.                          .eBay – उसगाव वरुन मी आयव्ही एम गोल्ड्स्टीन जेकबसन या पाश्चात्य ज्योतिर्विदे ने लिहलेल्या ग्रथांचा एक संच स्वस्तात विकत घेतला होता, (ग्रंथसंग्रह एका ज्योतिर्विदेचा होता त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजिवांनी त्याला eBay दाखवले ! देवा त्याला क्षमा कर आणि असेच लाखमोलाच्या वस्तू कवडीमोल भावाने विकणारे आणखी काही ‘चिरंजीव’ निर्माण करता आले तर बघ रे बाबा !! ), आख्खा संच एकगठ्ठा खरेदि केल्या मुळे खूष होऊन त्या चिरंजीवांनी प्रस्तुत परिक्षणाचा विषय असलेला ग्रंथ मला असाच भेट म्हणून पाठवून दिला होता (देव त्याचे भले करो !).

मादाम जेकबसन चे ग्रंथ एका पाठोपाठ एक वाचून झाले , त्या सर्वच ग्रंथांनी माझे ज्योतिष विषयक जीवन अक्षरश: समृद्ध केले आहे, पण त्या सोबत आलेल्या या जेम्स ब्राहा च्या ग्रंथाकडे मात्र माझे संपूर्णत: दुर्लक्षच झाले, आधी एक ‘जेम्स ब्राहा’ नामक अपरिचित फिरंगी लेखक आणि त्यात ‘How to be a Great Astrologer’ हे असले शिर्षक बघूनच वाटले हे काही खास नसणार, ‘बेसिक्स’ वरची इतके ग्रंथ आहेत त्यात आणखी एक भर! पण या पुस्तकात प्रत्येक चॅप्टर च्या आधी एक पूर्ण पान भर अशी नितांत सुंदर, रमणिय अशी पेन्सिल स्केचेस आहेत जी ‘Gustav Dore’ या जगप्रसिद्ध कलावंताने चितारली आहेत, ती पुन्हा एकदा बघायच्या निमित्ताने का होईना या ग्रंथाची काही पाने चाळली गेली आणि काय आश्चर्य पुढचे काही तास एखादी उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी तसा हा ग्रंथ मी एकाच बैठकीत वाचून काढला. आज त्या घटनेला काही वर्षे झाली पण हया ग्रंथाने माझी पाठ काही सोडली नाही. एकेकाळी ‘बघू कधीतरी सवडीने’ म्हणून बाजूला कोपर्‍यात ठेवलेला ग्रंथ आज माझ्या कामाच्या ठिकाणी मानाचे स्थान बळकावून बसला आहे.

या ग्रंथाचे नाव फसवे आहे , ग्रंथाचा विषय ‘ग्रहांमधले दृष्टियोग व त्याचे परिणाम’ हा अ‍सताना त्याला दुसरे कोणते तरी समर्पक असे नाव न देता हे असले गैरसमज होईल असे नाव का बरे दिले असावे असा प्रश्न मला अगदि सुरवातीला जरुर पडला होता. पण माझा या ग्रहयोगांचा जसाजसा अभ्यास वाढू लागला तसेतसे मला हे जास्त प्रकर्षाने जाणवायला लागले की भविष्य कथनाचा आख्खा डोलाराच या ग्रहांमधले ‘दृष्टियोग व त्याचे परीणाम’ यावर उभा आहे. ग्रहयोगांतले मर्म जो जाणतो तोच चांगला ज्योतिर्विद !

ग्रंथाचे नाव मग जास्तच समर्पक वाटू लागले.

आकाशस्थ ग्रहगोलां मधले जे कोनात्मक अंतर असते त्याला अस्पेक्ट किंवा ग्रहयोग म्हणतात. आता कोणत्याही वेळेला , कोणत्याही दोन ग्रहांमध्ये कोणते ना कोणते म्हणजे 0 ते 359 डिग्रीज पैकी एखादे अंशात्मक अंतर (कोन) असणारच, पण हजारो वर्षाच्या निरिक्षणंतून काही विषिष्ठ अंतरे (कोन) जास्त प्रभावी परिणामकारक असतात हे लक्षात आले आहे. ती अंतरें (कोन) असे आहेत युती –Conjunction 0 अंश, केंद्र योग Square 90 अंश , लाभयोग – Sextile 60 अंश , नवपंचम योग – Trine 120 अंश आणि प्रतियोग – Opposition 180 अंश.

