(हे कथापरिक्षण आहे, मूळ कथा श्री ऋषीकेश गुप्ते यांची आहे, लेखकाचा प्रताधिकार मान्य केला  आहे, हा लेख लिहण्याचा हेतू या कथेची व लेखकाची माझ्या ब्लॉगच्या  वाचकांना ओळख करुन देणे ईतकाच आहे.)

भय कथा वाचायला मला फार आवडायचे, महाविद्यालयीन कालात नारायण धारप, मतकरींच्या कथांची अक्षरश: पारायणें केली होती. ते वयच तसे होते, कालांतराने सुशिं चा एक टप्पा घेऊन वाचनाची एक्स्प्रेस पुल, दळवी, वपु , जी ए, अशी काही वळणें घेत ईंग्रजी साहित्याच्या प्रांतात प्रवेश करती झाली. अ‍ॅगाथा ख्रिस्ती पासून सुरवात मग वुडहाऊस , ओ हेन्री असे काही सुरवातीचे गड सर झाले आणि शेवटी अभिजात ईग्रजी वर स्थिरावली. मराठी वाचन तसे मागेच पडले.

मध्यंतरी फार दिवसांनी श्री ऋषीकेश गुप्ते यांची एक भयकथा वाचावयास मिळाली, खरे तर मूळ कथा श्री नारायण धारपांची आहे, पण या लेखकाने त्या मूळ कथेवर असे काही संस्करण केले आहे की प्रत्यक्षा हुन ही प्रतिमा उत्कट असे काहीसे झाले आहे, एखाद्या चित्रपटाचा रिमेक मूळ चित्रपटा पेक्षा जास्त चांगला व्हावा तसेच ईथे झाले आहे , खंत इतकीच की या लेखकाने ‘मूळ कथा वा कथा बीज श्री नारायण धारप यांचे आहे असा उल्लेख करायला हवा होता. ( निदान मला तरी असा उल्लेख केलेला आढळला नाही, चूक भूल देणे घेणे).

तर ही कथा आहे ‘गानू’ आज्जी आणि तिच्या भयाण ‘अंगाई’ ची!

गानू आजींची अंगाई

 

“त्या करकरीत तिन्हीसांजेला गानूआजींची अंगाई जशी मी ऐकली तशी ती दुसर्‍या कुणीही न ऐको,असं मला खुप वाटायचं;पण तसं घडायचं नव्हतं बहुदा.

जी भिती,जी काळीज गोठवणारी थंडगार भिती मी एवढी वर्षे मनाच्या जुनाट सांदीकोपर्‍यात गाडून टाकली होती,ती प्रचंड वेगाने सळसळत वर आली आहे. हजारो जहरी नागांनी एकावेळी दंश करावा असं काहीसं झालं आहे. सर्वांगाला कंप सुटतोय,हातपाय लुळावलेत आणि घशाला कोरड पडली आहे.
परवा मला गानू आजींची अंगाई आठवली.
गानू आजींची अंगाई !”

 

“पुढल्या आयुष्यात मी पराकोटीचा नास्तिक झालो;पण गानुंचे देवघर आठवले की हमखास अंगावर काटा येतो. काय होतं एवढं घाबरण्यासारखं तिथं !

आज विचार करू लागलो तर कधीकधी नवल वाटतं.पण मनातून कुठंतरी त्या भीतीचं कारण ठाऊक आहेच की मला.गानू आज्जी ! देवघारालगतची त्यांची ती खोली !! आणि त्यांची ती हिडीस, भेसूर अंगाई !!”

ही गानू आज्जी शी झालेली पहिली भेट:

“वितभर अंतरावरून तिचे ते हिरवे डोळे रोखून ती माझ्याकडेच पहात होती. एकाएकी तिची गालफाडं ताणली गेली, घशातली घरघर वाढली. आणि तिचे डोळे लकाकू लागले. गालावर उमटण्यास असमर्थ असणारं हसू तिच्या डोळ्यांतून ओसंडत होतं. पण तिच्या डोळ्यांतून जे ओसंडत होतं त्याला हसू तरी म्हणता आलं असतं का ?
तो आनंद होता. तिच्या डोळ्यातल्या त्या आनंदात क्रौर्य आणि खुनशीपणा होता; आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं. त्या आनंदात एक आधाशीपणा होता.”

वादळा पूर्वीची शांतता म्हणा हवे तर पण वर्णन अप्रतिम आहे:

“उन्हाचे ठिपके तर माझ्या डोळ्यांसमोर सावळसर होत नाहीसे झाले. झाडांच्या सावल्या लांब होत होत पार माजघरात शिरल्या आणि नंतर दिसेनाशा झाल्या. गानुंच्या बागेत संधीप्रकाश जरा जास्तच काळसर वाटतो. काळोखाचा सख्खा भाऊच म्हणा ना. संधीप्रकाश फार काळ रेंगाळलाच नाही. आल्या आल्याच गुल झाला. म्हणता म्हणता बाग काळीठिक्कर पडली. आता नजरेस पडत होते ते झाडांचे नुसते आकार. अंधाराने गिळलेले. अंधार पुरेसा पडतो न पडतो तोच आकाशातून लठ्ठ वाटोळा चंद्र झरझर वर आला आणि एके ठिकाणी स्थिरावला. चंद्राच्या प्रकाशानं गानुंच्या परसात अनेक नक्षी चितारल्या. परसातल्या पाचोळ्यावर निळसर चंदेरी रंगाचे ठिपके पडले. बाहेर आता मंद वारे वाहु लागलेले. वार्‍याच्या झुळुका अंगावर सुखद थंडावा आणत होत्या.”

