्रश्न न मिळालेल्या पुस्तक बद्दलचा आहे. पुस्तक हे काही कागदपत्र / पत्र / निरोप नाही तर ती एक प्रकाराची खरेदी – विक्री होऊ शकणारी मालमत्ता आहे. त्यामुळे या पुस्तकाचा (पार्सल) एक ‘मालकीची वस्तू’ म्हणूनच विचार करायला हवा.
हे पार्सल परदेशातून कुरीयर सेवे द्वारा पाठवले आहे ही बाब लक्षात घेतली पाहीजे, हे पार्सल पाठवले आहे ते एका विक्रेत्याने. तो या पार्सल चा ‘Sender सेंडर’ आहे, जर काही कारणामुळे हे पार्सल मला देता आले नाही (माझा पत्ता सापडला नाही / पार्सल आले त्या वेळी माझ्या घराला कुलूप होते / दोन तीन प्रयत्न करुनही हे पार्सल माझ्या कडे सुपूर्द करता आले नाही / अन्य कोणत्याही कारणाने – उदा कस्ट्म्स ने आक्षेप घेतला इ. ) तर ते पार्सल विक्रेत्या कडे परत पाठवले जाईल, म्हणजे जो पर्यंत पार्सल माझ्या हातात सोपवून माझी स्विकृतीची सही घेतली जात नाही तो पर्यंत हे पार्सल (पुस्तक) कोठे ही असले तरी त्याला विक्रेत्याच्या मालकीची वस्तू आहे असेच समजायचे.
वैयक्तीक मालमत्ते साठी द्वितीय (२) स्थान पाहतात पण इथे ते माझे द्वितीय स्थान नसून अॅमेझॉन वरील विक्रेत्याचे द्वितीय स्थान असेल !
विक्रेता आपण सप्तम (७) भावावरून पाहणार आहोत त्यामुळे विक्रेत्याचा द्वितीय (२) भाव त्याची मालमत्ता दाखवेल, सप्तमाचे द्वितीय म्हणजेच अष्टम (८) स्थान पार्सल (पुस्तक) साठी पाहीला पाहीजे. अष्टम (८) भावावर २० वृश्चिक ४५ राशी आहे म्हणजे वृश्चिकेचा स्वामी मंगळ या पार्सल चे प्रतिनिधीत्व करेल. अष्टमात स्वत: मंगळ आहे, इतर कोणताही ग्रह नाही त्यामुळे एकटा मंगळच या पार्सल चे प्रतिनिधित्व करणार आहे.
आता इथे मंगळ हा एकाच वेळी ‘माझा’ आणि ‘पुस्तका’ चा प्रतिनिधी होत आहे, त्यामुळे आपण माझ्या साठी मंगळा ऐवजी माझा सह प्रतिनिधी जो ‘चंद्र’ असतो तो वापरूया आणि मंगळाला पार्सल चे प्रतिनिधी मानू.
कथेतली पात्रे आणि त्यांचे प्रतिनिधी असे आहेत:
मी: चंद्र
विक्रेता: शुक्र
पार्सल: मंगळ
कथेतली पात्रे आणि त्या भूमिका करणारे ग्रह निश्चित झाल्यावर आपण या पत्रिकेचा प्राथमिक अभ्यास करू
१९ मीन ४३ वरील चंद्र (मी) आणि १६ मीन १६ वरील नेपच्यून यांच्यात अगदी नुकतीच युती झाली होती, नेपच्युन सारखा गोंधळ, काळजी , संभ्रम निर्माण करणार्या ग्रहाशी झालेली ही युती हे माझ्या प्रश्न विचारता वेळेच्या मन:स्थितीचे उत्तम द्योतक आहे.
आता पुढचा टप्पा – पार्सल (पुस्तक) मला मिळणार का?
जर हे पार्सल मला मिळणार असेल तर पार्सलचा प्रतिनिधी आणि माझा प्रतिनिधी यांच्यात एखादा ग्रह योग होणे आवश्यक आहे.
पार्सलचा प्रतिनिधी आहे मंगळ आणि माझा प्रतिनिधी आहे चंद्र.
चंद्र १९ मीन ४२ वर आहे आणि मंगळ २८ वृश्चिक ३५ वर आहे, या दोघांत नव पंचम योग होणार आहे!
म्हणजे पार्सल (पुस्तक) मला मिळणार हे नक्की!
पण हे पार्सल (पुस्तक) मिळणार जेव्हा?
चंद्र – मंगळ नव-पंचम योग व्हायला चंद्राला मीनेत ९ अंश पुढे सरकायचे आहे. म्हणजे आपले टाईम युनिट ‘९’ चे असेल, यात ९ तास , ९ दिवस, ९ आठवडे, ९ महीने असे काहीही असू शकते.
या पैकी ९ तास, ९ महीने अशक्य आहे!
९ दिवस किंवा ९ आठवडे शक्य आहे. पण ९ आठवडे म्हणजे सव्वा दोन महीने! इतका काळ मी थांबणार नाही, पार्सल हरवले/ मिळाले नाही या कारणास्तव मी अॅमेझॉन कडून रिफंड मागून मोकळा होईन !
त्यामुळे ९ दिवस हे परिमाण मला योग्य वाटले.
प्रश्न विचारला होता १ जानेवारीला त्या हिशेबाने हे पुस्तक मला ९ किंवा १० जानेवारीला मिळायला हवे!
प्रत्यक्षात हे पार्सल (पुस्तक) मला ८ जानेवारीला दुपारी ३ वाजता मिळाले !
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020