जन्मपत्रिकेचा अभ्यास करताना प्रथम ग्रहांची स्थानगत, राशीगत, नक्षत्रगत फळे तसेच भावेशांची फळे काय आहेत हे पाहावे लागते. पण ही ग्रंथात वर्णन केलेली सर्व फळे पृथक /सुटी किंवा ज्याला आपण इंग्रजीत ‘आयसोलेटेड’ म्हणतो अशी असतात, प्रत्यक्षात ती जशीच्या तशी कधीच मिळणार नाहीत , कारण प्रत्येक ग्रह इतर ग्रहांच्या कोणत्या ना कोणत्या प्रभावा खाली असतोच असतो. ह्या प्रभावामुळे त्या ग्रहाच्या फळ देण्याच्या क्षमतेत फार मोठे बदल होतात एव्हढेच नव्हे तर दोन ग्रहांच्या योगांमुळे एक तिसरीच प्रभावी शक्ती निर्माण होऊन एकदम वेगळी / भलतीच फळें मिळू शकतात. यामुळे प्रत्येक ग्रहाचे ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे निर्भेळ असे फळ मिळणे कदापीही शक्य होणार नाही.

जाळायला काही नसेल तर अग्नि सुद्धा शांत होतो त्याच प्रमाणे मंगळ , नेपच्युन सारखे ग्रह इतर ग्रहांच्या योगात नसतील तर निष्प्रभ होतात. शुक्रा सारख्या कलासक्त ग्रहाची शनीच्या योगात अशी काही कुतरओढ होते की ज्याचे नाव ते. एरवी विवाहाचा , वैवाहिक सुखाचा कारक मानला गेलेला शुभोत्तम शुक्र जेव्हा युरेनस च्या कुयोगात असतो तेव्हा   संसारसुखाची अक्षरश: राख रांगोळी होते, काही वेळा तर प्रकरण घटस्फोटा पर्यंत जाते. बुधाची तरल, तल्लख बुद्धी नेपच्युनच्या योगात गुन्हेगारी कडे कधी वळली हे कळणार सुद्धा नाही. शनीच्या योगातला चंद्र आयुष्यभराची साडेसाती देतो. अगदी गुरु सारखा परम शुभ ग्रह देखिल रवीच्या कुयोगात ‘बडा घर पोकळ वासा’ अशी दैन्यावस्था करुन टाकतो.

त्यामुळे कोणती फळें मिळणार आणि ती कशी व केव्हा मिळणार या प्रश्नांची अंतिम उत्तरें हे ग्रहांचे आपसात होणारे ग्रहयोगच देऊ शकतात. पत्रिकेचा मूलभूत अभ्यास असो की कालनिर्णया साठी केलेला तात्कालिन अभ्यास ( गोचर भ्रमणें, प्रोग्रेशन्स, डायरेक्शनस,रिटर्नस) ग्रहयोगाचा कौल घेऊन त्यांचा स्थल, काल, स्थिती सापेक्ष अर्थ लावल्या खेरिज कोणतेच भविष्य कथन शक्य होणार नाही.

हा इतका महत्वाचा आणि अपरिहार्य विषय असताना सुद्धा भारतात त्यावर हाताच्या बोटांवर मोजण्या एव्हढे सुद्धा ग्रंथ उपलब्ध नाहीत हे आपले सर्वांचे दुर्दैवच म्हणायचे. त्यामुळेच आपल्याला फिरंग्यांनी लिहलेल्या ग्रंथां कडे वळावे लागते. पण या फिरंग्यांची अभ्यासुवृत्ती, व्यासंग, शास्त्रनिष्ठ,तर्कशुद्ध विचारसरणीं, विषयाचा खोलात जाऊन प्रत्येक गोष्ट मूळापासून समजाऊन घेण्याची धडपड आणि आपले म्हणणे शिस्तबद्ध पद्धतीने दुसर्‍यापर्यंत पोहोचवण्याची हातोटी पाहता ,’फिरंग्या तूच खरा आधार ‘ असे म्हणायची वेळ फार लांब नाही.