आल्या, आल्या गानू आज्जी आल्या..

“बोळाच्या तोंडाशी गानुआजी होत्या. चार पायांवर एखादं कुत्रं चालावं तशा रांगत रांगत पुढे सरकणार्‍या गानु आजी !
हो….गानु आजीच!

त्यांचा तो चेहरा मी कधीही विसरलो नसतो.माझ्या शरीरावरचा केस नं केस ताठ झाला. तिच अतिपरिचीत भीतीची थंड जाणीव पूर्ण त्वेषाने शरीरभर पसरली. पाय लटपटू लागले. त्या इथवर कशा पोहोचल्या मला कळलंही नव्हतं.

आणि मग त्यांच्या घशातली ती घरघर मला ऐकू येऊ लागली. जातं दळावी तशी. घरघर..घरघर…
त्या तशाच चार पायांवर रांगत पुढे आल्या. “

‘‘ आज्जीला भूक लागलीये. भूक. किती दिवसांपासून उपाशी आहे आज्जी. आज खाणार. अगदी मनोसक्त खाणार.’’ असं म्हणत त्या खिऽखिऽ करत हसल्या. त्यांनी छोट्या माधवला वर उचलत तोंडाशी घेतलं आणि त्यांच्या त्या लांबलचक तांबड्या जिभेनं त्याला चाटायला सुरुवात केली.”

आणि गानू आज्जी ची अंगाई सुरु झाली…

“त्यांच्या त्या भेसूर स्वराला आसमंताने साथ द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या किरट्या, कर्कश आवाजाने सभोवताल भारला गेला. बाहेर पानं सळसळू लागली. गोठ्यातल्या गाईंनी जिवाच्या आकांताने हंबरायला सुरुवात केली.

त्यांच्या आवाजात एके प्रकारचा शब्दभ्रम होता. तो स्वर भूल पाडत होता. आजुबाजुच्या निर्जीवाला, अचैतन्याला अवाहन करीत होता. माजघरात काहीतरी जिवंत होऊ लागलं.
आजवर मृत असणारं, किंवा कधीच जिवंत नसणारं असं काहीतरी आज्जींच्या त्या सूरात सूर मिसळून गाऊ लागलं.

‘‘बाळाचे ओठ
जसे जास्वंदी देठ
चाऊन खाया
मजा येई
जो जो रे अंगाईऽऽऽ’’

माजघराच्या भिंती, भिंतीवरल्या मातीची फेफडं, माजघराची दारं अगदी सारं काही जिवंत झाल्यासारखं वाटत होतं.किती अभद्र आकार होते ते !  भिंती सोलीव कातडी सारख्या लाल तांबूस दिसू लागल्या. कातडीचा एक एक पापुद्रा सोलून काढावा तसे भिंतीचे पापुद्रे ओघळून पडत होते. दरवाजांचा तर रंगच बदलला होता. काळपट लाल रंगाची ती दारं न जाणो कोणत्या जमान्यातील भासत होती. आजींच्या त्या भेसूर सुरांना जसजशी इतर आवाजांची साथ मिळत गेली तसतशा त्या अधिकच बेभान होत गाऊ लागल्या.

‘‘सांडलं रगत
बघतो भगत
रगताची चटक
त्याला लागी
जो जो रे अंगाईऽऽऽ ’’

मग पुढे काय झाले ? मी सांगत नाही , त्यासाठी मूळ कथाच वाचा आणी तो सारा थरार अनुभवा काय?

हा, पण कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यकती काळजी घ्यावी.

ही घ्या मूळ कथा …

कथा लेखक: श्री ऋषीकेश गुप्ते.

(श्री. ऋषीकेश गुप्ते. यांच्या वेबसाईट ला काही समस्या आहेत असे अनेक वाचकांनी कळवले,  मी ह्या साईट ला गेलो  असता मलाही ‘इरर  मेसेज ‘ मिळाला … म्हणून त्या वेबसाईट ची लिंक नाईलाजाने काढून टाकावी लागत आहे , क्षमस्व)

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

9 प्रतिक्रिया

///////////////
 1. aswalya

  नमस्कार.
  ही कथा मूळ नारायण धारपांची आहे असं तुम्ही म्हटलंय – ती कथा कुठली ते कळू शकेल का?

  0
  1. सुहास गोखले

   मला आता त्या कथेचे नाव आठ्वत नाही पण श्री. गुप्तेंची गानू आजी , ही नक्कीच श्री. नरायण धारपांच्या कथे वर आधारीत आहे श्री नारयण धारपांच्या कथेतही एक म्हातारी असते आणि तिच्या पासुन वाचण्याचा एक कोड वर्ड असतो . त्यातही एक लहान मुलगा त्या म्हातारीच्या तावडीत सापडतो , मुलगा कोड वर्ड विसरतो पण अगदी शेवट्च्या क्षणी त्याला तो कोड वर्ड आठवतो आणी तो आपली सुटका करु घेतो. श्री. गुप्तेंनी हीच कथा अधीक खुलवून मोठी केली आहे. पण श्री. गुप्तेंनी ह्या कथेचे श्रेय श्री. नारायण धारपांना द्यायला हवे होते असे वाटते.

   सुहास

   0
 2. aswalya

  नक्कीच!
  गुप्त्यांची दुसरी एक कथा (काळ्या कपारी) ही स्टीफन किंगच्या N ह्या कथेची नक्कल आहे असं कळलं, म्हणून ह्या कथेबद्दल विचारणा केली.
  प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  0
 3. sagar

  मला ऋषिकेश गुप्ते यांची वेबसाईट मिळू शकते का ?

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.