या विषयावरच्या ईतर ग्रंथात अनुकूल योग ( 60, 120), प्रतिकूल योग (90, 180) अणि युती (0 ) असे वर्गीकरण करुन फारच त्रोटक माहीती दिली आहे मात्र जेम्स ब्राहांनी मात्र प्रत्येक ग्रहांच्या जोडी मधे होणार्‍या ह्या अशा सर्व (0, 60, 90, 120, 180) ग्रहयोगां वर अत्यंत विस्ताराने लिहले आहे. रवी – चंद्र , रवी – बुध….रवी – प्लुटो , मग चंद्र – बुध ते चंद्र – प्लुटो अशा क्रमाने जात प्रत्येक जोडी साठी युती , शुभ योग ( ट्राईन 120 अंश, सेक्स्टाईल 60 अंश), अशुभ योग ( स्क्वेअर 90 अंश , आपोझिशन 180 अंश) अशा पद्धतीचे विस्तृत विवेचन (पूर्ण पृष्ठ) दिले आहे. उगाच थातुर मातुर लिहून तोंडाला पाने पुसली नाहीत आणि रटाळ , दिशाहिन / संदर्भहिन मजकूराने पानेच्या पाने बरबटवली नाहीत.

मात्र या जोड्यांत हर्षल – नेपच्युन, हर्षल -प्लुटो नेपच्युन-प्लुटो या बाहय ग्रहां मधल्या जोड्यांचा समावेश नाही कारण उघड आहे हे अत्यंत मंद गती ग्रह असल्याने या जोड्यांत होणारे योग काही महिनेच नव्हे तर काही वर्षे चालू असतात त्यामुळे त्यांचा व्यक्तीं पेक्षा समाजा वरच मोठा परीणाम होत असतो.

जेम्स ब्राहांनी राहु (केतु) आणि इतर ग्रह यांच्यातले ग्रहयोग दिलेले नाहीत . राहु (केतु) आणि एखादा ग्रह यांची युती म्हणजे त्या ग्रहाला लागलेले एक प्रकारचे ‘ग्रहण’ च आणि अशा परिस्थितीत राहु (केतु) या युतीतल्या ग्रहावर असा काही जबरदस्त कब्जा करतो की युतीची म्हणून काही खास फळें होऊच शकत नाहीत, राहु (केतू) त्या ग्रहाच्या कारकत्वाचा अगदी विनाश करतो, त्यामुळे त्या ग्रहाची स्वत:ची म्हणून असलेली फळें मिळणे देखिल दुरापास्त होते. राहु (केतु) छायाग्रह असल्याने युती खेरिज इतर ग्रहयोगात त्यांचा खास असा परिणाम / प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळेच राहु (केतु) व इतर ग्रह यांच्यात होणार्‍या ग्रहयोगांच्या फळां पेक्षा राहु (केतु) यांची स्थानगत आणि राशीगत फळें अभ्यासणे जास्त महत्वाचे ठरते. म्हणूनच प्रस्तुतच्या ग्रंथकर्त्यानेच नव्हे तर इतर कोणत्याच लेखकांच्या ग्रंथात (अगदी श्री वसंतराव भटांच्या देखिल) राहु (केतु) व इतर ग्रह यांच्यात होणार्‍या ग्रहयोगांची फळें दिलेली नाहीत.

ब्राहांनी ग्रंथा चा सुरवातीच्या भागात राहु (केतू) यांची स्थानगत व राशीगत फळें अगदी ऊत्तम , तर्कशुद्ध व सविस्तरपणे दिली आहेत. ती पटतात. राहु (केतु) यांची जन्म-पुनर्जन्म या संकल्पनेशी जी सांगड घालण्यात आलेली आहे ती लक्षात ठेऊन, काहीश्या ‘मानसशास्त्रीय’ अंगाने लिहलेली ही वर्णने वाचकाच्या विचारांना चालना देण्यात बर्‍या पैकी यशस्वी होतात.

जेम्स ब्राहा जरी पाश्चिमात्य असले तरी बरीच वर्षे भारतात राहून भारतीय गुरुं कडून ‘ज्योतिष’ शिकले आहेत , त्यामुळेच पाश्चात्यांची संशोधक वृत्ती, तर्कनिष्ठ्ता व वैदिक ज्योतिषातली निखळ अचूकता याचा सुरेख संगम त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. लिख़ाणाची शैली ही वैदिक ज्योतिष पद्धती सारखीच असल्याने भारतीय वाचकांना फारसे परके वाटत नाहीच उलट असे सुरेख , तर्कशुद्ध , अचूक आणि चपखल वर्णन वाचल्यानंतर आपल्या भारतीय लेखकांची कीव करावीशी वाटते.

ग्रहयोगांची वर्णने समर्पक आहेत, पटण्यासारखी आहेत. त्याच बरोबर ही अशीच फळें का मिळतील याबाबतचे केलेले तर्कशुद्ध विवेचन त्याहुनी ही अधिक मनाला पटते. या ग्रंथाला लेखकाने स्वत:च प्रस्तावना लिहली आहे , ती आवर्जुन वाचावी कारण त्यात हे ग्रहयोग कशा तर्‍हेने बघायचे , दिलेल्या वर्णनांचा अर्थ कसा लावायचा याचा सुंदर खुलासा केला आहे.

आणि गुस्ताव डोर च्या चित्रांबद्दल मी काय लिहू, ग्रहयोगांसारखा रुक्ष विषयावरचा ग्रंथ सुद्धा अशी नितांतसुंदर रमणिय चित्रे वापरुन  किती उत्तम रित्या सजवता येतो याचे हा ग्रंथ एक दाखला आहे.

या ग्रंथातले मला काय आवडले / पटले:

 

 • चपखल , तंतोतंत जुळणारी वर्णनें. वर्णने विस्तृत असली तरी पाल्हाळीक नाहीत. बोलबच्चनगिरि नाही. भाषा ओघवती , शैलीदार असल्याने हा असला रुक्ष विषय देखील रंजक झाला आहे.
 • तर्कशुद्ध , सुसंगत विचारांना चालना देणारी मांडणी
 • पाश्चात्य विचारशैलीचा हिंदु वैदिक ज्योतिष विचारधारेशी घातलेला सुयोग्य मेळ, त्यामुळे हिंदु ज्योतिषातला अविभाज्य / अपरिहार्य असा फॅटलास्टीक टोन त्याचा मूळ गाभा शाबूत ठेऊन त्यावर पाश्चात्य तर्कसंगत कार्यकारण भावाचा संस्कार केला असल्याने प्रत्येक ग्रहयोगाचा शारिरीक, मानसिक, कार्मिक,सामाजीक अशा अनेक अंगांनी उहापोह झाला आहे.

 

या ग्रंथात मला काय पहायला आवडले असते:

मात्र हा ग्रंथ लिहताना काही गोष्टी राहून गेल्या आहेत किंवा जाणिव पूर्वक वगळल्या आहेत.

 

 • या ग्रंथात एक महत्वाचा भाग नाही तो म्हणजे या सर्व ग्रहांचा लग्नबिंदू व दशमबिंदूशी होणार्‍या योगांचाही यात समावेश नाही, बहुदा लग्नबिंदू व दशमबिंदूशी होणार्‍या योगांचा विचार करावयाचा असल्यास अगदी अचूक जन्मवेळेच्या पत्रिकां उपलब्ध असणे गरजेचे असते त्या तशा मिळत नाही म्हणून हे योग बघणे फारसे गरजेचे भासले नसावे. असे जरी असले तरी हा अत्यंत महत्वाचा भाग वगळायला नको होता असे मात्र मना पासुन वाटते.
 • ग्रहांचे योग विचारात घेताना ते ग्रह कोणत्या स्थानांतून हा योग करत आहेत, कोणत्या राशी व तत्वाचे (जल, वायू,पृथ्वी,आकाश) आहेत हे पण बघितले पाहीजे त्याच बरोबर योग करणारे ग्रह स्वत: कितपत सामर्थवान आहेत (ग्रहांचे बलाबल) हे पण विचारात घेतले  पाहीजे. ब्राहांच्या ग्रंथात याबद्दल उल्लेख नाही तो असायला पाहीजे होता. (श्री वसंतराव भटांनी त्यांच्या याच विषयावरच्या ग्रंथात ही उणीव भरुन काढली आहे हे इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते)

 

ग्रहयोगांवर माझ्या कडे अनेक ग्रंथ आहेत. C E O Carter यांचा Astrological Aspects, Reinhold Ebertin यांचा Combinations of Stellar Influence आणि आपल्या पुण्याच्या गुरुवर्य श्री वसंतराव भटांचा ‘फलज्योतिषातले समग्र ग्रहयोग’, तसेच Sue Tompkin ,  O P Verma,  A T Maan ई बर्‍याच लेखकांचे ग्रंथ माझ्या संग्रही आहेत.

Carter साहेबांचा ग्रंथ ग्रहयोगांवरचा आद्य ग्रंथ, मानाचा गणपती, मानावा लागेल, अतिशय सुंदर,तर्कशुद्ध विवेचन, शंका घ्यायला जागाच सोडली नाही त्यांनी, पण साहेबांचे Queen’s English समजायला चांगलेच जड जाते, ज्यांचे इंग्रजी वाचन फारसे नाही त्यांनी याच्या नादाला लागू नये ( पु.लं. च्या भाषेत बोलायचे तर मूळव्याध होईल ), पण काळजी नको, याच ग्रंथाचे जणू भाषांतर वाटावे असा ‘फलज्योतिषातले समग्र ग्रहयोग’ हा ग्रंथ गुरुवर्य श्री वसंतराव भटांनी आपल्या साठी सिद्ध केला आहेच ना, श्री वसंतरावांनी हेच सर्व ज्ञान आपल्या माय-मराठीत अत्यंत समर्पक रित्या आणले आहे, आणि हे करताना त्यावर आपल्या पारंपारीक ज्योतिषशास्त्रातल्या कल्पनांचा अप्रतिम साज चढवला आहे.

Reinhold Ebertin यांची कमालीची चपखल वर्णनें वाचून थक्क व्हायला होते, Ebertin स्वत: जर्मन असल्याने एखाद्या जर्मन इंजीनियरींग उत्पादना प्रमाणे ही वर्णंने शार्प, प्रिसाईज आहेत, या ग्रंथातली ग्रहयोगांची वर्णनें लागू पडली नाहीत असे होणारच नाही.

एखादे उदाहरण पाहूया का?

बुध-मंगळ अ‍शुभ योग (स्क्वेअर 90 किंवा ऑपोझिशन180)

C E O Carter

“……. it attacks the nerves, and makes a person irritable in the way that nervous people commonly are.  The temper is seldom of the best, and the native is rarely a favorite, for the tongue is sharp and not always controlled.  There is an element of ill-nature and a tendency to backbite.   In children there is often impertinence and rudeness.  Adults are sometimes unnecessarily outspoken and rough-tongued; sometimes it goes with the type that affects to consider politeness as a mere form of hypocrisy, a vice to which this combination is but little prone. In low types of maps it may indicate “pure cussedness” or the spirit of unvarying contrariety. It is rarely if ever lacking in intelligence, but rather tends to fail in using its brains sensibly and advantageously……….. From the standpoint of moral character the most needful lesson is, as a rule, to learn to appreciate the values of opinions and types of character different from one’s own; and to realize that we are all sometimes mistaken”

श्री वसंतराव भट

“या योग असलेल्या व्यक्तींचे मन स्वच्छ किंवा निष्पाप नसते, असे लोक दुसर्‍याला टाकून बोलतील,लोकांचे अवगुण शोधतील, ऊठ्सूठ दुसर्‍यावर टिका करतील, लोकांच्या कोणत्याही चांगल्या कार्याचे मनमोकळे हृदयापासून कौतुक करणे हयांना जमत नाही. स्तुती करतील ती सुद्धा खोटीच , यांचा स्वभाव अहंकार युक्त, जास्त हट्टी व दुराग्रही असतो, यांना कोणाचा विरोध सहन होत नाही. बुध – मंगळ अशुभ योग असलेल्या व्यक्ती दुसर्‍याला अप्रिय बोलण्यात अगदी अग्रेसर असतात, काही वेळा नको तिथे अतिस्पष्ट बोलतील, कित्येक वेळा अशा लोकांच्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होतात, बुध –मंगळ योगात अविचारी बुद्धि असते, बुध हा निसर्गत: चंचल ग्रह असल्याने बुध –मंगळ कुयोगात मानसीक अस्थिरता,चांचल्य,अ‍धीरता जास्त आढळते, रागाच्या भरात एखादी अविचारी गोष्ट करणे, तर्‍हेवाईक वागणे अ‍शी फळें अनुभवास येतात.”

(कार्टर आणि वसंतरावांचे लिखाण पाहा “जणू भाषांतर वाटावे”‌)

Reinhold Ebertin

Principle:

Powers of thought, the realization of thoughts and plans

Rashness, tendency to exaggerate or magnify, love of quarreling, grumbling and fault finding, obstinacy and willfulness, irritability, nervousness, utilization of other people’s ideas for one’s own benefits.

The systems of the motor nerves, spastic paralysis, nerve irritations, an increased sensitization or reflex action.

A critic, the speaker in a discussions group

The stage of getting involved in controversies or law suits, the bringing about of disputes.

James Braha:

The person is a professional critic, he is perceptive and sees people’s flaws and imperfections without the slightest effect. his mind is sharp and analytical, works too rapidly for his own good, there is great impatience, and nervousness, the person may be irritable, and have a short hot temper, he may have problems during his childhood, with hyperactivity or tantrums, the person is great problem solver unfortunately his morals are not the best, >>>> he is fairly selfish, and his first task in life is learning how to beat the system, his greatest pleasure comes from circumventing or bypassing the rules, the person may lie regularly or fail to keep his words, he believes the end justifies the means, and not particularly concerned with integrity, in extreme cases there may be stealing, shoplifting, or criminal activity, person is direct and blunt, he often speaks before thinking and therefore offend others, he has most energetic mind and is witty, sarcastic, and humorous,

आता मला हे विचारु नका की यापैकी कोणता ग्रंथ चांगला ? मोठा अवघड प्रश्न होईल तो. मी तर म्हणेन हे चारच नाही तर या विषयावरचे जेव्हढे म्हणून ग्रंथ तुम्हाला संग्रहात ठेवता येतील तितके चांगले.

ग्रहयोग चांगले समजणे व त्याचा भविष्य कथनात खुबीने उपयोग करणे हीच ‘यशाची गुरु किल्ली’ आहे असा ‘ कान मंत्र ‘  कित्येक वर्षापूर्वी मला माझ्या गुरुंनी दिला होता. मी श्रद्धेने व निष्ठेने त्याचे पालन केले, आज त्याची सुंदर फळें मला मिळत आहेत.. तुम्हालाही मिळतील.

How to Be a Great Astrologer: The Planetary Aspects Explained

Paperback: 256 pages
Publisher: Hermetician Pr (October 1992)
Language: English
ISBN-10: 0935895027
ISBN-13: 978-0935895025
Product Dimensions: 0.8 x 7.8 x 10 inches

http://www.abebooks.com/servlet/SearchResults?an=James+Braha&kn=great

http://www.amazon.com/How-Great-Astrologer-Planetary-Explained/dp/0935895027/ref=sr_1_1?s=books&ie=UTF8&qid=1409575194&sr=1-1

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. swapnil kodolikar

  सर आपला एवद्जा छान अभ्यास आहे अनुभव आहे , आता आपणच एक छान मराठीतून पुस्तक लिहा असे आम्हास वाटते .

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,

   धन्यवाद,

   माझा तसा विचार आहे पण ते पुस्तक अ‍ॅमेझॉन किंडल फॉरमॅट मध्ये असेल, माझी त्या दृष्टीने तयारी चालू आहे, पण नक्की केव्हा ते आत्ताच सांगता येणार नाही. असे ई-बुक प्रकाशीत झाल्यास मी आपल्याला त्याबद्दल कळवेन.

   शुभेच्छा.
   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.